उरूस, 2 जूलै 2020
हा फोटो देण्याची माझी जराही इच्छा नव्हती. विवेक बुद्धी असलेल्या माणसाने असे करू नये हे पण मला पूर्ण कळते. पण काल सकाळी ही घटना कश्मिरात घडली आणि त्यावरून जी भयानक चर्चा जमात-ए-पुरोगामींनी केली त्यामुळे माझा नाईलाज होतो आहे. नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी आपल्या एका कवितेत असं लिहीलं आहे ‘गाढवांच्या गर्दीत घोड्यांनी काय करावे? अपवाद म्हणून का होईना पण एक सणसणीत लाथ घातली पाहिजे.
पण यावर जेवढा विचार
कराल तेवढा थोडा आहे
शेवटी गाढवांना किमान एवढे
कळले तरी पुरे
की हे गाढव नसून
हा घोडा ताहे
-नारायण कुलकर्णी कवठेकर (मागील पानावरून पुढे चालू, मौज प्रकाशन, मुंबई)
त्या कवितेप्रमाणे एक लाथ घालण्याची वेळ आली आहे असे प्रकर्षाने वाटले.
कश्मिरात दोन आतंकवादी एका मस्जिदीत लपले असल्याची खबर सुरक्षा दलाच्या सैनिकांना लागली. त्यांना घेरण्यात आले. या आतंकवाद्यांनी त्यांच्याबाजूने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात एका 65 वर्षांच्या सामान्य कश्मिरी नागरिकाचा बळी गेला. (मी मुद्दाम त्याचे नाव सांगत नाही. बघु वाचणारे पुरोगामी काय प्रतिक्रिया देतात.) या वृद्ध कश्मिरी नागरिकाचा 3 वर्षांचा छोटा नातू त्या प्रेतावर बसून रडतो आहे असा हा हृदयद्रावक फोटो आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या मुलाला वाचविण्यासाठी प्राण पणाला लावले. या गोंडस बाळाला बाजूला सरक अशी खुण करणारा फोटो आज इंडियन एक्स्प्रेसने अगदी पहिल्या पानावर छापला आहे. (सोबत हा फोटो पण देत आहे.)
शेवटी या छोट्या बाळाला वाचविण्यात सुरक्षा दलाला यश आले. ज्या सुरक्षा अधिकार्याने या मुलाला पटकन कडेवर उचलून घेतले (त्याचेही नाव सांगत नाही. बघु पुरोगामी काय अंदाज बांधतात तो). त्याला गाडीत बसवून बिस्कीट चॉकलेट देतो म्हणूत त्याचे मन गुंतविण्याचा प्रयत्न केला. पण तो मुलगा आईचे नाव काढून मुसमुसत होता. त्याच्या तोंडून बाकी शब्दच फुटत नव्हते. या गोड बाळाला त्याच्या कुटूंबात सुरक्षीत पोचविण्यात आले.
खरं तर या घटनेवर कुठलेच आणि कसल्याच प्रकारचे राजकारण करण्याची काहीच गरज नव्हती. पण या नागरिकाचा मृत्यू सुरक्षा रक्षाकांच्या गोळीनेच झाला असला अश्लाघ्य दावा पुरोगाम्यांनी केला. वास्तविक माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षा सैनिकांनी सविस्तर माहिती नंतर दिली. अगदी किती गोळ्या झाडल्या त्या जागा दाखवल्या. समोरच्या बंद दुकानाच्या शटरवर त्या गोळ्यांच्या निशाण्या आहेत. रस्त्यावर सांडलेले रक्त दाखवले. गोळ्या मस्जिदीच्या दिशेने आल्या ते पण अगदी सहज तपासता येते.
असा सगळा ‘हा सुर्य हा जयद्रथ’ पुरावा असतानाही सुरक्षा दल सामान्य नागरिकांवर कसा अन्याय करतो आहे, सामान्य कश्मिरींचा जीव यांच्या गोळ्यांनी घेतला जातो आहे असा पाक धार्जिणा घाणेरडा देशद्रोही प्रचार केला जातो आहे तेंव्हा अपरिहार्यपणे हा फोटो शेअर करावा लागला.
(पुरोगाम्यांच्या देशविरोधी प्रचाराचा पुरावाही काही वेळातच समोर आला.आतंकवाद्यांच्या पाकिस्तानी ट्विटरवर याबाबत मेसेजही सापडला. हा मृत्यू सुरक्षा दलानेच केला असा प्रचार लगेच चालू करा. कारण आपली बदनामी होते आहे असा हा मजकूर आहे. टाईम्स नाऊ या वाहिनीवर याबाबत सविस्तर चर्चा बुधवार 1 जूलै 2020 ला करण्यात आली. ऑप इंडिया या यु ट्यूब वरही याबाबत माहिती उपलब्ध आहे.)
नुकतेच कश्मिरातील असे फोटो निवडून केल्या गेलेल्या फोटो पत्रकारितेला ‘पुलित्झर’ पुरस्काराने सन्मानिल्या गेले. आता या फोटोला पुरस्कार देणार अहात का? भाजप प्रवक्त संबित पात्रा यांनी हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करून पुरोगाम्यांना कोंडित पकडले.
ज्या ज्या कुणी पुलित्झर पुरस्कारांचे कौतूक केले आहे त्या सर्वांना माझे आवाहन आहे त्यांनी आता या फोटोवर आपली प्रतिक्रिया द्यावी.
तामिळनाडूमध्ये दोन जणांना (वडिल आणि मुलगा) लॉकडाउनमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा दुकान उघडे ठेवले या क्ष्ाुल्लक कारणाने पोलिसांनी पकडून नेले. कोठडीत मारहाणीत या दोघांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील गुन्हेगार असलेल्या जॉर्ज फ्लॉईडचे जे बोंबले आहेत त्यांचा आवाज आता कुठे गप्प झाला आहे? ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणणार्यांना आपल्याच देशातील सामान्य निर्दोेष माणसांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला तर त्याची वेदना जाणवत नाही का? तेंव्हा यांची कातडी गेंड्याची होते का?
एक वगळेच युद्ध देशात सुरू झाले आहे. काहीही घडले तरी एक देशविरोधी टोळी सक्रिय होते आणि आरडा ओरड सुरू करते. कश्मिरातील हे निरागस बालक तूमच्या राजकारणाचा विषय का बनते? याच्या आजोबांचा बळी घेणार्या आतंकवाद्यांना कुणी प्रोत्साहन दिले आहे?
हुरियत कॉन्फरन्सचे सय्यद अली शहा जिलानी यांना हुरियतच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागतो. परदेशांतील आपल्या मुला बाळांकडे उर्वरीत आयुष्य काढण्यासाठी देश सोडून जाण्याची वेळ येते हा आपल्या कश्मिर विषयक कडक धोरणाचा परिपाक आहे. गेल्या 6 महिन्यात 119 आतंकवाद्यांचा खात्मा केला जातो. एक एक आतंकवादी हुडकून त्यांचा समूळ नायनाट करण्याची मोठी मोहिम 370 कलम हटविल्यापासून जोमाने सुरू आहे.
370 कलम हटवताच लेह लदाख मध्ये सैन्याच्या हालचालींना गती मिळाली. सीमाभागात रस्ते, नदीवरील पुल यांची कामे जोरात सुरू झाली. सर्वात उंचीवरील विमानतळाची धावपट्टीची डागडुजी होवून तिचा वापर सुरू होतो. याचाच परिणाम म्हणजे चीनने केलेली गलवान मधील धुसफुस.
हे सगळं माहित असताना, चीनसोबत एकाच वेळी विविध पातळीवर संघर्ष सुरू असताना, तिकडे पाकिस्तानलाही सडेतोड जबाब दिला जात असताना हे पुरोगामी नेमकी देशविरोधी भूमिका का घेत आहेत?
सैन्याचे सर्वोच्य अधिकारी लदाखमध्ये जखमी सैनिकांची विचारपुस करायला जातीनं जात आहेत. एकाचवेळी मुत्सेद्दीगिरी, प्रत्यक्ष लष्करी हल्ल्याची पूर्ण तयारी, शस्त्र न वापरता साध्या साधनांनी हल्ले, आर्थिक पातळीवर बहिष्कार, चीनी ऍपवर बंदी असे सगळेच मार्ग अवलंबिले जात आहेत. आणि सर्व पुरोगामी मात्र, ‘हा भारताचा पराभव आहे, आपल्या 20 सैनिकांचे बळी घेणारे हे सरकार नामर्द आहे, आपल्या भूमीवर चीनने आक्रमण केले आहे, ऍप वर बंदीने काय होणार मॅप बदलला जातो आहे’ अशी ओरड का करत आहेत?
राजकारण राजकारणाच्या पातळीवर चालत राहिल. अधिकारी पातळीवर चर्चा चालू राहिल. सैनिक त्यांच्या पातळीवर संपूर्ण संघर्षासाठी सज्ज आहेतच. असल्या ‘पुलित्झारी’ पुरस्काराच्या जहरी प्रचाराचे विष तूमच्या मनात पेरले जात आहे ते केवळ आणि केवळ तूमचे मनोधैर्य खचावे म्हणून. हेच आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात केल्या गेले. कॉंग्रेस सारखा सर्वात जूना पक्षच या प्रचाराचे कंत्राट घेवून देशद्रोह करताना दिसत आहे. एक सच्चा देशप्रेमी नागरिक म्हणून तूम्ही या अपप्रचाराला बळी पडू नका ही हात जोडून विनंती.
आतंकवाद्यांच्या गोळीला बळी पडलेल्या त्या भारतीय नागरिकाला माझी विनम्र श्रद्धांजली.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575