Thursday, August 26, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५१



उरूस, 26 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 151

(ंपंजाब कॉंग्रेसचे प्रदेश्याध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे सल्लागार मलविंदर सिंग माली यांनी एक विचित्र वक्तव्य करून वाद अंगावर ओढून घेतला. कश्मिर हा स्वतंत्र प्रदेश आहे. त्यावर भारताचे अवैध कब्जा केलेला आहे. त्यावरून गदारोळ उठला आहे. त्यांच्यावर अजूनही काही कारवाई कॉंग्रेसने केलेली नाही.)

पंजाबी कॉंग्रेसी । ‘माली’ याचा किस्सा ।
कश्मिर ना हिस्सा । भारताचा ॥
कश्मिर म्हणजे । देश हा स्वतंत्र ।
दादागिरी तंत्र । भारताचे ॥
ऐसा दिव्य मेंदू । सिद्धू सल्लागार ।
करू बघे गार । स्वपक्षाला ॥
देशद्रोही बोल । कॉंग्रेसींची खोड ।
चाले चढाओढ । बोलभांड ॥ 4॥
‘मणीशंकर’नी । ‘दिग्विजय’ ‘शशी’।
यांनी केली काशी । स्वपक्षाची ॥
बोलायचे तेंव्हा । संसदेत गप्प ।
करू म्हणे ठप्प । कामकाज ॥
कांत अविचारी । जीभ यांची सैल ।
बुद्धीचा हो बैल । दिसतसे ॥
(24 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 152

(मुख्यमंत्र्याच्या कानाखाली काढली असती असे वाक्य नारायण राणे यांनी कार्यक्रमात वापरले. तेवढ्या एका वाक्यावर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. शिवसेनेने म्हणजेच आघाडी सरकारने अर्णब गोस्वामी प्रकरणासारखीच ही चुक करून ठेवली आहे. जी त्यांच्यावरच शेकण्याची शक्यता जास्त आहे.  )

सत्ताबळे माज । लागली चटक ।
राणेंना अटक । केली असे ॥
कंगनाचे घर । ऐसेची पाडले ।
अर्णवा धाडले । तुरूंगात ॥
‘उखाड दिया’ हे । सामना हेडिंग ।
सत्तेमुळे झिंग । चढलेली ॥
उडते भुवई । संजय उवाच ।
लिहितो उगाच । सामन्यात ॥
मिळे न्यायालयी । सर्वौच्च थपडा ।
रिता यांचा घडा । कायद्याचा ॥
राणेंना मिळता । जामिन सत्वरे ।
अब्रुची लक्तरे । निघतील ॥
कांत कोण यांचा । विधी सल्लागार ।
बुद्धीने जो पार । मतीमंद ॥
(25 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 153

(महाराष्ट्रभर शिवसैनिकांची हाणामारी करत आपल्या राडा संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. यावर कुठलीही कायदेशीर कारवाई तातडीने होताना दिसत नाही. )

महाराष्ट्रभर । सेना ‘ठोक’तंत्र ।
सैनिक स्वतंत्र । मारण्यासी ॥
सत्ताधारी करी । रस्त्यावर राडा ।
कायद्याला गाडा । सत्तेखाली ॥
हप्ते आणि राडा । हाची मुळ गुण ।
येई उफाळून । वेळोवेळी ॥
राणे नी उद्धव । पांडव कौरव ।
युद्धाचा गौरव । आपसात ॥
घड्याळ नी हात । लांबुन बघती ।
मनात हसती । यादवीला ॥
कुणी का जिंकेना । हारणार ‘युती’ ।
हीच भानामती । बारामती ॥
कांत आपसात । भांडती खुशीत ।
शत्रुच्या कुशीत । बसुनिया ॥
(26 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Monday, August 23, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५०



उरूस, 23 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 148

(सोमनाथ मंदिर परिसरांत मोठे चार प्रकल्प सुरू होत आहेत. त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नेमके याच वेळी तालिबान्यांनी हल्ला करून अफगाणिस्तान ताब्यात घेतले. दोन संस्कृतीमधील फरक जगाच्या समोर आला.)

सोमनाथ ज्यांनी । तोडले फोडले ।
त्यांचे बिघडले । सारे कांही ॥
पुन्हा पुन्हा आम्ही । मंदिर बांधले ।
जिवंत ठेवले । श्रद्धा बळे ॥
आजही मंदिर । उभे ते देखणे ।
तिकडे धिंगाणे । अफगाणी ॥
तलवारे धाके । वाढविला धर्म ।
उलटले कर्म । तेची आता ॥ 4॥
चायनात हार । बौद्धांच्या हातांनी ।
ज्यु कापे दातांनी । इस्त्रायली ॥
ख्रिश्‍चन छेडिता । लादेन गाडला ।
धडा शिकवला । कायमचा ॥
कांत नको सल्ला । हिंदू सबुरीचा ।
धडा बाबरीचा । ध्यानी ठेवा ॥
(21 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 149

(नारायण राणे यांनी जन आशिर्वाद यात्रा बाळासाहेबांच्या स्मारकापासून सुरू केली. त्यांच्या स्पर्शाने स्मारक बाटले म्हणून शिवसैनिकांनी ते स्मारक गोमुत्र टाकून पवित्र करून घेतले. )

जन अशिर्वाद । काढितसे यात्रा ।
राजकिय मात्रा । उगाळण्या ॥
‘नारायण’ स्पर्शे । स्मारक बाटले ।
सैनिक पेटले । मुंबईत ॥
गोमुत्र टाकून । जागा केली शुद्ध ।
निष्ठा केली सिद्ध । बोंबलुन ॥
जोरात उठते । बाटग्याची बांग ।
निष्ठावंता टांग । देवोनिया ॥
सैनिक कट्टर । अब्दुल सत्तार ।
त्याच्यापुढे पार । सारे फिके ॥
सेनेत कॉंग्रेस । भाजपात सेना ।
ओळखु येईना । कोण कुठे ॥
कांत सत्ता खेळ । संगीत खुर्चीचा ।
विरोधी मिर्चीचा । झोंबणारा ॥
(22 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 150

(विरोधी पक्षांची एक बैठक सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राहूल गांधींना दूर ठेवत शेवटी परत सोनियांना सुत्रे हाती घ्यावी लागली. याला मायावती, अरविंद केजरीवाल यांना बोलावलेच नव्हते. तर अखिलेश बोलावूनही आले नाहीत.)

विरोधी पक्षांची । जाहली मिटींग ।
लावली सेटींग । चोविसची ॥
वापरून झाला । राहूलचा पत्ता ।
‘हाता’ला न सत्ता । गवसली ॥
सोनियाच्या हाती । पुन्हा येई दोर ।
लावु म्हणे जोर । विरोधाचा ॥
जुन्या बाटलीत । जुनीच ती दारू ।
जागेवर वारू । डुलतसे ॥
केजरू मायाचा । विरोधात सुर ।
चार हात दूर । अखिलेश ॥
सुरू होण्याआधी । संपविती खेळ ।
कुणाचा ना मेळ । कुणाशीच ॥
कांत चघळिते । श्वान हडकाला ।
अशा बैठकीला । तोची दर्जा ॥
(23 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Friday, August 20, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ४९



उरूस, 20 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 145

 (अलीगढचे नामकरण हरिगढ करण्याचा प्रस्ताव तेथील जिल्हा परिषदेने केला. राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव गेला आहे. अधिकृतरित्या हे नामकरण होवून तसे जाहिर केल्या जाईल.)

अलीगढ आता । झाले हरिगढ ।
गळ्यामध्ये कढ । पुरोगामी ॥
आलाहाबादचे । हो प्रयागराज ।
संस्कृतीचा साज । शोभतसे ॥
बदलते वृत्ती । बदलता नाव ।
त्याच्यासाठी घाव । आवश्यक ॥
शिवबांनी हिंदू । केले नेताजीला ।
धडा शिकविला । धर्मांधांना ॥
आहे का हिंमत । सेनेमध्ये आज ।
वाटो जरा लाज । नावाचीच ॥
औरंगाबादचे । संभाजीनगर ।
बसली पाचर । आज इथे ॥
कांत पाळलेला । वाघ करी म्यांव ।
त्याला कोणी भ्याव । कशासाठी ॥
(18 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 146

(माजी गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावर 5 वे समन्स बजावण्यात आले. अजूनही ते ईडी समोर हजर झाले नाहीत. विविध कायदेशीर पळवाटा शोधत सर्वौच्च न्यायालयात वेळकाढूपणा करत आहेत.)


ईडीचे समन्स । पळे देशमुख ।
दाखवेना मुख । जनतेला ॥
‘सर्वौच्च’ मिळेना । जराही दिलासा ।
पडतोय फासा । उलटाच ॥
घड्याळ काकांची । मदत मिळेना ।
एकटे कळेना । काय करू ॥
आठवे कोरोना । वयही आठवे ।
परत पाठवे । समन्सला ॥
शंभर कोटींची । वसुलीची खेळी ।
कोण जातो बळी । कळेचिना ॥
बड्या नेत्यांसाठी । कायदा मजाक ।
सामान्यांना धाक । जोरदार ॥
कांत पकडले । फक्त साथीदार ।
मुख्य सुत्रधार । मोकळाच ॥
(19 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 147

(थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थान डुबेरे (ता.सिन्नर, जि. नाशिक) या गावी आहे. त्यांच्या मामांचा बर्वे सरदारांचा मोठा भव्य गढीवजा वाडा तिथे आहे. त्याला 18 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही भेट दिली. वाड्याची अवस्था वाईट आहे. तेथे बाजीरावांचे भव्य असे स्मारक व्हायला हवे. बर्वे वंशजांची तशी इच्छा आहे. आता इतर सर्व देशप्रेमी नागरिकांनी याकामी सहकार्य करायला हवे.)

माफ करा राउ । तुम्हा विसरलो ।
जन्मस्थळी आलो । पश्चातापे ॥
राज्याचे पेशवे । तुम्ही बाजीराव ।
कोरलेत नाव । काळजात ॥
शिवबांचे स्वप्न । पुर्णत्वास नेले ।
राज्य विस्तारले । दूर दूर ॥
अपराजीत हा । थोर सेनापती ।
पेटे ना पणती । जन्मस्थळी ॥
तुमची समाधी । रावेरखेडीला ।
नर्मदा काठाला । मध्यप्रांती ॥
तिथे मोठा होय । उत्सव साजरा ।
जन्मस्थळी सारा । अंधारच ॥
कांत जन्मस्थळी । भव्य हो स्मारक ।
पिढ्यांना प्रेरक । भविष्यात ॥
(20 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Tuesday, August 17, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ४८



उरूस, 17 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 142

 (15 ऑगस्ट 1947 ला पहिले झेंडावंदन लाल किल्ल्यावर झाले होते. आज 75 वे झेंडावंदन त्याच ठिकाणी होते आहे. देशाच्या इतिहासात हा अमृत क्षण महत्त्वाचा.)

अमृताची गोडी । स्वातंत्र्य दिनाला ।
भरती मनाला । आनंदाची ॥
पंच्याहत्तरावा । झेंड्याचा दिवस ।
यासाठी नवस । किती केले ॥
किती पचवले । काळजात घाव ।
तरी नाही नाव । बुडू दिली ॥
नाही टेकू दिली । मातीवर पाठ ।
अभिमाने ताठ । मान इथे ॥
संस्कृतीचा आम्हा । संपन्न वारसा ।
जगाला आरसा । दावू आम्ही ॥
लोकशाही द्वेषी । घालती जे दंगे ।
त्यांना करू नंगे । कायद्याने ॥
कांत जनतेला । भुमातेची आण ।
लोकशाही प्राण । वाचवा हा ॥
(15 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 143

(वाशिमच्या शिवसेना खासदार आणि तेथील शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यांच्या कामात अडथळे आणतात अशी थेट लेखी तक्रार नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. याने एकच मोठी खळबळ उडाली.)

उद्धवासी पत्र । लिही गडकरी ।
नाव ‘रोड’करी । ख्यात ऐसे ॥
बाधा आणताती । तुमचे सैनिक ।
खेळ हा दैनिक । त्यांचा चाले ॥
महामार्ग कामे । रूंदावती रस्ते ।
त्याचे थंड बस्ते । झाले आता ॥
स्थानिक नेत्याला । दिला नाही ‘वाटा’ ।
म्हणुनीच ‘वाटा’ । रोकती या ॥
रस्त्याचा विकास । नका करू भाषा ।
आम्हाला तमाशा । प्रिय असे ॥
मग करा कधी । जनतेची सेवा ।
आम्हाला द्याा मेवा । आधी इथे ॥
कांत वसुलीचा । आहे मुळ धंदा ।
सत्तेसाठी गंदा । खेळ चाले ॥
(16 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 144

(अफगाणीस्तानमध्ये तालिबान्यांनी घुसुन सर्व राजकारभार आपल्या ताब्यात घेतला आहे. कालपर्यंत भारतात ‘डर का माहौल’ आहे असं सांगणारे सर्व पुरोगाम दातखीळ बसून गप्प आहेत. आता कुणीच या इस्लामी आतंकवाद्यांबाबद बोलायला तयार नाही. तेथील नागरिक पलायन करत आहेत. ज्या शरिया कायद्याचे समर्थन इथले मुसलमान करत होते त्यांचेच भाउबंद तालिबान्यांच्या अधिपत्याखालील अफगाणीस्तानात रहायला तयार नाहीत.)

अफगाणीस्तान । तालीबानी हल्ला ।
पुरोगामी मुल्ला । इथे रडे ॥
रवीश कुमार । काय तुझे बोल ।
‘डर का माहौल’ । सांग कुठे ॥
आमीर जातो का । तिथे रहायाला ।
कुटुंब कबीला । घेवुनिया ॥
नासीरला सुद्धा । त्वरीत पाठवा ।
इथली गोठवा । मालमत्ता ॥
शरियाचा न्याय । तिकडे जन्नत ।
शारूख ‘मन्नत’। माग तिथे ॥
विमान भरून । पाठवा लिब्रांडु ।
खेळा विटीदांडू । तिकडेच ॥
कांत पुरोगामी । आली मोठी संधी ।
तालिबांना गांधी । शिकवा की ॥
(17 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 






कृषी आंदोलन आणि माध्यमांनी पसरवलेले गैरसमज



साप्ताहिक विवेक ९-१५  ऑगस्ट २०२१  

दिल्लीत गेले 8 महिने कृषी आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे वापस घेण्यासाठी शेतकरी रस्ता रोकून बसलेले आहेत. या सगळ्या प्रकरणांत आंदोलक शेतकरी, त्यांच्या किसान संघटना आणि त्यांना पाठिंबा देणारे  विविध राजकीय पक्ष विविध संस्था या सगळ्यांनी मिळून काही एक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरवले होते. त्याला माध्यमांनी खतपाणी घातले ही मोठी गंभीर बाब आहे.

मुळात हे आंदोलन केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर उभे राहिले आणि वाढीस लागले हाच एक गैरसमज आहे. तो आधी दूर केला पाहिजे. 2014 मध्ये भाजप या एका पक्षाला संसदेत स्पष्ट बहुमत मिळाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तारूढ झाले तेंव्हापासून भारतीय लोकशाही विरोधात सातत्याने काही ना काही खुसपट काढून अस्वस्थता पसरवली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी माध्यमे गुंतलेली आहेत हे आधी लक्षात घ्या.

जे.एन.यु. प्रकरणांत कन्हैय्या कुमार याचे केल्या गेलेले उदात्तीकरण, रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठांतील विद्यार्थ्याचे आत्महत्या प्रकरण, दादरी येथील अखलाखची झालेली हत्या, 370 प्रकरणांत देशभर अस्वस्थता निर्माण करण्याचा केला गेलेला प्रयास, कश्मिर मधील सुरक्षा सैनिकांवर केलेली दगडफेक आणि इतर प्रसंगी जे मृत्यूमुखी पडले त्यांचे फोटो काढणार्‍या पत्रकारांना दिले गेलेले पुलित्झर पुरस्कार इथपासून ते अगदी अलीकडच्या काळांतील अलीगढ मुस्लीम विद्यापीठ, जामिया मिलीया विद्यापीठ, जेएनयु, दिल्ली दंगे, सी.ए.ए. प्रकरणी पेटविल्या गेलेले शाहिन बाग आंदोलन, बेगलुरू दंगे, अमेरिकन कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यू विरोधात तिथे उसळलेल्या दंग्यांचे भारतात पडसाद उमटावे म्हणून केले गेलेले प्रयास ही एक मालिकाच आहे. 

अगदी याच मालिकेतीचा ताजा एपिसोड म्हणजे कृषी आंदोलन. आणि त्यातील 26 जानेवारीचा दंगा, टूलकिट.  
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कृषी आंदोलन ज्या कृषी कायद्यांबाबत आहे असे सांगितले जाते त्यावर चर्चा ही काही आज सुरू झालेली नाही. माध्यमांनी जो गदारोळ उठवून दिला आहे तो केवळ आणि केवळ बुद्धीभ्रम आहे.
1990 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान असताना शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. त्याचा अहवाल सरकारी दप्तरात पडून आहे. त्यानंतर 2000 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शरद जोशींच्याच अध्यक्षतेखाली दुसरा अहवाल सादर झाला. या नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना स्वामीनाथन समितीचा अहवाल सादर झाला. या शिवाय उच्चस्तरीय सचिव पातळीवरचे एकूण 15 अहवाल सादर झाले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात बाजार समितीत सुधारणा करणारा मॉडेल ऍक्ट मंजूर करण्यात आला. पंजाब सरकारने करार शेती बाबत कायदे केले. महाराष्ट्रातही बाजार समिती सुधारणा राबवल्या गेले. नियमन मुक्ती करण्यात आली. शरद पवार कृषी मंत्री असताना विविध पातळीवर विविध राज्यांत याच कायद्यांमधील सुधारणा राबविण्याचा प्रयत्न झाला. अगदी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यातही याच कृषी कायद्यांती तरतूदींचे समर्थन करण्यात आले. इतकं सगळं असतानाही माध्यमे सर्रासपणे खोटे बोलत आहेत की चर्चा झाली नाही. देश आणि विदेशी माध्यमांनी असा प्रचार चालवला की हे कायदे थोपवल्या जात आहेत. शेतकर्‍यांना विश्वासात घेतले नाही.  

खरे तर हा अध्यादेश जून 2020 मध्ये मंजूर करण्यात आला तेंव्हाच याचे स्वागत याच किसान मोर्चाचे राकेश टिकैत यांनी केले होते. हा कायदा म्हणजे त्यांचे पिताजी आणि उत्तरेतील शेतकरी नेते महेंद्रसिंह ट़िकैत यांचे स्वप्न कसे होते हे सांगितले. मग अचानक असे काय घडले की हे सर्व याच कायद्यांच्या विरोधात आंदोलन करते झाले?
26 नोव्हेंबर 2020 मध्ये हे आंदोलन दिल्लीच्या सीमा रोखून सुरू झाले. त्या दिवसांपासून सातत्याने एक प्रश्‍न सत्ताधारी आणि किमान तारतम्य बाळगून विवेकपूर्ण पातळीवर चर्चा करून इच्छिणारे माध्यमे पत्रकार विचारवंत विचारत होते की कायद्यांतील कोणत्या तरतूदींवर आक्षेप आहेत ते सांगा. आजतागायत एकाही आंदोलनकर्त्याने नेमकी कोणती तरतूद अन्यायकारक आहे हे सांगितलेले नाही. त्यांचे असले वैचारिक अडमुठ वागणे आपण समजू शकतो. जाटांच्या भाषेत एक म्हणच आहे, ‘जाट और सोला दूने आठ’. त्यामुळे राकेश टिकैत किंवा त्यांचे इतर सहकारी यांच्याकडून काही अपेक्षा करणे व्यर्थ आहे.  पण आपण जे पत्रकार विचारवंत लेखक या कायद्याच्या विरोधात प्रश्‍न करत आहेत त्यांचे मुद्दे विचारार्थ घेवू. तेही असेच अडमुठपणे लिहित आहेत बोलत आहेत.

पहिला मुद्दा सर्वांनी उपस्थित केला तो म्हणजे किमान हमी भाव. एम.एस.पी. खरे तर हे तिनही कायदे आणि एम.एस.पी. यांचा काहीही संबंध नाही. कायदे मुळात आवश्यक वस्तु कायद्यांतून शेतमाला वगळणे, शेतकर्‍याला बाजाराचे स्वातंत्र्य देणे, कृषी उत्पन्न समितीच्या जोखडातून शेकर्‍याची सुटका करणे, शेतमाल विक्रीचे करार करणे इतक्या पुरतेच मर्यादीत आहेत. याचा हमी भावाचा काहीच संबंध नाही. असं असतानाही हमी भावावरून गदारोळ माजविल्या जात आहे.

पत्रकारांचा बुद्धी भ्रष्टतेचा पुरावा म्हणजे जेंव्हा सरकारने हमी भावाप्रमाणे खरेदी केली त्याची यांनी दखल घेतलीच नाही. 10 एप्रिल 2021 ला केंद्र सरकारने निर्धारीत केलेल्या हमीभावाप्रमाणे पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान येथील गव्हाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. खरेदीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात सरळ जमा करण्यात आली. याची सर्व आकडेवारी सरकारने ऑन लाईन उपलब्ध करून दिली आहे. असं असतानाही या पत्रकारांनी ओरड चालू ठेवली. हे आक्षेपार्ह आहे.

केवळ देशातीलच नव्हे तर परदेशांतील पत्रकारांनीही आक्षेपार्ह अशा बातम्या या बाबत सातत्याने दिल्या. गेल्या 10 वर्षांतील सर्वोच्च अशी खरेदी गव्हाची करण्यात आली. आयुष्यात पहिल्यांदाच शेतकर्‍यांना अडत्याचा अडथळा दूर होवून खात्यात सरळ विनाविलंब पैसे मिळाले. तरी याबाबत बोलण्यास पुरोगामी पत्रकार तयार नाहीत. इंडियन एक्स्प्रेसने शेतकर्‍यांचे नावे घेवून बातम्या लिहिल्या आणि त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली हे पण सांगितले. पण हे सत्य स्विकारायला इतर तथाकथित पुरोगामी पत्रकार आणि विचारवंत शेतकरी नेते तयार नाहीत.

प्रत्यक्ष ज्या शेतकर्‍यांच्या शेतात गहू होता ते शेतकरी उठून गेले आणि त्यांनी गव्हाचा व्यवहार सरकार सोबत पूरा केला. या गहू खरेदी व्यवहारात जे अडते दलाल बिचोले गुंतलेले आहेत त्यांचे नुकसान होत असल्याने तेच आंदोलन करत ठाण मांडून बसून आहेत. प्रत्यक्ष शेतकरी निघून गेले आहेत. हे पैसे सरळ शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत असल्याने त्यांच्यात असंतोष उसळला आहे.

आश्चर्य म्हणजे एरव्ही आम्ही गरीब शोषित कष्टकरी मजूर शेतकरी यांच्या बाजूने आहोत असा आव आणणारे डावे विचारवंत नेते कार्यकर्ते यावेळेस मात्र दलालांच्या अडत्यांच्या बिचौलीयांच्या बाजूने भांडताना दिसत आहेत. सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात सरळ पैसे जमा करत आहे तर यावर यांचा आक्षेप नेमका काय आहे? आणि ही रक्कमही हमी भावापेक्षा 50 रूपयांनी जास्त आहे.

दुसरा मुद्दा यांनी उपस्थित केला होता तो म्हणजे शेतकर्‍याची जमिन चालली जाईल. व्यापारी ती जमिन घेवून टाकेल. खरं तर याचा कुठलाही संबंध कृषी कायद्याशी नाही. तीनही कायद्यांतील एकही कलम जमिनीशी संबंधीत नाही. कुठलाही व्यापारी जेंव्हा शेतकर्‍यांशी शेतमाला संबंधी करार करेल तो त्या हंगामातील पीकालाच लागू होतो. त्याच्या बदल्यात शेतकर्‍याला जमिन गहाण टाकावी लागत नाही. किंवा व्यापार्‍याला जमिनीचा कब्जा मिळवता येत नाही. असं असताना केवळ गैरसमज पसरवला जातो आहे की ‘किसान की जमिन चली जायेगी.’

शेतकर्‍याचा माल अदानी अंबानी मातीमोल भावात खरेदी करून टाकतील आणि शेतकरी भिकेला लागेल असा एक बालीश आरोप किसान युनियनचे नेते करत असतात. त्यांनी आरोप केला तर त्याला उत्तर देण्याची काही गरज नाही पण काही पत्रकारही त्यावर आपल्या लेखण्या झिजवत आहेत. त्यांना वारंवार विचारल्या गेले की हा आरोप तुम्ही कुठल्या कलमाच्या द्वारे करत आहात? त्याचे काहीच उत्तर दिले जात नाही.

वस्तुत: शेतमालाचा बाजार खुला झाला म्हणजे केवळ अदानी अंबानीच नाही तर कुणीलाही तो माल खरेदी करण्याची मोकळीक आहे. खुद्द शेतकरीही आपला माल बाजारात आणून विकू शकतो. दुसरी बाब जी की कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. अशोक गुलाटी यांनी अतिशय स्पष्ट केली होती. ती म्हणजे एकूण प्रमुख धान्याचा जो व्यापार आहे (गहु, तांदूळ आणि मका यांची एकत्रित किंमत) त्याच्या अडीच ते तीन पट व्यापार उलाढाल ही एकट्या दुधाची आहे. या दुधाच्या व्यापारात आंतराष्ट्रीय कंपन्या आहेत तशाच देशी कंपन्या आहेत शिवाय सहकारी संस्था आहेत, स्थानिक पातळीवर दुध विकणारे आहेत अगदी म्हशीचे गायीचे दुध काढून वरवा घालणारे गवळीही आहेत. इतकं असताना कुणीही असा आरोप केला नाही की नेस्ले सारख्या कंपन्या आम्हाला खावून टाकत आहेत. मग अदानी अंबानी स्थानिक शेतकर्‍याला व्यापार्‍याला खावून टाकतील ही भिती का दाखवली जाते आहे? एका तरी शेतमाला बाबत असं घडलं आहे का की कुणा एका व्यापार्‍याने किंवा मोठ्या कंपनीने सगळ्यांना संपवून टाकले?

हा हमी भाव केवळ आणि केवळ गहू आणि तांदूळ यांनाच आणि तोही काही प्रदेशांतील शेतकर्‍यांनाच मिळतो. बाकी सर्व शेतमाल आजही आणि कित्येक वर्षांपासून हमी भावाच्या 'हमी' शिवायच विकल्या जातो आहे. एकूण सर्व शेतमालाच्या उलाढालीत सरकारी खरेदीच्या गहू आणि तांदळाची खरेदी केवळ आणि केवळ दोन ते तीन टक्के इतकीच आहे. म्हणजे ही जी काही ओरड आणि तीही खोटी केली जाते आहे ती केवळ अगदी चिमुक़ल्या आकाराच्या शेतमालाबाबत आहे. त्याचा अवाढव्य अशा एकूण शेतमाल व्यवहाराच्या उलाढालीशी काडीचाही संबंध नाही.

मुळात धान्याची बाजारपेठ आधीसारखी कच्च्या स्वरूपातील धान्याची उरलेलीच नाही. नुसता गहू आता बाजारात येण्यापेक्षा त्याचे पीठ करून पॅकिंग करून त्याचा ब्रँड करून विकल्या जावू लागला आहे. तांदळाच्या तर कितीतरी जाती आहेत ज्या हमी भावाच्या पाचपट दहा पट भावाने विकल्या जातात. दाळींमध्ये चण्याची दाळ (हरबरा दाळ) नुसत्या स्वरूपात न येता बेसन पीठ म्हणूनच येत आहे. बाकी धान्य साफसुफ करून एक दोन किलोच्या पिशव्यांतून बाजारात येते आहे. याची कुठलीच कसलीच जाणीव या आंदोलन कर्त्या शेतकरी नेत्यांना, त्यांना पाठिंबा देणार्‍या वैचारिक भामट्या पत्रकारांना विचारवंतांना नाही.

मुळात सर्व सरकारी जोखडाच्या बाहेर असलेला शेतमाल त्यात फळे, भाजीपाला, दुध, अंडी, फुलं विस्तारत चालला आहे. त्याला कसलाही कुठलाही हमी भाव जाहिर होत नाही. भाज्यांना हमी भाव जाहिर करून हात पोळून घेण्याचा पराक्रम केरळ सरकारने करून पाहिला आहे.  या शेतमालाचा व्यापार कित्येक वर्षे सुखनैव चालू आहे. त्यात येणार्‍या समस्यांना ते शेतकरी-व्यापारी-मध्यस्थ-ग्राहक सगळे मिळून उत्तरे शोधत आहेत. त्यांची बाजारपेठ स्थिरावत चालली आहे. कच्च्या शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारत चालला आहे.

हमी भावाचा कायदा करा अशी अर्थशास्त्र आणि कायद्याच्या दृष्टीने हास्यास्पद मुर्खपणाची मागणी करणारे हे विसरून चालले आहेत की त्यांना बायपास करून इतर शेतमालाची बाजारपेठ पुढे निघून गेली आहे. दिवसेंदिवस विस्तारत चालली आहे. आणि हे आपले ‘कनून वापस लो’ असा लहान मुलांसारखा हट्ट करून बसले आहेत. आपल्याकडे म्हण आहे तुटे पर्यंत ताणायचे नसते. इथे तर तुटून गेल्यावरही ताणणे चालू आहे.

आता तर प्रत्यक्ष शेतकरी तिथून उठून गेले आहेत. पंजाब हरियाणा पश्चिमी उत्तर प्रदेशांतील अडते बिचोले दलाल हताशपणे दुसरं काहीच करता येत नाही म्हणून रस्त्यावर अडमुठपणे बसून आहेत. सध्या खरीपाचा मोठा महत्त्वाचा हंगाम सुरू आहे. मुळ खरा जो शेतकरी आहे तो आपल्या आपल्या शेतात मग्न आहे. तांदूळ, हलकी ज्वारी, मका ही तीन धान्ये, सोयाबीन करडी सारख्या तेलबिया, तूर, मुग, उडीदासारख्या डाळींचा हा हंगाम आहे. खरा शेतकरी अजून दिवाळीपर्यंत पूर्णपणे गुंतलेला आहे. असे असताना हे जे शेतकरी आंदोलन म्हणून चालू आहे ती काय नौटंकी आहे असा सख्त सवाल विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

सर्वौच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीन यावर अहवाल सादर केला आहे. शक्यता आहे न्यायालयाची भूमिका लवकरच समोर येईल. त्याचा फटका खाण्याची तयारी या बोलभांडांनी करावी.  
                 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
(छायाचित्र सौजन्य झी हिंदुस्तान आंतरजालावरून) 

Monday, August 16, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ४७




उरूस, 14 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 139

 (कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि सेना यांचे नेते प्रवक्ते वारंवार स्वबळाची भाषा बोलत आहेत. प्रत्यक्षात संपूर्ण महाराष्ट्रात या तीनही पक्षांची राजकीय ताकद नाही. सर्व जागी ते उमेदवारही उभे करू शकत नाहीत. पण भाषा मात्र स्वबळाची केली जाते आहे. परभणीचे सेना खासदार यांनी राष्ट्रवादी विरोधात जी भाषा वापरली त्यावरून गरदारोळ चालू आहे.)

कोणाच्या भुजेत । किती ‘भुजबळ’ ।
सेनेचे ‘स्वबळ’ । गरजले ॥
माकडी नी पोर । सेना राष्ट्रवादी ।
सुरू वादावादी । जोरदार ॥
गल्लीत गोंधळ । दिल्लीत मुजरा ।
कॉंग्रेस साजरा । खेळ करी ॥
खालती कशाला । युती नी आघाडी ।
लावू लाडीगोडी । विजेत्याला ॥
विजेत्याचा करा । खुल्यात लिलाव ।
जादा देई भाव । तोच खरा ॥
मतदार तरी । घ्यायचे कशाला ।
बोली बोलायाला । करा सुरू ॥
लोकशाही केली । बाजार बसवी ।
फसावा फसवी । कांत म्हणे ॥
(12 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 140

(संसदेत अतिशय असभ्यपणे महिला मार्शलवर हल्ला झाला. कॉंग्रेसच्या दोन महिला खासदारांनी हे आक्षेपार्ह वर्तन केले. त्याचा व्हिडिओच समोर आला आहे. विरोधकांनी लोकशाहीची केलेली ही अवहेलना अतिशय गंभीर आहे.)

संसदेत हवा । लोखंडी पिंजरा ।
सुरक्षेचा बरा । उपाय तो ॥
खुर्चीत बांधून । ठेवा खासदार ।
शब्दांचा ना मार । कामी येतो ॥
रक्षकां वरती । करिती हे हल्ला ।
पुरोगामी सल्ला । कोण देतो ॥
स्विकारला आम्ही । लोकशाही बुद्ध ।
नको हिंसा युद्ध । म्हणोनिया ॥
रक्तांतूनी तरी । उसळते हिंसा ।
गांधींची अहिंसा । शोभेलाच ॥
नकली गांधीच्या । धूर्त अवलादी ।
सुर विसंवादी । लावतात ॥
गांधीच्या शरीरा । तेंव्हा लागे गोळी ।
विचार खांडोळी । कांत इथे ॥
(13 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 141

(पिडित कुटुंबाचा फोटो ट्विटरवर शेअर करणे राहूल गांधी यांना भलतेच महागात पडले. त्यांचे अकाउंट ट्विटरने लॉक केले. त्यावर चिडून त्यांनी असंख्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांना रिट्विट करायला सांगितले. ती सर्व खाती ट्विटरने तातडीने लॉक केली. )

ट्विटरची बसे । जोरात थप्पड ।
होई तडफड । कॉंग्रेसची ॥
खाते बंद केले । चाळीस हजार ।
चमचे बेजार । राहूलचे ॥
राहूल आदेशे । केले होते ट्विट ।
आता आली झीट । कृतीमुळे ॥
राहूलसी हवे । स्वातंत्र्य गुन्ह्याचे ।
खोटे बोलण्याचे । भारतात ॥
राहूल धोरण । संसदेत दंगा ।
ट्विटरशी पंगा । घेतलेला ॥
लोकशाही मेली । सांगे बोंबलून ।
लक्तरे सोलून । ठेवतो जो ॥
लोकशाही वर । हल्ला पुन्हा पुन्हा ।
करिती हा गुन्हा । कांत म्हणे ॥
(14 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 









Thursday, August 12, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ४६



उरूस, 11 ऑगस्ट  2021 

उसंतवाणी- 136

 (नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळताच एका वेगळ्याच टीकेला तोंड द्यावे लागत आहे. पूर्वी त्याने मोदींच्या अभिनंदानाचे कसे ट्विट केले होते, ऑस्टे्रलियातील भारतीयाची ज्याने खालिस्तान्याची धुलाई केली त्याचे अभिनंदन कसे केले परिणामी तो कसा भगवा दहशतवादी आहे, संघी आहे अशी गलिच्छ टिका पुरोगामी करत आहेत. त्याची जात काढली जात आहे. )

सोन्याचा दिवस । ज्यामुळे देशात ।
काढतात जात । त्याची इथे ॥
निरज शब्दाचा । अर्थ हो कमळ ।
सुरू मळमळ । त्यावरून ॥
संघी म्हणोनिया । मारू त्याला शिक्का ।
पुर्वग्रह पक्का । करूनिया ॥
मंगल प्रसंगी । लागतात भांडू ।
ऐसे हे लिब्रांडू । नतद्रष्ट ॥
संशय शिंतोडे । नीरज सोसतो ।
ट्विटर ठासतो । कधीतरी ॥
थुंकण्याचा आहे । पुरोगामी धर्म ।
विकृतीचे वर्म । ओळखावे ॥
कांत देशद्रोही । असली जमात ।
आली नशिबात । भारताच्या ॥
(9 ऑगस्ट 2021)

उसंतवाणी- 137

(अल्पवयीन बलात्कारितेच्या घरी राहूल गांधींनी भेट दिली. त्या कुटूंबाचा फोटो त्यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केला. हा कायद्याने गुन्हा आहे. पण हे तारतम्य त्यांना नाही. ट्विटरने तो फोटो डिलीट करताच रणदीप सुरजेवाला, पवन खेडा सारख्य त्यांच्या चमच्यांनी तो रिट्विट केला. त्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. )

ट्विटरवरती । असभ्य दर्शन ।
हीन प्रदर्शन । राहूलचे ॥
पिडीतेच्या घरी । सांत्वनाची भेट ।
छायाचित्र थेट । प्रसिद्धीला ॥
कायदा सांगतो । नको फोटो नाव ।
घालु नका घाव । दु:खावरी ॥
कायदा तो सोडा । नाही नैतिकता ।
नाही बुद्धिमत्ता । तारतम्य ॥
तैसे नितीभ्रष्ट । त्यांचे झीलकरी ।
रीट्विट करी । तोची फोटो ॥
ट्विटर स्वत:च । करे ते डिलीट ।
परी न हो नीट । वृत्ती यांची ॥
कांत गेली खुर्ची । पुरेसा न धडा ।
अस्तित्वाला गाडा । राजकीय ॥
(10 ऑगस्टे 2021)

उसंतवाणी- 138

(ओबीसी आरक्षणाचा चेंडू कायदा करून केंद्राने राज्याकडे ढकलला. हे आरक्षण 50 टक्क्याच्या मर्यादेत बसविण्याचे आवाहन आता सर्वच राज्य सरकारांकडे आहे.)

कायद्याने उडे । आरक्षण चेंडू ।
केंद्र-राज्य भांडू । लागलेत ॥
पन्नास टक्क्यांचे । घातले बंधन ।
त्याचे उल्लंघन । शक्य नाही ॥
पन्नास मध्येच । बसवता कोटा ।
असंतोष मोठा । उठणार ॥
धरता चावते । सोडता पळते ।
सर्वांना छळते । आरक्षण ॥
धट्टाकट्टा त्याला । बनवते पंगु ।
कपड्यात नंगू । दाखवते ॥
मागासपणाची । अभिमाने स्पर्धा ।
त्याच्यासाठी गर्दा । सामाजिक ॥
कांत मागासांना । जोडता ‘इतर’ ।
तितर बितर । खेळ सारा ॥
(11 ऑगस्ट 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575