उरूस, 28 मे 2021
उसंतवाणी- 61
(कॉंग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीला एक ट्विट केले. त्यात राहूल गांधी आणि राजीव गांधी यांचे फोटो आहेत आणि असं लिहिलं आहे की ‘किंग ऑफ डेमोक्रसी’. ही जी गुलामीची मानसिकता आहे त्यावर मग बरीच टीका झाली. )
सल्मान खुर्शीद । करितसे ट्विट ।
गाली लावा तिट । राहूलच्या ॥
राजीव नंतर । राहूलच राजा ।
वाजवा रे बाजा । अंगणात ॥
कॉंग्रेसी भाट हे । बोलती जोशात ।
राजस वेशात । लोकशाही ॥
वारसाचा हक्क । आहे गादीवर ।
बाकीचे चाकर । भोवताली ॥
राहूल हा ‘किंग’ । त्यालाच मुजरे ।
राज्यात हुजरे । जागजागी ॥
पटेलांनी केली । संस्थाने खालसा ।
तरिही वारसा । सांगती हे ॥
‘कांत’ शरिरात । गुलामीचे रक्त ।
लोकशाही फक्त । देखावाच ॥
(26 मे 2021)
उसंतवाणी- 62
(समाज माध्यमं यांना भारतीय कायद्याने काही नियम पाळण्यास सांगितले होते. त्याची तीन महिन्याची मुदत 25 मे रोजी संपली. पण यांनी कुणीच त्यावर काही भारत सरकारला कळवले नाही. संबित पात्रा यांच्या ट्विटरवर मॅनिप्युलेटेड असा शिक्का मारण्यात आला आणि या वादाने उचल खाल्ली. त्यातच सरकारने दिलेली मुदत संपली. ट्विटरचा डावा अजेंडाही उघड झाला. )
चाले चुरू चुरू । ट्विटर ट्विटर ।
बसले खेटर । कायद्याचे ॥
बोलभांड इथे । दोन कोटी जीव ।
करी चिव चिव । सदोदीत ॥
ट्विटर म्हणजे । वैश्विक चव्हाटा ।
लिब्रांडू बोभाटा । सदा इथे ॥
केवळ माध्यम । वाहती कंटेन्ट ।
जाणे ना इंटेन्ट । आव ऐसा ॥
मॅन्युप्युलटेड । ऐसा मारी शिक्का ।
इरादा हा पक्का । राजकीय ॥
अभिव्यक्ती नावे । देशद्रोही काम ।
ऐसे हे हराम । जाणावे जी ॥
‘कांत’ म्हणे खास । लोकांची दुनिया ।
सोशल मिडिया । नाव जरी ॥
(27 मे 2021)
उसंतवाणी- 63
(26 मे ला वैशाखी पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा होती. बुद्धाची जयंती साजरी करताना त्या विचाराकडे आपण कधी लक्ष देतो? इतक्या अप्रतिम बुद्ध मुर्ती प्राचीन लेण्यांमधुन आढळून येतात. आधुनिक काळात अशा किती मुर्ती आपण निर्माण करू शकलो? एका जातीत बुद्धाला अडकवून पूर्वाश्रमीचे महार आणि इतरही सर्व मोकळे झाले. )
बाबासाहेबांचा । बुद्ध हवा कोणा ।
केवळ धिंगाणा । जयंतीला ॥
देव जो नाकारे । त्याचा केला देव ।
चाले देवघेव । पुर्वीचीच ॥
बुद्धीप्रामाण्याची । वाहे धम्मधारा ।
तिला नाही थारा । इथे कुठे ॥
लेण्यातील शिल्प । देखण्या त्या मुर्ती ।
नाही जरा स्फुर्ती । घेत कुणी ॥
गल्लोगल्ली उभे । बेढब पुतळे ।
फुटलेले डोळे । सौंदर्याचे ॥
अथांग निळाई । आहे कल्पांतीत ।
कोंडली जातीत । इवलाश्या ॥
‘कांत’ आज दोघे । भीमराव बुद्ध ।
किती हातबुद्ध । जाणवती ॥
(28 मे 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575