Friday, March 29, 2019

‘कन्हैया कुमारा’ । संसद उंबरा । गाठणार कसा? ॥


विवेक, उरूस, मार्च 2019

सहा महिन्यांपूर्वी कन्हैय्या कुमार यांनी देशभरात भाषणांचा सपाटा लावला होता. संविधान बचाव असे ते अभियान होते. या सभांना किती उपस्थिती आहे हे कधीच दाखवले जायचे नाही. पण या भाषणांना माध्यमांतून मोठी प्रसिद्धी मिळायची. त्या वातावरणात पत्रकारांनी त्यांना विचारले होते ‘तूमची राजकीय भूमिका काय? तूम्ही आत्तापर्यंत विद्यार्थी होता पण आता भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सी.पी.आय.) चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अहात. पक्षाचे अधिकृत नेते अहात. भाजपला विरोध करायचा म्हणजे केवळ भाषणं करून जमत नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत उतरावे लागते.’ यावर उत्तर देताना कन्हैय्या कुमार यांनी आपण बिहारमधील बेगुसराय या आपल्या मतदारसंघातून लोकसभा लढवायचे जाहिर केले होते. 

लगेच पुरोगामी माध्यमांना आनंदाचे भरते आले. त्यांनी यावर मोठ्या बातम्या केल्या. आणि असं चित्र उभे केलं की आता केवळ निवडणुकीची घोषणा व्हायची किरकोळ औपचारिकता बाकी आहे. कन्हैय्या कुमार यांना प्रचंड असा प्रतिसाद लोकांमधून मिळतो आहे. भाजप विरोधी पक्षही त्यांना ‘महागठबंधन’चा एकमेव उमेदवार म्हणून उभा करतील आणि ते निवडून येतील. 

पत्रकारांनी मग यावर प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विचारले. नितीशकुमार स्वत: विद्यार्थी दशेपासून राजकारणात आहेत. त्यांनी तथाकथित ‘महागठबंधन’ची चव चांगलीच चाखली आहे. त्यांनी फार जबाबदारीने प्रतिक्रिया दिली, ‘लोकशाहीत प्रत्येकाला निवडणुक लढवायचा अधिकार आहे. कन्हैय्या एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत. निवडणूक लढवणे न लढवणे हा संपूर्णत: त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. माझ्या त्यांना निवडणुकांच्या सक्रिय राजकारणा साठी शुभेच्छा !’

यातील गोम पत्रकारांच्या लक्षात आली नाही किंवा त्यांना ती लक्षात घ्यावी वाटली नाही. पत्रकारांनी खरं तर बिहारातील ‘महागठबंधन’ चे मुख्य सुत्रधार लालुप्रसाद किंवा त्यांचा वारसा चालविणारे त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना विचारायला हवे होते. पण त्यांनी या पुरोगामी नेत्यांना गृहीत धरले. आणि नेमकी हीच चुक पुरोगामी पत्रकारांची झाली. जी गोष्ट इतक्या दीर्घ अनुभवांनी नितीश कुमारांना कळली होती ती तथाकथित पुरोगामी पत्रकारांना कळण्याची शक्यता नव्हती. त्यांनी आपल्या बातम्या लेख आंधळ्या भाजप संघ द्वेषाच्या जोशात रंगवायला सुरवात केली.

प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झाली. निवडणुका होणारच नाही अशी बोंब आधीच पुरोगाम्यांनी केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुका जाहिर झाल्या तेंव्हा त्यांना जरा धक्काच बसला. मग ‘महागठबंधन’ची बोलणी सुरू झाली. प्रत्यक्ष निवडणुका जाहिर झाल्या नव्हत्या तोपर्यंत महागठबंधन हा विषय जोरात होता. पण प्रत्यक्ष 

जेंव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला
जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला

असे जे सुरेश भटांनी लिहीले आहे त्या प्रमाणे सुरू झाले. आपल्या आपल्या पक्षात सगळे दडायाला लागले. काहींनी तर निवडणुकीत सपशेल माघारच घेतली. कन्हैय्या कुमार यांच्या बिहारात ‘महागठबंधन’ जो प्रयोग सुरू झाला त्यात नेमकी डाव्या पक्षांनाच जागा शिल्लक ठेवण्यात आली नाही. लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने 40 पैकी 20 जागा स्वत:कडे ठेवल्या. यातील एक जागा शरद यादवांना सोडली. अट इतकीच की त्यांनी राजदच्या चिन्हावर लढायचे. आणि आपला पक्ष निवडणुकीनंतर राजदमध्ये विलीन करायचा. एक जागा सी.पी.आय. (एम.एल.) या कम्युनिस्ट गटाला सोडली. 

आता उरलेल्या जागांपैकी किमान एक जागा कन्हैया कुमार साठी सोडतील असे अपेक्षीत होते. पण ते तसे घडले नाही. आणि यासाठी जे कारण देण्यात आलं ते पुरोग्याम्यांच्या तोंडात चपराक मारणारं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की बेगुसराय येथे भाजपने केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांना तिकीट दिले आहे. ते कन्हैय्याकुमार यांच्याच जातीचे (भूमीहार) आहेत. मग कन्हैय्या कुमार यांना मतं कोण देणार? त्यापेक्षा आम्ही तिथे मुस्लिम उमेदवार देणार आहोत. 

तेजस्वी यादव यांचे हे जातीचे ‘तेजस्वी’ गणित. याला नेमके काय उत्तर आहे पुरोगाम्यांकडे? महागठबंधनची पतंगबाजी करत असताना खेळ प्रत्यक्ष खेळपट्टीवरच खेळावा लागतो, ‘कॉमेंटरी बॉक्समध्ये’ बसून खेळता येत नाही हे साधं तत्त्व पुरोगामी पत्रकार विसरले. 

बिहारमधील लालूप्रणित या ‘महागठबंधन’ मध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला 9 जागा आल्या आहेत. आणि अगामी राज्यसभा निवडणुकीत एक जागा त्यांना मिळणार आहे. उपेंद्र कुशवाह जे की आधी रालोआचे घटक होते त्यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाला 5, माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) या पक्षाला 3, मुंबईचे व्यवसायीक मुकेश सैनी यांच्या विकासशील इन्सान पक्षाला 3 जागा सोडण्यात आल्या आहेत. 

म्हणजे जितनराम मांझी, उपेंद्र कुशवाह, मुकेश सैनी यांच्यासाठी एकूण 11 जागा सोडायला पुरोगामी हृदय सम्राट लालू प्रसाद यादव (आडवाणींची रथयात्रा रोकणारे म्हणून पुरोगामी हृदय सम्राट)  तयार झाले. पण कन्हैय्या कुमारांसाठी एकही जागा सोडायला तयार नाहीत. इतकेच नाही तर आख्ख्या बिहारात डाव्यांना जागा सोडल्या गेली नाही. मागच्या निवडणुकीतही ही जागा सोडण्यात आली नव्हती. 

कम्युनिस्टांची ही गोची केवळ बिहारमध्येच केल्या गेली आहे असे नाही. डाव्यांचा एकेकाळचा गढ असलेल्या पश्चिम बंगाल मध्येही अगदी त्यांच्या विद्यमान खासदारांच्याही जागा सोडायला कॉंग्रेस तयार नाही हे पाहून शेवटी ही आघाडीच बारगळली. लांब कशाला आपल्या महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. 

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात कम्युनिस्टांचे चांगले काम आहे. ही जागा विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांना हवी होती. पण राष्ट्रवादीने इथे आपला उमेदवार घोषित करून डाव्यांना चित करून टाकले. दुसरी जागा पालघरची होती. पण या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला जागा सोडून हा रस्ताही बंद केला. सोलापुरला लोकसभा नाही पण पुढे चालून विधानसभा नरसय्या अडाम यांच्या रूपाने लढविता आली असती. पण तिथेही अडाम यांनाच पक्षातून काढून टाकून डाव्यांनी आपल्याच पायावर कुर्‍हाड (किंवा त्यांच्या चिन्हात असलेला कोयता) मारून घेतली आहे. 

आता प्रश्‍न निर्माण होतो की कन्हैय्या सारखे जेंव्हा भाजप-संघ-मोदी विरोधात आपल्या भाषणांतून तोफा डागत असतात  त्याचा फायदा कुणाला होणार? आणि हे कशासाठी असा फुकटचा प्रचार करत राहिले? 

परभणी लोकसभा मतदार संघात तर विचित्र परिस्थिती आहे. कन्हैय्याच्याच पक्षाचा (सी.पी.आय.) अधिकृत उमेदवार कॉ. राजन क्षीरसागर लोकसभेसाठी उभा आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. आणि सहा महिन्यांपूर्वी याच राष्ट्रवादीच्या लोकांनी कन्हैय्याच्या सभा संपूर्ण मतदार संघात ‘संविधान बचाव’ या नावाने धडवून आणल्या होत्या. मग राष्ट्रवादीने ही जागा कम्युनिस्टांसाठी का नाही सोडली? 

जर सोडायचीच नव्हती तर कन्हैय्याला बोलावून त्याच्या सभा का घडवून आणल्या? याचा अतिशय वाईट असा अर्थ निघू शकतो की केवळ भाजप-संघ विरोधी वातावरण तयार करण्यासाठी या भाषणांच्या सुपार्‍या देण्यात आल्या होत्या. त्यात प्रत्यक्ष डाव्या राजकारणाचा बळी गेला तरी हरकत नाही. आज देशभरात रालोआ विरूद्ध कॉंग्रेस प्रणित संपुआ विरूद्ध प्रादेशिक पक्षांची आघाडी (ममता, चंद्रबाबू, नविन पटनायक, चंद्रशेखरराव, केजरीवाल) विरूद्ध सपा अधिक बसपा विरूद्ध डावे लढत आहेत. म्हणजे भाजप विरोधात अधिकृतरित्या चार आघाड्या तयार झाल्या आहेत. मग कर्नाटकाच्या निवडणुकीत हात उंच  करून महागठबंधनच्या घेतलेल्या शपथा कुठे गेल्या?

सत्ताधारी आणि विरोधक हे सर्व राजकारणच करत असतात. त्यामुळे त्यांच्या आघाड्या आणि विरोध हा मुद्दा आपण जरा बाजूला ठेवू. हे चालणारच आहे. मग महागठबंधनच्या नावाने आपल्या लेखण्या झिजवणारे जे पत्रकार होते आणि आजही आहेत ते ही पतंगबाजी कशासाठी करत आहेत?  कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकुर, उमर खालीद ही सगळी पिलावळ काही दिवसांपूर्वी माध्यमांनी मोठी केली होती, यांना अवास्तव प्रसिद्धी देण्यात आली होती ती कशासाठी? 

आज डाव्या पक्षांत निष्ठेने वर्षानूवर्षे काम केलेले निस्पृह कार्यकर्ते आहेत. त्यांना बाजूला ठेवून या उठवळ तरूणांना मोठं करण्यात आलं हे कशासाठी? ही कुणाीच बौद्धिक दिवाळखोरी आहे?

भाजपला पराभूत करायचे असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीला उभं राहून सक्षम विरोध करून दाखवावा लागतो. मग कन्हैय्याला जर त्याच्या जातीवरून पुरोगामीच आत्ता घेरत असतील तर हे राजकारण पुढे फलदायी होणार कसे?

लोकशाहीत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकांसमोर तूम्ही पर्याय उभा केला पाहिजे. लोकांनी तूमच्यावर  विश्वास दाखवत तूम्हाला मते दिली पाहिजेत. मग निवडून आल्यावर वैध मार्गाने तूम्हाला सत्ताधार्‍यांना विरोध करणारा सक्षम विरोधी पक्ष बनता आला पाहिजे. आणि आपल्या कामांतून अजून एक पायरी पुढे चढून तूम्हाला मतदारांनी सत्ताधारी बनविले पाहिजे. हे सगळे विसरून केवळ भाषणबाजी करून सत्ताधार्‍यांना विरोध केला तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. उद्या लोक यांना ऐकणारही नाही.    
   
  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment