उरूस, 19 मे 2021
उसंतवाणी- 52
(युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे 16 मे 2021 रोजी निधन झाले. मराठवाड्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली. )
कोरोनाचा बळी । उमदे लाघव ।
राजीव सातव । अनंतात ॥
साधेसे बोलणे । आदबीचा सुर ।
गेला दूर दूर । दिगंतात ॥
अवकाळी आले । आभाळ भरून ।
काळीज चिरून । म्हाराष्ट्राचे ॥
बनवूनी गेला । आम्हासी अनाथ ।
तेव्हा ‘गोपीनाथ’ । अकालीच ॥
मिटला ‘प्रमोद’ । जाहलो उदास ।
मावळे ‘विलास’ । अवेळीच ॥
काय भोग आहे । मराठवाड्याचा ।
ढासळे वाड्याचा । चिरा चिरा ॥
कयाधूचा काठ । कांत आज शांत ।
उसळे आकांत । अंतरंगी ॥
(17 मे 2021)
उसंतवाणी- 53
(नारदा घोटाळ्यात सीबीआय ने ममतांच्या पक्षाचे चार नेते चौकशी साठी ताब्यात घेतले. त्या विरोधात त्यांनी सीबीआय न्यायालयात अर्ज केला. जमानत मिळवली. पण कोलकत्ता उच्च न्यायालयात या जमानतीलाच स्थगिती मिळाली. स्वत: ममता सीबीआय कार्यालयात 6 तास ठिय्या देवून बसल्या होत्या. )
चीटफंड घोळ । दीदी करे कल्ला ।
मुखी रोशगुल्ला । पुरोगामी ॥
सीबीआय कसे । तपासाचा फास ।
मंत्री नेते खास । अडकले ॥
घालून घेराव । सीबीआय कोंडी ।
लोकशाही चंडी । नाचतसे ॥
हिंसेचे चटके । लोक हे पळाले ।
निर्वासित झाले । स्वदेशात ॥
गरिबाचा निधी । घेती हिरावूनी ।
तोची ‘कटमनी’ । म्हणविती ॥
उद्योगां वाचून । बंगाल डबके ।
विकास थबके । जागेवरी ॥
कांत राज्य हवे । स्पष्ट कायद्याचे ।
भ्रष्ट फायद्याचे । कधी नको ॥
(18 मे 2021)
उसंतवाणी- 54
(भारताची मोदींची बदनामी करण्याची एक योजना टूलकिट मधून समोर आली. हे टूलकिट कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले असा आरोप भाजपने केला आणि अर्थातच कॉंग्रेसने त्याचा साफ इन्कार केला. हे खोटे असून त्यावर खटला दाखल करण्याची भूमिका घेतली. टूलकिटच्या माध्यमांतून करोना काळात भारताची प्रतिमा हनन करण्याचे मोहिम समोर येते आहे. ते फार गंभीर प्रकरण आहे. )
कोरोनाला म्हणू । मोदी व्हेरिएंट ।
वाहू दे करंट । विद्वेषाचा ॥
कुंभमेळ्यामुळे । कोरोना प्रसार ।
ऐसाची प्रचार । करू आम्ही ॥
नदीत वाहू की । स्मशानात जळो ।
प्रेत चित्र मिळो । छापायाला ॥
जळणारे प्रेत । दिसे मोठे छान ।
प्रतिमा हो घाण । भारताची ॥
आम्हास न दिसे । कृषी आंदोलन ।
ईदचे मिलन । कदापिही ॥
न्यूयॉर्क टाईम्स । वॉशिंग्टन पोस्ट ।
तिथे लिहू गोष्ट । देशद्वेषी ॥
कांत म्हणे जाणा । विकृती ही नीट ।
हेची ‘टूलकिट’ । कॉग्रेसचे ॥
(19 मे 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575