उरूस, पुण्यनगरी, 29 नोव्हेंबर 2015
हिंदी चित्रपट सृष्टीत तीन व्यक्तीमत्व कायम तरूण म्हणून ओळखली जातात. एक सुरैय्या. जिनं कधीच चरित्र भूमिका केल्या नाहीत. नायिका म्हणून काळ संपला की निवृत्त झाली. तिचं वृद्धावस्थेतील एकही छायाचित्र उपलब्ध नाही. दुसरा देव आनंद. त्यानं उशिरापर्यंत चित्रपटांत कामं केली. तो म्हातारा झाला तरी तरूणांचीच कामं करायचा. लोक आणि तोही स्वत:ला शेवटपर्यंत (वय वर्षे केवळ 88) तरूणच समजत राहिला. तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेलन जेरॅक रिचर्डसन उर्फ हेलन. 21 नोव्हेंबर 1938 ही हेलनची जन्मतारिख. म्हणजे तीची पंच्याहत्तरी उलटून गेली. आणि आजही तीची प्रतिमा नायकाला/खलनायकाला घायाळ करणारी तरूण कमनीय बांध्याची मादक नृत्यांगना अशीच आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीत तीन व्यक्तीमत्व कायम तरूण म्हणून ओळखली जातात. एक सुरैय्या. जिनं कधीच चरित्र भूमिका केल्या नाहीत. नायिका म्हणून काळ संपला की निवृत्त झाली. तिचं वृद्धावस्थेतील एकही छायाचित्र उपलब्ध नाही. दुसरा देव आनंद. त्यानं उशिरापर्यंत चित्रपटांत कामं केली. तो म्हातारा झाला तरी तरूणांचीच कामं करायचा. लोक आणि तोही स्वत:ला शेवटपर्यंत (वय वर्षे केवळ 88) तरूणच समजत राहिला. तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेलन जेरॅक रिचर्डसन उर्फ हेलन. 21 नोव्हेंबर 1938 ही हेलनची जन्मतारिख. म्हणजे तीची पंच्याहत्तरी उलटून गेली. आणि आजही तीची प्रतिमा नायकाला/खलनायकाला घायाळ करणारी तरूण कमनीय बांध्याची मादक नृत्यांगना अशीच आहे.
पडद्यावरील आपल्या प्रतिमेच्या अगदी उलट तीची हृदयद्रावक कौटूंबिक कहाणी आहे. ब्रह्मदेशात (आजचे म्यानमार) अँग्लो इंडियन वडिल व ब्रह्मदेशी आई यांच्या पोटी जन्मलेल्या हेलनला लहान वयात अतिशय वाईट परिस्थीतीला तोंड द्यावे लागले. दुसर्या महायुद्धात तिचे वडिल मारले गेले. जपानने म्यानमारवर ताबा मिळवला तेंव्हा हे कुटूंब ब्रिटीश सैन्याच्या सहाय्याने आसामला पळून आले. सोबतच्या कित्येक नातेवाईक आप्तस्वकियांचा या काळात मृत्यू झाला. खुद्द हेलनची आई या वेळी गरोदर होती. तिचाही गर्भपात झाला. आसाममधून हे कुटूंब कामाच्या शोधात मुंबईला पोचले. आई नर्स म्हणून काम करायची. त्या उत्पन्नात घर चालवणे मुश्किल होते. मग शेवटी हेलनने काम शोधायला सुरवात केली. तेंव्हाची गाजलेली आयटम गर्ल कक़्कु (बरसात, आवारा, मि.अँड मिसेस 55, चलती का नाम गाडी मधील तिची गाणी खुप गाजली) जी की स्वत: अँग्लो इंडियनच होती तिने हेलनची अडचण जाणली. तिच्या अंगातील लवचिकता ओळखली आणि तिला आपल्या सोबत चित्रपटात कामं मिळवून द्यायला सुरवात केली.
‘यहुदी’ (1958) चित्रटात या दोघींचे एक सुंदर गाणे आहे. शंकर जयकिशनचे संगीत असलेले ‘बेचैन दिल खोयी सी नजर’ हे गोड गाणे लता आणि गीता यांच्या आवाजात आहे. या गाण्यावर कक्कु आणि हेलनचे सुंदर नृत्य आहे. कुठेही अश्लिल हातवारे नाहीत, भारतीय शैलीत शोभतील असे कपडे असे हे गाणे तेंव्हा बर्यापैकी गाजले. हे गाणे म्हणजे आयटम गर्लचा चार्ज कक्कु कडून हेलन कडे आला याचे प्रतिकच आहे. कारण पुढे कक्कुची कारकीर्द खरेच उताराला लागली.
हेलन खरी गाजली ती हावरा ब्रीज (1958) मधील ओ.पी.नय्यरच्या गाण्याने. गीता दत्तच्या आवाजातील ‘मेरा नाम चिंन चुन चु’ या हीट गाण्याने हेलनचे नशिबच पालटले. अक्षरश: पुढची 20 वर्षे तिने आपल्या या प्रतिमेवर हिंदी चित्रपट सृष्टीत राज्य केलं. 1983 ला निवृत्ती जाहिर करेपर्यंत तिची हीच प्रतिमा होती.
हेलन आणि जॉनी वॉकर यांच्या शिवाय त्या काळात हिंदी चित्रपट हीटच होत नाहीत अशी एक गंमतीदार समजूत होती. आणि खरंच बर्याच हिट चित्रपटात हे दोघं आहेतच. दिल अपना और प्रीत पराई (1960) हा मीना कुमारी राजकुमार यांचा गाजलेला चित्रपट. यात आशा भोसलेच्या आवाजात ‘इतनी बडी मेहफील और इक दिल किसको दू’ म्हणत हेलन सुंदर नाचली आहे. दिलीप कुमार वैजयंतीमाला यांच्या गाजलेल्या ‘गंगा जमुना’ (1961) मध्ये तिने ‘तोरा मन बडा पापी सांवरीया’ म्हणत छानसा मुजरा सादर केला आहे. संगीतकार कोणीही असो हेलनसाठी एक वेगळे गाणे तो द्यायचाच. चायना टाउन (1962) हा शम्मी कपुर-शकिलाचा ‘बार बार देखो’ गाण्यासाठी गाजलेला सिनेमा. यातही हेलनचे गाणे ‘यम्मा यम्मा यम्मा, तू परवाना मै शम्मा’ आहेच.
तिच्या गाजलेल्या गाण्याची यादी जरी बघितली की लक्षात येते नायक नायिका संगीतकार या सगळ्या सोबत हेलन हेही एक स्वतंत्र प्रकरण आहे. ‘ऊई मां ऊई मां ये क्या हो गया- पारसमणी (1963)’, ‘ओ हसिना जुल्फोवाली जाने जहा- तिसरी मंझिल (1966)’, ‘आ जाने जा -इंतेकाम (1969)’, ‘पिया तू अब तो आ जा-कारवां (1971)’, ‘आओ ना गले लग जावो ना-मेरे जीवनसाथी (1972)’, ‘मेहबुबा मेहबुबा- शोले (1975)’, ‘मुंगडा मुंगडा-इन्कार (1978)’, ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना-डॉन (1978)’1958 ते 1978 अशा 20 वर्षात सतत तिचे चित्रपट येत होते. त्यातील गाणी गाजत होती.
हेलन एक चांगली अभिनेत्री होती हे मात्र काहीसं दूर्लक्षिलं गेलं. डोळा चकणा झाला म्हणून ललिता पवार ला कायम खलनायिकी भूमिका कराव्या लागल्या, निरूपमा रॉयला आईच्या भूमिका कराव्या लागल्या, जॉनी वॉकरला विनोदी भूमिका कराव्या लागल्या तसेच हेलनचे झाले. खरं तर आपली नृत्याची ताकद तिनं वेगळ्या पद्धतीनंही दाखवून दिली आहे. पंजाबी असो, मुजरा असो की शास्त्रीय हे नृत्यं ती चांगले करू शकायची. पण तिची प्रतिमा झाली ती कॅबरे डान्सर म्हणूनच.
1961 मध्ये जॉय मुखर्जी सोबत नायिका म्हणून तिचा ‘हम हिंदूस्थानी’ नावाचा चित्रपट आला होता. ‘रात बिखरी हुई’ हे मुकेशच्या आवाजातील वेगळे छान गाणे यात आहे. या गाण्यात गंमत म्हणजे नायक जॉय मुखर्जीच कमी कपड्यांत (टॉपलेस) आणि हेलन मात्र संपूर्ण कपड्यात आहे. यातीलच दुसरे गाणे आशा रफीच्या आवाजात ‘नीली नीली घटा’ हेलन जॉय मुखर्जीवर आहे. उषा खन्नाचे संगीत असलेल्या या चित्रपटांतील ‘छोडो कल की बाते’ हे सुनील दत्तवरचे गाणे तर आजही लोकप्रिय आहे. याच वर्षी ‘संपूर्ण रामायण’ नावाच्या चित्रपटात शुर्पणखाची भूमिका हेलने केली होती. या चित्रपटात एक अतिशय गोड गाणे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘बार बार बगिया मे कोयल ना बोले’ या भरत व्यासांच्या शब्दांवर शुद्ध शास्त्रीय नृत्य करून हेलनने सर्वांनाच चकित केले आहे. तिच्या या गुणाचा वापर पुढे केला गेला नाही.
1964 मध्ये वो कौन थी मध्ये मदन मोहनने ‘छोडकर तेरे प्यार का दामन’ हे लता-महेंद्र कपुरच्या आवाजातील गाणे दिले आहे. हे गाणे हेलन व मनोजकुमारवर आहे. यात ती केवळ एक आयटम गर्ल म्हणून आलेली नाही.
1964 मध्ये ‘चा चा चा’ नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाची हेलन नायिका होती. हैदराबादच्या इक्बाल कुरेशी याने या चित्रपटाला संगीत दिलं होतं. हैदराबादमुळे असेल कदाचित त्याला मक्दुम मोईनोद्दीन या तिथल्या शायरच्या प्रसिद्ध कवितेचा मोह पडला. त्याने आवर्जून या चित्रपटात मक्दूमची ‘एक चमेली की मंडुवे तले, दो बदन प्यार की आग मे जल गये’ही कविता घेतली. सलिम अनारकलीच्या वेशात चंद्रशेखर व हेलनवर हे गाणे चित्रीत झाले आहे.
नाचाव्यतिरिक्त आपल्यातल्या अभिनेत्रीची फार दखल घेतली गेली नाही याची खंत तिने कधीच जाणवू दिल नाही. महेश भटच्या ‘लहू के दो रंग’(1979) चित्रपटात तिने केलेल्या कामाची दखल घेत तिला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.
वैयक्तिक आयुष्यात उठलेली वादळं तिनं पडद्यावर येवू दिली नाहीत. चित्रपट दिग्दर्शक पी.एन.आरोरा सोबत ती बराच काळ राहिली. नंतर प्रसिद्ध लेखक सलिम जावेद जोडीतील सलिम खान यांच्या सोबत 1981 मध्ये वयाच्या 44 व्यावर्षी लग्न केले. सलमान खानची सावत्र आई बनलेल्या हेलनने अर्पिता नावाची एक मुलगी दत्तक घेतली. या दत्तक मुलीचे नुकतेच मोठ्या थाटात लग्न झाले. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटांत तिने सलमानच्या आईची भूमिका मोठ्या रूबाबात सादर केली.
तसं तर तिनं 1983 पासूनच चित्रपट संन्यास घेतला. शांतपणे सलिम खान सोबत आपलं आयुष्य व्यतित करण्यास सुरवात केली. आपल्या गत आयुष्याबद्दल कुठलाही कडवटपणा तिनं कधी व्यक्त केला नाही. हे तिचं मोठेपणच म्हणावे लागेल. 1964 मध्ये ‘गुमनाम’ चित्रपटात लताच्या आवाजात शंकर जयकिशनच्या गाण्यावर हेलन नाचली आहे. हसरत जयपुरीचे बोल तिनं स्वत:च्या आयुष्याबाबत स्वत:ला समजावून सांगितले असतील.
इस दुनिया मे जिना है तो सुन लो मेरी बात
गम छोड के मनावो रंगरेली
पंच्च्याहत्तरीला ‘अमृत महोत्सव’ म्हणतात. कुसुमाग्रजांनी गमतीनं असं म्हटलं आहे, ‘पंच्च्याहत्तर वर्षांची सुट देवूनही जी माणसं मृत होत नाहीत त्यांची गणती अ‘मृता’त करण्याशिवाय काय गत्यंतर आहे...’ हेलनला तिची पंच्च्याहत्तरी होवून गेल्यावर उशीरा का होईना या शुभेच्छा !
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575