उरूस, 2 जून 2020
डिसेंबर महिन्यात दिल्लीत शाहिनबाग परिसरात सीएए एनआरसी विरोधात जे धरणे आंदोलन सुरू झालं त्याला ‘शाहिनबाग’ या नावानेच ओळखल्या जाते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभर जिथे जिथे म्हणून आंदोलन झाले त्या त्या गावचे ‘शाहिनबाग’ असाच उल्लेख केला गेला.
हे आंदोलन शांततेच्या मार्गाने वैध मागण्यासाठी होते असा एक गैरसमज. प्रत्यक्षात या आडून हिंसाचाराचा मोठा कट आखला गेला होता हे आता तपासात समोर येत आहे. काही विद्यार्थी नेत्यांना यु.ए.पी.ए. कायद्याअंतर्गत पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. या अटकांमुळे ऍड. प्रशांत भुषण, गीतकार जावेद अख्तर, पुरोगामी पत्रकार यांचा तडफडाट होताना दिसतो आहे. कन्हैय्या कुमार सारखे कम्युनिस्ट नेते तर मुसलमानांच्या विरोधात ही कारवाई आहे असे धादांत खोटे बोलत आहेत.
दिल्ली दंग्यांत डाव्यांचा, अर्बन नक्षलींचा, कट्टरपंथीय मुस्लिम संघटनांचा हात होता हे पण उघड होत चालले आहे. मोदिविरोधी एक पत्रकारांची लॉबी या घटनांना जास्त भडक करून समोर मांडत होती. अगदी आत्ताच्या कोरोना काळात रेल्वेतील मृत्यू, प्रवासी मजदूरांचे चालताना झालेले मृत्यू यांच्या बातम्या किंवा ट्विट करून समारे आणले गेलेले फोटो या सगळ्यांतून एक सरकार विरोधी अजेंडा समोर येताना दिसतो आहे.
आपण याचा अनुभव 2014 च्या मोदींच्या पंतप्रधान होण्यापासूनच घेतो आहोत. हाच प्रकार अमेरिकेत 2016 ला ट्रंप निवडून आले तेंव्हापासून होतो आहे. तिथेही सक्रिय असलेल्या डाव्या लॉबीने डेमॉक्रॅट पक्षाची बाजू घेत ‘नॉट माय प्रेसिडेंट’ नावाने उपद्रवी निदर्शने केली होती.
आताही चीनी विषाणू मुळे लाखापेक्षा जास्त अमेरिकनांचा बळी गेल्याने सामान्य नागरिक चीनवर संतापलेले आहेत. जगभरातच चीनविरोधी संतापाची भावना आहे. या भावनेची कदर राखत अध्यक्ष ट्रंप यांनीही भाडभीड न बाळगता कोरोना विषाणूचा उल्लेख ‘वुहान व्हायरस’ म्हणून केला. चीनवर निर्बंध लादायला सुरवात केली. चीनला पाठिशी घालणार्या जागतिक आरोग्य संघटनेचा निधी बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे चीनचा तडफडाट होतो आहे. चीनने जगभरात डाव्या चळवळींना हाताशी घेवून प्रस्थापित सरकार विरूद्ध आवाज उठविण्याची मोहिम तेज केली आहे. यात पत्रकारही सामील आहेत. अगदी भारतातही एनडिटिव्ही सारखे चॅनेल उघडपणे राजरोस कोरानासाठी चीन कसा जबाबदार नाही असे सांगताना दिसते आहे.
अमेरिकेत घटना घडली ती अशी. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे कुणीच कसल्याच पद्धतीने समर्थन करणार नाही. या विरोधात तिथे जी काय कारवाई व्हायची ती झालेलीही आहे. या पूर्वीही कृष्णवर्णीय व्यक्तींचा पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अमेरिकेत अजूनही काळे गोरे हा भेद आहे हे सत्य आहे.
पण या घटनेचे निमित्त करून अमेरिकेत जागजागी प्रचंड हिंसाचार माजवला गेला हे भयानक आहे. आपल्याला लक्षात असेल भारतातही मोदी आल्यानंतर रोहित वेमुला, गौरी लंकेश, अखलाख, कलबुर्गी, पानसरे, तबरेज अंसारी असे एक एक विषय काढून त्यावर देशभर गदारोळ माजवला गेला होता. ताजे उदाहरण म्हणजे ‘शाहिनबाग’ आंदोलन.
हाच शाहिनबाग पॅटर्न आता अमेरिकेतही दिसून येतो आहे. कुठलेही निमित्त शोधून देशभर अस्वस्थता निर्माण करायची. हिंसाचार माजवायचा. लोकशाही माध्यमातून निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करायचे. एक दोन नव्हे तर अमेरिकेतल्या चाळीस शहरांत संचारबंदी लागू करावी लागली आहे त्यावरून हा कट किती मोठा आहे हे लक्षात येते.
हा कट असल्याचा पुरावाच आपले देशी पत्रकारही अप्रत्यक्षरित्या देवू लागले आहेत. आजचा लोकसत्ताचा अग्रलेख नमुना म्हणून वाचा ( मंगळवार दिनांक 2 जून 2020). सगळा दोष ट्रंप यांच्या माथ्यावर मारलेला दिसून येईल. हिंसाचार माजविणारे कोण आहेत? एकाच वेळी इतक्या शहरांमध्ये नियोजन असल्याशिवाय दंगे कसे उसळतात? विरोध शांततेच्या मार्गाने व्यक्त करण्या ऐवजी हिंसाचार का केला जातो? असले प्रश्न अग्रलेखात विचारलेले दिसून येत नाहीत. उलट हा अग्रलेख म्हणजे नाव जरी ट्रंपचे असले तरी या निमित्ताने मोदींनाच झोडपून घेतलेले दिसून येईल.
जसे भारतात मोदी 2014 ला निवडून आले आणि 2019 ला परत जास्त बहुमताने आले हे पुरोगाम्यांच्या पचनी पडलेले नाही तसेच अमेरिकेतही ट्रंप अध्यक्ष झालेले यांना मंजूर नाही.
हिंसाचार माजविणारे, त्यांची पाठराखण करणारे, त्यांना पैसा पुरवणारे, त्यांचे समर्थन करणारे, पत्रकार लेखक कलाकार ही सगळी एकच गँग जगभर भयंकर सक्रिय झालेली दिसते आहे. लोकशाही न मानणारे आणि सगळ्या जगाला कोरोनाच्या फासात अडकविणारे चीनसारखे हुकूमशाही देश यांच्या पाठीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असलेले दिसून येत आहे.
अगदी टीकटॉक सारखे साधे निरूपद्रवी वाटणारे मोबाईल ऍपही या चीनी कटाचा भाग आहे हे आता लक्षात येत चालले आहे. हे एक वेगळेच युद्ध आहे.
अमेरिका आणि भारत यांच्यातील हिंसाचाराला जोडणारा धागा म्हणजेच डाव्या विचारांच्या जहाल संघटना. आपल्याकडे स्वत:ला पुरोगामी समजणारे अमेरिकेतील या हिंसाचाराचा, समाजकंटकांचा उल्लेखही न करता ट्रंप सरकारवर टीका करताना तूम्हाला आता आढळून येतील. अमेरिकेतील या घटनेवर ट्रंप विरोधी विखारी लिखाण समोर येत जाईल.
अली शोराब यांच्या ट्विटर हँडलवर असे ट्विट आढळून आले आहे की ज्यात उघडपणे अमेरिकन हिंसाचाराचे समर्थन केले आहे. भारतात होणार्या मुस्लिमांच्या ‘न्यायालयीन हत्यां’ (प्रत्यक्ष वाक्यं ट्विट मध्ये वाचा) विरोधात असे आंदोलन करण्याचे हा देशद्रोही उघडपणे म्हणतो आहे. राणा आयुब किंवा अशोक स्वाईन यांनीही अशाच पद्धतीचे ट्विट केलेले आहे. (या ट्विटरची छायाचित्रे सोबत जोडली आहेत.)
हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. अमेरिकेतील हिंसाचार हा अशा पद्धतीनं आपल्याशी जोडल्या गेला आहे. कुमार केतकर मोदी पंतप्रधान होणे यात आंतरराष्ट्रीय कट शोधत होते पण आता तर मोदी विरोध किंवा ट्रंप विरोध करत हिंसाचार पसरविण्याचाच कट उलगडत चालला आहे. अर्थात यावर केतकर काहीच बोलणार नाहीत.
अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षपदासाठी निवडणुका येवू घातल्या आहेत. पुरोगाम्यांच्या लाडके व्लॉगर ध्रुव राठी यांनी आपल्या व्हिडीओत कुठल्यातरी सर्वेचा आधार घेत हे कबुलच केले आहे की ट्रंप यांच्या लोकप्रियतेच्या जवळपासही दुसरा कुणी नेता त्यांच्या पक्षात नाही. तेंव्हा रिपब्लिकन पक्षाकडून ट्रंप हेच अध्यक्षपदाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चितच आहे. ट्रंप यांच्या बाजूने बहुतांश अमेरिकन आहेत हे पण लक्षात येत चाललं आहे. त्यामुळेच डावी लॉबी अस्वस्थ असून चीनच्या पाठिंब्याने हा हिंसाचाराचा कट आखला गेला असण्याची दाट शक्यता आहे. तपासात हे लवकरच उलगडत जाईल. पण जसं गुन्हेगाराचे मदतनीस तपास पुढे पुढे सरकत जावू लागला की अस्वस्थ होतात आणि त्यांच्याकडून अप्रत्यक्षपण काही पुरावे समोर येत जातात तसे होताना दिसत आहे.
जगभरच्या माध्यमांना चीनकडून मिळणारा निधी, हिंसाचार माजविणार्या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या खात्यात अचानक आलेला पैसा या सगळ्या बाबी हळू हळू समोर येत चालल्या आहेत. हे जे भारतात घडताना दिसत आहे त्याची अमेकिरन आवृत्ती म्हणजे हे दंगे.
अनय जोगळेकर यांनी एम.एच.48 या यु ट्यूब चॅनलवर एक फार चांगली चर्चा घेतली आहे ती लिंक शेअर करतो आहे. जरूर ऐका. प्रस्थापित पत्रकार ही माहिती दडपून ठेवत आहेत.
https://youtu.be/zbz48qQaMPs
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575