उरूस, पुण्यनगरी, 1 नोव्हेंबर 2015
सध्या ‘पुरस्कार वापसी’ चा धमाकेदार शो भारतभर चालू आहे. मराठीतही काही लेखकांनी राज्य शासनाकडुन आपणहून अर्ज करून मिळवलेले पुरस्कार वापस करण्याचे ‘नाटक’ चांगले वठवले आहे. गंमत अशी की ज्या घटनेचा उल्लेख सगळे करत आहेत त्या दाभोळकरांची हत्या होवून दोन वर्षे उलटून गेली. तेंव्हा कोणीही पुरस्कार परत केले नाहीत. पानसरेंची हत्या झाली. तेंव्हाही काही घडले नाही. कर्नाटकात कलबुर्गी यांची हत्या झाली. त्याच्या निषेधार्थ कानडी लेखकांनी पुरस्कार वापसी सुरू केली. तेंव्हाही मराठी लेखकांनी काही केलं नाही. दादरी येथे अखलाख यांची गोमांस घरात असल्याच्या संशयावरून माथेफिरू समुहाने हत्या केली आणि अचानक मराठी लेखकांची ट्यूब पेटली. लगेच सर्व पुरोगामी जाणीवा तीव्र झाल्या. आणि पुरस्कार वापसीचे प्रयोग सुरू झाले. साहित्य अकादमी या केंद्रिय संस्थेचे पुरस्कार वापस करून केंद्र शासनाचा निषेध करण्याचे धोरण इतर भाषिक लेखकांनी अवलंबिले. पण यातही मराठी लेखक चतुर. एकाही मराठी लेखकाने आपल्याला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार अजूनपर्यंत वापस केला नाही. फक्त राज्य शासनाचे पुरस्कार वापस केले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली, देशात असहिष्णू वातावरण निर्माण झाले, म्हणून हा निषेध असे या लेखकांकडून सांगण्यात येतं. यांची कृती कौतुकास्पदच आहे पण हेतू संशयास्पद आहे. काही जणांनी आणिबाणीच्या काळात लेखन स्वातंत्र्यावर कशी गदा आली होती आणि त्यावेळी लेखक कसे बाणेदारपणे वागले होते याचे उदाहरण दिले. साधा प्रश्न आहे की आणिबाणीत नेमके काय घडले? मराठी लेखक तेंव्हा कसे वागले?
केरळ मधुन एक पत्रकार आणिबाणीबद्दल कोणी काय लिहून ठेवलंय? लेखका तेंव्हा काय करत होते याचा शोध घेत महाराष्ट्रात आला. समिक्षक लेखक डॉ. चंद्रकांत पाटील यांना भेटला तेंव्हा त्यांनी सांगितलं की तूला फक्त एकाच माणसाकडून माहिती मिळेल आणि तो म्हणजे विनय हर्डिकर. याचे साधे कारण म्हणजे आणिबाणीत अविष्कार स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास पत्करणारा लेखक म्हणजे विनय हर्डिकर. या अनुभवावरचे त्यांचे ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे. आजच्या लेखकांच्या हेतुबद्दल शंका येण्याचे एक कारण म्हणजे यातील काही तर विनय हर्डीकर यांच्याच वयाचे आहेत. मग हे आजचे ‘पुरस्कार वापसी’कार तेंव्हा काय करत होते?
ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, दुर्गाबाई भागवत इतकी बोटावर मोजता येईल अशी नावे सोडली तर तेंव्हाही मराठीतील तमाम लेखक मंडळी मुकाट बसून होती. इतकेच नाही तर नंतरही आणिबाणी बाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही. सत्याग्रह करून विनय हर्डीकर तुरूंगात गेले. सुटून बाहेर आल्यावर मराठी लेखकांच्या भेटी घ्यायला लागले. श्री.ना.पेंडसे यांनी तर आणिबाणीला पाठिंबाच जाहिर करून टाकला. आणिबाणीमुळे लोकांमध्ये शिस्त आल्याचं पेडश्यांनी सांगितल्यावर विनय हर्डिकरांनी त्यांना विचारलं, ‘भितीपोटी आलेली शिस्त टिकेल का?’ पेंडश्यांना उत्तर देता येईना. आणिबाणीमुळे लोकल वेळेवर यायला लागल्या. सकाळी कामावर गेलेला माझा भाऊ संध्याकाळी सुरक्षित परत येतो आहे याचे समाधान त्यांनी व्यक्त केल्यावर हर्डिकरांनी विचारलं मग लाखभर लोक तुरूंगात सरकारने डांबले ते सुरक्षित कधी बाहेर येतील याची तुम्हाला काळजी नाही का वाटत? यावर परत पेंडशे निरूत्तर.
रा.भा.पाटणकरांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी तो परत करावा म्हणून त्यांच्यावर दबाव वाढत चालला होता. आणि पाटणकर मात्र पुरस्कार परत करायला तयार नव्हते. ‘सौंदर्यमिमांसा’ सारख्या अ-राजकीय विषयावरच्या पुस्तकाला पुरस्कार मिळालेला. तो परत का करायचा? आणि परत केला नाही तर मी लेखन स्वातंत्र्याच्या विरूद्ध कसा? आता पाटणकरांच्या या विधानाला काय म्हणावे?
विंदा करंदीकरांच्या घरी हर्डीकर गेले तेंव्हा ते कसे घरगुती गोष्टीच सांगत बसले. चुकूनही सामाजिक विषयाकडे कसे येईनात. कराडच्या साहित्य संमेलन प्रसंगी खांडेकर, पु.ल.देशपांडे, रणजित देसाई यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करावे म्हणून दुर्गाबाईंचा कसा दबाव होता आणि यशवंतरावांनी गोड बोलून सगळ्यांना कसे खिशात घातले असे धम्माल प्रसंग हर्डीकरांनी आपल्या पुस्तकात लिहीले आहेत. आणिबाणीत पु.ल.देशपांडे शांत बसून होते. तूम्ही निषेध का केला नाही अस ं विचारलं तेंव्हा पु.ल.म्हणाले, ‘बोलून काय फायदा? काही छापून येतच नव्हतं.’ म्हणजे पु.ल. सारख्यांना त्याही परिस्थितीत प्रसिद्धी महत्त्वाची वाटली. पुढे आणिबाणी उठल्यावर मात्र त्यांनी कॉंग्रेस विरोधी प्रचार करण्यात धन्यता मानली. ‘माझ्या आयुष्यातला अत्यंत अपमानास्पद काळ’ असा उल्लेख पु.ल. करत. हर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे की जर कोणी स्वाभीमान कसोटीला लावलाच नाही तर अपमान होईलच कशाला? ‘विशाखा’ सारखा कवितासंग्रह लिहीणारे, गांधींचा स्पर्श झाला तो हात मी दोन दिवस तसाच धरून बसलो असं सांगणारे कुसूमाग्रज शांत. विनोबासारख्यांनी तर आणीबाणीला ‘अनुशासनपर्व’ म्हटलं. पुढं त्यांना ‘भारतरत्न’ चे बक्षिस इंदिरा गांधींकडून मिळाले !
दुर्गाबाई भागवत यांच्या आणिबाणी काळातील भाषणं व लेखांचे छोटे पुस्तक ‘मुक्ता’ 1977 मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने सिद्ध केले आहे. त्यात दुर्गाबाईंनी विजय तेंडूलकरांबाबत लिहीले आहे. विजय तेंडुलकर सामाजिक प्रश्नांबाबत भूमिका घेणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. आणिबाणीत दुर्गाबाई भागवत यांनी ज्या पद्धतीनं विचारांचा झंझावात उभा केला त्यावर जाहिरातबाजीचा आरोप तेंडुलकरांनी केला. दुर्गाबाईंनी सडेतोड उत्तर देताना सांगितलं की स्वत:च्या नाटकावर बंदी आली की विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणारे, मित्रांकडून पत्रके काढून मिरवणारे तेंडुलकर सार्वत्रिक बंदी आली की मूग गिळून चुप का?
याच पुस्तकात दुर्गाबाईंनी लेखनावर आलेली बंधनं धिक्करताना म्हटलं आहे, ‘लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला आरंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार-मुक्त विचार-हे मानले पाहिजेत.’
विनय हर्डीकर यांनी मुळ विषयाला हात घातला आहे. ‘साहित्यीकांचा शासनावर वचक राहिला नाही. शासनानं स्वातंत्र्य द्यावं, पारितोषिकं द्यावीत, शिष्यवृत्त्या द्याव्यात, परदेशी जाण्यची संधी उपलब्ध करून द्यावी. परिणामी साहित्यिकांवर-बुद्धिजीवींवर शासनाची एक प्रकारची नैतिक सत्ताच निर्माण झाली.’ आता अशी सत्ता शासनाची लेखकांवर निर्माण झाल्यावर ते शासनाचा निषेध काय म्हणून करणार? आज पुरस्कार वापस करणार्यांच्या हेतूवर शंका येते ती अशा पार्श्वभूमीवर.
हर्डीकर स्वच्छपणे शासनाचा साहित्यातील हस्तक्षेप नाकारतात. हर्डीकर, दुर्गाबाई, अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते ही कोणीही माणसे शासनाची अंकित नव्हती. त्यामुळे यांनी जी काही भूमिका घेतली त्याचा आजही आदर केला जातो. त्याचा वचक शासनावर आजही आहे. आणि नेमकं उलट आजचे जे ‘पुरस्कार वापस’कर्ते आहेत त्यांना त्यांच्या घराशेजारचा पानवालाही लेखक म्हणून ओळखत नाही.
लेखक आजही मुलभूत भूमिका घ्यायला कचरतात म्हणून त्यांचा विरोध किरटा कुठलाही परिणाम न करणारा ठरतो. हेमिंग्वेच्या ‘फेअरवेल टू आर्म्स’ ही हेमिंग्वेची युद्धात निर्वासित झालेल्यांच्यावर लिहीलेली कादंबरी. या लेखनावरच्या चित्रपटातील एक प्रसंग हर्डीकरांनी लिहीला आहे. अर्धमेली गुंगीत असलेली एक बाई घोडागाडीतून जात आहे. तिच्या मांडीवर मुल आहे. एका खड्ड्यातून गाडी जात असताना ते मुल निसटतं आणि खाली पडतं. एक क्षण तिच्या चेहर्यावर वेदना उमटते आणि परत चेहरा निर्विकार होतो. तिला ते मुल उचलून घ्यावं वाटत नाही. युद्धामुळे बधिरता येते असं दिग्दर्शकाला दाखवायचं होतं. हर्डीकर आरोप करतात की आपल्या लेखकांनी काही न अनुभवताच आपलं आपत्य असलेलं आविष्कार स्वातंत्र्याचं मुलभूत हक्काचं मांडीवरचं मूल खाली पडू दिलं.
कबीराचा फार सुंदर दोहा आहे.
शोला शोला रटते रटते लब पर आंच न आये
एक चिंगारी लब पर रख दो लब फॉरन जल जाये
नुसतं बोलून काही उपयोग नाही प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. आणीबाणीतील अनुभवांवरच्या विनय हर्डीकर यांच्या ‘जनांचा प्रवाहो चालला’ यापुस्तकाला शासनाने पुरस्कार नाकारला. लोकांनी वर्गणी गोळा करून या पुस्तकाला गौरविले. अशी भूमिका आज कोण घेणार आहे?
शासनविरोधी कृती करणारा प्रत्यक्ष तुरूंगात जाणारा, नंतरही सातत्याने आपली भूमिका मांडणारा, चळवळीत उतरणारा, त्यासाठी वैयक्तीक आयुष्यात मोठी किंमत मोजणारा विनय हर्डीकर सारखा लेखक आपल्या मराठीत आहे याचे कौतुक करावे का अशी उदाहरणं दूर्मिळ आहेत याचं दू:ख करावं?
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575