(विमलाबाई बीडकर- शांताबाई मानवतकर)
उरूस, 2 ऑगस्ट 2020
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभर ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा होतो. मला माझ्या नकळत अनुभवाला आलेली एक मैत्री फार आगळी वेगळी होती. माझी आजी आईची आई विमलाबाई तुकारामपंत बीडकर ही मोठी धीराची चळवळी सामाजिक कार्यात सदा पुढे असलेली कुटूंबात सर्वांना आधार वाटणारी अशी व्यक्ती होती. माझं हे आजोळचे घर परभणीच्या वडगल्लीत होते (आजही आहे. पण तिथे कुणी आता रहात नाही). वडाचा एक प्रचंड मोठा वृक्ष इथे आहे. त्यावरूनच या भागाला ‘वडगल्ली’ असे नाव पडले. या महावृक्षाची प्रचंड मोठी सावलीही खाली पसरलेली असायची. अशीच मायेची सावली इथल्या माणसांची मला लहानपणापासून अनुभवाला मिळाली. या झाडाला पंचमीला मोठा झोका टांगून उंच उंच झोके घेण्याची स्पर्धा चालायची. इतका उंच झोका आजतागायत माझ्या पाहण्यात आला नाही. त्या झोक्याची उंची पाहूनच लहानग्या पोरांचा उर दडपायचा.
या वडाच्या सावलीत जबरेश्वर महादेवाचे मंदिर आहे. परिसरांत सापडलेली अतिशय देखणी अशी दगडी मुर्ती अजूनही मंदिरात काचेमध्ये ठेवलेली आहे. वडाच्या आणि जबरेश्वराच्या सावलीतून पुढे सरकले की रस्ता अरूंद होतो आणि त्या बोळीत जरा पुढे गेल्यावर माझ्या आजोळच्या घराची दगडी भिंत लागते. उंच जोत्यावर घराचा दगडी चौकटीत बंदिस्त लाकडी दरवाजा आहे. आत शिरलं की उजव्या बाजूला स्वयंपाकघर. पहाटे स्तोत्रासारखा आजीचा आवाज या स्वयंपाकघरातून कानावर पडायचा.
जेवून खावून पहाटेची कामं आटोपून जराशी दुपार होत असताना आजी मला हाताशी धरून शेजारच्याच गल्लीत म्हणजे सुभाष रोडला असलेल्या दुसर्या आजीच्या घरी घेवून जायची. ही आजी म्हणजे शांताबाई शंकरराव मानवतकर. तिला आम्ही ‘मानवतकर माई’ असं म्हणायचो. आमच्या आजीला ‘माई’ म्हणायचो. त्यांच्या घरात आमच्या आजीला ‘बीडकर माई’ म्हणायचे.
आजीच्या काळ्या दगडी भिंतीच्या पार्श्वभूमीवर या दुसर्या आजीच्या घराची दर्शनी भिंत पांढर्या चुन्यानं रंगवलेली होती. या पांढर्या भिंतीत हिरव्या रंगाचा दरवाजा होता. हा घराच्या वापराचा लहान दरवाजा. याच दरवाज्याला लागून जराशा अंतरावर ओटा आणि एक मोठा दरवाजा होता. हा मोठा दरवाजा आजोबांच्या (ऍड. शंकरराव मानवतकर) कार्यालयाचा होता. ते मोठे नामंकित वकिल होते. त्यांना सगळे बाबा म्हणायचे. त्या खोलीच्या वाट्याला आम्ही कधी जायचो नाही.
छोट्या दरवाज्यातून आत गेलो की बसक्या इमारतीच्या समोर मोकळे अंगण होते. यात विविध झाडे लावलेली होती. ही बसकी इमारत मला विलक्षण जवळची वाटायची. एखादी उंच जोत्यावरची टोलेजंग इमारत आपली छाती दडपून टाकते. या बसक्या इमारतीत समोर ओसरी होती. तिला लागून डाव्या बाजूला स्वयंपाकघराची आडवी खोली होती.ओसरी मागे एक परत अंगण होते. अशी एक मोकळी ढोकळी रचना या घराची होती.
आजीच्या हाताला धरून मी या दुसर्या आजीच्या घरात जायचो तेंव्हा माझ्याशी खेळायला माझ्या वयाचे तिथे कुणी नव्हते. सगळ्यात लहान मामा (डॉ. रविंद्र मानवतकर) हाही माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांनी मोठा. याचा एक वेगळाच फायदा म्हणजे सगळेच माझे विविध पद्धतीने लाड करायचे.
या घरात सर्वत्र स्वच्छंद बागडणे हाच माझा आडीचा कार्यक्रम. अगदी क्वचित का होईना आजोबांच्या कार्यालयातील खोलीत गेलो की तेथील उंच उंच कपाटात बंदिस्त मोठ मोठी पुस्तके नजरेला पडायची. एरव्ही कुणाला त्याचा धाक वाटत असेल पण मला ते दृष्य ओळखीचे होते. कारण माझे वडिल वकिल असल्या कारणाने असली पुस्तकांची टोलेजंग कपाटे माझ्या दृश्य परिचयाची होती. मोठ्या भिंगाचा चष्मा घातलेले करारी उग्र वाटणारे मानवतकर बाबा मला मात्र तसे कधी वाटले नाहीत. कदाचित नातवंडांना आजोबाचा एक वेगळा पैलू वाट्याला येत असल्यामुळे असेल.
मानवतकर माई हे एक अतिशय वेगळे रसायन. घरातले सणवार करताना सोवळे ओवळे पाळताना मी तिला पहात आलो तसेच सामाजिक पातळीवर निवडणुक लढवताना महिला मंडळात काम करत असतानाही पहात आलो. गंमत म्हणजे माझी आजी कॉंग्रेसमध्ये तर मानवतकर माई सामजवादी पक्षात होत्या. (माझे सख्खे मोठे काका कॉंग्रेसमध्ये तर वडिल मानवतकर बाबांसोबत डाव्या पक्षांत). विरोधी पक्षात असूनही त्यांच्या दाट मैत्रीवर त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. त्यावर स्वतंत्रपणे लिहावे लागेल. माईं तशा सरळ आमच्या नात्यात नव्हत्या. पण त्या काळात घराची आख्ख्या घराशीच मैत्री असायची. माईंची सर्व मुले मुली आमच्यासाठी मावशी मामाच असायचे. पुढे सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना या बायकांनी त्या काळात किती मोठी कामगिरी पार पाडली ते मला तीव्रतेनं जाणवलं. त्यांनी घरेच्या घरे जोडली होती. आणि यासाठी आपण सामाजिक काम करत आहोत असा कुठलाही आव आणला नाही. दहा पंधरा वर्षे नगरसेविका राहिलेली माझी आज्जी आणि मानवतकर माई या रूढ अर्थाने राजकारणी कधीच नव्हत्या. आपल्या घरसंसारा सोबतच त्यांनी समाजाचा संसार सांभाळला. मी मोठा नातू असल्याने या आज्ज्या त्यांच्या कर्तबगारीच्या वयात आम्हाला पहायला मिळाल्या.
माईंचा आवाज अतिशय गोड होता. त्याकाळची भावगीतं त्या म्हणायच्या त्याचा एक सुरेल संस्कार माझ्यावर नकळत झाला. माझ्या आजीला गाण्याची विशेष अशी काही गोडी नव्हती. ती कधी गाताना मी ऐकलंही नाही. पण मानवतकर माईंकडे गेल्यावर मात्र ती माईंना काहीतरी गाण्याचा आग्रह करायची. मानवतकर माईंही सहजपणे ‘बोला अमृत बोला’, ‘राधे तूझा सैल अंबाडा’, ‘कबीराचे विणतो शेले’ अशा काही रचना गायच्या. माणिक वर्मा, माणिक भिडे, ज्योत्स्ना भो़ळे अशा तेंव्हाच्या लोकप्रिय गायीकांची ती गाणी असायची.
‘फ्रेंडशीप डे’ साजरा होत असताना माझ्या अचानक लक्षात आले की आपल्या आजीची ही तेंव्हाची मैत्रिणच होती. आणि आपण जे काही अनुभवले तो मैत्रीचाच अविष्कार होता. माझी आजी आणि मानवतकर माई यांच्या या गोड नात्यावर मला कविता सुचली. ती कविता म्हणजेच ‘मैत्र’. ही कविता लिहीली तेंव्हा त्या दोघीही हयात होत्या. त्यांना वाचून दाखली तेंव्हा दोघीही गालातल्या गालात मस्त हसल्या. माझ्या कवितेला मिळालेले हे सगळ्यात मोठे पारितोषक.
आज जागतिक मैत्र दिना निमित्त सर्व रसिकांना ही कविता सादर..
मैत्र
कामानं उतू जाणारी पहाट
चुलीवरून उतरवून
रेंगाळणारी वामकुक्षी
चटकन उरकून
एखाद्या रित्या दुपारी
आजी निघायची
मला हाताशी घेऊन
दुसर्या आजीच्या घरी
दार उघडल्यावर
डोळ्यांच्या कोपर्यातून
ती मऊ हसायची
अंगणासकट सगळं घरच
उबदार दुलई भासायची
माजघरात चटईवर
काळीज उसवत
दोघीही विसावायच्या सैल
माझ्यासाठी वाटीत खाऊ
संक्रांतीची बोळकी, पोळ्याचे बैल
अंगणात फुलपाखरामागे धावताना
हळूच मागे भिरभिरत यायचे
माजघरातून तिच्या गाण्याचे सूर
ओंजळभर गाण्याचा
पुरता बुडून जावा मी
इतका दाटून यायचा पूर
काहीच न सुचून
मी तोडू लागायचो
गाणं एैकत फुलू पाहणार्या
काटेकोरांटीच्या टपोर कळ्या
ती ओवून घ्यायची दोर्यात सगळ्या
आजीच्या अंबाड्यावर माळून द्यायची गजरा
परतताना
आजीच्या फुललेल्या चेहर्याकडे बघून
मी विचारायचो न राहवून
‘ती ग तूझी कोण?’
आजी म्हणायची ‘मैत्रिण !’
माझ्या चिमुकल्या मेंदूत
आता उलगडतंय सूत्र
कुणासाठी अबोल फुलणं म्हणजे मैत्र.
0
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575