-----------------------------------------------------
६ जुलै २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख

राजमान्य राजश्री, तमाम हिंदी चित्रपट प्रेक्षकांचे लाडके, आधुनिक भारतातील महान समाज सुधारक मा. आमीर खान यांनी आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात अन्नधान्याबाबत बर्याच गोष्टी सत्य वाटाव्या अशा रेटून सांगितल्या. परिणामी, टीव्ही बघणे हीच सामाजिक जबाबदारी मानणारे तमाम आळशी, सुस्त टीव्ही प्रेक्षक यांनाही तेच खरे वाटू लागले आहे. आपल्याकडे प्रचलित असलेला दुसरा एक शब्द आहे निसर्ग शेती. म्हणजे नैसर्गिकरीत्या पिकलेले अन्न खायचे. याची भलामण करणार्यांच्या हे लक्षातच येत नाही, शेती हीच मूळात निसर्गाच्या विरुद्ध मानवाने केलेली सगळ्यांत मोठी कृती होय. शेतीचा इतिहास किमान 10,000 वर्षांचा आहे. कितीतरी वर्षांच्या अनुभवानंतर शेती प्रक्रियेमध्ये आणि पिकांमध्ये बदल होत गेला. निसर्गात जे उपलब्ध आहे, त्याच्यावरच अवलंबून राहिलो असतो, तर आज जी प्रगती दिसते आहे ती दिसली नसती. शेतीचा शोध लागण्याआधी लाखो वर्षांपासून मानवाचं अस्तित्व या पृथ्वीतलावर होतं; पण त्याला प्रगती साधता आली नाही. एका आदीम अवस्थेमध्येच लाखो वर्षे माणूस राहिला. शेती करायला लागल्यापासून एक नवीन विकासाचा मार्ग माणसाला सापडला. त्या दिशेने केलेल्या प्रवासातून आजचं जग आपल्यासमोर दिसतं आहे. हे सगळं माहीत असताना परत एकदा निसर्गशेती खरी, नैसर्गिकरीत्या पिकवलेले पदार्थ चांगले, रसायनं म्हणजे एकदम वाईट हे अध्यात्मिक गारूड का पसरवलं जात आहे?
आमीर खानचा कार्यक्रम बघत असताना प्रेक्षकांना हेही कळत नाही ते खात असलेल्या आंब्याच्या फोडीही रासायनिकरीत्या पिकवलेल्या आहेत. आज माणूस वापरत असलेली अन्नधान्य ही रासायनिकदृष्ट्या पिकवलेली आहेत आणि तरीही बोलताना मात्र नैसर्गिकरीत्या पिकवलेल्यांचा बोलबाला पसरवला जातो. या ढोंगाचे कारण काय?
भारतीय इतिहासात अशा ढोंगाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. एकीकडे भौतिक जग हे नश्वर आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे धर्माच्या नावाखाली मोठमोठी देवळं उभारायची, त्या ठिकाणी संपत्ती गोळा करायची आणि त्या अधिकारावरून सर्वसामान्य जनतेचं शोषण करायचं. प्रत्येक वेळी भोगाला दुय्यम समजायचं, देहधर्मांना क्षुल्लक मानायचं, स्वाभाविक वासनांकडे दुर्लक्ष करायचं आणि दुसरीकडे सगळ्या भोगवादी वृत्तींना आपलंसं करायचं हे एक ढोंग आपल्याकडे दिसून येतं. त्याचाच हा आधुनिक अवतार. निसर्गत: पिकवलेल्या पिकाची फॅशन शहरी किंवा शेतीपासून तुटलेल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. स्वत: कृत्रिम धागे वापरायचे, त्यांच्या किफायतशीर किमती, त्यांचा टिकाऊपणा याचा उपयोग करून घ्यायचा आणि बोलताना मात्र सुती कपड्यांचे महत्त्व सांगायचे. मुंबईचे एक प्रसिद्ध कवी आम्हाला तावातावाने दहा वर्षांपूर्वी एकदा बीटी कॉटनच्या वापरामुळे शेतकरी कसं देशाचं नुकसान करतो आहे, हे सांगत होते. त्याचे वेगवेगळे दाखले देत होते. आपल्याकडचे देशी बियाणे किती चांगले आहे आणि त्याचाच कापूस कसा चांगला असतो हेपण सांगत होते. तेव्हा त्यांना कसलाही प्रतिवाद न करता आम्ही शांतपणे इतकाच मुद्दा मांडला होता. ‘बीटी कापूस हा निदान शेतकर्याच्या जीवनमरणाचा प्रश्र्न आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रविरोधी काम केलं असं मान्य करूयात; पण पेप्सी आणि कोकाकोला या तर काही जीवनावश्यक गोष्टी नाहीत. मुंबईतलं तर सोडाच, तुमच्या चेंबूरमधलंही सोडा, तुमच्या कॉलनीतलं - अपार्टमेंटमधलं सोडा, तुमच्या स्वत:च्या घरातला पेप्सी आणि कोकाकोला बंद करून दाखवा आणि मग माझ्याशी या विषयावर गप्पा करा. बाष्कळ गोष्टींवर चर्चा करायला आम्हाला वेळ नाही.’ आधुनिकीकरणाचे सगळे फायदे उचललेला समाज अन्नधान्याच्या बाबतीत मात्र मागास विचार का करतो आहे? 1960 ला हरित क्रांती झाली नसती तर भूकेने लोक मेले असते हे सगळ्यांना माहीत आहे. रसायनांचा वापर ही गोष्ट आक्षेपार्ह नसून त्या संदर्भातलं तारतम्य काय आहे हे बघायला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाने अन्नधान्य जास्त प्रमाणात पिकवल्या जाणे हे तर आवश्यक आहेच; पण त्याचे जे आणि जसे काही दुष्परिणाम होत असतील ते तपासून त्यावर बंदी घालणे किंवा अशा गोष्टींना प्रोत्साहन देणारे किंवा त्याचा वापर करणार्यांना शासन करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्याबाबतीत काहीच घडत नाही. प्रत्यक्षात रसायनांचा वापर केलेलं खूप मोठ्या प्रमाणातलं अन्नधान्य, फळफळावळ आम्ही वापरतो, त्याचा दुष्परिणाम घडतो आहे, असं सरसकट चित्र गेल्या 50 वर्षांत कुठेही दिसलं नाही. काही ठिकाणी अतिरिक्त कीटकनाशके, रसायनांचा वापर केल्यामुळे गैरप्रकार घडले असतील; पण याचा अर्थ असा निघत नाही की, हा वापरच चूक आहे. विज्ञानाची दिशा ही विकासाकडे प्रगतीकडेच असते. काळाची चक्रे परत फिरवून मागे जाता येत नाही. हे ध्यानात घ्यायला हवे.
निसर्गशेतीचं अध्यात्मिक गारूड उभं करण्यात लोकांचे वेगळे असे स्वार्थ आहेत. आज मोठ्या प्रमाणात छोट्या गावांचं किंवा शेतीचं शोषण करून शहरी व्यवस्था उभी राहिली आहे. याचे दुष्परिणाम सगळ्यांना जाणवायला लागले आहेत. मग या अपराधी भावनेतून स्वत:चा दोष लपवण्यासाठी शेतीतल्या विविध गोष्टींबाबत मोठ्याप्रमाणात ओरड हाच वर्ग करत राहतो. उद्योगक्षेत्राला दोन वर्षांपूर्वी साडेचार लाख कोटींची करमाफी देण्यात आली होती; पण त्याबाबत चकार शब्द न बोलता शेतीक्षेत्राला दिल्या गेलेल्या 80 हजार कोटी कर्जमुक्तीची ओरड झाली. शासनाला नियमित स्वरूपात करोडो रुपयांनी डुबवणारा शहरी वर्ग शेतकर्याला इन्कम टॅक्स नाही म्हणून बोंब मारतो, त्यामधली मेख हीच आहे. शेती असो की आधुनिक जगातील आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा कितीतरी गोष्टी असो, यांच्या स्वागताची उदार भूमिका आपण घेतली पाहिजे. नवनवे बदल स्वीकारण्याची एक फार मोठी अशी भारतीय परंपरा आहे. आपला एकमेव देश असा आहे, की ज्याने विविध आक्रमणं पचवून स्वत:ची अस्मिता विविधतेसह टिकवून ठेवली. हे सगळं माहीत असताना परत एकदा जुन्या कर्मठ विचारांनी आधुनिकतेला विरोध करायचा, या मानसिकतेला काय म्हणावे?
आमीर खानचा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल ते जवळपास सगळे दूरदर्शनसंच त्यातील तंत्रज्ञान हे सगळं आधुनिक विज्ञानाचीच देणगी होय असं असतानाही शेतीमध्ये काही आधुनिक गोष्टी येत असतील तर त्याबाबत नकारात्मक दृष्टीकोन का ठेवायचा? बीटीचं युग संपलं आता जीएम युग येऊ घातलं आहे. खुल्या मनाने त्याचं स्वागत करूया.