उरूस, 5 जूलै 2020
‘दर्द जब हद से गुजर जाये तो दवा होता है’ अशी उर्दू कवितेतील एक ओळ आहे. एका मर्यादेच्यापलीकडे दुखणे हेच औषध बनून जाते. सध्या पुरोगाम्यांसाठी मोदींवर टीका हेच औषध बनून गेले आहे. ही टीका केली नाही तर त्यांना जगणेच अवघड आहे.
शुक्रवारी 3 जूलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहच्या लष्करी तळाला भेट दिली. 15 जूनच्या चीनसोबतच्या संघर्षात जखमी झालेल्या जवानांची रूग्णालयात जावून विचारपुस केली. सैनिकांना संबोधीले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. बासरी वाजविणारा कृष्ण जसा आम्हाला आठवतो तसाच सुदर्शनधारी कृष्णही आम्हाला कसा वंदनीय आहे हे सांगून भारत कुठल्याही कठोर सैनिकी कारवाईसाठी सज्ज असल्याचे सैन्यासमोर ठामपणे सांगितले.
याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि लगेच जमाते ए पुरोगामींनी हल्लकल्लोळ सुरू केला. ही टीका नेमकी केंव्हा सुरू झाली? चीनचे अधिकृत एकमेव वार्तमानपत्र ‘ग्लोबल टाईम्सने’ पहिल्यांदा यावर टीका केली. ही टीका वाचताच 50 वर्षांचे तरूण तडफदार राजकुमार राहूल गांधी यांना योग्य ती बत्ती मिळाली. लगेच त्यांची ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. त्यांनी ते तसे सोडताच सगळ्या पुरोगाम्यांना इशारा मिळाला. दिवाळीत फटाक्याची लड पेटवताच एका पाठोपाठ एक जसे फटाके फुटत जातात. तसे इकडे सुरू झाले. सर्व पुरोगाम्यांनी मोदींच्या या दौर्यावर टीका करायला सुरवात केली.
टीकेचे मुद्दे तर फारच अफलातून होते. ज्या जखमी सैनिकांना मोदी भेटायला गेले ते ठिकाण म्हणजे चित्रपटाचे शुटिंग वाटावे असा सेट लावलेला वाटत होते, जखमी सैनिकांच्या पलंगाजवळ कुठेही सलाईनचे स्टँड कसे नव्हते, औषधाच्या बाटल्या नव्हत्या, पाण्याच्या बाटल्या दिसत नव्हत्या, चादरी अगदी स्वच्छ कशा होत्या वगैरे वगैरे तारे सर्व ‘आरोग्य तज्ज्ञांनी’ तोडायला सुरवात केली. हे रूग्णालय नसून थेएटर कसे आहे. इथे प्रोजेक्टर कसा दिसतो आहे. वगैरे वगैरे टीका होत राहिली.
खरं तर या बाबत काही एक अधिकृत खुलासा सैन्याधिकार्यांकडून येईपर्यंत थांबायला हवे होते. चीनच्या ग्लोबल टाईम्स ने केलेली टीका वाचून आपण टीका करू नये इतके तरी शहाणपण यायला हवे होते. राहूल गांधी यांच्या ‘हो मध्ये हो’ मिसळत राहिलो तर नेहमीच तोंडावर आपटावे लागते हा मागचा अनुभव होता. पण तरी यातून काही शिकायला पुरोगामी तयार नाहीत.
एकाच दिवसांत सैन्याच्या प्रसिद्धी आधिकार्यांनी याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. आणि सर्व टीकाकार तोंडावर पडले. हा जो हॉल होतो तो ऑडिओ व्हिज्यूअल प्रशिक्षणासाठी वापरल्या जाता होता. कोव्हिड-19 चा धोका असल्याने बाकी रूग्णांपासून हे नविन आलेले रूग्ण विलगीकरणात ठेवले असल्याने त्यांना त्याच सभागृहात ठेवण्यात आले होते. हे नियमित रूग्णालय नसून तात्पुरती तयार केलेली व्यवस्था आहे. जे गंभीर रूग्ण आहेत त्यांना अजून वेगळीकडे ठेवण्यात आले आहे. त्यांना कुणालाच भेटू दिले जात नाही. सर्व सविस्तर खुलासा सैन्याच्या प्रसिद्धी खात्याकडून देण्यात आला.
या शिवाय राहूल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरून ज्या लदाखी नागरिकांचे व्हिडिओ दिले आहेत ते चारही जण कॉंग्रेस पक्षाचेच पदाधिकारी आहेत. त्यातील एक तर लदाखी नागरिक नसून हिमाचल प्रदेशचा नागरिक असून तोही युवक कॉंग्रेसचा पदाधिकारी होता. राहूल गांधींच्या ट्विटरचाही भांडाफोड लगेच झाला.
राहूल गांधी संसदेच्या सुरक्षाविषयक स्थायी समितीचे सदस्य आहेत. सप्टेंबरमध्ये तयार झालेल्या या समितीच्या आत्तापर्यंत ११ बैठका झाल्या. यातील एकाही बैठकीला राहूल गांधी हजर नव्हते. शेखर गुप्तांच्या "द प्रिंट" या न्युज पोर्टलने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. पण हेच राहूल गांधी चीनवरून रोज ट्विटर ट्विटर खेळून मोदींवर टीका करत असतात.
या सगळ्या टीकेच्या आरडा ओरडोची एक विशिष्ट पद्धत आहे. सध्याच्या प्रकरणांत चीनचे ग्लोबल टाईम्स वापरले जाते आहे इतर प्रकरणी परदेशी वृत्तसंस्थांचा (बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट वगैरे) वापर केला जातो. यातील अर्धवट बातम्या अर्धवट संदर्भात वापरल्या जातात. स्पष्ट पुरावे समोर आले की काही दिवसांत हा आरडा ओरड बंद होवून जातो. मग त्या बाबत सर्व पुरोगामी ‘आळीमिळी गुपचिळी’ धोरण अवलंबितात.
रोहित वेमुलाच्या प्रकरणात सध्या काय चालू आहे किंवा पुढे काय झाले तूम्ही कुणाही पुरोगाम्याला विचारा ते काहीच सांगू शकणार नाहीत. ज्या हैदराबाद विद्यापीठांत हा प्रसंग घडला त्याच विद्यापीठाच्या नंतरच्या निवडणुकांत कोण दलित मुलगी निवडुन आली? ती कोणत्या विद्यार्थी संघटनेची होती? याची कसलीही उत्तरे हे आता देवू शकणार नाहीत. रोहित वेमुलाच्या आईचे काय झाले? तिला घर घेण्यासाठी कोण्या पक्षाने धनादेश दिला होता? तो कसा बाउंस झाला वगैरे वगैरे सर्व गोष्टी पुरोगाम्यांनी विस्मरणात ढकलून दिल्या आहेत.
ही एक टीका सुरू होते आणि अगदी खालच्या पातळीवर ती झिरपत येते. अगदी काही वेळातच सर्वत्र हा ‘कोरोना’ पसरतो. विद्यापीठात शिकणार्या एका तरूणाने तातडीने मोदींच्या लेह दौर्यावर टीका केलेली मी फेसबुकवर पाहिली. त्याला या बाबत विचारलेही. पण तो आपल्याला सत्य कसे कळले आहे या आविर्भावात ठाम. नंतर जेंव्हा खुलासे आले तेंव्हा मात्र हे कुणीच काही उत्तर द्यायला तयार होत नाहीत. पक्षाचे प्रवक्ते निदान भाडोत्री आहेत असं म्हणता येतं. पण हे काही सामान्य नागरिक ज्यांचा कशाशी काहीच संबंध नसतो, तेही या प्रचाराला बळी पडतात आणि आपली विवेक बुद्धी हरवून बसतात. हे फार घातक आहे. जी अगदी सामान्य माणसे आहेत त्यांची विवेक बुद्धी शाबूत असते. पण थोडेफार शिकले सवरलेले स्वत:ला बुद्धिवादी म्हणवून घेणारेच या ‘पुरोगामी बौद्धिक कोरोना’ संक्रमणाला बळी पडतात असे दिसून येते.
ज्या गलवान घाटीत संघर्ष झाला तिथे तपमान उणे असते शिवाय प्राणवायु विरळ आहे हे सामान्यांना कळते. पण पुरोगामी मात्र मोदी प्रत्यक्षात गलवानला का गेले नाहीत? असा प्रश्न विचारण्यात धन्यता समजतात.
आता काही दिवसांत चीनचा विषय मागे पडला की हे सगळे पुरोगामी विसरून जातील. मग बिहारच्या निवडणुका समोर येतील. मग परत एक वेगळीच चर्चा चालवली जाईल. मागच्या निवडणुकांत भाजप विरोधात नितीशकुमार लालू यांची युती होती. या युतीने भाजपचा पराभव करताच कम्युनिस्ट नेत्यांनी आनंद साजरा केला. स्थानिक कम्युनिस्ट नेत्यांना मी विचारले की ‘तूम्ही तर नितिश लालू यांच्या सोबत नव्हते. तूम्ही स्वतंत्र लढले होता. तूमचा पण दारूण पराभव झाला आहे. मग तूम्ही आनंद कसला साजरा करता अहात?’ त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.
आपलं काहीही होवो पण भाजपचा पराभव झाला ना यातच यांचे समाधान. मग पुढ वैतागुन नितिश लालूंच्या पक्षाला सोडून भाजप सोबत निघून गेले आणि सर्व पुरोगाम्यांची तोंडे कायमची कडू झाली.
संघ मोदी भाजप अमित शहा यांचा विरोध करता करता आपण सैन्यावर टीका करत देशद्रोही बनत चालला आहोत याचाही अंदाज पुरोगाम्यांना येत नाहीये.
2014 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने कॉंग्रेंसचा पराभव करून दाखवला होता. कॉंग्रेसच्या अडून वावरणार्या जमात ए पुरोगाम्यांचा वैचारिक पराभव राम मंदिर प्रकरणी उत्खननात सापडलेल्या पुरातन अवशेषांनी करून दाखवला. अपेक्षा अशी होती की रोमिला थापर सारखे विद्वान समोर येवून सर्वांची माफी मागतील. हे जे अवशेष सापडले आहेत त्याबाबत काही एक सविस्तर लेख जमात ए पुरोगामींकडून प्रसिद्ध होईल अशी वैचारिक क्षेत्रात प्रमाणीक काम करणार्यांची अपेक्षा होती. पण तसे काही घडले नाही. यातूनच यांचे ढोंग उघडे पडले.
आता मोदींच्या लेह दौर्यावर टीका कर, अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूवर लेख लिही, प्रवासी मजदूरांच्या प्रश्नांवर खोट्या माहितीच्या आधारे छाती बडवून घे, पुलित्झर पुरस्कारांचे कौतूक कर, डोनाल्ड ट्रंप यांच्या धोरणांवर टीका कर असली कामे करताना हे दिसून येत आहेत.
पुरोगाम्यांच्या दिवंगत विवेक बुद्धीला परमेश्वर शांती देवो.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575