Friday, March 29, 2019

‘कन्हैया कुमारा’ । संसद उंबरा । गाठणार कसा? ॥


विवेक, उरूस, मार्च 2019

सहा महिन्यांपूर्वी कन्हैय्या कुमार यांनी देशभरात भाषणांचा सपाटा लावला होता. संविधान बचाव असे ते अभियान होते. या सभांना किती उपस्थिती आहे हे कधीच दाखवले जायचे नाही. पण या भाषणांना माध्यमांतून मोठी प्रसिद्धी मिळायची. त्या वातावरणात पत्रकारांनी त्यांना विचारले होते ‘तूमची राजकीय भूमिका काय? तूम्ही आत्तापर्यंत विद्यार्थी होता पण आता भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सी.पी.आय.) चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अहात. पक्षाचे अधिकृत नेते अहात. भाजपला विरोध करायचा म्हणजे केवळ भाषणं करून जमत नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत उतरावे लागते.’ यावर उत्तर देताना कन्हैय्या कुमार यांनी आपण बिहारमधील बेगुसराय या आपल्या मतदारसंघातून लोकसभा लढवायचे जाहिर केले होते. 

लगेच पुरोगामी माध्यमांना आनंदाचे भरते आले. त्यांनी यावर मोठ्या बातम्या केल्या. आणि असं चित्र उभे केलं की आता केवळ निवडणुकीची घोषणा व्हायची किरकोळ औपचारिकता बाकी आहे. कन्हैय्या कुमार यांना प्रचंड असा प्रतिसाद लोकांमधून मिळतो आहे. भाजप विरोधी पक्षही त्यांना ‘महागठबंधन’चा एकमेव उमेदवार म्हणून उभा करतील आणि ते निवडून येतील. 

पत्रकारांनी मग यावर प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विचारले. नितीशकुमार स्वत: विद्यार्थी दशेपासून राजकारणात आहेत. त्यांनी तथाकथित ‘महागठबंधन’ची चव चांगलीच चाखली आहे. त्यांनी फार जबाबदारीने प्रतिक्रिया दिली, ‘लोकशाहीत प्रत्येकाला निवडणुक लढवायचा अधिकार आहे. कन्हैय्या एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत. निवडणूक लढवणे न लढवणे हा संपूर्णत: त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. माझ्या त्यांना निवडणुकांच्या सक्रिय राजकारणा साठी शुभेच्छा !’

यातील गोम पत्रकारांच्या लक्षात आली नाही किंवा त्यांना ती लक्षात घ्यावी वाटली नाही. पत्रकारांनी खरं तर बिहारातील ‘महागठबंधन’ चे मुख्य सुत्रधार लालुप्रसाद किंवा त्यांचा वारसा चालविणारे त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना विचारायला हवे होते. पण त्यांनी या पुरोगामी नेत्यांना गृहीत धरले. आणि नेमकी हीच चुक पुरोगामी पत्रकारांची झाली. जी गोष्ट इतक्या दीर्घ अनुभवांनी नितीश कुमारांना कळली होती ती तथाकथित पुरोगामी पत्रकारांना कळण्याची शक्यता नव्हती. त्यांनी आपल्या बातम्या लेख आंधळ्या भाजप संघ द्वेषाच्या जोशात रंगवायला सुरवात केली.

प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झाली. निवडणुका होणारच नाही अशी बोंब आधीच पुरोगाम्यांनी केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुका जाहिर झाल्या तेंव्हा त्यांना जरा धक्काच बसला. मग ‘महागठबंधन’ची बोलणी सुरू झाली. प्रत्यक्ष निवडणुका जाहिर झाल्या नव्हत्या तोपर्यंत महागठबंधन हा विषय जोरात होता. पण प्रत्यक्ष 

जेंव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला
जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला

असे जे सुरेश भटांनी लिहीले आहे त्या प्रमाणे सुरू झाले. आपल्या आपल्या पक्षात सगळे दडायाला लागले. काहींनी तर निवडणुकीत सपशेल माघारच घेतली. कन्हैय्या कुमार यांच्या बिहारात ‘महागठबंधन’ जो प्रयोग सुरू झाला त्यात नेमकी डाव्या पक्षांनाच जागा शिल्लक ठेवण्यात आली नाही. लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने 40 पैकी 20 जागा स्वत:कडे ठेवल्या. यातील एक जागा शरद यादवांना सोडली. अट इतकीच की त्यांनी राजदच्या चिन्हावर लढायचे. आणि आपला पक्ष निवडणुकीनंतर राजदमध्ये विलीन करायचा. एक जागा सी.पी.आय. (एम.एल.) या कम्युनिस्ट गटाला सोडली. 

आता उरलेल्या जागांपैकी किमान एक जागा कन्हैया कुमार साठी सोडतील असे अपेक्षीत होते. पण ते तसे घडले नाही. आणि यासाठी जे कारण देण्यात आलं ते पुरोग्याम्यांच्या तोंडात चपराक मारणारं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की बेगुसराय येथे भाजपने केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांना तिकीट दिले आहे. ते कन्हैय्याकुमार यांच्याच जातीचे (भूमीहार) आहेत. मग कन्हैय्या कुमार यांना मतं कोण देणार? त्यापेक्षा आम्ही तिथे मुस्लिम उमेदवार देणार आहोत. 

तेजस्वी यादव यांचे हे जातीचे ‘तेजस्वी’ गणित. याला नेमके काय उत्तर आहे पुरोगाम्यांकडे? महागठबंधनची पतंगबाजी करत असताना खेळ प्रत्यक्ष खेळपट्टीवरच खेळावा लागतो, ‘कॉमेंटरी बॉक्समध्ये’ बसून खेळता येत नाही हे साधं तत्त्व पुरोगामी पत्रकार विसरले. 

बिहारमधील लालूप्रणित या ‘महागठबंधन’ मध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला 9 जागा आल्या आहेत. आणि अगामी राज्यसभा निवडणुकीत एक जागा त्यांना मिळणार आहे. उपेंद्र कुशवाह जे की आधी रालोआचे घटक होते त्यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाला 5, माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) या पक्षाला 3, मुंबईचे व्यवसायीक मुकेश सैनी यांच्या विकासशील इन्सान पक्षाला 3 जागा सोडण्यात आल्या आहेत. 

म्हणजे जितनराम मांझी, उपेंद्र कुशवाह, मुकेश सैनी यांच्यासाठी एकूण 11 जागा सोडायला पुरोगामी हृदय सम्राट लालू प्रसाद यादव (आडवाणींची रथयात्रा रोकणारे म्हणून पुरोगामी हृदय सम्राट)  तयार झाले. पण कन्हैय्या कुमारांसाठी एकही जागा सोडायला तयार नाहीत. इतकेच नाही तर आख्ख्या बिहारात डाव्यांना जागा सोडल्या गेली नाही. मागच्या निवडणुकीतही ही जागा सोडण्यात आली नव्हती. 

कम्युनिस्टांची ही गोची केवळ बिहारमध्येच केल्या गेली आहे असे नाही. डाव्यांचा एकेकाळचा गढ असलेल्या पश्चिम बंगाल मध्येही अगदी त्यांच्या विद्यमान खासदारांच्याही जागा सोडायला कॉंग्रेस तयार नाही हे पाहून शेवटी ही आघाडीच बारगळली. लांब कशाला आपल्या महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. 

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात कम्युनिस्टांचे चांगले काम आहे. ही जागा विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांना हवी होती. पण राष्ट्रवादीने इथे आपला उमेदवार घोषित करून डाव्यांना चित करून टाकले. दुसरी जागा पालघरची होती. पण या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला जागा सोडून हा रस्ताही बंद केला. सोलापुरला लोकसभा नाही पण पुढे चालून विधानसभा नरसय्या अडाम यांच्या रूपाने लढविता आली असती. पण तिथेही अडाम यांनाच पक्षातून काढून टाकून डाव्यांनी आपल्याच पायावर कुर्‍हाड (किंवा त्यांच्या चिन्हात असलेला कोयता) मारून घेतली आहे. 

आता प्रश्‍न निर्माण होतो की कन्हैय्या सारखे जेंव्हा भाजप-संघ-मोदी विरोधात आपल्या भाषणांतून तोफा डागत असतात  त्याचा फायदा कुणाला होणार? आणि हे कशासाठी असा फुकटचा प्रचार करत राहिले? 

परभणी लोकसभा मतदार संघात तर विचित्र परिस्थिती आहे. कन्हैय्याच्याच पक्षाचा (सी.पी.आय.) अधिकृत उमेदवार कॉ. राजन क्षीरसागर लोकसभेसाठी उभा आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. आणि सहा महिन्यांपूर्वी याच राष्ट्रवादीच्या लोकांनी कन्हैय्याच्या सभा संपूर्ण मतदार संघात ‘संविधान बचाव’ या नावाने धडवून आणल्या होत्या. मग राष्ट्रवादीने ही जागा कम्युनिस्टांसाठी का नाही सोडली? 

जर सोडायचीच नव्हती तर कन्हैय्याला बोलावून त्याच्या सभा का घडवून आणल्या? याचा अतिशय वाईट असा अर्थ निघू शकतो की केवळ भाजप-संघ विरोधी वातावरण तयार करण्यासाठी या भाषणांच्या सुपार्‍या देण्यात आल्या होत्या. त्यात प्रत्यक्ष डाव्या राजकारणाचा बळी गेला तरी हरकत नाही. आज देशभरात रालोआ विरूद्ध कॉंग्रेस प्रणित संपुआ विरूद्ध प्रादेशिक पक्षांची आघाडी (ममता, चंद्रबाबू, नविन पटनायक, चंद्रशेखरराव, केजरीवाल) विरूद्ध सपा अधिक बसपा विरूद्ध डावे लढत आहेत. म्हणजे भाजप विरोधात अधिकृतरित्या चार आघाड्या तयार झाल्या आहेत. मग कर्नाटकाच्या निवडणुकीत हात उंच  करून महागठबंधनच्या घेतलेल्या शपथा कुठे गेल्या?

सत्ताधारी आणि विरोधक हे सर्व राजकारणच करत असतात. त्यामुळे त्यांच्या आघाड्या आणि विरोध हा मुद्दा आपण जरा बाजूला ठेवू. हे चालणारच आहे. मग महागठबंधनच्या नावाने आपल्या लेखण्या झिजवणारे जे पत्रकार होते आणि आजही आहेत ते ही पतंगबाजी कशासाठी करत आहेत?  कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकुर, उमर खालीद ही सगळी पिलावळ काही दिवसांपूर्वी माध्यमांनी मोठी केली होती, यांना अवास्तव प्रसिद्धी देण्यात आली होती ती कशासाठी? 

आज डाव्या पक्षांत निष्ठेने वर्षानूवर्षे काम केलेले निस्पृह कार्यकर्ते आहेत. त्यांना बाजूला ठेवून या उठवळ तरूणांना मोठं करण्यात आलं हे कशासाठी? ही कुणाीच बौद्धिक दिवाळखोरी आहे?

भाजपला पराभूत करायचे असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीला उभं राहून सक्षम विरोध करून दाखवावा लागतो. मग कन्हैय्याला जर त्याच्या जातीवरून पुरोगामीच आत्ता घेरत असतील तर हे राजकारण पुढे फलदायी होणार कसे?

लोकशाहीत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकांसमोर तूम्ही पर्याय उभा केला पाहिजे. लोकांनी तूमच्यावर  विश्वास दाखवत तूम्हाला मते दिली पाहिजेत. मग निवडून आल्यावर वैध मार्गाने तूम्हाला सत्ताधार्‍यांना विरोध करणारा सक्षम विरोधी पक्ष बनता आला पाहिजे. आणि आपल्या कामांतून अजून एक पायरी पुढे चढून तूम्हाला मतदारांनी सत्ताधारी बनविले पाहिजे. हे सगळे विसरून केवळ भाषणबाजी करून सत्ताधार्‍यांना विरोध केला तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. उद्या लोक यांना ऐकणारही नाही.    
   
  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, March 24, 2019

‘कोळसा’ लावतो । वंचितांना चूना । युद्धाआधी हार । रोग आहे जूना ॥


विवेक, उरूस, मार्च 2019

अपक्षेप्रमाणे कोळसे पाटील यांनी आपला रंग दाखवला. वंचित बहुजन आघाडीने जाहिर केलेली उमेदवारी नाकारताच आक्रस्ताळेपणा करत पाठिंबा नाकारल्याचे पत्रकच काढले. कॉंग्रेस सोबत युती करण्याचा आपला आग्रह होता. पण प्रकाश आंबेडकरांनी ते नाकारून भाजप-संघाच्या सोयीची भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा तोटा कॉंग्रेस राष्ट्रवादीलाच होणार आहे. असं कोळसे पाटील यांचे म्हणणे आहे. 

निवडणूकीचे युद्ध सुरू होण्याआधीच ही फाटाफुट का झाली? हे सगळे प्रकरण मुळापासून समजून घेतले पाहिजे. 

भीमा कोरेगांव दंगल प्रकरणात एल्गार परिषदेचे आयोजन एक महत्त्वाची घटना आहे. या एल्गार प्रकरणात कोळसे पाटील अडकले आहेत. महाराष्ट्रात मराठेतर मुख्यमंत्री सत्तास्थानी आल्यापासून मराठा जातीच्या संघटनांची डोकी भडकावून त्यांना रस्त्यावर उतरविण्याचे काम करण्यात स्वत: कोळसे पाटील अग्रेसर राहिलेले आहेत. कोळसे पाटीलांसोबतचा भडक जातीयवादी विचारांचा संभाजी ब्रिगेड सारखा गट कोपर्डी प्रकरणापासून दलितांवर प्रचंड संतापलेला होता.  आधी घडलेल्या दलित मुलींवरील अत्याचार प्रकरणाने दलित सवर्ण ताण वाढीस लागलेला होताच. ऍट्रासिटी प्रकरणात गावोगाची मराठा तरूण मुले अडकत चालली आहेत हे अस्वस्थतेचं कारण होतं. 

दलित-मराठा ताणतणावात आपला स्वार्थ साधून घेण्याची संधी नक्षलवादी गटांना जाणवली. त्यांनी भीमा-कोरेगांव प्रकरणातून या सगळ्याचा जास्त भडका उठेल हे पाहिले. आश्चर्य म्हणजे एल्गार परिषदेतील कोळसेपाटील किंवा प्रकाश आंबेडकर हे कुणीच प्रत्यक्ष भीमा-कोरेगांवला 1 जानेवारीला गेले नाहीत. एल्गार परिषदेत नक्षलवादी समर्थक कम्युनिस्ट, कोळसेपाटील यांच्या रूपाने संभाजी बिग्रेड आणि प्रकाश आंबेडकरां सोबतचे दलित असे एकत्र आले होते. 

या सर्वांचे एकत्रिकरण हेच संशयास्पद होते. कारण बाबासाहेबांनी कम्युनिस्टांना आपल्या समाजकार्यात दूर ठेवले होते. त्यांच्याशी असलेला विरोध स्पष्टपणे लिहूनही ठेवला होता. बाबासाहेबांना प्रत्यक्ष निवडणुकीत पराभूत करण्यात कॉंग्रेस सोबत कम्युनिस्टही होते. शिवाय वैचारिक दृष्ट्या 'वर्ग संघर्ष' आणि 'वर्ण संघर्ष' यात बाबासाहेब नेहमीच वर्ण संघर्ष हाच कसा भारतीय परिप्रेक्षात महत्त्वाचा ठरतो हे मांडत आले. याच्या उलट कम्युनिस्टांना भारतातील वर्ण संघर्षाची तीव्रता कधीच पटली नव्हती. 

दुसरा घटक कोळसे पाटील यांचा संभाजी ब्रिगेडचा. महाराष्ट्राची निर्मिती करताना बाबासाहेब छोट्या राज्यांच्या बाजूने होते. विदर्भ वेगळा करा शिवाय उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांचे एक राज्य करा असे त्यांनी मांडले. याचे कारण देत असताना पश्चिम महाराष्ट्रातील मराठा वर्चस्ववादी राजकारण इतर जातींना भारी ठरेल अशी मांडणी बाबासाहेबांनी केली आहे. ही मांडणी गैरसोयीची असल्याकारणाने कुणी समोर आणत नाही. 

दलित-मराठा-कम्युनिस्ट हे तिन्ही घटक निवडणुकीसाठी एकत्र राहणे शक्य नाही हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. पण तरी भीमा कोरेगांवच्या निमित्ताने असा एक प्रयोग केला गेला. प्रत्यक्ष निवडणुका जाहिर होईपर्यंत हा फुगा फुगत राहिला. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा ढोल वाजवत राहिले. त्यांनी एम.आय.एम. सारख्या जातीयवादी धर्मांध पक्षाला सोबत घेतले तेंव्हाच त्यांचे हेतू काहीतरी वेगळेच असल्याचे जाणवत होते. ही मोट कॉंग्रेस राष्ट्रवादीशी बांधून भाजप विरोधी एकसंध भक्कम आघाडी उभी करता येऊ शकेल असे भल्या भल्यांना वाटत होते. 

प्रकाश आंबेडकर आधीपासूनच राष्ट्रवादीवर टीकेची राळ उठवत होते. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी तुटण्याची शक्यता नव्हती. प्रकाश आंबेडकरांना आघाडीत समाविष्ट करून घेणे शक्यच होणार नाही अशी स्थिती स्वत: आंबेडकरांनीच आणली. परस्पर उमेदवार जाहिर करून टाकले. ‘संघाला संविधानाच्या चौकटीत आणा’ असली संदिग्ध मागणी कॉंग्रेस पुढे ठेवली. त्यांना काय म्हणायचे ते आजतागायत कुणाला कळले नाही. 

ही आघाडी जमत नाहीये असे पाहिल्यावर कोळसे पाटील यांनी आपल्या पुरती औरंगाबादची जागा निश्‍चित करायला सुरवात केली. त्यांच्या उमेदवारीला कॉंग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा. ते जनता दल (सेक्युलर) या पक्षाच्या वतीने उमेदवारी भरतील. वंचित बहुजन आघाडीने त्यांनी उमेदवारी जाहिरही केली. पण ज्या औरंगाबादमध्ये एम.आय.एम. बळकट आहे तिथे हे बाहेरचे पार्सल स्विकारण्यास एम.आय.एम.चे आमदार इम्तियाज जलील यांनी नकार दिला.

एकीकडे भाजप-सेना आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून जागावाटप करून मोकळे झाले. त्यांनी त्यांचे असंतुष्ट बंडोबा थंड केले. विभागीय मेळावे घ्यायला सुरवात केली. कार्यकर्ते कामाला लागले. आणि इथे जागा कुणी लढवायची हेच ठरत नाही. कॉंग्रस राष्ट्रवादीने कोळसे पाटीलांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव तात्काळ उडवून लावला. 

प्रकाश आंबेडकरांनी एम.आय.एम.पुढे गुडघे टेकले व औरंगाबाद सेाबतच मुंबईची एक जागा त्यांच्यासाठी सोडून बाकीचे उमेदवार जाहिर केले. 

कोळसे पाटलांनी वंचित बहुजन आघाडी विरोधात जाहिर पत्रकच काढले. 

एल्गार परिषदेचा तिसरा घटक म्हणजे कम्युनिस्ट. कम्युनिस्टांनीही या वंचित बहुजन आघाडीपासून अंतर राखले.  त्यांना कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचे होते. त्यासाठी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या सारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला त्यांनी पक्षातून काढून टाकले. तिकडे दिंडोरी मतदार संघात जिवा पांडून गावीत यांना उमेदवारी हवी होती. पण ती जागा राष्ट्रवादीने सोडली नाही. जनतादलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांच्या मुलाला राष्ट्रवादीने तिकीट देवून पुरोगामी राजकारणाचा बळी घेतला. शेकापचा त्यांनी आधीच घेतला होता. मार्क्सवादी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस दोघांकडूनही नाकारले गेले. 

एल्गार परिषद- भीमा कोरेगांव दंगल यातून मतांचे धृवीकरण करून सत्ताधार्‍यांना गोत्यात आणायची सगळी खेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर संपूर्णत: फसली. कम्युनिस्टांनी काढलेले आदिवासी मोर्चे, वंचित बहुजनांने मोठ मोठे मेळावे, लाखोंच्या संख्येने निघालेले मराठ्यांचे मोर्चे याचा कुठलाही राजकीय लाभ उठविण्यात विरोधक यशस्वी ठरले नाहीत.
 
आज युती विरूद्ध आघाडी अशी निवडणु क होत आहे. पण या शिवाय जे काही छोटे राजकीय पक्ष शिल्लक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र येवून एक सशक्त वंचित बहुजन आघाडी नावाने तिसरी ताकद उभी करण्यातही अपयश आले. 

भाजप-सेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांना विरोध करताना त्यांच्यावर मनुवादी, ब्राह्मणी, घराणेशाहीचे समर्थक, धन दांडगे अशी बेफाम टीका करणारे प्रकाश आंबेडकर स्वत: सोबत कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, जनता दल (सेक्युलर), स्वाभिमानी पक्ष, आम आदमी पार्टी यांना का नाही सोबत घेवू शकले? वंचित बहुजन आघाडी म्हणत असताना प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या इतर दलित गटांनाही का नाही सोबत घेता आले?   असे प्रश्‍न त्यांना पत्रकारांनी अभ्यासकांनी सामान्य मतदारांनी विचारले पाहिजेत.
 
कोळसे पाटील उमेदवारी नाकारली गेल्यावर शांत बसले असते तरी हे मतभेद दबून राहिले असते. लगेच विरोधी पत्रक काढून कोळसेंनी काय मिळवलं? आपल्या कृत्याने वंचित आघाडीला ‘चुना’ लागतोय हे त्यांना कळत नाही का? किंबहुना तसा तो लागावा म्हणूनच ही खेळी आहे का? 

कम्युनिस्टांचे काही गट स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीचे काम करत आहेत. अधिकृत रित्या कम्युनिस्टांचा उमेदवार परभणी मतदार संघातून उभा आहे. पण लालनिशाण गटाचे लोक वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम उमेदवाराच्या पाठीशी आहेत. ही सगळी फाटाफुट सामान्य मतदाराला काय संदेश देते?

युद्धाआधीच हारण्याची कडेकोट तयारी अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीने करून ठेवली आहे. हा एक तिसर्‍या आघाडीच्या राजकारणाला शापच आहे. जनता दलाच्या रूपाने जो प्रयोग देशभर विश्वनाथ प्रताप सिंहांच्या नेतृत्वाखाली समोर आला होता त्याला महाराष्ट्राने बर्‍यापैकी प्रतिसाद तेंव्हा दिला होता. कॉंग्रेस (शरद पवार तेंव्हा कॉंग्रेसमध्येच होते. मुख्यमंत्रीही होते.) विरूद्ध भाजप-सेना अशी निवडणुक होत असताना जनता दलाने तिसरी आघाडी उभी केली. एक दोन नाही तर 6 खासदार व पुढे चालून विधानसभेत 24 आमदार निवडून आणले होते. ही सगळी पुरोगामी चळवळ पुढे लयाला गेली. प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्या घटकांना जोडून घ्यायचे काम भीमा कोरेगांव नंतर केले असते तर आज कॉंग्रेस समोर लाचारी न करता स्वतंत्रपणे आव्हान उभे करता आले असते. यांना सोबत घ्यायच्या ऐवजी एम.आय.एम. सारख्यां धर्मांधांना सोबत घेवून आपसूकच मतांचे धृवीकरण घडवून आणले.  

आत्तापर्यंत झालेल्या घडामोडी पाहता वंचित बहुजन आघाडी सामान्य मतदारांनी सत्तेपासून वंचित ठेवल्याचे चित्र 23 मेला दिसून येईल याचीच जास्त शक्यता आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, March 14, 2019

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ‘लाल’ लक्तरे


विवेक, उरूस, फेब्रुवारी 2019

नरसय्या अडाम हे अडाम मास्तर या नावाने सोलापूर परिसरात सर्वपरिचित आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते. विधानसभा निवडणुकीत ते निवडूनही आले होते. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे ते सचिव असून  असंघटीत विडी कामगारांसाठी संघर्ष करणारे एक लढाऊ व्यक्तीमत्व म्हणून ते ओळखले जातात. 

या अडाम मास्तरांना त्यांच्या पक्षाने निलंबीत करण्याचा निर्णय घेतला आहे.  कम्युनिस्टांना पुरेसे न ओळखणार्‍यांना याचा धक्का बसला. पण कम्युनिस्टांना जे ओळखतात त्यांना हे चांगले माहित आहे की आपल्याच कार्यकर्त्याची माती कशी करावी याबाबत डाव्यांचा कुणी हात धरू शकत नाही. 

अडाम मास्तरांचा दोष काय? नुकत्याच झालेल्या सोलापुरातील एका सरकारी कार्यक्रमात मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची स्तूती केली. असंघटीत विडी कामगारांसाठी घरकुलाची एक योजना त्यांनी आखली होती. ही योजना वाजपेयी सरकारच्या काळात मार्गी लागली. प्रत्यक्षात जेंव्हा यातील  10 हजार घरांचा टप्पा 2006 मध्ये पूर्ण झाला त्यावेळी मनमोहन सिंग यांचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर होते. या कार्यक्रमात नरसय्या अडाम सहभागी झाले तेंव्हा त्यांच्यावर पक्षाने टीका केली नाही कारण या सरकारला मार्क्सवाद्यांचा पाठींबा होता. या कार्यक्रमातही नरसय्या अडाम यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अभार मानले होते. 

पुढचा टप्पा कार्यन्वित व्हावा म्हणून अडाम यांनी खुप प्रयत्न केले. पण कॉंग्रेसच्या काळात हा प्रकल्प मार्गी लागला नाही. 2015 मध्ये केवळ 1600 घरांचा एक छोटा हिस्सा तयार झाला. तोपर्यंत कॉंग्रेस सरकार सत्तेवरून गेले होते. शिवाय या सरकारचा पाठिंबा मार्क्सवाद्यांनी 2008 मध्येच काढल्यामुळे कॉंग्रेसशी त्यांचे फाटले होते. याच सरकारने विडी कामगारांच्या गृहप्रकल्पात खोडा घातला. परिणामी 750 कोटी रूपयांचा भूर्दंड दिरंगाईमुळे लागला असा आरोप तेंव्हा नरसय्या अडाम यांनी केला होता. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अडाम यांनी परत अटल बिहारी वाजपेयी, मोदी, फडणवीस यांचे आभार मानले. त्यांना धन्यवाद दिले. पण याही वेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कुठलाही आक्षेप आपल्या या नेत्यावर घेतला नाही. 

केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने तब्बल 30 हजार विडी कामगारांच्या घरांचा महत्त्वाकांक्षी सर्वात मोठा प्रकल्प तातडीने मार्गी लावला. या कामगारांत बहुतांश मुस्लिम महिलांचा समावेश आहे. विडी कामगार म्हणजे घरी बसून विडी वळण्याचे काम करणारे मजूर. हे काम मुस्लिम महिलांना सामाजिक स्थिती पाहता सोयीचे वाटले. परिणामी या परिसरात हे काम वाढत गेले. या महिलांना घरी बसून काम करावे लागत असल्याने त्यांच्या घराचा प्रश्‍न मार्गी लागला तर विडी उद्योगाचीच एक मोठी समस्या मार्गी लागते (तंबाखूच्या विरोधात आंदोलन करणारे परत डावेच असतात हा भाग निराळा). नरसय्या अडाम यांनी हा मोठा प्रकल्प मार्गी लागला म्हणून भूमिपूजन समारंभात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची स्तूती केली. 

आधी दोन वेळा काहीच न बोलणार्‍या मार्क्सवाद्यांचे पित्त आता मात्र खवळले. कारण सध्याची राजकीय परिस्थिती.आता भांडण विसरून मार्क्सवाद्यांनी कॉंग्रेसशी जूळवून घेतले आहे. आगामी निवडणूक त्यांच्या सोबत लढण्याचे ठरवले आहे. नेमकी हीच बाब स्वत: नरसय्या अडाम यांना अडचणीची आहे. कारण अडाम मास्तरांना राजकीय दृष्ट्या भाजपचा सामना करावा लागला नसून कॉंग्रेसशी करावा लागला आहे. कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी अडाम मास्तरांचा पराभव केला होता. भाजप उमेदवाराने नाही.

आपल्या राजकीय सोयीसाठी विडी कामगारांच्या हीताकडे दुर्लक्ष करण्याची मार्क्सवाद्यांची ही वृत्ती धक्कादायक आहे. एरव्ही वैचारिक भूमिकांसाठी आग्रह धरणार्‍या, विचारवंतांच्या टोळ्या ज्यांच्यासाठी कार्यरत आहेत म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सातत्याने बोंब ठोकणार्‍या डाव्यांची  स्वत:च्याच नेत्यावरची निलंबनाची कार्रवाई टिकेचा विषय बनते. 

दोन अतिशय गंभीर बाबींचा खुलासा डाव्यांनी केला पाहिजे. एक तर नरसय्या अडाम यांनी पक्षविरोधी अशी नेमकी कुठली कृती केली? दुसरी बाब म्हणजे मोदी हे देशाचे पंतप्रधान असताना त्यांना केवळ भाजपचा पंतप्रधान समजणे योग्य आहे का? कार्यक्रम भाजपचा नसून सरकारी होता. मग त्यात सामील होणे ही अडाम यांची चूक कशी होवू शकते?

संघ-भाजपचा राजकीय विरोध एक वेळ समजू शकतो. पण शपथ घेतल्यानंतर कुठलाही पंतप्रधान, कुठलाही मंत्री हा देशाचा असतो. त्याला एखाद्या पक्षापुरते मर्यादीत समजणे ही लोकशाहीला न शोभणारी गोष्ट आहे. भारतीय लोकशाही ही प्रातिनिधीक लोकशाही आहे. निवडून कुणीही जावो, एकदा का तो निवडला गेला की तो सर्वांचाच असतो. निदान तसे वैचारिक पताळीवर मानावे लागते. तो तसा वागला नाही तर त्यावर कडाडून टीका केला पाहिजे. 

प्रत्यक्षात भाजप-मोदी-संघ यांनी डाव्यांचा कामगारांच्या गृह प्रकल्पाचा विषय मार्गी लावला, त्यातही लाभार्थी हे डावे मानतात तसे भाजपचे मतदार नाहीत. बहुतांश मुस्लिम स्त्रिया यात आहेत. मग हा तूमच्याच जिव्हाळ्याचा विषय मोदींनी मार्गी लावला तरी तूमचा आक्षेप? 

माझं भलं झालं तरी नको कारण ते करणारा आमचा विरोधक आहे ही नेमकी कुठली भूमिका आहे? नरसय्या अडाम इतक्या वर्षे डाव्या चळवळीत निष्ठेने काम करत आहेत आणि एका साध्या घटनेने तूम्ही त्यांच्यावर लगेच निलंबनाची कार्रवाई करता? यातून नेमका कोणता संदेश तूमच्याच निष्ठावान कार्यकर्त्यांत पेाचतो? 

प्रभाकर उर्ध्वरेषे यांचे ‘हरवलेले दिवस’ पुस्तक म्हणजे एका माजी कम्युनिस्टाचे आत्मकथन आहे. कुठलीही आक्रस्ताळी भाषा न वापरता, कसलीही कंठाळी टीका न करता त्यांनी आपण निष्ठेने ज्या चळवळीचे काम केले त्याचे कठोर परिक्षण केले आहे. पण डाव्यांनी यापासून काहीही शहाणपण शिकलं आहे असे वाटत नाही. कॉ. डांगेंवर अशीच कार्रवाई करून रात्रीतून त्यांची पुस्तकेही डाव्यांनी आपल्या विक्री केंद्रातून काढून टाकली होती. ज्योती बसूंना पंतप्रधानपदाची संधी पॉलिटब्युरोने नाकारली होती. सोमनाथ चटर्जी यांना पक्षातून निलंबीत केले गेले. अगदी आत्ता सिताराम येच्युरी यांना राज्यसभेवरचे सदस्यत्व नाकारले गेले. 

अडाम मास्तरांवर कार्रवाई करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा त्याची भलावण करणार्‍यांनीच घोटला आहे. देशापेक्षा मार्क्सवादी पक्ष स्वत:ला मोठा समजू लागला आहे. लोकशाहीचे किमान संकेतही पाळले जात नाहीत. 

जगात लोकशाहीच्या मार्गाने केरळात पहिल्यांदा डाव्यांना सत्ता संपादन करता आली होती. अन्यथा त्यांचा लोकशाहीवर कधीच विश्वास नव्हता. आजही नक्षलवादी चळवळीला छूपा पाठिंबा त्यांनी चालूच ठेवला आहे.  

स्वत: हिंसेवर विश्वास ठेवणारे, कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली की छाती बडवतात हे पाहून आश्चर्य वाटते. स्वत: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारे, अभिव्यक्तीच्या नावाने बोलू लागले की हसू आल्याशिवाय रहात नाही. लोकशाहीवर विश्वास नसणारे सध्या देशात लोकशाही धोक्यात आली आहे अशी बोंब करतात तेंव्हा त्यांना नेमके काय म्हणायचे तेच समजत नाही. 

आज देशभरात किमान अर्धा डझन प्रमुख डावे पक्ष आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकरी कामगार पक्षांसारखे त्यांच्या परिवारातील काही इतर पक्ष आहेत. पण हे सगळे मिळून कधी एकत्र आलेले दिसत नाहीत. आपसातील मतभेद किती तीव्र आहेत हे मोठ्या अभिमानाने सांगताना लोण्याचा गोळा माकड खावून जाते हे बोक्यांच्या लक्षात येवू नये तसे यांचे झाले आहे. आपसात तर सोडाच पण तथाकथित पुरोगामी म्हणविणार्‍या पक्षांची आघाडी करून भाजपविरूद्ध लढण्याचे मनसुबे प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीत.

आधीच बळ शिल्लक राहिले नाही. त्यातही नरसय्या अडाम सारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर कार्रवाई करून नेमके काय समाधान मिळते कुणास ठाऊक. विविध डाव्या पक्षांनी एकत्र येवून पहिल्यांदा एक समर्थ कम्युनिस्ट पक्ष तयार केला पाहिजे. त्या पक्षाने आपण राजकीय पर्याय आहोत हा विश्वास मतदारांमध्ये तयार केला पाहिजे. भाजपला आंधळा विरोध करत यांनीच सगळ्यांनी मिळून भाजपला एक राजकीय अवकाश तयार करून दिला. भाजप विरोध कॉंग्रेसला मदत करण्याच्या नादात स्वत:चा जनाधार गमावला. आताही अडाम मास्तरांच्या पाठीशी रहायच्या ऐवजी कॉंग्रेसच्या नादाला लागून आपल्याच निष्ठावान कार्यकर्त्याची माती केली आहे. चुकांतून बोध घेणे हा डाव्यांना दुर्गूण वाटतो. तेंव्हा काय बोलणार? याचा फायदा राजकीय दृष्ट्या भाजपसारखे पक्ष घेतात आणि मग परत ‘जातीयवादी विचारसरणी डोकं वर काढत आहे’ म्हणत हे राजकीय परिसंवादांमध्ये बडबड करत बसतात लेख लिहीत बसतात.    

  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, March 4, 2019

किसान ‘लॉंग’ मार्च ‘शॉर्ट’ का झाला?


विवेक, उरूस, फेब्रुवारी 2019

बरोब्बर एक वर्षापूर्वी नाशिकहून भव्य असा किसान ‘लॉंग’ मार्च निघाला होता. त्याला माध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिली. लाल बावट्याचे भरपूर कौतूक केल्या गेले. मुंबईला पोचल्यावर हा ‘लॉंग मार्च’ मार्चएंड सारखा गुंडाळला गेला. शेतकर्‍यांच्या ज्या काही मागण्या होत्या  त्यांच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. बघता बघता सगळा विषय संपून गेला. 

त्या ‘लॉंग मार्च’च्या वर्षपूर्तीच्या वेळी परत डाव्या शेतकरी नेत्यांना आठवण झाली की अरे आपल्या मागण्यांचा विचार झालाच नाही. मग परत यांनी ‘मार्च’ची तयारी मार्चच्या तोंडावर केली. मॅच फिक्सींग असावी तसा हा मार्च नाशिकहून निघाला. पण मुंबईला काही पोचलाच नाही. दीडदोनशे किलोमिटर चालण्याऐवजी ‘लॉंगमार्च’ अगदी शॉर्ट झाला. केवळ 15 किलोमिटर चालला. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. परत लेखी स्वरूपात आश्वासनं देण्यात आली. लॉंगमार्च 15 कि.मी.मध्ये शॉर्ट होवून संपून गेला. लोकसभा निवडणूका तोंडावर आलेल्या आहेत.  सगळ्यांचा  आंदोलनातील रस संपून गेलेला. परिणामी ‘लाल वावटळ’ निर्माण होण्याआधीच तिची झुळूक झाली.

लॉंगमार्चच्या प्रमुख मागण्या अशा होत्या 1. कर्जमुक्ती- हा विषय कधीही डाव्यांनी पुढे आणला नसून पहिल्यांदा सविस्तर शरद जोशींनी मांडला. याच्या पाठिशी शेतीच्या लुटीचे शासकीय धोरण कसे आहे हे साधार आकडेवारींसह पटवून या मागणीला आर्थिक नैतिक पाठबळ उभं करून दाखवलं. डाव्यांनी हा मुद्दा आयता चोरला. अजूनही त्यांना ‘कर्जमुक्ती’ आणि ‘कर्जमाफी’ यातील फरक कळत नाही. 2. स्वामीनाथन शिफारशीप्रमाणे दीडपट हमीभाव- जेंव्हा डावे स्वत:च उत्पादन खर्च कमी करा, शुन्यावर आणा असं सांगत आहेत तेंव्हा शुन्याला कितीनेही गुणले तर उत्तर शुन्यच येणार. मग आपोआपच दीडपटीचा मुद्दा स्वत:हूनच निकाली निघतो. 3.शेतकरी पेन्शन- शेतकरी कुणाला म्हणावं? तर ज्याच्या नावावर सातबारा असेल तो. मग ज्याच्या नावावर जमिन नाही किंवा जो भूमीहून आहे याच्यासाठीच तर आत्तापर्यंत डावे आंदोलन करत आले होते. या पेन्शन योजनेत तो कसा बसणार? जिथे सरकारी कर्मचार्‍यांचीच पेन्शन योजना संपूष्टात आली आहे तिथे शेतकर्‍यांना पेन्शन ही अव्यवहार्य योजना राबवायची कशी? 4. शेतीसाठी सिंचन- ज्या पिकांना सिंचनाची व्यवस्था आहे त्या उसासारख्या पीकाचे प्रश्‍नही सुटले नसताना डावे समाजवादी सिंचनाचा विषय (जो महत्त्वाचा आहेच.) या पद्धतीनं कसा काय लावून धरतात? त्यासाठी यांच्याकडे काय योजना आहेत? हेच लोक मोठ्या प्रकल्पांना विरोध करतात, नदीजोड योजना पर्यावरण विरोधी आहेत म्हणून ओरड करतात. हा कुठला विरोधाभास आहे? 5.आदिवासींना जमिन कसण्याचे अधिकार- तोट्यात असलेली शेती कसायला मिळाली तरी नेमके काय भले होणार आहे? आदिवासींनी अशी तोट्याची शेती कशासाठी करावी?    

असे कितीतरी विरोधाभास ‘लॉंगमार्च’ च्या मागण्यांत आहेत. हे असं का झालं? 

मूळात डाव्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कधी समजल्याच नाही. समजून घेण्याचा प्रयत्नही केल्या गेला नाही. केवळ वरवर भासणार्‍या दुय्यम अशा शेती प्रश्‍नांवर डाव्यांनी रान उठविण्यात शक्ती (जी काही होती ती) खर्च केली. परिणामी प्रत्यक्षात शेतकर्‍यांचाही कधी मोठा पाठिंबा त्यांना लाभला नाही. 

मागच्या वर्षी जो किसान लॉंग मार्च निघाला त्याचे योग्य विश्लेषण पत्रकारांकडून करण्यात आले नाही. हा मोर्चा शेतकर्‍यांचा नसून आदिवासींचा होता. त्यांच्या मागण्या जमिनीशी संबंधीत होत्या हे खरं आहे पण त्या शेतीच्या नव्हत्या. हे समजून न घेता ‘किसान लॉंगमार्च’ या नावाला बहुतांश माध्यमं फसले. 

आदिवासींचे प्रश्‍न शेतकर्‍यांपेक्षा वेगळे आहेत. जंगलावर जगणारी, जंगलात राहणारी माणसं ही इतर शेतकरी जमातीपेक्षा वेगळी आहेत. भटकेपणा, शिकार, कंदमुळे, फळे, वनसंपत्ती अशा कितीतरी बाबी त्यांना शेती करणार्‍यांपेक्षा वेगळं पाडतात. त्यांचे अन्नपदार्थ पण वेगळे आहेत. त्यांच्या समस्यांचे स्वरूपपण त्यामुळे वेगळे आहे. 

इंग्रजांनी पहिल्यांदा जमिनीची मोजणी, जमिनीचा अधिकार, वनसंपत्तीचा अधिकार यासारख्या गोष्टी समोर आणल्या. यांचा कधीच विचार आदिवासींनी केला नव्हता. स्वच्छंदपणे मुक्त जगणारी, निसर्गाचे नियम पालन करणारी, स्वत:ची लिखीत नसलेली अशी एक मौखिक कायदेकानूनची परंपरा असलेली ही जमात. त्यांचा इतर जगाशी फारसा संबंध पूर्वी आला नव्हता. त्यामुळे त्यांचे सर्व प्रश्‍न स्थानिक बाबींशी निगडीत होते. इंग्रज गेल्यानंतरही त्यांचे बहुतांश कायदे तसेच राहिले. विशेषत: शेती विषयक, जमिन विषयक कायदे फारसे बदलले नाहीत. याचा जसा तोटा शेतकर्‍यांना झाला तसाच तो आदिवासींनाही झाला. 

मूळात वनजमिनीवर उपजिवीका करण्याचा अधिकार, जनावरांचा चराईचा अधिकार, जंगलात काही वनस्पती राखणे आणि त्यांचा वापर आपल्या जगण्यात करून घेणे अशा बाबी स्वातंत्र्योत्तर काळात कठीण होवून बसल्या. एखाद्या भागाला जंगल म्हणून घोषित केले की तिथे वेगळे कायदे लागू होतात. त्याची जाणीव आदिवासींना पूरेशी नसते. 

आज आदिवासींचे जे प्रश्‍न निर्माण झाले आहेत ते वनजमिनी वहितीखाली आणण्याचे नसून जनावरांना चराईसाठी हक्क मिळणे, शेती करण्यापेक्षा इतर उपयोगासाठी जमिनीवर हक्क असणे त्यांना गरजेचे वाटते. 
आदिवासी भागातील पाण्यावर शहरी भागातील योजनांसाठी डल्ला मारला जातो आणि त्याचा कुठलाच परतावा फायदा आदिवासींना मिळत नाही ही एक मोठी तक्रार आहे. या भागातील जमिनी हडप करण्यात येतात. त्यांना मिळणारा मोबदला अतिशय तोकडा असतो. शासनानेच एक नियम केला होता की एखाद्या भागातील जमिनीची किंमत त्या भागात तीन वर्षांत जमिनींचा जो व्यवहार झालेला आहे त्या प्रमाणात असावी. जर आदिवासी भागात जमिनींचा विक्री व्यवहारच झालेला नसेल तर मग किंमत काढणार कशी?

पण आदिवासींच्या या प्रश्‍नांना हात घालायचा म्हटलं की त्याला एक मर्यादा येते. मुळात आदिवासींची संख्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम दोन तीन टक्के. मग यावर आवाज उठवला तर कुणी लक्ष देण्याची शक्यता कमी. मग डाव्यांनी डोकं लावून हा विषय शेतकर्‍यांशी नेवून भिडवला. शेतकरी असंतोषाची उर्जा त्याला दिली. शेतकर्‍यांचा संप नुकताच झाला होता. त्याचाही एक धगधगता निखारा होताच. 

ही ‘जोडतोड’ एका आंदोलनापुरती आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यापूरती टिकली. आदिवासींना शेतकरी म्हणून वठवलेले ढोंग फारदिवस टिकणारे नव्हतेच. तसेच घडले. परत जेंव्हा याच आदिवासींचा मोर्चा काढण्याचे ठरले तेंव्हा जून्याच मार्गाने जाता येणार नाही हे तर दिसतच होते. मग पडद्यामागून हालचाली झाल्या. मोर्चा 15 किमी. पर्यंत गेला. मंत्री महोदयांनी त्यांची दखल घेतली. विषय संपून गेला. 

शेतकर्‍यांचा मूळ प्रश्‍न त्यांच्या मालाला भाव मिळत नाही हा नसून हा भाव ‘मिळू’ दिला जात नाही हा आहे. 

शेतकर्‍यांचे प्रश्‍न जसे डाव्यांना कळत नाहीत तसे आता आदिवासींचेही कळत नाहीत हे पण या ‘शॉर्ट’मार्चने सिद्ध झाले आहे. आदिवासींना त्यांच्या भागात रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर शेतीत लक्ष घालण्यापेक्षा त्यांचे जे पारंपरिक उद्योग चालू होते त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्याबाबत तर डावे मूळीच लक्ष द्यायला तयार नाहीत. आदिवासी पारंपरिक रित्या दारू तयार करतो. पण ‘दारू’ शब्द उच्चारला की यांच्या पोटात दुखते. दारू कंपन्यांच्या प्रयोजकत्वाखाली भरणार्‍या महोत्सवांना डावे लेखक/कवी/कलावंत खुशाल हजेरी लावतात. गलेलठ्ठ मानधनाची पाकिटं खिशात घालतात. पण आदिवासींच्या पारंपरिक पद्धतीच्या दारू व्यवसायावर यांना आक्षेप. बाबूंपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यात मोठा अडथळा कायद्याचा होता. सरकारने या कायद्यात बदल केले. आता बाबूंच्या व्यवसायीक वापराच्या शक्यता जास्त तयार निर्माण झाल्या आहेत. हाच प्रकार इतरही आदिवासी बहुल भागात आढळून येणार्‍या कंदमूळे, भाज्या, फळे, वनस्पती, लाकूड यांच्याबाबत आहेत. पण या सगळ्यांवरचे निर्बंध उठू द्यायला डावे तयार नाहीत. म्हणजे एकीकडून आदिवासींच्या परंपरागत व्यवसायांवर निर्बंधांचा फास आवळायचा आणि दूसरीकडून त्यांना शेती करा म्हणत मोर्चा काढायचा. जेंव्हा की ज्यांच्याकडे शेती आहे ते तोट्यात आहेत. हा सगळा अव्यापारेषू व्यापार करायचा कशासाठी? याचे कुठलेच वैचारिक उत्तर ‘लॉंगमार्च’ वाल्यांकडे नाही.

आदिवासींचे खरे शत्रू नक्षलवादी आहेत. नक्षलवाद्यांना कोण समर्थन देतो आहे? प्रत्यक्ष- प्रत्यक्षरित्या नक्षलवाद्यांचे उदात्तीकरण कोण करतो आहे? मूळात नाशिकच्या आदिवासी बहूल भागातून ‘किसान लॉंग मार्च’ काढणे हीच एक बौद्धिक फसवणूक आहे. एक वेळ ही युक्ती चालून गेली. अण्णा हजारेंसारखे एका उपोषणाला प्रतिसाद मिळाला की अण्णा परत परत तेच करायला लागले. डावे जर असे प्रत्येकवर्षी ‘किसान लॉंगमार्च’ काढू लागले तर काही दिवसांत त्यांना त्यांच्या इतर आंदोलनांसारखे याही आंदोलनात लोक मिळणार नाहीत. कारण एकीकडून हे ‘महागाई विरोधी मोर्चा’ काढणार, शेतजमिनीचे वाटप कुळकायद्याचे समर्थन करणार आणि दुसरीकडून शेतकरी संकटात आहे म्हणणार. 

शेतकर्‍यांचे प्रश्‍न शेतमालाच्या बाजारपेठेवरील निर्बंधात अडकले आहेत. आदिवासींचे प्रश्‍न जंगल, वनजमिनी, वनसंपत्ती यांच्यांशी संबंधीत कायद्यांत निर्बंधात अडकले आहेत. आदिवासींचे हितसंरक्षण करतो आहोत या नावाखाली आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणि मुख्य प्रवाहातील लोकांना तिकडे जाण्यांपासून रोकतो आहोत हे ध्यानात घेतले जात नाही. सगळ्या आधुनिक गोष्टी आदिवासींना मिळायला पाहिजेत. ज्यांना हजारो वर्षांपूर्वीची जीवनशैली प्रिय आहे त्यांनी  स्वेच्छेने ती स्वीकारावी. कमी कपड्यात निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध हवा पाण्यासोबत खुशीत रहावं. पण हा आग्रह ज्यांची इच्छा नाही त्यांच्यासाठी धरू नये.  आदिवासींची नविन पिढी बाहेर पडू पहात असेल तर त्यांना सहजतेने आधुनिक जगात स्थिर होता आले पाहिजे. शेतकर्‍यांच्या पुढच्या पिढीला शेती सोडायची असेल तर त्यांना कार्पोरेट जगतासारखे ‘गोल्डन शेक हँड’ सारखे फायदे घेत बाहेर पडता आले पाहिजे. ज्यांना समस्त जगाच्या अन्नधान्याची काळजी आहे त्यांनी खुशीत शेतकरी व्हावं, ज्यांना समस्त जगातील पर्यावरणाची काळजी आहे त्यांनी खुशीत आदिवासी जीवनशैली आत्मसात करावी. शुन्य उत्पादन खर्चाची शेती करावी, झिरो बजेट शेती करावी. त्या सर्वांना शुभेच्छा. पण ज्यांचे पोटपाण्याचे प्रश्‍न तीव्र आहेत अशा आदिवासी आणि शेतकरी यांच्या आयुष्याशी खेळ करू नये. 
    
 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, March 3, 2019

साहित्य महामंडळ भंगारात काढून नविन व्यवस्था आणूया !


संबळ, अक्षरमैफल, मार्च 2019

फ.मुं.शिंदे यांच्या आई कवितेत एक ओळ अशी आहे
ज़त्रा पांगते
पालं उठतात
पोरक्या जमिनीत 
उमाळे दाटतात

साहित्य संमेलनाची जत्रा पांगल्यावर आता रसिकांच्या पोरक्या जमिनीत काही उमाळे दाटून आले आहेत. त्यांचा विचार व्हायला पाहिजे. या रसिकांना निर्भेळ आनंदाला मुकावे लागले त्याला जबाबदार कोण? आज गावोगाव पसरलेल्या साहित्य रसिक वाचकांच्या भावनांची कदर महामंडळाला उरली नाही का? 

नयनतारा सेहगल यांना आमंत्रण दिले व नंतर नकार दिला याचा सर्वत्र निषेध झाला. पण सोबतच हा निषेध करणार्‍या सर्वांचेच इरादे सच्चे होते का? हा प्रश्‍न निर्माण झाला. याला कारणीभूत ठरले ते माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख. 

नयनतारा देखमुख यांना मुंबईला खास आमंत्रित करून एक कार्यक्रम घेण्यात आला. तिथे जमा झालेले सर्व डावे पुरोगामी निषेधाचा सूर लावत असताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित करून डाव्यांची दातखिळी बसवली. 30 जानेवारीला गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने कॉंग्रेस पक्षाने दिल्लीत एका मोठ्या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कन्हैय्या कुमार आणि सेहेला रशिद यांना आमंत्रित केल्या गेले होते. पण हे आमंत्रण कॉंग्रेस पक्षाने ऐनवेळेला मागे घेतले. याही ‘निमंत्रण वापसी’ चा निषेध करायला पाहिजे असा मुद्दा लक्ष्मीकांत देशमुख यांनी उपस्थित केला. यावर सगळे चिडीचुप झाले. कुणीच देशमुखांना दुजोरा दिला नाही.

नयनतारा सेहगल यांच्या ‘निमंत्रण वापसी’ वर हल्लकल्लोळ उठवणारे कन्हैय्या कुमार आणि सेहला रशिद यांच्या निमंत्रणवापसी वर चुप राहतात हे मोठं अजब कोडं आहे. पुरोगाम्यांच्या याच दुट्टप्पीपणावर देशमुखांनी बोट ठेवले आहे. याचे कुठलेच उत्तर द्यायला कुणी पुरोगामी पत्रकार, लेखक, विचारवंत, पुरस्कारवापसी सम्राट तयार नाहीत. 

ज्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही चर्चा सुरू झाली त्या संमेलनाचाच आता पुनर्विचार व्हायला हवा.

नयनतारा सेहगल यांना आमंत्रण देताना त्यांचे विचार सध्याच्या सरकार विरोधी आहेत, पुरस्कार वापसी मध्ये त्या सहभागी होत्या हे लक्षात का घेतल्या गेलं नाही? जर सरकारच्या मदतीशिवाय संमेलन होणं शक्य नाही असं जर महामंडळाला वाटत असेल तर मग याचा आधीच विचार करायला हवा होता.

दुसरा मुद्दा आयोजकांच्याबाबत आहे. भाजप मंत्र्यांच्या सहकार्याशिवाय संमेलन होणार नाही हे स्पष्ट होते. आणि अध्यक्ष म्हणून एकमताने निवडल्या गेलेल्या अरूणा ढेरे यांचा सन्मान होणे आवश्यकच आहे असाही आग्रह होता. तर मग महामंडळालाच बाजूला ठेवून हे संमेलन का नाही घेतल्या गेलं? 

निमंत्रण देणे आणि मग ते मागे घेणं हा सगळा दोष महामंडळाच्या माथी स्थानिक संयोजन समितीने घातला आहे. मग या स्थानिक संयोजन समितीने असा निर्णय घ्यायला हवा होता. की महामंडळाला आम्ही यातून बाजूला ठेवत आहोत. हे संमेलन स्थानिक संयोजन समिती घेणार आहे. यात अरूणा ढेरे अध्यक्ष म्हणून सामील असतील. सर्व निमंत्रीत पाहूणे तेच असतील. नियोजीत सर्व कार्यक्रम त्याच पद्धतीनं पार पडतील. केवळ महामंडळाचा सहभाग असणार नाही. हवे तर महामंडळाने त्यांचे त्यांचे संमेलन त्यांना ज्याला कुणाला बोलवायचे त्याला बोलावून पार पाडावे. शिवाय अध्यक्ष म्हणून त्या संमेलनास अरूणा ढेरे यांनी जावे किंवा नाही त्यांचे त्यांनी ठरवावे. 

पण असाही बाणेदारपणा स्थानिक संयोजन समितीला दाखवता आला नाही. शासकीय निधीला चिकटून राहण्याची  आणि त्यासाठी सत्ताधार्‍यांशी लाचारी पत्करण्याची भूमिका महामंडळाने घेतली. आणि दुसरीकडून स्थानिक संयोजन समितीनेही महामंडळाचे कुंकू असल्याशिवाय संमेलनाला सौभाग्य प्राप्त होणार नाही अशी भूमिका घेतली. 

नयनतारा सेहगल यांच्या निमित्ताने समग्र लेखक मंडळींपुढे एक संधी चालून आली होती. सर्वांनी मिळून संमेलनावर बहिष्कार टाकला असता तर त्या प्रतिभावंतांच्या शक्तीपुढे इतर सर्व शक्तींना नमावे लागते असा संदेश सामान्य रसिकांपर्यंत पोचला असता. सत्ताधार्‍यांना आणि महामंडळाला सर्वांनाच आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली असती. पण मंचावरून मिरवण्याच्या प्रसिद्धीखोर वृत्तीला बहुतांश निमंत्रीत लेखक मंडळी बळी पडली. 

गेली 700 वर्षे महाराष्ट्रात वारीची भव्य अशी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारीसाठी लोक पायीपायी स्वखर्चाने येतात. यातील बहुतांश बायाबापडे अतिशय गोरगरिब वर्गातील असतात.  पण तरी कुणीही दुसर्‍याच्या मदतीवर वारीला जात नाही. आणि इथे तर येणारे बहुतांश साहित्यीक बर्‍यापैकी आर्थिक वर्गातील असताना किरकोळ मानधन/प्रवासखर्चाची आशा का ठेवतात? त्यासाठी सत्ताधार्‍यांशी अशी लाचारी का पत्करतात? 

याच साहित्य संमेलनात पुस्तकांची विक्री अतिशय कमी झाली. बहुतांश प्रकाशकांचा जाण्या येण्याचा स्टॉलचा खर्चही भरून निघाला नाही. मग ही कुणाची जबाबदारी आहे? महामंडळ किंवा स्थानिक संयोजन समिती कुणी याची किमान जाणीव तरी ठेवतं का? 

संगीत, नाटक इत्यादी कला या सादरीकरणाच्या कला आहेत. त्यांचे उत्सव होणं गरजेचंच असतं. पण हे साहित्या बाबत काही खरं नाही. साहित्य काही सादरीकरणाची कला नाही. भाषणं केली पाहिजेत, कविता वाचल्या पाहिजेत, लेखकांच्या मुलाखती झाल्या पाहिजेत हे गरजेचं नाही. हे सगळं करत असताना मुळात साहित्य व्यवहार निकोप होतो आहे का? ग्रंथ व्यवहाराला पोषक पुरक असं काही आपण करतो आहोत का? याचा विचार झाला पाहिजे. जो की साहित्य संमेलनात होताना दिसत नाही. यासाठी कुण्या एकट्या दुकट्या माणसानं प्रयत्न करून काही होणार नाही. सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. असे असताना साहित्य संमेलनं, महामंडळ, स्थानिक संयोजक यासाठी काही करताना दिसतात का? ज्या गावात संमेलन होतं त्या गावात दरवर्षी त्या संमेलनाची आठवण म्हणून एखादा ग्रंथ महोत्सव नियमित व्हावं, एखादा साहित्योत्सव सुरू व्हावा असं काही नियोजन कुणी का करत नाही? 

ज्या यवतमाळ मध्ये आत्ता साहित्य संमेलन झालं त्याच यवतमाळ मध्ये पूर्वीही संमेलन झाले होते. त्याची काय आठवण मधल्या काळात ठेवल्या गेली? 

यवतमाळला अरूणा ढेरे अध्यक्ष होत्या. त्यांच्या पुस्तकांच्या किती प्रती विकल्या गेल्या? का याचा विचार करण्याची महामंडळाला किंवा स्थानिक संयोजन समितीला गरज वाटत नाही? 

एक फार विचित्र अशी अवस्था सध्या मराठी वाचकांची समोर येते आहे. अध्यक्ष म्हणून जो निवडल्या जातो त्याचे साहित्य बहुतांश वाचकांनी वाचलेलेच नसते. मग याला जबाबदार कोण? साहित्य संमेलनात पुस्तक केंद्री किती कार्यक्रम आखले जातात? साहित्य महामंडळ, त्यांच्या घटक संस्था, विविध महाविद्यालयातील वाङ्मय मंडळे, जागोजागची वाचनालये ही सगळी मिळून ‘एक पुस्तक एक दिवस’ सारखे उपक्रम का चालवत नाहीत? 

वारंवार मुल्ला नसरूद्दीनच्या गोष्टीची आठवण साहित्य संमेलना संदर्भात येत राहते. मुल्ला त्याच्या घरा समोरच्या अंगणात काहीतरी शोधत असतो. त्याला पाहून दूसरा एक शोधू लागतो. मग तिसरा शोधू लागतो. पण एक शहाणा मात्र सरळ शोधू न लागता विचारतो, ‘काय हरवले आहे?’ मुल्ला उत्तर देतो ‘अंगठी!’. मग हा शहाणा विचारतो की ‘कुठे हरवली आहे? केंव्हा हरवली आहे?’. मुल्ला उत्तर देतो,  ‘जंगलात हरवली आहे. काल संध्याकाळी हरवली आहे.’ मग हा शहाणा विचारतो, ‘जर अंगठी जंगलात हरवली आहे तर इथे का शोधतो आहेस?’

याला मुल्लाना दिलेले उत्तर महामंडळाचे शासनाचे साहित्याशी संबंधीत संस्थांचे साहित्य विषयक धोरण नेमके कसे आहे यावर प्रकाश टाकते. मुल्ला उत्तर देतो, ‘शहाणाच आहेस. जंगलात अंधार आहे, अंगठी शोधणं किती मुश्किल आहे. इथे अंगणात प्रकाश आहे, जमिन चांगली सपाट आहे, माझ्या घराजवळ आहे, शोधायला सोपं आहे.’

आम्हाला जे सोपं जातं, सोयीचं असतं ते आम्ही करतो. वाङ्मय व्यवहाराची मूळ समस्या काय आहे याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. भव्य दिव्य संमेलन घेणे, दणकावून जेवणावळी सजावट मनोरंजनाचे कार्यक्रम राजकीय नेत्यांचा प्रमाणाबाहेरचा हस्तक्षेप वावर हे सगळं म्हणजे साहित्य व्यवहार असा महामंडळाचा समज होवून बसला आहे. 

ज्याला आपण साहित्य व्यवहार म्हणून ओळखतो त्याच्या गाभ्याशी ग्रंथ व्यवहार आहे. हा ग्रंथ व्यवहार जो पर्यंत सूरळीत निकोप होणार नाही तोपर्यंत आमचा साहित्य व्यवहार चांगला कसा होईल? जर पुस्तकंच वाचल्या गेली नाहीत, चांगली पुस्तके चांगल्या वाचकांपर्यंत पोचली नाहीत, चांगल्या पुस्तकांची रसग्रहणे लिहीली गेली नाहीत तर आपण साहित्य व्यवहार कसा चालवणार आहोत? शालेय ग्रंथालयांची अवस्था अतिशय भयानक आहे. शिक्षक संघटना आपल्या पगारवाढीसाठी आग्रही असतात. पण शालेय ग्रंथालये अद्यायावत असावीत म्हणून कितीवेळा या संघटनांनी आंदोलने केली? या नविन वाचकांसमोर चांगलं साहित्य आलं नाही तर आपल्या साहित्य व्यवहाराला काय भवितव्य आहे? 

सार्वजनिक ग्रंथालय यंत्रणा अपुर्‍या निधींमुळे आणि घटलेल्या वाचकांमुळे पार मोडकळीला आली आहे. याचा पाया मुळात शालेय ग्रंथालये हा आहे. शालेय वयात वाचनाची सवय लागलेला मुलगा पुढे मोठा झाल्यावर सार्वजनिक ग्रंथालयाचा सक्रिय सभासद होवू शकतो. पण मुळात शालेय ग्रंथालयांच्या नरडीला नख लावल्या गेल्यावर सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती सुधारणार कशी? 

महाविद्यालयीन ग्रंथालयांची परिस्थिती जराशी वेगळी आहे. बर्‍यापैकी निधी आहे. पुस्तके आहेत. पण वाचकच नाहीत. अगदी अभ्यासाचीही पुस्तके मुले वाचत नाहीत. कारण त्यांना तशी सवयच लावल्या गेलेली नाही. महाविद्यालयीन ग्रंथालयांचा बहुतांश निधी आजकाल अभ्यासक्रमांची पुस्तके खरेदी करण्यातच संपून जातो. त्यांना संदर्भ किंवा ललित पुस्तके खरेदी करायला फारसा निधीच शिल्लक राहत नाही. 
आजपर्यंतच्या साहित्य संमेलनात अगदी आत्ताच्या यवतमाळच्या संमेलनातही ग्रंथालयांच्या समस्या समजून घेतल्या गेल्या नाहीत. प्रकाशकांच्या अडचणींवर तोडगा काढला गेला नाही. 

साहित्य संमेलनाचे 3 दिवस अधिक राज्य ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाचे 2 दिवस अधिक मराठी प्रकाशक परिषदेच्या अधिवेशनासाठी एक दिवस असा ‘माय मराठी’ सप्ताहच साजरा झाला पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. या तिनही संस्थांना शासकीय मदत आहे. मग सगळे मिळून प्रयत्न करताना का दिसत नाहीत? 

नॅशनल बुक ट्रस्ट ही संस्था शासकीय निधीवर काम करते. साहित्य अकादमी सुद्धा शासकीय संस्था आहे. या दोन्ही संस्था पुस्तके प्रकाशीत करतात. पुस्तक प्रदर्शनासाठी यांना निधी पण आहे. महाराष्ट्र शासनाचीही विविध प्रकाशने आहेत. पाठ्यपुस्तकांशिवाय इतरही पुस्तके बालभारतीकडून काढली जातात. मग या सगळ्यांची मिळून विक्रीची एक यंत्रणा का नाही उभारली जात? हे काम पागरखोर शासकीय कर्मचारी जे की नीट करत नाहीत यांच्याकडून काढून साहित्य महामंडळ, प्रकाशक संघटना, ग्रंथ विक्रेत्यांच्या संघटना, ग्रंथालय संघ यांच्या मदतीने का नाही केले जात? 

2019 च्या अर्थसंकल्पात एक वेगळीच योजना मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी आणली आहे. शेतकर्‍यांच्या खात्यात सरळ वार्षिक 6 हजार रूपये मदत जमा होणार आहे. याच धर्तीवर वाचकांसाठी त्यांच्या खात्यावर सरळ पैसे का नाही जमा केले जात? ही मागणी कदाचित अतिशयोक्त किंवा जरा विचित्र वाटेल पण खरंच जर वाचन संस्कृती वाढवायची असेल तर प्रत्यक्ष या क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही मदत सरळ कशी देता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. 

असं घडलं तर हे वाचक, रसिक आपल्या बळावर संमेलनं घडवून आणतील. (या पूर्वीच्या लेखात हा विषय सविस्तर आलेला आहेच. वाचकांनी तो संदर्भ तपासावा.)

यवतमाळच्या संमेलनाने दोन संधी गमावल्या. एक तर विरोधी विचार आपल्या मंचावरून व्यक्त होवू दिले असते तर उदारमतवादी भारतीय परंपरेला ते शोभून दिसले असते. दूसरी संधी महामंडळाला बाजूला सारून एक वेगळा संदेश आयोजकांना देता आला असता. साहित्य व्यवहारात लेखकांपेक्षा, रसिक वाचकांपेक्षा स्वत:ला मोठं समजणार्‍या महामंडळाला कुणीतरी धडा शिकवायला हवा होता. महाबळेश्वरला अध्यक्ष आनंद यादवांना दमदाटी करून येवू दिलं गेलं नाही तर अध्यक्षाविना संमेलन भरविण्याचा निर्लज्जपणा महामंडळाने दाखवला होता. याच्या नेमके उलट महामंडळाविनाच संमेलन घेण्याची सुवर्ण संधी स्थानिक संयोजकांना होती. ती त्यांनी गमावली. 

अक्षर मैफल सारख्यांनी आता पुढाकार घेवून जिल्हा तालूका पातळीवर वाचक मेळावे भरवावेत. त्यासाठी जिल्हा तालूका अ वर्ग वाचनालयांची मदत घेता येईल. कितीतरी प्रकाशक यासाठी मदत करू शकतील. नविन लिहीणारे वाचणारे असा एक मोठा वर्ग आहे जो महामंडळाच्या कारभाराला कंटाळला आहे. एक नविन सुंदर अशी लेखक-वाचक-प्रकाशक-विक्रेते-ग्रंथालय कार्यकर्ते यांच्या सहकार्याने व्यवस्था निर्माण करता येईल. शास्त्रीय संगीतासाठी असा एक उपक्रम आम्ही सुरू केला आहे. साहित्यासाठीही असं काहीतरी नविन रसरशीत दमदार अभिनव टिकावू भविष्यवेधी करता येईल. त्यासाठी कुजून गेलेली ही महामंडळाची सगळी व्यवस्था भंगारात काढून टाकली पाहिजे.  ती तशीही भंगारात गेलीच आहे. आपणच त्याच्या नादाला न लागता नविन काहीतरी केलं पाहिजे. दिनकर दाभाडे या मित्राने लेखक संघटना तयार केलीच आहे. अशा नविन संकल्पनांना पाठबळ पुरवले गेले पाहिजे. 

एप्रिल महिन्यात जागतिक ग्रंथ दिन येतो आहे. मार्चमध्ये आपण सर्वांनी विचारविनीमय करून निर्णय घ्यावा. औरंगाबाद शहरात या निमित्त माय मराठीचा पहिला महोत्सव घेण्यास आम्ही तयार आहोत.  कुणीही प्रस्ताव घेवून यावा. आम्ही खुले आवाहन करतो आहोत. 

श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Monday, February 25, 2019

साहित्य संगीत कला चळवळ लोक वर्गणीतून चालायला हवी !


संबळ, अक्षरमैफल, फेब्रुवारी 2019

साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांना येवू नका असं सांगून जो अपमान केला गेला त्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या.  विरोध करणारे आणि संमेलनाचे पाठिराखे या दोन्ही बाजूंनी एक वेगळा मुद्दा या निमित्ताने समोर येतो आहे तो लक्षात घ्यायला हवा. समजा हे संमेलन आयोजीत करणारी संस्था कुठल्याही सरकारी निधीशिवाय, राजकारण्यांच्या हस्तक्षेपाशिवाय काम करणारी असली असती तर ही वेळ आली असती का? सामान्य रसिक, साहित्य प्रेमी, प्रकाशक, लेखक, ग्रंथालय कार्यकर्ते, विक्रेते यांनी मिळून जर हे आयोजन स्वखर्चातून केले असते तर अशा पद्धतीनं गदारोळ उठला असता का? 

स्वाभाविकच आपण मुळ मुद्द्याकडे येतो. जेंव्हा एखादे साहित्य कलाविषयक नियोजन अपरिहार्यपणे इतरांच्या हातात जाते तेंव्हा त्या त्या वर्गाचा दबाव वाढत जातो. तो प्रमाणाच्या बाहेर गेला की असे आयोजन आपला मूळ हेतूच हरवून बसते. 

औरंगाबाद शहरातच घडलेले दोन सांस्कृतिक उपक्रम याची साक्ष देतात. वेरूळ महोत्सव या नावाने 30 वर्षांपूर्वी वेरूळच्या कैलास लेण्याच्या परिसरात शास्त्रीय संगीतासाठी महोत्सव शासनाच्या पर्यटन विभागाने आयोजीत करावयाला सुरवात केली होती. काही वर्षे हा महोत्सव सुरळीत चालला. पण पुढे हा महोत्सव म्हणजे पांढरा हत्ती बनला असून शहरापासून तो दूर आहे अशी कारणं देत औरंगाबाद शहरात हलविण्यात आला. त्याला औरंगाबाद वेरूळ महोत्सव असे नाव देण्यात आले. पुढे सरकारी अधिकार्‍यांनी हस्तक्षेप वाढवत वाढवत या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवात अजय-अतूल सारख्यांना चित्रपट संगीतासाठी प्रचंड मानधन देवून आमंत्रित केले. बघता बघता महोत्सव आपला मुळ हेतू हरवून बसला. शेवटी तर तो बंदच पडला. वेरूळ लेण्यात भारतीय संगीत परंपरा शिल्पांमधुन जतन केलेली आहे. आधुनिक काळात या कलेचे जतन करणे त्यांचे संवर्धन करणे यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे जाणून महोत्सवाची सुरवात झाली होती. पण हा हेतू विसरला गेला.

दुसरे उदाहरण खासगी क्षेत्रातले आहे. कार्पोरेट झगमगाट असलेला ‘स्वरझंकार संगीत महोत्सव’ प्रसिद्ध व्हायोलीन वादक पं. अतूल उपाध्याय यांनी सुरू केला होता. या महोत्सवात यावेळी फ्युजन आणि पंकज उधास यांचे गझल गायन यांचा समावेश करण्यात आला. सामान्य जनतेला शास्त्रीय फारसे कळत नाही, शिवाय प्रयोजकांनी आग्रह धरला अशी लंगडी कारणं पुढे करण्यात आली. यातून परत तेच घडले. शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार परंपरेचे जतन संवर्धन हा मूळ हेतूच हरवून बसला.

कलाकार आणि रसिक, लेखक आणि वाचक, नाटक/चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यात हस्तक्षेप करणारे प्रमाणाच्या बाहेर मोठे झाले, त्यांची लुडबूड वाढली की विकृती जन्माला येतात. याच्या नेमके उलट यांच्यातील नातं जितकं सरळ प्रस्थापित होवू शकेल तितकी ती या कलांसाठी पोषक फायदेशीर ठरू शकते. 

यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. गावातील हरिनाम सप्ताहात जसे सर्वजण आपआपल्यापरिने योगदान देतात, प्रत्यक्ष मेहनत करतात, त्या प्रसंगाचे पावित्र्य राखण्याचा सर्व मिळून प्रयास करतात, कुणीही जबाबदारी झटकून टाकत नाही याचा परिणाम म्हणजे वर्षानुवर्षे असे उत्सव, जत्रा, उरूस आपल्याकडे नियमित संपन्न होताना दिसतात. आधुनिक काळात बदलत्या परिस्थितीतही यांचे अस्तित्व टिकून आहे. नव्हे बहरले आहे. 

म्हणजे एकीकडे साहित्य संमेलनांत वाद होत आहेत, शास्त्रीय संगीताच्या उत्सवांत अशास्त्रीय बाबींचा शिरकाव होवून हेतू हरवून बसत आहे, अवाच्या सव्वा खर्च झाल्याने सामान्य रसिक प्रामाणिक आयोजक त्यापासून बिचकून दूर जात आहेत. कलाकारांना शुद्ध स्वरूपातील कला कशी सादर करावयाची हा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रतिभावंत लेखक संमेलनाकडे पाठ फिरवत आहे. आणि दूसरीकडे परंपरेने चालत आलेले सण उत्सव जत्रा उत्साहात साजरे होताना दिसत आहेत.

या दोन भिन्न बाबींचा विचार करून साहित्य संगीत कलांसाठी काही एक वेगळे नियोजन करता येईल का याची चाचपणी करायला हवी. 

सेलू (जि. परभणी. हे गांव नाशिक-मनमाड-औरंगाबाद या रेल्वे मार्गावर असून तिथे एक्स्प्रेस रेल्वे थांबतात. मुंबई पुण्याहून येथे सरळ रेल्वे उपलब्ध आहे. सचिन कुंडलकर सारख्यांनी हा लेख वाचून परत सेलू कुठे आहे असा प्रश्‍न विचारू नये. सेलू आणि परिसरात प्राचिन मंदिरे आहेत. साईबाबांचे गुरू केशवराव बाबासाहेब यांची समाधी याच सेलूत आहे. साईबाबांचे जन्मगाव जवळच पाथरी हे असून तिथे त्यांचें सुंदर मंदिर आहे.) येथे हरिभाऊ चारठाणकर हे जून्या जमान्यातील थोर गायक  नट होवून गेले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे कुटूंबिय छोटा कार्यक्रम दरवर्षी घ्यायचे. यावर्षी सेलूकर रसिकांनी मिळून एक मोठा संगीत महोत्सव हरिभाऊंच्या स्मृती प्रित्यर्थ घेेण्याचा संकल्प केला. हा महोत्सव देान दिवसांचा असावा व लोकवर्गणीतून तो संपन्न व्हावा असे सर्वांनी ठरवले. त्या प्रमाणे वर्गणी गोळा करून कुठलाही मोठा प्रयोजक नसताना, कुठल्याही राजकीय नेत्याचे पाठबळ नसताना, कुठलाही भपका न करता हा पार पडला. कलाकारांना रसिकांनी आपल्या घरी उतरवले. जेवू खावू घातले. हा आत्मियतेचा प्रत्यय कलाकारांनाही भारावून टाकणारा होता. कुणावरच मोठा आर्थिक ताण आला नाही. सामान्य रसिकांनाही मोकळेपणाने उत्सवात सहभागी होता आले. शिवाय हा महोत्सव आपला आहे अशी भावनाही लोकांमध्ये रूजली.

अशा पद्धतीशी एक शैली जर विकसित झाली तर साहित्य संगीत कला यांचे महोत्सव अगदी साधेपणाने उत्स्फुर्तपणे साजरे होवू शकतात. गावोगावी शेकडो वर्षे उत्सवांची अशीच परंपरा चालवली जाते आहे. त्यातील धार्मिकतेचा भाग बाजूला ठेवला तर अगदी हेच सुत्र साहित्य संगीत कला चळवळीसाठी वापरता येवू शकते.

आपल्याकडील धार्मिक उत्सवांमधूनही संगीत जपण्याची एक मोठी चळवळ नकळत जोपासल्या गेली आहे. किर्तनांत संगीताचा भाग मोठाच राहिला आहे. आज ज्याला स्टँडअप कॉमेडी म्हणतात याचाच जूना अवतार म्हणजे किर्तन. आत्ताच्या इंदूरीकर महाराजांची किर्तनं म्हणजे स्टँडअप कॉमेडीच असते. 

आमच्या परिसरात जून्या दर्ग्यांमधून उरूस भरवले जातात. या उरूसांमध्ये कव्वाली गाण्याची परंपराही फार मोठी आहे. एकेकाळी मोठ मोठे गायक संगीतकार या उरूसांमध्ये येवून कव्वाल्या ऐकायचे. सादर करायचे. या पारंपारीक चाली नव्यानं चित्रपटांत गाणी म्हणून यायच्या. ‘मेरा पिया घर आया’, ‘मेरे रश्क-ए-कमर’, ‘भर दे झोली मेरी या मुहम्मद’ या चित्रपटांमधून गाजलेल्या कव्वाल्या मूलत: उरूसातील पारंपरिक कव्वाल्याच आहेत. त्यांना जरासा आधुनिक साज चढवून चित्रपट गीत म्हणून सादर केल्या गेले. 

पंढरपुरची यात्रा उत्स्फुर्तपणे शेकडो वर्षे पार पडते आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी कुठलीही कमिटी बनवली जात नाही. त्यासाठी कुठलाही मोठा निधी निर्धारीत केल्या जात नसतो. आप आपल्या गावाहून पायी निघालेल्या लाखो वारकर्‍यांची जेवण्या खाण्याची संपूर्ण महाराष्ट्रभर सोय केल्या जाते. यासाठी कुठलाही भेदभाव पाळला जात नाही. आपण पंढरपुरला जावू शकत नाही तर किमान तिकडे निघालेल्या वारकर्‍यांची जरा सेवा करावी असा पवित्र भाव सामान्य नागरिकांमध्ये असतो. 

याच पद्धतीनं याच भावनेनं जर संगीत महोत्सव, साहित्य संमेलनं भरवली गेली तर त्यांच्यामध्येही असाच उदंड उत्साह आढळून येईल. आज ज्या पद्धतीनं वाद होत आहेत आणि या सगळ्याला एक कळकट सरकारी मदतीचा करडा रंग प्राप्त झाला आहे तो तसा राहणार नाही. 

जूनी शिल्पं, अजिंठा सारख्या ठिकाणची रंगीत चित्रं, मंदिरांतून जतन केल्या गेलेलं संगीत हे सगळं पाहता मंदिरं हे कलांचे एक मोठे उर्जा केंद्र राहिलेलं आहे. आज आधुनिक काळात मंदिर व्यवस्थेवर टीका करत असताना त्यातील कलेचा हा मोठा घटक आपण नकळतपणे उपेक्षीला. गुरूवारी दत्ताची पंचपदी, एकादशीला होणारे किर्तन अशा कितीतरी निमित्ताने संगीताची जोपासना केली जायची. 

अंबड (जि. जालना. येथे महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे एकत्र मोठे सुंदर मंदिर आहे. अहिल्याबाईंनी त्याचा जिर्णाद्धार केला आहे. शिवाय तळ्याइतकी मोठी पुष्करणी बारव आहे. खंडोबाचे सुंदर मंदिर आहे. सचिन कुंउलकर यांना जालना जिल्हा माहित नसल्यास अंबड माहित असण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून सविस्तर सांगितलं. जालना हे रेल्वे स्टेशन असून मुंबईहून येथे रेल्वे आहे. तेथून अंबड 35 कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून रस्ता मार्गे आल्यास अहमदनगरहून उजवीकडे नांदेडला जाणार्‍या राष्ट्रीय महार्गावरून गढी गावापर्यंत गेल्यास तेथून जालन्याला जाणार्‍या राज्य रस्त्यावर अंबड हे तालूक्याचे ठिकाण आहे.) येथे गेली 95 वर्षे दत्त जयंती संगीत महोत्सव भरत आहे. 

95 वर्षांपूर्वी अंबड जवळ भणंग जळगांव इथे त्र्यंबक नारायण कुलकर्णी यांना त्यांच्या गुरूंनी दत्त जयंती निमित्ताने संगीत सेवा सुरू करण्याचा आदेश दिला.  त्यांची आज्ञा प्रमाण माणून त्र्यं.ना.कुलकर्णी यांनी हे कार्य सुरू केले. त्र्यंबकरावांच्या पोटी गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर यांचा जन्म झाला. त्यांच्या लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले. हैदराबादचे प्रसिद्ध गायक वासुदेव नामपल्लीकर यांच्याकडून गांविंदरावांना आग्रा घराण्याच्या गाण्याचा वारसा मिळाला. गाविंदरावांनी पुढे अंबड शहरात वास्तव्यास आल्यावर दत्त जयंती संगीत महोत्सव अंबडला सुरू केला. तेंव्हा पासून ते आजतागायत अंबड शहरात अखंडपणे ही गायन चळवळ चालू आहे. 

चार वर्षांपूर्वी पं. गोविंदराव जळगांवकरांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य असे सभागृह अंबड नगर पालिकेने उभारले आहे. त्यांचा सुंदर असा अर्धाकृती पुतळा सभागृहाच्या दर्शनी भागात उभारण्यात आला आहे. एखाद्या गायकाच्या नावाने ग्रामीण भागात भव्य सभागृह असणे आणि अखंडपणे त्याची आठवण संगीत महोत्सवातून जतन केली जाणे हे दुर्मिळ उदाहरण आहे. आज घडीला अंबड इतकी जूनी परंपरा असलेला संगीत महोत्सव दूसरा नाही.

अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गावांमधून संगीत विषयक चळवळ चालवली जाते. भविष्यातही याच मार्गाने ही चळवळ पुढे जावू शकते. कर्‍हाडजवळ औदूंबरला साहित्य संमेलन भरवले जाते. या साहित्य संमेलनात आजतागायत कुठले वाद झाले नाहीत. एक लोकचळवळ असे स्वरूप या साहित्य संमेलनाचे राहिले आहे. परभणीला गेली 16 वर्षे ‘बी. रघुनाथ महोत्सव’ भरत आहेत.आज घडीला महाराष्ट्रात विविध ठिकाणी साहित्य कलाविषयक उपक्रम लोक उत्स्फुर्तपणे घेत आहेत. त्यासाठी निधी आपणहून गोळा केला जात आहे. हे असे छोटे मोठे महोत्सव जे लोकांनी आपणहून चालवले आहेत ते टिकून राहतात. या उलट शासनाने मदत केलेले साहित्य संमेलनासारखे उपक्रम वादात सापडताना दिसत आहेत. 

सरकारी मदत घ्यावी की नाही हा वादाचा विषय आहे. मोठे प्रायोजक मिळवावे की नाहीत हा पण वादाचा विषय आहे. ज्यांना अशा मदतीतून उपक्रम घ्यायचे आहेत ते त्यांनी घ्यावेत. पण सामान्य रसिक आणि कलाकार यांनी परस्पर समन्वयातून चांगले महोत्सव साधेपणाने आता भरवायला हवे. 

सेलूच्या हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचा हिशोब त्या समितीने आठच दिवसांत सगळ्या लोकांसमोर मांडला.  पहिल्या बैठकीत जे ठरले होते तेंव्हा पासून ते शेवटी सगळा हिशोब सादर करण्यापर्यंत एक पारदर्शकता पाळल्या गेली. याचा परिणाम म्हणजे पुढचा महोत्सव आम्ही अजून चांगला भरवून दाखवतो असे आश्वासन आत्ताच सामान्य कार्यकर्त्यांनी दिले. समितीत सगळेच कार्यकर्ते होते. कुणीच पदाधिकारी नसल्याने महोत्सव सर्वांना आपला वाटला. 

सुरेश भटांनी आपल्या एका गझलेत असे लिहीले होते

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही

भटांचे शब्द जरा कडक होते. पण सामान्य माणसांवर त्यांनी टाकलेला विश्वास हा कलेच्या चळवळीतही खरा ठरताना दिसतो आहे. 

माध्यमांनी पण आता अशा चळवळींना योग्य ती प्रसिद्धी देवून सामाजिक पुरूषार्थाचा गौरव केला पाहिजे. जेंव्हा सामान्य माणसांच्या बळावर चळवळी चालतात तेंव्हा त्यांच्या टिकण्याची आणि वर्धिष्णु होण्याची शक्यता जास्त असते. या उलट जेंव्हा महोत्सव चळवळ वरून लादली जाते तेंव्हा तीचे आयुष्य फार असत नाही. साहित्य संगीत कला चळवळ निरोगीपणे पुढे न्यायची असेल तर ही पालखी  सामान्य रसिकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी. 

(छायाचित्र- पंकज लाटकर हरिभाउ चारठाणकर समारोहात सेलू येथे गाताना)


Tuesday, February 19, 2019

छोट्या गावांमध्ये रूजत आहे शास्त्रीय संगीत चळवळ


विवेक, उरूस, फेब्रुवारी 2019

डिसेंबर महिन्यातील शेवटच्या दिवसांतील ही घटना आहे. थंडी प्रचंड वाढलेली. रविवारचा दिवस. नेमका हा लग्नाचा मुहूर्त.  अशा प्रसंगी जर संगीताचा कार्यक्रम तोही शास्त्रीय संगीताचा तोही सकाळी 8 वा. ठेवला तर कुणी येईल का? गाव छोटं. पण या सगळ्या अडथळ्यांवर मात करत सेलू (जि. परभणी. गांव रेल्वे ट्रॅकवर आहे. यवतमाळ माहित नसणारे लोक महाराष्ट्रात आहेत. तेंव्हा त्यांना सेलू कुठे आहे हे सांगावंच लागेल.) या गावात शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत शंभरएक रसिकांनी पहाटे हजेरी लावून आपलं रसिकतेचं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं. 

जून्या जमान्यातील गायक संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन 29-30 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आले होते. समान्य रसिकांच्या बळावर शास्त्रीय संगीताचा महोत्सव भरवता येतो यावरच मुळात कुणाचा विश्वास बसत नव्हता. पण सेलू सारख्या गावानं कुठलाही मोठा प्रायोजक न घेता, कुठल्याही राजकीय नेत्याचा आश्रय न घेता सामान्य रसिकांच्या स्वेच्छा देणगीवर संमेलन यशस्वी करून दाखवले. या संमेलनात संपूर्ण तीन सत्रे शास्त्रीय संगीताचीच झाली. 

आधी केले मग सांगितले या धरतीवर या प्रदेशातील रसिकांनी सेलूचा महोत्सव झाल्यावर औरंगाबादला मराठवाडा पातळीवर बैठक घेतली. आधी संपूर्ण मराठवाड्यात आणि नंतर महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताचे महोत्सव, छोट्या मैफली, कार्यशाळा यांचे आयोजन करण्याचा निर्धार केला. आधीपासून विविध ठिकाणी ज्या व्यक्ती आणि संस्था शास्त्रीय संगीतासाठी काम करत आहेत त्यांना जोडून घेण्यासाठी ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ नावाने अनौपचारिक मंचाची स्थापना केली. संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गायक पं. नाथराव नेरलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या मंचाचे रितसर उद्घाटन गाण्याच्या मैफिलीनेच व्हावे असे सर्वानूमते ठरले. 

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या पत्नी वत्सलाबाई जोशी या औरंगाबादच्या. येथील शारदा मंदिर प्रशालेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगितिक उपक्रम करण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले होते. पण त्यात सातत्य राहिले नाही. तेंव्हा ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ ची सूरवात म्हणून वत्सलाबाईंच्या स्मृतीत संगीत सभा घेण्याचा ठरले. पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले. बनारस घराण्याचे तबला वादक पं. अरविंद आझाद यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रतिष्ठानचे रीतसर उद्घाटन झाले. 
प्रतिष्ठानच्या वतीने परभणीला उस्ताद डॉ. गुलाम रसूल यांच्या स्मृतीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे संगीत चळवळीची कोंडी फोडण्याचे काम केले आहे. या प्रदेशात अंबडसारख्या छोट्या गावात गेली 95 वर्षे दत्त जयंती संगीत महोत्सव होतो आहे. असे तूरळक अपवाद वगळता छोट्या गावांमधून नियमित स्वरूपात शास्त्रीय संगीताचे उपक्रम होताना दिसत नाहीत. 

मोठ्या शहरांमध्ये ’सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ च्या धर्तीवर छोटे मोठे उपक्रम आता नियमित होत आहेत. पण लहान गावांत असं काही घडत नाही. त्यातील काही अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. एक तर अशा कार्यक्रमांना तिकीट लावले तर लोक येतीलच असे नाही. शिवाय पुरेसा निधी जमा होईलच असे नाही. प्रयोजक मिळवावेत तर त्यांच्या काही अटी असतात त्या शास्त्रीय संगीताला पेलतीलच असे नाही. कुठल्याही व्यवसायीक आस्थापनांची अपेक्षा असते भरपूर गर्दी जमा झाली पाहिजे. पण असे काही शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांत होताना दिसत नाही. 

पॉप-रॉक-पंजाबी गाण्यांना प्रचंड मोठा समुह ऐकायला मिळतो. मोठ्या स्टेडियमवर हे कार्यक्रम होतात. येणारे तरूण तरूणी धूंद होवून नाचत असतात. प्रचंड मोठा आवाज केलेला असतो. याच्याशी तूलना करता शास्त्रीय संगीताचे क्षेत्र प्रचंड वेगळंच आहे हे लक्षात येतं.

पहिली बाब म्हणजे हजारो श्रोत्यांपर्यंत आमचं संगीत अशा पद्धतीनं पोचू शकत नाही. डोकं बाजूला ठेवून बेधुंदपणे झिंग आणणार्‍या तालावर नाचणे हे इथे जमत नाही. हे संगीत बुद्धि बाजूला ठेवून नव्हे तर बुद्धि लावूनच सादर केले जाते परिणामी ऐकतानाही त्या श्रोत्याला आपल्या बुद्धिनं त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. हे संगीत म्हणजे तयार असलेल्या नोटेशनवर केवळ गाणं असं नाही. रागदारीची एक चौकट तेवढी असते. बाकी रंग प्रत्येक मैफलीत त्या त्या वेळी भरल्या जातो. तोच गाणारा/वाजवणारा असेल आणि रागही तोच असेल तरी तो पहिल्यासारखा असतोच असे नाही. 

कुणीही येवून शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला बसेल आणि त्याला ते पचेल असेही नाही. इथे श्रोत्याचा कानही तयार व्हावा लागतो. शास्त्रीय संगीतासाठी साधारणत: 500 आसनक्षमतेचे सभागृह पुरेसे आहे. (छोट्या मैफिलीं साठी 200 पेक्षाही कमी पुरे.) त्यापेक्षा जास्तीची आसनव्यवस्था पोषक ठरत नाही. आज ज्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा बोलबाला आहे त्याही महोत्सवात जास्तीची गर्दी अनावश्यक आहे असंच या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात. मूळात आमचं संगीत असं पाच आणि दहा हजारांच्या संख्येने ऐकण्याचं नाहीच.

मोठे कलाकार व्यवहारीक पातळीवर मोठ्या महोत्सवात सहभागी होतात पण जाणीवपूर्वक छोट्या मैफिलीत आपली कला सादर करतात कारण त्यांना त्यातून आपल्या सादरीकरणाचे कितीतरी आयाम सापडतात. हे प्रचंड मोठ्या ठिकाणी घडत नाही. डोळे मिटून आपण केलेला रियाज आपला विचार ते जेमतेम सादर करतात. पण नविन काही सुचण्याची प्रक्रिया प्रचंड मोठ्या महोत्सवात घडत नाही. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर छोट्या गावांमधून सुरू झालेल्या ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ सारख्या शास्त्रीय संगीत चळवळीला रूजवू पाहणार्‍या उपक्रमांचा विचार करावा लागेल. 

मूळात आपल्याकडे देवळांमधून संगीत परंपरा फार वर्षांपासून जतन केल्या गेली होती. कितीतरी कालबाह्य धार्मिक रूढी परंपरांना विरोध करत असताना नकळतपणे आपण संगीत परंपरेवरही घाला घातला. देवीच्या आरत्या पदे गाणी सादर करणारे दलित कलाकार पुरोगामी चळवळीत या परंपरा जतन करताना टीकेचे लक्ष्य व्हायला लागले. चर्मवाद्य वाजविण्याची परंपरा पूर्वाश्रमीचे महार, मातंग यांच्याकडे चालत आलेली होती. कोल्हाटी समाजाकडे नृत्याची परंपरा होती. जाती व्यवस्थेची एक काळी छाया संगीतावर पडलेली होती. 
पण स्वातंत्र्योत्तर कालखंडात यातील कालबाह्य रूढी परंपरांना बाजूला ठेवून निखळ संगीत परंपरा जतन व्हायला हवी होती. अजूनही दक्षिणेतील काही मंदिरांमध्ये ती जतन केलेली आहे. मंदिरांपेक्षा सार्वजनिक सभागृहांमध्ये आपण सांस्कृतिक उपक्रम चालवू. ते सोपं आहे. असं बर्‍याच जणांना वाटतं. पण यातील अडचण अशी की महाराष्ट्रात सांस्कृतिक उपक्रमांसाठी बांधलेली सभागृहे, समाज मंदिरे यांची अवस्था बकाल होवून गेलेली आहे. शासनाने जी नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थांना (नगर पालिका, महानगर पालिका) निधी देवून उभारली ती काही दिवसांतच निकाली निघाली. याच्या उलट छोट्या गावांमध्ये आजही जूने किंवा नविन एखादे मंदिर आढळून येते ज्याचे सभागृह चांगल्या अवस्थेत असते. तिथे किमान स्वच्छता राखल्या जाते. त्या त्या देवी देवतेचा उत्सव असेल तर छोट्या गावातील अगदी धार्मिक नसलेले लोकही त्यात उत्साहाने सामील होतात. 
या मंदिरांना जोडून छोट्या गावांमध्ये संगीताच्या मैफिली करणं सहज शक्य आहे. काही ठिकाणी गुरूवारची पंचपदी, एकादशीचे किर्तन, महाशिवरात्रीचे भजन अशा परंपरा आहेतच. यांना केवळ थोडेसे आधुनिक रूप देण्याची गरज आहे. 

शास्त्रीय संगीतासाठी असे उपक्रम रूजविण्याचे कारण म्हणजे इतर सर्व प्रकारच्या सुगम संगीताचा पाया म्हणजे हे संगीत होय. ते शिकविण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. काही एक मेहनत, उपजत गळा आणि बुद्धी या तिन्हीच्या आधारावर हे संगीत फुलते. संगीत ही सादरीकरणाची कला असल्या कारणाने ते सादर होणेच गरजेचे आहे. खुप मोठा गायक आहे पण तो गातच नाही. असं होवू शकत नाही. 

दुसरीकडून चांगले रसिक म्हणजेच कानसेन तयार होण्यासाठी नियमितपणे हे शास्त्रीय संगीत सादर झालं पाहिजे. या दोन्ही बाबींचा विचार करून म्हणजेच तानसेन आणि कानसेन किंवा त्याहीपेक्षा ज्यांच्याकडे कलासक्त मन आहे त्यांच्यासाठी पोषक वातावरण होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. धर्माच्या नावाखाली शेकडो वर्षे हे चाललं.    आता मात्र जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं हे रूजवलं गेलं पाहिजे. 

दुसरा एक गंभीर मुद्दा सध्याच्या धकाधकीच्या काळात पुढे येता आहे. तास दोन तास शांत बसून एखाद्या रागाचा विस्तार ऐकणे, स्वरांचे बारकावे समजून घेणे, संगीत सौंदर्याचा आस्वाद घेणे हे मनशांतीसाठी आवश्यक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तूम्हाला गाणं कळो की न कळो पण या गाण्यानं मनशांती मिळते, विचारशक्तीला चालना मिळते, आपलंही मन सृजनात्मक दिशेनं काम करू लागतं हे महत्त्वाचं आहे.

छोट्या गावांमध्ये ही चळवळ जास्त चांगली रूजू शकते याचे एक कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात तयार झालेला मध्यमवर्ग.  त्याच्यापाशी किमान वेळ आणि पैसा अशा कलांसाठी उपलब्ध आहे. शहरांमध्ये वेळेची समस्या मोठी गंभीर आहे. आणि अगदी छोट्या गावांमध्ये पोटापाण्याचे प्रश्‍नच सुटलेले नसताना कलात्मक चळवळींसाठी कुठल्याच अर्थाने जागा शिल्लक नसते. मग यातला मधला पर्याय  म्हणून नगर पालिका असलेली महाराष्ट्रातील 200 गावं संगीत चळवळीची केंद्र म्हणून विचारात घ्यावी लागतील. ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ सारख्या उपक्रमांचे महत्त्व या दृष्टीने जास्त आहे. 

                                 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575