काव्यतरंग, दै. दिव्य मराठी रविवार १० मे २०२०
अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मजुळ
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भोवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकून अपुले तनमन
विश्वच अवघे ओठां लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यामधुनी थेंब सुखाचे
‘‘हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव...’’
-इंदिरा संत
(इंदिरा संत यांची समग्र कविता, पृ. 147, पॉप्युलर प्रकाशन)
प्रेमाचा कुठेही संदर्भ आला की राधा कृष्ण येतातच. कृष्णाच्या प्रेमाबाबत जरा अजून पुढे गेलो तर रूक्मिणीचा संदर्भ येतो. कृष्ण रूक्मिणी हे तर सफल प्रेमाचे प्रतिक. पण कधीही कुठेही कुरूप असलेली कुब्जा हीचा विषय येत नाही. गोकुळातील एक कुरूप स्त्री या पेक्षा तिच्या बाबत काहीच जास्त माहिती नाही.
इंदिरा संत यांनी मात्र या कुब्जेची मानसिकता समजून तिला एक सामान्य माणसाचे प्रतिक मानून ही सुंदर अशी कविता लिहीली. प्रेमाचा एक अनोखा पैलू या कवितेच्या निमित्ताने रसिकांसमोर झळाळून उठला.
गोकुळातील पहाटेची वेळ आहे. सुंदर मोठा केशरी चंद्र मावळतीकडे निघाला आहे. अशा अवेळी यमुनातीरी मंजूळ पावा वाजतो. हा कुणासाठी आहे? रास खेळून सारे गोकुळ शांत झोपी गेले आहे. राधाही अजून जागी नाही. तेंव्हा यमुनातिरी उभ्या असलेल्या कुरूप कुब्जेच्या असे लक्षात येते की केवळ तिच जागी आहे तेंव्हा ही बासरी तिच्याचसाठी आहे.
कविता तशी समजून घ्यायला साधी सोपी आहे. या निमित्ताने इंदिरा संतांनी प्रेमाचा एक पैलू पुढे आणला आहे तो मात्र विलक्षण आहे.
कृष्णाच्या आयुष्यात एकूण 7 स्त्रीया महत्त्वाच्या आहेत. आणि या सात स्त्रीयांच्या निमित्ताने प्रेमाची निरनिराळी रूपं समोर येतात. पहिली स्त्री ही देवकी जिने 9 महिने कृष्णाला पोटात वाढवले ती जन्मदाती आई. दुसरी यशोदा जिने जन्म दिला नाही पण कृष्णाचा सांभाळ केला. आपल्या आयुष्यात जन्मदाती नसलेल्या पण आपल्याला जिव लावणार्या माया करणार्या स्त्रीया येतात. पूर्वीच्या काळी जन्मदाती लवकर मृत्यू पावली तर त्या बाळाला दुध पाजविण्यासाठी दुसर्या बाळांतिण बाईला विनंती केली जायची. सम्राट अकबर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीत अशा दुधआयांची उदाहरणं इतिहासात आहेत.
कृष्णाच्या आयुष्यातील तिसरी स्त्री म्हणजे अर्थातच जगप्रसिद्ध अशी राधा. ही राधा त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. हे प्रेम सफल होत नाही. पण चिरंतन राहिलेले असे हे प्रेमाचे प्रतिक आहे. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी गोकुळावाटा या मालिका कवितेत मोठे सुंदर लिहून ठेवले आहे
आपल्यातच असते राधा
आपल्यातच असतो कृष्ण
मन वृंदावन करण्याचा
इतकाच आपुला प्रश्न
चौथी स्त्री कृष्णाच्या आयुष्यात येते ती बहिणीच्या रूपातील सुभद्रा. भावा बहिणीच्या प्रेमात कृष्ण सुभद्रा हे इतके लोकप्रिय आहेत की जगन्नाथपुरीला जे मंदिर आहे तिथे कृष्ण-बलराम यांच्या सोबत जी तिसरी मुर्ती आहे ती सुभद्रेची आहे. भावा बहिणींला असे जगात कुठेही पुजले जात नाही.
पाचवी स्त्री कृष्णाच्या आयुष्यात येते ती रूक्मिणी. रूक्मिणी स्वतंत्र स्त्रीची अशी प्रतिमा आहे की जी आपल्या मनातील पुरूषाला संदेश पाठवून स्वत:चे हरण करण्यास सांगते व त्याच्या सांबत संसार करून एक आदर्श निर्माण करते. निर्णय घेणे आणि तो अंमलता आणणे, त्यासाठी झटून पूर्णत्व प्राप्त करणे याचे उदाहरण म्हणजे रूक्मिणी.
सहावी स्त्री कृष्णाच्या आयुष्यात येते ती सत्यभामा. सत्यभामेचा असा दावा आहे की ती यादव कुळातील असून त्या काळातील रितीरिवाजाप्रमाणे कुळशील बघून राजरोस विवाह करून कृष्णाच्या आयुष्यात येते. ती काही पळवून आणलेली नाही, ती काही दुसर्या जाती धर्मातील नाही. हा मुद्दा खरेच लक्षात घेण्यासारखा आहे की आपल्याकडचे बहुतांश विवाह हे कृष्ण-सत्यभामा पद्धतीचेच असतात. तेंव्हा सामान्य नवरा बायकोचे प्रतिक म्हणजे कृष्ण-सत्यभामा.
कृष्णाच्या आयुष्यातील सातवी लोविलक्षण स्त्री म्हणजे द्रौपदी. ही कृष्णाची प्रेयसी नाही. बहिण नाही. तर सखी आहे. भारतीय परंपरेतील उदारमतवादाचा पुरावा म्हणजे कृष्ण-द्रौपदीचे मैत्रीचे नाते. एक स्त्री आणि एक पुरूष केवळ मित्र असू शकतात हे आजपण सहजा सहजी पचत नाही. तेंव्हा असे एक नाते आपल्या पुराणांत आहे हे इथल्या परंपरेचे प्रगल्भपण समजून त्याचा अभिमान बाळगला पाहिजे.
कुब्जा ही आठवी अशी स्त्री आहे जी की सामान्य माणसाचे त्यातही कुरूप साध्या व्यक्तिमत्वाचे प्रतिक आहे. या साध्या व्यक्मित्वांत हा आत्मविश्वास आहे की मी पण कृष्णा सारख्या लोकविलक्षण दैवतावर प्रेम करू शकते.
मोनालिसा हा जगविख्यात चित्राबाबत असं म्हणतात की आत्तापर्यंत राजेरजवाडे आणि देवी देवतांचीच चित्र काढली जायची. पण मोनालिसा हे सामान्य माणसाचे पहिलेच चित्र आहे. ही स्त्री स्मितहास्य करून दर्शकांना संागू पहात आहे की मी पण चित्राचा कलेचा विषय बनू शकते. खरं तर पाश्चत्यांना हे माहित नाही त्याच्याही दीड एक हजार वर्षांपूर्वी आमच्याकडे अजिंठ्यात सामान्य माणसांची चित्रे रेखाटली गेली आहेत.
कुब्जा ही अशा सामान्य माणसांचे प्रतिनिधीत्व करते. कुब्जा- कृष्ण हे केवळ स्त्री पुरूष अशा प्रेमाचे प्रतिक नाही. एक अवतारी दैवी देखणे लोकविलक्षण व्यक्तीमत्व आणि एक सामान्य कुरूप व्यक्तिमत्व यांचीही जवळीक होवू शकते हे सांगणारे प्रतिक आहे.
महाभारतातील अशा कितीतरी व्यक्तिरेखा प्रसंग आहेत की ज्यांचा वेगळा अन्वयार्थ आपणाला आज लावता येवू शकतो. मानवी स्वभावाचे हजारो मनोज्ञ पैलू इथे आलेले आहेत. इंदिरा संतांना कुब्जा वेगळ्या पद्धतीनं दिसली. त्यांनी ती आपल्या प्रतिभेनं विलक्षण अशी रंगवली. इतरही पैलू आपण शोधून पाहू शकतो.
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575