उरूस, 3 एप्रिल 2021
स्वत: भाजप जेंव्हा विरोधात होता तेंव्हा त्यांनी ईव्हिएम विरोधात प्रचंड आरडा ओरडा केला होता. हे आधीच सांगितलेले बरे. कारण लेखाचे शिर्षक ‘विरोधक’ लागता हरू असे आहे. तेंव्हा ते सर्वांना लागू पडते. नुकतेच ईव्हिएम बाबत जे प्रकरण असम मध्ये घडले ते पाहू या (या प्रदेशाचे नविन बदलले नाव ‘असम’ असेच आहे. पूर्वी आपण उच्चार करायचो तसे ‘आसाम’ असे नाही).
असममध्ये 1 एप्रिल रोजी दुसर्या टप्प्याचे मतदान पार पडले. एका मतदारसंघातील एका बुथवरील ईव्हिएम मशीन तहसील मुख्यालयात घेवून जात असताना निवडणुक आयोगाची गाडी बंद पडली. रात्र वाढत चालली होती. ईशान्य भारतात अंधार लवकर पडतो. त्याने दुसरी गाडी मागवली. ती यायला उशीर होत होता. तोपर्यंत जास्त उशीर नको म्हणून त्याने रस्त्यावरून जाणार्या एका गाडीला हात केला आणि लिफ्ट देण्यास सांगितले. नेमकी याच ठिकाणी निवडणुक अधिकार्याची चुक झाली. ही गाडी काही अंतरावर जाताच लोकांनी अडवली. कारण ही गाडी त्या मतदार संघातील नव्हे पण शेजारच्या भाजप उमेदवाराची गाडी होती. तिच्यात ईव्हिएम मशिन पाहून लोकांचा संताप झाला. गाडीवर हल्ला झाला.
झाल्या प्रकाराची निवडणुक आयोगाने तातडीने दखल घेतली. जे ईव्हिएम मशीन गाडीत होते त्याचे सील शाबूत होते. पण तरीही या मतदान केंद्रावरचे मतदान रद्द करून तातडीने परत मतदान घेण्यात येईल हे जाहिर केले. ज्या उमेदवाराची ही गाडी होती (त्याच्या बायकोच्या नावावर होती. त्याचा मोठा भाउ ही गाडी चालवत होता.) त्याने आपली गाडी असल्याची कबुलीही दिली. निवडणुक आयोगाने चार अधिकार्यांना या प्रकरणांत निलंबीत केले.
खरं तर प्रकरण इथेच संपायला हवे होते. पण तसे झाले तर त्याला राजकारण कोण म्हणेल? लगेच कॉंग्रेसने याला मोठा भडक रंग दिला. सर्वच निवडणुक रद्द करा, निवडणुका मतपत्रिकांवरच घ्या, सर्वच ईव्हिएम च्या व्हिव्हिपॅटची मोजणी करा अशा अतर्क्य मागण्या केल्या. झाला प्रकार गंभीरच होता. पत्रकारांनी वास्तव तातडीने समोर आणले. याला कुठलाही भडक रंग निदान पत्रकारांनी तरी येवू दिला नाही. आयोगानेही तातडीने कारवाई केली.
या सोबतच प.बंगाल मध्ये ईव्हिएम बाबत तक्रारी करायला तृणमुलने सुरवात केली. पण मशिन खराब बसल्याचा प्रत्यक्ष पुरावा ते देवू शकले नाहीत. ज्या काही केंद्रांवर किरकोळ बिघाड असल्याचे सांगितले जात होते तिथे दुरूस्ती केल्या गेली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
2014 नंतर वारंवार समोर येणारा मुद्दा म्हणजे राजकीय पक्ष ईव्हिएम वर आक्षेप घेत आहेत. आधीही हे होतच होते. म्हणूनच सुरवातीलाच मी भाजपने पण हे केल्याचे नमुद केले आहे. पण हे प्रमाण 2014 नंतर वाढले. आपले राजकीय अपयश झाकुन विरोधी पक्ष ईव्हिएम वर खापर फोडत आहेत हे कुणाही सामान्य माणसाला सहज लक्षात येते.
आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विरोधी भूमिका घेणे हे अतिशय चुक आहे. ज्या कुणी जून्या कागदांवरच्या मतदान प्रक्रियेत काम केले आहे त्यांना तो काळ आठवला तरी अंगावर काटा येतो. त्या मतपत्रिकांची मोजणी किती किचकट होती. त्यासाठी किती मनुष्यबळ खर्ची पडायचे. हे सर्व देशाने अनुभवले आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया किती वेळखावू होती. आज ईव्हिएम च्या वापराने किती तरी प्रकारे मनुष्यबळ वाचले पैसा वाचला. आणि तरीही हे विरोधी पक्ष मध्ययुगीन कालखंडातील मानसिकतेत जात ‘पूर्वीची पाटीलकीच बरी होती. गावगाडा कसा चांगला चालू होता. बैलगाडीतला प्रवास किती सुखकर होता. पोहर्याने आडातून पाणी शेंदणे किती मस्त होते. बैलाच्या मदतीने नांगरट करणेच किती सोयीस्कर होते’ म्हणणार असतील तर त्यावर काही न बोललेलेच बरे.
यातील सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की ज्याच्या अंगावर जबाबदारी नसते तो असली विधानं बिनधास्त करू शकतो. म्हणूनच मी ‘विरोधक’ असा शब्द वापरला आहे. कारण प्रत्यक्ष सरकार चालविण्याची प्रचंड अशी जबाबदारी त्यांच्यावर नसते. हे सर्वच क्षेत्रात घडताना दिसते (ईव्हिएमचा पहिला निर्णय राजीव गांधी पंतप्रधान असताना झाला होता हे लक्षात घ्या.)
ईव्हिएम तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केले. प्रत्यक्ष वापरात आणून दाखवले. गेली 20 वर्षे भारतात आपण हे तंत्रज्ञान वापरत आलेलो आहोत. तरी त्यावर शंका वारंवार उपस्थित करणे ही नेमकी कोणती मानसिकता आहे?
बरं गेल्या 30 वर्षांत भारतातील सगळ्याच प्रमुख पक्षांना केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त करता आलेली आहे. कॉंग्रेस, भाजप आणि डावे हे देशभर पसरलेले तीन राजकीय विचार प्रवाह.1989 पासून तूम्ही तपासून पहा 15 वर्षे कॉंग्रेसचा पंतप्रधान आहे त्याला डावे व इतर पक्षांचा पाठिंबा आहे, 12 वर्षे भाजपचा पंतप्रधान आहे त्यालाही इतर पक्षांचा पाठिंबा आहे. 4 वर्षे विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, एच.डि.देवैगौडा, आय.के. गुजराल असे विविध छोट्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पंतप्रधान पदावर बसून गेले आहेत. विविध राज्यांतील स्थिती तपासली तर अगदी आत्ताही ईव्हिएम च्या काळात प्रमुख बलदंड राजकीय पक्षां व्यतिरिक्त उद्धव ठाकरे (48), ममता बॅनर्जी (42) , नितीश कुमार (40), इ.पलानीस्वामी (39), जगन मोहन रेड्डी (25) , नविन पटनायक (21), पी.विजयन (20), टी.एस.चंद्रशेखर राव (17) , हेमंत सोरेन (14), अरविंद केजरीवाल (7) हे विविध राज्यांत मुख्यमंत्री आहेत. कंसातील आकडे त्या राज्यांतील लोकसभा मतदारसंघाचे आहेत. यांची बेरीज केल्यास 273 भरते. अगदी आजही भारतात लोकसभेत बहुमत मिळावे इतक्या जागांवर भाजप आणि कॉंग्रेस या बलदंड पक्षांशिवाय अगदी छोट्या प्रादेशीक पक्षांचे नेते सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर बसलेले आहेत.
जर भाजप किंवा पूर्वी कॉंग्रेस हे सत्ताधारी ईव्हिएम त्यांच्या सोयीप्रमाणे हॅक किंवा आता हायजॅक करत होते असा आरोप खरा मानला तर याचे काय उत्तर आहे? केवळ तंत्रज्ञानाचा विचार केल्यास ईव्हिएम अगदी उत्तम आहेत असाच निर्वाळा या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वारंवार दिला आहे. अगदी यासाठी सर्वौच्च न्यायालयापर्यंत याचिका गेल्या होत्या.
या यंत्राला जोडून आता VVPAT यंत्र पण जोडले जाते. आपण कोणाला मत देत आहोत त्याची खातरजमा प्रत्यक्ष कागदावर करता येते. अश्या कागदावरची माते मोजून प्रत्यक्ष यांत्रावरच्या आकड्यांशी तपासून पहिले गेले आहे. त्याही अग्निपरीक्षेतून हे यंत्र गेले आहे. तरी संशयी आत्मे शांत होत नाहीत. कारण त्यांचा विरोध यंत्राला नसून सत्तेवर येण्याच्या राजकीय तंत्राला आहे. जे विरोधकांना जमत नाही तिथे ते ओरड करतात. सत्ता मिळाली की शांत बसतात.
तेंव्हा ईव्हिएम बाबतचे आक्षेप राजकीय आहेत. धुळफेक करणारे आहेत हे सामान्य मतदारांनी लक्षात घ्या. ज्या त्रुटी निर्माण होतात जाणवतात त्यांचे निराकरण लगेच केले जाते. बॅटरीवर चालणारे हे अतिशय उपयुक्त उपकरण आहे. त्यामुळे कागदाची बचत होते आहे. पर्यावरणवाद्यांनी तर यावर आनंद व्यक्त करायला पाहिजे. शिवाय एकच मशिन परत परत वापरता येते. पूर्वीच्या काळी प्रत्येक वेळी मतपत्रिका छापाव्या लागायच्या. शिवाय या मतपत्रिकांना वाहून नेण्यासाठी अवजड अशा मतपेट्यांचीही मोठी समस्या होती. आपण काही श्रीमंत देश नाहीत. आपल्याला आपला निधी काटकसरीनेच वापरावा लागतो. अशा काळात ईव्हिएम एक मोठे वरदान आहे (हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकांत मतपत्रिकांवर मतदान होवूनही कॉंग्रेस पराभूत झाला याची कॉंग्रेस समर्थकांनी घ्यावी).
राजकीय लोक आणि त्यांची डफली वाजवणारे बाजारू विचारवंत पत्रकार यांना बाजूला ठेवा. एक सामान्य मतदार पूर्वग्रह दुषीत नसलेली कुणीही खुल्या विचाराची व्यक्ती म्हणून आपण ईव्हिएम वर संशय घेवू नये. या यंत्राची उपयुक्तता वारंवार सिद्ध झाली आहे. आपली लोकशाही सुदृढ करण्यात या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग झाला आहे. मतदानाचा टक्का वाढणे, मतदानाची गती वाढणे, मतमोजणी अचुक व कमी वेळात होणे अशा कितीतरी बाबींचा लाभ या तंत्रज्ञानाने आपल्याला दिला आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575