1 जानेवारी 2020 उरूस
‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती’ या तुकाराम महाराजांच्या रचनेचा जरा चुक अर्थ लावला जातो. मोठे होवूच नका, लहान बनून रहा असा काहीसा याचा विचित्र अर्थ काही जण समजून सांगतात. प्रत्यक्षात तुकाराम महाराजांनी अनावश्यक मोठेपणावर बडेजावावर टीका करण्यासाठीही कदाचित या ओळी वापरल्या असाव्यात. काही वेळा व्यवहारीक धबडग्यात अनावश्यक झकपक मोठेपणा तामझाम कोसळून पडतो आणि अगदी साधेपणा टिकून राहतो.
शास्त्रीय संगीतासाठी मोठ्या स्टेडियम वर उभारलेला चित्रपटाचा सेट भासावा असा रंगमंच, भलीमोठी खर्चिक आरास, ट्रॉली कॅमेर्याने चित्रण, कलाकारांची पंचतारांकित हॉटेल्समध्ये व्यवस्था, दहा हजार प्रेक्षकांसाठीची अगडबंब आसन व्यवस्था. आणि मग इतकं सगळं केलंच आहे तर त्यासाठी गर्दी जमविण्यासाठी ‘सेलिब्रिटी’ बोलवा म्हणजे मूळ ज्या कारणासाठी हे सगळं सुरू केलं आहे तेच बाजूला ठेवावं लागतं. शास्त्रीय संगीताऐवजी सुगम संगीतातील लोकप्रिय गायक कलावंतांना आमंत्रित करून लोकांना खेचावे लागते. मग या खेचाखेचीत शास्त्रीय संगीत एका बाजूलाच राहते आणि बाकीच्याच गोष्टींना अतोनात महत्त्व प्राप्त होते.
इतकं करूनही असे मोठे संगीत महोत्सव सातत्याने साजरे होताना दिसत नाहीत. कारण आयोजकांचा दृष्टीकोन शुद्ध सांगितिक नसतो. परिणामी त्या राजकीय नेत्याला जो पर्यंत आपली प्रतिमा उजळून घेण्यात रस असतो तोपर्यंत हे चालते. मग त्याचा मूळ आत्मा गमावतो. आणि कधीतरी मग हे उपक्रम बंदच पडलेले दिसतात.
याच्या अगदी उलट सांगितिक निष्ठेने चालू असलेले आणि सामान्य रसिकांनी उचलून धरलेले महोत्सव. परभणी जिल्ह्यातील सेलू या अगदी छोट्या गावी गेली दोन वर्षे सामान्य रसिकांच्या बळावर लोकवर्गणीवर ‘संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सव’ आयोजीत केला जातो. या वर्षी 28-29 जानेवारी 2019 ला हा महोत्सव उत्साहात रसिकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला. दुपारी 5.30 पासून ते रात्री 10.30 पर्यंत दोनएकशे रसिक शुद्ध शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी मांडी घालून बसून होते. त्यातही अर्ध्याच्यावर संख्या अगदी तरूण मुला मुलींची. स्त्रियांची उपस्थितीही जवळपास अर्धी.
पं. विजय कोपरकरांसारखा दिग्गज कलाकार ‘जोग’ रागाचा बडा ख्याल तासभर आळवतो आणि त्याला रसिक तन्मयतेने दाद देतात, ‘किरवाणी’ सारखा वाद्यसंगीतातच जास्त करून ऐकायला मिळणारा राग सादर होतो आणि त्यातील बारकावे रसिक समजून घेतात हे दृश्य विलक्षण होते. सुंद्री सारखे अपरिचित वाद्य (छोटी सनई) सोलापूरचा कपिल जाधव हा तरूण शास्त्रीय संगीतात रूजवू पहातो आहे. त्याचे वादन ऐकायला तरूण उत्सुक असतात. समीप कुलकर्णी सारखा तरूण सतार वादक ‘यमन’ सारखा प्रचलित राग नजाकतीने सादर करतो किंवा संजय गरूडांसारखे तयारीचे कलाकार ‘जोगकंस’ आवेशात सादर करतात, शंतनु पाठक हा सेलूचा तरूण कलाकार आपल्या आयुष्यातील पहिलेच सादरीकरण आश्वासक असे या मंचावरून सादर करतो असे कितीतरी ठळक क्षण या महोत्सवात रसिकांनी अनुभवले. ज्यांच्या नावे हा महोत्सव भरवला जातो त्या संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकरांचे चिरंजीव ज्येष्ठ गायक यशवंत चारठाणकर यांचा मारूबिहाग आणि सेलू शहरातील अगदी कोवळ्या वयातील मुला मुलींनी सादर केलेले स्वागतगीत हेही लक्षणीय होते.
स्वागत गीत सादर करणार्या कोवळ्या सुरांतून शास्त्रीय संगीताचे आश्वासक भवितव्य सर्वच ज्येष्ठांना जाणवले. दोन दिवसांच्या महोत्सवानंतर पं. विजय कोपरकरांनी एक दिवस मुक्काम वाढवून या शालेय विद्यार्थ्यांशी आवर्जून सांगितिक संवाद साधला.
सेलू शहरांतील संगीत रसिकांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. आपले पद प्रतिष्ठा विसरून पडेल ते काम करत सर्वजण झटत होते. स्वेच्छा देणगीच्या माध्यमातून सगळे आर्थिक नियोजन करण्यात आले. देवगिरी संगीत प्रतिष्ठान संपूर्ण मराठवाड्यात संगीत चळवळ रूजविण्यासाठी गेली दोन वर्षे कार्यरत आहे. औरंगाबाद, सेलू, परभणी, अंबड, वसमत येथील सांगितिक उपक्रम यशस्वीरित्या पार पडत आहेत. इतरही ठिकाणी शास्त्रीय संगीत विषयक उपक्रम राबविण्यासाठी देवगिरी संगीत प्रतिष्ठान कटीबद्ध आहे.
सेलू सारख्या छोट्या गावाने शास्त्रीय संगीताची चळवळ कशी चालवावी याचा आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे. आज महाराष्ट्रभर संगीत शिक्षण देणार्या छोट्या मोठ्या संस्था कार्यरत आहेत. येथे शिकविणारे, शिकणारे, त्यांचे पालक या सगळ्यांना जोडून घेणारी एखादी चळवळ उभारली जाण्याची गरज आहे. छोट्या वैयक्तिक देणगीदारांच्या सहकार्याने संगीत महोत्सव भरविणे सहज शक्य आहे. त्यासाठी सगळी झकपक बाजूला ठेवून साधेपणाने काम करण्याची खरी गरज आहे.
दोनशे तिनशे श्रोते बसू शकतील इतके लहान सभागृह, चांगली ध्वनी व्यवस्था, मंचावर पुरेशी प्रकाश व्यवस्था, वेळेचे काटेकोर नियोजन, अनावश्यक भाषणं सत्कार समारंभ यांना फाटा असे काही पथ्य पाळले तर असे संगीत महोत्सव यशस्वी होवू शकतात. निधीसाठी सामान्य रसिकांना आवाहन करण्याचा मार्ग सगळ्यात उत्तम. काही देणगीदार स्थानिक पातळीवर मिळू शकतात. काही कंपन्या आपल्या सामजिक निधीतूनही अशा उपक्रमांना मदत करू शकतात. या सगळ्यांतून अतिशय कमी पैशात संगीत महोत्सव यशस्वी होवू शकतो.
सेलू सारख्या गावांनी हा पायंडा घालून दिला आहेच. आता इतरही ठिकाणच्या संगीत रसिकांनी याचे अनुकरण करण्याची गरज आहे.
(महोत्सवाच्या बातम्या वर्तमानपत्रांत आलेल्या आहेत. शिवाय इतरांनी यावर लिहीलेले असल्याने कलाकारां व्यतिरिक्त इतरांची नावे लेखात घेतली नाहीत. आयोजकांचीही नावे दिलेली नाहीत. यासाठी झटणार्या सर्वांची वृत्ती ‘नावासाठी नाही तर गावासाठी’ अशीच आहे. अगदी देणगीदारांनीही आपली नावे कुठे येवू दिली नाहीत. साथीदार कलाकारांची नावे इतरत्र आलेली आहेतच.)
श्रीकांत उमरीकर 9422878575