वाचकांना कदाचित असे वाटेल की शिर्षक चुकले आहे. दिलीपकुमारसाठी रफी गातो तेंव्हा..., देव आनंदसाठी रफी गातो तेंव्हा... किंवा शम्मी कपुरसाठी रफी गातो तेंव्हा... असे शिर्षक योग्य आहे. कारण या नायकांसाठी मोहम्मद रफीचा आवाज आपल्या मनात ठसून आहे. पण किशोरकुमार जो की स्वत:च एक चांगला गायक होता त्यासाठी मोहम्मद रफीचा आवाज... पण हे खरं आहे. 31 जूलै ही रफीची पुण्यतिथी तर 4 ऑगस्ट ही किशोरची जयंती.
कल्पना करा मस्तीखोर किशोरकुमार छब्बा जाकिट धोतर घालून व्यवस्थित भांग पाडून हाती तंबोरा घेवून मांडी घालून बसला आहे. समोर नटखट मधुबाला किंवा मुमताज किंवा शुभा खोटे कोणी नसून शास्त्रीय नृत्यांत निपूण असलेली पदमिनी सारखी सौंदर्यवती आहे. किशोरकुमार तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडातून मोहम्मद रफीचे सूर बाहेर पडतात. शास्त्रीय रागदारीवर आधारीत ‘मन मोरा बावरा’ हे गाणं किशोरकुमारसाठी रफीने गायले आहे. 1958 ला आलेल्या ‘रागिणी’ या चित्रपटातील हे गीत आहे. अजून एक आश्चर्य म्हणजे या गाण्याचा संगीतकार कुणी शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध असलेला संगीतकार नाही. तर मस्तीखोर चालीसाठी टांग्याच्या ठेक्यासाठी प्रसिद्ध असलेला ओ.पी.नय्यर हा या गाण्याचा संगीतकार आहे. नुसता रफीच नाही तर तेंव्हाचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक फतेह अली, अमानत अली आणि उस्ताद अमीर खान यांचेही आवाज किशोरकुमारसाठी ओ.पी.नय्यरनी यात वापरून कमाल केली आहे. ‘ललत’ रागातील अमीर खां यांची प्रसिद्ध बंदिश ‘जोगिया मोरे घर आये’ ही याच चित्रपटात आहे. सध्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खां ही बंदिश अप्रतिम गातात. पण याही चित्रपटाच्या आधी १९५६ मध्ये "भागम भाग" नावाचा किशोरकुमार भगवान दादा यांचा चित्रपट आला होता. त्यालाही संगीत ओ पी नय्यर यांचेच होते. "चले हो कहा करके जी बेकरार" असे एक गोड गाणे रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात आहे. पडद्यावर शशिकला आणि किशोरकुमार आहेत. यात खरे तर किशोर रफी अशी दोन गाणी आहेतही. याच चित्रपटात अजून एका गाण्यात किशोरकुमार साठी एस. डी. बतीश यांचा आवाज वापरला आहे. ( दिल दिया दौलत को- रफी व एस डी बतीश)
शंकर जयकिशनने किशोरकुमारचा वापर फार थोडा केला असा समज आहे. गंमत म्हणजे मुकेशच्या बरोबरीनेच किशोरकुमारची गाणी शंकर जयकिशनकडे आहेत. रागिणीनंतर दुसर्याच वर्षी 1959 मध्ये ‘शरारत’ नावाच्या शंकर जयकिशनच्या चित्रपटात किशोरकुमारच्या तोंडी रफीचे गाणे आहे. ‘अजब है दास्ता तेरी ऐ जिंदगी । कभी हसा दिया रूला दिया कभी ॥ असे या गाण्याचे साधे पण नितांत सुंदर बोल हसरत जयपूरीने लिहीले आहेत. हे खरंच अजब आहे की मस्तीखोर किशोरकुमार शांतपणे पियानोवर बसून मीनाकुमारी समोर हे गाणं सादर करतो आहे. शंकर जयकिशनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शैलेंद्र व हसरत जयपूरी सोडून कुणाचीच गाणी कधी वापरली नाहीत. बी.आर.चोप्रा यांनी विविध संगीतकारांना आपल्या चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी बोलावले. पण गीतकार म्हणून साहिर त्यांनी कधी सोडला नाही. एकदा त्यांनी शंकर जयकिशनला आमंत्रित केलं. सर्व अटी दोघांनाही मान्य झाल्यावर गीतकारासाठी त्यांनी साहिरच्या नावाचा आग्रह धरला. साहिर तसा चित्रपटसृष्टीतील फार मोठा प्रतिभावंत गीतकार. पण शंकर-जयकिशनने शैलेंद्र आणि हसरत जयपूरीशिवाय संगीत देणार नाही म्हणत करार मोडून टाकला. ज्याच्यासाठी शंकर जयकिशन आग्रही होते तो हसरत जयपूरी एक साधा बस कंडक्टर होता.
चौथ गाणं रफीने किशोर कुमारसाठी गायलं ते ‘बागी शहजादा’ (1964) या चित्रपटासाठी. किशोरकुमार आणि कुमकुमवर हे गाणं चित्रित झालं आहे. रफीसोबत आहे सुमन कल्याणपूर. बीपीनदत्त या अनोळखी संगीतकाराने हे गाणं गावून घेतलं आहे. गाण्याचे बोल फारच मधूर आहेत. ‘मै इस मासूम चेहरेको अगर छू लू तो क्या होगा?’ असा प्रश्न रफीने केल्यावर त्याला सुमन कल्याणपूर तशाच हळव्या आवाजात उत्तर देते, ‘अरे पागल वो ही होगा जो मंजूर ए खुदा होगा.’ रफी-सुमन कल्याणपूर ही जोडी फार काळ टिकली. त्याचं कारणही मोठं गंमतशीर आहे. गाण्याची रॉयल्टी घेण्यावरून लता मंगेशकरने पहिल्यांदा आवाज उठवला. गाण्याच्या रेकॉर्ड जशा खपल्या जातात तशी जास्त रॉयल्टी आपल्याला भेटली पाहिजे असा लताचा आग्रह होता. त्याला रफीने दिलेले उत्तर फार तात्विक आणि त्याची स्वच्छ नितळ मानसिकता सांगणारे आहे. रफीचे म्हणणे होते की चित्रपटासाठी गाताना आपण आपले एक मानधन सांगितलेले असते. आणि ते आपल्याला निर्माता देतो. चित्रपट पडला तर आपण आपल्याकडून पैसे परत देतो का? मग चित्रपटाची गाणी चालली तर आपल्याला जास्त पैसे मागायचा काय हक्क आहे? परिणामी लता-रफी यांच्यात बेबनाव झाला. मग रफीसोबत कोण गाणार? अशावेळी सुमन कल्याणपुरचा आवाज संगीतकार रफीसोबत वापरायला लागले. सुमन कल्याणपुरने आपल्या गोड आवाजात या संधीचं सोनचं केले आहे.
पाचवे गाणे ‘प्यार दिवाने’ (1972) चित्रपटातील आहे. हे गाणे मात्र अगदी किशोरकुमारला शोभावं असेच मस्तीखोर आहे. खरं तर हे गाणे त्याने स्वत:च का गायले नाही कळत नाही. समुद्रकिनार्यावर नटखट मुमताजच्या मागे लागलेल्या किशोरकुमारच्या तोंडी ‘अपनी आदत है सबको सलाम करना, हुस्नवालो को हसके कलाम करना, क्या खबर थी की आप बुरा मानेंगे’ हे शब्द खरंच शोभून दिसले असते. रफीनेही या गाण्याला योग्य न्याय देत आपणही ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’ आवाजाचे आहोत हे दाखवून दिले आहे. या गाण्याला लालासत्तार या अनोळखी संगीतकाराचे संगीत आहे.
‘आराधना’ या चित्रपटासाठी रफीच्या आवाजात दोन गाणी सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली. (बागो मे बहार है, गुन गना रहे भवरे) पण नंतर ते आजारी पडले. मग त्यांचा मुलगा राहुलदेव बर्मन याने रफीऐवजी किशोरकुमारला घेवून बाकी गाणी संगीतबद्ध केली. त्या गाण्यांनी किशोरकुमार बघता बघता पहिल्या क्रमांकाचा पार्श्वगायक बनला. रफीनेच किशोरकुमारसाठी गायलेल्या ‘अजब है दास्ता तेरी ऐ जिंदगी’ प्रमाणेच इथेही घडले. ज्या आर.डी.बर्मनने रफीऐवजी किशोरकुमारचा आवाज वापरला त्याच आर.डी.बर्मनने एक सुंदर गाणे ‘क्या हुआ तेरा वादा’ (हम किसीसे कम नही 1977) रफीला दिले. रफीला याच गाण्यासाठी त्याच्या आयुष्यातले एकमेव राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.
त्या काळातील चार महत्त्वाचे आवाज रफी, किशोर, लता आणि मुकेश अमर अकबर अँथनी साठी लक्ष्मीकांत प्यारेलालने वापरले. ते गाणे होते ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे’. नंतर परत कधीच इतके आवाज एकत्र ऐकायला मिळाले नाही.
हिंदी चित्रपट संगीतात 1949 (शंकर जयकिशनच्या ‘बरसात’ चित्रपटापासून) ते 1966 (राहूल देव बर्मन यांच्या ‘तिसरी मंझिल’पर्यंत) चे युग म्हणजे सुवर्ण युग आहे. या काळातील पाच आवाज सर्वात जास्त प्रभावी ठरले. लता, रफी, किशोर, गीता आणि आशा. कारण हे आवाज अष्टपैलू होते. सर्व भावभावना या आवाजात समर्थपणे व्यक्त करण्यात संगीतकार यशस्वी ठरले. इतर आवाज मन्ना डे, शमशाद, मुकेश, तलत, हेमंतकुमार यांचा एक विशिष्ट बाज होता. त्या पलीकडे ते फारसे जावू शकत नव्हते. यांचा प्रभाव निश्चतच होता पण त्यांच्याकडे अष्टपैलूत्व नव्हते.
या काळात एक निकोप स्पर्धा होती. त्यामुळे शैलेंद्र या गीतकाराने स्वत: चित्रपट काढला (तिसरी कसम) तेंव्हा त्यातील सर्व गाणी स्वत: न लिहीता त्याने हसरत जयपूरीलाही दिली. हेमंतकुमार या गायक संगीतकाराने इतर गायकांना आपल्याकडे सन्मानाने गायला लावले. गीता दत्त आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल खर्याखोट्या अफवा लोक उठवतात. पण गीता दत्त गेल्यावर तिला श्रद्धांजली म्हणून लतानेच तिच्या गाण्याचा कार्यक्रम आपल्या आवाजात सादर केला हे कोणी सांगत नाही.
1949 ते 1966 या काळातील संगीताने आपले कान समृद्ध केले आहेत. त्यातील दोन महत्त्वाचे पुरूषी आवाज रफी -किशोर यांच्या पुण्यतिथी व जयंती निमित्ताने आपण त्यांच्याच स्वरांतून त्यांना आठवूया.
किशोरची अजून काही गाणी या विषयावर अभ्यास करताना सापडत गेली.. खाली अशा गाण्यांची यादी दिली आहे..(दि. २० जून २०१८)
किशोर कुमार साठी इतर गातात तेंव्हा
किशोर कुमार साठी इतर गातात तेंव्हा
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment