काव्यतरंग, शुक्रवार 14 ऑगस्ट 2020 दै. दिव्यमराठी
भटेन नऊ महिन्यांनी
मनि धीर धरी शोक आवरी जननी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥
या न्यायाची रीत मानवी असते । खरी ठरते केव्हा चुकते
किति दुर्दैवी प्राणी असतिल असले । जे अपराधाविण मेले
लाडका बाळ एकुलता
फांशीची शिक्षा होतां
कवटाळुनि त्याला माता
अति आक्रोशे, रडते केविलवाणी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥
तुज सोडुनि मी. जाइन कां गे इथुन । परि देह परस्वाधीन
बघ बोलति हे, बोल मुक्या भावाचे । मम दोरखंड दंडाचे
अन्नपाणि सेवुनि जिथले
हे शरीर म्यां पोशियले
परदास्यिं देश तो लोळे
स्वातंत्र्य मला, मिळेल मग कोठोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥
लाभते जया, वीर मरण भाग्याचे । वैकुंठपदी तो नाचे
दे जन्म मला, मातृभूमिचे पोटी । पुन:पुन्हा मरण्यासाठी
मागेन हेंच श्रीहरिला
मातृभूमि उद्धरण्याला
स्वातंत्र्यरणी लढण्याला
तव शुभ उदरी, जन्म पुन्हा घेवोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥
-कुंजविहारी (गीतगुंजारव, पृ.54, प्रकाशक गीतगुंजारव मंडळ सोलापुर, आ.1947)
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध स्वातंत्र्यगीते वाजवली जातात. काही कवितांची आठवण या निमित्ताने काढली जाते. कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ सारख्या कवितांप्रमाणेच तेंव्हाची अतिशय लोकप्रिय असलेली कवी कुंजविहारी यांची कविता म्हणजे ‘भेटेन नऊ महिन्यांनी’.
कवी कुंजविहारी यांचे संपूर्ण नाव हरिहर गुरुनाथ कुलकर्णी-सलगरकर (जन्म 10 नोव्हेंबर 1896 मृत्यू 1 नोव्हेंबर 1978). सोलापूर ही त्यांची कर्मभूमी. स्वातंत्र्यलढ्यात अतिशय सक्रिय असलेले कुंजविहारी यांना सोलापूरच्या मार्शल लॉच्या वेळी 1 वर्षाचा तुरूंगवासही भोगावा लागला.
देशासाठी लढणार्या एकुलत्या एक मुलाला फांशीची शिक्षा होते. त्याला पोलिस ओढून नेत असताना त्याची आई आक्रोश करते. या आईला समजावून सांगताना तो स्वातंत्र्यवीर जे बोलतो आहे त्याचीच ही कविता बनली आहे. सोलापुरचे स्वातंत्र्यवीर मल्लप्पा धनशेट्टी यांना फासावर चढविण्यात आले. त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती. मल्लप्पा धनशेट्टी यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी त्यांच्या पत्नींस पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे नाव शंकरअप्पा धनशेट्टी. हा स्थानिक संदर्भही कुंजविहारींच्या कवितेला आहे.
कुंजविहारींनी भारतीय सनातन तत्त्वज्ञानातील पुनर्जन्माची संकल्पना अतिशय उत्कटपणे कवितेत आणली आहे. आत्ता जरी मला हे सरकार फासावर चढवत असले तरी तूझ्या उदरी मी परत नऊ महिन्यांनी जन्म घेईन. मूळ कविता 13 कडव्यांची आहे. (कुंजविहारींची स्वाक्षरी असलेली त्यांच्या पुस्तकाची प्रत मला औरंगाबादच्या जीवन विकास ग्रंथालयात सापडली. त्याचे छायाचित्र सोबत जोडले आहे. हे पुस्तक त्यांनी 1962 मध्ये तेंव्हाच्या शिक्षणाधिकारी शकुंतलाबाई वाघमारे यांना सप्रेम भेट दिलेले आहे.)
भारतीयांची ही जी मानसिकता आहे हीच त्यांनी मोठी ताकद आहे. अगदी आत्ता जून महिन्यात गलवान खोर्यात चिनी सैनिकांसोबत हातापायी होवून 20 सैनिक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या सोबतच्या इतर सैनिकांना जेंव्हा पत्रकारांनी विचारले तेंव्हा त्यांनी ‘आम्हाला परत आघाडीवर पाठवा’ अशीच भावना व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही आपली भारतीय मानसिकता समजून घेण्याची गरज आहे.
देशासाठी शहिद होणार्या कित्येकांची तर नोंदही नाही. कुसुमाग्रजांनी ‘अनामवीरा’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे
अनामवीरा जिथे जाहला तुझा जिवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात
जरी न गातील भाट डफावर तूझे यशोगान
सफल जाहले तूझेच हे रे तूझेच बलिदान
भारतीयांच्या मनांमनांत शहिदांसाठी अतिशय सन्मानाची आदराची भावना नेहमीच राहिली आहे. कुंजविहारींनी हेच ओळखून या कवितेची रचना केली. कवितेचा आशय अतिशय सोपा सरळ आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी भक्कम अध्यात्मिक अशी पार्श्वभूमी आहे. संत साहित्यातून, शिवाजी सारख्या महान राज्यकर्त्यांपासून एक प्रेरणा सतत आपल्याला मिळत आली आहे. तुरूंगात असतांना कुंजविहारी यांच्यावर संत साहित्याचा परिणाम झाल्याची नोंद त्यांच्यावर लिहीताना वा.शि. आपटे यांनी करून ठेवली आहे.
याच कुंजविहारींनी शिवरायांची आरती लिहीताना स्वातंत्र्यलढ्याला इतिहासाशी जोडत आपली प्रेरणा स्पष्ट केली आहे,
जेव्हा जगी धर्मध्वज होतो पदभ्रष्ट
जेव्हां मांडिती तांडव अरिदानव दुष्ट
जेंव्हा साधूसज्जन सहतिल अति कष्ट
शिवसंभव तव होइल भगवद्वच स्पष्ट ॥
राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये जागृत करण्यासाठी महाभारतातील युद्ध, परकियांची आक्रमणे यांचा धागा इंग्रजांविरूद्धच्या लाढ्याशी र्जोडणारी कविता त्या काळात लिहीली गेली.
आजही स्वातंत्र्यलढ्यातील कवितां का लोकप्रिय आहेत? ही गाणी आजही परत त्याच उत्साहात का गायली जातात? त्याचे कारण म्हणजे भारतीयांच्या मनात या भूमीबद्दल एक विलक्षण अशी आत्मियता आहे. हा केवळ जमिनीचा तुकडा नसून आमच्या कणाकणांत हे भारतीयत्व समावलेले आहे. आजही विपरीत सामाजिक परिस्थिती उद्भवते, दंगे होतात, दंग्यांत बळी पडलेला मुलगा 100 वर्षांपूर्वी जसे आईला म्हणत होता, ‘भेटेन नऊ महिन्यांनी’ तोच आजच्या आईला म्हणतो
आई दाराबाहेर पाऊल ठेवताना
कधी येशील? विचारू नको
वापस यायची निश्चित वेळ व खात्री द्यावी
इतकं हे शहर साधं सरळ उरलेलं नाही
इंग्रजांविरूद्ध लढलेल्या
भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे भाग्य
आमच्या वाट्याला येणार नाही
आपल्याच लोकांनी पाठीमागुन केलेल्या वारांनी
ते बाटल्या शिवाय राहणार नाही
भागतसिंग सुखदेव राजगुरू
तर आम्ही ठरणार नाहीतच
पण तूझं काळीज मात्र
भगतसिंगाच्या आईचे असू दे.
कुंजविहारी यांनी भारतीय मानसिकता ओळखून काळावर मात करणारी कविता लिहीली. आजचाही कवी हीच भावना आपल्या शब्दांत मांडतो तेंव्हा या कविची प्रतिभा लक्षात येते.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575