भव्य द्वारपाल
Monday, January 4, 2021
मूर्ती मालिका -२२
भव्य द्वारपाल
मूर्ती मालिका -२१
Sunday, January 3, 2021
कलाविषयक जागृती करणारे व्यक्तिमत्व पार्वती दत्ता
दै. लोकसत्ता 3 जानेवारी 2021 (विशेष पुरवणी)
(सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज संस्थेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार पार्वती दत्ता यांना आज औरंगाबाद येथे प्रदान करण्यात येतो आहे.)
कलाकारांच्या चारित्र्यात नेहमी आढळणारी बाब म्हणजे त्यांनी मेहनतीने कला कशी आत्मसात केली. गुरूकडे राहून कष्टाने ज्ञान मिळवले. प्रचंड रियाझ केला. आणि त्यांच्या कलेला रसिकांनी कसा प्रचंड प्रतिसाद दिला. विविध पुरस्कार कसे प्राप्त झाले. पण आपल्या वैयक्तिक कर्तृत्वासोबतच कलेबाबत प्रशिक्षण देणारी, डोळसपणे अभ्यास करणारी, या क्षेत्रातील विद्वानांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या ज्ञानाचे भांडार रसिकांसाठी अभ्यासकांसाठी खुले करणारी एखादी संस्था स्थापन करणे आणि ती चिवटपणे दीर्घकाळ चालवणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे.
औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेत असा प्रयोग ‘महागामी’ गुरूकुलाच्या रूपाने सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता गेली 23 वर्षे चालवित आहेत.
मुळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या पार्वती दिदी (त्यांना त्यांच्या शिष्या आणि या गुरूकुलाशी संबंधीत सर्व याच नावाने ओळखतात) वडिलांच्या नौकरीनिमित्त भोपाळला आल्या. भोपाळच्या वास्तव्यात एक फार चांगली गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली. त्यांची हिंदी भाषा अतिशय वळणदार, शुद्ध, माधुर्यपूर्ण बनली. अन्यथा बंगाली भाषिक किंवा हिंदी खेरीज अन्य भाषिकांची हिंदी कानाला इतकी गोड वाटत नाही. सुप्रसिद्ध नर्तक पद्मविभुषण गुरू केलूचरण महापात्रा यांच्याकडून त्या ओडिसी आणि नर्तक गुरू पं. बिरजू महाराज यांच्याकडून त्या कथ्थक शिकल्या.
वयाच्या अगदी 3 वर्षांपासून दिदींच्या नृत्यशिक्षणाला सुरवात झाली. दहाव्या वर्षी त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समोर नृत्य सादर करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांच्या नृत्याविष्काराने इंदिरा गांधी इतक्या प्रभावीत झाल्या की या छोट्या मुलीला त्यांनी दूसर्या दिवशी सकाळी आपल्या निवासस्थानी बोलावले. तिचे कौतुक केले. प्रेमाचा हात पाठीवरून फिरवला.
नृत्य शिक्षणासोबत संस्कृत गणित विज्ञान या विषयांतही दिदींना गोडी राहिलेली आहे. मॅथ्स टूडे साठी त्यांनी नियमित लेखनही केलं आहे. नृत्यासोबतच सतार व तबला यांचीही तालिम त्यांनी घेतली हे विशेष.
कथ्थक आणि ऑडिसी यांतील पदव्युत्तर शिक्षणासोबतच विज्ञानांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राविण्यासह प्राप्त केले आहे. दिल्लीतील आपल्या नृत्यशिक्षणांत त्यांनी सर्वोच्च यश प्राप्त केले. पद्मविभुषण डॉ. कपिला वात्सायन यांच्या नेतृत्वाखालील संशोधन प्रकल्पांत त्यांनी सहायक म्हणूनही काम केले.
विविध 40 देशांत पार्वती दिदींनी दौरा करून संगीत विषयक प्रचार प्रसार तर केलाच पण आपल्या सांस्कृतिक वारश्याबद्दल जगभरांत जागृती घडवून आणण्यात योगदान दिले.
आपले शिक्षण चालू असतांनाच त्यांच्या मनात संगीत शिक्षण देणारी आगळी वेगळी संस्था असावी असे विचार चालू झाले. संगीताचे आद्य ग्रंथ अभ्यासत असताना त्यांच्या हातात शारंगदेवाचा ग्रंथ ‘संगीत रत्नाकर’ लागला. मुळचे कश्मिरचे असलेले शारंगदेव देवगिरीच्या यादवांच्या दरबारात संगीतज्ज्ञ म्हणून होते. देवगिरी किल्ल्यावर या ग्रंथाची रचना झाली. या परिसरांतील वेरूळ, अजिंठा लेण्यांमधील मूर्तींच्या नृत्यमुद्रा पार्वती दिदींना मोहवत होत्याच. औरंगाबाद शहराला लागून विद्यापीठ परिसरात ज्या लेण्या आहेत त्यात आम्रपालीचे नृत्य-वादन-गायन असे एक शिल्प आहे. भारतातातील नृत्य-गायन-वादनाचा हा सगळ्यात जूना शिल्पांकित पुरावा मानला जातो. हा जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे.
या सगळ्या वातावरणांने भारून जावून पार्वती दिदींना असे वाटले की ज्या परिसरात गेली दोन हजार वर्षे संगीताचे वातावरण राहिलेले आहे, जिथली सांगितीक परंपरा खुप समृद्ध आहे त्याच परिसरात संगीत शिक्षण देणारे आगळे वेगळे गुरूकुल स्थापन केले पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी चाचपणी सुरू केली. महात्मा गांधी मिशन शिक्षण संस्थेच्या अंकुशराव कदम यांना त्यांचा प्रस्ताव पसंत पडला. त्यांच्या परिसरात त्यांनी ‘महागामी’ गुरूकुलाला जागा दिली शिवाय सर्व सहाय्य केले.
वारली चित्रांनी सजलेल्या आकर्षक भिंती, उंचच उंच वाढलेल्या वृक्षांची घनदाट छाया, प्लास्टिक सारख्या कृत्रिम वस्तुंचा वापर न करता लाकुड, धातू यांपासून तयार केलेले फर्निचर, नृत्य करतांना वापरावयाची सुती वस्त्रे, जून्या परंपरेतील दागिने, केशभुषेचे अस्सल भारतीय बाज अशा कितीतरी बाबींतून या गुरूकुलाचे वैशिष्ट्य न सांगताही पाहणार्यांच्या डोळ्यात मनांत ठसते. इथल्या विद्यार्थ्यांची सुंदर संस्कृत मिश्रीत शुद्ध हिंदी हे पण एक वैशिष्ट्यच आहे.
ओडिसी आणि कथ्थक शिकवत असतांना केवळ नृत्यच नाही तर एकूणच वागण्यांत सुसंस्कृतपणा रूजविण्यात दिदींचा कल असतो. या परिसरांत एक बंदिस्त आणि एक खुले असे दोन रंगमंच आहेत. जेंव्हा रसिकांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते तेंव्हा सगळ्या परिसरात पणत्या पेटवल्या जातात. दगडी बाकांवर सुती सतरंज्या अंथरल्या जातात. पुरूषांसाठी कपाळाला गंध आणि स्त्रियांसाठी फुलांचे गजरे यांची व्यवस्था केली जाते. मंचावर कधीही कुठलेही भडक बॅनर पाठीमागे लावले जात नाही. नृत्याच्या मोठ्या कार्यक्रमांसाठी रेकॉडेड संगीत न वापरता वादकांना खास आंमंत्रित केले जाते. कथ्थकसाठी सारंगी-तबला तर ओडिसी साठी बांसरी-पखावज वादकांना सन्मानाने बोलावून प्रत्यक्ष वादनाचा आस्वाद रसिकांना नृत्यासोबत दिला जातो.
केवळ मनोजरंजनाच्या हेतूने अथवा शृंगाराचा उद्देश समोर ठेवून सादर केल्या जाणार्या कलांना आणि कलाकारांना इथे बोलाविले जात नाही. तर आपल्या प्रदीर्घ तपश्चर्येने रियाझाने ज्यांनी कलेची जोपासना केली आहे, अभ्यास केला आहे अशा कलाकारांनाच ‘शारंग देव समारोहा’त आमंत्रित केले जाते. मग यात बाऊल संगीतासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या पार्वती बाऊल असो, की दुर्मिळ अशा वीणा वाजविणार्या ज्योती हेगडे असो की मार्गनाट्यसारखा हजार वर्षापूर्वीचा कलाप्रकार जपणारे पियल भट्टाचार्य असो.
पार्वती दिदींनी स्वत:चा कलात्मक विकास करत असताना या परिसरांतील कलेचा जो अभ्यास सुरू ठेवला आहे तो पण फार महत्त्वपूर्ण आहे. ओडिसा आणि महाराष्ट्र यांच्यात हजारो किमी चे अंतर. पण वेरूळमधील शिल्पांत मूर्त्यांमध्ये ज्या मुद्रा आहेत त्या ओडिसी नृत्य प्रकारातील मुद्रांशी कशा जूळतात याचा त्या बारकाईने अभ्यास करत आहेत. या दोन ठिकाणच्या राजवटींतील कलाकारांमध्ये आदानप्रदान होत असणार असे त्यांचे प्रतिपादन आहे.
जगप्रसिद्ध कैलास लेण्यात शिवाची नटराज मुर्ती आहे. ही मूर्ती सर्वत्र पूजल्या जाणार्या तंजावरच्या ‘उल्लोलीतपाद नटराज’ मुर्तीपेक्षा जूनी आहे. ही मुर्ती ‘लोलीतपाद’ नटराज असून आपण याचीच पुजा कलेच्या सादरीकरणापूर्वी कशी केली पाहिजे. अशा बाबी त्या अभ्यासाने अग्रहपूर्वक ठासून सांगतात तेंव्हा त्यांचा या प्रदेशाबद्दलचा अभिमान जाणवत राहतो.
शिष्यांना ओडिसी व कथ्थक शिकविण्याची त्यांची पद्धतही अभिनव अशीच आहे. पहिल्यांदा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा घेवून त्यांतून त्यांची निवड केली जाते. त्यांना काय शिकवायचे कथ्थक की ओडिसी याचा निर्णय गुरूकुलाच्यावतीनेच घेतला जातो. गुरूपौर्णिमेला या गुरूकुलाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात होते. वर्षभर शिष्यांना शिकवत असताना पालक सभा म्हणून पालकांसमोर त्यांना सादरीकरण करायला सांगितले जाते. स्वत: पार्वती दिदी प्रत्येक शिष्याचे नृत्य पाहून पालकांसमोरच सुचना करतात. उणिवा दाखवून देतात. पालकांनाही आपण वर्षभर काय आणि कसे शिकवले हे समजावून सांगतात. त्या स्वत: उत्कृष्ट नृत्यांगना आहेतच पण शिष्यांना शिकवताना त्या ज्या पद्धतीनं स्वत: मुद्रा करून दाखवतात ते फारच परिणामकारक ठरते. शिवाय वर्षांतून किमान दोन तरी मोठे वाटणारे सादरीकरण त्या आमंत्रित हजारो रसिकांसमोर करून एक वस्तुपाठच शिष्यांसमोर ठेवतात.
शारंगदेव समारोहात 2018 मध्ये त्यांनी ‘धृपदांगी कथ्थक’ हा अभ्यासुन स्वत: विकसित केलेला नृत्य प्रकार सादर करून रसिकांना अभ्यासकांना आणि शिष्यांना चकित केले. कथ्थक हे केवळ मोगलांच्या दरबारातून पुढे आले विकसित झाले असे नसुन त्याचे धागे पूर्वीच्या ग्रंथांत परंपरात कसे सापडतात, इतकेच नाही तर महाभारत कालीन संदर्भही कथ्थकचे कसे आहेत हेही त्यांनी अभ्यासातून उलगडून दाखवले आहेत.
लोककलांच्या बाबतीतही दिदी जागरूक आहेत. शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर मध्ये उल्लेख असलेल्या ‘किन्नरी विणा’ या वाद्याचा शोध घेत त्यांनी तेलंगणातील एकमेव कलाकार शोधून काढला. त्याचे सादरीकरण रसिकांसमोर करण्यात आले. याच पद्धतीनं डवरी गोसावी वाजवतो त्या छोट्या सारंगीचा शोध या गुरूकुलाला नुकताच लागला आहे. त्याचेही सादरीकरण इथे आता होणार आहे.
संगीत नाटक नृत्य कलाविषयक चित्रपट ध्वनीमुद्रक प्रकाश योजनाकार आदी या क्षेत्रातील विविध अभ्यासक, ज्येष्ठ कलाकार, समीक्षक यांना शारंगदेव समारोहात आमंत्रीत करून ही जागा संगीत विषयक सर्वांग चर्चा करण्याचे सादरीकरणाचे एक प्रगल्भ व्यासपीठ आहे हेच सिद्ध केले आहे. हा समारोह गेली 12 वर्षे अव्याहतपणे चालू आहे. चार दिवस सकाळी चर्चासत्रं, दुपारी कार्यशाळा आणि रात्री सादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम इथे आखलेला असतो.
संगीत परंपरा डोळसपणे अभ्यासत असताना आपल्या या परंपरांचा प्रभाव इतरांवर कसा पडतो याचाही शोध पार्वतीदिदी घेतात. चीनमध्ये भरतनाट्यम शिकवणार्या इशा दिदी (जीन शान शान) यांच्या परदेशी छोट्या शिष्यांचे भरतनाट्यमचे सादरीकरण या गुरूकुलात झाले आहे. मलेशियाचे ओडिसी नर्तक रामली इब्राहीम यांनी 2018 मध्ये त्यांची कला शारंगदेव महोत्सवात सादर केली आणि दुसर्याच दिवशी त्यांना भारत सरकारने पद्मश्री जाहिर केले. देश परदेशांत आपल्या संगीत परंपरेचा धागा गुंफत जागतिक पातळीवर एक कलात्मक वस्त्र विणण्याचे मोठे कामही पार्वती दिदी करत आहेत. स्वत:ची कला जपताना विकसित करताना याच कलेचा सम्यक विचार करत प्रत्यक्ष कृती करण्यातही शक्ति खर्च करावी ही वृत्ती खरेच गौरवास्पद आहे.
विद्यारण्य नावाने एक शाळा औरंगाबाद शहरालगत गांधेली गावा जवळ पार्वती दत्ता यांनी सुरू केली आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीने शिक्षणविषयक दृष्टीकोन बाळगून ही शाळा चालवली जाते. रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचा आदर्श हा शिक्षण विषयक उपक्रम चालवताना समोर ठेवल्या गेला आहे.
आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार्वती दत्ता यांना डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. !
(सा. विवेक फेब्रुवारी 2018 मध्ये प्रकाशीत झालेल्या लेखात वाढ करून हा लेख तयार करण्यात आला आहे.)
(छायाचित्र सौजन्य महागामी गुरुकुल)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
Saturday, January 2, 2021
विद्यापीठाचे नामांतर चालते तर शहराचे का नको?
Wednesday, December 30, 2020
प्राचीन वारसा जपणार्या हतनुरचा आदर्श घ्या..
उरूस, 30 डिसेंबर 2020
प्राचीन मंदिरांचा जिर्णाद्धार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभेत केली, मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. साहजिकच हा विषय चर्चेसाठी ऐरणीवर आला. जागजागच्या प्राचीन मंदिरांकडे लोकांचे लक्ष जायला लागले. आपल्या आपल्या भागातील प्राचीन मंदिर कसं महत्त्वाचं आहे आणि त्याचा जिर्णोद्धार कसा झाला पाहिजे अशी मागणी व्हायला लागली. पत्रकारांनी अशा काही बातम्या आपल्या परिसरांतील प्राचीन मंदिरांबाबत द्यायला सुरवात केली. एरव्ही गावाकडे न फिरकणारेही आपल्या गावच्या प्राचीन मंदिरांबाबत भरभरून बोलायला लागले.
या सगळ्या धामधुमीत एक गांव शांतपणे आपलं काम करत आहे. ही सगळी चर्चा समोर येण्याच्या पाच वर्षे आधीच त्यांनी आपल्या गावातील 700 वर्षे जून्या मंदिराचा, तेथील बारवेचा जिर्णोद्धार केला. आणि त्यासाठी कुणाकडेही हात पसरले नाहीत. अगदी शासनाकडेही नाहीत. कुठल्या धनाढ्य माणसाकडे, आमदार खासदाराकडे अगदी एखाद्या कंपनीच्या सीएसआर मधूनही पैसा घेतला नाही.
हे आदर्श काम केलं आहे हतनूर (ता. सेलू जि. परभणी) च्या बहाद्दर गावकर्यांनी. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी अवलंबलेले सुत्र मोठे विलक्षण आहे. गावच्या शिवारात ज्यांची ज्यांची शेती आहे त्या सगळ्यांनी आपल्या शेतात जो माल होईल त्याच्या 1 टक्के इतका माल अथवा तो विकून येणारी रक्कम या कामासाठी देगणी म्हणून द्यायची.
पाच वर्षांत अशा पद्धतीने या गावकर्यांनी तब्बल एक कोटी रूपये उभे केले. गावात प्राचीन नागेश्वर शिव मंदिर आहे. त्याच्या समोर बारव आहे. या मंदिरावर एक शिलालेख सापडला आहे. त्यानुसार याचा कालखंड हा इ.स. 1301 चा इतका जूना निघतो आहे. या मंदिराच्या समोर चारही दिशांनी प्रवेश असलेली देखणी बारव आहे. हीचे दगड निखळले होते. बराचसा भाग पडला होता. ही बारव उकलल्या गेली. एका एका दगडावर नंबर टाकून अतिशय कुशलतेने दगडांची रचना परत केल्या गेली. जिथले दगड तुटले होते अथवा नाहिसे झाले होते तिथे नविन दगड घडवून बसवले.
गावात ज्यांनी ज्यांनी मंदिराचे आणि परिसरांतील दगड आपल्याकडे नेले आहेत अथवा आपल्या बांधकामात वापरले आहेत ते सगळे शोधून यांनी वापस आणले. सलग दोन वर्षे हे किचकट काम चालेले. इ.स. 2019 च्या फेब्रवारी महिन्यात बारवेचे काम पुर्ण झाले. एकूण तब्बल 22 लाख रूपये त्याला खर्च आला.
मंदिराचा परिसर त्याच्या जोत्याचे ओट्याचे निखळलेले दगड, अंगणातील फरशी हे सर्व नव्याने करण्यात आले. मुखमंडपाचे खांब कलले होते त्याला अधार देण्यात आला.
हे सगळं करण्यासाठी ज्या पद्धतीनं गावकर्यांनी एकोपा दाखवला तो विलक्षण आहे. पक्ष गट तट आपसांतील भाउबंदकी असले अडथळे त्यांनी मध्ये येवू दिले नाहीत. या परिसरांत शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आहे. पंचक्रोशीतील लोक गावात गोळा होतात. मंदिराचे भक्त दूर दूरवरून येतात.
याच परिसरांत प्राचीन मंदिराचे अवशेषही विखुरलेले आहेत. ते एकत्र करून ठेवण्याची गरज आहे. अभ्यासकांना या अवशेषांचे निरीक्षण केले पाहिजे. त्यावर सविस्तर लिखाण संशोधन केले पाहिजे.
बारव आणि मंदिराला लागूनच नविन पद्धतीने मंगल कार्यालयाचे काम करण्यात आले आहे. सर्वच परिसर आता विकसित झाला आहे. एकूण 1 कोट रूपये खर्च याला आला. आणि हा सगळा निधी गावकर्यांच्या शेतमालाच्या विक्रीतून देणग्यांतून गोळा झाला हे विशेष.
मराठवाड्यात खुप प्राचीन मंदिरं आहेत. पुरातत्त्व खात्याकडे ज्यांची नोंदणी झाली आहे किंवा जे संरक्षीत वास्तू म्हणून आहेत त्यांच्या शिवाय भरपूर अशी स्थळं आहेत. शासनाकडे संरक्षीत असलेल्यांसाठी शासनाकडून निधी मिळवून त्यांचे काम करता येवू शकते त्यासाठी पाठपुरावा निधी मिळावा म्हणून दबाव हे तंत्र अवलंबता येईल. पण इतर जी मंदिरं आहेत, जून्या अतिशय सुंदर अशा बारवा आहेत, नदीवरचे घाट आहेत त्यांचे संरक्षण संवर्धन होण्यासाठी चळवळ उभारावी लागणार आहे.
जून्या मंदिरांची दूरूस्ती करणारे पाथरवट शिल्पी यांनाही या कामात सहभागी करून घेतले तर त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न मिटेल. आजही हे काम करणारे शिल्पकार उपेक्षेत जगत आहेत. ज्यांनी हजारो वर्षोंपासून ही कला जपली आहे त्यांची दखल पुरेशी घेतली जात नाही. अगदी त्याच पद्धतीनं मुर्ती शास्त्रीय ग्रंथाचा आधार घेवून मुर्ती घडवणारेही आहेत. त्यांच्या हातातील कसब पुरेसे वापरलेच जात नाही अशी त्या लोकांची खंत आहेत.
हतनुरच्या कामाचा आदर्श यासाठी घेण्याची गरज आहे की त्यामुळे ग्रामीण पर्यटनाला गती येईल. गावोगाची प्राचीन मंदिरं आपण होवून गावकर्यांनी शास्त्रीय पद्धतीनं दुरूस्त केली पाहिजेत. दगडांना भडक वार्निश फासणे, सिमेंेट लावून टाईल्स बसवणे म्हणजे जिर्णोद्धार नव्हे. त्यामुळे प्राचीन वास्तूकलेचा सत्यानाश होतो. तेंव्हा अश कामं करताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
मराठवाड्यात प्राचीन बारवा अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेल्या आहेत. पण त्या केवळ प्राचीन वास्तू आहेत असं नव्हे. त्या म्हणजे जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहेत. या बारवांचा जिर्णाद्धार करताना दुरूस्ती करताना जलतज्ज्ञांचा सल्ला मोलाचा आहे. त्या नुसारच ही कामं झाली पाहिजेत.
प्रत्येक जिल्ह्यातील प्राचीन वास्तूंची माहिती गोळा करून त्याचा सविस्तर अभ्यास झाला पाहिजे. जिल्ह्याचा नकाशा, या वास्तूंचे चांगले छायाचित्र, ठिकाणाची माहिती असे संकेतस्थळ तयार केले गेले पाहिजे. या सगळ्यांसाठी शासनावर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही. स्वयंस्फुर्तपद्धतीनं काम करता येते हे हतनूरने दाखवून दिले आहेच.
रोहन काळे नावाचा एक तरूण महाराष्ट्रभर बारवा शोधत आणि त्यांची माहिती गोळा करत फिरतो आहे. येत्या गुढी पाडव्याला महाराष्ट्रांतील बारवांमध्ये दिवे लावून उत्सव साजरा करावयाचा आहे. हे कुण्या एकाच्या आवाक्यातले काम नाही. तूम्ही तूमच्या परिसरांतील बारवांची/प्रचीन मंदिरांची/ नदीवरच्या घाटांची/ स्मारकांची माहिती आमच्या पर्यंत पोचवा. आपण सर्व मिळून महाराष्ट्रात आज ज्या बारवा शिल्लक आहेत त्यांची साफसफाईची मोहिम राबवूया. रोहन काळे चा मो. नं. देत आहे. माझा तर खाली दिलेला आहेच. सर्वांना कळकळीचे आवाहन आपण सर्व मिळून आपला प्राचीन वारसा जतन करू या.
रोहन काळे मंुंंबई- 9372496819
(हतनूर संपर्क श्री गांधी काकडे 9767248427 बाळासाहेब शेळके 9922439645)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
Sunday, December 27, 2020
शिवसेना 'युपीए' चा अधिकृत घटक आहे का?
उरूस, 27 डिसेंबर 2020
‘सामना’च्या कालच्या (शनिवार, 26 डिसेंबर 2020) ‘ओसाडगावची पाटीलकी’ या अग्रलेखाने राजकीय वर्तुळात धमाल उडवून दिली आहे. भाउ तोरसेकरांनी त्यावर व्हिडिओ करताना ‘तोंंडपाटीलकी’ असा मस्त आणि नेमका शब्द वापरला आहे. अनय जोगळेकरांनी एमएच 48 या यु ट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवला आहे.
राउतांच्या तोंडपाटीलकीतून समोर आलेल्या एका मुद्द्याचा वेगळा विचार करावा लागेल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा मुद्दा आजच समोर आणला आहे. मुळात शिवसेना हा संयुक्त पुरोगामी आघाडीचा (युपीए) घटक आहे का? अधिकृत रित्या तसे पत्र शिवसेना प्रमुखांना गेले आहे का? सध्या युपीए मध्ये असलेल्या पक्षांनी यासाठी सहमती दर्शवली आहे का?
2004 मध्ये कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणुक लढवली होती. कधी नव्हे ते पहिल्यांदा (आणि शेवटचे) कम्युनिस्टांचे भारतीय इतिहासात सर्वाच्च असे 65 खासदार निवडून आले होते. यांनी आपल्या भाजप विरोधी राजकारणाच्या गरजेतून कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळची अपरिहार्यता म्हणून संयुक्त पुरोगामी आघाडी या नावाने एक आघाडी तयार झाली. मनमोहनसिंग यांची पंतप्रधान पदी निवड करून ते सरकार तयार झाले. त्यापूर्वी मध्यप्रदेशातील पंचमढी येथील शिबीरात सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून अशी घोषणा केली होती की कॉंग्रेस ‘ऐकला चलो रे’ हे धोरण राबवणार आहे. म्हणजे कॉंग्रेस एकटीच निवडणुका लढणार आहे. कुठल्याही पक्षांची युती करणार नाही.
भाजप विरोधक एकत्र आले आणि त्यांनी मिळून संयुक्त पुरोगामी आघाडी तयार केली. जसे की 1989 मध्ये कॉंग्रेस विरोधक एकत्र आले आणि त्यांनी जनता दलाचे सरकार विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेेतृत्वाखाली तयार केले होते.
2008 मध्ये डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला तरी संयुक्त पुरोगामी आघाडी शिल्लक राहिली. शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस त्याचा हिस्सा होताच. या सरकारला इतर पक्षांनी पाठिंबा देवून परत 2009 मध्ये मनमोहन सिंग यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन केले. अशा पद्धतीने 2004 नंतर ‘भाजप विरोध’ या एकाच मुद्द्यावर संयुक्त पुरोगामी आघाडी काम करत आली आहे.
2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एन.डि.ए.) फुटून बाहेर पडलेली शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या मोहात कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली आणि तिने सरकार स्थापन केले. पण अधिकृत रित्या शिवसेना युपीए चा घटक झाली का नाही हे कुणी स्पष्ट केले नाही.
त्याचेही एक कारण आहे. शिवसेनेची प्रतिमा ही कट्टर हिंदुत्ववादी अशी राहिलेली आहे. ही प्रतिमा युपीए मधील इतर पक्षांना किंवा खुद्द कॉंग्रेसलाही सोयीची नाही. त्यामुळेच आपण बिहार मध्ये हारलो असा पण एक मतप्रवाह कॉंग्रेस मध्ये आहेच. अगदी हैदराबाद मनपाच्या निवडणुकांतही आपला पराभव झाला याला कारण शिवसेनेशी राजकीय भागीदारी हाच आहे असेही मानणारा एक गट आहे. नुकतेच मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष भाई जगताप यांनी कॉंग्रेसने मुंबई मनपाची निवडणूक स्वतंत्रपणे लढावे असे मत जाहिरपणे मांडले आहे.
वर्षभर शिवसेनेसोबत राजकीय संसार करूनही अधिकृतपणे युपीए मध्ये शिवसेनेला सामाविष्ट करून घेतले गेले नसेल तर ही एक राजकीय दृष्ट्या दखल घेण्याजोगी गंभीर बाब आहे.
मग या पार्श्वभूमीवर वैतागुन संजय राउत यांनी ‘ओसाडगावची पाटीलकी’ हे शब्द वापरले आहेत का? भाउ तोरसेकरांनी तोंडपाटीलकी हा शब्द वापरला त्याचा एक दुसराही अर्थ निघू शकतो. संजय राउत केवळ बडबड करतात. त्यांना बाकी कुठले अधिकार नाहीत. या अग्रलेखात संजय राउत हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भलावण करण्याऐवजी शरद पवार यांची करतात हे पण एक आश्चर्य आहे. राउत नेमके कोणत्या पक्षाचे खासदार आहेत? नेमके कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत? राउतांचे नेते कोण उद्धव ठाकरे का शरद पवार?
मराठवाड्याच्या ग्रामीण भागात रहायला घर, नावावर शेत, पोरांना बापाचे नाव पण लग्नाची नाही अशा बाईला ‘ठेवलेली’ म्हणतात. मग तसे कॉंग्रेसने शिवसेनेला ‘ठेवलेले’ आहे का?
महाराष्ट्राच्या बाहेर ज्या निवडणुका झाल्या आणि भविष्यातही होतील त्यात शिवसेना कॉंग्रेस आघाडी बरोबर असणार की नाही?
हा विषय सुरू झाला तो पश्चिम बंगालवरून. तिथे ममता बॅनर्जी यांच्या मदतीला कॉंग्रेस सह सर्वांनी धावून जावे अशी इच्छा संजय राउत यांनी व्यक्त केली. शरद पवार त्यासाठी जाणार असल्याचेही सांगितले. पण आश्चर्य म्हणजे कॉंग्रेसने डाव्यांसोबत युती करून संजय राउतांच्या इच्छेच्या चिंधड्या उडवल्या. आता सरळ सरळ ममता विरूद्ध भाजप विरूद्ध डावे अधिक कॉंग्रेस विरूद्ध ओवैसींचा पक्ष अशा चार आघाड्या उभ्या राहण्याची शक्यता आहे. मग यात संजय राउत व्यक्त करतात त्या प्रमाणे भाजप विरूद्ध एक संयुक्त आघाडी कशी उभी राहणार? आणि नसेल तर जी काही आघाडी कॉंग्रेसच्या नेतृत्वात उभी राहणार आहे त्याला राउत ‘ओसाडगाव’ म्हणणार का?
1989 पर्यंत भारतीय राजकारणात कॉंग्रेस विरूद्ध इतर असे चित्र होते. 1989 च्या लोकसभा निवडणुकी पासून भाजपने हे चित्र पूर्णत: बदलून भाजप विरूद्ध इतर असे बनवले. विविध पक्षांसोबत आघाड्या करून निवडणुकी मागून निवडणुका लढवत आपला पक्ष बळकट केला. याच 1989 ते 2004 या 15 वर्षांच्या अस्थिर कालखंडात प्रत्यक्ष (अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात) आणि अप्रत्यक्ष (विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या कालखंडात) सत्ता राबवली. जेंव्हा सत्ता नव्हती तेंव्हा विरोधी पक्षनेतेपद मिळवून एका बाजूचा राजकीय अवकाश पूर्णत: व्यापून टाकला. लालूप्रसाद यांचा राजद आणि कम्युनिस्ट वगळले तर इतर सर्वच कॉंग्रेसेत्तर पक्ष भाजपच्या मांडवाखालून सत्तेच्या मोहात मिरवून आले आहेत. त्यामुळे त्या सर्वांची विश्वासार्हता भारती मतदारांनी फारशी गृहीत धरलेलीच नाही. गरजे पुरते या पक्षांना मतदार वापरून घेतो. अन्यथा खड्यासारखा वगळून टाकतो.
अकाली दल आणि शिवसेना हे दोन पक्ष मात्र अगदी आधीपासून भाजप सोबत होते. नेमकी जेंव्हा भाजपला केंद्रात स्थिर सत्ता लाभली तेंव्हाच यांना भाजपची साथ सोडण्याची दुर्बुद्धी आठवली. बरं समोर जर एखादा सक्षम बळकट विरोधी पक्ष किंवा आघाडी असेल तर त्यातील राजकीय धुर्तता लक्षात येवू शकते. पण राहूल गांधी सारखा अपरिपक्व नेता ज्याचा सर्वेसर्वा आहे ती कॉंग्रेस समोर असेल तर त्यासोबत जाण्यात नेमका कोणता शहाणपणा आहे? पण मुख्यमंत्रीपदाच्या मोहात शिवसेना आंधळी झाली होती. आता डोळे उघडले तरी काय उपयोग? 1998 पासून सोनिया गांधींच्या नेतृत्वावात कॉंग्रेस ढासळत चालली होती. डाव्यांनी आणि इतर काही पक्षांनी आपल्या भाजप विरोधी नितीसाठी त्यांच्यात काही काळ प्राण फुंकला. नसता स्वत:होवून हा पक्ष आत्महत्येकडेच वेगाने वाटचाल करत आहे. त्याला स्वत:चा अध्यक्षही गेल्या दीड वर्षांत निवडता आलेला नाही.
संजय राउत यांची तोंडपाटीलकी राजकीय दृष्ट्या आता काहीच कामाची नाही. आता अधिकृत रित्या कॉंग्रेसने त्यांना युपीए चा सदस्य केले तरी त्याचा फायदा शिवसेनेला होणार नाही. केले नाही तर राजकीय विरोधाभास मतदारांना समोर दिसत राहील. त्याचा फटका येत्या निवडणुकांत दिसेल. मग त्या अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो की विधानसभा लोकसभेच्या असो.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
Saturday, December 26, 2020
मूर्ती मालिका -२०
द्राक्ष सुंदरी