उरूस, 11 फेब्रुवारी 2020
मराठवाड्यात स्वातंत्र्याच्या नंतर अगदी सुरवातीच्या काळात संगीत चळवळ रूजविणारी जी मोजकी नावे आहेत त्यापैकी एक म्हणजे परभणीचेा उस्ताद डॉ. गुलाम रसूल. परभणीला गायनाची कुठलीच पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटूंबात उस्तादजींचा जन्म 24 एप्रिल 1927 ला झाला. उस्तादजींनी स्वयंप्रेरणेने संगीताचे शिक्षण प्राप्त केले. 1974 मध्यं संगीताचार्य म्हणजेच डॉक्टरेट ही पदवी त्यांनी मिळवली. भारतभर परिक्षक म्हणून फिरत असताना विविध कलाकारांशी त्यांचा संपर्क आला. आग्रा ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांच्या गळ्यावर प्रभाव टाकून गेली.
1965 च्या दरम्यान त्यांनी ललित कला मंडळाच्या माध्यमातून संगीत शिक्षणाची सुरवात परभणीस केली. त्या काळात असे संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार्या संस्था आणि संगीतातील पदवी प्राप्त शिक्षक फार दुर्मिळ होते. मराठवाड्यातील अशा मोजक्याच लोकांपैकी डॉ. गुलाम रसूल. त्यांच्या आधीच्या पिढ्या या मौखिक परंपरेतून शिकलेल्या. यांच्यापेक्षा उस्तादींचे वेगळेपण त्यांच्या अभ्यासू व्यक्तीमत्वात शोधता येते. संगीत विषयक मासिकांमधून नियमितपणे लेख लिहीणारे त्यांच्यासारखे फारच थोडे विद्वान त्या काळात होवून गेले.
डॉ. गुलाम रसूल यांच्या स्मृती प्रित्यर्थ औरंगाबादेत त्यांचे शिष्य डॉ. पराग चौधरी गेली अकरा वर्षे संगीत महोत्सव भरवत आहेत. परभणीला त्यांच्या जन्म आणि कर्मभूमीत संगीत महोत्सव झाला पाहिजे अशी त्यांच्या शिष्यांची आणि चाहत्यांची इच्छा होती. त्या इच्छेला देवगिरी संगीत प्रतिष्ठान या शास्त्रीय संगीत चळवळीसाठी मराठवाडाभर काम करणार्या संस्थेने मूर्त रूप दिले. गेल्या वर्षीपासून हा संगीत महोत्सव परभणी शहरात भरवला जातो आहे.
या वर्षी 8-9 फेब्रुवारी रोजी हा महोत्सव संपन्न झाला. लोकवर्गणीतून हा महोत्सव साजरा करण्याचा पायंडा सेलू पाठोपाठ आता परभणीतही चांगलाच रूजला आहे. संगीत रसिक, शहरातील गायक वादक, संगीत शिकणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, संगीत प्रेमी या सगळ्यांच्या सहकार्याने हा महोत्सव पार पाडला जातो. लोकसहभाग आणि लोकवर्गणी ही फार महत्त्वाची बाब या महोत्सवात घडून येत आहे. अशा प्रकारचे उत्सवच हळू हळू लोकमहोत्सव बनत टिकून राहतात. एरव्ही बहुतांश उपक्रमांचे आयुष्य फारसे नसते.
शास्त्रीय संगीतासाठी हे घडून येते आहे ही पण फार महत्त्वाची बाब आहे. अन्यथा इतर संगीत प्रकारांसाठी प्रायोजक मिळतात, आश्रयदाते तयार असतात. पण शुद्ध शास्त्रीय संगीतासाठी म्हणून काही उपक्रम करणं कठिण जातं. त्यासाठी येणार्या अडचणी विविध प्रकारच्या आहेत. सगळं जूळून आलं तरी समोर जाणकार श्रोते नसतील तरी ते श्रम सार्थकी लागत नाहीत. यासाठी श्रोत्यांचा कान तयार करण्याचे पण मोठे आव्हान संयोजकांसमोर असते.
मराठवाड्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र संगीतविषयक अतिशय पोषक वातावरण आहे.
शारंगदेवाच्या संगीत रत्नाकर ग्रंथात गायन-वादन-नृत्य या तिन्हीला मिळून संगीत म्हटल्या गेलेलं आहे. मराठवाड्यात जास्त करून गायनाचेच कार्यक्रम होतात. त्या तूलनेनं वादन फारसे होत नाही. आणि नृत्य तर त्याहूनही कमी. जवळपास नाहीच. गुलाम रसूल संगीत महोत्सवात आवर्जून वाद्य संगीत आणि नृत्य यांचा समावेश करण्यात येतो. या वर्षी महागामी गुरूकुलाच्या श्रीया दिक्षीत आणि रसिका तळेकर या पार्वती दत्ता यांच्या शिष्यांनी अप्रतिम असा कथ्थक नृत्याचा आविष्कार सादर केला. उस्ताद शाहिद परवेझ यांचे शिष्य आणि पुत्र उस्ताद शाकिर खा यांनी राग जोग आणि पिलू रागातील धून वाजवली.
मराठवाड्यातील युवा कलावंत जालन्याची भक्ती पवार हीच्या आश्वासक सुरांनी मराठवाड्यात शास्त्रीय संगीताचे भवितव्य उज्वल असल्याची ग्वाही दिली. उस्ताद गुलाम रसूल यांचे शिष्य डॉ. पराग चौधरी यांनी पहिल्या दिवशी जो मारवा आळवला त्यात आर्तता तर होतीच पण सोबत गुलाम रसूल यांचा वारसा पुढे चालविण्याची ग्वाहीही होती.
विदूषी मंजिरी कर्वे आलेगांवकर आणि बेंगलुरूचे ज्येष्ठ गायक पं. परमेश्वर हेगडे ही मोठी नावं. मंजिरी ताईंचा नंद असो की परमेश्वरजींचा मारूबिहाग एकाचवेळी रसिकांना बांधून ठेवत होता आणि गायन क्षेत्रातील जाणकारांना बौद्धिक मेजवानीही देवून जात होता.
महोत्सवाचे आयोजन अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आले. कुठलाही अंगावर येणारा भपका नव्हता, आक्रस्ताळी सजावट नव्हती, असांगितिक लोकांचा अनावश्यक वावर नव्हता. कुठेही भाषणबाजी नव्हती. एखादे घरगुती कार्य असावे त्या निगूतीने आणि आपुलकीने कार्यकर्ते संगीतप्रेमी रसिक शिष्यवर्ग कार्यरत होता.
या महोत्सवाने एक वेगळा पायंडा पाडला आहे.
उस्ताद गुलाम रसूल सारख्यांनी अतिशय प्रतिकूल काळात संगीत चळवळ रूजवली. आज तंत्रज्ञानाची मोठी साथ असताना, आर्थिक दृष्ट्या सामान्य माणसे सुस्थितीत आली असताना कलाविषयक चळवळी मंदावल्या याची खंत आहे. चांगली सभागृहे, ध्वनी व्यवस्था, प्रवासाच्या निवासाच्या सोयी सगळ्यांचीच बर्यापैकी समृद्धी गुलाम रसूल यांच्या काळापेक्षा आता दिसून येते. पण कलाविषयक जाणीवा मात्र विस्तारताना दिसत नाहीत. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे भाग आहे. संगीत क्षेत्रातील सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याला इतरांनी साथ दिली पाहिजे. सामान्य रसिकांचा कान घडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
देवगिरी संगीत प्रतिष्ठान यासाठी कटीबद्ध आहे. मराठवाड्यात ज्यांना कुणाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा.
श्रीकांत उमरीकर 9422878575