काव्यतरंग, दै. दिव्य मराठी. रविवार १९ जानेवारी २०२०
जीवन त्यांना कळले हो
जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरि
सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचराचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनि जे वळले हो
दूरित जयांच्य दर्शनमात्रे
मोहित होउनि जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन् परिमळले हो
आत्मदळाने नक्षत्रांचे
वैभव ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
घरीचं ज्या आढळले हो
-उरीच ज्यां आढळले हो
-बा.भ. बोरकर
(बोरकरांची समग्र कविता,खंड 1, प्रकाशक देशमुख आणि कं. पुणे, पृष्ठ-322)
बोरकरांच्या या सुप्रसिद्ध कवितेचा महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षात एक वेगळा अन्वयार्थ लावतो येतो. त्या दृष्टीने ही कविता समजून घेतली पाहिजे.
‘मीपण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो’ असं बोरकर लिहीतात तेंव्हा त्यांच्यासमोर गांधीजीच असणार. 1920 साली टिळकांच्या निधनानंतर गांधींचे नेतृत्व समोर आले तेंव्हा त्यांचे वय 50 होते. म्हणजे पक्वफळापरी हा संदर्भ अतिशय योग्य ठरतो. ‘जळापरी मन निर्मळ ज्यांचे’ या ओळी गांधीमधील पारदर्शकतेला लागू पडतात. याचे दाखले त्यांच्या आत्मकथेत कितीतरी आहेत.
‘आपत्काली अन् दीनांवर घन होवून जे वळले हो’ या ओळीसाठी गांधींच्या आयुष्यातील कितीतरी प्रसंग सांगता येतील. पण मला ‘गांधी’ चित्रपटांतील एक अतिशय साधा पण विलक्षण बोलका प्रसंग आठवतो. नदीवर स्नान करणार्या गांधींना नदीच्या दुसर्या काठावर आंघोळ करणारी अर्ध्यामुर्ध्या कपड्यांत लाज झाकतांना तारांबळ उडालेली एक स्त्री दिसते. तिच्या अर्धनग्नतेने गांधी प्रचंड अस्वस्थ होतात. हीच्यासाठी काय करता येईल हा विचार करत असतांना ते आपल्या अंगावरील उपरणे नदीच्या प्रवाहात तिच्या दिशेने सोडून देतात. पाण्यावरून वहात ते वस्त्र तिच्यापर्यंत पोचते. आणि ती उचलून ते पांघरून घेते. हा प्रसंग अप्रतिम तर आहेच पण तो चित्रपटांत मोठ्या प्रभावीपणे आला आहे. दीनांवर घन होवून वळणे याचा साधा सोपा अर्थ भूकेल्याला अन्न देणे असाच कुणाच्या नग्नतेवर वस्त्र पांघरणे हाही असू शकतो. पुढे आयुष्यभर गांधी मोजक्या कपड्यांतच राहिले.
‘दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होवून जळले हो’ हे तर कित्येकांनी लिहूनच ठेवले आहे. अगदी वैचारिक शत्रू असलेले लोकही गांधींबद्दल आदर बाळगून असायचे. मग दूरित तर जळून जाणारच.
बोरकरांनी शेवटच्या कडव्यात ‘आत्मदळाने नक्षात्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो’ ही ओळ जी वापरली आहे ती अगदी 100 टक्के केवळ आणि केवळ त्या काळात गांधींनाच लागू पडते. श्रीकृष्णाची तुला करताना सगळी संपत्ती सगळे दागिने कमी पडले. केवळ रूक्मिणीच्या एका तुलसी दलाने कृष्णाचे पारडे वर गेले अशी पुराणांतील कथा आहे. आख्ख्या स्वातंत्र्य संग्रामात भारतीयांचे नैतिक पारडे ज्या माणसाच्या तुलसी दलाने जड झाले ते म्हणजे गांधीजीच. तेंव्हाच काय पण आजही गांधीशिवाय दुसरे कुठलेच नाव आत्मबळासाठी समोर येत नाही.
कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या कवितेसारखी ‘घुमवा जयजयकार शांतिचा’ अशीही एक कविता बोरकरांनी गांधीप्रभावांतून लिहीली होती. गांधी प्रभावांतून बोरकरांनी गोवा मुक्तिलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता. ‘महात्मायन’ नावाने एक महाकाव्यच त्यांनी गांधीजींवर लिहायला घेतले होते. पण ते पुर्ण झाले नाही. त्यांच्या कित्येक कवितांमधून गांधीविचारांचा प्रभाव दिसून येतो. पण ही कविता गांधींचे एक वेगळेच दर्शन घडवते. त्यासोबतच बोरकरांच्या प्रतिभेचाही एक लोभस पैलू समोर येतो.
ˆ
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
No comments:
Post a Comment