उरूस, 16 एप्रिल 2020
संविधान बचाव म्हणून आंदोलन करत असताना पुरोगामी स्वत: मात्र कायद्यातील पळवाटा शोधून मार्ग काढत राहिले आहेत. याचे अतिशय ताजे उदाहरण म्हणजे आनंद तेलतुंबडे यांची राष्ट्रीय शोध यंत्रणेसमोर शरणागती. (शरणागती असाच शब्द आहे. अटक नाही.)
शहरी नक्षलवाद हा विषय 2005 पासून अधिकृतरित्या पोलिस खात्यात ऐरणीवर आला. म्हणजे प्रत्यक्षात ही ‘फाईल’ तयार झाली आणि शोध सुरू झाला. त्यावेळी कुठले लोक सत्ताधारी होते दिल्लीत आणि महाराष्ट्रात हे समजून घ्या. म्हणजे या विषयात सध्या निखील वागळे सारखे पत्रकार जो आरडा ओरडा करत आहेत तो किती निष्फळ आणि चुक आहे हे सहजच लक्षात येईल. मुळात हा शब्दच पहिल्यांदा कुणी वापरला? तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘अर्बन नक्षलवाद’ हा शब्द संसदेत वापरला. त्यानंतर गृहमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनीही हा शब्द वापरला. आणि तेंव्हापासून हा शब्द सर्वत्र वापरण्यात आलेला आढळतो आहे.
आंबेडकर जयंतीच्या दिवशीच बाबासाहेबांच्या नात जावायाला अटक असला तर्कही वागळे आणि तेलतुंबडे यांचे समर्थक हितचिंतक वापरत आहेत.
मुळात तेलतुुंबडे यांच्यावर प्रत्यक्ष खटला उभा राहिला नोव्हेंबर 2018 मध्ये. तेंव्हापासून सर्वोच्च न्यायालयात दोन वेळा, उच्च न्यायालयात दोन वेळा आणि जिल्हा न्यायालयात एक वेळा अशी पाच वेळा तेलतुंबडेंना स्वत:चा बचाव करण्याची संधी मिळाली. जी एरव्ही कुठल्याही सामान्य माणसाला मिळणे अवघड असते. दीन दलित दुबळ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे तेलतुंबडे ही दीर्घ न्यायालयीन लढाई कुणाच्या पैशावर लढले हे पण एकदा त्यांच्या पाठिराख्यांनी दीन दलित दुबळ्या जनतेला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे.
6 एप्रिल 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने शेवटची एक आठवड्याची मुदतवाढ तेलतुंबडे यांना दिली. या नंतर शोध यंत्रणेसमोर शरणागती पत्करण्यास सांगितले. आता सर्वच मार्ग खुंटले असल्या कारणाने तेलतुुंबडे आणि त्यांच्या सोबतचे दुसरे संशयीत आरोपी गौतम नवलखा यांना शरणागती पत्करावी लागली.
यांना नेमकी 14 एप्रिललाच अटक करण्यात आली असा कांगावा वागळे प्रभृती करत आहेत. मुळात दीड वर्षांपासून तेलतुंबडे शोध यंत्रणेशी कायदेशीर लपंडाव खेळत आहेत. त्यांना दिलेली मुदत 13 एप्रिलला संपली. त्यांना जर 14 एप्रिल या बाबासाहेबांच्या जयंतीचे इतके पावित्र्य होते तर त्यांनी ही शरणागती आधीच पत्करायची. त्यांना कुणी रोकले होते?
जनतेला एक पत्र लिहून त्यांनी आवाहनही केले आहे. शिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सी.पी.आय.) यांनी 11 एप्रिलला पत्रक काढून यांना अटक करू नये अशी मागणी केली आहे.
आता या पूर्वी ज्या कुणा तथाकथित हिंदूत्ववादी नेत्यावर न्यायालयाने अशी कारवाई केली तेंव्हा कायदेशीर प्रक्रियेत कुणी बाधा आणली होती का? अगदी शंकराचार्य यांना भर दिवाळीत हिंदूंच्या मोठ्या सणाच्या वेळी अटक करण्यात आली तेंव्हा कुणी आक्षेप घेतला होता का? राम जन्मभूमी प्रकरणात 28 वर्षे इतकी दीर्घ न्यायालयीन लढाई चालली. अगदी ताजे उदाहरण साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांचे आहे. त्यांची कायदेशीर लढाई ते लढले. 8 वर्षांनी त्यांना जामिन मिळाला. यासाठी कुणी अशी पत्रकबाजी करून आकांडव तांडव केले होते का?
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावेच लागले होते. ज्या पद्धतीनं नजिकच्या काळात पी. चिदंबरम, कन्हैया कुमार आणि आता तेलतुंबडे आदींनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत तपास यंत्रणेसमोर अडचणी उभ्या केल्या तशा इतर कुणीही केल्या नाहीत. म्हणजे एकीकडे संविधान बचाव असे आंदोलन करायचे आणि दुसरीकडे आपल्यावर कायद्याला सामोरे जायची वेळ आली की होईल तेवढ्य पळवाटा शोधून अडथळे निर्माण करायचे. ही नेमकी कुठली प्रवृत्ती आहेत?
बर जेंव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समोर येतो तेंव्हा हे पुरोगामी तो मोकळ्या मनाने स्विकारतात का? राम जन्मभुमी प्रकरणात यांचे पितळ उघडे पडले आहे. न्याय मिळाला नाही म्हणून ओवेसी यांनी ओरड केली आणि त्यांच्या सुरात सर्व पुरोगाम्यांनी सूर मिसळला.
तेलतुंबडे बाबासाहेबांचे जावाई आहेत हा शोध आत्ताच नेमका कसा काय लागतो? मग ते फरार असलेल्या जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडे याचे भाउ आहेत हे का नाही सांगितले जात?
गोरगरिबांचा कळवळा असणारे कामगारांच्या हितासाठी काम करणारे तेलतुंबडे परराष्ट्रीय कंपन्यांत उच्च पदस्थ अधिकारी कसे काय असतात? मग हेच पुरोगामी भांडवलदार म्हणून टीका कशी काय करतात? तेलतुुंबडे स्वत:ला कम्युनिस्ट मानतात की नाही? का विचार वेगळा आणि व्यवहार वेगळा असंच त्यांना सुचवायचं आहे?
यवतमाळ जिल्ह्यांत वणीमध्ये शाळेत जात असतांना अंगात घालायला कपडे नसणारे तेलतुंबडे सिनेमाचे पोस्टर रंगवून पैसे गोळा करतात आणि खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून शाळेत जाणार्या दलित मुलांसाठी निळ्या टोप्या तयार करून आणतात व बंड करतात. कारण काय तर तथाकथित संघावाल्यांनी इतर कांही मुलांना काळ्या टोप्या घालायला लावल्या असतात. आता साधा प्रश्न आहे की शाळेचा गणवेश खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असेल तर तेलतुुंबडे पांढरी टोपी का नाकारतात? संघाच्या लोकांनी काही मुलांना काळी टोपी घालायला लावली म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी पांढर्या टोप्यांची संख्या वाढविण्याऐवजी तेलतुंबडे निळ्या टोपीचा वेगळा मार्ग का स्विकारतात? गणवेशचा भाग असलेली पांढरी टोपी का नको? (सुषमा अंधारे यांनी याबबत एक तयार व्हिडीओ करून यु ट्यूबवर टाकला आहे. इच्छुकांनी तो पहावा.)
आता परत विषय आजच्या शरणागतीपाशी येवून थांबतो. अहिंसेच्या मार्गाने आपले आदांलन चालविणार्या मेधा पाटकर या तेलतुंबडे यांच्यावरील कारवाई विरोधात आवाज उठवतात. त्यांनी हे जाणून घेतले का की तेलतुंबडे गांधींची टोपीच काय पण अहिंसा हे तत्त्व मानत नाहीत?
बाबासाहेबांच्या विचारापेक्षा माओच्या विचारांची आज जास्त गरज आहे हे तेलतुंबडे यांचे प्रतिपादन त्यांची भलावण करणार्या आंबेडकरवाद्यांना मंजूर आहे का? महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलना नंतर सवर्णांनी दलितांवर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दलितांनाही हिंसेचाच मार्ग हाताळायचा होता हे तेलतुंबडे सांगतात. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना हा मार्ग हाताळण्यापासून रोकले ही चुकच झाली अशी मांडणी ते करतात. हे आजच्या तेलतुंबडेंसाठी आरडा ओरड करणार्या पुरोगाम्यांना मान्य आहे का?
आंबेडकरवादी, गांधीवादी, समाजवादी पुरोगामी या सर्वांनी हे स्पष्ट ध्यानात घ्यावे की तेलतुुंबडे कितीही आव आणत असले तरी ते या मार्गाने जाणारे नाहीत. त्यांचे सर्व लिखाण आणि आता तपास यंत्रणेनेने गोळा केलेले पुरावे पाहता त्यांचे नक्षलवादाला असलेले समर्थन स्पष्ट दिसून येते.
तेलतुंंबडे यांनी कायदेशीर प्रक्रियेत दीडवर्ष तपास यंत्रणेला झुलवले. पण बाबासाहेबांच्या जयंतीलाच नेमकं शरणागती पत्करण्याची वेळ तेलतुंबडे यांच्यावर आली. जे लेाकशाहीला मानत नाहीत, अहिंसेला मानत नाहीत अशा नक्षलवादी आंदोलनाचे पाठिराखे कायद्याच्या बळकट पकडीत सापडतात हेच आपल्या संविधानाचे मोठे यश आहे.
तेलतुुंबडे यांचे जे पाठिराखे संविधान लोकशाही मानतात त्यांनी हे ध्यानात घ्यावे प्रक्रियेचा भाग म्हणून तेलतुंबडेंना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून कायदेशीर लढाई लढण्यास कुणीही रोकलेले नाही. आजही त्यांना त्यासाठी पूर्ण मोकळीक आहे. तसेही त्यांनी दोनदा सर्वोच्च न्यायालयात केवळ अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी धडपड करून आपले कायदेशीर हात किती ‘वर’ पर्यंत पोचले आहेत हे सिद्ध केलंच आहे. चिदंबर, कन्हैय्या कुमार प्रकरणीही पुरोगाम्यांनी कायदेशीर लढाईतील आपली कालव्यय करण्याची ताकद दाखवून दिली आहेच.
तेलतुुंबडेंसोबत गौतम नवलखाही दिल्लीत शरण झाले आहेत. आधीच तुरूंगात असलेल्या त्यांच्या इतर सहकार्यां सोबत आता यांनाही गजाआड रहावे लागणार आहे.
बाबासाहेबांच्या संविधानापुढे आपली सगळी शस्त्रं बनावट ठरल्याने पुरोगाम्यांची मती गुंग झाली आहे. नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्याची तपास यंत्रणेचे एक पाउल पुढे पडले आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575