काव्यतरंग, शुक्रवार 17 जूलै 2020 दै. दिव्यमराठी
सुनील नभ हे, सुंदर नभ हे,
नभ हे अतल अहा
सुनील सागर सुंदर सागर
सागर अतलचि हा
नक्षत्राही तारांकित हे
नभ चमचम हासे
प्रतिबिंबाही तसा सागरहि
तारांकित भासे
नुमजे लागे कुठे नभ कुठे
जलसीमा होई
नभात जल ते जलात नभ ते
संगमुनी जाई
खरा कोणता सागर यातुनि
वरती की खाली?
खरे तसे आकाश कोणते
गुंग मती ंझाली
-वि.दा.सावरकर (समग्र ़सावरकर वाङ्मय- खंड 8 काव्य, प्रकाशक स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशन)
या कवितेच्या खाली सावरकरांचे नाव टाकले नसते तर ही कविता बालकविंची म्हणून सहज खपून गेली असती. इतकी तरल इतकी निसर्गप्रेमी इतकी सुंदर ही कल्पना सावरकरांनी मांडलेली आहे. (सावरकर आणि बालकवी यांचा जन्मही सोबतचाच आहे.)
‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या कवितेचे गाणे बनले आणि त्याला अफाट लोकप्रियता लाभली. त्या कवितेत जी भावना आहे ती मातृभूमीविषयी वाटणारी तळमळ व्यक्त करणारी आहे. दूर गेल्यावर सगळ्याचीच किंमत कळते असं म्हणतात.
पण ही कविता मात्र त्यापासून जरा वेगळी आहे. 90 ओळींची ही दीर्घ मोठी कविता आहे. त्यातील सुरवातीचा हा तुकडा आहे. 1906 असे वर्ष या कवितेखाली लिहीलेले आहे. बोटीवरून जात असताना जे अफाट आभाळ आणि समुद्र असे निसर्गसौंदर्य सावरकरांना अनुभवायास मिळाले त्यातून ही कविता त्यांना स्फुरली.
या कवितेत कसला संदेश कविला द्यायचा नाही, कसली विशिष्ट भूमिका नाही, विशुद्ध अशी भावना या कवितेत सावरकरांनी मांडून आपल्यातील उच्च प्रतिभेचा पुरावा दिला आहे.
‘सुनील नभ’ असं म्हणत असताना त्या निळ्या रंगाचे एक वेगळेपण सांगितलं आहे. बोरकरांनी आपल्या निळ्या रंगाच्या कवितेत निळ्याच्या विविध छटा सांगितल्या आहेत
आभाळाच्या घुमटाचा एक गोलसर निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आता निळा हा रंग आहे मग तो गोल चौकोनी त्रिकोणी कसा असू शकेल? पण त्या निळ्याचे वेगळेपण सांगण्यासाठी हा शब्द येतो. तसेच सावरकर याला नुसता निळा न म्हणता ‘सुनील’ म्हणतात.
निळ्या रंगाचे वैशिष्ट्य सांगताना ‘असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे, त्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे’ असंही बोरकर सांगून जातात. या निळ्या रंगाच्या अफाटपणामुळेच कदाचित या रंगाला देवाचा रंग समजला जातो.
नभात जल आणि जलात नभ संगमुनी जाते हे सांगताना समुद्राच्या प्रवासातील एक सुंदर असे दृश्य सावरकर वाचणार्यांच्या डोळ्यात ठसवतात. किनार्यापासून खुप आत मध्ये गेल्यावर अथांग पाणी आणि अपार नभ यांच्या निळाईशिवाय डोळ्यासमोर काहीच नसते. ही एक अतिशय सुंदर अशी अनुभूती आहे.
‘कोलंबसचे गर्वगीत’ नावाची एक कुसुमाग्रजांची कविता आहे. त्यात खलाश्यांचे शौर्याचे वर्णन आहे, त्यांना प्रोत्साहन देणार्या कोलंबसचे वीर रसात भिजलेले शब्द आहेत, धीर देणारे शब्द आहेत. पण त्याच कवितेत एक ओळ मात्र अशी काही येवून जाते
सहकार्यांनो, का ही खंती जन्म खलाशांचा
झुंझण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरि असीम नीलामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम
आपल्या शुर सहकार्यांना कोलंबस इतर सर्वकाही सांगत असताना नक्षत्रापरि असीम नीळ्या रंगात आपला संचार आहे अशी ओळ कुसुमाग्रज लिहून जातात.
ना.धो. महानोर यांच्या वही कविता संग्रहात समुद्राबाबत अशाच सुंदर ओळी आलेल्या आहेत.
गडद निळे आकाश उतरते गदड समुद्री निळ्या
क्षितीज कोठले वाटा कुठल्या दिशात रातांधळ्या
जशी भूलावण व्हावी अवघे लीन असावे जिणे
शब्दांमधले अर्थांमधले एकसंध चांदणे
सावरकरांच्या याच कवितेच्या पुढील तुकड्यांत खुप सुंदर कल्पना आल्या आहेत. हे तारे म्हणजे काय आहे, ‘थवे काजव्यांचे की नंदनवनिच्या चकचकले, तयांसि तारे म्हणूनि ज्यांतिषी भले भले चकले!’ किंवा अजून एक सुंदर कल्पना म्हणजे गौरीच्या गळ्यातील मोत्याचा हार हिसका बसून तुटला, ‘त्या हारातील मोती सैरा वैरा ओघळले, तयांसि तारे म्हणूनि ज्योतिषी भले भले चकले’ अशा काही कल्पना कवितेत पुढे आल्या आहेत.
सावरकरांचा अभ्यास करताना त्यांच्या कवितेचा विचार केला जात नाही ही खरी शोकांतिका आहे.
स्वत: सावरकरांनी पण जी भूमिका नंतर घेतली ‘लेखणी सोडून बंदूका हाती घ्या’ ही त्यांच्या विशुद्ध साहित्याला मारक ठरली. त्यांना समजून घेताना त्यांच्याच भूमिकेची अडचण येते हे पण लक्षात घेतले पाहिजे.
आपल्याकडे राजकीय नेत्यांच्या कलेविषयक भूमिकांना समजूनच घेतले जात नाही. ज्यांची जन्मशताब्दि चालू आहे ते माजी पंतप्रधान पी.व्हि. नरसिंहराव हे साहित्याचे चांगले रसिक अभ्यासक लेखक होते, समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचा शेक्सपिअरच्या नाटकांचा गाढा अभ्यास होता, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी भारतीय संस्कृतीवर अतिशय सुंदर लिहून ठेवले आहे.
बाबासाहेब आंबेडकर डफ चांगला वाजवायचे असा उल्लेख त्यांच्या चरित्रात सापडतो. महात्मा गांधींची भाषा खादीच्या सुतासारखीच सरळ सोपी सुंदर होती. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी आत्मचरित्रपर जे लिखाण केले, काही व्यक्तिरेखा लिहील्या त्या ‘अंगारमळा’ पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार लाभला आहे. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र मराठीतील उत्कृष्ट वाङ्मयीन नमुना आहे.
अशी बरीच उदाहरणे सांगता येतील. सावरकरांच्या या कवितेत एका राजकीय नेत्याच्या आतील खर्या प्रतिभावंत लेखकाचे दर्शन होते.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575