विवेक, उरूस, मे 2019
महाकवी कालिदास याला आषाढाच्या पहिल्या दिवशी ‘मेघदूत’ हे काव्य स्फुरले. हा दिवस त्याच्या आठवणीत ‘कालिदास दिन’ नावाने साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस बुधवार 3 जूलै रोजी येतो आहे. या दिवशी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ नावाच्या सुंदर निसर्गवर्णनपर काव्यावर एका कार्यक्रमाचे नियोजन आम्ही करणार आहोत. त्यासाठी कालिदासावरील ग्रंथांचा शोध घेत होतो. ‘कालजयी कालिदास’ हे डॉ. बी.के. शुक्ल यांचे हिंदी पुस्तक समोर आले. पुस्तक अतिशय चांगले असल्याचे लक्षात आले. कालिदासाचा काळ, त्याच्या चरित्राबद्दल माहिती, त्याच्या एकूण साहित्यकृती, त्यावरील वाद, कालिदासच्या काळातील इतर लेखक अशी सर्व सविस्तर माहिती या ग्रंथात आहे.
हा ग्रंथ चाळत असतानाच अचानक डो़क्यात किडा आला की मराठीत वा. वि. मिराशी यांचे ‘कालिदास’ या नावाचे एक चांगले पुस्तक आहे. ते कधीतरी चाळले होते. हिंदीत वाचण्यापेक्षा मराठीतील पुस्तक वाचावे म्हणून परभणीच्या गणेश वाचनालयाचे ग्रंथपाल आमचे मित्र संदीप पेडगांवकर यांच्याकडे मागणी केली. अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची सगळ्यात जूनी पहिली आवृत्ती आमच्या या ग्रंथालयात सापडली. दूर्मिळ पुस्तकांच्या कपाटात हा अनमोल खजिना होता. हातात असलेले डॉ. शुक्ल यांचे हिंदी पुस्तक बाजूला ठेवून मिराशी यांचे जूने पुस्तक हाती घेतले. त्यावरची तारीख पाहूनच हरखून गेलो. मिराशी यांचे हे पुस्तक आहे इ.स.1934 चे.
नागपुरच्या ‘सुविचार प्रकाशन मंडळाने’ हे पुस्तक प्रकाशीत केले आहे. या पुस्तकाची आता नविन आवृत्तीही प्रकाशीत झाली आहे. मिराशी हे ‘कालिदास’ विषयातील भारतातील एक फार मोठे तज्ज्ञ मानले जातात. आत्तापर्यंत त्यांच्या मांडणीला प्रमाण मानल्या गेले आहे. मिराशींचे पुस्तक वाचत असताना अचानक मला ही सगळी वाक्यरचना ओळखीची वाटायला लागली. मी तर पुस्तक पूर्वी वाचले नव्हते. फक्त चाळले होते. मग हे वाक्यं मला का आळखीचे वाटत आहेत? मी समोरचे दुसरे पुस्तक बघितले. आणि अक्षरश: उडालोच. शुक्ल यांनी मिराशींच्या पुस्तकातील ओळ न ओळ भाषांतरीत केलेली आढळून आली.
मी जो संदर्भ शोधत होतो तो ‘ऋतुसंहार’ चा. तेंव्हा त्याच्यापुरती ही चोरी असेल असे वाटले. मग पुस्तकाची अनुक्रमणिका बघितली. ती सुद्धा शब्दश: चोरी केलेली. मिराशींच्या पुस्तकात 1. कालिनिर्णय 2. कालिदासकालीन परिस्थिती 3. जन्मस्थानाचा वाद 4. चरित्रविषयक अनुमाने 5. कालिदासची काव्यें 6. कालिदासाची नाटके 7. कालिदासीय ग्रंथांचे विशेष 8. कालिदासीय विचार 9. कालिदास व उत्तर कालीन ग्रंथकार अशी एकूण 9 प्रकरणे आहेत.
आता ‘कालजयी कालिदास’ या डॉ. शुक्ल यांच्या हिंदी पुस्तकाची अनुक्रमणिका बघा- 1. काल-निर्णय 2. कालिदासकालीन परिस्थिती 3. जन्मस्थान की समस्या 4. चरित्रविषयक अनुमान 5. कालिदास के काव्य 6. कालिदास के नाटक 7. कालिदास के ग्रंथों की विशेषताएँ 8. कालिदास के विचार 9. कालिदास और उत्तरकालीन ग्रंथकार.
पहिल्या प्रकरणातील पहिलीच ओळ मूळ पुस्तकातील अशी आहे- ‘आपले संस्कृत वाङ्मय अनेक विषयांत अत्यंत समृद्ध आहे.’ हिंदी कालिदास पुस्तकातील पहिलीच ओळ बघा- ‘हमारा संस्कृत साहित्य अत्यन्त संपन्न और अगाध है.’
निव्वळ शब्दश: भाषांतर करण्याच्या नादात आपण मुळ मराठी पुस्तकांचे संदर्भ या पुस्तकात जसे घेतले आहेत तसेच ते हिंदीतही घेत आहोत हे डॉ. शुक्ल विसरून गेले. कारण ते हे भाषांतर बुद्धी बाजूला ठेवून ठोकळेबाजपणे करत होते. आपल्या मुर्खपणाचे कित्येक पुरावे डॉ. शुक्ल यांनी पुस्तकात जागोजागी सोडले आहेत. जन्मस्थानाचा वाद या तिसर्या प्रकरणात मूळ पुस्तकात मिराशी यांनी शि. म. परांजपे यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘साहित्यसंग्रह भाग 1’. या पुस्तकातील 96 व्या पानावरील एक परिच्छेद मिराशी यांनी आपल्या पुस्तकात वापरला. डॉ. शुक्ल यांचे हे काम होते की त्यांनी हे मूळ पुस्तक कोणते त्याचा पहिले शोध घ्यायचा. पण त्यांनी ते कष्ट घेतले नाहीत. त्यांनी हे आपल्या आपल्या पुस्तकात हा परिच्छेद जशाला तसा घेतला. शिवाय कंसात पुस्तकाचे नाव आणि पृष्ठ क्रमांक देताना (साहित्य संग्रह भाग 1, पृ. 16) असे करून लिहीले. वस्तुत: मूळ मराठी पुस्तकाचा पृ. क्र. 96 असताना केवळ हा 9 आकडा न समजल्याने त्यांनी तो 1 करून टाकला. कारण यात कुठेच कसलाच विचार डॉ. शुक्ल करत नाहीत.
आपण कुठल्या पुस्तकांचे संदर्भ वापरले आहेत ते शेवटी परिशिष्टात नोंदविण्याची पद्धत असते. मिराशी यांनी आपल्या पुस्तकात ‘कांही संदर्भ ग्रंथ व लेख’ या नावाने सविस्तर परिशिष्ट दिले आहे. त्यात कालिदासाचे ग्रंथ, मराठी भाषांतरे, मराठी चर्चात्मक ग्रंथ, संस्कृत ग्रंथ, इतर भाषांतील ग्रंथ, शिवाय खालील नियतकालिकांतील कोरीव व चर्चात्मक लेख असे सगळे सविस्तर नोंदवले आहे. म्हणजे मुळात मिराशी यांनी किती कष्ट उचलले हे लक्षात येते.
डॉ. शुक्ल यांनी मात्र उचला उचली करताना हे सगळं विसरून केवळ ‘इतर भाषांतील ग्रंथ’ इतकीच यादी आपल्या पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट म्हणून जोडली आहे. आणि नेमकी इथे त्यांची चोरी अजूनच उघडी पडली आहे. इतर भाषांतील ग्रंथांची यादी देताना 1 ते 17 असे क्रमांक वा. वि.मिराशी यांनी दिले आहेत. चोट्टेपणा करताना शुक्ल यांनी ‘संदर्भ ग्रंथावलि’ असे नाव देत पृ. क्र. 255 वर एक चारच पुस्तकांची यादी दिली आहे. स्वाभाविकच कोणीही हे क्रमांक 1 ते 4 असेच देईल ना. पण हा माणूस मुळातच निर्बुद्ध चोर असल्याने त्याला ही चोरी पण नीट जमली नाही. त्याने 12 पासून 15 क्रमांकांची जी चार इंग्रजी पुस्तकांची नावे जशाला तशी कॉपी करत त्यांना क्रमांकही मुळ पुस्तकातीलच 12 ते 15 दिले आहेत. आता काय म्हणावं अशा वृत्तीला?
संपूर्ण पुस्तकात मिराशी यांच्या पुस्तकाचा कुठेही काहीही संदर्भ नाही. मिराशीच कशाला पण कुठल्याच मराठी लेखकाचा काहीही संदर्भ नाही. मिराशी यांनी जागोजागी आपल्या पुस्तकात ज्या मराठी पुस्तकांचे संदर्भ घेतले आहेत ते जशाला तसे हिंदीत शुक्ल देतात. पण या पुस्तकांची यादी परिशिष्टात देण्याचे मात्र सोयीस्कररित्या विसरून जातात. अगदी एक ना एक शब्द एक ना एक ओळ भाषांतरीत करून घेतली आहे. पण कुठेही मुळ लेखकाला जराही श्रेय दिले नाही.
यापुस्तकावरचा जास्त मोठा आरोप पुढचा आहे. शासनाच्या सार्वजनिक ग्रंथालयासाठीच्या राजा राम मोहनराय ग्रंथ खरेदी योजनेत या पुस्तकाचा समावेश झालेला आहे. हे पुस्तक सदर प्रकाशकाकडून खरेदी करून महाराष्ट्रातील ग्रंथालयांना भेट म्हणून पाठविण्यात आले आहे. ही तर जास्त गंभीर बाब आहे. 2016 साली या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. निदान पुस्तकावर तरी तशी तारीख छापली गेली आहे.
वासुदेव विष्णु मिराशी हे अतिशय विद्वान असे संस्कृत पंडित. नागपुरच्या मॉरिस कॉलेजमध्ये ते प्राध्यापक राहिलेले आहेत. नागपुरपासून जवळच असलेले रामटेक हे कालिदासाच्या मेघदुतचे जन्मस्थान. तेथे कालिदास विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील या ठिकाणाचा अभिमान बाळगत एक मराठी माणूस कालिदासावर अतिशय मोलाचा असा ग्रंथ 85 वर्षांपूर्वी लिहीतो. या ग्रंथाची इंग्रजीत आणि इतरही भाषांत लेखकाला पुरेसा सन्मान देवून भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. आणि असं असताना डॉ. बी.के.शुक्ल नावाचा एक कुणी उपटसुंभ हिंदी लेखक या पुस्तकाचे शब्दश: हिंदीत भाषांतर करून आपल्याच नवाने छापतो. आणि हा ग्रंंथ एका शासकीय योजनेद्वारे सार्वजनिक ग्रंथालयांसाठी खरेदी करून भेट म्हणून पाठवला जातो हा प्रकार आपल्या ग्रंथालय संस्कृतीला लांच्छन आहे. भारतातील इतर प्रदेशांत हाच ग्रंथ गेला असेल तर ते याच माणसाला कालिदासाचा अभ्यासक मानून याचेच संदर्भ देत बसतील. मुळ संशोधन करणार्या वा. वि.मिराशींचे श्रेय नाकारले जाईल.
याची तमाम मराठी माणसांनी संबंधीतांनी गंभीर दखल घेवून या पुस्तकावर योग्य ती कार्रवाई केली पाहिजे.
(मुळ पुस्तक : कालिदास, लेखक- वासुदेव विष्णु मिराशी, प्रकाशक-सुविचार प्रकाशन मंडळ, लिमिटेड, नागपूर, 1934,
हिंदी पुस्तक : काजजयी कालिदास, लेखक : डॉ. बी.के.शुक्ल, प्रकाशन- राष्ट्रीय साहित्य सदन, यमुना विहार, दिल्ली 110053. प्रकाशन वर्ष 2016.
लेखकाचा पत्ता. डॉ. बी.के. शुक्ल, देवभूमि, राजनगर, पालमपुर-176062 हिमाचल प्रदेश.)
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575