उरूस, 11 फेब्रुवारी 2021
हा सुंदर फोटो माझ्या मोठ्या भावाने 30 वर्षांपूर्वी काढला होता. आज शिवरात्र आजीची पुण्यतिथी. तिची आठवण होताना मला नेहमी हाच फोटो डोळ्यांसमोर येत राहतो.
1994 च्या धुळवंडीची ही गोष्ट. आम्ही दोघा भावांनी असं ठरवलं की आज आपल्या नात्यातल्या सगळ्या मोठ्या पुरूषांना त्यांच्या बायकोला रंगवायला लावायचे. आमच्या घरांतून तर असल्या उचापत्यांना कायम प्रोत्साहनच मिळत आलेलं होतं. आई बाबांना दोघांनाही रंग खेळण्यात भरपूर रस.
आम्ही पहिलं घर गाठलं आमच्या मागेच राहणार्या हरिदादा या चुलत भावाचे. हा आमचा सगळ्यात मोठा भाउ. अगदी बाबांपेक्षाही पाच वर्षांनी मोठा. त्यांना पटवून वहिनींना रंग लावायला लावला. या वहिनींचा रंग अतिशय गोरा सुंदर. आता दोघेही हयात नाहीत. यांच्याच घरातल्या महालक्ष्या अतिशय सुंदर असतात. दुसरं घर गाठलं विद्या नगर मधील आईच्या मावशीचे माणकेश्वरांचे. हे काका तसे रागीट. पण माझ्या मात्र फार आपुलकीने सलगीने वागायचे. भावानं डोकं लढवून मलाच पुढे केलं त्यांना पटवायला. कसे काय की पण ते लगेच तयार झाले. त्या मावशी आज्जीला रंग लावला तेंव्हा त्यांच्या दोन्ही मुलांना फारच हसू आलं. हे काकाही आता हयात नाहीत.
तिसरं घर गाठलं बाबांच्या बहिणीचे नांदापुरकरांचे. ही आत्या लहान भाउ असल्याने बाबांवर आणि स्वाभाविकच आमच्यावर भरपूर माया करायची. तिच्यासारख्या पोळ्या कुणाच्याच मी खाल्ल्या नाहीत. गोविंदराव काका हे पोलिस प्रॉसिक्युटर राहिलेले. मानवत खुन खटल्यासारखा मोठा खटला त्यांनी सरकारच्या बाजूने लढवलेला. त्यांनी आमचा हट्ट मानला आणि आत्याला रंग लावला.
चौथं घर गाठलं आमचं आजोळ. म्युनिपल कॉलनी परभणीतील ‘निशीगंध’ हे आजीचं घर. आजोबांचा जूना वाडा वडगल्लीत आहे. तो त्यांच्या लहान भावांना मिळाला.
आम्ही आण्णांना (आजोबांना आम्ही आण्णा म्हणायचो) पटवलं. माईला (आज्जीला आम्ही माई म्हणायचो) रंग लावायची आयडिया सांगितली. ते तसे आजच्या पोरांच्या भाषेत सांगायचे तर ‘कुल’ आजोबा होते. आम्हा नातवंडांचे तर विशेष लाड करायचे. आज्जीला गोड बोलून मी अंगणात आणायचे. आणि मग आण्णांनी तिला रंग लावायचा असा कट होता. माझ्या मोठ्या भावाने दादाने इकडे कॅमेरा सज्ज करून ठेवला होताच. ठरलेल्या कटाप्रमाणे सगळं घडून आलं. आज्जी न चिडता उलट मस्त हसली. तिनेही आण्णांना उत्साहानं रंग लावला. हा प्रसन्न क्षण दादाने टिपला.
माईची आज पुण्यतिथी. ही बाई मोठी विलक्षण होती. एक आज्जी-आई- मोठी बहिण- मोठी जावू अशा जबाबदार्या तिनं मोठ्या उत्साहानं प्रेमानं पार पाडल्या. पण याहीपेक्षा मला विलक्षण वाटतं ते तिचं सामाजिक कार्यात झळाळून निघालेलं व्यक्तिमत्व.
ती सलग 20 वर्षे परभणी नगर पालिकेत नगरसेविका होती. महिला बाल कल्याण सभापती होती. घरचे डोहाळजेवणं मंगळा गौरी, महालक्ष्म्या असे सण जशा सहजतेने साजरे करायची तसंच महिला बाल कल्याण विभागाच्या बैठकाही घेताना मी पाहिलं आहे. आणीबाणी नंतरच्या निवडणुकांत कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार लिंबाजीराव दुधगांवकर यांचा प्रचार करताना मी तिच्यासोबत जीपमधून गावोगाव फिरलेलो आहे. याच निवडणुकीतील एक किस्सा मला चांगला आठवतो. तीच्यासोबत जीपमध्ये प्रचारात फिरत असताना आम्ही घोषणा द्यायचो, ‘शेष्या कुठे गेला, गाडीखाली मेला’. कारण विरोधी पक्षाचे उमेदवार शेषराव देशमुख हे होते आणि त्यांची निवडणुक निशाणी बैलगाडी होती.
एकदा प्रचारांतून फिरून आल्यावर जीप वडगल्लीत तिच्या घराकडे वळली आम्ही कोपर्यावरच गाडीतून उड्या मारल्या. नानलपेठत आमचे घर. घरी आलो तेंव्हा बैठकीत काही लोक पांढर्या स्वच्छ कपड्यांत बसलेले होते. बाबांनी लगेच आदेश दिला पाणी आणून ठेव. आणि आईला चहा करायला सांग. मी पाणी आणून ठेवलं. चहा आणून दिला आणि वर माडीत निघून गेलो. पुढे चालून जेंव्हा हा प्रसंग बाबांना सांगताना माझ्या लक्षात आले गाडीतून ज्यांच्या नावाने आम्ही शिव्यांची लाखोली वाहिली होती ते शेषराव देशमुखच आमच्या घरांत बसले होते. आज्जी कॉंग्रेसचा प्रचार करत होती लिंबाजीराव दुधगांवकर यांच्यासाठी तर वडिल शेकापचा प्रचार शेषराव देशमुख यांच्यासाठी करत होते. त्या निवडणुकीत शेषराव देशमुख खासदार म्हणून निवडूनही आले होते. अशी एक राजकिय सहिष्णुता माझ्या घरांतच मला अनुभवता आली होती.
दिल्लीला महिलांची एक कुठलीशी परिषद होती. महिला बाल कल्याण सभापती म्हणून आज्जी त्या परिषदेला गेली होती. तेंव्हाचा पंतप्रधान इंदिरा गांधींसोबतचा तिचा फोटो आमच्या आजोळी लावून ठेवलेला आहे. चीन आणि पाकिस्तान सोबतच्या युद्धात सर्वांना प्राथमिक आरोग्याचे प्रशिक्षण द्यावे अशी काही एक योजना होती. त्यात माझी ही आज्जी ते प्रशिक्षण घेवून आली होती. आम्हा नातवंडांची नातेवाईकांची दुखणी खुपणी तिने निस्तरली त्याचे हे पण एक वेगळे आणि महत्त्वाचे कारण. दवाखान्यात भरती व्हावे तसे आम्ही आजारी पडलो की तिच्या वसंगळी असायचो. आज आश्चर्य वाटते की आरोग्य विषयक जागृकता त्या काळात हीने कशी आत्मसात करून घेतली असेल. तिने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया छोट्या मामाच्या जन्मानंतर करून घेतली होती. मला तिच्या या सुधारणावादी वृत्तीचे फारच अप्रुप वाटते. ती कधीच धर्मभोळी वाटली नाही. तिने देवदेवही कधी केलेला मला फारसे दिसले नाही.
वयोमानाप्रमाणे तिने सक्रिय राजकारणांतून निवृत्ती घेतली. त्या काळातला एक प्रसंग माझ्या समोरच घडला. माझे मोठे काका पण कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते. परभणी नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राहिलेले. पण वडिल मात्र विरोधी पक्षांत. जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष नंतर जनता दल असे सक्रिय राहिलेले. त्यामुळे समाजवादी पुरोगामी शेकापच्या नेत्यांचा आमच्याकडे नियमित राबता.
आमच्या बैठकीत शेकापचे खासदार मा. शेषराव देशमुख, आजी आमदार नेते आण्णासाहेब गव्हाणे नगराध्यक्ष बाबुराव मठपती हे बसून निवडणुकीची बोलणी करत होते. आज्जी नेमकी आमच्याकडे आली होती आणि आत स्वयंपाकघरात आईशी बोलत होती. त्यांचे बोलणे झाल्यावर आईने मला सांगितले की हीला स्कुटरवर तिच्याघरी नेवून सोड. स्वयंपाकघरांतनून बाहेर जाण्यासाठी आमच्या बैठकीतून जावं लागायचं. आज्जीला पहाताच शेषरावांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘अरे व्वा विमलाबाई. तूम्हाला एक आग्रह करायचा होता. अगामी निवडणुकांत तूम्ही उभं रहा. आमच्या पक्षांकडून रहा असं नाही सांगत कारण तूमचे आयुष्य कॉंग्रेसमध्ये गेलंय. तूम्ही निष्ठावान अहात. आम्ही एक स्वतंत्र आघाडी करत आहोत. तूम्हाला आम्ही पाठिंबा देतो. तूमच्यासारख्या कर्तृत्ववान नि:स्पृह महिलांची आजही राजकारणात गरज आहे.’ मी चकित होवून हा संवाद ऐकत स्तब्ध उभा राहिलो. माझ्या समोर आपल्या विरोधात आयुष्यभर लढलेल्या बाईला हा खासदार राहिलेला मोठा नेता आपण होवून विनंती करतो आहे.
आज्जीने मोठे सुंदर उत्तर दिले, ‘भाऊ (शेषरावांना सगळे भाऊ याच नावाने संबोधायचे) आता माझं वय राहिलं नाही आणि आता आमचा पक्षही तसा राहिला नाही तूम्हाला माहित आहे. आता नविन लोकांना पुढे आणा. आमचा तर पाठिंबाच राहिल.’ खरंच तेंव्हा परभणीतील सर्व पक्षांतील जाणत्यांनी मिळून नगर विकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली होती.
आज्जीने शेवटचा श्वास घेतला तेंव्हा 4 मुलं 4 सुना 1 मुलगी (माझी आई) जावाई, आम्ही 12 नातवंडं, 14 पतवंडं अशा भरल्या गोकुळांत ती होती.
8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने ज्या चर्चा मी ऐकल्या लेख वाचले त्यात अशा स्वातंत्र्यपूर्व काळातील विपरीत परिस्थितीत कसला बाउ न करता शांतपणे समाजकार्य करणार्या महिलांची फारशी दखल घेतल्या गेलेली दिसली नाही. तेंव्हाच्या पुरूषांत सहसा न आढळणारा गुण माझ्या आजोबांत होता. ते जिल्हा परिषदेच्या नौकरीत असल्याने स्वत: सामाजिक कार्यात सक्रिय राहू शकत नव्हते पण त्यांनी आज्जीला मात्र पुर्ण पाठिंबा दिला. प्रोत्साहन दिले. त्यांच्या बोलण्यात नेहमीच आज्जीबद्दल केवळ बायको म्हणून जिव्हाळाच नव्हे तर एक आदर मला नेहमीच जाणवत राहिलेला आहे.
पाच बहिणींत आज्जी दोन नंबरची. तीला भाऊ नाही. इकडे आजोबाही पाच भावांत दोन नंबरचे. त्यांना बहिण नाही. या दोन्ही घरांत आज्जीचा दुसरा नंबर असतानाही अधिकारांत तीनं नेहमीच एक नंबरचं स्थान कमावलं. तिचा प्रेमळ धाक सर्वांवरच असायचा. तिला सर्वच मान द्यायचे. आमच्या नातेवाईकांत कुणाच्याही घरांत काही छोटा मोठा निर्णय तिला विचारल्याशिवाय व्हायचा नाही.
केवळ नातेवाईकांतच नव्हे तर वाड्यांतील इतर भाडेकरू (मंडलीक, धोंड, भेडसुरकर) शेजार पाजारची घरे (सोबणे, पिंगळकर, कात्नेश्वरकर) अगदी गल्लीला लागून असलेल्या सुभाष रोडवरचे मानवतकरांचे घर, गल्लीतलेच जहागिरदार, डावरे, मोकाट, तिची नणंद तुका आत्याचे औंढेकरांचे घर या सगळ्यांत तिला प्रेमाचे आदराचे वडिलकीचे स्थान होते. आजही या घरांतील सगळी मंडळी अगदी जवळचे नातेवाईक असल्यासारखे भेटतात जिव्हाळा दाखवतात मी माझा मोठा भाउ आम्ही पहिले पहिले नातवंडं असल्या कारणाने या सर्व ठिकाणी आमचे आजोळासारखेच लाड व्हायचे त्याला कारण आज्जीच. सर्व वडगल्लीच आमचं आजोळ होतं.
तिच्या स्वतंत्र बाण्याच्या व्यक्तीमत्वाचा उलगडा तिच्या छोट्या बहिणीने (जिजी मावशी) सांगितलेल्या एका प्रसंगातून मला झाला. आजीचे वडिल तिच्या लहानपणीच गेले. पाच बहिणीपैकी सर्वात मोठी (आक्का मावशी) हीचेच फक्त लग्न झाले होते. आज्जीचे वय तेंव्हा 16 वर्षांचे म्हणजे त्या काळाच्या मानाने थोराडच झाले होते. हीच्यासाठी कुठलेही स्थळ आले तर आपल्या सांगण्यांवरून ती हो म्हणणार नाही. तेंव्हा तीला आधी विचारले पाहिजे हे तिच्या मोठ्या मावस भावाने (मधुकरराव चौकेकर, बेगमपुरा औरंगाबाद) जाणले. आज्जीचे मोठे मामा, ही मावस भावंडं यांनी तीला स्थळाबाबतची अट विचारली.
वडिलांच्या माघारी लासूरला घरची शेती आणि सगळा कारभार चोखपणे सांभाळणारी ही माझी आज्जी 1945 ला स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या मोठ्या मावसभावाला असं म्हणाली, ‘दादा मी भाड्याच्या घरांत राहणार नाही आणि विकतची ज्वारी खाणार नाही.’ पुढे चालून आज्जीने चिवटपणे भांडून आजोबांच्या घराण्याची वडिलोपार्जित जमिन कुळाकडून कब्जेदारांकडून सोडवून आणली त्यातून तीची जिद्द आपल्या हक्कासाठी संघर्षाची तयारी दिसून येते.
आज्जीची आज पुण्यतिथी. तिच्या स्मृतीला अभिवादन करताना सतत वाटत राहते की आपण तिचा सामाजिक कार्याचा वारसा जसा जमेल तसा चालवावा. तीच तीला खरी श्रद्धांजली.
-श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575