Tuesday, July 14, 2020

पिंजर्‍यातील वाघाचा स्वतंत्र बाणा !


उरूस, 14 जूलै 2020 

झुंझार पत्रकार अनंत भालेराव यांनी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांच्यावर एक फर्मास अग्रलेख लिहीला होता. त्याचे शिर्षक होते, ‘घोड्यांचा खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा अडवणार कसा?’. दिल्ली श्रेष्ठींच्या समोर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते कसे लाचार होतात यावर हा टोला होता.

आताच्या काळात भाउ तोरसेकर वगळता महाराष्ट्रातील पत्रकार असं काही लिहीत नाहीत. सत्ताधार्‍यांवर टीका करणं म्हणजे कर्णकर्कश्शपणा वाटून ते सत्ताधार्‍यांची स्तूतीच करत चालले आहेत. ही स्तूती जरूर करावी पण ती किमान वस्तुनिष्ठ तरी असावी. आपल्या समतोल लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक लेख लिहीला, ‘उद्धव अन कळसुत्री बाहुले? मुळीच नाही’ (त्यांच्या ब्लॉगवर आणि अक्षरनामा या पोर्टलवर हा लेख उपलब्ध आहे). त्यांचा हा लेख वाचून माझ्यासारख्या त्यांच्या नियमित वाचकाला धक्काच बसला.

बर्दापुरकरांच्या अक्षरांवरची शाई वाळलीही नव्हती की तितक्यात बातमी आली 10 पैकी 9 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या रद्द झाल्या होत्या त्या परत करण्यात आल्या आहेत. यातील 6 जणांची तर आधी केली होती त्याच जागी बदली करण्यात आली आहे. शिवाय हा लेख लिहीला त्याच्या दुसर्‍याच दिवशी अजीतदादा पवार यांनी पुण्यातील पाच उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.

मग आता ह्या बदल्या-रद्द बदल्या- परत बदल्या नेमक्या कसला पुरावा आहेत? उद्धव ठाकरे यांची प्रशासनावर पकड असल्याचे हे लक्षण आहे का?

कोरोनाला भिउन उद्धव ठाकरे मातोश्रीवर दडी मारून बसले आहेत. मुख्यमंत्र्याचे सरकारी निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला त्यांनी निवासासाठी स्विकारलाच नाही. शिवाय ते मंत्रालयातही जात नाहीत. परिणामी ‘मातोश्री’ हेच मंत्रालय होवून बसले आहे. मग स्वाभाविकच शरद पवारांना तिथेच चकरा माराव्या लागतात. शरद पवारांना मातोश्रीवर जावे लागते यातून उद्धव ठाकरे यांचे मोठेपण बर्दापुरकर सुचवतात. मग त्यांनी याचे उत्तर द्यावे की सरकार स्थापन करताना किंवा त्यानंतर कोरोना भितीने मातोश्रीच्या गुहेत दडी मारून बसेपर्यंत उद्धव ठाकरे यांनाच का बरे शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ वर चकरा माराव्या लागत होत्या? सत्तेत अर्धा वाटा मिळण्यासाठी ठाम असलेले आता सत्तेच्या चतकोर तुकड्यावर संतुष्ट होतात हा काय प्रकार आहे?

त्या काळात एकदाही शरद पवार मातोश्रीवर फिरकले नाहीत. अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत अर्धावाटा द्यावा, शिवाय मातोश्रीवर चकरा माराव्यात अशा अटी घालणारे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओकचे उंबरठे झिजवत राहिले हे कोणत्या स्वाभिमानाचे लक्षण होते?

उद्धव ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत ज्यांच्या खासगी सचिवाचे नाव उभ्या महाराष्ट्राला ठळकपणे माहित आहे. चहापेक्षा किटली गरम असे जे वर्णन नितिन गडकरी यांनी केलेले आहे ते सगळ्यात जास्त मिलिंद नार्वेकर यांनाच लागू पडते. सामनाचे संपादकपद रश्मी ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर बहाल केले. तसेही ठाकरेंचे निर्णय ‘आतल्या स्वारी’च्या प्रभावाने होतात हे उघड गुपित आहे. युवराज आदित्य यांचे हट्ट उद्धवजींना काय काय करायला लावतात हे पण सर्वांना माहित आहेच. या शिवाय निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांना ठाकरेंनी आपला प्रशासकीय सचिव म्हणून नेमले. म्हणजेच आधीच या चौकडीत उद्धवजी बंदिस्त आहेत. ही चार बोटे कमी पडली म्हणून की काय काकांचा ‘अंगठा’ पण यांना लागतोच. अशा पाच बोटांवर नाचणारे हे नेतृत्व नेमके कुठल्या अंगाने ‘कळसुत्री बाहुले नाही’ असे बर्दापुरकरांना वाटते? खरं तर मला अशीही शंका येते आहे की बर्दापुरकर हे उपहासाने तर लिहीत नाहीत ना?

उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत ही देवेंद्र फडणवीस यांचीच तक्रार असली असती तर त्याकडे राजकारण म्हणून दुर्लक्ष करता येईल. पण त्यांचेच मंत्रीमंडळातील सहकारी ही तक्रार करतात, प्रत्यक्ष शिवसैनिकच तक्रार करतात याचे काय करायचे? कोरोना काळात शिवसैनिकांचेच मृत्यू होत आहेत अगदी शिवसेनेचा गढ असलेल्या मुंबईत आणि त्यांच्या घरच्यांना एक दिवसा नंतर कळवले जाते हा नेमका कशाचा पुरावा आहे?

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाचा धोका असतानाही संपूर्ण महाराष्ट्रात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आवश्यक त्या सुचना करत आहेत. आणि या काळात कळसुत्री बाहुले नसलेले स्वतंत्र बाण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय करत आहेत? मातोश्रीवर बसून कोमट पाणी पीत आहेत. डिझास्टर टूरिझम (आपत्ती पर्यटन) म्हणून युवराज आदित्य ठाकरे हे देवेंेद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना उडवून लावू शकतील. कारण ‘नया है वह’. पण उद्धव ठाकरे पण असंच समजत आहेत का?

कोरोना संकटाच्या काळातील मुंबईत प्रवासी मजदुरांच्या रेल्वे प्रवासावरून उडालेला प्रचंड गोंधळ, पालघर येथील पोलिसांच्या उपस्थितीत दोन साधुंचा जमावाने घेतलेला बळी, वाधवान प्रश्‍नी सरकारची झालेली प्रचंड नामुष्की, अर्णब गोस्वामी प्रकरणांत दाखल करण्यात आलेले खोटे एफआयआर आणि त्यावर न्यायालयाने निकालात मारलेली थप्पड, मुुंबईमध्ये कोरोना बाधितांच्या हाताळणी मृतदेहांची झालेली हेळसांड या सर्व नजिकच्या काळात घडलेल्या घटना आहेत. या सगळ्यांतून उद्धव ठाकरे यांची नेमकी कुठली प्रशासनिक पकड दिसून येते?

आपल्या लेखात बर्दापुकर असं लिहीतात, ‘...इतकी अवहेलना आणि अनेकदा तर अपमानास्पद भाषा वाट्याला आलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणातले एकमेव नेते आहेत.’ हा लेख वाचणार्‍या कुणाही वाचकाने गेल्या पाच वर्षांतली समाज माध्यमांवरची भाषा बघितली तर देवेंद्र फडणवीस यांना जातीवरून, पत्नीवरून आणि देहावरून  ज्या घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल केल्या गेले तेवढे कुणालाच केल्या गेले नाही हे सहज लक्षात येते. अगदी हेलीकॉप्टरच्या अपघातात ते बचावले तर ‘टरबुज्या मेला का नाही’ असेही बोलल्या गेले. मग हे ढळढळीत समोर असताना बर्दापुरकरांना खोटे का लिहावे वाटते?

उद्धव ठाकरे यांचे जे काही गुण असतील त्यावर जरूर लिहावे पण नसलेल्या गोष्टी त्यांना चिटकवून काय होणार आहे? उद्धव ठाकरेंनी शिवसेना ग्रामीण भागात पोचवली असं एक विधान बर्दापुरकर करतात हे एकवेळ ठीक. पण त्यापुढे जावून ‘... या काळात शेतकर्‍यांचे प्रश्‍न राजकीय पटलावर विविध मार्गांनी उचलून धरणारा शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष महाराष्ट्रात दिसत होता.’ असं लिहीलं आहे. फार खोलात न जाता मी केवळ एकच विचारू इच्छितो, उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या कुठल्याही प्रमुख नेत्याने शेतकर्‍यांची ‘कर्जमुक्ती’ आणि ‘कर्जमाफी’ या दोन शब्दांतला फरक समजावून सांगावा. खरीप आणि रब्बीच्या पाच पाच पिकांची नावे सांगून त्यांच्यासाठी काय धोरण असावे हे किमान शब्दांत अगदी ढोंबळपणे मांडून दाखवावे. साखर उद्योग, त्यावरचे नियंत्रण, उसाच्या उपपदार्थांची विक्री आणि त्याचे धोरण याबाबत अगदी ढोबळ वाटावी अशी 200 शब्दांत मांडणी करून दाखवावी.

उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचे सर्वेसर्वा आहेत त्या शिवसेनेच्या शाखा 1988 च्या दरम्यान आमच्या औरंगाबादेत (शिवसैनिकांच्या भाषेत संभाजीनगरात) सुरू झाल्या तेंव्हा न त्यांचा कुणी आमदार होता न मंत्री होता ना खासदार होता. सगळ्यात जास्त नगरसेवक निवडुन येवून त्यांचा कुणी महापौरही झाला नव्हता. पण त्यांच्या शाखा गल्लो गल्ली निघाल्या होत्या. त्यावर भगवा झेंडा आणि  डरकाळी फोडणार्‍या वाघाचे चित्र ठळकपणे असायचे. त्याची एक दहशत सर्वत्र होती.  महाविद्यालयातील विद्यार्थी गाड्यांमध्ये भरभरून जावून शिवसेनेसाठी बोगस मतदान करायचे. तेंव्हा तर धनुष्यबाण हे चिन्हही सेनेच्या उमेदवाराला मिळाले नव्हते. मोरेश्वर सावे हे मशाल चिन्हावर पहिल्यांदा खासदार बनले. पण त्या मशालीची धग प्रचंड होती.

आजचा शिवसेनेचा वाघ हा सर्कशीतला वाघ बनला आहे. तो बारामतीच्या रिंगमास्टरच्या तालावर नाचतो. आणि खेळ संपला की पिंजर्‍यात (मातोश्री) जावून बसतो. शिकार करायचे विसरून आयते कुणी आणून दिलेले मटण खातो.

बर्दापुरकर ज्या मराठवाड्यात आहेत तिथे मोहरमचे ताबुत बसवले जातात. आणि त्या मिरवणूकीत कागदी वाघ नाचवले जातात. तसा हा मोहरमचा कागदी वाघ आहे.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, July 13, 2020

कॉंग्रेसचा पोपट मेला आहे !


उरूस, 13 जूलै 2020   

राजस्थानमध्ये गंभीर राजकीय संक़टाची छाया पसरली आहे. अशोक गेहलोत सरकार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण या निमित्ताने जी चर्चा चालू आहे वाहिन्यांवर ती पाहिली की अकबराची एक गोष्ट आठवते. अकबराचा लाडका पोपट मरण पावतो. पण ते बादहशाला सांगायचे कसे? कारण बादशहा आपल्यालाच शिक्षा करेल. मग पंख कसे मिटले आहे, तोंड वासले आहे, डोळे पांढरे पडले आहेत, श्‍वास कसा बंद आहे, मान टाकली आहे असं सगळे सांगत राहतात. पण कुणी कबुल करत नाही की पोपट मेला आहे. मग वास सुटतो आणि पोपट मेल्याचे सत्य समोर येतेच.

कॉंग्रेस पक्षाची अवस्था तशीच झाली आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आता राजस्थान. एक संयुक्त आघाडी सरकार (कर्नाटक), एक बहुमत नसलेले पण अपक्षांच्या पाठिंब्यावरचे सरकार (मध्य प्रदेश) आणि आता एक पूर्ण बहुमताचे  स्थिर सरकार (राजस्थान) पत्त्याचा बंगला कोसळावा तसे कोसळत चालले आहेत. याची कुठलीच वस्तुनिष्ठ कारणमिमांसा कॉंग्रेसवाले किंवा त्यांचे हितचिंतक जमात-ए-पुरोगामी करायला तयार नाहीत ही खरी शोकांतिका आहे.

राजस्थान सरकार मधील असंतोष ही काही नविन गोष्ट नाही. सचिन पायलट प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी निवडणुक प्रचारात भरपूर मेहनत घेतली होती, त्यांना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात मात्र अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. हाच प्रकार मध्यप्रदेशातही करण्यात आला. तिथेही ज्योतिरादित्य शिंदे यांना डावलून कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्या गेले.

दिल्लीत बसलेली पक्षश्रेष्ठी नावाची संस्था मख्ख बसून राहते आपले काही ऐकत नाही ही तक्रार कित्येक वर्षांपासून सातत्याने केली गेली आहे. कंटाळून काही तरूण नेत्यांनी बाहेरचा रस्ता पकडला. राज्या राज्यांतील तरूण नेत्यांना भेटण्या बोलण्याऐवजी राहूल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्कीटं खावू घालणं पसंद करतात ही वस्तुस्थिती आहे. हा आरोप कुण्या सामान्य माणसाने किंवा राजकीय विरोधकाने केला नव्हता. तर हेमंत बिस्वशर्मा या असम मधील तरूण कॉंग्रेस नेत्यानेच केला होता. शेवटी त्याने कॉंग्रेसचा त्याग केला. परिणामी असम मधून कॉंग्रेसची सत्ता गेली. भाजपला स्वत:च्या बळावर बहुमत तिथे मिळाले. याच असम राज्यांतून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राज्यसभेवर निवडुन जायचे. त्यांचा तो रस्ताही बंद झाला. आणि हे घडलं ते केवळ माणसं सोडून कुत्र्याला महत्व देणार्‍या नेतृत्वामुळे.

टी. अंजय्या हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. राजीव गांधी तेंव्हा कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस होते. इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाची ही गोष्ट. हैदराबादच्या विमानतळावर टी. अंजय्या यांनी राजीव गांधी यांच्या चपला उचलल्या. राजीव गांधी त्यांना काहीतरी अपमानास्पद बोलले होते. ही बातमी इतकी वार्‍यासारखी पसरली आंध्रप्रदेशांत की पुढे केवळ 9 महिन्यात तेलगु अस्मितेच्या नावाखाली एन.टी.रामाराव यांनी तेलगु देसम पक्षाची स्थापना करून कॉंग्रेसचा पराभव घडवून आणला व एन.टी. रामाराव आंध्राचे मुख्यमंत्री बनले.

पण यापासून काही शिकेल ती कॉंग्रेस कुठली. पुढे चालून ज्या कॉंग्रेस नेत्याने चंद्राबाबूंच्या हातातून मेहनत करून राज्यभर फिरून सत्ता हिसकावून घेतली त्याचे नाव वाय.एस. राजशेखर रेड्डी (वायएसआर नावाने ते लोकप्रिय होते). याच रेड्डी यांचा मुलगा म्हणजे जगन मोहन रेड्डी. त्यानेही असेच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी सतत संपर्क करायचा प्रयत्न केला. रेड्डी यांच्या निधनानंतर त्याला मुख्यमंत्री करा अशी आमदारांची मागणी होती. पण सोनिया गांधी- राहूल गांधी आपल्याच मस्तीत राहिले. उलट त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. त्याला तुरूंगातही जावे लागले. अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे दरबारी राजकारणी त्यांना सतत घेरा घालून बसलेले. परिणामी जगनमोहन रेड्डीला पक्षातून बाहेर पडावे लागले. त्याने वेगळा पक्ष स्थापन केला आणि आंध्रप्रदेशांतून तेलगु देसमचा नाही तर कॉंग्रेसचा समुळ नायनाट करून दाखवला.

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचेही उदाहरण असेच आहे. जनतेचे समर्थन असणार्‍या तरूण लोकनेत्यांची उपेक्षा करणे हा कॉंग्रेसचा एक कलमी कार्यक्रम राहिला. समोर सक्षम पर्याय नव्हता तो पर्यंत सत्तेच्या लोभाने कॉंग्रसची सर्कस कशीबशी चालू राहिली. पण हळू हळू स्थानिक पातळीवर प्रादेशीक पक्षांचे पर्याय उभे राहत गेले, देश पातळीवर भाजप सारखा सक्षम पर्याय उभा राहिला आणि कॉंग्रेसचा किल्ला ढासळायला सुरवात झाली. आता तर धक्का मारायचीही गरज उरलेली नाही. एखाद्या पावसात भक्कम गढीची मातीची भिंत कोसळावी तशी अवस्था झालेली आहे.

राजस्थानमध्ये बाहेरून कुणीही हे सरकार पाडण्याचे प्रयत्न केलेले नाहीत. सचिन पायलट यांना जास्तीचे दुखावण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांच्याकडून पक्षाध्यक्षपद काढून घ्यायची हालचाल अशोक गेहलोत यांनी का सुरू केली? सरकारविरोधी कारवाया केला म्हणून आपल्याच पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यावर पक्ष अध्यक्षावर देशद्रोहाचे कलम लावावे हे नेमके काय धोरण आहे?

कॉंग्रेसचे प्रवक्ते ज्या प्रतिक्रिया देत आहेत त्याला भाउ तोरसेकर यांनी नेमके नाव दिले आहे, ‘बोलसेनारो व्हायरस बाधा’. म्हणजे असा रोग ज्यात रोगी आपल्याला रेाग आहे हेच कबुल करत नाही. आपलं सगळं ठीकच चालू आहे असंच कॉंग्रेसवाले सांगत राहतात. कॉंग्रेसचे जे हितचिंतक आहेत ते सर्व जमात-ए-पुरोगामी हे भाजपला आंधळा विरोध करत कॉंग्रेसची पाठराखण करत आहेत. त्यांना भाजप नको म्हणू कॉंग्रेस हवी आहे. पण तेही कॉंग्रेसच्या समस्येचे नेमके रोगनिदान करायला तयार नाहीत.

खरं तर कॉंग्रेसचा आणि त्यातही सोनिया-राहूल-प्रियंका या गांधी घराण्याच्या नेतृत्वाचा पोपट मेला आहे आणि हे कबुल करण्याची कुणाची हिंमत नाही. कॉंग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी आत्मचिंतनाचा आवाज उठवला की लगेच त्यांना पक्ष प्रवक्तेपदावरून हटवले. काल माजी मंत्री व राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी ट्विट करून पक्षाविषयी चिंता जाहिर केली. तबेल्यातून सर्व घोडे पळून गेल्यावर आम्ही जागे होणार का? इतक्या दाहक शब्दांत नेतृत्वावर टीका केली. पण हे ऐकणार कोण?

आता दोनच पर्याय शिल्लक राहतात. एक तर राहूल-सोनिया-प्रियंका यांना बाजूला सारून इतर कर्तबगार कॉंग्रेस नेत्यांनी (असे कुणी आहे का? हाच प्रश्‍नच आहे) पुढे यावे. यांना बाजूला सारून पक्ष हाती घ्यावा. सगळी सुरवात पहिल्यापासून करावी. तळापासून पक्षसंघटना बांधत यावे. पक्षातून बाहेर गेलेल्या सर्व प्रमुख नेत्यांना परत पक्षात आणावे. उदा. शरद पवार, जगन मोहन रेड्डी, ममता बॅनर्जी इ. लोक चळवळ असलेल्या कॉंग्रेसचे मुळ स्वरूप परत प्रकट करावे. त्याला एक  वर्ग निश्‍चितच प्रतिसाद देईल.

याच्या उलट कॉंग्रेसला पूर्णत: बाजूला सारून देशपातळीवर भाजपेतर पक्षांची एक स्वतंत्र आघाडी तयार करण्यात यावी. त्या आघाडीने प्रादेशिक पक्षांना सोबत घेताना देशपातळीवर एक पर्याय उभा करावा. यासाठी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले आणि आताही बाहेर पडू पाहणार्‍या सर्वांना सोबत घ्यावे. आत्तापासून प्रयत्न केले तर 2024 च्या निवडणुकांत एक राजकीय आव्हान उभे करता येईल.

ही चर्चा कितीही केली तरी ती कुणी कॉंग्रेसवाले मनावर घेणार नाहीत याची मला खात्री आहे. पण राजकीय क्षेत्रात काम करू पाहणारे जे कुणी नविन तरूण कार्यकर्ते असतील त्यांनी लक्षात घ्यावे की राहूल सोनिया प्रियंका यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसमध्ये काम करणे म्हणजे राजकीय आत्महत्या आहे. त्यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग अवलंबावा. अगदी स्थानिक पातळीवर स्वत:पुरता एखादा गट स्थापन करून काम केलं तरी फायदा मिळेल. पण कॉंग्रेसमध्ये जाण्याचा फायदा नाही.

राजस्थान मध्ये काही तडजोडी होवून सचिन पायलट परतले किंवा त्यांना आता कॉंग्रेसने मुख्यमंत्री बनवले तरी हा प्रश्‍न सुटणार नाही. कारण या दुखण्याचे मुळ दिल्लीत 24 अकबर रोड (कॉंग्रेसपक्षाचे मुख्यालय) इथे राहूल प्रियंका सोनिया यांच्यापाशी आहे. अंगठी जंगलात हरवली आहे. सोयीसाठी आपल्या घरच्या अंगणात कितीही शोधली तरी सापडणार नाही. 

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Thursday, July 9, 2020

या नगराला लागुनिया सुंदर ती दुसरी दुनिया !


काव्यतरंग, १० जुलै शुक्रवार २०२०,  दै. दिव्यमराठी

या बालांनो, या रे या !

या बालांनो, या रे या
लवकर भरभर सारे या
मजा करा रे ! मजा मजा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे । तोचि फसे ।
वनभूमी । दाविन मी ।
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया ॥ 1 ||

खळखळ मंजुळ गाति झरे
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुळे फळे
सुवास पसरे रसहि गळे
पर ज्यांचे । सोन्याचे ।
ते रावे । हे रावे ।
तर मग कामे टाकुनिया
नवी बघाया ही दुनिया ॥ 2 ||

पंख पाचुचे मोरांना
टिपति पाखरे मोत्यांना
पंख फडकती घोड्यांना
मौज दिसे ही थोड्यांना
चपलगती । हरिण किती ।
देखावे । देखावे ।
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया ॥ 3 ||

-भा.रा.तांबे (तांबे यांची समग्र कविता, पृ. 32, व्हिनस प्रकाशन, आ.11, 2004)

तांब्यांची ही कविता प्रसिद्ध असे बालगीत आहे. पूर्वी अभ्यासक्रमात ही कविता हमखास असायची. रॉबर्ट ब्राउनिंग याच्या ‘पाईड पायपर’ या सुप्रसिद्ध कवितेचे हे भाषांतर आहे.

एक दोन नव्हे तर तब्बल 110 कडव्यांची ही कविता आहे. तांबे हे मध्य प्रदेशातील धार संस्थानचे युवराज खासेराव पवार यांचे शिक्षक म्हणून नेमले गेले होते. त्यांना शिकवत असताना ही कविता 1895 साली त्यांनी लिहीली. या कवितेतील 91,92,93 क्रमांकाची कडवी म्हणजे ही कविता. 

स्वातंत्र्यपूर्व कालातील अगदी पहिल्या पिढीचे केशवसुतांचे समकालीन कवी म्हणजे भा.रा.तांबे. तांबे ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी होते. (जन्म 27 नोव्हेंबर 1874, मृत्यू 7 डिसेंबर 1941)

ही कविता बालगीत म्हणून प्रसिद्ध असली तरी बारकाईने वाचल्यास लक्षात येते की ही केवळ बालकविता नाही. लहान मुलांना अदभूताचे वेड असते. कल्पनेच्या जगात रमायला मुलांना आवडते. तसेच कलेची निसर्गाची आवड मुलांना मुलत: असतेच. आपण पुढे ‘कथित’ संस्कार करून ही आवड घालवतो.

नगरात उंदीर फार झाले. त्यावर काही उपाय सुचत नाही. तेंव्हा आपल्या बासरीच्या/पुंगीच्या नादाने उंदरांना पळवणारा एक जादूगर आहे. त्याला बोलावले तर हे उंदीर तो आपल्यामागे घेवून जाईल असे समजते. तेंव्हा गाव प्रमुख त्या जादूगाराला बोलावून आणतात. तो पुंगी वाजवून सगळे उंदीर आपल्या मागोमाग घेवून जातो. नदीच्या काठावर जो जातो आणि त्याच्या इशार्‍यावर सर्व उंदीर नदीत उडी मारतात. मग हा जादूगार आपली बिदागी गावाला मागतो. त्याने मागितलेली रक्कम देण्यास गाव कां कू करते. उंदीर तर मेले आता कशाला याला पैसे द्यायचे. हे समजल्यावर तो जादूगर रागाने निघून जातो पण जाताना आपल्या पुंगीच्या नादात गावातील सगळ्या मुलांना मोहित करून घेवून जातो. अशी ही कथा आहे. 

ताब्यांनी ही कविता मराठीत आणताना महेश्वर हे अहिल्याबाईंचे राजधानीचे किल्ला मंदिरे नदीवरील घाट असलेले सुंदर शहर, खळखळा वाहणारी नर्मदा नदी असे सगळे संदर्भ घेतले आहेत. या कवितेतील हा छोटासा तुकडा आहे.

ही कविता मोठ्यांसाठी पण आहे. किंबहुना ही मोठ्यांसाठीच आहे. आज आपण लहान मुलांना शिक्षण म्हणजे चार भिंतीत कोंडून ठेवतो. तसं न करता त्यांना निसर्गाच्या जवळ नेल्यास खुप शिकवता येते. म्हणूनच पहिल्या कडव्यात शब्द येतात, ‘स्वस्थ बसे । तोची फसे। वनभुमी । दाविन मी।’. व्यंकटेश माडगुळकर यांची ‘शाळा’ नावाची फार अप्रतिम अशी कथा आहे. मुले शाळेला जाण्यासाठी निघतात आणि दप्तरं नदीकाठी झाडाखाली झुडपात वाळूत पुरून ठेवतात. दिवसभर रानात हिंडतात. हवं ते खातात. नदीत डुंबतात. निसर्गाच्या बिनभींतीच्या शाळेतच खुप काही शिकतात. भिंतीच्या शाळेत जातच नाहीत. संध्याकाळी दिवस मावळताना दप्तरं शोधून परत घराकडे फिरतात अशी ही गोष्ट आहे. 

दुसर्‍या कडव्यात तांब्यांनी निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. मंजूळ गाणारे झरे आहेत, पाखरे गोड आवाजात किलबिल करत आहेत, फुले फुलली आहेत, फळं रसाळ पिकली आहेत, या सगळ्याचा एक सुवास सर्वत्र भरून राहिला आहे. फळं इतकी पिकली आहेत की त्यांतून रस गळत आहे. आणि हे सगळं का आहे तर तिथे माणसाने कसलाही हस्तक्षेप केला नाही. सध्याच्या कोरोनाच्या काळात वाहने कमी झाली, त्यामुळे प्रदुषण कमी झाले, हवा शुद्ध झाली पाखरांचे आवाज घराघरांत ऐकू येवू लागले आहेत.  

तिसर्‍या कडव्यांत मुलांना आवडणार्‍या अदभूत रसात भिजलेले वर्णन आहे. मोरांना पाचुंचे पंख आहेत, पाखरे दाणे नाही तर मोती टिपत आहेत, घोडे पंख लावून उडत आहेत. 

मोर नेहमी मानवी वस्तीजवळ राहतो. अजिंठ्याच्या डोंगरात वाडीच्या किल्ल्याजवळ एका झोपडीच्या अंगणात अगदी पोज देवून नाचणारा मोर आम्ही बधितला होता. अगदी जवळ जावून त्याचे फोटो काढता आले. त्या झोपडीत राहणार्‍याला विचारले तेंव्हा कळले की कोंबडीच्या अंड्यासोबतच हे मोराचे अंडे उबवल्या गेले. कोंबडीच्या पिल्लांसोबतच हे मोराचे पिल्लू वाढले. तेंव्हा आता ते इतर कोंबड्यांसारखेच त्या मालकाच्या झोपडीच्या जवळपास खेळत असते. मोर पाळायची हीच पद्धत आहे. मोराचे अंडे कोंबडीच्या अंड्यांसोबत उबवले जाते. माणसाने निसर्गाच्या जवळ जायला शिकले पाहिजे.  

तांबे या नगराला लागूनिया सुंदर ती दुसरी दुनिया म्हणतात त्याचा अर्थ इतकाच की आपल्या या व्यवहारी जीवनाला लागूनच आनंदाचा ठेवा असणारे एक जग आहे. त्यासाठी आपण आपली सर्व व्यवधाने विसरून तिथे गेले पाहिजे. ‘तर मग कामे टाकूनिया’ हे म्हणण्या मागे हाच अर्थ दडला आहे. 

निसर्ग, कला यांचे जग आपल्या व्यवहारी जगाला खेटूनच असते. पण आपण तिथपर्यंत पोचत नाही. एक अदृश्य अशी भिंत आपण उभी केलेली आहे. या व्यवहारी तटबंदीत बाहेरून कुणी येवू शकत नाही अशी तजवीज आपण करतो पण सोबतच आपणही बाहेर पडत नाही. परिणामी आनंदाच्या एका मोठ्या ठेवल्याला आपण मुकतो. 

राजशेखर रेड्डी याचा एक फार सुंदर शेर आहे.

मेरे दिल के किसी कोने मे एक मासुम सा बच्चा
बडों की देखकर दुनिया बडा होने से डरता है ।

आणि इथे तर तांबे या आपल्या मनात दडलेल्या लहान मुलाला ‘या बालांनो या रे या’ म्हणून बाहेर बोलावत आहेत. या व्यवहाराच्या नगराला लागून जी दुसरी सुंदर दुनिया आहे तिच्यात खेळायला बोलावत आहेत.

शतकोत्तर रौप्यमहोत्सव (125 वर्षे) वय असलेली ही कविता. रॉबर्ट ब्राउनिंगने दुसर्‍या भाषेत दुसर्‍या प्रदेशात वेगळ्या काळात लिहीली ही कविता. आज इतक्या वर्षांनी आपल्यापर्यंत हीच्यातील भाव सहज पोचतो आहे. अगदी एक शब्दही शिळा झालेला नाही. ही ताकद आहे ब्राउनिंगच्या आणि भा रा तांब्यांच्या प्रतिभेची.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, July 5, 2020

रूग्ण सैनिक आणि मनोरूग्ण पुरोगामी


उरूस, 5 जूलै 2020 

‘दर्द जब हद से गुजर जाये तो दवा होता है’ अशी उर्दू कवितेतील एक ओळ आहे. एका मर्यादेच्यापलीकडे दुखणे हेच औषध बनून जाते. सध्या पुरोगाम्यांसाठी मोदींवर टीका हेच औषध बनून गेले आहे. ही टीका केली नाही तर त्यांना जगणेच अवघड आहे. 

शुक्रवारी 3 जूलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहच्या लष्करी तळाला भेट दिली. 15 जूनच्या चीनसोबतच्या संघर्षात जखमी झालेल्या जवानांची रूग्णालयात जावून विचारपुस केली. सैनिकांना संबोधीले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. बासरी वाजविणारा कृष्ण जसा आम्हाला आठवतो तसाच सुदर्शनधारी कृष्णही आम्हाला कसा वंदनीय आहे हे सांगून भारत कुठल्याही कठोर सैनिकी कारवाईसाठी सज्ज असल्याचे सैन्यासमोर ठामपणे सांगितले.

याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि लगेच जमाते ए पुरोगामींनी हल्लकल्लोळ सुरू केला. ही टीका नेमकी केंव्हा सुरू झाली? चीनचे अधिकृत एकमेव वार्तमानपत्र ‘ग्लोबल टाईम्सने’ पहिल्यांदा यावर टीका केली. ही टीका वाचताच 50 वर्षांचे तरूण तडफदार राजकुमार राहूल गांधी यांना योग्य ती बत्ती मिळाली. लगेच त्यांची ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. त्यांनी ते तसे सोडताच सगळ्या पुरोगाम्यांना इशारा मिळाला. दिवाळीत फटाक्याची लड पेटवताच एका पाठोपाठ एक जसे फटाके फुटत जातात. तसे इकडे सुरू झाले. सर्व पुरोगाम्यांनी मोदींच्या या दौर्‍यावर टीका करायला सुरवात केली.

टीकेचे मुद्दे तर फारच अफलातून होते. ज्या जखमी सैनिकांना मोदी भेटायला गेले ते ठिकाण म्हणजे चित्रपटाचे शुटिंग वाटावे असा सेट लावलेला वाटत होते, जखमी सैनिकांच्या पलंगाजवळ कुठेही सलाईनचे स्टँड कसे नव्हते, औषधाच्या बाटल्या नव्हत्या, पाण्याच्या बाटल्या दिसत नव्हत्या, चादरी अगदी स्वच्छ कशा होत्या वगैरे वगैरे तारे सर्व ‘आरोग्य तज्ज्ञांनी’ तोडायला सुरवात केली. हे रूग्णालय नसून थेएटर कसे आहे. इथे प्रोजेक्टर कसा दिसतो आहे. वगैरे वगैरे टीका होत राहिली.

खरं तर या बाबत काही एक अधिकृत खुलासा सैन्याधिकार्‍यांकडून येईपर्यंत थांबायला हवे होते. चीनच्या ग्लोबल टाईम्स ने केलेली टीका वाचून आपण टीका करू नये इतके तरी शहाणपण यायला हवे होते. राहूल गांधी यांच्या ‘हो मध्ये हो’ मिसळत राहिलो तर नेहमीच तोंडावर आपटावे लागते हा मागचा अनुभव होता. पण तरी यातून काही शिकायला पुरोगामी तयार नाहीत.

एकाच दिवसांत सैन्याच्या प्रसिद्धी आधिकार्‍यांनी याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. आणि सर्व टीकाकार तोंडावर पडले. हा जो हॉल होतो तो ऑडिओ व्हिज्यूअल प्रशिक्षणासाठी वापरल्या जाता होता. कोव्हिड-19 चा धोका असल्याने बाकी रूग्णांपासून हे नविन आलेले रूग्ण विलगीकरणात ठेवले असल्याने त्यांना त्याच सभागृहात ठेवण्यात आले होते.  हे नियमित रूग्णालय नसून तात्पुरती तयार केलेली व्यवस्था आहे. जे गंभीर रूग्ण आहेत त्यांना अजून वेगळीकडे ठेवण्यात आले आहे. त्यांना कुणालाच भेटू दिले जात नाही. सर्व सविस्तर खुलासा सैन्याच्या प्रसिद्धी खात्याकडून देण्यात आला.

या शिवाय राहूल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरून ज्या लदाखी नागरिकांचे व्हिडिओ दिले आहेत ते चारही जण कॉंग्रेस पक्षाचेच पदाधिकारी आहेत. त्यातील एक तर लदाखी नागरिक नसून हिमाचल प्रदेशचा नागरिक असून तोही युवक कॉंग्रेसचा पदाधिकारी होता. राहूल गांधींच्या ट्विटरचाही भांडाफोड लगेच झाला.

राहूल गांधी संसदेच्या सुरक्षाविषयक स्थायी समितीचे सदस्य आहेत. सप्टेंबरमध्ये तयार झालेल्या या समितीच्या आत्तापर्यंत ११ बैठका झाल्या. यातील एकाही बैठकीला राहूल गांधी हजर नव्हते. शेखर गुप्तांच्या "द प्रिंट" या न्युज पोर्टलने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. पण हेच राहूल गांधी चीनवरून रोज ट्विटर ट्विटर खेळून मोदींवर टीका करत असतात.

या सगळ्या टीकेच्या आरडा ओरडोची एक विशिष्ट पद्धत आहे. सध्याच्या प्रकरणांत चीनचे ग्लोबल टाईम्स वापरले जाते आहे इतर प्रकरणी परदेशी वृत्तसंस्थांचा (बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट वगैरे) वापर केला जातो. यातील अर्धवट बातम्या अर्धवट संदर्भात वापरल्या जातात. स्पष्ट पुरावे समोर आले की काही दिवसांत हा आरडा ओरड बंद होवून जातो. मग त्या बाबत सर्व पुरोगामी ‘आळीमिळी गुपचिळी’ धोरण अवलंबितात.

रोहित वेमुलाच्या प्रकरणात सध्या काय चालू आहे किंवा पुढे काय झाले तूम्ही कुणाही पुरोगाम्याला विचारा ते काहीच सांगू शकणार नाहीत. ज्या हैदराबाद विद्यापीठांत हा प्रसंग घडला त्याच विद्यापीठाच्या नंतरच्या निवडणुकांत कोण दलित मुलगी निवडुन आली? ती कोणत्या विद्यार्थी संघटनेची होती? याची कसलीही उत्तरे हे आता देवू शकणार नाहीत. रोहित वेमुलाच्या आईचे काय झाले? तिला घर घेण्यासाठी कोण्या पक्षाने धनादेश दिला होता? तो कसा बाउंस झाला वगैरे वगैरे सर्व गोष्टी पुरोगाम्यांनी विस्मरणात ढकलून दिल्या आहेत.

ही एक टीका सुरू होते आणि अगदी खालच्या पातळीवर ती झिरपत येते. अगदी काही वेळातच सर्वत्र हा ‘कोरोना’ पसरतो. विद्यापीठात शिकणार्‍या एका तरूणाने तातडीने मोदींच्या लेह दौर्‍यावर टीका केलेली मी फेसबुकवर पाहिली. त्याला या बाबत विचारलेही. पण तो आपल्याला सत्य कसे कळले आहे या आविर्भावात ठाम. नंतर जेंव्हा खुलासे आले तेंव्हा मात्र हे कुणीच काही उत्तर द्यायला तयार होत नाहीत. पक्षाचे प्रवक्ते निदान भाडोत्री आहेत असं म्हणता येतं. पण हे काही सामान्य नागरिक ज्यांचा कशाशी काहीच संबंध नसतो, तेही या प्रचाराला बळी पडतात आणि आपली विवेक बुद्धी हरवून बसतात. हे फार घातक आहे. जी अगदी सामान्य माणसे आहेत त्यांची विवेक बुद्धी शाबूत असते. पण थोडेफार शिकले सवरलेले स्वत:ला बुद्धिवादी म्हणवून घेणारेच या ‘पुरोगामी बौद्धिक कोरोना’ संक्रमणाला बळी पडतात असे दिसून येते.

ज्या गलवान घाटीत संघर्ष झाला तिथे तपमान उणे असते शिवाय प्राणवायु विरळ आहे हे सामान्यांना कळते. पण पुरोगामी मात्र मोदी प्रत्यक्षात गलवानला का गेले नाहीत? असा प्रश्‍न विचारण्यात धन्यता समजतात.

आता काही दिवसांत चीनचा विषय मागे पडला की हे सगळे पुरोगामी विसरून जातील. मग बिहारच्या निवडणुका समोर येतील. मग परत एक वेगळीच चर्चा चालवली जाईल. मागच्या निवडणुकांत भाजप विरोधात नितीशकुमार लालू यांची युती होती. या युतीने भाजपचा पराभव करताच कम्युनिस्ट नेत्यांनी आनंद साजरा केला. स्थानिक कम्युनिस्ट नेत्यांना मी विचारले की ‘तूम्ही तर नितिश लालू यांच्या सोबत नव्हते. तूम्ही स्वतंत्र लढले होता. तूमचा पण दारूण पराभव झाला आहे. मग तूम्ही आनंद कसला साजरा करता अहात?’ त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

आपलं काहीही होवो पण भाजपचा पराभव झाला ना यातच यांचे समाधान. मग पुढ वैतागुन नितिश लालूंच्या पक्षाला सोडून भाजप सोबत निघून गेले आणि सर्व पुरोगाम्यांची तोंडे कायमची कडू झाली.

संघ मोदी भाजप अमित शहा यांचा विरोध करता करता आपण सैन्यावर टीका करत देशद्रोही बनत चालला आहोत  याचाही अंदाज पुरोगाम्यांना येत नाहीये.

2014 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने कॉंग्रेंसचा पराभव करून दाखवला होता. कॉंग्रेसच्या अडून वावरणार्‍या जमात ए पुरोगाम्यांचा वैचारिक पराभव राम मंदिर प्रकरणी उत्खननात सापडलेल्या पुरातन अवशेषांनी करून दाखवला. अपेक्षा अशी होती की रोमिला थापर सारखे विद्वान समोर येवून सर्वांची माफी मागतील. हे जे अवशेष सापडले आहेत त्याबाबत काही एक सविस्तर लेख जमात ए पुरोगामींकडून प्रसिद्ध होईल अशी वैचारिक क्षेत्रात प्रमाणीक काम करणार्‍यांची अपेक्षा होती. पण तसे काही घडले नाही. यातूनच यांचे ढोंग उघडे पडले.

आता मोदींच्या लेह दौर्‍यावर टीका कर, अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूवर लेख लिही, प्रवासी मजदूरांच्या प्रश्‍नांवर खोट्या माहितीच्या आधारे छाती बडवून घे, पुलित्झर पुरस्कारांचे कौतूक कर, डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांवर टीका कर असली कामे करताना हे दिसून येत आहेत.

पुरोगाम्यांच्या दिवंगत विवेक बुद्धीला परमेश्वर शांती देवो. 
   
      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, July 3, 2020

एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण !



काव्यतरंग, शुक्रवार ३ जुलै  २०२० दै. दिव्यमराठी

तहान

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण

व्हावे एव्हढे लहान;
सारी मने कळो यावी;
असा लाभावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी.

सर्व काही देता यावे
काही राहू नये हाती;
यावी लाविता कपाळी
भक्तिभावनेने माती

फक्त मोठी असो छाती
दु:ख सारे मापायला;
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायाला

राहो बनून आकाश
माझा शेवटचा श्‍वास
मनामनांत उरावा
फक्त प्रेमाचा सुवास !

-म.म.देशपांडे (अंतरिक्ष फिरलो पण.., संपा. द.भि. कुलकर्णी, पृ. 33, पद्मगंधा प्रकाशन, आ.1, 2006)

‘गांधी’ चित्रपटांत एक अप्रतिम प्रसंग रिचर्ड ऍटनबरो यांनी रंगवला आहे. लोकांनी हिंसा केली म्हणून महात्मा गांधी उपोषणाला बसले आहेत. सगळा देश चिंतित आहे. एक वयस्क फाटका माणूस आपल्या खिशातून रोटी काढून गांधीसमोर करून ‘आम्ही करत नाही हिंसा, खा आता ही रोटी गुमान’ असं म्हणतोय जणू असा तो विलक्षण प्रभाव प्रसंग आहे. 

सामान्य माणसे आंदोलनासाठी उभी करणं हे महात्मा गांधींचे स्वातंत्र्यलढ्यातील फार मोठे योगदान आहे. त्यांना लढण्यासाठी ‘असहकार, सविनय कायदेभंग’ असली साधी वाटणारी पण फार प्रभावी हत्यारे त्यांनी दिली. 

म म देशपांडे यांच्या या कवितेत असा एक सुर सापडतो, ‘एका साध्या सत्यासाठी’ त्या काळात लोक पंचप्राण अर्पायला तयार झाले. म म देशपांडे हे जून्या पिढीतील कवी. महात्मा गांधींना त्यांनी केवळ बघितलं असं नाही तर त्यांच्या तरूणपणीच्या आठणीच त्यांच्याशी निगडीत असणार. ‘सारा अंधारच प्यावा’ म्हणत असताना सर्व वाईट वृत्ती नकारात्मकता संपविण्याची एक विलक्षण ताकद सामान्य माणसांत असते हे पण सुचवले जाते.   

‘व्हावे एव्हढे लहान’ म्हणत असताना लहान मुलाचे मन जसे अपेक्षीत आहे तसेच आपला सगळा अहंकार बाजूला सारून कुणाच्याही मनात शिरता यावे इतके लहानपण लाभावे हाही अर्थ इथे निघतो. याच ओळींसारख्या ओळी बोरकरांनी लिहील्या आहेत

उन्हासारखा हर्ष माझा असावा
घरातून बाहेर यावी मुले
नभासारखा शोक माझा असावा
तृणांतून देखील यावी फुले

पाषाणांची फुले व्हावी ही एक सुंदर कल्पना आहे. ग्रेस यांनीही एके ठिकाणी असं लिहून ठेवले आहे, 

मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल

तिसर्‍या कडव्यात मातीचा संदर्भ येतो. आज शहरी व्यवस्थेत राहणार्‍या आणि शहरांतच जन्मल्या वाढलेल्या लोकांना कदाचित कल्पना येणार नाही की गावगाड्यांत ‘माती’ला किती अतोनात महत्त्व असते. मातीची शपथ घेतली जाते, मातीत नाळ पुरली असल्याने मातीचा जिव्हाळा जन्मभर जपला जातो, अगदी आयुष्याचा शेवटही गावच्या मातीतच व्हावा असा ध्यास असतो. शहरात राहणार्‍या काही लोकांच्या बाबतीत तर आजही असं घडतं की अंत्यविधी गावाकडेच केले जावे असा त्यांचा अट्टाहास असतो. 

इंद्रजीत भालेराव यांच्या ‘आम्ही काबाडाचे धनी’ या दीर्घ कवितेत मातीसंबंधी एक फार सुंदर तुकडा आलेेला आहे

भन उन्हात जल्मला 
माती तोंडात घेवून
वाढलास एवढा तू 
धान मातीचे खावून

मातीसाठीच जगावं 
मातीसाठीच मरावं
बाळा माती लई थोर 
तिला कसं इसरावं

विठ्ठलाच्या काळ्या रंगात या मातीचे काळेपणही अंतर्भूत आहे. त्यामुळे ‘यावी लाविता कपाळी भक्तिभावनेने माती’ असे शब्द उमटतात. सृजनाचे प्रतिक म्हणूनही ही माती ओळखली जाते. ज्ञानेश्वरीतील ओवी प्रसिद्ध आहे, ‘मातीचे मार्दव । सांगे कोंभाची लवलव॥

सामान्य माणूस काय मागणे मागतो? पसायदान ही तर फार मोठी गोष्ट झाली. ‘विश्वात्मके देवे’ ही प्रार्थना संतांना शोभून दिसते. सामान्य माणूस मात्र 

पुसता येईल इतकंच पाणी
डोळ्यामध्ये हलू दे
गाता येईल इतकं तरी
गाणं गळ्यात खुलू दे

इतक साधं पसायदान मागत असतो. म म देशपांडे, ‘फक्त मोठी असो छाती दु:ख सारे मापायाला’ म्हणतात तेंव्हा सामान्य माणसांसाठीचे एक पसायदानच सामान्यांच्या शब्दांत मागत असतात. 

मातीच्या नंतर शेवटी संदर्भ येतो तो आकाशाचा. आकाशाचा निळा रंग स्वातंत्र्याचे प्रतिक समजले जाते. मुक्त होवून कुठे जायचे तर आकाशात अशी एक समजूत आहे. ‘माझा शेवटचा श्‍वास राहो बनून आकाश’ ही अगदी साधी सर्वव्यापी अशी संकल्पना आहे. आपली राख बनून आपण मातीत मिसळून जातो पण आपले श्‍वास कुठे जातात? तर ते आकाश बनून राहतात.

भारतीय परंपरंतील जगण्याचे तत्त्वज्ञान अगदी साध्या शब्दांत मांडणारी ही कविता. ‘एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण’ असं ती म्हणते तिथे मात्र खुप वेगळी ठरते आणि फार उंचीवर जावून पोचते. सध्या चालू असलेल्या लदाखमधील चिनसोबतच्या संघर्षात जखमी झालेल्या आणि चिन्यांच्या कैदेतून सुटून आलेल्या सैनिकांनी काय भावना व्यक्त केली आहे, ‘आम्हाला परत युद्धावर पाठवा. आम्ही लढायला पंचप्राण देण्यासाठी तयार आहोत.’

देशासाठी लढणे, आपल्या भूमीसाठी लढणे ही संकल्पना फार आधीपासून आपल्या मनांत रूजविल्या गेली आहे. पण म म देशपांडे यांनी ‘साध्या सत्यासाठी’ असे शब्द वापरून संघर्षाचे रूपच पालटले आहे. रोजच्या जीवनातही संघर्ष असतो. त्यासाठी अगदी प्राण पणाला लावून लढायला आपण तयार असतो का? 

रोज आपल्यासमोर काही ना काही गैर प्रकार घडताना दिसतात त्याला आपण कसा प्रतिसाद देतो? ‘साध्या सत्यासाठी’ लढणं हे वाटतं तसं सोपं नाही. त्यामुळे म म देशापांडे यांना देशासाठी त्याग करणार्‍यांसोबतच ‘साध्या सत्यासाठी’ पंचप्राणाची बाजी लावणारा पण फार महत्त्वाचा वाटतो. 

मनोहर महादेव देशापांडे हे स्वातंत्र्योत्तर काळातील कविंच्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी (जन्म23 ऑक्टोबर 1929, मृत्यू 25 डिसेंबर 2005). मुळचे यवतमाळचे असलेले देशपांडे ग्वाल्हेर येथून ते लेखा परिक्षण अधिकारी म्हणून निवृत्त झाले. उतारवयात त्यांचा निवास नाशिक येथे होता. ‘वनफूल’, ‘अंतर्देही’, ‘अपार’ हे त्यांचे कविता संग्रह त्यांंचे प्रसिद्ध झाले. त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह ‘अंतरिक्ष फिरलो पण’ हा 2006 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, July 2, 2020

या फोटोला पुलित्झर देणार का?


उरूस, 2 जूलै 2020 

हा फोटो देण्याची माझी जराही इच्छा नव्हती. विवेक बुद्धी असलेल्या माणसाने असे करू नये हे पण मला पूर्ण कळते. पण काल सकाळी ही घटना कश्मिरात घडली आणि त्यावरून जी भयानक चर्चा जमात-ए-पुरोगामींनी केली त्यामुळे माझा नाईलाज होतो आहे. नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी आपल्या एका कवितेत असं लिहीलं आहे ‘गाढवांच्या गर्दीत घोड्यांनी काय करावे? अपवाद म्हणून का होईना पण एक सणसणीत लाथ घातली पाहिजे.

पण यावर जेवढा विचार
कराल तेवढा थोडा आहे
शेवटी गाढवांना किमान एवढे
कळले तरी पुरे
की हे गाढव नसून
हा घोडा ताहे

-नारायण कुलकर्णी कवठेकर (मागील पानावरून पुढे चालू, मौज प्रकाशन, मुंबई)

त्या कवितेप्रमाणे एक लाथ घालण्याची वेळ आली आहे असे प्रकर्षाने वाटले.

कश्मिरात दोन आतंकवादी एका मस्जिदीत लपले असल्याची खबर सुरक्षा दलाच्या सैनिकांना लागली. त्यांना घेरण्यात आले. या आतंकवाद्यांनी त्यांच्याबाजूने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात एका 65 वर्षांच्या सामान्य कश्मिरी नागरिकाचा बळी गेला. (मी मुद्दाम त्याचे नाव सांगत नाही. बघु वाचणारे पुरोगामी काय प्रतिक्रिया देतात.) या वृद्ध कश्मिरी नागरिकाचा 3 वर्षांचा छोटा नातू त्या प्रेतावर बसून रडतो आहे असा हा हृदयद्रावक फोटो आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या मुलाला वाचविण्यासाठी प्राण पणाला लावले. या गोंडस बाळाला बाजूला सरक अशी खुण करणारा फोटो आज इंडियन एक्स्प्रेसने अगदी पहिल्या पानावर छापला आहे. (सोबत हा फोटो पण देत आहे.)


शेवटी या छोट्या बाळाला वाचविण्यात सुरक्षा दलाला यश आले. ज्या सुरक्षा अधिकार्‍याने या मुलाला पटकन कडेवर उचलून घेतले (त्याचेही नाव सांगत नाही. बघु पुरोगामी काय अंदाज बांधतात तो). त्याला गाडीत बसवून बिस्कीट चॉकलेट देतो म्हणूत त्याचे मन गुंतविण्याचा प्रयत्न केला. पण तो मुलगा आईचे नाव काढून मुसमुसत होता. त्याच्या तोंडून बाकी शब्दच फुटत नव्हते. या गोड बाळाला त्याच्या कुटूंबात सुरक्षीत पोचविण्यात आले.
खरं तर या घटनेवर कुठलेच आणि कसल्याच प्रकारचे राजकारण करण्याची काहीच गरज नव्हती. पण या नागरिकाचा मृत्यू सुरक्षा रक्षाकांच्या गोळीनेच झाला असला अश्लाघ्य दावा पुरोगाम्यांनी केला. वास्तविक माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षा सैनिकांनी सविस्तर माहिती नंतर दिली. अगदी किती गोळ्या झाडल्या त्या जागा दाखवल्या. समोरच्या बंद दुकानाच्या शटरवर त्या गोळ्यांच्या निशाण्या आहेत. रस्त्यावर सांडलेले रक्त दाखवले. गोळ्या मस्जिदीच्या दिशेने आल्या ते पण अगदी सहज तपासता येते.

असा सगळा ‘हा सुर्य हा जयद्रथ’ पुरावा असतानाही सुरक्षा दल सामान्य नागरिकांवर कसा अन्याय करतो आहे, सामान्य कश्मिरींचा जीव यांच्या गोळ्यांनी घेतला जातो आहे असा पाक धार्जिणा घाणेरडा देशद्रोही प्रचार केला जातो आहे तेंव्हा अपरिहार्यपणे हा फोटो शेअर करावा लागला.

(पुरोगाम्यांच्या देशविरोधी प्रचाराचा पुरावाही काही वेळातच समोर आला.आतंकवाद्यांच्या पाकिस्तानी ट्विटरवर याबाबत मेसेजही सापडला. हा मृत्यू सुरक्षा दलानेच केला असा प्रचार लगेच चालू करा. कारण आपली बदनामी होते आहे असा हा मजकूर आहे. टाईम्स नाऊ या वाहिनीवर याबाबत सविस्तर चर्चा बुधवार 1 जूलै 2020 ला करण्यात आली. ऑप इंडिया या यु ट्यूब वरही याबाबत माहिती उपलब्ध आहे.)

नुकतेच कश्मिरातील असे फोटो निवडून केल्या गेलेल्या फोटो पत्रकारितेला ‘पुलित्झर’ पुरस्काराने सन्मानिल्या गेले. आता या फोटोला पुरस्कार देणार अहात का? भाजप प्रवक्त संबित पात्रा यांनी हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करून पुरोगाम्यांना कोंडित पकडले.

ज्या ज्या कुणी पुलित्झर पुरस्कारांचे कौतूक केले आहे त्या सर्वांना माझे आवाहन आहे त्यांनी आता या फोटोवर आपली प्रतिक्रिया द्यावी.

तामिळनाडूमध्ये दोन जणांना (वडिल आणि मुलगा) लॉकडाउनमध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा दुकान उघडे ठेवले या क्ष्ाुल्लक कारणाने पोलिसांनी पकडून नेले. कोठडीत मारहाणीत या दोघांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील गुन्हेगार असलेल्या जॉर्ज फ्लॉईडचे जे बोंबले आहेत त्यांचा आवाज आता कुठे गप्प झाला आहे? ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणणार्‍यांना आपल्याच देशातील सामान्य निर्दोेष माणसांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला तर त्याची वेदना जाणवत नाही का? तेंव्हा यांची कातडी गेंड्याची होते का?

एक वगळेच युद्ध देशात सुरू झाले आहे. काहीही घडले तरी एक देशविरोधी टोळी सक्रिय होते आणि आरडा ओरड सुरू करते. कश्मिरातील हे निरागस बालक तूमच्या राजकारणाचा विषय का बनते? याच्या आजोबांचा बळी घेणार्‍या आतंकवाद्यांना कुणी प्रोत्साहन दिले आहे?

हुरियत कॉन्फरन्सचे सय्यद अली शहा जिलानी यांना हुरियतच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागतो. परदेशांतील आपल्या मुला बाळांकडे उर्वरीत आयुष्य काढण्यासाठी देश सोडून जाण्याची वेळ येते हा आपल्या कश्मिर विषयक कडक धोरणाचा परिपाक आहे. गेल्या 6 महिन्यात 119 आतंकवाद्यांचा खात्मा केला जातो. एक एक आतंकवादी हुडकून त्यांचा समूळ नायनाट करण्याची मोठी मोहिम 370 कलम हटविल्यापासून जोमाने सुरू आहे.

370 कलम हटवताच लेह लदाख मध्ये सैन्याच्या हालचालींना गती मिळाली. सीमाभागात रस्ते, नदीवरील पुल यांची कामे जोरात सुरू झाली. सर्वात उंचीवरील विमानतळाची धावपट्टीची डागडुजी होवून तिचा वापर सुरू होतो. याचाच परिणाम म्हणजे चीनने केलेली गलवान मधील धुसफुस.

हे सगळं माहित असताना, चीनसोबत एकाच वेळी विविध पातळीवर संघर्ष सुरू असताना, तिकडे पाकिस्तानलाही सडेतोड जबाब दिला जात असताना हे पुरोगामी नेमकी देशविरोधी भूमिका का घेत आहेत?
सैन्याचे सर्वोच्य अधिकारी लदाखमध्ये जखमी सैनिकांची विचारपुस करायला जातीनं जात आहेत. एकाचवेळी मुत्सेद्दीगिरी, प्रत्यक्ष लष्करी हल्ल्याची पूर्ण तयारी, शस्त्र न वापरता साध्या साधनांनी हल्ले, आर्थिक पातळीवर बहिष्कार, चीनी ऍपवर बंदी असे सगळेच मार्ग अवलंबिले जात आहेत. आणि सर्व पुरोगामी मात्र, ‘हा भारताचा पराभव आहे, आपल्या 20 सैनिकांचे बळी घेणारे हे सरकार नामर्द आहे, आपल्या भूमीवर चीनने आक्रमण केले आहे, ऍप वर बंदीने काय होणार मॅप बदलला जातो आहे’ अशी ओरड का करत आहेत?

राजकारण राजकारणाच्या पातळीवर चालत राहिल. अधिकारी पातळीवर चर्चा चालू राहिल. सैनिक त्यांच्या पातळीवर संपूर्ण संघर्षासाठी सज्ज आहेतच.  असल्या ‘पुलित्झारी’ पुरस्काराच्या जहरी प्रचाराचे विष तूमच्या मनात पेरले जात आहे ते केवळ आणि केवळ तूमचे मनोधैर्य खचावे म्हणून. हेच आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात केल्या गेले. कॉंग्रेस सारखा सर्वात जूना पक्षच या प्रचाराचे कंत्राट घेवून देशद्रोह करताना दिसत आहे. एक सच्चा देशप्रेमी नागरिक म्हणून तूम्ही या अपप्रचाराला बळी पडू नका ही हात जोडून विनंती.

आतंकवाद्यांच्या गोळीला बळी पडलेल्या त्या भारतीय नागरिकाला माझी विनम्र श्रद्धांजली.

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, June 29, 2020

कॉंग्रसचे गांधीवादी चौधरी विरूद्ध नेहरूवादी केतकर


उरूस, 29 जून 2020 

कॉंग्रेस ‘महात्मा गांधीं’ नावाचे चलनी नाणे आपल्या हक्काचे म्हणून आपल्या सोयीने वापरत आली आहे. अगदी कॉंग्रेस नेतृत्वाने महात्मा गांधींचे आडनावही वापरले. आता तर प्रियंका यांचा मुलगा रेहान हा पण वाड्रा हे आडनाव न लावता गांधी आडनाव लावतो आहे. (पाकिस्तानात असिफ अली झरदारी यांचा मुलगा बिलावल याने आपल्या आईचे आडनाव भुट्टो लावले कारण त्यात एक मोठी राजकीय सोय आहे.)

कॉंग्रेस मध्ये गांधीवाद विरूद्ध नेहरूवाद असा काही संघर्ष होता का? का उगाच आज काहीतरी शब्दचमत्कृती म्हणून वरील शीर्षक वापरतो आहे?

हा वाद आधीपासून होता याचा पुरावा स्वत: महात्मा गांधी यांनीच दिलेला आहे. पत्रकारांनी त्यांना नेहरूं सोबत तूमचे नेमके कोणते वैचारिक मतभेद आहेत असे विचारले असता गांधींनी स्वच्छपणे साध्या सोप्या शब्दांत उत्तर दिले, ‘इंग्रज भारतात राहिले तरी मला चालतील पण त्यांची धोरणे मात्र गेलीच पाहिजे हा माझा आग्रह आहे. उलट जवाहर मात्र इंग्रज जावा यासाठी आग्रही आहे इंग्रजांची धोरणं राहिली तरी चालतील या मताचा आहे.’

महात्मा गांधींच्या हत्येनंतर पुढे कॉंग्रेसचा सत्तातूर सत्तालंपट इतिहास सर्वांसमोर आहे. गांधींच्या शरिराची हत्या जरी नथुराम गोडसेंनी केली तरी विचारांची हत्या मात्र नेहरू आणि पुढे इंदिरा-राजीव गांधी यांच्या कॉंग्रेसनेच केली.

विश्वंभर चौधरी हे गांधी मानणार्‍या, पदाची अपेक्षा न बाळगणार्‍या सच्च्या सेवादली कॉंग्रेसी कार्यकर्त्याचे प्रतिनिधी आहेत. (कॉंग्रेसचा पण सेवादल होता हे बहुतांश लोकांना माहितही नसेल). त्यांनी आपली व्यथा 27 जूनला समाजमाध्यमांत फेसबुक पोस्टवरून व्यक्त केली. आण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिडियाने ‘हाईप’ केलेले आंदोलन म्हणून हिणवल्या गेले. शिवाय अण्णा हे संघी आहेत असा आरोपही केला गेला. वारंवार होणार्‍या या आरोपांनी व्यथित होवून विश्वंभर यांनी लिहीले.

नेमके त्याच काळात 20 जूनच्या साप्ताहिक साधनाच्या अंकात कॉंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी ‘कॉंग्रेस विरोध म्हणजे नेहरू विचार विरोध..’ असा लेख लिहिला. यात त्यांनी भाजप-संघेतर पुरोगामी पक्षही कसे नेहरूंच्या विचारांना विरोध करत राहिले. कॉंग्रेस विरोधी राजकीय शक्तींना याच पुरोगाम्यांनी ताकद पुरवली. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या लोकांना या पुरोगामी पक्षांनी कशी मदत केली. परिणामी हे सगळे नेहरू विचार विरोधी आहेत.

केतकरांनी ही मांडणी केवळ पत्रकार विचारवंत अभ्यासक म्हणून केली असती तर तीचा वेगळा विचार झाला असता. पण आता केतकर काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आहेत. पक्षासमोर भीषण राजकीय संकट उभे आहे. अशावेळी भाजपेतर इतर पुरोगामी पक्षांना विरोध करायचे काय कारण? बरं ते भलावण कुणाची करतात? सेानिया-राहूल-प्रियंका या नकली गांधींची. ज्यांनी अस्सल सच्च्या कॉंग्रेसी कार्यकर्त्यांची वाट लावली आहे.

यातही परत एक वैचारिक जमालगोटा केतकरांनी देवून ठेवला आहे. महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यानंतरही पुढे 16 वर्षे नेहरू कसे पंतप्रधान होते असं लिहीताना केतकर राजरोसपणे गांधींचा वारसा नेहरू कसे पुढे चालवित होते हे सांगू पहात आहेत. प्रत्यक्षात नेहरूंची धोरणे गांधीवादी नव्हती. नेहरू नियोजनाचे पुरस्कर्ते, गांधी विकेंद्रिकरण मानणारे, नेहरू अती सरकारवादी, गांधी अ-सरकारवादी, नेहरू उद्योग केंद्री शहर केंद्री (इंडिया)  तर गांधी ग्रामकेंद्री (भारत). मग गांधींचा वारसा नेहरू आणि पुढचे त्यांचे सत्ताधारी वारस यांनी कुठे चालवला?

केतकर कौतुक करतात ती सोनियांच्या काळात राबवल्या गेलेली अन्नसुरक्षा, शिक्षणाचा हक्क, मनरेगा, महिला सबलीकरण ही धोरणं कुणाची होती? ही डाव्या चळवळींची आग्रही मागणी होती.

मुळात जे या सर्व डाव्यांचे (कम्युनिस्टां शिवायचे पुरोगामी समाजवादी डावे) कुलगुरू डॉ. राम मनोहर लोहिया यांनी फार पूर्वीच नेहरूंच्या समाजवादी ढोंगाचे पितळ उघडे पाडले होते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर 1948 ला नाशिक येथे अधिवेशन भरवून समाजवादी विचारांची मंडळी कॉंग्रेसमधून बाहेर पडली आणि त्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला.  गांधी जिवंत होते तोपर्यंत कॉंग्रेस अंतर्गत समाजवाद्यांना नैतिक आधार वाटत होता. पण त्यांच्या हत्येनंतर मात्र हा आधार संपला. कारण नेहरूंची सत्तालालसा कॉंग्रेस पक्षाला समाजवादी धोरणे राबवू देणार नाही म्हणून कॉंग्रेस अंतर्गत राहून काही उपयोग होणार नाही अशी आग्रही मांडणी लोहियांनी केली.

इतकेच नाही तर नेहरूंच्या समाजवादाच्या कृत्रिम प्रेमात अशोक मेहतांसारखे मोठे नेते अडकू पहात आहेत, जयप्रकाश नारायण मऊ पडत आहेत हे पाहून समाजवादी पक्षात फुट पाडत लोहिया यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. पुढे त्यांनी नेहरूंच्या विरोधात 1962 मध्ये निवडणुकही लढवली. त्यात लोहियांचा पराभव झाला. पण 1963 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यांनी लोसभेत प्रवेश घेतला. संसदेत नेहरूंचा समाजवाद कसा नकली आहे हे ते जोरदारपणे मांडत राहिले.

केतकर एकीकडे भाजप सोबतच लोहियांच्या पुरोगामी शिष्याना नेहरूंच्या विचारांचे विरोधक म्हणत आहेत पण दुसरीकडे त्यांचीच धोरणे राबवू पाहणार्‍या सोनियांची तळी उचलत आहेत.

विश्वंभर चौधरी यांनी आग्रह धरला त्याप्रमाणे कॉंग्रेसने रस्त्यावर उतरून भाजप सरकार विरूद्ध आंदोलनं केली पाहिजेत. जनसामान्यांपर्यंत पोचले पाहिजे. आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधात हाक देताच उभा देश आणि विशेषत: तरूणाई पाठिशी उभी राहिली. ही तळमळ म्हणजेच गांधी विचारांशी जूळणारा खादीचा धागा आहे. हे आत्ताच्या कॉंग्रेसने समजून घेतले पाहिजे. उलट आताची कॉंग्रेस म्हणजेच भ्रष्टाचाराच्या ‘खादी’ विचारांची झाली आहे.

विश्वंभर चौधरी यांची खंत असली (महात्मा) गांधींची रामराज्य वाली कॉंग्रेस उरली नसून नकली (सोनिया) गांधींची रोमराज्य वाली कॉंग्रेस उरली अशी आहे (हे शब्द माझे आहेत त्याचे खापर विश्वंभर यांच्यावर नको).  तिने आत्मपरिक्षण करावे अशी प्रमाणिक तळमळ मांडत आहेत.

केतकर मात्र कुठलेही आत्मपरिक्षण करण्यास तयार नाहीत. उलट आजही आणीबाणीचे समर्थन करत जयप्रकाश नारायण यांच्यावर आंतरराष्ट्रीय कटाचा आरोप करत आहेत. भाजप सोबतच भाजपेतर पक्षांवर कॉंग्रेस विरोधाचा ठप्पा मारत आहेत.

नुकतीच बिहार मधून बातमी आली आहे की राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली भाजप-नितिश कुमार विरोधी जी आघाडी बनते आहेत त्यातून कॉंग्रेस हद्दपार केली जात आहे. म्हणजे इकडे केतकर नेहरू विचार विरोध म्हणून ज्या पुरोगाम्यांना हिणवत आहेत तेच आता राजकीय तडजोड म्हणून कॉंग्रेसला सोबत घ्यायला तयार नाहीत. मग कॉंग्रेसचे राजकीय अस्तित्व बिहारात शिल्लक राहिल काय? विश्वंभर चौधरी यांची तळमळ किती खरी आहे याचा लगेच पुरावा बिहार मधील राजकीय घडामोडीं मधून येतो आहे. 

हा अंतर्विरोध नेहरूवाद गांधीवाद असा केवळ वैचारिक नाही. जनसामान्यांचा पाठिंबा नसलेले दरबारी राजकारणी आणि जनसामान्यांत मिळसळणारे त्यांचे प्रश्‍न समजून घेणारा सच्चा कार्यकर्ता असापण आहे. हेच विश्वंभर चौधरी यांना सुचवायचे आहे.

‘येथे समस्त बहिरे बसतात लोक, का मधुर भाषणे तू करिशी अनेक’ अशी परिस्थिती असताना विश्वंभर चौधरी यांचे तळमळीचे म्हणणे कोण ऐकणार? त्यांची अपेक्षा फोलच ठरण्याची शक्यता जास्त. त्यांच्यातल्या सच्च्या गांधीवाद्याला यामुळे वेदना होणार. पण जोपर्यंत नकली गांधी (सोनिया-राहूल-प्रियंका-रेहान) कॉंग्रेसला विळखा घालून बसलेले आहेत तोपर्यंत काही इलाज नाही. या नकली गांधींची चापलुसी करून खासदारकी पदरात पाडून घेणार्‍यांकडून तर कसल्याच अपेक्षा ठेवता येत नाहीत.

(छायाचित्रातील गांधी नेहरू यांचे कपडेही हा विरोध सांगायला प्रतिक म्हणून पुरेसे आहेत)
 
      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575