Thursday, March 5, 2020

दि‘शाहीनबाग’!


उरूस, 5 मार्च 2020

महाभारतातील प्रसंग आहे. सगळे युद्ध संपून गेलं. कौरवांचा शेवटचा सेनापती शल्य याचाही वध युद्धिष्ठीराने केला. दुर्योधन द्वैपायन सरोवरात लपून बसला. शिल्लक राहिलेले कृपाचार्य आणि अश्वत्थमा सारखे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके लोक त्याला शोधत निघाले. सरोवरात लपून बसलेल्या दुर्योधनाला गाठून अश्वत्थाम्याने आश्वासन दिले की मी पांडवांवर सुड उगवेन. तेंव्हा अगदी आपल्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी दुर्योधनाने त्याला आपला (म्हणजे सगळं संपलेल्या सेनेचा) सेनापती म्हणून नेमले.

या आश्वत्थाम्याने आपल्या हातीचे शेवटचे शस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र द्रौपदीच्या पाचही मुलांवर ते झोपेत असताना सोडलं (द्रौपदीला पाचही पांडवांपासून प्रत्येकी एक असे पाच पुत्र झाले होते.) त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेवटी हे ब्रह्मास्त्र अभिमन्युची पत्नी उत्तरा हीच्या गर्भाकडे वळविण्यात आले. तिचा गर्भपात झाला. कृष्णाने तो गर्भ सांभाळून त्यापासून मुल जन्माला येईल असे पाहिले. हे झाल्यावर अश्वत्थाम्याला शाप मिळाला. त्याच्या माथ्यावरचे प्रकाशमान दिव्य रत्न काढून घेतले गेले. तिथे एक कायम न मिटणारी जखम झाली. आणि त्या जखमेसाठी हा चिरंजीव अश्वत्थामा तेल मागत अजूनही फिरतो आहे अशी ती महाभारतातील दंतकथा आहे.

2014 आणि नंतर 2019 ची सार्वत्रिक निवडणुक हारल्यावर सगळे पुरोगामी म्हणवून घेणारे पक्ष राजकीय दृष्ट्या पिछाडीस ढकलल्या गेले. आता त्यांनी आपली लढाई माध्यमे, डावे विचारवंत, इतिहासतज्ज्ञ, सामाजिक संघटना, स्त्रीया यांच्यावर सोपवली.

शाहीनबागेत सुरू असलेलं रस्ता रोको आंदोलन हे एक शेवटचं ब्रह्मास्त्र होतं. तेच आता निकामी झालं आहे. आणि हे वापरणारे सगळे अश्वत्थामे आता दिशाहीन झाले आहेत. आता पुढे काय करायचे कुणालाच सुचेनासे झाले आहे. दिल्लीत विजय मिळताच अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका बदलली. कन्हैय्या कुमार यांच्यावर खटला चालविण्याची त्यांनी परवानगी देवून टाकली. ते शाहीनबागेत फिरकलेही नाहीत. कॉंग्रेसने खुप प्रयत्न करून पाहिला पण शाहीनबाग आंदोलनाचा निवडणुकी काहीही फायदा झाला नाही.

कुठलेही आंदोलन हिंसक झाले की सत्ताधार्‍यांना सोयीचे जाते. कारण त्या मुळे असे आंदोलन दडपून टाकायला एक मोठीच संधीच त्यांना उपलब्ध होते. आता तर न्यायालयात अधिकृतरित्या खटलाच दाखल झाला आहे. या सगळ्या प्रकरणात सरकारी पक्ष शांतपणे बसून आहे. आंदोलन करणार्‍यांचाच धीर संपून गेला आहे. काही दिवसांत या आंदोलनाच्या बातम्याही माध्यमांतून कमी झालेल्या दिसतील.

मुळात कुठल्याही एखाद्या मागणीसाठी आंदोलन करत असताना धरणे धरत असताना ते कधीपर्यंत ताणायचे याचेही एक तंत्र असते. पुढे जातानाच मागे वळायची परतायची वाट आणि वेळ ठरवून घ्यावी लागते. नसता केवळ भ्रम तयार करून हवेवर आंदोलन पुढे नेता येत नाही. महात्मा गांधी यांच्या आंदोलनांची तीव्रता सतत कायम राहिली कारण त्यांना आंदोलन कधी मागे घ्यायचे हे नेमके माहित असायचे.

आंदोलनात आपली मागणी रेटत असताना इतर सामान्य नागरिकांना किती आणि कसा त्रास होतो याचीही जाणीव असावी लागते. गेली तीन महिने दिल्ली सारख्या महानगरात एक प्रमुख मार्ग अडवून ठेवणे म्हणजे इतर सामान्य नागरिकांचा रोष ओढवून घेणे हे ध्यानात घेतले गेले नाही.  परिणामी सामन्य नागरिकांची सहानुभूती संपत गेली.

दुसरा गंभीर मुद्दा म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होणार आहे अशा सर्व वर्गापर्यंत हा विषय पोचला तर त्यांची सहानुभूती अशा आंदोलनाला प्राप्त होवू शकते. पण सीएए संदर्भात कुणावर अन्याय होणार आहे? देशातील कुणाच नागरिकाचा त्याच्याशी काहीच संबंध नसेल तर त्यांची सहानुभूती मिळणार कशी? आणि नसेल तर आंदोलन व्यापक होणार कसे?

आंदोलनाबाबत काही मुद्दे तांत्रिक असतात. हरिश साळवे सारखे प्रख्यात कायदेतज्ज्ञ यांनी नि:संदिग्धपणे सीएए चा देशातील मुसलमानांचा किंवा इतर कुठल्याही नागरिकाचा काहीच संबंध नाही हे तांत्रिक भाषेत समजावून सांगितले आहे. मुलाखती दिल्या आहेत. लेख लिहीले आहेत. भाऊ तोरसकर सारख्या पत्रकारांनी आंदोलन लांबत गेलं तर सत्ताधार्‍यांनाच कसा फायदा आहे हे सविस्तर लिहीलं आहे. युट्यूब चॅनलवर मांडलं आहे. इतकंच नाही तर या नंतर समान नागरी कायदा कसा येवू घातला आहे हे पण विवरण केलं आहे. पण हे काहीच समजून न घेता अर्धवट ज्ञानावर सीएए ला विरोध करणारे शाहीनबाग आंदोलनाचे समर्थक पुरस्कर्ते आक्रस्ताळेपणा करत समोर येत गेले.

सीएए संदर्भात न्यायालयाचा निकाल काहीही आला तरी रस्ता अडवून ठेवण्याचे कसलेच समर्थन कुणालाच करता येणार नाही. आंदोलन करणार्‍यांना धरणे धरण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या अशी सुचना न्यायालय करेल. त्या आदेशाचे पालन जसे सरकारला करावे लागेल तसेच आंदोलन कर्त्यांनाही करावे लागेल. मग असे आंदोलन किती काळ चालेल?

सीएए ला विरोध करणार्‍यांना हे लक्षात घ्यावे लागेल की हा कायदा रद्द करायचा तर त्यासाठी संसदेत ठराव मांडून तो मंजूर करून घ्यावा लागेल. त्यासाठी संसदेत निवडणुकीद्वारे बहुमत मिळवावे लागेल. येत्या लोकसभेत समजा भाजपचा पराभव होवून इतर कुणा पक्षाला किंवा कुठल्याही आघाडीला बहुमत मिळाले तरी प्रश्‍न सुटत नाही. कारण तोपर्यंत राज्यसभेत भाजपे बहुमत झालेले असेल. म्हणजे सीएए रद्द करणारे विधेयक राज्यसभेत अडून बसेल. जसे की मागल्या संसदेत लोकसभेत मंजूर झालेले हेच विधेयक राज्यसभेत अडकले होते.
शाहीनबाग आंदोलना मागे ज्या कुणाचा मेंदू आहे तो असा चेकमेट झालेला आहे. हाती शस्त्र नसलेला, सगळे सैनिक मरून गेलेला, राजाही नसलेला अशा सैन्याचा सेनापती जो की अश्वत्थामा तसे हे शाहीनबागेचे युद्ध संपल्या नंतरचे बौद्धिक सेनापती आहेत. त्यांच्या माथ्यावरची जखम भळभळत राहणार आहे. यांची काही दिवसांत कुणी दखलही घेणार नाही. भारतातील पुरोगामी शाहीनबागेने पूर्णत: दिशाहीन करून टाकले आहेत. म्हणूनच ही चळवळ आता दिशाहीन बनून गेली आहे. शाहीनबाग इतिहासात दि‘शाहीनबाग’ म्हणून ओळखल्या जाईल. 


   श्रीकांत उमरीकर 9422878575

Monday, March 2, 2020

कन्हैय्या देशद्रोह खटला आणि कम्युनिस्टांचा आक्रोश!


उरूस, 2 मार्च 2020

कन्हैय्या कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सन्माननिय सदस्य आहेत. त्यांच्यावर जेएनयु प्रकरणांत गुन्हा नोंदवून देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची कार्यवाही दिल्ली पोलीसांनी केली. हे सगळे संविधानातील तरतुदीप्रमाणेच चालू आहे. यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थे बाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन झालेले नाही. हा खटला दाखल करण्यासाठी दिल्ली प्रशासनाची परवानगी आवश्यक होती. कारण हा प्रकार घडला तो दिल्ली राज्यात. कुठल्याही राज्यात त्या राज्य सरकारच्या आखत्यारित पोलिस खाते असते. पण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही. त्यामुळे तिथे पोलिस यंत्रणा ही केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत. आणि हा नियम काही आत्ता नविन झालेला नाही. नजिकच्या काळात दिल्लीवर सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने राज्य केलेले आहे (शीला दिक्षीत 15 वर्षे). त्या खालोखाल आम आदमी पक्षाची राजवट राहिली आहे. त्यामुळे हा नियम भाजपने तयार केला असली पळवाटही चालणार नाही.

या पूर्वी हा खटला न्यायालयात चालविण्यासाठी परवानगी नाकारताना अरविंद केजरीवाल यांनी ‘कन्हैय्या कुमार यांच्या विरोधात कसलाही पुरावा नाही. जे काही व्हिडीओ आहेत ते नकली आहेत.’ असं म्हटलं होतं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात केजरीवालांचे हे वाक्य वापरले आहे. आणि केजरीवाल यांनी आता अशी परवानगी देणे हे चुक आहे असे प्रतिपादन केले आहे.

आता प्रश्‍न असा आहे की कन्हैय्या कुमार दोषी आहेत किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार केजरीवाल यांना कुणी दिला? कम्युनिस्ट ‘संविधान बचाव’चे नारे लावत असतात. मग हे संविधान विरोधी वाक्य त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात का आले? जेंव्हा केजरीवाल त्यांच्या नेत्याच्या बाजूने  आपला अधिकार विसरून बोलतात ते चालते आणि आता त्यांनी त्यांच्या अधिकारात केवळ परवानगी दिली तर ते लगेच विरोधी झाले?

कन्हैय्या कुमार यांच्या विरोधात जो काही प्रथमदर्शी पुरावा मिळाला आहे त्यावरून गुन्हा नोंदवणे आणि न्यायालयात खटला दाखल करणे ही एक सामान्य अशी प्रक्रिया आहे. यात संविधान विरोधी काहीच नाही. कन्हैय्या दोषी आहेत किंवा नाहीत याचा निर्णय न्यायालयात होईल. हे न्यायालय संविधानानेच अस्तित्वात आणले आहे. मग ‘संविधान बचाव’चे नारे देत असताना या न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान राखला गेला पाहिजे.
29 फेब्रवारी 2020 ला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने न्यायालयात लढण्याचा निर्णय जाहिर केला. तो स्वागतार्ह आहे. त्यांनी न्यायालयात त्यांच्या नेत्यावर झालेल्या अन्याया बाबत दाद मागावी. लढा द्यावा. आणि जो काही निकाल न्यायालय देईल तो शांतपणे मान्य करावा.

संपूर्ण डाव्या चळवळीचे हे एक मोठेच अपयश आहे. त्यांचा ज्यावर विश्वास नाही त्या लोकशाही व्यवस्थेत त्यांना तोंडदेखलं का होईना ‘संविधान बचाव’ म्हणून आंदोलन करावं लागतं. त्यांच्या नेत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यावर अपरिहार्यपणे लोकशाहीतील न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून कायद्याची लढाई लढावी लागते. रशियात करोडो शेतकरी  आणि चिनमध्ये लाखो विद्यार्थी गोळ्या घालून मारले रणगाडे घालून मारले आणि डाव्या विचारांचा झेंडा फडकत ठेवला गेला. आणि आतो साध्या घोषणा दिल्या तर न्यायालयात खेटे मारावे लागणार आहेत.

म्हणूनच कन्हैय्या प्रकरणात निकाल काहीही लागो. कम्युनिस्टांचा पराभवच आहे. कारण निकाल बाजूने लागला तर आपण जीला मानत नाही त्या व्यवस्थेचा जयजयकार करावा लागेल. निकाल विरोधी लागला तर परत ‘संविधान खतरे मे’ म्हणून छाती बडवत रडावे लागेल.  फैज अहमद फैज च्या शब्दांत जरासा बदल करून म्हणावे लागेल

क्या खुब रंग बदल दिया है डिमोक्रसी ने कम्युनिस्टों का
बस नारे ही लगाये तो कोर्ट के चक्कर काटने पड रहे है

श्रीकांत उमरीकर 9422878575

Sunday, March 1, 2020

आभाळ म्हणाले नाही, भूमीहि म्हणाली नाही । मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही ॥


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी

मी मुक्तांमधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी ।
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी ? ॥

माझ्यावर लिहीते गीते - या मंद समीरण लहरी ।
माझ्यावर चित्रित होते - गरुडाची गर्द-भरारी ॥

जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार?।
माझ्याहुन आहे योग्य - भूमीला प्रश्‍न विचार ॥

आभाळ म्हणाले ‘नाही’ - भूमीहि म्हणाली ‘नाही’ ।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही ॥

पापण्यांत जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले ।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन ‘शब्दा’ आले ॥

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही?।
शाई न स्पर्शली असुनी - हे अभंग नदिच्या ‘बाही’॥

(ती पहाट लालम् लाल - अनपेक्षित झाली काळी)
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली
‘‘मी कागद झाले आहे  चल लिही’’ असे ती वदली ॥
-मनमोहन(आदित्य, कॉन्टिनेंटल प्रकाशन, पृ. 94, पहिली आवृत्ती)

सावरकरांना कविता सुचली आणि ती लिहीण्यासाठी अंदमान तुरूंगात कागद उपलब्ध नव्हता. लोककवी मनमोहन यांनी यावर ही कविता लिहीली. सावरकरांनी आभाळाला विचारले, भूमीला विचारले अशी अतिशय गोड कल्पना मांडत पुढे कोळश्याने भिंतीवर कविता लिहीली असा तो प्रसंग मनमोहन यांनी चितारला आहे.

26 फेब्रुवारी सावरकरांची जयंती. त्यांच्या कविता आणि त्यांच्या विचारांवर भरपुर चर्चा या दिवशी केली जाते. पण मनमोहन यांची ही कविता मात्र फारशी कुठे रसिकांसमोर येताना दिसत नाही.

मनमोहन यांच्यासारख्या दुर्लक्षीत कविची एक ओळ मात्र रसिकांमध्ये अतिशय लोेकप्रिय आहे.

शव हे कविचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतच होता
फुलेहि त्यावरि उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतच होता.

‘हे अंगा भरलेले वारे’या 33 कडव्यांच्या दीर्घ कवितेचा शेवटचा तुकडा म्हणजे या चार ओळी. या ओळींचा वापर आजही केला जातो. पण बर्‍याचदा त्या मनमोहन यांच्या आहेत हेच सांगितल्या जात नाही.

सावरकरांवर लिहीलेल्या या कवितेचे शिर्षक ‘ज्ञानेश्वरानंतर भिंत पुन्हा एकासाठी चालली’ असे आहे. ‘भिंत चालणे’ याचा शब्दश: अर्थ न घेता लक्षणार्थ घेवून त्याचा सुंदर उपयोग मनमोहन यांनी केला आहे.

कविता कळायला तशी सोपी आहे. यात कलेविषयक जागतिक सत्य मनमोहन सांगून गेले आहेत. कुठलाही उच्च प्रतीचा कलाविष्कार त्याची आंतरिक उर्जा इतकी प्रचंड असते की त्याला व्यक्त होण्यापासून रोकता येत नाही. तो सगळ्या अडथळ्यांवर मात करून व्यक्त होतोच. सावरकरांना लिहीण्याची प्रचंड उर्मी होती. कारागृहात बंदिस्त केले, विविध बंधनं घातली तरी या उर्मीला रोकता आले नाही.

सावरकरांचा बंदीवास हा मोठाच सामाजिक राजकीय विषय आहे. पण एरव्हीही कलाकारा लेखकाला विविध बंधने अडथळे अडचणींना तोंड द्यावे लागते. 

नागराज मंजूळे ‘उन्हाच्या कटाविरूद्ध’ या कविता संग्रहात असं लिहून जातो, ‘मी उपसतच राहिलो असतो हा गाळ, माझ्या हातात नसती लेखणी, तर असते छिन्नी, असते गिटार’. कलाकाराला ती उर्मी शांत बसू देत नाही. तो कुठल्याही प्रकारे आपला आविष्कार व्यक्त करतो.  मनमोहन यांना या कवितेतून कलाकाराच्या तीव्र उर्मी बद्दल तीव्रतेनं सांगायचे आहे. ते समजून घेतलं पाहिजे.

काही कलाप्रकार परंपरेने चालत येतात. आजच्या कलाकाराला माहित नसते की तो काय वाहून आणतो आहे. पण तो प्रमाणिकपणे ही कला पुढच्या पुढच्या पिढीकडे सोपवत जातो. महान संगीतकार शारंगदेवाने आपल्या ‘संगीत रत्नाकर’ ग्रंथात ‘किन्नरी वीणा’ नावाच्या एका वाद्याचा उल्लेख केला आहे. त्यावर वाजविल्या जाणार्‍या अवरोहात्मक संगीताची माहिती दिली आहे. आज हीच किन्नरी वीणा ‘किंगरी’ नावाने तेलंगणातील दलित समाजातील वादक दर्शनम मोगुलय्या वाजवतो. त्याला लिहीता वाचता येत नाही. तेलगुशिवाय दुसरी भाषाही येत नाही. त्याने संगीत रत्नाकर मधील शारंगदेवाचे विवेचन वाचले असण्याची जराही शक्यता नाही. मग रसिक मनाला असा प्रश्‍न पडतो की कुठल्या अदम्य उर्मीने हा या प्रकारचे संगीत आयुष्यभर वाजवत आला असेल? केवळ मौखिक परंपरेतून त्याला जे काही मिळाले ते तो प्राणपणाने जतन करून ठेवतो आहे आणि रसिकांपर्यंत पोचवतो आहे. 

वरवर सावरकरांवर वाटणारी ही कविता कलानिर्मितीच्या गभ्यापाशी पोचते. व्यक्त होण्याची अदम्य उर्मी शब्दांत मांडते हे या कवितेचे वेगळेपण आहे.
     
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Friday, February 28, 2020

कशाळकरांनी उभारला "जोगकंस" स्वरकैलास


उरूस, २८ फेब्रुवारी, २०२०

सत्तरी ओलांडलेला बुजूर्ग गायक मंचावर येतो तेंव्हा रात्रीचे ९ वाजलेले असतात. कार्यक्रम उशीरा सुरू होणे, आधीच्या कलाकाराचे सादरीकरण लांबणे यातून कमी अवधी या बुजूर्गासाठी शिल्लक राहीलेले असतात. ध्वनी व्यवस्था, वाद्य जुळवणे, सुरवातीला आवाज लागणे स्थिरावणे यात अजून २० मिनीटे निघून जातात. समोर बसलेल्या जाणकार रसिकांचे चेहरे चिंताक्रांत होवून जातात. आज पदरी काही पडणार का? बघता बघता आवाज स्थिर होवून असा काही लागतो, असा काही तापतो की आख्खा मंडप त्या प्रभावाखाली डोलायला लागतो.

हा काही कल्पनेतला प्रसंग नाही. नांदेडला २७ फेब्रुवारीला संगीत शंकर दरबार कार्यक्रमात प्रत्यक्ष पद्मश्री पंडित उल्हास कशाळकरांच्या बाबत हे घडलं.

पं. जग्गनाथबुवा पुरोहीत यांचा म्हणून ओळखला जाणारा "जोगकंस" कशाळकरांनी आळवायला सुरवात केली. आळवायला म्हणायचे कारण एक लडिवाळपणा त्यांच्या सुरात होता. आणि काही मिनीटातच रसिकांच्या काळजाचा ताबा बुवांनी घेतला. 

फ्युजनच्या नावाखाली वाट्टेल तो स्वरगोंधळ घालत सांगितिक आतंकवाद माजवला जात असताना कशाळकरांनी घरंदाज गायकीचे, शंभर वर्षांपूर्वीच्या अस्सल बंदिशीचे अशा काही नजाकतीने सामर्थ्याने दर्शन घडवले की नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या बेढव इमारतीपुढे एकाच दगडात घडवलेले कलात्मक कैलास लेणे. 

कैलास लेण्याची उपमा देण्याचे एक कारण म्हणजे जसं हे लेणे पिढ्यान् पिढ्या घडत होते तसेच शास्त्रीय संगीतही घडत आले आहे. आता कशाळकरांनी आळवलेल्या जोगकंसाचाच विचार केला तर जग्गनाथबुवा पुरोहीत यांच्यापासून पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या पर्यंत आणि तिथून कशाळकरांपर्यंत हा जोगकंसचा प्रवास चालू आहे.

पंडितजींना साथ करायला मागे तेवढाच तोलामोलाचा त्यांचा ज्येष्ठ शिष्य शशांक मक्तेदार होता. त्याचाही आवाज अप्रतिम लागलेला. घराणेदार चीज सर्वांसमक्ष बुवा पुढच्या पिढीपर्यंत पोचवत होते. 

या कार्यक्रमात अजून एक योग जूळून आला. पंडितजींच्या साथीला मक्तेदारांशिवाय अगदी पंचेविशीतला तरूण तडफदार गायक पं. अजय चक्रवर्तींचा शिष्य अभिजीत अपस्तंभ होता. कशाळकरांना धरून शास्त्रीय संगीतातल्या तीन पिढ्या रसिकांसमोर एकाचवेळी गात होत्या. 

सुघर बरपा ही जग्गनाथबुबांची बंदिश गाताना तिघांचेही आवाज समेवर यायचे तेंव्हा एक वेगळीच सौंदर्य अनुभूती रसिकांना होत होती. तीन सांगितीक पिढ्यांचा सुंदर तिपेडी गोफ बनून त्याचे वळसेदार सुत्र तयार व्हायचे. पंडितजींचा आवाज विलक्षण सामर्थ्याने सर्व सप्तकांत फिरत होता. तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर मिलींद कुलकर्णी मोजक्याच जागी आपले कौशल्य दाखवत या बुजूर्ग खानदानी गाण्याची आब राखत होते.  

सुघर बरपा या विलंबीत बंदिशीतून पीर परायी या दृत मध्ये प्रवेश करताना गाडीने रूळ बदलताना खडखड करावी असं एरवी बहूतांश कलाकारांच्या बाबत अनुभवयाला येतं तसं इथे घडलं नाही. मजबूत, कलात्मक पाया भिंती तयार झाल्यावर त्यावर कळसाचे काम सुरू व्हावं अशी अभुतपूर्व अनुभव रसिकांना आला. पाउणतासात बुवांनी जोगकंसच्या मंदिराचे सांगितीक बांधकाम संपवले तेंव्हा रसिकांच्या डोळ्यासमोर पीर पराईचा सोनेरी कळस झळाळत होता. 

सध्याच्या दूषित सांगितीक वातावरणाबद्दल कुठला शब्दही जास्तीचा न बोलता पंडितजींनी सणसणीत कृतीशील उत्तर दिले. 

भारतीय संगीताचे काय होणार? म्हणून आंबट चेहर्‍याने प्रश्न विचारणार्‍यां समोर जग्गनाथबुवा, अभिषेकी, स्वत: कशाळकर, मक्तेदार आणि अपस्तंभ या पाच पिढ्यांनी जोगकंसचा स्वरकैलास उभारून दाखवला. 

कार्यक्रम वेळेत सुरू झाला असता तर पंडितजींना अजून वेळ मिळाला असतो. रसिकांना पोट भरून ऐकता आले असते. भरल्या ताटावरून अर्धपोटी उठावे लागले नसते. 

नांदेड शहरात संगीताच्या क्षेत्रात काम करणारी भरपूर व्यक्तीमत्वं आहेत. त्यांचे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक असा विचार केला तर ही संख्या फार मोठी होते. मग असं असताना अर्धा मंडप रिकामा कसा? हा नतद्रष्टपणा का? 

आज हयात असणार्‍या आणि मंचावर गावू शकणार्‍या चार दोन बुजूर्ग गायकांतले एक नाव म्हणजे पंडित उल्हास कशाळकर. त्यांना ऐकायला बाहेरगावातून रसिक धडपडत येतात. आणि नांदेडकर घरात बसून रहातात याला काय म्हणावे? 

आयोजकाने त्याचे काम केल्यावर रसिकांची किमान जबाबदारी म्हणजे उपस्थित राहणे. सांगितिक कार्यक्रमाची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तिचे "कान" असणार्‍यांचीच गर्दी असावी लागते. फापट पसारा तिथे येवून भागत नाही. आणि कशाळकरांसारखा घराणेदार माणूस गातो तेंव्हा तर रसिकांची जबाबदारी अजूनच वाढलेली असते.  आपण ती पार पडताना दिसत नसू तर ते आपलेच दूर्देव! 

एक अप्रतिम स्वराविष्कार उपस्थित रसिकांना अनुभवायला मिळाला. त्यासाठी संयोजक अशोक चव्हाण, डि.पी. सावंत यांचे आभार. त्यांच्या सर्व सहकार्‍यांना धन्यवाद. संजय जोशी यांच्या सारख्या गायक कलाकारांनी महोत्सवाची सांगितिक नियोजनाची बाजू सांभाळली. त्यांचे मन:पूर्वक आभार. 

श्रीकांत उमरीकर, औरंंगाबाद, ९४२२८७८५७५
(छायाचित्र सौजन्य होकर्णे बंधु, नांदेड)

Monday, February 24, 2020

संगीत परंपरेला शिवी देणाऱ्या वृत्तीचा जाहिर निषेध !


उरूस, 24 फेब्रुवारी 2020

या लेखाच्या सुरवातीला वापरलेला फोटो कुणाल गायकवाड या तरूण मित्राच्या फेसबुकवरचा आहे. ही पोस्ट त्याने ‘पॉवरफुल’ असा शेरा लिहून आपल्या फेसबुक पेजवर टाकली आहे (ता. 22 फेब्रुवारी 2020).

पेटीवरचे बाबासाहेब आणि बुद्ध यांची छायाचित्रे आणि खाली लिहीलेला जयभीम सिद्ध करतो की हा कलाकार आंबेडकरी चळवळीची गाणी गाणारा रस्त्यावरचा कलाकार आहे. याचा गौरव करताना किंवा त्याच्या विपन्नावस्थेवर अस्वस्थ होवून शिवी देताना कुणाल गायकवाड काहीच कारण नसताना ‘फक युअर क्लासिकल, फक युअर गुरूज’ अशी वाह्यात उठवळ टीका करून जातो. यातील ‘फक युअर कॉन्सर्ट’ मी एकवेळ समजू शकतो. (पूर्वी त्याने सवाई गंधर्व महोत्सवावर टीका केली होती. ती योग्य होती.)  अतिशय महान जगाला अभिमान वाटावी अशी परंपरा असताना आणि त्याचाही बहुतांश भाग अबाह्मणी लोकांनीच टीकवलेला असताना शास्त्रीय संगीताला शिवी देण्याचे काय कारण? संगीतात शिक्षण हे गुरूमुखातूनच घेतले जाते. आणि हा गुरू कुठल्या जाती धर्माचा आहे हे कधीच पाहिल्या गेलं नाही.

‘भरतनाट्यम’ सारखी नृत्यकला तर केवळ आणि केवळ देवदासींच्या नृत्यावरून अगदी अलीकडच्या काळात नावारूपाला आली. ओडिसी नृत्याचाच एक प्रकार असलेले गोटीपुआ नृत्य हे तृतीयपंथी लहान मुलांना घेवून केले जाते. कलकत्त्यात बाऊल गायन वादन नृत्याची जी परंपरा किमान एक हजार वर्षांपासून चालू आहे तिच्यात कुणीच उच्चवर्णीय नाही.

हे सगळे लोक आपल्या गुरूंबद्दल आजही प्रचंड आदर बाळगून आहेत. आजही ते हजारो वर्षांपासून चालत आलेले कलेचे नियम सांभाळतात. अगदी महाराष्ट्रात आणि कुणाल गायकवाड ज्या भागांतून आला आहे (परभणी जिल्हा) कोल्हाटी, मांग, पूर्वाश्रमीचे महार यांच्या घरांत चर्मवाद्य वाजविण्याची नृत्याची परंपरा आहे. ते सगळे त्यांच्या गुरूंबाबत काय आणि कशी भावना बाळगून असतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही. उस्ताद गुलाम रसूल यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली दोन वर्षे आम्ही संगीत महोत्सव भरवीत आहोत. त्याची वर्गणी देताना उच्च विद्याविभुषीत डॉक्टर असलेल्या दलित भगिनीने  निधी देवून झाल्यावर आमच्या पायावर डोकं ठेवलं. कारण तिच्या गुरूसाठी आम्ही कार्यक्रम करत आहोत म्हणून.

टीका करताना आपण नेमकी कशावर करतो आहोत याचे तर भान ठेवावे. शास्त्रीय संगीतातील कितीतरी महान गायक वादक हे अब्राह्मणी राहिले आहेत. काही जणांना तर उलट ब्राह्मणी चौकटीचाच जाच सहज न झाल्याने त्यांनी इस्लामचा स्विकार केला. (जयपुर घराण्याचे महान गायक उस्ताद अल्लादिया खां यांचे उदाहरण ज्वलंत आहे.) अब्दूल करीम खां साहंबांची अनौरस संतती म्हणून हिराबाई बडोदेकर यांना अतिशय खडतर संघर्षाला तोंड द्यावे लागले. गंगुबाई हनगल, मोगुबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, मल्लिकार्जून मन्सूर, कुमार गंधर्व आणि कितीतरी मुस्लिम गायक वादक हे अब्राह्मणी आहेत. त्यांनी कधीच त्यांच्या गुरूंबाबत  आणि संगीत परंपरेबाबत अनादर दाखवला नाही. भिमसेन जोशी ब्राह्मण होते म्हणून त्यांना कुठलीच सवलत गुरूकडून मिळाली नाही. अगदी आत्ताच्या गायकांमध्ये प्रभाकर कारेकर, विजय कोपरकर, राजशेखर मन्सूर, मुकुल शिवपुत्र, एम. व्यंकटेशकुमार, कैवल्यकुमार, यादवराज फड वादकांमध्ये मुकेश जाधव, उद्धवबापु आपेगांवकर, कल्याण अपार हे सगळे अब्राह्मणी आहेत.

लोककलांच्या बाबतीत तर जवळ जवळ 100 टक्के कलाकार अब्राह्मणी आहेत. कुणाल गायकवाडच्याच जवळ गोंधळ महर्षी राजारामभाऊ कदम आणि गवळणी गाणार्‍या लोकगायिका गोदावरी बाई मुंढे ही दोन मोठी उदाहरणं आहेत. या सगळ्यांनी गुरूबाबत आणि परंपरेबाबत कधी अपशब्द काढले आहेत का?

आंबेडकरी चळवळीत गाणार्‍या कडूबाई खरात यांना लोकांनी सन्मानाने मोठी व्यासपीठं अगदी अलीकडच्या काळात त्यांच्या आवाजावर खुश होवून मिळवून दिलीच ना? दारोदारी एकतारी घेवून फिरणार्‍या कडूबाई यांचे कार्यक्रम आता जाहिर भव्य मंचावरून होत आहेत ना? त्यांच्याही रस्त्यावरच्या गाण्याचा आता भव्य ‘कॉन्सोर्ट’ झालाच ना?

शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथात वर्णन केलेले किन्नरी वीणा जीला किंगरी म्हणतात ती केवळ मांग समाजातील कलाकारच वाजवतात. या कलाकाराला भव्य मंचावर सन्मानाने निमंत्रीत करून पुरस्कृत करणारे कोण आणि कुठल्या जातीचे पाठीराखे होते? सुंदरी हे अतिशय छोटे वाद्य (सनईची छोटी बहिण) वाजवणारे सोलापुरचे कपिल जाधव कोणत्या जातीचे आहेत? त्यांना सन्मानाने आमंत्रित करणारी व्यासपीठं कोणती आहेत?

अभिजात परंपरेला शिव्या देताना दलित अदिवासी बहुजन इतर मागास यांच्या संघटना व्यक्ती संस्था यांनी किती व्यासपीठं बहुजनांच्या कलेसाठी उभी केली आणि सातत्याने चालविली? तमाशा मधील लावणीला भारतीय नृत्य परंपरेत स्थान मिळावं म्हणून कुणी प्रयत्न केले? लावणी नृत्यातील मुद्रा, हावभाव, यांची एक सांगितिक परिभाषा कायम करण्यासाठी काय प्रयत्न झाले?

गेली दहा वर्षे औरंगाबादमध्ये महागामी गुरूकुल (ही संस्था ब्राह्मणांची नाही.) शारंगदेव समारोह साजरा करतं आहे. या समारंभात देशभरांतील लोककलांचे सादरीकरण, त्यांच्यावर अभ्यास करणार्‍यांची व्याख्यानं, चर्चासत्र यांचे आयोजन केलं जाते आहे. याच वर्षी गुजरात, केरळ, मणिपूर, आसाम, तिबेट येथील लोककलांचे अप्रतिम सादरीकरण झाले. बुद्ध धर्मातील भिख्खुंना सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या धर्मविषयक विधींतील सांगितिक योगदानाची चर्चा आणि सादरीकरण झाले. याची किती कल्पना तथाकथित  अभिजातला ‘फक यु’ म्हणून शिव्या देणार्‍यांना आहे? किमान औरंगाबाद शहरांतील दलित चळवळीतील किती कार्यकर्ते हे समजून घ्यायला उपस्थित होते?

द हिंदू सारख्या वृत्तपत्रांनी या महोत्सवावर देशपातळीवरील त्यांच्या पुरवणीत स्थान दिले. आवर्जून दखल घेतली. मग ही ‘फक यु’ गँग इकडे का नाही फिरकली?

केवळ फेसबुकी चर्चा करण्यात मला रस नाही. मी कुणाल गायकवाड आणि त्याच्या पोस्टला लाईक करणार्‍या सर्वांना आवाहन करतो. त्यांना माहित असलेले ताला सुरात गाणारे वाजवणारे किमान दहा आंबेडकरी जलसा कलाकारांची नावे सांगा. त्यांचा संपूर्ण महोत्सव करण्याची जबाबदारी आम्ही औरंगाबाद शहरात घेतो.  आणि इतकेच नाही तर हा महोत्सव दरवर्षी होईल याचीही हमी देतो. सांगित परंपरेत जी काही कला या जाती जमातींनी जपली आहे त्याची दखल घेण्याची त्याला प्रोत्साहन देण्याची आमची पूर्ण तयारी आहे. शास्त्रीय संगीतात जे कुणी ब्राह्मणेतर कलाकार आहेत त्यांना आम्ही आवर्जून सन्मान देत आलेलोच आहोत.
 
 श्रीकांत उमरीकर 9422878575

Sunday, February 23, 2020

शिवाजी नावाच्या पोलादावर फुटली औरंगजेब नावाची काच !

काव्यतरंग रविवार २३ फेब्रुवारी २०२० दै. दिव्य मराठी 


या जमिनीवर

या जमिनीवर असेल तेव्हा
प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे
पडले पाउल
या भूमीच्या सुगंधसिंचित
धूलिकणांना
या भिंतीवर रुळझुळणार्‍या
गर्भरेशमी आवरणांना
या मंचांतिल रत्नमण्यांच्या
चंचल गर्वोद्धत किरणांना
सह्याद्रीवर अवतरलेल्या
ऊर्जस्वल स्वातंत्र्य उषेची
इथे लागली
पहिली चाहुल.

याच ठिकाणी-
मावळखोर्‍यामधले वादळ
इंद्रसीेवर या आदळले
कृष्णेचे बळ खडकांमधले
यमुनेच्या श्रीमंत तटावर
येथे वळले
इथे तमाच्या अधिराज्याला
तेजाचे बळ प्रथमच कळले.

येथ रुजाम्यावरी जरीच्या
असतिल कुजबुजल्या तलवारी
थरथरले शिरताच हिर्‍यांचे
असतिल श्रवुनी ती ललकारी
संगमरवरी चिर्‍यांत झाले
असेल स्पंदन
शिवनेरीच्या वनराजाचे
होता दर्शन!

या स्तंभातुनि असेल घुमली
ती शिववाणी
या दगडांवर असेल थिजले
त्या शब्दांतिल अभिमानाचे
जळते पाणी
मखमाली गाद्यांवर सळसळ
संतापाची असेल उठली
माळ करांतिल या तख्तावर
असेल तुटली
काच बिलोरी ऐश्वर्याची
पोलादाच्या त्या तुकड्यावर
इथेंच फुटली.

-कुसुमाग्रज
(स्वगत, पृ. क्र दहा, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)

19 फेब्रुवारीला शिवजयंती होवून गेली आहे. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो आहे. या दोन्ही जयंत्यांच्या निमित्ताने ही कविता आठवणीतून झळाळून वर आली. .

आग्र्याच्या किल्ल्यात कुसुमाग्रज गेले असताना त्यांना ही कविता सुचली. वाचताना असे लक्षात येते की एखाद्या नाटकाच्या स्वगतासारखी ही कविता लिहीली गेली आहे. शब्दांची योजना, वाक्यांची रचना तशाच पल्लेदार पद्धतीनं केलेली आहे. एखादा नट आवेशात मंचावरून संवाद फेकतो आहे आणि अंधारात बसलेले हजारो प्रेक्षक प्राण कानात घेवून ते ऐकत आहेत. असेच वाटत राहते. 

शिवाजी महाराजांबद्दलचा मराठी माणसाला असलेला अभिमान या कवितेच्या शब्दांशब्दांत ओसंडून वाहतो आहे.  उत्तरेत मोगल कालखंडांतील प्रचंड मोठ्या नाजूक नक्षीकाम केलेल्या इमारती, त्यांच्यावरची बारीक कलाकुसर, लाल दगडात  पांढर्‍या संगमरवरांत केलेली बांधकामे, त्यांची भव्यता पाहताना आपण हरखून जातो. परत महाराष्ट्रात येवून पाहतो तर महाराजांच्या आधीची वाकाटक राष्ट्रकुट चालूक्य यादवांच्या काळातील आणि महाराजांच्या नंतरच्या अहिल्याबाईंच्या काळातील काळ्या पाषाणांतील घडीव दगडी चिर्‍यांमधील मंदिरे लेण्या किल्ले घाट बारवा आदिंचे अस्सल राकट सौंदर्य आपल्याला मोहवून टाकते. 

या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांची ही कविता आणि तिचे सौंदर्य उठून दिसते. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा, काटक कणखर चिवट वृत्ती आणि सोबतच ‘भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचे मनात पुजीन रायगडा’ ही बापटांनी वर्णन केलेली भावना मराठी माणसाच्या मनात असते. 

या कवितेत शब्दकळेसोबतच मांडणीचेही वेगळेपण आहे. वृत्तांच्या बंधनांना जरासे मोकळे करत सुंदर यमकांचा अनुप्रासाचा वापर करत पण मुक्त रचना करण्याची ही एक वेगळीच शैली त्यांनी विकसित केली आहे. असा वापर  इंदिरा संतांनी पण त्यांच्या कवितेत केला आहे. अलिकडच्या काळात अनुराधा पाटील यांच्याही कवितांत असा मुक्त यमकांचा शैलीदार वापर आढळून येतो.
यमुना ही बारामाही वाहणारी मोठी नदी. तिचे विस्तीर्ण पात्र. त्याच्याशी तुलना करताना ‘कृष्णेचे जळ खडकांमधले’ अशी शब्दयोजना कुसुमाग्रज करतात. ही काही केवळ दोन नद्यांची तुलना नाही. ही दोन मानसिकतेमधील तुलना आहे.  इंद्रजीत भालेराव यांनी 

बारोमास खळाळणार्‍या बांधांमधुन
आम्ही उकललो नाही
केळीच्या गाभ्यासारखे
आम्ही वाढलो वर्षानुवर्षे
आवर्षणग्रस्त भागातील
झुडुपांसारखे. 

पण खबरदार
आम्हाला खुरटे म्हणाल तर
आम्ही तुमच्यापेक्षा
जास्त उन्हाळे पावसाळे
पाहिले आहेत.

या कवितेत जे भाव व्यक्त केले आहेत ते याच ओळींशी मेळ खातात.

आग्र्याच्या दरबारात महाराज उभे असताना तिथली परिस्थिती काय असेल हे नोंदवताना तेंव्हाच्या आख्ख्या भारताचीच काय मानसिकता होती हे कुसुमाग्रज लिहून जातात. 

कवितेचा शेवट करताना ‘काच बिलोरी एैश्‍वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली’ असं लिहीतानाही एक मोठेच तत्त्व साध्या वाटणार्‍या शब्दांतून समोर येते. मोगल साम्राज्याला काचेची उपमा देताना त्यावर शिवाजी महाराजांनी दगड भिरकावला असं लिहीलेलं नाही. दगड भिरकावणे ही केवळ तात्कालीक प्रतिक्रिया असते. (फँड्रि चित्रपटात असा दगड शेवटी उगारला गेला आहे.) पण पोलादाची उपमा देताना लोखंडाची ताकद, तेंव्हाच्या शस्त्रांमध्ये होणारा लोखंडाचा वापर (ढाल, तलवार, भाले) याचा विचार इथे केलेला आहे. महाराजांची ताकद ही शस्त्र वापरणारे सामन्य मावळे ही होती. हत्ती घोडे उंट तोफा ही महाराजांची ताकद नव्हती. दिमाखदार इमारती हे स्वराज्याचे भुषण नव्हते. तर उपयुक्त मजबुत भक्कम डोंगरी किल्ले म्हणजे स्वराज्याची ताकद होती. शिवाजी महाराजांच्या माघारी तब्बल 27 वर्षे जनता औरंगजेबाशी लढत होती. आजपर्यंतच्या इतिहासात सैन्य सैन्याशी लढले. पण शिवाजी हा असा एकमेव राजा आहे की त्याच्यासाठी सामान्य लोक लढले. नरहर कुरूंदकरांनी शिवाजी महाराजांचे नोंदवलेले हे वेगळेपण कुसुमाग्रजांच्या शब्दांतून कलात्मक रूप घेवून येते.

मध्ययुगील कालखंडात महाबलाढ्य मोगल साम्राज्याशी टक्कर देणारे शिवाजी महाराज केवळ मोजक्या शब्दांतून कुसुमाग्रज उभे करतात ही या कवितेची ताकद आहे.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Saturday, February 22, 2020

भारतीय संगीताने छेडल्या फ्रेंच हृदयाच्या तारा!

(छायाचित्रात डावीकडून पं. नाथ नेरळकर, डॉ. प्रसन्न कालगांवकर, सम्राट पंडित, श्रीकांत उमरीकर, व्हिन्सेंट पास्कीलिनी. खालच्या छायाचित्रात सम्राट पंडित गाताना. तबला सागर पटोकार, संवादिनी अभिषेक सिनकर )

उरूस, 22 फेब्रुवारी 2020

प्रसंग तसा जरा हटकेच आहे. औरंगाबाद शहरात गेली 4 वर्षे व्हिन्सेंट पास्किलीनी हा फ्रेंच तरूण शाश्‍वत पर्यटनासाठी प्रयत्न करतो आहे. तो वर्षातील काही दिवस भारतात आणि त्यातही औरंगाबाद परिसरात येवून राहतो. येथील मंदिरे, लेण्या, संस्कृती, संगीत, शिल्प, इतिहास, सण, उत्सव, परंपरा याबाबत माहिती गोळा करतो. फ्रान्समध्ये जावून तेथील पर्यटकांना ही माहिती देतो आणि त्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रीत करतो. शाश्‍वत पर्यटन हा अतिशय वेगळा विषय तो हाताळतो आहे. त्याचे सरकार त्यासाठी त्याला प्रोत्साहन देते.
औरंगाबाद परिसरात शाश्‍वत पर्यटन वाढावे म्हणून आम्ही काही लोक व्हिन्सेंट ला मदत करतो. त्याला विविध सांस्कृतिके कार्यक्रमांसाठी आवर्जून आमंत्रित करतो. तोही त्या काळात शहरात असलेल्या परदेशी पर्यटकांना घेवून कार्यक्रमासाठी येतो.

शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी संगीतमहर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर संगीत महोत्सवाचे आयोजन पं. नाथ नेरलकर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात पतियाळा घराण्याचे गायक सम्राट पंडित यांचे गायन सादर झाले. व्हिन्सेंट एक रसिक प्रेक्षक म्हणून समोर बसून गाण्याचा आस्वाद घेत होता. कार्यक्रम संपल्यावर मी त्याची ओळख सम्राट पंडित यांच्याशी करून दिली. व्हिन्सेंट फ्रेंच आहे हे कळल्याबरोबर सम्राट पंडित यांनी सरळ फ्रेंच भाषेतच बोलायला सुरवात केली.

व्हिन्सेंटला हा आश्चर्याचा आनंदाचा धक्काच होता. आपल्या मातृभूमीपासून दूर कुणी आपल्या भाषेत संवाद साधतंय याचा हा आनंद होता. सम्राट पंडित यांच्या बोलण्यातून खुलासा झाला की त्यांची पत्नी फ्रेंच आहे. तेही बर्‍याचवेळा पॅरिसलाच असतात. दोन महिन्यांनी ते तिकडे जाणार आहेत. व्हिन्सेंटही मार्चच्या शेवटी फ्रान्सला परतणार आहे. मे महिन्यात पर्यटकांसाठी भारतविषयक सांस्कृतिक महोत्सव आयोजीत करण्याचे आश्वासन व्हिन्सेंट याने सम्राट पंडित यांना दिले. सम्राट यांनीही आपले सासूरवाडीचे फ्रेंच नातेवाईक सगळी मदत करतील असे सांगितले.

गांधींच्या विचारांनी भारून व्हिन्सेंट पूर्णत: शाकाहारी आणि त्यातही व्हेगन (प्राण्यांना त्रास देवून तयार झालेले कुठलेही पदार्थ खायचे नाहीत, वस्तु परिधान करायच्या नाहीत. दुध दही तेल तुप वर्ज्य शिवाय कातड्याच्या वस्तुही वापरायच्या नाहीत.) बनला. गांधींच्या या दिडशेव्या जयंती वर्षात असे व्रत कुणी परदेशी नागरिक पाळतो आहे हे खरेच आपल्याला खुप अभिमानास्पद आहे.

महागामी गुरूकुलात नृत्याचे कार्यक्रम सतत होत असतात. त्यांनाही व्हिन्सेंट परदेशी मित्रांना घेवून हजेरी लावतो. पुढच्या महिन्यात तो फ्रान्सला परत जाणार आहे. या परिसराचे सुंदर सुंदर छायाचित्र त्याने स्वत: फिरून काढली आहेत. चारठाण्या सारख्या गावाला हेरिटेज व्हिलेज म्हणून मान्यता मिळावी यासाठी आपल्यापेक्षा जास्त त्याची तळमळ आहे. 12 जानेवारीला चारठाणा गावात एक हेरिटेज वॉकचे आयोजन व्हिन्सेंटच्या पुढाकाराने करण्यात आले होते. त्यासाठी रोटरीच्या योजनेत भारतात आलेले परदेशी तरूण मुलं मुलीही या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झाली होती.

आपण भारतीय म्हणून इतकीच अपेक्षा आहे की आपण अशा कुणाच्या तळमळीसाठी आपले किमान योगदान दिले पाहिजे. निदान आपण जे उपक्रम घेतो आहोत त्यात अशा समर्पित वृत्तीच्या माणसांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे. त्यांच्या उपक्रमाला मदत हातील अशा चार गोष्टी केल्या पाहिजेत.

भारतीय संगीत, कला, तत्त्वज्ञान, इतिहास शतकानुशतके इतरांना आकर्षित करून घेत आला आहे. आपण हे गांभिर्याने समजून घेतलं पाहिजे. किमान आस्था अशा उपक्रमांबाबत बाळगली पाहिजे.

 श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ