Thursday, February 6, 2020

किशोरकुमारच्या दुर्मिळ चित्रपटाच्या दोन रीळ सापडल्या


उरूस 6 फेबु. 2020 

किशोरकुमार पडद्यावर दिसतो आहे नायक म्हणून पण गाणं जे चालू आहे ते इतर गायकांच्या आवाजात. हे दृश्य एक दोन नव्हे तर तब्बल 22 वेळा घडले आहे. अशी 22 गाणी सापडली आहे. एका गाण्याबाबत मात्र वाद चालू होता. 1957 ला ‘बेगुनाह’ नावाचा किशोर कुमारचा चित्रपट आला होता. हा चित्रपट डॅनी केच्या ‘नॉक ऑन वूड’ या इंग्रजी चित्रपटाची नक्कल होता. त्यामुळे त्याच्यावर मुळ इंग्रजी निर्मात्यांनी बंदी घालण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि चित्रपट डब्यात गेला.

या चित्रपटात मुकेशच्या आवाजातील ‘ए प्यारे दिल बेजुबां’ हे गाणे किशोरकुमारवर चित्रीत झाले असे मानले जायचे. पण प्रत्यक्षात पुरावा काहीच नव्हता. हा चित्रपट पाहणार्‍यांनी हे गाणे संगीतकार जयकिशनवर चित्रित झाल्याचे सांगितले. इसाक मुजावर यांनी आपल्या ‘चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ- 1931 ते 1960’ या पुस्तकात हे लिहून ठेवले आहे.

माझे वडिल अनंत उमरीकर हे हिंदी चित्रपट आणि गाण्यांचे प्रचंड दर्दी. त्यांनी हे गाणे जयकिशनवरचे आहे आणि त्याने पांढरा सुट घातला आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी त्यांना विचारले अहो या चित्रपटावर तर बंदी आली होती. तूम्ही केंव्हा बघितलात? ते म्हणाले बंदी आली पाचव्या दिवशी. मी तर पहिल्याच दिवशी चित्रपट पाहिला होता. ते तेंव्हा हैदराबादला शिकायला होते.

‘द हिंदू’ दैनिकाने या गाण्याची चित्रफित सापडल्याची बातमीच दिनांक 5 फेब्रुवारी 2020 च्या अंकात अगदी पहिल्या पानावर दिली आहे. या गाण्याच्या वेळेसचा फोटोही त्यांनी पहिल्याच पानावर छापला आहे. किशोर कुमारच्या चित्रपटांत त्याच्यासाठी इतर गायकांनी गाणी गायली आहेत हे बहुतेकांना माहित होत नाही. अशा किशोर कुमारच्या गाण्यांची यादी खाली जोडली आहे. ‘ए प्यारे दिल बेजुबान’ चा फोटो सौजन्य दै. द हिंदू. 

किशोर कुमार साठी इतर गातात तेंव्हा

1. बाप रे बाप (1955)- ओ.पी.नय्यर- जाने भी दे छोड ये बहाना-आशा
2. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- चले हो कहां करके जी बेकरार- रफी/आशा
3. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- आंखो को मिला यार से- रफी/बातीश
4. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- हमे कोई गम है- आशा रफी
5. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- हमे कोई गम है- आशा रफी
6. पैसा ही पैसा (1956)- अनिल विश्वास-  ले लो सोने का लड्उू - किशोर/रफी
(एक कडवे रफीचे किशोरवर चित्रित आहे)
7. बेगुनाह (1957)-शंकर जयकिशन-  दिन अलबेले प्यार का मौसम- मन्ना/लता
8. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- मन मोरा बावरा- रफी
9. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- छेड दिये दिल के तार - अमानत अली (उपशास्त्रीय)
10. शरारत (1959)- शंकर जयकिशन- अजब है दास्ता तेरी ए जिंदगी- रफी
11. शरारत (1959)- शंकर जयकिशन- लुस्का लुस्का लुई लुई शा तू मेरा कॉपी राईट- रफी/लता
12. करोडपती (1961)- शंकर जयकिशन-  पहले मुर्गी हुयी थी के अंडा- मन्ना
13. करोडपती (1961)- शंकर जयकिशन- आप हुये बलम मै तेरी हो गयी- मन्ना/लता
14. नॉटी बॉय (1962)- सचिन देव बर्मन - हो गयी श्याम दिल बदनाम-रफी/आशा
15. बागी शहजादा (1964)- बिपीन दत्त- मै इस मासुम चेहरे को- रफी/सुमन
16. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- जब दो दिल हो बेचैन- आशा/शमशाद
17. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- ओ बेखबर तुझे क्या खबर- दुर्रानी/महेंद्र/ भुपेंद्र
18. अकलमंद (1966) - ओ.पी.नय्यर बालमा साजना दुनिया भूला दी-आशा/उषा
19. दुनिया नाचेगी (1967) - की जो मै होता हवा का झोका-मन्ना/आशा
20. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- जानेमन जानेमन तूम-मन्ना/उषा खन्ना
21. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- काहे जिया की बात- मन्ना
22. प्यार दिवाने (1972)- लाला सत्तार- अपनी आदत है सबको सलाम- रफी

Wednesday, February 5, 2020

तळ्याकाठी निवारा शोधीत थकून आली शांतता !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी  २  फेबु २०२० .

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून असतो काही
गळून पडत असता पान मुळीच सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच नसते वरती येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
-अनिल
(दशपदी, मौज प्रकाशन)

खुप ताणाताणीचे व्यग्र असे (व्यग्र हा शब्द वापरायच्या ऐवजी आपण चुकीने सर्रास हिंदी अर्थाचा शब्द व्यस्त वापरतो. त्याचा मराठीतला अर्थ ‘सम’च्या विरूद्ध ते ‘व्यस्त’ असा आहे.) जीवन जगत असताना कधीतरी आपल्याला शांततेची तहान लागते. अशी जागा आपण शोधू पहातो तिथे कुठलेच आवाज नसतील. अशा जागी जो आवाज असतो त्याला शांततेचा आवाज म्हणतात. जंगलात एखाद्या तळ्याच्याकाठी अशी जागा आपल्याला सापडते.

कवी अनिलांनी याच भावनेला आपल्या कवितेत शब्दरूप दिले आहे. अनिलांच्या अकादमी पुरस्कार प्राप्त अतिशय प्रसिद्ध अशा ‘दशपदी’ कवितासंग्रहात ही कविता आहे. ‘दशपदी’तील सर्वच कविता या दहा ओळींच्या आहेत. त्यांची वैशिष्ट्ये समिक्षकांनी उलगडून दाखवली आहेत. नुकतेच अनिलांच्या समग्र कवितेचे पुस्तक श्याम धोंड यांनी मोठ्या कष्टाने संपादित करून प्रकाशीत केले आहे.

‘तळ्याकाठी’ या कवितेची लय अतिशय संथ उस्ताद अमीर खां यांचा विलंबीत ख्याल असावा अशी आहे. जवळ जवळ गद्य वाट्याव्या अशा ओळी यात आलेल्या आहेत. आपण ही कविता वाचत जातो तसं तसं आपल्या आत एक शांतता पसरत गेल्याचा विलक्षण अनुभव येत जातो. दुसर्‍याच ओळीत ‘शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते’ असे शब्द येतात. म्हणजेच शांतते साठी जे काही इतर उपाय आपण करत असतो ते सगळे थकून गेले आहेत. त्यांना मर्यादा पडली आहे. आणि ही शांतता नेमकी मिळते कुठे तर वर्दळीपासून पूर्णत: दूर गेल्यावर जंगलातल्या एखाद्या अस्पर्श अशा तळ्याच्याकाठी. जिथे शेकडो वर्षांपासून प्राणी पक्षी वृक्ष यांचे सहजीवन अव्याहतपणे चालू आहे.  मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जागी आपण जावून त्याच भावनेने शांत बसून राहिलो तरच आपल्याला ही शांतता अनुभवण्यास मिळणार आहे.

व्यंकटेश माडगुळकर यांचे ‘नागझिरा’ हे आख्खे पुस्तक म्हणजेच अनिलांच्या या कवितेचा गद्य विस्तार होय. ‘नागझिरा’ पुस्तकाच्या शेवटी माडगुळकरांनी असे लिहीले आहे की ‘..येताना सोबत जी मद्याची बाटली आणली होती ती बॅगेच्या तळाशी परत येताना तशीच पडून होती.’ त्यांना त्या नशेची कुठली गरजच पडली नाही इतकी नशा या निसर्गातील प्राणी पक्षी वृक्ष यांच्या सहवासात लाभली होती.

अनिलांच्या या कवितेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो प्रत्यक्षपणे शब्दांत आलेला नाही तो म्हणजे या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आपल्यालाही त्यात त्याच पद्धतीनं मिसळावं लागेल हा आहे. नसता निसर्गात जावून आपण जो धुडगुस घालतो, खाण्यापिण्याचा जो आचरटपणा करतो, आरडा ओरडा करून सगळं पाणी गढूळ करून टाकतो ते भयानक आहे. हे पूर्णत: टाळलं पाहिजे. पाणी गढूळ करून टाकतो हे केवळ पाण्याशी संबंधीत विधान नाही. आपण त्या निसर्गातील सगळं जगणंच गढूळ करून टाकतो. रणजीत देसाई यांची एक सुंदर कथा आहे. त्यात रात्रभर जंगलातील विविध आवाजांचे वर्णनं येत जातात. जंगलातील विलक्षण अनुभव देसाई रंगवत जातात. कथेच्या शेवटी असं वाक्य येतं, ‘... खट खट लाकडे तोडण्याचा आवाज येवू लागला. आणि जंगलात माणसांचा दिवस सुरू झाला.’या एकाच वाक्यात मानवी हिंसक वृत्तीची दखल रणजीत देसाईंनी नेमकी घेतली आहे.

व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा तळ्याच्या काठी बसून रात्रभर चांदण्यात विविध आवाज कसे अनुभवायला आले याचे वर्णन केलं आहे. आणि शेवटी तेंदू पत्ता मजूर कसे येतात आणि आवाजाचा कलकलाट कसा सुरू होतो याचे वर्णन येतं. आत्तापर्यंत गढून न झालेलं पाणी पुरतं गढूळ होवून जातं.

निसर्गातील सर्व घटक या शांततेत समाजवून गेलेले असतात. कुणीच कुणाच्या शांततेचा भंग करत नाही. केवळ माणूस हा असा एकच प्राणी आहे की जो गोंगाट करून सगळं काही ढवळून टाकतो.

कवितेचा शेवट हृदयावरची विचारांची धूळ हळू हळू जिथे निवळत जाते असा केलेला आहे. विचार हे मानवी उत्क्रांतीचे एक महत्त्वाचे साधन आहे. बुद्धी आहे म्हणूनच तर माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा आहे. पण याच विचारांची धूळ बनते आणि ती आपल्या हृदयावर साचून राहते तेंव्हाच आपण शांतता गमावून बसतो. ही धुळ झटकायची असेल तर आपल्यालाही प्राणी पक्षी झाडे यांच्यासारखाच निसर्गाचा एक अविभाज्य घटक बनून तळ्याच्या काठी बसून रहावे लागेल तेंव्हाच ती अनुभूती येईल.

धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर ‘बारीपाडा’ नावाचे सुंदर गाव आहे. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. या जंगलातील तलावाकाठी बसून अनिलांच्या या कवितेचा अनुभव मला स्वत:ला घेता आला. उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींना ही कविता मी म्हणून दाखवली आणि काही काळ शांत बसायला सांगितलं. सगळ्यांना एका विलक्षण अनुभूतीचा साक्षात्कार झाला. तूम्हीपण हा अनुभव जरूर घ्या.

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Thursday, January 30, 2020

त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते !


२६ जानेवारी २०२० काव्यतरंग, दै. दिव्य मराठी.
त्या चंद्राचे या चंद्राचे
मुळीच काही नाही नाते.
त्या चंद्रावर-
अंतरिक्षयानात बसोनी
माकड मानव कुत्रा यांना जाता येते
या चंद्राला वाटच नाही
एक नेमके ठिकाण नाही
हाहि नभाचा मानकरी पण-
लक्ष मनांच्या इंद्रगुहांतुनि
भटकत राही.

नटखट मोठा ढोंगीसोंगी
लिंबोणीच्या झाडामागे
केव्हा लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तानांच्या दरेत केव्हा
चुरून जातो फुलाप्रमाणे
भग्न मंदिरावरी केधवा
बृहस्पतीसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो
थरथर कापत बघतो आतुन,
तटघुमटावर केव्हा चढतो
कधी विदूषक पाणवठ्यावर
घसरूनि पडतो
कुठे घराच्या कौलारांतुनि
उतरुनि खाली शेजेवरती
तिथे कुणाची कमलपापणी
हळूच उघडून नयनी शिरतो
कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी
द्वारपाल होऊन जगाच्या
रहस्यतेचे दार उघडतो
अशा बिलंदर अनंतफंदी
या चंद्राचे त्या चंद्राशी कुठले नाते?

त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावुनी
शास्त्रज्ञांना चढता येते
रसिक मनांना या चंद्राला
पळभर केंव्हा
जळात वा डोळ्यांतच केवळ धरता येते.
-कुसुमाग्रज
(हिमरेषा, कॉंटिनेंटल प्रकाशन)
(कवितेवरील चित्र जॉन मस्टोन, सौजन्य आंतरजाल)

कुसुमाग्रजांच्या कितीतरी प्रसिद्ध अशा कविता आहेत. पण ही कविता तशी फारशी पोचलेली नाही. ‘हिमरेषा’ या दुर्लक्षीत राहिलेल्या कवितासंग्रहातील ही कविता. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्या प्रसंगावरून कुसुमाग्रजांना ही कविता सुचली असावी. कारण हीचा कालखंड तोच आहे. (हिमरेषा 1 ली आवृत्ती 1964)
कला आणि जीवन यांतील एक अतिशय सुरेख असा संबंध कुसुमाग्रजांनी परत कलेच्याच नाजूक भाषेत समजावून सांगितला आहे. 1960 नंतर औद्योगिकीकरणाने जगभरात वेग पकडला. 1990 नंतरच्या जागतिकीकरणांतून बाजारपेठेचे तत्त्वज्ञान जोरकसपणे पुढे आले. त्याचा मोठ्या प्रमाणात स्वीकार जगभरात केला जावू लागला. 2000 नंतर संगणक आणि पुढे मोबाईलने अवघे विश्व व्यापले.

या सगळ्यांतून आपण परत त्याच मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले या बिंदूपाशी येवून थांबतो. दगड माती खड्डे यांनी भरलेला चंद्र पाहताना कलाकारांनी लेखकांनी पाहिलेला चंद्र कुठे आहे? हा  प्रश्‍न जसा कुसुमाग्रजांना तेंव्हा पडला होता तसाच प्रश्‍न आज नवनविन शोध लागत असताना, तंत्रज्ञानाचा विस्फोट होत असताना मानवी मनाला पडतो आहे. माणसाच्या मुळच्या भावभावनांचे काय? हास्य, करूणा, शृंगार, वीर आदी नवरस सगळे अजूनही मनावर कब्जा करून बसलेले आहेतच ना. मानवी जीवन यंत्रांनी व्यापून टाकले तरी माणूस यंत्र नाही ना बनू शकत. आणि तो तसा बनत नाही यातच त्याचे माणूसपण आहे. हेच कोडे व्यवहारी दृष्टीच्या लोकांन उलगडत नाही. हे कोडे रसिक दृष्टीकोनातूनच समजून घेता येवू शकते.

कुसुमाग्रजांच्या कवितेत उलगडून दाखवावे असे काहीच नाही. तशी खुप सहज सोपी ही कविता आहे. तितकीच ती मुलभूत मानवी भावभावनांची दखल घेणारी सखोल कविता आहे. आपण एखाद्या पौणिमेच्या चांदण्या रात्री गच्चीवर किंवा उघड्या माळावर किंवा कोरड्या नदीच्या पात्रात पडून एकटक आकाशाकडे पाहिलं तर एका वेगळ्याच सौंदर्याची अनुभूती येते आणि या कवितेचा आशय उमगून येतो.  सभोवतीचे भौतिक जग त्या चांदण्यात असे काही अद्भूत वाटू लागते की जणू काही हे सगळं परिकथेतीलच आहे. अशी काय ताकद चांदण्यात असते की ती आपल्या मनाचा कब्जा घेते? हीच कलेची ताकद आहे. आणि कला समजून घ्यायची असेल तर तसेच कलासक्त मनही असावे लागते. रसिकतेची रसिकतेने करून दिलेली व्याख्या असेच या कवितेचे वर्णन करावे लागेल.  


श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Monday, January 27, 2020

10 रु.थाळीचे थोतांड कार्यकर्त्यांचे पोट भरण्यासाठी !


उरूस, 27 जानेवारी 2020

हा लेख वाचणार्‍या कुणालाही माझे आवाहन आहे. त्याने आपल्या आजूबाजूच्या गरजू काम करणार्‍या सामान्य मजूराला आपल्या घरचे शिल्लक अन्न देवून पहावे. बघा तो घेवून जातो का. जवळपास सगळ्यांचाच असा अनुभव आहे की कुणी अन्न न्यायला तयार नाही. औरंगाबाद सारख्या शहरात (महाराष्ट्रभर हीच परिस्थिती आहे.) शिल्लक अन्न हीच समस्या आहे. अन्न नाही ही समस्याच नाही. मग असं असताना 10 रूपयांत जेवण यांसारख्या भिकारड्या थोतांड माजवणार्‍या योजना का राबवल्या जातात?

आधी शाळेत मुलांना तांदूळ वाटप केला जाण्याची योजना आली. नंतर खिचडी वाटपाची योजना आली. तिची वाट लागल्यावर आता ही 10 रूपयांत ‘शीव थाळी’ योजना आली आहे.

1965 च्या हरितक्रांती नंतर जगभरांत अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड वाढले. नंतर आलेल्या जैविक तंत्रज्ञान क्रांतीनंतर तर कमी जागेत जास्त अन्न तयार करण्याची तंत्रज्ञान क्रांती विकसित झाली आहे. लवकरच कमी जागेत जास्त अन्न पिकेल, आज जेवढी जागा लागते त्याच्या केवळ 30 टक्के जागेतच जास्त लोकसंख्येला लागणारे अन्न तयार होईल. मग आधी जी जमीन शेतीखाली होती ती रिकामी होईल. त्या जागेत इतर पिके घेता येतील किंवा त्या जागी जंगल वाढवता येईल. ही स्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर असेल.

या फुकटाच्या योजना सामान्यांचे पोट भरण्यासाठी कदापिही आखल्या जात नाहीत. तर कार्यकर्त्यांचे पोट भरण्यासाठी आखल्या जातात हे एक उघड गुपीत आहे. अशा योजना या पूर्वीही आल्या होत्या. 1 रूपयांत झुणका भाकर ही योजना युती सरकारने 1995 ला आणली होती. या झुणका भाकर केंद्राच्या जागा कार्यकर्त्यांनी ढापल्या. आता तिथे काय दुकानदारी चालते ते एकदा जावून तपासावे.

10 रूपयांत जेवण मिळू शकत नाही हे सगळ्यांना माहित आहे. यासाठी शासनाकडून सबसिडी मिळणार आहे. यातच सगळी गोम दडली आहे. खरं तर शासनाने यात पडायची काही गरजच नव्हती. जो कुणी भुकेला आहे त्याची काळजी घेण्यासाठी शेतकरी समर्थ आहे. त्यानं सगळ्या मानवप्राण्यांची भूक भागू शकेल इतके अन्नधान्य पिकवून ठेवले आहे. काही दुर्गम आदिवासी भागांत कुपोषणाने मुले मृत्युमुखी पडतात तेथे अन्नधान्य पोचविण्याची गरज आहे. अन्नधान्य उपलब्ध नाही असे नाही तर वितरणाची यंत्रणा काही ठिकाणी विस्कळीत आहे ही समस्या आहे. सरकारी गोदांमामध्ये प्रचंड प्रमाणात धान्य सडत आहे.

शीख पंथातील लंगर सारख्या योजना अखंडपणे प्रत्येक भूकेलेल्या अन्न पुरवण्याचे काम करतच आहेत. इस्कॉन सारख्या मोठ्या धार्मिक संस्था शाळांमधून सकस अन्न मोफत पुरवत आहेत.

ज्यांना कुणाला भुकेल्यांची दया येते त्यांनी अशा संस्थांना मदत करावी. त्यासाठी शासकीय पातळीवर 10 रूपयात थाळी सारखे थोतांड करायची गरज नाही. देवस्थानांच्या गावी अतिशय कमी किमतीत जेवण दिले जाते आहेच. शिर्डी काय किंवा शेगांव काय इथे अशा योजना वर्षानुवर्षे बीनबोभाट चालू आहेत. गरजू त्याचा लाभ घेतही आहेत.

शिवाय गावोगावी भंडारे होतात. तिथेही अन्न वाटपाचा मोठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो.
शीख, क्रिश्‍चन आणि बौद्ध या धर्मांत भीकेला जराही स्थान नाही. परिणामी या धर्मियांत भिकारी आढळतच नाही. जो कुणी भीक मागेल त्याची खाण्याची सोय लावली जाते. तसेच ज्याला काम करायचे आहे त्याचीही सोय लावली जाते. परिणामी भिकारी आढळतच नाही. या उलट हिंदू, इस्लाम आणि जैन धर्मात भीकेचे मोठेच अवडंबर माजवल्या गेले आहे. भीक घालणे मोठे पुण्याचे काम समजले जाते. याचा परिणाम म्हणजे भीक मागण्यालाही एक मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आढळून असे येते की भीक ही मागण्यार्‍यापेक्षा ती देणार्‍याची जास्त गरज आहे. परिणामी ही व्यवस्था अव्याहतपणे टिकून राहिली आहे. हीच गोष्ट अन्नदानाची. आता जास्तीचे अन्नधान्य उपलब्ध असल्याने ती वाटणार्‍याची गरज होवून बसली आहे न की खाणार्‍याची.

औरंगाबाद शहरात जास्तीचे अन्न गोळा करून वाटप करण्याचे काम दोन संस्था करतात. त्यांचे मो. क्र. खाली देत आहे. ज्या कुणाकडे जास्तीचे अन्न असेल त्यांनी यांच्याशी संपर्क साधावा. किमान औरंगाबाद शहरांत तरी भुकेला एकही माणूस असेल अशी शक्यता नाही. तेंव्हा 10 रूपयांत थाळी सारख्या योजनांचे थोतांड माजवल्या जावू नये. सरकारी पैशाची नासधुस अशा नको त्या गोष्टींवर करू नये. रस्ते वीज पाणी कचरा नालेसफाई अतिक्रमणं हे विषय आधी सरकारने मार्गी लावावेत.

सार्वजनिक वितरण व्यवस्था (रॅशन) पूर्णपणे सडून गेली आहे. त्यापेक्षा या सगळ्यांतून शासनाने बाजूला होवून दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या खात्यात काही एक रक्कम जमा करण्याची सोय करावी. किंवा फुड कुपन्स सारख्या योजना राबवून त्यांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. पण धान्य वाटप किंवा शिजवलेले अन्न वाटप असा आचरटपणा करू नये. भ्रष्टाचारासाठी नविन कुरण तयार करू नये. 

(शिल्लक अन्ना आणि भुकेल्यांना अन्न देण्यासाठी संपर्क रॉबिनहूड आर्मी 9823399929, मानव सेवा ग्रुप 8983171289)
 
श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

Wednesday, January 22, 2020

उकिरड्यावर पडलेले होट्टलचे शिल्पवैभव


उरूस, 22 जानेवारी 2020

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालूक्यात तेलंगणा सीमेवर होट्टल नावाचे गांव आहे. चालूक्यांची उप राजधानी असलेले हे गांव शिल्पवैभवाने अतिशय समृद्ध आहे. या गावांतील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. आज याच मंदिरांच्या परिसरात होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे.  एक हजार वर्षांपूर्वीची ही अतिशय समृद्ध अशी नगरी. जूने भक्कम दगडी वाडे आजही गावात आहेत. परिसरांतील 22 गावे ज्यांच्या देशमुखीखाली होती अशा तालेवार देशमुखाची प्रचंड गढी या गावात आहे. गढीची पडझड झालेली असली तरी प्रवेशद्वार आणि त्या भोवतीची भक्कम भिंत जून्या वैभवाची साक्ष देते.

मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार 20 खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मक रित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.

जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर. जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्‍याचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.

मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.

पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्‍न सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?

एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?

ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्‍या मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.

आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्‍यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे.
मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल. केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण कृती करू या.

होट्टल असो की चारठाणा की मराठवाड्यातील अजून इतरत्र असलेली जूनी मंदिरे आणि प्राचीन वारसा सांगणार्‍या वास्तू यांचे जतन करण्यासाठी आपण सगळे मिळून चळवळ उभारू या. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी होण्यात रस आहे, इच्छा आहे, मदत करायची आहे, सुचना आहेत, जे अभ्यासक आहेत त्यांनी संपर्क साधावा. आपण सगळे मिळून मराठवाडा पातळीवर ऐतिहासिक वारसा जतन चळवळीची उभारणी करू या.

   श्रीकांत उमरीकर 9422878575


ˆˆ   

Monday, January 20, 2020

जीवन त्यांना कळले हो !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी. रविवार १९ जानेवारी २०२० 

जीवन त्यांना कळले हो

जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरि
सहजपणाने गळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचराचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो

सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनि जे वळले हो

दूरित जयांच्य दर्शनमात्रे
मोहित होउनि जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन् परिमळले हो

आत्मदळाने नक्षत्रांचे
वैभव ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन
घरीचं ज्या आढळले हो
-उरीच ज्यां आढळले हो

-बा.भ. बोरकर
(बोरकरांची समग्र कविता,खंड 1, प्रकाशक देशमुख आणि कं. पुणे,  पृष्ठ-322)

बोरकरांच्या या सुप्रसिद्ध कवितेचा महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षात एक वेगळा अन्वयार्थ लावतो येतो. त्या दृष्टीने ही कविता समजून घेतली पाहिजे. 

‘मीपण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो’ असं बोरकर लिहीतात तेंव्हा त्यांच्यासमोर गांधीजीच असणार. 1920 साली टिळकांच्या निधनानंतर गांधींचे नेतृत्व समोर आले तेंव्हा त्यांचे वय 50 होते. म्हणजे पक्वफळापरी हा संदर्भ अतिशय योग्य ठरतो. ‘जळापरी मन निर्मळ ज्यांचे’ या ओळी गांधीमधील पारदर्शकतेला लागू पडतात. याचे दाखले त्यांच्या आत्मकथेत कितीतरी आहेत.

‘आपत्काली अन् दीनांवर घन होवून जे वळले हो’ या ओळीसाठी गांधींच्या आयुष्यातील कितीतरी प्रसंग सांगता येतील. पण मला ‘गांधी’ चित्रपटांतील एक अतिशय साधा पण विलक्षण बोलका प्रसंग आठवतो. नदीवर स्नान करणार्‍या गांधींना नदीच्या दुसर्‍या काठावर आंघोळ करणारी अर्ध्यामुर्ध्या कपड्यांत लाज झाकतांना तारांबळ उडालेली एक स्त्री दिसते. तिच्या अर्धनग्नतेने गांधी प्रचंड अस्वस्थ होतात. हीच्यासाठी काय करता येईल हा विचार करत असतांना ते आपल्या अंगावरील उपरणे नदीच्या प्रवाहात तिच्या दिशेने सोडून देतात. पाण्यावरून वहात ते वस्त्र तिच्यापर्यंत पोचते. आणि ती उचलून ते पांघरून घेते. हा प्रसंग अप्रतिम तर आहेच पण तो चित्रपटांत मोठ्या प्रभावीपणे आला आहे. दीनांवर घन होवून वळणे याचा साधा सोपा अर्थ भूकेल्याला अन्न देणे असाच कुणाच्या नग्नतेवर वस्त्र पांघरणे हाही असू शकतो. पुढे आयुष्यभर गांधी मोजक्या कपड्यांतच राहिले.

‘दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होवून जळले हो’ हे तर कित्येकांनी लिहूनच ठेवले आहे. अगदी वैचारिक शत्रू असलेले लोकही गांधींबद्दल आदर बाळगून असायचे. मग दूरित तर जळून जाणारच. 

बोरकरांनी शेवटच्या कडव्यात ‘आत्मदळाने नक्षात्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो’ ही ओळ जी वापरली आहे ती अगदी 100 टक्के केवळ आणि केवळ त्या काळात गांधींनाच लागू पडते. श्रीकृष्णाची तुला करताना सगळी संपत्ती सगळे दागिने कमी पडले. केवळ रूक्मिणीच्या एका तुलसी दलाने कृष्णाचे पारडे वर गेले अशी पुराणांतील कथा आहे. आख्ख्या स्वातंत्र्य संग्रामात भारतीयांचे नैतिक पारडे ज्या माणसाच्या तुलसी दलाने जड झाले ते म्हणजे गांधीजीच. तेंव्हाच काय पण आजही गांधीशिवाय दुसरे कुठलेच नाव आत्मबळासाठी समोर येत नाही.

कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या कवितेसारखी ‘घुमवा जयजयकार शांतिचा’ अशीही एक कविता बोरकरांनी गांधीप्रभावांतून लिहीली होती.  गांधी प्रभावांतून बोरकरांनी गोवा मुक्तिलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता. ‘महात्मायन’ नावाने एक महाकाव्यच त्यांनी गांधीजींवर लिहायला घेतले होते. पण ते पुर्ण झाले नाही. त्यांच्या कित्येक कवितांमधून गांधीविचारांचा प्रभाव दिसून येतो. पण ही कविता गांधींचे एक वेगळेच दर्शन घडवते. त्यासोबतच बोरकरांच्या प्रतिभेचाही एक लोभस पैलू समोर येतो.
ˆ
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Monday, January 13, 2020

संस्कृती संवर्धनाचा चारठाणा पॅटर्न सर्वत्र राबवूया !


सोमवार दि. 13 जानेवारी 2020

या लेखासाठी वापरेले चित्र चारठाणा येथील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा मानस्तंभाचे चित्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असे केवळ तीन स्तंभ आहेत. पहिला स्तंभ सातवाहनाच्या काळातील पैठण येथे आहे. दुसरा स्तंभ त्यानंतर जवळपास आठशे वर्षांनी खोदलेल्या कैलास लेण्यात आढळून येतो. आणि तिसरा स्तंभ त्यानंतर चारशे वर्षांनी उत्तर चालूक्य किंवा यादवांच्या काळातील चारठाणा (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे आहे.

रविवार दिनांक 12 जानेवारी 2020 ला या गावात वारसा पदयात्रा (हेरिटेज वॉक) चे आयोजन ग्रामस्थ, इतिहास प्रेमी, परातत्त्व अभ्यासक, कलाकार यांनी केले होते. या पदयात्रेत सामील चित्रकार सरदार जाधव यांचे पाय या स्तंभाजवळ येताच खिळून राहिले. सोबतचे पुढे निघून गेले तरी सरदार जाधव त्याच जागी बसून राहिले. खाणं पिणं विसरून त्यांनी तीन तासांत हे अप्रतिम असे चित्र रेखाटले.



हा स्तंभ जैनमंदिर वास्तुशास्त्राचा एक भाग असल्याची माहिती भरपुर अभ्यास करून इतिहास अभ्यासक तज्ज्ञ लक्ष्मीकांत सोनवटकर यांनी मांडली. अगदी स्तंभावरील मातृका शिल्पांचा बारीक बारीक तपशील सांगत आपल्या मताला पुष्टी दिली. ज्या दिशेला मुर्ती आहे त्या दिशेचेही संदर्भ जेंव्हा त्यांनी दिले तेंव्हा इतिहास अभ्यासक तर सोडाच पण सामान्य दर्शकांनीही तोंडात बोटे घातली.

आज या स्तंभाच्या परिसरात अक्षरश: उकिरडा झालेला आहे. सामान्य लोक या परिसरात प्रात:विर्धी करत आहेत. स्तंभाच्या जवळच शीरच्छेद झालेली अशी यक्षाची मुर्तीती भग्न अवस्थेत पडून आहेत.

या स्तंभाच्या पूर्वेला मंदिराचे प्रवेशद्वार असावे अशी रचना मातीच्या ढिगार्‍यात स्पष्ट आढळून येते. या परिसराचे उत्खनन केल्यास मंदिर सापडण्याची शक्यता दाट आहे. पण केवळ आणि केवळ आपल्या अनास्थेपोटी हा सगळा परिसर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या अभियानात लोकांनी परिसराची साफसफाई केली. किमान जाण्यासाठी वाट तरी तयार झाली. स्तंभाच्या दगडी पायाजवळ जागा स्वच्छ झाली. पण बाकी परिसर वाढलेला झाडोरा, बाभळीची झाडे, घाण कचरा अजून शिल्लक आहे.

असे वातावरण असताना व्हिन्सेंट पास्किलीनी हा फ्रेंच पर्यटक डिसेंबर 2018 ला या गावी आला. येथील पुरातन वारसा पाहून त्याला प्रचंड असे कुतूहल निर्माण झाले. या गावाला ‘हेरिटेज व्हिलेज’ दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करण्याची गरज त्याने बोलून दाखवली. त्याची तळमळ पाहून ग्रामस्थ, इतिहास अभ्यासक, पुरातत्त्व तज्ज्ञ यांनाही या विषयाचे गांभिर्य लक्षात आले.

पाहता पाहता वर्षभर विविध घटक कार्यरत झाले. रवी पाठक सारखा एक चित्रपट दिग्दर्शक या पसिरावर अतिशय सुंदर असा माहितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केली. लक्ष्मीकांत सोनवटकर सारखे इतिहास अभ्यासक या पसिराची माहिती गोळा करून त्याचे पुस्तक करण्याच्या मार्गाला लागले आहेत. येथील मंदिर शिल्पातील नृत्य करणार्‍या अप्सरा, त्यांच्या हातातील वाद्ये यांची माहिती होताच महागामी गुरूकुलाच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता या गावात सांस्कृतिक वारसा सप्ताहाचे आयोजन करून त्यात गायन वादन नृत्य सादर व्हावे अशी आग्रही मागणी केली आहे. डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी, डॉ. प्रभाकर देव, सुरेश जोंधळे यांच्यासारखे तज्ज्ञ प्रत्यक्ष या सांस्कृतिक वारसा पदयात्रेत सामील होवून या अभियानाला नैतिक बळ पुरवत आहेत. नानासाहेब राऊत सारखे लोकप्रतिनिधी स्थानिक व्यवस्था काटेकोरपणे राबवून पाहूण्यांचे आगत स्वागत आस्थेने करत आहेत. गावाच्या भल्यासाठी गावकर्‍यांकडून संपूर्ण सहकार्य करण्याची केवळ हमीच देत नाहीत तर तसे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करत आहेत.

सांस्कृतिक जागृती अभियानाच्या आठवडाभर आधीपासून गावात ग्राम स्वच्छता अभियान चालू करण्यात आले होते. उर्दू शाळेतील मुसलमान मुला मुलींनी गावातील उकंडेश्वर मंदिराची साफसफाई करून उदारामतवादी सहिष्णु परंपरेचा एक जिवंत पुरावाचा दिला. माजी सरपंच अजगर देशमुख यांनी पुढाकार घेवून सर्व मुस्लिम समाज या अभियानात सहभागी केला. या भागांतील सुफी संतांच्या दर्ग्यांच्या परिसरांतही अभियान राबविण्याची तयारी दर्शविली.

भारताची संस्कृती जनजीवन संपन्न वारसा चालीरिती समजून घेण्यासाठी परदेशी विद्यार्थी आपल्याकडे आणि आपले विद्यार्थी परदेशात अशी एक योजनाच रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येते. चित्रकार, पुराण वस्तुच्या संग्राहक, पर्यटक मेधा पाध्ये या अशा तीन परदेशी विद्यार्थ्यांना घेवून या अभियानात सहभागी झाल्या होत्या. या परदेशी विद्यार्थ्यांनी आवर्जून भारतीय वेष परिधान केला होता. शिवाय इतर गावकर्‍यांसोबत मांडी घालून पत्रावळीवर जेवण केले.

प्रा. शिवा आयथळ हा परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयातील विज्ञानाचा प्राध्यापक. मूळचा कर्नाटकातील असलेल्या शिवाचा जन्म परभणीचाच. कर्नाटकांत संस्कृती संवर्धनाची जी जागृती आहे ती आपल्या जन्मभूमीत मराठवाड्यात नाही याची खंत त्याला वाटते. चारठाण्याच्या अभियानात तो उत्स्फुर्तपण सहभागी झाला. आपल्या कॅमेर्‍याने हे अभियान टिपताना त्याने उत्कृष्ठपद्धतीने आपल्या फर्ड्या इंग्रजीत लिहून काढले. समाज माध्यमातून त्याची हा विषय जगभर पोचविण्याची त्याची ही प्रामाणीक धडपड फार महत्वाची आहे.

शाश्‍वत पर्यटनासाठी झटणार्‍या आकाश धुमणे या तरूणाने औरंगाबादेतून सर्व तज्ज्ञ अभ्यासकांना मुद्दामहून गाडी करून या पदयात्रेसाठी आणले. मराठवाडा परिसरात शाश्‍वत पर्यटन वाढावे यासाठी गेली तीन वर्षे व्हिन्सेंट या फ्रेंच मित्राच्या सहकार्याने हा तरूण प्रयत्न करतो आहे. परदेशातील पर्यटक आपल्या संपन्न सांस्कृतिक वारश्याकडे आकर्षित करण्यासाठी  केला जाणारा हा प्रयास प्रशंसनीय आहे. पर्यटकांना अजिंठा वेरूळ बिबी का मकबरा देवगिरी किल्ला या शिवाय दाखवायला खुप काही आपल्याकडे आहे हेच लक्षात घेतले जात नाही. केवळ जून्या वास्तुच नव्हे तर आपली परंपरा, जत्रा, सांस्कृतिक महोत्सव, संगीत, खाद्य पदार्थांचा आस्वाद या पर्यटकांना दिला पाहिजे या बाबत शाश्‍वत पर्यटन आग्रही आहे.

पर्यटकांना राहण्यासाठी आपले जूने वाडे डागडुजी करून वापरता येवू शकतात. आपला परिसर तेथील जनजीवन या सर्वांचा विचार शाश्‍वत पर्यटनात केला जातो. मराठवाड्यातील वस्त्र विणण्याची अतिशय मोठी समृद्ध अशी परंपरा पर्यटकांना आकर्षित करू शकते. पण यासाठी वेगळे असे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
मल्हारीकांत देशमुख सारख्या परभणीच्या चळवळ्या पत्रकाराने वंशपरंपरागत त्याच्या घराण्यात या चारठाणे गावची चारआणे देशमुखी होती हे ऋण ध्यानात ठेवून या सगळ्या प्रकल्पाला गती दिली. घरात दु:खद प्रसंग घडला असतानाही वैयक्तिक दु:खावर मात करून अभियानाला बळ पुरवले हे विशेष.

चारठाण्याच्या सांस्कृतिक वारसा पदयात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील कितीतरी सांस्कृतिक विषय ऐरणीवर आले आहेत. मराठवाड्यातील जाणत्या विचारी लेकांनी एकत्र येवून या विचारपुर्वक कृती करण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेत काम करणारे अधिकारी आपल्याच समाजाचा एक घटक आहेत. त्यांच्याकडून आपल्या परिसरांतील शाश्‍वत पर्यटनाच्या संधी शोधून त्यांचा विकास करण्याची गरज आहे. राजकीय नेते शेवटी आपणच निवडून दिलेले आहेत. त्यांच्यावर जनतेचा दबाव या कामांसाठी आपणच निर्माण करावा लागणार आहे. चारठाण्याच्या ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे टाकले आहेच. संपूर्ण मराठवाड्यात अशी जागृती होण्याची गरज आहे.

सुरेश जोंधळे यांनी नांदेड जिल्ह्यात होट्टल महोत्सवाच्या माध्यमांतून एक मोठे काम आधीच सुरू केले आहे. शिवरात्रीला औंढा नागनाथ येथे सांस्कृतिक महोत्सव घेता येवू शकतो. जालना जिल्ह्यात अंबडला दत्तजयंतीला संगीत महोत्सव गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. या वर्षी तो होवू शकला नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अंबडला असलेली जूनी मंदिरे बारवा या ठिकाणीही हेरिटेज वॉक आयोजीत करता येवू शकतो. उस्मानाबाद येथील माणकेश्वर मंदिर अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे. जालना जिल्ह्यातीलच भोकरदन तालूक्यातील अन्व्याच्या मंदिरातील शिल्पसौंदर्य चकित करणारे आहे. त्याचीही दखल घेतली गेली पाहिजे. मराठवाड्यात किमान 25 जूनी अप्रतिम मंदिरे डॉ. प्रभाकर देव यांनी अधोरेखीत केली आहेत. त्या त्या स्थळी हेरिटेज वॉक आयोजीत करून जागृती घडविता येवू शकते.

अंबाजोगाई तर मराठी भाषेचे जन्मस्थान आहे. या परिसरांत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करता येवू शकते.
चला मित्रांनो संस्कृती संवर्धनाचा चारठाणा पॅटर्न सर्वत्र राबवू या !