Thursday, December 10, 2020

कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरेगांव शहिदांचे स्मरण


उरूस, 10 डिसेंबर 2020 

बरोबर 34 वर्षांपूर्वी म्हणजेच 10 डिसेंबर 1986 रोजी कापसाच्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. हिंगोली जिल्ह्यातील सुरेगांव पाटी येथे तीन शेतकरी या गोळीबारात शहिद झाले. 

आज नेमके असेच शेतकरी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर आंदोलन करत बसून आहेत. आज तरी सरकार शेतकर्‍यांशी बोलणी करत आहे. तेंव्हा कसलीच बोलणी करायला सरकार तयार नव्हते. शेतकर्‍यांची काय मागणी होती? कापुस एकाधिकार योजनेत शेतकर्‍याची लूट होत होती. कापसाला भाव वाढून मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कापसाला चांगली किंमत मिळत होती आणि इकडे भारत सरकार मात्र आपल्याच शेतकर्‍यांचे शोषण करत होते.

आज जे डावे समाजवादी पर्यावरणवादी बुद्धीजीवी सरकारी हस्तक्षेप सरकारी खरेदी यांचे जोरदार समर्थन करत आहेत, एमएसपी प्रमाणे सर्वच खरेदी व्हावी असा आग्रह धरत आहेत त्यांनी याचे उत्तर द्यावे की 34 वर्षांपूर्वी सर्व काही सरकारी असताना हेच शेतकरी आंदोलन का करत होते? 

आज जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते गहू आणि तांदूळ ही पीके घेणारे आहेत. ही पीकं बागायती आहेत म्हणजेच पाण्यावर येणारी पीके आहेत. तेंव्हा जे शेतकरी आंदोलन करत होते ते कापसाचे म्हणजेच कोरडवाहू पीकाचे होते. मग हे डावे ज्यांना बडे शेतकरी बागायतदार शेतकरी म्हणून हिणवायचे त्यांचा उपहास करायचे त्यांच्या आंदोलनाला हे पाठिंबा कसा काय देत आहेत? आणि बरोबर 34 वर्षांपूर्वी जे कोरडवाहू पीकांच्या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते त्या शेतकर्‍यांना यांचा विरोध कसा काय होता?

10 डिसेंबर 1986 ही तारीख महाराष्ट्रात अजून एका कारणाने लक्षात ठेवेल. आज जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  देत आहेत त्यात कोण कोणते पक्ष आहेत? सगळ्यात प्रमुख आहे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष. याच पक्षाचे 1986 ला पंतप्रधान होते राजीव गांधी. राजीव गांधी यांच्या कृत्रिम धाग्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणाने कापसाची माती केली होती. याच पक्षाचे मुख्यमंत्री होते मा. ना. शंकरराव चव्हाण. त्यांचेच सुपुत्र माजी मुख्यमंत्री आणि आजचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड जवळच हे आंदोलन तेंव्हा झाले होते. या शेतकर्‍यांना गोळीबार करण्याचा आदेश देणारे शंकरराव चव्हाणच होते. 

अजून एक नाव या संबंधात लक्षात घ्यावे लागेल. देशाचे सलग सर्वात जास्त काळ कृषी मंत्री राहिलेले मा. शरद पवार हे तेंव्हा समाजवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. याच वर्षी म्हणजेच 1986 ला एकीकडे कापूस शेतकर्‍यांचे आंदोलन पेट घेत होते त्याच काळात अगदी त्याच वेळी नोव्हेंबर महिन्यात याच परिसरांत औरंगाबाद शहरात आमखास मैदानावर मोठा मेळावा भरला होता. हा मेळावा म्हणजे मा. शरद पवार यांचा कॉंग्रेस पक्षातील प्रवेश सोहळा होता. त्याला पंतप्रधान राजीव गांधी आणि जम्मु कश्मिरचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रिय मंत्री आणि आताचे गुपकार गटाचे प्रमुख मा. फारुख अब्दूला हजर होते. एकीकडे शेतकरी कापसाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला होता. तीन शेतकरी भाउ पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडले होते. त्या रक्ताने माखलेल्या भूमीवर आज आंदोलनाचे समर्थन करणारे आपले राजकारण सार्थ करत होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा. शरद पवार आणि कॉंग्रेसचे सर्वच नेते यांना कुणीतरी पत्रकाराने हा प्रश्‍न विचारायला पाहिजे होता की 34 वर्षांपूर्वी कोरडवाहू कापुस शेतकर्‍यांच्या आंदोलनाला तूम्ही का विरोध केला होता? आणि आजच्या बागायती पीकांच्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला का पाठिंबा देत आहात? तेंव्हा सरकारी खरेदी च्या विरोधात शेतकर्‍यांत असंतोष होता. आज या जोखडातून शेतकरी मोकळा होउ पहात आहेत. कृषी कायद्याने शेतकर्‍याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पाउल उचलले आहे. ते पाउल मागे घ्या म्हणून डावे आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रचाराला पंजाबातील काही शेतकरी बळी पडले आहेत. यांना हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कोणत्या तोंडाने पाठिंबा देत आहेत? 

शेतकरी संघटनेने 1980 पासून शेतकरी स्वातंत्र्याची मागणी केली. कुठलाही वैचारिक गोंधळ न ठेवता अतिशय स्पष्टपणे सरकारी हस्तक्षेप उठवून लावण्याची मागणी लावून धरली. आजचे शेतकरी आंदोलन नेमक्या त्याच्या उलट सरकारने किमान हमी भाव देवून खरेदी करावी असा आग्रह धरत आहेत. कालची मागणी आमची सुटका करा, तूम्हाला सुटका करता येत नसेल तर बाजूला व्हा आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवतो. पिंजर्‍याचे दार उघडा नसता आम्ही पिंजरा तोडतो अशी होती. फक्त तूम्ही पिंजर्‍याला बाहेरून कुलूप लावू नका. अशी होती.

आजची मागणी मात्र पिंजरा चांगला कसा करा, त्याला रंग कसा द्या इतकंच नाही तर पिंजरा सोन्याचा करा, पेरूच रोज न देता डाळिंबाचे दाणे द्या, फळांमध्ये विविधता कशी येवू द्या, पिंजरा कधी घरात कधी गॅलरीत कधी बागेत नेवून कसा ठेवा अशी आहे. चुकूनही पिंजर्‍याचे दार उघडा अशी मागणी नाही. 

कोरडवाहू पिकासाठी आंदोलन करताना आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणत शेतकरी शहिद झाले. आणि याच्या उलट आज बागायती पिकाचे, मोठ्या प्रमाणात संरक्षण असलेले, सरकारी खरेदीची कवच कुंडले लाभलेले पंजाबातील शेतकरीही सरकारच्या गळ्यात पडून आम्हाला वाचवा म्हणून गळा काढत आहेत. 

कालपर्यंत शेतकर्‍याच्या विरोधात उभे असलेले मेधा पाटकर, योगेंद्र यादव आणि सगळेच पर्यावरणवादी समाजवादी डावे आज शेतकर्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसून येत आहेत. यातूनच या आंदोलनाचे वैचारिक पितळ उघड पडताना दिसत आहे. 

निवृत्ती कर्‍हाळे, परसराम कर्‍हाळे आणि ग्यानदेव टोंपे या शेतकर्‍यांचे बळी सरकारी हस्तक्षेपाच्या धोरणाने घेतले. त्यांचे आत्मे आज स्वर्गात हळहळत असतील की आज पंजाबचे शेतकरी आपल्या मागणीच्या नेमक्या उलट्या मागणीसाठी आंदोलन करताना दिसत आहेत. 

दोन दिवसांनी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी युगात्मा शरद जोशी यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी शेतकर्‍याला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. सरकारी पिंजरा तोडायची दिशा दाखवली. त्यांच्या या खडतर मार्गावर चालताना 23 शेतकरी भाउ शहिद झाले. शेतकरी आंदोलनातील 23 हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेला लाल रंगाचा बिल्ला शेतकरी विचाराचा पाईक सतत आपल्या छातीवर अभिमानाने लावत असतो. तेंव्हा या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, शरद जोशींना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सर्व शेतकरी स्वातंत्र्याची शपथ घेवू या. आताच्या भीकमाग्या शेतकरी आंदोलनाचा संपूर्ण पराभव होईल यासाठी प्रयत्न करू या.

कृषी कायद्याने शेतकरी स्वातंत्र्याची पहाट होताना दिसत आहेत. आपण त्याचे स्वागत करू. 

यूं खूं की महक है के लबे यार की खुशबू
किस राह की जानिब से सबा आती है देखो!
गुलशन मे बहार आई के जिंदा हुवा आबाद?
किस सिम्त से नग्मों की सदा आती है देखो !

(हा रक्ताचा दरवळ आहे की प्रियेच्या ओठांचा सुगंध? हा पूर्वेकडून येणार्‍या पहाटवारा कोणत्या वाटेने येत आहे ते पहा. वसंत ऋतु फुलला आहे की तुरूंग गजबजला आहे. कोणत्या दिशेने गाण्याचे स्वर ऐकू येत आहेत- सुरेश भट यांनी आपल्या एल्गार कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत या ओळींचा उल्लेख केला आहे.)

शेतकरी आंदोलनातील सर्व शहिदांना आणि मा. शरद जोशी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.

शेतकरी स्वातंत्र्याचा विजय असो! इडा पीडा टळणार आहे बळीचे राज येणार आहे !!

(छायाचित्रातील शहिदांचे पुतळे गावकर्‍यांनी पै पै गोळा करून पदरचे पैसे खर्चूृन खासगी देणगी मिळालेल्या जमिनीवर उभारले आहेत. सरकारी जमिनीवर नेत्यांची स्मारकं सरकारी खर्चाने उभे करणार्‍यांनी याची नोंद घ्यावी. या शेतकरी भावांची माय बहिणींची नियत साफ आहे. हीच शेतकरी चळवळीची शरद जोशींची पुण्याई आहे.)

             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 
  

Wednesday, December 9, 2020

मूर्ती मालिका - १५

 

येरगी येथील काळम्मा

सरस्वतीची एक अतिशय सूंदर मूर्ती होट्टल पासून जवळच असलेल्या येरगी (ता. देगलूर जि. नांदेड) येथे आहे. स्थानिक लोक "काळम्मा" या नावाने तीची पूजा करतात.
ही मूर्ती आसनस्थ आहे. सरस्वती ओळखु येते कारण डाव्या वरच्या हातात आपण ज्याला एकतारी म्हणून ओळखतो तशी एकतंत्री वीणा आहे. त्याच बाजूला खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा खालचा हात नीट दिसत नाही त्या हातात अक्षमाला आहे. वरच्या हातात अंकुश आहे. हळेबीडू येथील नृत्त मूद्रेतील सहा हातांच्या सरस्वतीच्या एका हातात अंकुश दाखवलेला आहे. तसा तो येथे आढळून येतो. कधी अंकुशाच्या ऐवजी पाश दाखवलेवा असतो. वीणा आणि पुस्तक जास्त आढळून येतात. त्यावरूनच ढोबळमानाने ही मूर्ती ओळखता येते.
मूर्तीच्या अंगावरील दागिने विशेषत: गळ्यातील हार अप्रतिम आहे. असे चौरसाकृती "नेकलेस" अगदी आजही फॅशनच्या नावाने लोकप्रिय आहे. त्याची पाळंमुळं या आठशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीमध्ये सापडतात. होयसळ शैलीतले हे शिल्पांकन आहे.
पाठीमागे सहा देवतांच्या मूर्ती आहेत. अजून एक मूर्ती जी छायाचित्रात दिसत नाही ती असावी म्हणजे या सप्त मातृका असतील. पायाशी हंस कोरलेला आहे. पण खंडित असल्याने त्याची ओळख नीट पटत नाही.
Ainoddin Warsi
या मित्राने मूर्तीचा फोटो पाठवला.
Rajesh Kulkarni
यांनी या ठिकाणाची माहिती पुरवली. अभ्यासकांनी या सरस्वती मूर्तीवर अजून प्रकाश टाकावा. सरस्वती मंदिर म्हणून या ठिकाणाचा विकास झाला पाहिजे.
(आपणा सगळ्यांच्या प्रेमानं मी खरंच अवघडून गेलोय. नवनविन मूर्तींची माहिती आपण पाठवत अहात. हे मूर्ती व्रत आता माझे एकट्याचे उरले नसून सर्वांचेच झाले आहे. तूम्ही पाठवत असलेल्या फोटोंचे माहितीचे मन:पूर्वक स्वागत. मी माझ्या कुवतीप्रमाणे याला न्याय देत राहिन. परत धन्यवाद. रोज शक्य नाही पण शक्य तसे लिहित राहिन.)



मकर तोरणावरील देखणा नटेश
मंदिराच्या मुख्य मंडपातून गर्भगृहाकडे जाताना जो पॅसेज लागतो त्याला अंतराळ म्हणतात. या भागात डाव्या उजव्या भिंतींवर देवकोष्टके असतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची जी चौकट असते तिच्या वरच्या भागाला मकर तोरण म्हणतात. होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या मकर तोरणावर हा नृत्य करणारा शिव कोरला आहे ( नृत्य शिव म्हणजे नटराज नव्हे). नटराज मूद्रेशिवाय शिवाच्या नृत्य मूद्रीत शिल्पांना नटेश असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय उचललेला अशी ही मूद्रा आहे. (नटराज मूद्रेत उजवा पाय जमिनीवर आणि डावा उचललेला असतो) आजूबाजूला भक्तगण वाद्य वाजवत संगीतात गुंग झालेले आहेत. भक्तांच्या चार मूर्ती असून दोन वाद्य वाजवत आहेत तर दोन ललित मूद्रेत उभ्या असून नृत्याला साथ देत आहेत. मुख्य नर्तकाच्या मागे "कोरस" म्हणून कसे इतर उप नर्तक नाचत असतात तसे.
मगरीच्या मुखातून निघालेले नक्षीचे तोरण शिवाच्या माथ्यावर आहे. हे तोरण मोठे कलात्मक आणि सुंदर आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजव्या वरच्या हातात डमरु आणि खालचा हात वरद मूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. पायाशी नंदी बसलेला आहे.
हे मंदिर शिवाचे आहे हे सुचित करणारे हे शिल्पांकन गर्भगृहाच्या चौकटीवर दिसून येते. मंदिरांवरच्या शिल्पात खुप अर्थ दडलेला असतो. केवळ कोरायचे म्हणून शिल्प कोरले असे होत नाही. या शिल्पातील इतर मूर्तीही लयबद्ध आहेत. तोरणाच्या वरतीहि डाव्या उजव्या कोपर्यात गंधर्व किन्नर कोरलेले दिसून येतात. शिडी लावून वर चढून ही शिल्पं नीट पाहिली पाहिजेत. त्यांची सुंदर छायाचित्र, चलचित्रण (व्हिडिओ) करून ठेवले पाहिजे. म्हणजे सामान्य रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. अन्यथा शिल्पातले बारकावे लक्षात येत नाहीत. खुप वरचे किंवा पुरेसा प्रकाश नसलेल्या जागचे दिसतही नाही.
छायाचित्र सौजन्य


पशु पक्षी शिल्पं घोटण
मंदिरांवर कोरलेल्या शिल्पांमागे काही एक अर्थ दडलेला असतो. पण काही शिल्प काही वास्तुरचना या सौंदर्याचा भाग बनुन निखळ कलात्मक आविष्कार बनुन येतात. पशु पक्षांच्या या सहा जोड्या घोटण (ता. शेवगाव जि. नगर) थेथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावरील आहेत. मंदिराच्या पायाशी गजथर, अश्वथर असतो. पण हे प्राणी युद्धात वापरले जाणारे आहेत. मोर हंस गरुड हे देवतांचे वाहन आहैत. पण घोटण मंदिरावरील ही शिल्पे मुख्य मंडपावरील खांबांवर स्वतंत्र शिल्प म्हणून कोरलेली आहेत हे विशेष. बदक, हत्ती, हंस, वराह, हरिण आणि वानर अशा या सहा जोड्या आहेत. यातही परत नर मादी असं काही दाखवलं असतं तर त्यालाही काही वेगळा अर्थ देता आला असता. इथे तसंही नाही. केवळ जोड्या आहेत. मुख्य मंडपाच्या स्तंभांवर पौराणीक संदर्भ कोरलेले असतात किंवा नक्षी असते. पण इथे प्रामुख्याने पशु पक्ष्यांच्या जोड्या आहेत.
तेराव्या शतकातील या मंदिराचा जिर्णोद्धार पेशवेकाळात १८ व्या शतकात करण्यात आला. पुरातत्व खात्याकडून हे मंदिर चांगल्या पद्धतीनं जतन केलं गेलं आहे. पैठणपासून दक्षिणेला २० किमी अंतरावर हे मंदिर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी रस्ता चांगला आहे.
(छायाचित्र
Vincent Pasmo
)

श्रीकांत उमरीकर औरंगाबाद 9422878575

Tuesday, December 8, 2020

गर्द हिरवाईत सुचलेली कविता ...



उरूस, मंगळवार 7 डिसेंबर 2020
   
लॉकडाउनच्या काळात अजिंठा डोंगरांत फिरत असताना एक सुंदर अनुभूती आली. ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ ही बालकवींची कविता ओठावर घोळत होती. सर्वत पसरलेली मखमालीची हिरवी चादर. आभाळाची निळाई, मधूनच दाटून आलेले ढग आणि कोसळत चाललेल्या पाउस धारा. परत पडणारं ऊन.

वेताळवाडीच्या किल्ल्याला वळसा घालून पलिकडच्या डोंगर कपारीत रूद्रेश्‍वर लेणी आहे. तिथे आम्ही भटकत होतो.  उंचावरून कोसळणारा धबधबा, त्याचा नाद, त्या कातळात कोरलेली लेणी. दोन एक हजार वर्षांपूर्वी जो कुणी इथे पहिल्यांदा लेणी खोदण्यासाठी येवून राहिला असेल त्याची अनुभूती काय असेल? त्याला काय म्हणून इथेच लेणी खोदावी वाटली?

हे सगळं पहात असताना माझ्या मनात आपोआपच कविता सुचत गेली. शब्दांचा एक नादच डोक्यात घुमायला लागला. या परिसरांत या आधीही आलेलो होतो. पण ही अनुभूती पहिल्यांदाच येत होती.

नुसतीच कविता लिहीली आणि संपलं असंही होत नव्हतं. या शब्दांना एक लय होती. कविता लिहीणं झाल्यावर लक्षात आलं की यातील शब्द वेगळे करता येत नाहीत. त्यांची रचनाही बदलता येत नाही. बालकवी, बोरकर, महानोर, पाडगांवकर यांच्या निसर्गविषयक कवितांची एक मोहिनी मनावर आधीपासून होतीच. त्याच धर्तीवर हे शब्द आलेले आहेत हे पण जाणवत होते. एके ठिकाणी ‘कभिन्न काळा’ असा शब्द आला. शशांक जेवळीकर या मित्राने लक्षात आणून दिले की हा शब्द मर्ढेकरांच्या प्रभावातून आलेला आहे. कारण एरव्ही ‘काळा कभिन्न’ असं म्हणतो. पण उलट कभिन्न काळा असं म्हणत नाही. पुढे दुसर्‍या एका कवितेतही असाच धम्मक पिवळा शब्द आलेला आहे. 

पहिली ओळ सुचली ती पाऊस आणि सर्वत्र पसरलेली हिरवाई यांचा शाब्दिक अविष्कार बनून

डोंगर माथा । सचैल न्हातो
पाऊस रिमझिम । जवळ नी दूर
पोपट रंगी । मखमालीचा
हिरवा हिरवा । दाटे पूर  धृ० 

ही ओळ धृवपदासारखी घोळत राहिली.  धबधब्याचा नाद मंत्रघोषासारखा वाटायला लागला. पूजा करताना भोवताली पाणी शिंपडतात. मंत्र म्हणतात तसेच काहीतरी वाटायला लागले. आधी कातळ फोडूनी असा शब्द मी लिहीला होता. नंतर लक्षात आले की फोडूनी पेक्षा भेदूनी असा शब्द जास्त योग्य वाटतो. वार्‍याचा नाद, पाणी कोसळतानाचा नाद, पाणी खळखळा वाहतानाचा नाद असे सगळे सूर एकमेकांत मिसळून गेले आहेत..

कभिन्न काळा । कातळ भेदूनी
पाणी उसळे । झरा होवूनी
मंत्रघोष हो । चैतन्याचा 
सभोवताली । तुषार सिंचूनी
वार्‍यामधूनी । नाद लहरतो
सुरात मिसळूनी । जातो सूर ॥१

या परिसरांत मोर आहेत. जळकी नावाच्या गावात एका शेतकर्‍याने तर कोंबडीच्या अंड्यासोबत मोराचे अंडे उबवले. तो मोर कोंबडीच्या पिलांसोबतच वाढला. आज तो कोंबडीसारखाच घराच्या सभोवताली फिरत असतो.  मोरांच्या केका परिसरांत नेहमी ऐकू येतात. केवळ मोरच पिसे फुलवून नाचत आहेत असे नाही तर झाडांनीही पानांचा पिसारा फुलवला आहे.  

वनात कोणी । मनात कोणी
सुखे नाचतो । पिसे फुलवूनी
कानी पडती । मयुर केका
पानांमधूनी । वाजे ठेका
नादावूनी मग । खुळे पाखरू
हवेत सुर्रकन । मारी सूर ॥ २॥

या परिसरांत पळसाची झाडं भरपूर आहेत (महानोरांचे गाव पळसखेडे याच भागातले). तळ्याकाठी पाण्यात वाकुन पाहणारी पळसाची फांदी, काठावरची दगडी शिळा, चरणारी गाय हे सगळं आपोआपच कवितेत आलं. याच पसिरांत अजिंठा सारखी अप्रतिम शिल्पे घडली. तेंव्हा ही दगडी शिळा शिल्पासाठी झुरते आहे अशी ओळ सहजच कवितेत आली. आता पावसाळा चालू होतो. पळसांच्या लाल फुलांचा वसंत ऋतू ही खूप दूरची गोष्ट.

तळ्यात वाकून । पळस शोधतो
लाल फुलांचे । हसरे क्षण क्षण
काठावरची । शिळा एकटी
शिल्पासाठी । झुरते कण कण
चरता चरता । गाईचे मग
तिथेच अडूनी । राहते खूर ॥३॥

त्या डोंगर कपारीत भव्य कातळकडा भोवती उभा असताना आपल्या खुजेपणाची जाणीव खुपच तीव्र होत गेली. हे  भव्य असे जलरंगांतील चित्र कुणी रंगवलं? त्यात आपलं स्थान काय? मग यातून कवितेचा शेवट जो सुचला तो असा होता

डोंगर झाडी । अभाळ पाणी
‘जलरंगी’ या । ठिपका आपण 
भव्य रूप हे । पाहून विरते 
ताठर मनीचे । आपुले ‘मी’पण 
चैतन्याच्या । अनुभूतीने
भरून येतो । इवला ऊर ॥४॥

पावसाळ्यात या परिसरांत जरूर जा. कवितेत वर्णन केले आहे त्या निसर्गाचा अनुभव जरूर घ्या. 

(छाया चित्र सौजन्य व्हिन्सेंट पास्कीलिनी. आम्ही प्रत्यक्ष सप्टेंबर २०२० मध्ये गेलो तेंव्हाची छायाचित्रे)
 
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575   
      

Monday, December 7, 2020

मूर्ती मालिका -१४


श्रीधर विष्णु
मंदिरांच्या बाह्य भागातील देवकोष्टकांत कोणती देवता आहे त्यावरून आतील मूख्य मूर्तीबाबत अनुमान लावले जाते. ही विष्णुची मूर्ती गुप्तेश्वर मंदिराच्या (धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) दक्षिणेला बाह्य भागातील देवकोष्टकांत स्थित आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात चक्र, डाव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात शंख असा क्रम आहे. या विष्णुला श्रीधर असे नामाभिधान आहे. या विष्णुची जी स्त्री शक्ती आहे तीला "मेधा" असे संबोधतात. अशी विष्णुची २४ नावे आणि त्यांच्या २४ शक्ती आहेत. या मूर्तीला मोजकेच पण रेखीव असे दागिने दाखवले आहेत.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्यात सध्या महादेवाची पिंड आहे.
(छायाचित्र सौजन्य
Arvind Shahane
परभणी)



अनंतशयन विष्णु
(मूर्ती व्रताचा ५० वा दिवस म्हणजेच सुवर्ण महोत्सव)
मूर्तीबद्दल सांगण्याआधी नकळत सहज घडलेल्या या व्रताबद्दल सांगतो. घटस्थापनेच्या दिवशी (१७नोव्हेंबर) माझ्या घरातील महालक्ष्मीच्या मूर्तीपासून याची सुरवात झाली. नवरात्राप देवीच्या मूर्तींपुरतं ठरवलं होतं. पण दसर्याच्या दूसर्या दिवशी
Sai Chapalgaonkar
ने तिच्या घरच्या पुजेतील व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीचा फोटो पाठवला. मग त्यावर लिहिलं. आणि मग लिहितंच गेलो. पन्नास दिवस लिहायचे ठरवले कारण माझे पन्नासावे वर्ष चालू आहे. ही मी मलाच दिलेली भेट आहे. पुढेही लिहित राहिन पण असं व्रत म्हणून रोजच लिहिन असं नाही. आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आश्चर्यकारक माझ्यासाठी अभूतपूर्व असा राहिला.
सुरवात घरच्या मूर्तीने केली आता शेवटही घराजवळच्या मूर्तीनेच करतो आहे. (उद्या ५१वा दिवस. समापन म्हणजेच काल्याचे किर्तन म्हणतात तसे एका अप्रतिम भव्य मूर्तीवर लिहिणार आहे. या देखण्या मूर्तीने आपण भैरवी करू.)
अनंतशयन असा हा अप्रतिम विष्णु मंदिराच्या बाह्य भागावर कुठे सहसा आढळत नाही. ही मूर्ती परभणीच्या क्रांती चौकातील राम मंदिरात आहे (टाकळकर कुटूंबियांचे हे मंदिर आहे).
उजव्या वरच्या हातावर मस्तक विसावलेले आहे. उजव्या पायाशी लक्ष्मी असून ती पाय चुरत आहे (याला पाय दाबणे म्हणत नाहीत). तिच्या बाजूला भुदेवी हात जोडून उभी आहे. नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पाठशिळेवर दहा अवतार कोरलेले आहेत. खाली नागाच्या वेटोळ्यांची मउ शय्या आहे. डोक्याशी नागाचा फणा आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पाठशिळेवर कोरलेले अष्टदिक्पाल. कंसात दिशा आणि वाहन दिले आहेत. इंद्र (पूर्व -ऐरावत)), अग्नी (अग्न-मेष) , यम (दक्षिण-महिष), निऋती (नैऋत्य-श्वान), वरूण (पश्चिम-मकर), वायु (वायव्य-मृग), कुबेर (उत्तर- नरवाहन) , ईशान (ईशान्य-वृष). शिल्पात त्यांची वाहने पण दाखवली आहेत. अभ्यासक या शिल्पाला फार महत्वाचे मानतात त्याचे कारणच ही वैशिष्ट्ये आहेत. बारवेत अशा शिल्पाची स्थापना केलेली असते.
उद्या या मूर्ती व्रताचे उद्यापन करूया. आपणा सगळ्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मूर्ती संवर्धनाचा जागृतीचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.
(अष्टदिक्पाल संदर्भ "भारतीय मूर्तीशास्त्र" या
प्रदीप म्हैसेकर
च्या पुस्तकातून)
(छायाचित्र सौजन्य मल्हारीकांत देशमुख, परभणी)



सर्वांगसुंदर भव्य देखणा शार्ङगधर बालाजी
मूर्ती प्रेमींनी आयुष्यात किमान एकदा तरी पहावीच अशी सुंदर मूर्ती म्हणजे मेहकरचा (जि. बुलढाणा) शार्ङगधर बालाजी. पु.ल. देशपांडे यांनी लिहिलं आहे, "मेहकरचा बालाजी पाहून पटतं लक्ष्मी नारायणाच्या प्रेमात का अडली असेल ते."
साडेअकरा फुटाची ही भव्य काळ्या पाषाणातील मूर्ती शिल्पकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आयुधांचा क्रम बघितला तर उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंख आहे. विष्णुच्या या रूपाला त्रिविक्रम म्हणतात. पण मेहकरला या मूर्तीला शार्ङगधर बालाजी म्हटले जाते. मूर्तीचा अप्रतिम असा मुकूट आहे त्यावर शार्ङग नावाचे धनुष्य हाती घेतलेले विष्णुची प्रतिमा आहे म्हणून याला शार्ङगधर म्हणतात.
मूर्तीच्या पाठशिळेवर दशावतार कोरलेले आहेत. डावीकडून क्रमाने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह या नंतर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. त्या वर वामन अवतार आणि मध्यभागी सर्वात वर शिखरावर विष्णु प्रतिमा आहे. खाली उतरताना दूसर्या बाजूने परशुराम, महेश, राम, बलराम, बौद्ध आणि कल्की अशा दशावतार अधिक ब्रह्मा विष्णु महेश १३ प्रतिमा आहेत.
डाव्या उजव्या बाजूला जय विजय आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला खाली भुदेवी आणि डाव्या बाजूला महालक्ष्मी आहे.
मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकरण याचे वर्णन करावे तितके थोडे आहे. ही मूर्ती ७ डिसेंबर १८८५ रोजी मेहकरच्या एका गढीत खोदकाम करताना सापडली. इंग्रज अधिकार्यांनी रितसर पंचनामा करून मूर्ती इंग्लंडला पाठविण्याचे ठरवले. पण गावकर्यांनी मूर्ती गावाबाहेर जावू द्यायची नाही असा पण केला. तातडिने तीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली. हजारो लोकांनी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवू देणार नाही असा आग्रह धरला. शेवटी धार्मिक बाबीत हस्तक्षेप करायचा नाही या १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यातील कलमाच्या अनुषंगाने इंग्रज अधिकार्यांनी आपला निर्णय मागे घेतला.
आठ वर्षात मंदिराचे बांधकाम लोकांनी पूर्ण केले आणि मग ही मूर्ती तिथे स्थापित केली. उद्या ७ डिसेंबरला मूर्ती सापडली त्या घटनेला १३२ वर्ष पूर्ण होतील. त्या लोकांनी शिकस्त केली म्हणून मूर्ती वाचली. म्हणूनच ही सर्वांगसुंदर मूर्ती आज आपल्या देशात आपल्या डोळ्यासमोर आहे. या मूर्तीचा चांगला फोटो मला भेटू शकला नाही. कदाचित शार्ङगधराचीच इच्छा तूम्ही त्याला प्रत्यक्ष पहावे अशी असेल. मूर्ती व्रताची सांगता करताना माझा आग्रह नव्हे हट्ट आहे. ही मूर्ती एकदा पहाच.
मेहकरचे ज्येष्ठ मराठी कवी ना. घ. देशपांडे यांनी या मूर्तीवर सुंदर काव्य रचले. तिनेच मी या मूर्ती व्रताच्या काल्याच्या किर्तनाचा शेवट करतो.
त्रिविक्रमा हे, हे जगदंतर, सुंदर शार्ङगधरा
तव चरणाशी लक्ष्मी सुंदर
जय विजयाचे युगूल मनोहर
अवताराची तूझी प्रभावळ मनमोहन श्रीधरा ।।१।।
तूझे गीत गाते हे मंगल
अविरत निर्मळ गंगेचे जळ
पिउन ते, ही सस्यश्यामला प्रमुदित होते धरा ।।२।।
शिखराभवती शुभ्र पाखरे
प्रदक्षिणा करतात तूला रे
धुंडतात हे तुला सारखे अगोचरा गोचरा ।।३।।
पडतो मी पण तू वरती धर
व्यथित असा मी तू करूणाकर
हे करूणामय तूझ्यात आहे पूर्णकृपेचा झरा ।।४।।
- ना.घ. देशपांडे
(श्री व्यंकटेश व कालहस्तीश्वर, ले. रा.चिं. ढेरे, प्रकाशक पद्मगंधा)
सर्व वाचकांचे शतश: आभार. मूर्ती व्रत येथे समाप्त झाले. मूर्तींवर वेळोवेळी लिहितच राहिन. मंदिर मूर्ती कोशाचे मोठे काम हाती घेतो आहोत त्यात तूम्हा सर्वांचा सहभाग राहू द्या सहकार्य करा. प्राचीन मंदिरे व मूर्तींचे जतन संवर्धन अभ्यास या चळवळीस सहकार्य करा.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575


Sunday, December 6, 2020

मराठी लेखक शेती स्वातंत्र्याच्या विरोधात

उरूस, रविवार 6 डिसेंबर 2020

दिल्लीत चालू असलेल्या पंजाबातील शेतकर्‍यांच्या आंदोलनास मराठी लेखकांनी पाठिंबा जाहिर केला आहे. समाज माध्यमांत आणि प्रस्थापित वर्तमानपत्रादी माध्यमांतून तशा बातम्या झळकल्या आहेत. 

मुळात सध्या चालू असलेले शेती आंदोलन जरा बाजूला ठेवू. महाराष्ट्रात 40 वर्षांपूर्वी शरद जोशींनी शेतकरी आंदोलनाची मुहर्तमेढ रोवली. हे सर्व मराठी लेखक तेंव्हा या चळवळीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधीत होते. केवळ आंदोलन उभं केलं असे नव्हे तर शेती प्रश्‍नाची साधार सविस्तर अर्थशास्त्रीय मांडणी शरद जोशींनी करून दाखवली. दोन चार वर्षांतच म्हणजे 1982 पासून पंजाब आणि इतर प्रदेशांत शरद जोशी यांच्या आंदोलनाचा वैचारिक दबदबा पसरला. उत्तर प्रदेशात महेंद्रसिंह टिकैत किंवा कर्नाटकांत नंजूडा स्वामी यांनी उभारलेल्या आंदोलनास कधीच वैचारिक आधार नव्हता. उलट शरद जोशी यांच्या मांडणीला भारतभरांतून पाठिंबा मिळत गेला.

हे सर्व मराठी लेखक ज्यांच्या प्रदेशांतील एक शेतकरी नेता किंबहुना शेती प्रश्‍नाची मांडणी करणारा विचारवंत अनुभवत होते. त्याचे लिखाण वाचत होते. बंगाली लेखकांच्या कादंबर्‍यांत 1985 पासूनच शरद जोशी यांची मांडणी आणि आंदोलनाची दखल यायला सुरवात झाली होती (तिस्तेकाठचा वृत्तांत). खुद्द या लेखकांनीही त्या काळात आपल्या कथा कविता कादंबर्‍यांत शेतकरी आंदोलनाची वैचारिक मांडणी कलात्मक पद्धतीने मांडली होती. आज पत्रक काढणार्‍या पाच प्रातिनिधीक लेखकांच्या कलाकृतींचेच उदाहरण आपण येथे पाहूया.

पहिला लेखक आहे इंद्रजीत भालेराव. त्यांच्या ‘काबाडाचे धनी’ या दीर्घकाव्यात आडतीवर कापूस विक्रिचे वर्णन आलेले आहे. कापसाला न मिळालेल्या भावाची वेदना त्यांनी शब्दांत मांडली आहे. ती वाचून शरद जोशींनी असे लिहीले की ‘शंभर भाषणं करून आकडेवारी मांडून जे सांगता येणार नाही ते इंद्रजीतने चार ओळीत मांडले आहे.’

भावामधी काट्यामधी पस्तोरीत उणीपूरी

ज्यानं त्यानं जिथं तिथं देल्या हातावर तुरी

पट्टी घेवून येतानी त्याचा उतरला नूर

जनू वाहून गेलाय उभ्या झाडावून पूर

कापसाची सरकारी खरेदी व्यवस्था आपल्या बापाला लुटते हे लिहीणारे इंद्रजीत भालेराव आज शेतकर्‍यांच्या गळ्या भोवती सरकारी धोरणाचा पाश आवळणारी मागणी करणार्‍या आंदोलनास पाठिंबा का देत आहेत? ही कापुस एकाधिकार योजना कधीच कापसाला पुरेसा भाव देवू शकलेली नाही हा त्यांच्या आजूबाजूचा अनुभव नाही का? परभणी आणि परिसरांतील सर्व प्रदेश काळ्या मातीचा म्हणजेच कापसाचा प्रदेश आहे.

दुसरे लेखक कवी अकोल्याचे नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी आपल्या ‘मागील पानावरून पुढे चालू’ या कविता संग्रहात अशी ओळ लिहीली आहे

अस्मानीतून सुटशील 

तर सुलतानीत अडकशील

टाकांच्या निभांनी 

तूझी कणसं खुडतील

म्हणजे सरकारी धोरण शेतकर्‍याला मारते याची पूर्ण कल्पना नारायण कुलकर्णी कवठेकर यांना आहे. शरद जोशी ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या आहे’ ही घोषणा आधीपासून देत आले होते. इतकंच नाही तर ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण’ अशीही मांडणी करत होते याचीही कल्पना अनुभव या मराठी लेखकांना येत होता आणि त्याचे त्यांच्या साहित्यकृतीत प्रतिबिंब दिसून येते.

या पत्रकावर सही करणारे कथाकार भास्कर चंदनशीव यांनीही आपल्या ‘लाल चिखल’ या कथेत भाव न मिळाल्याने टमाटे रस्त्यावर ओतून परतणार्‍या शेतकर्‍याचे दु:ख मांडले होते. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्था आपल्या बळीराजाला न्याय देवू शकत नाही याची पूर्ण कल्पना भास्कर चंदनशीव यांना होती.

राजन गवस यांनी आपल्या अकादमी पुरस्कारप्राप्त ‘तणकट’ कादंबरीत गावातील पतपेढीचे राजकारण रंगवताना डबकं बनलेल्या गावगाड्यातील अर्थप्रवाहाचे वर्णन केले आहे. ही सहकारी सरकार आश्रीत व्यवस्था बळीराजावर अन्याय करते हे नीट माहित आहे. 

आसाराम लोमटे यांच्या इडा पीडा टळो या कथासंग्रहात भर दिवाळीत बलीप्रतिपदा म्हणजे शेतकरी विरोधी सण आहे तेंव्हा तो साजरा करायचा नाही या शेतकरी संघटनेच्या मांडणीचा पाठपुरावा करणार्‍या महिलेची कथा आहे. कथा वाङमयीन दृष्ट्या अतिशय दर्जेदार आहे. वर्षोनुवर्षे सत्ताधारी मग ते कुठल्याही काळातील कसे असो शेतकर्‍याला लुटतात हे सत्य कलात्मक रित्या मांडता येते.  मग त्याच आसाराम लोमटे यांना आजचे सरकारी धोरण पोषक आंदोलन शेतकर्‍यांच्या हिताचे कसे काय वाटते?

 हे जर यांच्या कलाकृतीतून स्पष्टपणे दिसून येते तर मग आता यांची नेमकी भूमिका बदलण्याचे कारण काय? आताचे शेतकरी आंदोलन हे पूर्णत: डाव्यांच्या प्रभावातील मागण्या पुढे करत आहे. सरकारशाही बळकट करत आहे. शेतकर्‍या हाती वाडगा घेवून भीकवादी बनवत आहे. सरकारी खाटीकखान्याकडे शेतीप्रश्‍नाची गाय घेवून जात आहे. मग हे मराठी लेखक त्या गायीच्या गळ्यात हार घालण्यासाठी, तिला कुंकूम तिलक लावण्यासाठी, पुरणाचा गोग्रास भरविण्यासाठी पुढे का निघाले आहेत? 

शेतकर्‍यांचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयास होतो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. असे या लेखकांनी म्हटले आहे. कुठलेच आंदोलन दडपून टाकू नये. त्यावर वाद करण्याचे कारणच नाही. पण या शेतकर्‍यांनी त्यांच्या मागण्याासाठी अवैध पद्धतीने रस्ता अडवून ठेवावा याचे समर्थन ही लेखक मंडळी का करत आहेत? सर्वोच्च न्यायालयाने शाहिनबाग प्रकरणांत आंदोलन करताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे हे यांना माहित नाही का? का हे सर्व लेखक न्यायालयाच्या विरोधात जाणार आहेत?

शरद जोशींनी केलेले सर्व लिखाण मराठीतून उपलब्ध आहे. त्यात विविध आकडेवारीही वेळोवेळीची दिलेली आहे. सरकारी पातळीवर विश्वनाथ प्रतापसिंह आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील दोन अहवाल उपलब्ध आहेत.  आणि तरीही हे काहीच न वाचता ही लेखक मंडळी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. ही कमाल आहे. 

आसाराम लोमटे यांनी आजच (रविवार 6 डिसेंबर 2020) लोकसत्तामध्ये ‘भूमी आणि भूमिका’ असा लेख लिहीला आहे. संपूर्ण लेखात एकाही ठिकाणी या कायद्यांतील शेतकर्‍यांवर अन्याय करणारे कलम कोणते? हे सांगितलेले नाही. नेमका विरोध कोणत्या कारणासाठी पंजाबचे शेतकरी करीत आहेत याचाही उल्लेख लोमटे करत नाहीत. याला काय म्हणावे? 

डंकेल प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहनसिंग यांना असाच कडवा विरोध समाजवादी चळवळीच्या प्रभावातील शेतकरी नेत्यांनी केला होता. तेंव्हाही काही लेखक त्याला बळी पडले होते. 

शेतकर्‍याचा पोरगा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अधिकारी बनून गेला की धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला कमी करत नाही असे शरद जोशींनी लिहून ठेवले होते. तसेच आज शेतकर्‍याचा पोरगा लेखक झाला की बापाचा गळा आवळणारी धोरणं राबविण्यासाठी आग्रह धरणार्‍या आंदोलनाला पाठिंबा दिल्याशिवाय रहात नाही असेच दूर्दैवाने म्हणावे लागेल. शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. तशी संपूर्ण वैचारिक मांडणी करून ठेवली. आणि त्याच शरद जोशींच्या प्रदेशातील त्यांच्याच मराठी भाषेत लिहीणारे लेखक याच शेतकर्‍यांला भीकारी बनविणार्‍या आंदोलनाची पालखी वहात आहेत. 

शेतकर्‍यांसाठी संपूर्ण स्वातंत्र्याची अतिशय स्वच्छ मागणी शरद जोशींनी केलेली होती. बाजार स्वातंत्र्य, तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि शेतीविरोधी कायद्यांपासून मुक्ती या त्रिसुत्रीशिवाय शेतकर्‍यांचे भले होणे शक्य नाही. हे जर मराठी लेखकांना समजूनच घ्यायचे नसेल तर त्यांना समजावून सांगणे मुश्किल आहे. 

  

    श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575   

      


Saturday, December 5, 2020

डोंगरमाथा बाभुळझाड । होतच नाही नजरेआड ॥

  


उरूस, 1 डिसेंबर 2020 

औरंगाबाद शहराला टेकड्यांनी वेढलेले आहे. दक्षिणेकडच्या म्हणजेच सातारा परिसरांतल टेकडीवर एक सुरेख झाड आहे. टेकडीवरील हे एकटेच झाड कुठूनही उठून दिसते. ही टेकडी ‘वन ट्री हील’ म्हणूनच ओळखली जाते. हे झाड जवळून पाहण्याची फार दिवसांची इच्छा होती. 

पर्यावरणप्रेमी तरूणांच्या एका गटाने पावसाळ्यात तिथे वृक्षारोपण केले. दोन तीन दिवांपूर्वी वणव्यात ही सर्व झाडे होरपळली. जी वाचू शकतील अशा झाडांना पाणी देवू या, त्यांच्या मुळाशी पाण्याच्या बाटल्या ठेवून ठिबकच्या माध्यमातून तेथे ओल जपली जाईल. या झाडांना वाचविण्यासाठी आज शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी पहाटे सुर्योदय होताना उत्साही तरूण तरूणींच्या गटासोबत मी या टेकडीवर पोचलो. 

ज्या झाडाला जवळून पहायची ईच्छा होती ते दृष्टीपथास पडल्यावर आश्चर्य वाटलं, आनंद झाला. आश्चर्य यासाठी की बाकी काहीच त्या बोडक्या डोंगरावर टिकू शकले नाही पण हे झाड मात्र तग धरून चिवटपणे टिकून आहे. आणि आनंद यासाठी की हे तर एक साधं आपलं गावठी बाभळीचे झाड आहे. नेहमी आढळणारी अशी ही आपल्या जवळची बाभूळ इथे इतक्या उंचावर औरंगाबाद शहराच्या माथ्यावर अभिमानाने तुर्‍यासारखी डौलात उभी आहे. 

झाडांना पाणी द्यायचे काम थोडावेळ करून नविन आलेल्या उत्साही गटाच्या हाती सोपवले आणि झाडाजवळ येवून बसलो. कधीपासून हे झाड आपल्याकडे खेचून घेत होतं. गर्द हिरवी पाने, त्यावरची पिवळी सुंदर फुले, काळे अस्सल भक्कम  खोड मला बापटांची कविता आठवली


अस्सल लाकुड भक्कम गांठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे


देहा फुटले बारा फांटे

अंगावरचे पिकले कांटे

आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे


अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे


बापटांच्या कवितेत या झाडाचा टणकपणा स्पष्टपणे आला आहे. इथे बाकी कुठलेच झाड टिक़ले नाही. आहेत ती झुडूपे. नविन लावलेली झाडे जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमी धडपडत आहेत. 

बापटांच्या कवितेपेक्षा काहीतरी अजून वेगळे या झाडात आहे असे मला वाटले. भोवती फिरून पाहताना झाडावर पडलेले कोवळे ऊन, पिवळ्या फुलांची आकर्षक झळाळी, काळ्या फांद्यांच्या जाळीतून पलीकडे दिसणारे शहराचे सुंदर चित्र हे मला ‘माथ्यावरची हळद विटली’ या ओळीशी विसंगत वाटायला लागले. 

मार्गशीर्षातली पहाट आहे. शिसवी शिल्पासारखे खोड, कोवळ्या उन्हात पिवळ्या फुलांची झळाळी उठून दिसते आहे, फांद्यांच्या जाळीतून पलीकडचे शहर खुप सुंदर दिसते आहे. मला इंदिरा संतांची कविता आठवली. हे झाडही इंदिरा संतांच्या कवितेतील बाभळीसारखे गावाबाहेर एकटे उभे आहे. त्यांनी बांधावर म्हटले इथे हे डोंगरावर आहे.



लवलव हिरवी गार पालवी

काट्यांशी वर मोहक जाळी

घमघम करती लोलक पिवळे

फांदी तर काळोखी काळी


झिलमिल करती शेंगा नाजूक

वेलांटीची वळणे वळणे

या सार्‍यांतून झिरमिर झरती

रंग नभाचे लोभसवाणे


अंगावरती खेळवी राघू

लाघट शेळ्या पायाजवळी

बाळ गुराखी होउनिया मन

रमते तेथे सांज सकाळी


संध्याकाळी येते परतून 

लेउन हिरवे नाजुक लेणे

अंगावरती माखुन अवघ्या

धुंद सुवासिक पिवळे उटणे


कुसर कलाकृती अशी बाभळी

तिला न ठावी नागररीती

दूर कुठेतरी बांधावरती

झुकुन जराशी उभी एकटी


औरंगाबाद शहराचा मानाचा तुरा असणारी अशी बाभळी. ही टेकडी म्हणजे बाभुळ टेकडी असेच म्हणायला पाहिजे. जशी गोगाबाबा टेकडी आहे, हनुमान टेकडी आहे तशीच ही बाभुळ टेकडी. हे झाड नजरेआड होताच नव्हते. म्हणून मला ओळ सुचली "डोंगरमाथा बाभूळ झाड | होताच नाही नजरेआड ||"

             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

Friday, December 4, 2020

शाश्‍वत पर्यटन : आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाच पाऊल

 


सत्यवेध दिवाळी 2020

कोरोना काळात पूर्वीच्या खुप संकल्पना बदलून गेल्या आहेत. पर्यटनातही आता वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आपल्याला शाश्‍वत पर्यटनाचा विचार अगत्याने अग्रक्रमाने करावा लागेल. शाश्‍वत पर्यटन (सस्टेनेबल टूरिझम) ही संकल्पना जास्त करून समोर आली युरोपातून. आपला देश, आपली संस्कृती, चालिरीती, रितीरिवाज, संगीत, खाद्य पदार्थ यांबाबत त्यांना जास्त आस्था राहिलेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगात व्यापाराला आणि त्या सोबतच पर्यटनाला विशेष गती मिळाली. या पर्यटनाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे शाश्‍वत पर्यटन. त्यात या स्थानिक मुद्द्यांना विशेष महत्त्व दिले जाते.
कोरोना आपत्तीनंतर भारतात आणि महाराष्ट्रातील पर्यटनाचाही आपण या दृष्टीने वेगळा विचार करू शकतो. आत्तापर्यंत पर्यटन म्हणजे उंची महागडे हॉटेल्स, खाण्यापिण्याची मौजमजा आणि यासोबतच जरा जमले तर बाहेर फिरणे. गोव्या सारख्या प्रदेशाने मौजमजेलाच पर्यटन म्हणा असा गैरसमज पसरवला. पण आता सगळीकडेच पैशाच्या अडचणी जाणवू लागल्या आहेत. याचा आघात पर्यटनावरही पडत आहे. मग यातून पर्याय काय? तर शाश्‍वत पर्यटन एक चांगला पर्याय समोर येतो आहे.

1. वेगळी ठिकाणे :
जी अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं आहेत त्यांचा विचार आपण बाजूला ठेवू. तसेही त्यांच्याकडे पर्यटक येत असतातच. अतिशय उत्तम पण पर्यटकांना ज्ञात नसलेली स्थळं शोधून पर्यटकांसमोर असे पर्याय ठेवता येतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था मुद्दाम वेगळी न करता आधीच अस्तित्वात असलेल्या घरांमधून शक्य आहे.  ज्या गावांमधून जूने वाडे आहेत त्यांची जराशी डागडुजी करून घेतली तर पर्यटक विशेषत: परदेशी पर्यटक अशा जागी मुद्दाम रहायला जातात. पर्यटन स्थळाजवळ स्थानिक लोकांना हाताशी धरून अशा सोयी करता येणे सहज शक्य आहे. त्यांनाही रोजगार मिळेल, पर्यटकांचे पैसेही कमी खर्च होतील आणि यातून एका वेगळ्या व्यवसायाला चालना मिळेल.
उदा. म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा आपण विचार करू. गौताळा अभयारण्याजवळ अंतुरचा किल्ला आहे. तसेच अजिंठा लेणी जवळ हळदा घाटात वेताळ वाडीचा किल्ला आहे. वाडीच्या किल्ल्या पर्यंत जाण्यासाठी उत्तम रस्ता आहे. अंतुर किल्ल्यासाठी मुख्य सडकेपासून 6 किमी. कच्या खराब रस्त्याने जावे लागते. या ठिकाणी राहण्याची खाण्याची कसलीही व्यवस्था नाही. स्थानिक गावकर्‍यांशी बोलून खाण्यापिण्याची व्यवस्था करता येते. (असा अनुभव आम्ही वाडिच्या किल्ल्या जवळ घेतला आहे. अगदी शेतात बसून जेवण केले आहे.) परदेशी पर्यटक असा अनुभव घेण्यासाठी मुद्दाम तयार असतात. या किल्ल्यांवर साहसी पर्यटकांना चांगली संधी आहे.
काही अतिशय चांगली मंदिरे दुर्गम ठिकाणी आहेत, काही मंदिरे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यांची माहिती होत नाही. पाटणादेवी सारखे ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे. घाटात आहे. तिथे चांगला धबधबा आहे. त्याला लागून महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. जवळच वाघळी गावात महाराष्ट्रातील एकमेव असे प्राचीन सुर्यमंदिर आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालूक्यात तलवाडा गावात छोट्याशा टेकडीवर त्वरिता देवीचे मंदिर आहे.  हे मंदिर शिवकालीन असून उत्तम दगडी बांधणीचे आहे. टेकडीवर असल्याने येथे निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येतो. तसेच अंबडच्या जवळ जामखेड म्हणून गाव आहे. येथील टेकडीवर असलेले जांबुवंताचे मंदिरही असेच उत्तम पर्यटन स्थळ आहे. अशा कितीतरी जागा महाराष्ट्रभर शोधता येतील. या ठिकाणी पर्यटनाच्या उत्तम संधी आहेत. गड किल्ले लेण्या जून्या वास्तू येथे पर्यटनास चालना देणे सहज शक्य आहे. जी ठिकाणं चांगल्या स्थितीत आहेत तेथे पर्यटन वाढू शकते.
शाश्‍वत पर्यटनातील पहिला मुद्दा येतो तो अशा फारशा परिचित नसलेल्या स्थळांबाबत. शिवाय काही निसर्गरम्य ठिकाणं शोधून तिथेही पर्यटनाला चालना देता येते.

2. स्थानिक अन्न :
दुसरा मुद्दा यात पुढे येतो तो अन्नाचा. आपण पर्यटकांचा विचार करताना त्यांना जे पदार्थ खायला देतो ते त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे असावेत असा विचार केला जातो. पण स्थानिक जे पदार्थ आहेत, जे अन्नधान्य आहे त्याचा विचार होताना दिसत नाही. आपण जिथे जातो आहोत तेथील धान्य आणि तेथील पदार्थ यांचा अनुभव घेतला पाहिजे. त्यांच्या चवी समजून घेतल्या पाहिजेत. नसता कुठेही जावून आपण तंदूर रोटी आणि दाल मखनी पनीरच खाणार असू तर त्याचा काय उपयोग?  बारीपाडा हे गाव महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर धुळे जिल्ह्यात आहे. या गावात दरवर्षी रानभाज्यांची स्पर्धा भरते. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. निसर्ग पर्यटन आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपण तिथे जावू शकतो. पर्यटनांत अशा ठिकाणांचाही विचार झाला पाहिजे.
विविध पदार्थ करण्याची पण एक प्रत्येक प्रदेशातील एक पद्धत असते.  तिचा अनुभव घेतला पाहिजे. अशामुळे स्थानिक आचार्‍यांना एक संधी उपलब्ध होते. त्यासाठी बाहेरून माणसे आणायची गरज उरत नाही. अगदी जेवणासाठी त्या त्या भागात मिळणारी केळीची पानं, पळसाच्या पत्रावळी यांचा उपयोग झाला पाहिजे. तोही एक वेगळा अनुभव असतो. हैदराबादी पदार्थात ‘पत्थर का गोश’ म्हणून जो मांसाहारी पदार्थ खाल्ल्या जातो तो खाताना कसे बसावे कसे खावे याचेही नियम आहेत. अशा रितीने पर्यटनाच्या एका वेगळ्या पैलूचा विचार यात केला जातो.

3. लोककला, जत्रा, उत्सव :
खाण्यापिण्या सोबतच अजून एक मुद्दा शाश्‍वत पर्यटनात येतो. तो म्हणजे त्या त्या प्रदेशातील संगीत, रितीरिवाज, सण समारंभ, जत्रा, उत्सव, उरुस. आपल्याकडे देवस्थानच्या जत्रा असतात. त्यांचा एक विशिष्ट काळ ठरलेला असतो. त्याच काळात तिथे जाण्यात एक वेगळा आनंद असतो. उदा. अंबडच्या मत्स्योदरी मातेच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या दगडी पायर्‍यांवर हजारो दिवे लावले जातात. (मागील वर्षी सात हजार दिवे लावले होते.) हा दिपोत्सव पाहणे एक नयनरम्य सोहळा असतो. काही ठिकाणी रावण दहन केले जाते दसर्‍याच्या दिवशी. त्याही प्रसंगी पूर्व कल्पना दिली तर पर्यटक येवू शकतात. गणपतीच्या काळात नवरात्रीच्या काळात पर्यटनात वाढ झालेली दिसून येते. हा एक वेगळा पैलू आहे. शिवरात्र आणि श्रावणातील सोमवारी बहुतांश महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त जमा होतात. शिवरात्रीला रात्रभर भजन चालते. हे दिवस ओळखून त्या प्रमाणे पर्यटकांच्या सहली आयोजीत करता येतात.
कोल्हापूरजवळ खिद्रापूर येथे कोप्पेश्वर शिवमंदिर आहे. या मंदिराला वैशिष्ट्यपूर्ण असा गोलाकार उघडा मंडप आहे. कोजागिरी पौर्णिमेला या मंडपाच्या अगदी मध्यावर संपूर्ण चंद्राचे दर्शन होते. हे निमित्त साधून या दिवशी येथे मोठा सांस्कृतिक उत्सव नियोजीत केला जावू शकतो.  
नवरात्रीत बहुतांश देवी मंदिरांत गर्दी होते. निसर्गरम्य असलेली ठिकाणं निवडुन अशा ज़त्रांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तिथे पर्यटकांना आवर्जून बोलावता येवू शकते.
काही दर्ग्यांमधून उरूस भरतात. उरूस म्हणजे त्या सुफी संताची पुण्यतिथी. अशा वेळी कव्वाल्यांचा कार्यक्रम आयोजीत केलेला असतो. त्यासाठी पर्यटकांना पूर्वकल्पना असेल तर तेही येवू शकतात. (खुलताबाद येथील दर्ग्यात अशा कव्वालीसाठी आम्ही परदेशी पर्यटकांना घेवून गेलो आहोत. तो अनुभव अतिशय आगळा वेगळा आहे.)
कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. रात्रीची जागरणं अशावेळी केली जातात. त्या जागी काही सांस्कृतिक सांगितीक कार्यक्रम करणे सहज शक्य आहे. अशा निमित्तानेही पर्यटकांना आणता येवू शकते.

4. पर्यटन वाढीसाठी संगीत महोत्सव/ सांस्कृतिक कला महोत्सव :
ऐतिहासिक वास्तुंच्या परिसरांत संगीत महोत्सव आयोजीत करण्यासाठी शासकिय पातळीवर काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले जायचे. लालफितीच्या कारभारामुळे ते जवळपास सगळे बंद पडले. या शिवाय काही मंदिरे आणि मठ, दर्गे यांच्या संस्था यासाठी सहकार्य करण्यास तयार असतील तर त्यांच्या परिसरांत संगीत महोत्सव छोट्या प्रमाणात घेणे सहज शक्य आहेे. यामुळे पर्यटनाचा एक वेगळा पैलू समोर येवू शकतो. शाश्‍वत पर्यटनात याचाही विचार केला जातो.
लोककला नृत्य लोकसंगीत यांचा अतिशय चांगला वापर पर्यटनाच्या वाढीसाठी करता येवू शकतो. शिवाय या कलांना प्रोत्साहन देण्याचेही काम यातून होवू शकते. तेलंगणात दलित किन्नरी वादक कलाकारांना शासन स्वत: प्रोत्साहन देवून विविध ठिकाणी पाठवते. त्यांचा कलाविष्कार लोकांच्या समोर यावा म्हणून धडपड करते. अशा काही योजनांतून पर्यटनाला चालना मिळू शकते.
शाश्‍वत पर्यटनात हस्तकलांचाही विचार केला जातो. हातमागावर कापड विणणारे, हॅण्डमेड कागदवाले, धातूवर कोरिवकाम करणारे (बिदरी कला), मातीची/लाकडाची खेळणी तयार करणारे असे कितीतरी कलाकार आपल्या जवळपास असतात. यात परदेशी पर्यटकांना विशेष रस असतो. समोर बसून चित्र काढून देणारे. किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळी तिथेच बसून त्या जागेचे चित्र काढणारे यांचाही विचार शाश्‍वत पर्यटनांत केला जातो. त्या त्या जागची चित्रे काढून त्याचे प्रदर्शन भरवता येवू शकते. त्या त्या भागातील वस्त्र विणण्याची परंपरा हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. अशा वस्त्रांचे प्रदर्शन भरवता येवू शकते. उदा. पैठणी, हिमरू, महेश्वरी, पाटण पटोला, कांचीपुरम, बालुचेरी, बनारसी इ.इ.

5. घरगुती निवास  व्यवस्था (होम स्टे) :
प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी जाताना वाटेत घरगुती राहण्याची खाण्याची व्यवस्था होणार असेल तर बर्‍याच जणांना ते हवे असते.  कोकणात तर मुद्दाम समुद्रकिनार्‍या जवळ घरांत जावून राहणे पर्यटक आजकाल पसंद करत आहेत. कर्नाटकांत हंम्पी हे गांव असे आहे की तिथे एक पन्नास शंभर घरांचे खेडेच संपूर्णत: पर्यटन व्यवसायावर चालते. तुंगभद्रा नदीच्या काठी छोट्या घरांतून लोक राहतात. तिथेच जेवायची चहापाण्याची व्यवस्था केली असते. काही परदेशी पर्यटक तर तिथे केवळ शांततेसाठी येवून राहतात.
काही दिवसांनी जंगलात, दूरवरच्या खेड्यात, एखाद्या तळ्याच्या काठी जावून आठ दिवस राहणे  हा प्रकारही लोकप्रिय होत चाललेला आपल्याला दिसेल. निसर्गरम्य वातावरण, शांतता, पक्ष्यांचे मधुर आवाज, चुलीवरचे जेवण, जवळपासच्या शेतांत डोंगरात फेरफटका, रात्री खुल्यावर बसून चांदण्याचा आनंद घेणे अशा गोष्टी लोक आवर्जून करताना दिसून येतील.

6. उपसंहार :
शाश्‍वत पर्यटनांत सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे ती संसाधने आहे ते मनुष्यबळ याचा सुयोग्य उपयोग करून घेण्यावर भर दिला जातो. तेथील लोककलाकार, कारागिर यांचाही विचार यात केला जातो. तिथील जनजिवनाशी जूळवून घेण्यावर भर दिला जातो. अन्यथा इतर वेळी आपण पर्यटक म्हणून आपल्या आवडीनिवडी त्या प्रदेशावर तेथल्या माणसांवर लादत असतो. तेथील निसर्गाची हानी करत असतो.
कोरोना आपत्तीमधुन एक आर्थिक पेच समोर आला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काटकसरीने सर्व काही करण्यावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी स्थानिकांना संधी, स्थानिक संसाधनांचा वापर यामुळे बचतही होवू शकते व रोजगाराच्या वेगळ्या संधीही निर्माण होवू शकतात.
याची सुरवात म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळच्या अशा एखाद्या कधी न गेलेल्या थोडेफार माहिती असलेल्या ठिकाणी  गेलं पाहिजे. तेथील अनुभव इतरांना सांगितला पाहिजे. सध्या समाज माध्यमे (सोशल मिडिया) अतिशय प्रभावी पद्धतीनं काम करत आहे. त्यावरून हे अनुभव इतरांना समोर आले तर या पर्यटनाला चालना मिळू शकते. सहजपणे अर्थकारणाला गती येवू शकते.      

(वरचे छायाचित्र शेंदूरवादा ता. गंगापूर जि. औरंगाबाद  येथील गणेश मंदिरा जवळ खाम नदीच्या पाण्यात त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब पडले त्याचे आहे. २९ नोव्हेंबर रोजी तेथे साहित्य संगीत कला मंच च्या वतीने  सांस्कृतिक कार्यक्रम झाला. औरंगाबाद शहरातून ४९ रसिक गाडी करून गेले होते. शाश्वत पर्यटनाचे जिवंत उदाहरण. खाण्या पिण्याची सर्व व्यवस्था स्थानिक लोकांनी केली.)  

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575