संबळ, अक्षरमैफल, फेब्रुवारी 2019
साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांना येवू नका असं सांगून जो अपमान केला गेला त्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या. विरोध करणारे आणि संमेलनाचे पाठिराखे या दोन्ही बाजूंनी एक वेगळा मुद्दा या निमित्ताने समोर येतो आहे तो लक्षात घ्यायला हवा. समजा हे संमेलन आयोजीत करणारी संस्था कुठल्याही सरकारी निधीशिवाय, राजकारण्यांच्या हस्तक्षेपाशिवाय काम करणारी असली असती तर ही वेळ आली असती का? सामान्य रसिक, साहित्य प्रेमी, प्रकाशक, लेखक, ग्रंथालय कार्यकर्ते, विक्रेते यांनी मिळून जर हे आयोजन स्वखर्चातून केले असते तर अशा पद्धतीनं गदारोळ उठला असता का?
स्वाभाविकच आपण मुळ मुद्द्याकडे येतो. जेंव्हा एखादे साहित्य कलाविषयक नियोजन अपरिहार्यपणे इतरांच्या हातात जाते तेंव्हा त्या त्या वर्गाचा दबाव वाढत जातो. तो प्रमाणाच्या बाहेर गेला की असे आयोजन आपला मूळ हेतूच हरवून बसते.
औरंगाबाद शहरातच घडलेले दोन सांस्कृतिक उपक्रम याची साक्ष देतात. वेरूळ महोत्सव या नावाने 30 वर्षांपूर्वी वेरूळच्या कैलास लेण्याच्या परिसरात शास्त्रीय संगीतासाठी महोत्सव शासनाच्या पर्यटन विभागाने आयोजीत करावयाला सुरवात केली होती. काही वर्षे हा महोत्सव सुरळीत चालला. पण पुढे हा महोत्सव म्हणजे पांढरा हत्ती बनला असून शहरापासून तो दूर आहे अशी कारणं देत औरंगाबाद शहरात हलविण्यात आला. त्याला औरंगाबाद वेरूळ महोत्सव असे नाव देण्यात आले. पुढे सरकारी अधिकार्यांनी हस्तक्षेप वाढवत वाढवत या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवात अजय-अतूल सारख्यांना चित्रपट संगीतासाठी प्रचंड मानधन देवून आमंत्रित केले. बघता बघता महोत्सव आपला मुळ हेतू हरवून बसला. शेवटी तर तो बंदच पडला. वेरूळ लेण्यात भारतीय संगीत परंपरा शिल्पांमधुन जतन केलेली आहे. आधुनिक काळात या कलेचे जतन करणे त्यांचे संवर्धन करणे यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे जाणून महोत्सवाची सुरवात झाली होती. पण हा हेतू विसरला गेला.
दुसरे उदाहरण खासगी क्षेत्रातले आहे. कार्पोरेट झगमगाट असलेला ‘स्वरझंकार संगीत महोत्सव’ प्रसिद्ध व्हायोलीन वादक पं. अतूल उपाध्याय यांनी सुरू केला होता. या महोत्सवात यावेळी फ्युजन आणि पंकज उधास यांचे गझल गायन यांचा समावेश करण्यात आला. सामान्य जनतेला शास्त्रीय फारसे कळत नाही, शिवाय प्रयोजकांनी आग्रह धरला अशी लंगडी कारणं पुढे करण्यात आली. यातून परत तेच घडले. शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार परंपरेचे जतन संवर्धन हा मूळ हेतूच हरवून बसला.
कलाकार आणि रसिक, लेखक आणि वाचक, नाटक/चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यात हस्तक्षेप करणारे प्रमाणाच्या बाहेर मोठे झाले, त्यांची लुडबूड वाढली की विकृती जन्माला येतात. याच्या नेमके उलट यांच्यातील नातं जितकं सरळ प्रस्थापित होवू शकेल तितकी ती या कलांसाठी पोषक फायदेशीर ठरू शकते.
यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. गावातील हरिनाम सप्ताहात जसे सर्वजण आपआपल्यापरिने योगदान देतात, प्रत्यक्ष मेहनत करतात, त्या प्रसंगाचे पावित्र्य राखण्याचा सर्व मिळून प्रयास करतात, कुणीही जबाबदारी झटकून टाकत नाही याचा परिणाम म्हणजे वर्षानुवर्षे असे उत्सव, जत्रा, उरूस आपल्याकडे नियमित संपन्न होताना दिसतात. आधुनिक काळात बदलत्या परिस्थितीतही यांचे अस्तित्व टिकून आहे. नव्हे बहरले आहे.
म्हणजे एकीकडे साहित्य संमेलनांत वाद होत आहेत, शास्त्रीय संगीताच्या उत्सवांत अशास्त्रीय बाबींचा शिरकाव होवून हेतू हरवून बसत आहे, अवाच्या सव्वा खर्च झाल्याने सामान्य रसिक प्रामाणिक आयोजक त्यापासून बिचकून दूर जात आहेत. कलाकारांना शुद्ध स्वरूपातील कला कशी सादर करावयाची हा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रतिभावंत लेखक संमेलनाकडे पाठ फिरवत आहे. आणि दूसरीकडे परंपरेने चालत आलेले सण उत्सव जत्रा उत्साहात साजरे होताना दिसत आहेत.
या दोन भिन्न बाबींचा विचार करून साहित्य संगीत कलांसाठी काही एक वेगळे नियोजन करता येईल का याची चाचपणी करायला हवी.
सेलू (जि. परभणी. हे गांव नाशिक-मनमाड-औरंगाबाद या रेल्वे मार्गावर असून तिथे एक्स्प्रेस रेल्वे थांबतात. मुंबई पुण्याहून येथे सरळ रेल्वे उपलब्ध आहे. सचिन कुंडलकर सारख्यांनी हा लेख वाचून परत सेलू कुठे आहे असा प्रश्न विचारू नये. सेलू आणि परिसरात प्राचिन मंदिरे आहेत. साईबाबांचे गुरू केशवराव बाबासाहेब यांची समाधी याच सेलूत आहे. साईबाबांचे जन्मगाव जवळच पाथरी हे असून तिथे त्यांचें सुंदर मंदिर आहे.) येथे हरिभाऊ चारठाणकर हे जून्या जमान्यातील थोर गायक नट होवून गेले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे कुटूंबिय छोटा कार्यक्रम दरवर्षी घ्यायचे. यावर्षी सेलूकर रसिकांनी मिळून एक मोठा संगीत महोत्सव हरिभाऊंच्या स्मृती प्रित्यर्थ घेेण्याचा संकल्प केला. हा महोत्सव देान दिवसांचा असावा व लोकवर्गणीतून तो संपन्न व्हावा असे सर्वांनी ठरवले. त्या प्रमाणे वर्गणी गोळा करून कुठलाही मोठा प्रयोजक नसताना, कुठल्याही राजकीय नेत्याचे पाठबळ नसताना, कुठलाही भपका न करता हा पार पडला. कलाकारांना रसिकांनी आपल्या घरी उतरवले. जेवू खावू घातले. हा आत्मियतेचा प्रत्यय कलाकारांनाही भारावून टाकणारा होता. कुणावरच मोठा आर्थिक ताण आला नाही. सामान्य रसिकांनाही मोकळेपणाने उत्सवात सहभागी होता आले. शिवाय हा महोत्सव आपला आहे अशी भावनाही लोकांमध्ये रूजली.
अशा पद्धतीशी एक शैली जर विकसित झाली तर साहित्य संगीत कला यांचे महोत्सव अगदी साधेपणाने उत्स्फुर्तपणे साजरे होवू शकतात. गावोगावी शेकडो वर्षे उत्सवांची अशीच परंपरा चालवली जाते आहे. त्यातील धार्मिकतेचा भाग बाजूला ठेवला तर अगदी हेच सुत्र साहित्य संगीत कला चळवळीसाठी वापरता येवू शकते.
आपल्याकडील धार्मिक उत्सवांमधूनही संगीत जपण्याची एक मोठी चळवळ नकळत जोपासल्या गेली आहे. किर्तनांत संगीताचा भाग मोठाच राहिला आहे. आज ज्याला स्टँडअप कॉमेडी म्हणतात याचाच जूना अवतार म्हणजे किर्तन. आत्ताच्या इंदूरीकर महाराजांची किर्तनं म्हणजे स्टँडअप कॉमेडीच असते.
आमच्या परिसरात जून्या दर्ग्यांमधून उरूस भरवले जातात. या उरूसांमध्ये कव्वाली गाण्याची परंपराही फार मोठी आहे. एकेकाळी मोठ मोठे गायक संगीतकार या उरूसांमध्ये येवून कव्वाल्या ऐकायचे. सादर करायचे. या पारंपारीक चाली नव्यानं चित्रपटांत गाणी म्हणून यायच्या. ‘मेरा पिया घर आया’, ‘मेरे रश्क-ए-कमर’, ‘भर दे झोली मेरी या मुहम्मद’ या चित्रपटांमधून गाजलेल्या कव्वाल्या मूलत: उरूसातील पारंपरिक कव्वाल्याच आहेत. त्यांना जरासा आधुनिक साज चढवून चित्रपट गीत म्हणून सादर केल्या गेले.
पंढरपुरची यात्रा उत्स्फुर्तपणे शेकडो वर्षे पार पडते आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी कुठलीही कमिटी बनवली जात नाही. त्यासाठी कुठलाही मोठा निधी निर्धारीत केल्या जात नसतो. आप आपल्या गावाहून पायी निघालेल्या लाखो वारकर्यांची जेवण्या खाण्याची संपूर्ण महाराष्ट्रभर सोय केल्या जाते. यासाठी कुठलाही भेदभाव पाळला जात नाही. आपण पंढरपुरला जावू शकत नाही तर किमान तिकडे निघालेल्या वारकर्यांची जरा सेवा करावी असा पवित्र भाव सामान्य नागरिकांमध्ये असतो.
याच पद्धतीनं याच भावनेनं जर संगीत महोत्सव, साहित्य संमेलनं भरवली गेली तर त्यांच्यामध्येही असाच उदंड उत्साह आढळून येईल. आज ज्या पद्धतीनं वाद होत आहेत आणि या सगळ्याला एक कळकट सरकारी मदतीचा करडा रंग प्राप्त झाला आहे तो तसा राहणार नाही.
जूनी शिल्पं, अजिंठा सारख्या ठिकाणची रंगीत चित्रं, मंदिरांतून जतन केल्या गेलेलं संगीत हे सगळं पाहता मंदिरं हे कलांचे एक मोठे उर्जा केंद्र राहिलेलं आहे. आज आधुनिक काळात मंदिर व्यवस्थेवर टीका करत असताना त्यातील कलेचा हा मोठा घटक आपण नकळतपणे उपेक्षीला. गुरूवारी दत्ताची पंचपदी, एकादशीला होणारे किर्तन अशा कितीतरी निमित्ताने संगीताची जोपासना केली जायची.
अंबड (जि. जालना. येथे महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे एकत्र मोठे सुंदर मंदिर आहे. अहिल्याबाईंनी त्याचा जिर्णाद्धार केला आहे. शिवाय तळ्याइतकी मोठी पुष्करणी बारव आहे. खंडोबाचे सुंदर मंदिर आहे. सचिन कुंउलकर यांना जालना जिल्हा माहित नसल्यास अंबड माहित असण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून सविस्तर सांगितलं. जालना हे रेल्वे स्टेशन असून मुंबईहून येथे रेल्वे आहे. तेथून अंबड 35 कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून रस्ता मार्गे आल्यास अहमदनगरहून उजवीकडे नांदेडला जाणार्या राष्ट्रीय महार्गावरून गढी गावापर्यंत गेल्यास तेथून जालन्याला जाणार्या राज्य रस्त्यावर अंबड हे तालूक्याचे ठिकाण आहे.) येथे गेली 95 वर्षे दत्त जयंती संगीत महोत्सव भरत आहे.
95 वर्षांपूर्वी अंबड जवळ भणंग जळगांव इथे त्र्यंबक नारायण कुलकर्णी यांना त्यांच्या गुरूंनी दत्त जयंती निमित्ताने संगीत सेवा सुरू करण्याचा आदेश दिला. त्यांची आज्ञा प्रमाण माणून त्र्यं.ना.कुलकर्णी यांनी हे कार्य सुरू केले. त्र्यंबकरावांच्या पोटी गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर यांचा जन्म झाला. त्यांच्या लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले. हैदराबादचे प्रसिद्ध गायक वासुदेव नामपल्लीकर यांच्याकडून गांविंदरावांना आग्रा घराण्याच्या गाण्याचा वारसा मिळाला. गाविंदरावांनी पुढे अंबड शहरात वास्तव्यास आल्यावर दत्त जयंती संगीत महोत्सव अंबडला सुरू केला. तेंव्हा पासून ते आजतागायत अंबड शहरात अखंडपणे ही गायन चळवळ चालू आहे.
चार वर्षांपूर्वी पं. गोविंदराव जळगांवकरांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य असे सभागृह अंबड नगर पालिकेने उभारले आहे. त्यांचा सुंदर असा अर्धाकृती पुतळा सभागृहाच्या दर्शनी भागात उभारण्यात आला आहे. एखाद्या गायकाच्या नावाने ग्रामीण भागात भव्य सभागृह असणे आणि अखंडपणे त्याची आठवण संगीत महोत्सवातून जतन केली जाणे हे दुर्मिळ उदाहरण आहे. आज घडीला अंबड इतकी जूनी परंपरा असलेला संगीत महोत्सव दूसरा नाही.
अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गावांमधून संगीत विषयक चळवळ चालवली जाते. भविष्यातही याच मार्गाने ही चळवळ पुढे जावू शकते. कर्हाडजवळ औदूंबरला साहित्य संमेलन भरवले जाते. या साहित्य संमेलनात आजतागायत कुठले वाद झाले नाहीत. एक लोकचळवळ असे स्वरूप या साहित्य संमेलनाचे राहिले आहे. परभणीला गेली 16 वर्षे ‘बी. रघुनाथ महोत्सव’ भरत आहेत.आज घडीला महाराष्ट्रात विविध ठिकाणी साहित्य कलाविषयक उपक्रम लोक उत्स्फुर्तपणे घेत आहेत. त्यासाठी निधी आपणहून गोळा केला जात आहे. हे असे छोटे मोठे महोत्सव जे लोकांनी आपणहून चालवले आहेत ते टिकून राहतात. या उलट शासनाने मदत केलेले साहित्य संमेलनासारखे उपक्रम वादात सापडताना दिसत आहेत.
सरकारी मदत घ्यावी की नाही हा वादाचा विषय आहे. मोठे प्रायोजक मिळवावे की नाहीत हा पण वादाचा विषय आहे. ज्यांना अशा मदतीतून उपक्रम घ्यायचे आहेत ते त्यांनी घ्यावेत. पण सामान्य रसिक आणि कलाकार यांनी परस्पर समन्वयातून चांगले महोत्सव साधेपणाने आता भरवायला हवे.
सेलूच्या हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचा हिशोब त्या समितीने आठच दिवसांत सगळ्या लोकांसमोर मांडला. पहिल्या बैठकीत जे ठरले होते तेंव्हा पासून ते शेवटी सगळा हिशोब सादर करण्यापर्यंत एक पारदर्शकता पाळल्या गेली. याचा परिणाम म्हणजे पुढचा महोत्सव आम्ही अजून चांगला भरवून दाखवतो असे आश्वासन आत्ताच सामान्य कार्यकर्त्यांनी दिले. समितीत सगळेच कार्यकर्ते होते. कुणीच पदाधिकारी नसल्याने महोत्सव सर्वांना आपला वाटला.
सुरेश भटांनी आपल्या एका गझलेत असे लिहीले होते
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही
भटांचे शब्द जरा कडक होते. पण सामान्य माणसांवर त्यांनी टाकलेला विश्वास हा कलेच्या चळवळीतही खरा ठरताना दिसतो आहे.
माध्यमांनी पण आता अशा चळवळींना योग्य ती प्रसिद्धी देवून सामाजिक पुरूषार्थाचा गौरव केला पाहिजे. जेंव्हा सामान्य माणसांच्या बळावर चळवळी चालतात तेंव्हा त्यांच्या टिकण्याची आणि वर्धिष्णु होण्याची शक्यता जास्त असते. या उलट जेंव्हा महोत्सव चळवळ वरून लादली जाते तेंव्हा तीचे आयुष्य फार असत नाही. साहित्य संगीत कला चळवळ निरोगीपणे पुढे न्यायची असेल तर ही पालखी सामान्य रसिकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी.
(छायाचित्र- पंकज लाटकर हरिभाउ चारठाणकर समारोहात सेलू येथे गाताना)
(छायाचित्र- पंकज लाटकर हरिभाउ चारठाणकर समारोहात सेलू येथे गाताना)
No comments:
Post a Comment