उरूस, शुक्रवार, 20 डिसेंबर, 2019
नागरिकत्व कायद्यासाठी देशभरांत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तथाकथित पुरोगामी या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत. सरकारच्या प्रती आपला रोष प्रकट करण्याचा, विरोध करण्याचा, रस्त्यावर उतरण्याचा विद्यार्थ्यांचा कसा हक्क आहे हे सगळेच सांगत आहेत.
एक साधा प्रश्न समोर येतो देशभरांत गेली 35 वर्षे शेतकर्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. 19 मार्च 1986 ला अमरावती जिल्ह्यात साहेबराव करपे या शेतकर्याची कुटूंबासह आत्महत्या ही नोंदली गेलेली पहिली आत्महत्या. तेंव्हापासून आजपर्यंत एकूण चार लाख शेतकरी आत्महत्या नोंदल्या गेल्या आहेत. मग यासाठी ही शेतकर्यांची विद्यापीठांत शिकणारी पोरं रस्त्यावर का नाही उतरली?
1990 ला मंडल आयोगाचा वणवा पेटला तेंव्हा एका विद्यार्थ्याने दिल्लीत स्वत:ला जाळून घेतले. त्याची कितीतरी मोठी बातमी झाली. आंध्र प्रदेशांत तेलंगणाच्या विभाजनाच्या प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी अतिशय उग्र असे आंदोलन केले. रोहित वेमुलाच्या आत्महत्ये प्रसंगाचेही मोठे भांडवल देशभरांतील विद्यार्थ्यांनी केले. कश्मिर प्रश्नांवरून जे.एन.यु. सतत पेटते राहिलेले आहे.
अगदी आत्ता आत्ता महाराष्ट्रात आरक्षणावरून प्रचंड मोठे मोर्चे मराठा समाजाने काढले. त्यात मराठा विद्यार्थीही होते. या प्रश्नाचे राजकारण केले गेले. आजही केले जाते आहे.
अगदी आत्ताही नागरिकत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी कसा महत्त्वाचा आहे हे समजून न घेताच त्यांना यात ओढल्या गेले आहे. कुणी त्यावर सध्या विचारच करत नाहीये. मग देशभरांतील ग्रामीण विद्यार्थ्याच्या बापाचा शेतीचा प्रश्न खरोखरच बिकट असताना, एक दोन नाही तर तब्बल चार लाख शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या असताना कुणालाच या प्रश्नावर बाकी प्रश्नाइतक्या तीव्रतेने रस्त्यावर यावे वाटत नाही का?
मी गांधींच्या अहिंसेचे तत्त्व पूर्णत: मानतो. कुठलेही आंदोलन हिंसक असून नये या मताचा मीही आहे. हिंसेचे समर्थन करताच येत नाही. पण शांततेच्या मार्गाने का असेना जसे प्रचंड मराठा मोर्चे निघाले तसे शेतकर्यांसाठी त्या संख्येने मोर्चे का नाही निघाले? आरक्षणापेक्षा शेतमालाचा प्रश्न मराठा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा वाटत नाही का?
अगदी आदिवासीही दोन वर्षांपूर्वी शेतीप्रश्नाची ढाल पुढे करून आंदोलन करत मुंबईला ‘लॉंग मार्च’ करून निघाले. पण प्रत्यक्ष शेतकर्यांची पोरं मात्र शांत बसून राहिली.
आत्ताचा नागरिकत्व कायद्याचा प्रश्न किंवा पुढे येवू घातलेला नागरिकत्व नोंदणीचा प्रश्न याचा विद्यार्थ्यांशी सरळ कुठलाच आणि कसलाच संबंध नाही. कश्मिरच्या प्रश्नाचाही विद्यार्थ्यांशी सरळ कुठलाच धागा जूळत नाही. पण तरीयासाठी विद्यापिठांतील विद्यार्थी रस्त्यावर येतात.
दाभोळकर, गौरी लंकेश, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांचा विद्यार्थ्यांशी कुठला संबंध होता? रोहित वेमुला याची आत्महत्या हा त्या विद्यापीठापुरता विषय असू शकतो. तो तसा गंभीर विषय होताही. पण देशभरांतील विद्यार्थी रस्त्यावर यावेत इतके महत्त्व त्या विषयाला का देण्यात आले?
वादासाठी या सगळ्या विषयांची तीव्रता प्रचंड आहे हे आपण मान्य करू. त्यासाठी विद्यार्थ्यांचे रस्त्यावर येणेही हिंसा वजा करून मान्य करू. पण मग 4 लाख शेतकरी बापांच्या आत्महत्या हा विषय का दूर्लक्ष करावा इतका फालतू आहे?
इतर कुठल्याही प्रश्नांवरून खवळणारे तरूणांचे रक्त या वेळी का गोठते? नेमका शेतकरी बापाचा प्रश्न आला की शेतकरी पोरगा शांत, थंड, षंढ बनतो?
राज्यकर्ते हे पण शेतकर्यांचीच पोरं आहेत. मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर गेल्यावर सत्तेच्या खुर्चीची ऊब मिळाली की त्यांना आपल्या बापाचा गळा धोरणाच्या कोयत्याने कापायला कुठली प्रेरणा मिळत असते ?
कांद्याचे भाव शंभराच्या पुढे गेले की सगळ्यांना चेव येतो. या बातम्या लिहीणारे आणि चॅनेलवरून ओरडून सांगणारे पत्रकार कुणाच्या पोटी जन्मले आहेत? त्यांचा बाप आजा पणजा कधीतरी शेतकरी होताच ना? जेंव्हा याच कांद्याचे भाव कोसळतात तेंव्हा सगळे मिठाची गुळणी धरून चुप्प का बसतात?
कांद्यासाठी ओरड करणारे कांद्याची भाजी, भजी, गव्हाची पोळी, बिर्याणी, गव्हापासूनच बनणारी ब्रेड, विविध भाज्या या सगळ्यांचे भाव वाढतात तेंव्हा शांत का बसून असतात? दोन रूपयांचा रेशनवर मिळणारा गहु दळायला चार रूपये लागतात तेंव्हा कुठल्याही पत्रकाराचे तोंड गप्प का बसते?
जे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी मेसचे भाव 25 वर्षांत 12 पटीने वाढले आणि गव्हाचे भाव मात्र 6 पटीनेच वाढलेे याकडे कधी लक्ष्य दिले का? शेतकर्याचा कच्चा माल असताना भाजीचे भाव आणि तयार भाजीचे हॉटेलमधील भाव यांची तुलना कधी केली का? दुधाचे भाव किती वाढले आणि चहाचे भाव किती वाढले याची तुलना कधी या विद्यार्थ्यांनी केली का?
इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या ‘पेरा’ कविता संग्रहात एक कविता लिहीली आहे. शेतकर्यांसाठी सहानुभूती नसलेल्याा लोकांसाठी ही कविता होती. पण आता शेतकर्यांच्या पोरांनाच ही कविता लागू पडते आहे हे पाहून आम्हा शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे आतडे तुटत आहे.
सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा
तर तुम्ही काय खाल ? धत्तुरा !
असं म्हणायची खरं तर माझी इच्छा नाही
पण माझ्या बापानं आत्महत्या करूनही
आमच्या आयुष्याला तुमची सदिच्छा नाही
तसं असतं तर तुम्ही आमच्या धानाचं मोल केलं असतं
मग आम्हीही आमचं काळीज
तुमच्यासाठी आणखी खोल केलं असतं
पेरा करणार्या माझ्या बापाचा घास
मग अपुरा राहिला नसता
ऐतखाऊंच्या ताटात तुपाचा शिरा रहिला नसता
रस पिऊन माझ्या बापाचा तुम्ही ठिवलाय फक्त चुर्रा
आकाश माती पाणी उजेड वारा
यासारखाच शेतकरीही सृष्टीचं सहावं तत्त्व आहे
पण तुम्हाला कुठं त्याचं महत्त्व आहे !
हवापाण्यासारखीच तुम्हाला ज्वारीही फुकट हवी आहे
रोज भाजी ताजी आणि निकट हवी आहे
कारखान्यात ज्वारी पिकत नाही
अन् कारखान्यातला माल तुम्हीही फुकट विकत नाही
आम्हालाही वाटतं जगावर उपकार करावेत
पुस्तकात नसलेलेही काही चमत्कार करावेत
पण उडून गेलाय सगळा आमच्या आयुष्याचा पारा
सांगा आमच्या बापाने केला नाही पेरा
तर जग काय खाईल धत्तुरा ?
आत्ताही काही जण असा युक्तीवाद करतील की ते आपण नंतर बघु आधी नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी हे विषय महत्त्वाचे आहेत की नाही ते सांगा? त्यावर एकच साधे उत्तर आहे आत्तापर्यंत ज्यांनी कुणी शेतकर्यांसाठी जे काही छोटं मोठं आंदोलन केलं आहे त्यांनीच हे विचारावं.
12 डिसेंबरला शेतकर्यांनी "निर्बंध मुक्ती" आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केलं. या आंदोलनात जे सहभागी होते त्या सर्व विद्यार्थ्यांनाच असा प्रश्न विचारायचा नैतिक हक्क आहे. इतरांनी यावर बोलण्याचा नैतिक हक्क गमावला आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद मो. 9422878575
No comments:
Post a Comment