उरूस, 26 मार्च 2020
एक गाव आहे अगदी खरं खुरं, तिथे असलेली खरी खुरी माणसं घेवून त्यांच्याच आयुष्यातील खरे खुरे प्रसंग जराफार कलात्मक पद्धतीनं मांडत एखादी कलाकृती तयार होवू शकते यावर तूमचा विश्वास बसतो का? आणि ही कलाकृतीही परत अगदी किमान पैशात, किमान तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेली. शिवाय अतिशय आशय संपन्न. या कलाकृतीचे नाव आहे ‘गावाकडच्या गोष्टी’. जगभरात वेब मालिका लोकप्रिय व्हायला लागल्या, त्यांत प्रचंड भांडवली गुंतवणूक व्हायला लागली त्याला प्रमाणाच्या बाहेर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळायला लागला हे आपण ऐकून होतो. मोठ मोठ्या चित्रपटांपेक्षा यांचा तांत्रिक दर्जा अफलातून होता. हे सगळं इंग्रजीतच असतं असा आपला समज होता.
पण ‘गावाकडच्या गोष्टी’ या अस्सल मराठी मातीतील वेब मालिकेने हे सगळे समज खोडून काढले. सातारा जिल्ह्यातलं केळेवाडी हे एक आपलेच दुर्गम गाव दिग्दर्शक नितीन पवार याने निवडले. गावातील आणि जवळपासची नाटकांत काम करणारी कलाकार मित्रमंडळी निवडली. आणि बघता बघता चार लाख सबस्क्रायबर चा टप्पा पार करणारी एक वेब मालिका तयार झाली.
या मालिकेबद्दल आता भरपूर इतर माहिती यु ट्यूब वर उपलब्ध आहेत. मालिकेचे 67 भाग झाले आहेत. गेले तीन दिवस झपाटल्यासारखे हे भाग मी पहात होतो. सातार्याच्या भाषेतील खणखणीत संवाद, ठळक व्यक्तिरेखा, गावाकडची सुंदर सुंदर निसर्ग स्थळं, आख्खं गाव म्हणजे विविध लोकेशन्सनी गजबजलेला एक मोठा सेटच. यात काम करणारे कलाकारच नाही तर आख्खा गावच यात गुंतलेला.
आत्तापर्यंत न पहायला मिळालेलं काहीतरी वेगळं सुंदर अस्सल आपण पहातोय अशीच भावना ही मालिका पहाताना होते.
मकरंद अनासपुरे याने लोकप्रिय केलेली ग्रामीण बोली, फॅण्ड्रीनंतर ‘सैराट’च्या रूपानं नागराज मंजूळेच्या शैलीला मिळालेले अफाट व्यवसायीक यश, चला हवा येवू द्या सारख्या कार्यक्रमांतून ग्रामीण पार्श्वभूमी संवाद वगनाट्याची शैली यांना लाभलेला प्रतिसाद ही सगळी पार्श्वभूमी ‘गावाकडच्या गोष्टी’च्या यशाला आहे हे समजून घेतले पाहिजे.
अतिशय मचूळ अशा मालिकां पाहून कंटाळलेला वर्गाला झणझणीत मटणरस्सा आणि त्यात कुस्करून चुरलेली भाकरी वोरपायला मिळावी तसं झालं आहे.
खरं तर सैराट नंतर नाळ हा अतिशय गोड सिनेमा नागराज मंजूळेने दिला. त्याची तशी फारशी चर्चा झाली नाही. कमी भांडवलात तयार झालेल्या या चित्रपटाने अतिशय चांगला व्यवसाय करून ग्रामीण मराठी भाषा/प्रसंग/दृश्य ही बाजारपेठ विस्तारत आहे हे सिद्ध केलं होतं. मग असे चित्रपट यायला लागले. विस्तारभयास्तव सगळी नावं मी घेत नाही.
नितीन पवार यांचे हे सगळ्यात मोठे यश आहे की त्यांनी आहे त्याच व्यक्तिरेखांचा वापर करून एकाच गावातील खरी खरी लोकेशन्स वापरून 67 भागांची हजार मिनीटांची मालिका तयार केली. जवळ जवळ 10 मोठ्या चित्रपटांच्या लांबीइतका हा कलात्मक अविष्कार आहे. आणि अजूनही पुढे जावू शकेल अशा कितीतरी शक्यता यात पाहणार्याला आढळून येतात. दुसरे मोठे यश म्हणजे पाहणार्याला हा दिग्दर्शक खिळवून ठेवतो.
मालिकेत या क्षेत्राचे अभ्यासक त्रुटी दाखवून देवू शकतील. सामान्य रसिकांनाही तसं काही शोधून काढता येईल. पण तो मुद्दा मला महत्त्वाचा वाटत नाही. या मालिकेवर आर.के. नारायण यांच्या मालगुडी डे ची किंवा स्वामी मालिकेची छाप आहे वगैरे वगैरे खुप मांडता येईल. यात अजून काय घेता आलं असतं हे पण सांगता येईल. हेही फार महत्त्वाचं नाहीये. या मालिकेने एक मोठी वाट मराठी निर्माते दिग्दर्शकांना दाखवून दिली आहे हे महत्त्वाचे आहे. सामान्य रसिकांनी याला मोठा प्रतिसाद देवून व्यवसायीक संधी मोठी असल्याचे सिद्ध केले आहे.
मालिकेचा सगळ्यात मोठे यश तिच्या आशयसंपन्नतेत आहे. याचे सर्व श्रेय दिग्दर्शक नितीन पवार याला जाते.
या वेब मालिकेपासून प्रेरणा घेवून आता गावोगावच्या विविध कलाकारांना त्यांच्या कलागुणांना कशी संधी देता येईल याचा सर्वांनी विचार करावा. पैशाअभावी अडकून बसलेली कितीतरी प्रकल्प या दिशेने वाटचाल करू शकतील.
मी ज्या परभणीचा आहे त्या जिल्ह्यातील गंगाखेड या संत जनाबाईंच्या गावात गोदावरीबाई मुंढे या एक अतिशय गोड गळ्याच्या गायिका आहेत. त्यांच्या गवळणी वारकरी संप्रदायात अतिशय लोकप्रिय आहेत. मृदुंग, टाळ, एकतारी इतक्या किमान वाद्यसंगतीत गोदावरी बाईंचा आवाज लागला की समोर हजारो लोक तल्लीन होवून जातात. अभंग ‘धरीला पंढरीचा चोर’ म्हणत असताना सामान्य रसिकांचे चित्त त्यांनी बंदिस्त कधी करून घेतले हे लक्षातच येत नाही तसे नितीन पवार या दिग्दर्शकाने ‘गावाकडच्या गोष्टी’तून साध्य केले आहे.
तूम्ही ही मालिका जरूर पहा. तूमच्या प्रतिक्रिया द्या. अस्सल मराठी मातीतील एका कलाकृतीला दाद द्या.
मालिकेच्या कथानकाबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे. मी ती परत सांगण्यात काही हशील नाही. प्रत्यक्ष पहा आणि मग तूम्हीच तूमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा. मराठी माणसाचा कंजूषपणा सोडा. मोकळेपणाने ‘दिल खोलके’ दाद द्या.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575