दै. महाराष्ट्र टाईम्स संवाद रविवार १२ एप्रिल २०२०
तबलीगच्या विघातक हरकतींमुळे देशभर सध्या मोठ्या प्रमाणात संताप आहे. चर्चा चालू आहे. तबलीगच्या दिल्लीतील मरकज (मरकजचा मुळ अर्थ केंद्र, उद्दीष्ट, ध्येय) चा उल्लेख करताना वारंवार निजामोद्दीन औलियाचा उल्लेख येतो आहे. त्याचे कारण म्हणजे तबलिगच्या या मरकजची घटना घडली तो परिसर निजामोद्दीन नावाने ओळखला जातो. आणि त्याचे कारण म्हणजे सुफी संत हजरत निजामोद्दीन औलिया यांचा दर्गा याच भागात आहे.
तबलीग आणि निजामोद्दीन ही दोन नावे सोबत घेतली जात असल्याने निजामोद्दीन औलियावरही टीका होवू लागली आहे.
नेमकं इथेच गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. कारण तबलीग ही कट्टरपंथी इस्लामची शिकवण देणारी चळवळ असून हीचा मुळातच सुफी पंथाला विरोध आहे. किंबहुना भारतातील दोन प्रमुख सुफी दर्गे ख्वाजा गरीब नवाज मोईनोद्दीन चिश्ती (अजमेर) आणि ख्वाजा हजरत निजामोद्दीन औलिया (दिल्ली) यांच्या वाढत चाललेल्या भक्तवर्गामुळे, या दर्ग्यांच्या लोकप्रियतेमुळे याला विरोध करण्यासाठी 1926 ला तबलीगची सुरवात भारतात झाली.
तबलीगवर मोठ्या प्रमाणावर आता लिहून येतं आहे पण ही ज्याची प्रतिक्रिया होती त्या सुफी दर्ग्यांबद्दल मात्र अजूनही फारशी माहिती नाही. गैरसमजच फार आहेत. मुळात इस्लामला गाणं बजावणं प्रतिकांची पूजा मंजूर नाही. पण हिंदू प्रभावात भारतीय उपखंडात इथल्या मुसलमानांना सुफी संप्रदाय जवळचा वाटला. मग संतांच्या पूण्यतिथीला उत्सव साजरा करणे ही हिंदू परंपरा उचलून सुफी संतांचे ‘उरूस’ सुरू झाले. दर्ग्यावर चादर चढवणे, फुले वाहणे, उदबत्ती लावणे, नवस बोलणे (मन्नत), गंडा बांधणे, स्त्रीयांचे गळ्यात काळी पोत बांधणे, भजनं गावून परमेश्वराला आळवणे हे सगळे सुफी दर्ग्यात वाढत गेले.
हजरत मोहम्मद पैंगबरांपासून सुफींची परंपरा सांगण्यात येते. सुफींचे पमुख पाच पंथ आहेत. 1. चिश्ती 2. कादरी 3. फिरदौसी 4. सुर्हावर्दी 5. शत्तारी. यातील ज्या दर्ग्याची चर्चा तबलीग प्रकरणा निमित्त होते आहे तो निजामोद्दीन औलिया हा दर्गा चिश्ती संप्रदायाचा आहए. भारतातील प्रमुख चिश्ती सुफी संत म्हणजे अजमेरचे ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती. यांना 17 वे ख्वाजा म्हणतात. त्यांच्यानंतर 18 वे ख्वाजा बख्तीयार काकी (दिल्ली), 19 वे ख्वाजा बाबा फरीद गंजेशक्कर (पाकपत्तन पंजाब). यानंतर ज्यांना 20 वे ख्वाजा म्हणून ओळखले जाते ते म्हणजे निजामोद्दीन औलिया. पुढे 21 वे ख्वाजा म्हणजे बुर्हानोद्दीन गरिब. यांचा दर्गा औरंगाबाद जवळ खुलताबाद येथे आहे. याच दर्ग्यात पहिले निजाम मीर कमरोद्दीन असफजहा यांची कबर आहे. या परंपरेतील शेवटचे म्हणजेच 22 वे ख्वाजा म्हणून जैनोद्दीन चिश्ती हे ओळखले जातात. यांचा दर्गा खुलताबादलाच आहे. याच दर्ग्यात सम्राट औरंगजेबाची कबर आहे.
सुफी दर्ग्यात जावून नवस बोलणे ही परंपरा इस्लामला मंजूर नाही. सम्राट अकबराने पुत्रप्राप्तीसाठी आग्र्याचे ख्वाजा सलिमोद्दीन चिश्ती दर्ग्यात मन्नत मागितली होती (कांही जण हाच संदर्भ अजमेरच्या दर्ग्यात जोडतात. जोधा अकबर आणि मोगल ए आजम चित्रपटांत याचे चित्रण आहे.) आणि पुढे पुत्र प्राप्ती झाल्यावर हा नवस पायी जावून फेडला. मुलाचे नाव सलिम ठेवले. हाच पुढे जहांगीर या नावाने गादीवर बसला. (सलीम अनारकली या काल्पनिक प्रेम कहाणीने हा बादशहा परिचित आहे.) शाहरूख खान याच्या बंगल्याचे नावही ‘मन्नत’ असेच आहे.
आजही हिंदू मुसलमान सुफी दर्ग्यात नवस बोलतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी पुत्रप्राप्तीसाठी नगरच्या शाहशरिफ दर्ग्याला नवस बोलला होता. म्हणूनच पुढे मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली.
दर्ग्याला नवस बोलणे हे एक वेळ ठीक आहे. त्या संतांच्या नावाप्रमाणे मुलांची नावे ठेवणे ठीक आहे. पण हैदराबादचे दिवाण महाराजा किशनप्रसाद यांनी आपल्या मुलाचे नावच 6 वे निजाम मेहबुबअली पाशा यांच्या नावावरून मेहबुबप्रसाद असे ठेवले होते.
हजरत निजामोद्दीन औलिया यांचे शिष्य म्हणजे प्रसिद्ध संगीतज्ज्ञ कवी अमीर खुसरो. आपल्या शास्त्रीय संगीतात अमीर खुसरो यांचे योगदान मोठे आहे. आजही हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या नावाने कित्येक बंदीशी गायल्या जातात. अमीर खुसरो यांनी आपल्या गुरूचे वर्णन करताना येशू ख्रिस्त आणि ख्वाजा खिज्र यांचे सर्व गुण शेख निजामोद्दीन औलियात एकवटले असल्याचे नमुद करून ठेवले आहे. मुहम्मद इकबाल यांनी यामुळेच या निजामोद्दीन औलिया यांचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे.
तेरी लहद की जियारत है जिंदगी दिल की
मसीह व खिज्र मे ऊंचा मुकाम है तेरा ॥
(तुझ्या समाधीचे दर्शन करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आकांक्षा आहे. कारण तुझे स्थान हे खिज्र आणि मसीह यांच्यापेक्षा कितीतरी अधिक उंच आहे.)
तबलीग आणि सुफी यांचा विरोध असण्याचे कारण केवळ वरवर नसून मुळात जे इस्लामी तत्त्वज्ञान आहे त्याला छेद देत काही गोष्टी सुफींनी स्विकारल्या ज्या की वेदांतापासून घेण्यात आल्या आहेत यामुळे आहे. डॉ. आजम यांनी असे नमुद केले आहे की, ‘...उपरोक्त तथ्यांच्या आधारावर असे म्हणता येऊ शकते की सूफींच्या परम उद्दिष्टासंबंधी धारणेस बौद्धांच्या निर्वाण आणि उपनिषदांच्या मोक्ष या धारणेशी जोडले जाऊ शकते आणि याची शक्यता अधिक आहे की या दोहोंचा प्रभाव या दृष्टीकोनातून सूफींवर पडलेला असावा.’ (पृ. 262, ‘सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन’- डॉ. मोहम्मद आजम, पद्मगंधा प्रकाशन, आ.1)
सुफी एक भारतीय पंथ आहे असे समजून त्याचा विचार झाले तर आपल्याला भारतीय मुसलमानांच्या मानसिकतेचा उलगडा होवू शकतो. हा मुसलमान कव्वाली- दर्गे- उरूस-मजारी-नवस-गंडे-चादर चढवणे यांच्या
माध्यमांतून आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित करू पाहतो आहे. आणि ही परंपरा किमान 800 वर्षांची वारकरी संप्रदाया सारखीच प्राचीन आहे. (ख्वाजा मोईनोद्दीच चिश्ती यांनी 1192 मध्ये या संप्रदायाची भारतीय उपखंडात स्थापना केली.)
भारतातील सर्वात मोठा उरूस हजरम ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांचा अजमेरला भरतो. दसर्या क्रमांकाचा उरूस महाराष्ट्रात परभणीला कादरी परंपरेतील सुफी संत तुरतपीर यांचा भरतो. यांनी रामदासांच्या दासबोधाचा ‘मन समझावन’ नावानं उर्दूत अनुवाद केला आहे. तिसर्या क्रमांकाचा उरूस खुलताबादला जरजरी बक्ष यांचा भरतो. े
तबलीग चळवळ ही या सुफींच्या विरोधातील आहे. हे कट्टरपंथी देवबंदवाले इतर सुफी मानणार्या बरेलवी मुसलमानांना आपले समजत नाहीत. तबलीगचा पहिला विरोध हा हिंदूंना नसून हिंदू प्रभावातील सुफी मानणार्या मुसलमानांना आहे हे लक्षात घेतले तर आपल्याला या संघर्षाला समजून घेणे सुलभ होईल.
(या लेखनासाठी डॉ. मोहम्मद आजम, डॉ. यु.म. पठाण, रा.चि. ढेरे, डॉ. श्रीधर कुलकर्णी यांच्या पुस्तकांचे संदर्भ घेतले आहेत.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575