Thursday, October 15, 2015

मराठी पुस्तके आणि पुरस्कार : कही पे निगाह है कही पे निशाना !!

दै. उद्याचा मराठवाडा दिवाळी 2013 

मराठी पुस्तकांसाठी आजकाल गल्ली पासून ते दिल्ली (साहित्य अकादमी) पर्यंत पुरस्कारांची प्रचंड दाटी झाली आहे. कुणालाही असं वाटतं की मराठी वाङ्मयासाठी काही करायचं असेल तर ते केवळ पुरस्कार देवूनच साध्य होवू शकेल. पुरस्कार देण्यास सुरवात होते. सुरवातील उत्साह टिकतो, चांगली पुस्तके निवडली जातात. मग बघता बघता त्यात गटातटाचे राजकारण शिरते. कुणाला पुरस्कार द्यावा या सोबतच कुणाला तो कसा मिळू नये याची व्यूहरचना काटेकोरपणे केली जाते. (मराठवाड्यात असं घडलं आहे की आदल्या दिवशी पर्यंत एका कविमित्राला पुरस्कार द्यायचं ठरलंं होतं, एका संस्थेने आपल्या पत्रिकांमध्ये तसं लिहिलं पण होतं पण दुसर्‍यादिवशी ऐनवेळेवर हा पुरस्कार दुसर्‍याच पुस्तकाला दिल्या गेला. मराठवाड्यातीलच एक कथाकार, एक कादंबरीकार आणि एक कवी यांच्या अतिशय चांगल्या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार कसे मिळू नयेत याचे आटोकाट प्रयत्न केल्या गेले.)  परिणामी त्या पुरस्काराचे गांभिर्यच मग कमी होउन जाते. नंतर नंतर तर कुठल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला हेच कुणाच्या लक्षात रहात नाही.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वर्तमानपत्रे मर्यादित होती शिवाय त्यांची पानेही मर्यादितच होती. परिणामी एखाद्या पुरस्काराची बातमी सगळ्या महाराष्ट्रभर पसरायची. मग स्वाभाविकच महाराष्ट्रभरचे साहित्यप्रेमी त्याची नोंद घ्यायचे. आता मात्र गावोगावच्या स्वतंत्र आवृत्त्या निघू लागल्या आहेत. मग होते काय की पुरस्कार कितीही मोठा असो (पैशाच्या दृष्टीने) कितीही महत्त्वाचा असो (वाङ्मयीन दृष्टीने) कितीही काटेकोरपणे दिला जात असा (नि:स्पृहपणे काम करणार्‍या साहित्यीक कार्यकर्त्यांकडून) त्याची माहिती महाराष्ट्रभर होतच नाही. मग असा लेखक एखाद्या ठिकाणी जेंव्हा निमंत्रीत म्हणून जातो तेंव्हा कार्यक्रमापूर्वी आयोजकांपैकी एखादा होतकरू परिचय करून देणारा तरूण त्या साहित्यीकालाच विचारतो, ‘तूमचा काही छापिल परिचय असेल तर द्या किंवा पटापट सांगा मी लिहून घेतो.’ मग तो लेखक स्वत:ला मिळालेल्या पुरस्कारांची यादी सांगतो. तेंव्हाच इतरांना त्याला मिळालेले पुरस्कार कळतात.

बरं पुस्तकाला पुरस्कार मिळाला तर त्याचा खप वाढतो का? त्याला समीक्षक, रसिक वाचक यांच्या विशिष्ट वर्गात योग्य ती मान्यता मिळते का? तर तसा कुठलाही पुरावा नाही. उलट चांगलं पुस्तक हे वाचकापर्यंत बर्‍याचदा योगायोगानं किंवा एखाद्या चांगल्या वाचक मित्रानं सांगितलं, उपलब्ध करून दिलं म्हणूनच पोंचतं.
गल्लोगल्लीच्या पुरस्कारांचे निकष, त्यांचे स्वरूप यात गांभिर्य नसल्यामुळे त्यांचा विचार मी इथे करत नाही. फक्त साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार यांचा मराठी पुरता विचार करतो.

साहित्य अकादमीची स्थापना 1954 ला झाली. 1955 पासून पुरस्कार द्यायला सुरवात झाली. आतापर्यंत (2014 पर्यंत) 1957 चा एकमेव अपवाद वगळता प्रत्येकवर्षी हा पुरस्कार एका मराठी लेखकाला मिळाला असून ही संख्या 59 आहे. (सोबतच्या परिशिष्टात ही यादी दिली आहे.) एवढी मोठी परंपरा असलेला इतका मोठा हा पुरस्कार, ज्यासाठी आपणहून पुस्तक पाठवता येत नाही, यासाठी एका मोठ्या समितीद्वारे निवड केली जाते. तीन पातळ्यांवर ही निवड करत करत शेवटी 3 जणांची अंतिम समिती निर्णय घेते. इतकं सगळं होवून हा पुरस्कार जाहिर होतो.

आता अशी अपेक्षा सर्वसाधारण वाचकांची किंवा साहित्य क्षेत्रातील जाणकारांची असेल की ही पुस्तकं खुप खपली असतील, सर्वत्र पोचली असतील. तर ते सपशेल खोटं आहे. सोबतच्या नावांवरून तूम्ही नजर टाका तूमच्या लक्षात येतील की यातील कित्येक पुस्तके अजूनही कुठल्याच जिल्हा ग्रंथालयातही उपलब्ध नाहीत. किंवा उलटही घडलेले आहे. की पुस्तक लोकांना माहित आहे. त्याचे महत्त्व लोकांना माहित आहे पण या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे हेच माहित नाही.  त्याच्यापर्यंतही आम्ही पुरस्काराची महती पोंचवण्यास अपुरे पडलो.

विनय हर्डीकर यांच्या ‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार जाहिर झाला. पण आणिबाणीतील त्यांची शासनाचा कठोरपणे निषेध करणारी भूमिका पाहून या पुस्तकाला पुरस्कार नाकारला गेला. मग लोकांनी वर्गणी करून त्यांचा सन्मान घडवून आणला. याच काळात रा.भा.पाटणकर यांना ‘सौंदर्यमिमांसा’ या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहिर झाला. शासनाच्या निषेधार्थ हा पुरस्कार परत करा अशी मागणी दुर्गाबाईंनी केली होती. पाटणकरांनी आपले पुस्तक हे अराजकीय विषयावरचे आहे, साहित्य अकादमी ही संस्थासुद्धा अराजकीय आहे असं म्हणत पुरस्कार परत करायचं टाळलं.

गंगाधर गाडगीळ यांच्या ‘एका मुंगीचे महाभारत’ या आत्मचरित्राला अकादमी पुरस्कार मिळाला. खरं तर त्याकाळात गाडगीळ अकादमीचे अध्यक्षच होते. त्यांनी आपले पुस्तक शेवटच्या टप्प्यापर्यंत शर्यतीत राहिल याची काळजी घेतली. आपल्या पदाचे दडपण आणले. आणि प्रत्यक्ष पुस्तकाची निवड जाहिर करण्याच्या वेळेस मात्र राजीनामा देवून पद सोडले.

काही लेखकांच्या चांगल्या पुस्तकाला पुरस्कार मिळू नये अशीच योजना केली गेली मग उपरती होवून त्यांच्या दुय्यम पुस्तकांना हा पुरस्कार देवून भरपाई करण्याची तडजोड केली गेली. भालचंद्र नेमाडे यांचे ‘कोसला’ सोडून ‘टिकास्वयंवर’, ना.धो.महानोर यांचे ‘रानातल्या कविता’ सोडून ‘पानझड’, ग्रेस यांचे ‘संध्याकाळच्या कविता’ सोडून ‘वार्‍याने हलते रान’ पुरस्कार देण्यात आले. अशी काही उदाहरणं देता येतील.

साहित्य अकादमी पुरस्काराबाबत असा नियम आहे की जे कुठले पुस्तक पुरस्कारासाठी निवडण्यात येईल ते आधी कुठेही आणि कसल्याही स्वरूपात प्रकाशित झाले नसावे. शिवाय त्यातील एखादा भागही पुस्तक स्वरूपात प्रकाशित नसावा. पुस्तकाची अर्थातच पहिलीच आवृत्ती असावी. पण सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांच्याबाबतीत डोळेझाक करण्यात आली. एलकुंचवार यांचे ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक मौज प्रकाशनाने प्रकाशित केले होते. त्यानंतर जेंव्हा वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगांत ही तीन नाटके एकत्र करून ‘युगांत’ याच नावाने हे पुस्तक मौजेनेच प्रकाशित केले. आता जेंव्हा अकादमी पुरस्कारासाठी ‘युगांत’चा विचार झाला तेंव्हा वाडा चिरेबंदीच्या पूर्वप्रकाशनाकडे दुर्लक्ष केल्या गेले. आणि या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला. लेखक अतिशय प्रतिष्ठीत, प्रकाशन मोठे तेंव्हा कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नव्हता.  आणि तो घेतलाही गेला नाही. हेच जी.ए.कुलकर्णी यांच्याबाबतीत मात्र क्ष्ाुल्लक तांत्रिक बाब उपस्थित करून आक्षेप घेण्यात आला होता.

ज्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त होतो त्या पुस्तकाचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद व्हावा अशी अपेक्षा असते. किंवा अकादमीचे हे कामच आहे. पण प्रत्यक्षात मराठीतील पुस्तकांबाबत हे घडले नाही किंवा घडू दिले नाही. एक तर मराठी पुस्तकांचे अनुवाद झाले नाही किंवा जे झाले ते अतिशय सुमार दर्जाच्या लोकांनी केले. तसेच मराठीत जे अनुवाद उपलब्ध आहेत इतर भाषांमधले त्यातही अशात येणारी बरीच पुस्तके अतिशय सामान्य दर्जाची आहेत. त्या उलट इतर प्रकाशन संस्था सध्या जी अनुवादाची कामं करत आहेत ती जास्त समाधानकारक आहेत. पूर्वी साहित्य अकादमीने ही कामं चांगली केलेली आहेत.

अकादमीच्या पुरस्कारांना एक प्रतिष्ठा आहे, 59 वर्षांची मोठी परंपरा आहे शिवाय एक मोठे अधिष्ठान या संस्थेला आहे तिथे हे हाल आहेत.

सर्वसामान्य वाचकांना ही पुरस्कारप्राप्त पुस्तके कुठली आहेत हे जाणून घेण्यात भरपूर रस असतो. पण त्याहीबाबत अकादमी कमी पडते. पुस्तकांची विक्री आपण स्वत: करायची आहे की विक्रेत्यांमार्फत करायची आहे हेच अजून अकादमीला उलगडले नाही. खरं तर खासगी विक्रेत्यांना हाताशी धरून विक्रीची अतिशय चांगली यंत्रणा उभी करणं सहज शक्य आहे. पण सरकारी खाक्याप्रमाणे इथेही कारभार चालतो. एखाद्या परिसंवादासाठी लाखो रूपये खर्च करणारी अकादमी पुस्तक विक्रीसाठी मात्र अतिशय कद्रूपणा दाखवते. आजही अकादमीचा एखादा प्रतिनिधी नियमितपणे महाराष्ट्रभर विक्रेत्यांकडे फिरतो आहे असे घडत नाही. चांगले अनुवादक हुडकून त्यांच्याकडून मराठीतून इतर भाषेत व इतर भाषेतून मराठीत पुस्तके आणली जात आहेत असंही घडत नाही. टी.शिवशंकर पिळ्ळे या मल्याळम भाषेतल्या मोठ्या लेखकाचे हे जन्मशताब्दि वर्ष आहे. त्यांची पुरस्कार प्राप्त कयर (रस्सी) ही कादंबरी इंग्रजी व हिंदीत अकादमीने छापली. ही मराठीत यावी म्हणून आम्ही जनशक्ती वाचक चळवळीच्या वतीने एक प्रस्ताव अकादमीकडे दिला. त्यांच्या होकारानंतर अनंत उमरीकर यांच्याकडून काही भाग अनुवादीत करून त्यांच्याकडे पाठवला. त्यांनी होकार दिल्यानंतर संपूर्ण 1000 पानाची ही महाकादंबरी अनुवाद करून त्याचे डिटीपी करून त्यांच्याकडे पाठवली. त्यांनी सुचवलेले बदल करून परत सगळा मजकूर पाठवला. यासाठी पूर्ण 2 वर्षे गेली. अकादमीच्या इतिहासात इतके मोठे काम इतक्या लवकर झाल्याचे हे पहिलेच उदाहरण. तरीही अंतिम टप्प्यात ही कादंबरी अकादमीकडून नाकारल्या गेली. आता त्यांनी केलेल्या कराराप्रमाणे मेहनतीचे तरी किमान पैसे द्यायला पाहिजे होते. पण तिथेही दप्तर दिरंगाईचा अनुभव आला. 1 वर्ष उलटून गेले अजून काहीही उत्तर अकादमी कडून आम्हाला मिळाले नाही. हे सगळं मराठवाड्याचाच माणूस अकादमीच्या मुंबई कार्यालयात सर्वेसर्वा असताना घडलं हे विशेष.

दुसरा महत्त्वाचा पुरस्कार दिला जातो तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. फार जणांचा असा गैरसमज आहे की हा ही साहित्य अकादमीसारखा शासकीय पुरस्कार आहे. पण तसे नाही. ज्ञानपीठ ही संस्था स्वतंत्र आहे. टाईम्स या वृत्तपत्र समुहाची ही संस्था असून हीच्यावतीने सर्व भारतीय भाषांतील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो.
मराठीत आत्तापर्यंत फक्त चारच लेखकांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
1. वि.स.खांडेकर 2. वि.वा.शिरवाडकर, 3. विंदा करंदीकर. 4. भालचंद्र नेमाडे

खरं तर मराठीत जी.ए.कुलकर्णी, विजय तेंडूलकर, श्री.ना.पेंडसे, गंगाधर गाडगीळ, बा.भ.बोरकर, पु.ल.देशपांडे, रंगनाथ पठारे, ना.धो.महानोर अशा साहित्यीकांना हा पुरस्कार मिळायला हवा होता. पण तो मिळू शकला नाही. ज्यांना मिळाला त्यांच्या मोठेपणाबद्दल तर कुठली शंका नाहीच.

या पुरस्कारासाठी ज्या पद्धतीने मोठं राजकारण दिल्लीत खेळलं जातं त्याबद्दल एक घटना एका पत्रकार मित्राने सांगितली. पु.ल.देशपांडे यांना हा पुरस्कार देण्याचे घटत होते. दुसर्‍या एका मोठ्या मराठी लेखकाने दिल्लीत ज्ञानपीठ समितीचे अध्यक्ष कन्नड लेखक यु.अनंतमुर्ती यांच्यासमोर पु.ल.देशपांडे हे बाळासाहेब ठाकरेंना कसे भेटायला जातात हे समोर पडलेले वर्तमानपत्र दाखवून निदर्शनास आणून दिले. लगेच अनंतमूर्तींच्या मनात पु.ल.जातीयवादी पक्षांशी जवळीक साधतात असे मत बनले. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा अपघातात गेल्यावर पु.ल.भेटायला गेले अशी ती बातमी होती. तीचा आमच्याच दुसर्‍या मराठी लेखकाने असा वापर करून मराठीचे ज्ञानपीठ दूर पळवून लावले.

बरं ज्या लेखकांना ज्ञानपीठ अथवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ती पुस्तके किती खपतात? असे विचारले तर त्याही आघाडीवर भयाण शांतता आढळेल. ज्ञानपीठ अथवा साहित्य अकदमी प्राप्त पुस्तकांची विक्री हा आमच्या समोरचा विषयच नाही. ठाण्याच्या साहित्य संमेलनात त्यावर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अशोक केळकर यांचे ‘रूजुवात’ हे पुस्तक  विक्रीसाठी उपलब्धच नव्हते. बरं हे संमेलन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एखाद्या बुद्रूक गावी भरले नव्हते. मुंबईलाच ज्या प्रकाशनाचे मुख्यालय आहे त्या लोकवाङ्मयगृहानेच हे पुस्तक प्रकाशित केले होते. मग ठाण्याला ते का उपलब्ध करू शकले नाहीत? का त्यांना गरजच वाटली नाही?

या मोठ्या पुरस्कारांची ही अवस्था आहे मग छोट्या छोट्या पुरस्कारांची स्थिती विचारायची सोयच नाही. सगळे पुरस्कार हे सर्वसामान्य वाचकांपासून वेगळ्या अर्थाने तुटून गेले आहेत. खुप चांगल्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले नाहीत आणि सामान्य पुस्तकांना मिळून गेले. बनगरवाडी-व्यंकटेश माडगुळकर, कोसला-भालचंद्र नेमाडे, डोह-श्रीनिवास विनायक कुलकर्णी, संध्याकाळच्या कविता-ग्रेस, मांदियाळी-अनंत भालेराव, धार आणि काठ-नरहर कुरूंदकर, विठोबाची आंगी-विनय हर्डीकर, अंगारमळा-शरद जोशी, वनवास-प्रकाश नारायण संत, आम्ही काबाडाचे धनी-इंद्रजीत भालेराव, तरीही-दासू वैद्य, इडा पीडा टळो-आसाराम लोमटे ही चांगली पुस्तके आम्ही पुरस्कारांपासून वंचित ठेवली. परिणामी यांना इतर संस्थांनी पुरस्कार दिले किंवा सामान्य वाचकांनी गौरविले आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करून ठेवले.

तेंव्हा पुरस्कार पुस्तकांना न्याय देतातच असे नाही. किंबहूना जास्तीत जास्त वेळा त्यांनी न्याय दिला असे दिसत नाही. म्हणजे एकतर चुक पुस्तकांना पुरस्कार दिला जातो. आणि जर योग्य पुस्तकाला दिला असेल तर ते पुस्तक वाचकांपर्यंत पोंचविण्यात आपण अपयशी ठरतो. पुस्तक वाचकांपर्यंत पोंचते केवळ त्याच्या नशिबानेच असं म्हणावे लागते.

 साहित्य अकादमी पुरस्कारांची यादी

1955- वैदिक संस्कृतीचा विकास (इतिहास) -तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
1956- सौंदर्य आणि साहित्य (समीक्षा) -बा.सी.मर्ढेकर
1958- बहुरूपी (आत्मचरित्र)-चिंतामणराव कोल्हटकर
1959- भारतीय साहित्यशास्त्र-ग.त्र्यं.देशपांडे
1960- ययाती-वि.स.खांडेकर
1961- डॉ.केतकर (चरित्र)-द.ना.गोखले
1962- अनामिकाची चिंतनिका-पु.य.देशपांडे
1963- रथचक्र-श्री.ना.पेंडसे
1964- स्वामी-रणजित देसाई
1965- व्यक्ती आणि वल्ली - पु.ल.देशपांडे
1966- श्री शिवछत्रपती-त्र्यं.श्री.शेजवलकर
1967-भाषा:इतिहास आणि भूगोल-ना.गो.कालेलकर
1968-युगांत-इरावती कर्वे
1969-नाट्याचार्य देवल (चरित्र)-श्री.ना.बनहट्टी
1970-आदर्श भारत सेवक (चरित्र)-न.र.फाटक
1971-पैस-दुर्गा भागवत
1972-जेव्हा माणूस जागा होतो (आत्मचरित्र)-गोदावरी परूळेकर
1973-काजळमाया-जी.ए.कुलकर्णी
1974-नटसम्राट-वि.वा.शिरवाडकर
1975-सौंदर्यमीमांसा-रा.भा.पाटणकर
1976-स्मरणगाथा (आत्मचरित्रात्मक कादंबरी)-गो.नी.दांडेकर
1977-दशपदी-अनिल (आ.रा.देशपांडे)
1978-नक्षत्रांचे देणे-आरती प्रभू (चि.त्र्यं. खानोलकर)
1979-सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य-शरच्चंद्र मुक्तिबोध
1980-सलाम-मंगेश पाडगांवकर
1981-उपरा (आत्मचरित्र)-लक्ष्मण माने
1982-सौंदर्यानुभव-प्रभाकर पाध्ये
1983-सत्तांतर-व्यंकटेश माडगुळकर
1984-गर्भरेशीम-इंदिरा संत
1985-एक झाड आणि दोन पक्षी (आत्मचरित्र)-विश्राम बेडेकर
1986-खूणगाठी (कवितासंग्रह)-ना.घ.देशपांडे
1987-श्री विठ्ठल : एक महासमन्वय (समीक्षा)-रा.चिं.ढेरे
1988-उचल्या (आत्मचरित्र)- लक्ष्मण गायकवाड
1989-हरवलेले दिवस (आत्मचरित्र)-प्रभाकर उर्ध्वरेषे
1990-झोंबी (आत्मचरित्र)-आनंद यादव
1991-टीकास्वयंवर (समीक्षा)-भालचंद्र नेमाडे
1992-झाडाझडती (कादंबरी)-विश्वास पाटील
1993-मर्ढेकरांची कविता :स्वरूप आणि संदर्भ (समीक्षा)-विजया राजाध्यक्ष
1994-एकूण कविता-1 (कविता)-दि.पु.चित्रे
1995-राघववेळ (कादंबरी)-नामदेव कांबळे
1996-एक मुंंगीचे महाभारत (आत्मचरित्र)-गंगाधर गाडगीळ
1997-ज्ञानेश्वरीतील लौकीक सृष्टी (समीक्षा)-म.वा.धोंड
1998-तुकाराम दर्शन (समीक्षा)- सदानंद मोरे
1999- ताम्रपट (कादंबरी)-रंगनाथ पठारे
2000-पानझड (कवितासंग्रह)-ना.धों.महानोर
2001-तणकट (कादंबरी)-राजन गवस
2002-युगांत (नाटक)-महेश एलकुंचवार
2003-डांगोरा एका नगरीचा (कादंबरी)-त्र्यं.वि.सरदेशमुख
2004-बारोमास (कादंबरी)-सदानंद देशमुख
2005-भिजकी वही (कवितासंग्रह)- अरूण कोलटकर
2006-भूमी (कादंबरी)- आशा बगे
2007-महर्षी विठ्ठल रामजी शिंदे :जीवन व कार्य (चरित्र)-गो.मा.पवार
2008-उत्सुकतेने मी झोपलो (कादंबरी)-श्याम मनोहर
2009-चित्रलिपी (कवितासंग्रह)-वसंत आबाजी डहाके
2010-रुजुवात (समीक्षा)-डॉ. अशोक केळकर
2011-वार्‍याने हलते रान (लघुनिबंध)-ग्रेस
2012-फिनिक्सच्या राखेतून उडाला मोर (कथासंग्रह)-जयंत पवार
2013-वाचणार्‍याची रोजनिशी (संकीर्ण) - सतीश काळसेकर
2014-चार महानगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)- जयंत नारळीकर

(श्रीकांत उमरीकर,  मो. 9422878575
-------------------------------------------------------------
        

2 comments:

  1. पुरस्कारांच गोडबंगाल अगदी सविस्तर मांडलत
    विशेष म्हणजे या पुरस्कारांचा इतिहास सांगितलात जो बऱ्याच नवख्या मंडळीना माहित नसतो.

    ReplyDelete
  2. पुरस्कारांच गोडबंगाल अगदी सविस्तर मांडलत
    विशेष म्हणजे या पुरस्कारांचा इतिहास सांगितलात जो बऱ्याच नवख्या मंडळीना माहित नसतो.

    ReplyDelete