विवेक, उरूस, फेब्रुवारी 2019
डिसेंबर महिन्यातील शेवटच्या दिवसांतील ही घटना आहे. थंडी प्रचंड वाढलेली. रविवारचा दिवस. नेमका हा लग्नाचा मुहूर्त. अशा प्रसंगी जर संगीताचा कार्यक्रम तोही शास्त्रीय संगीताचा तोही सकाळी 8 वा. ठेवला तर कुणी येईल का? गाव छोटं. पण या सगळ्या अडथळ्यांवर मात करत सेलू (जि. परभणी. गांव रेल्वे ट्रॅकवर आहे. यवतमाळ माहित नसणारे लोक महाराष्ट्रात आहेत. तेंव्हा त्यांना सेलू कुठे आहे हे सांगावंच लागेल.) या गावात शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत शंभरएक रसिकांनी पहाटे हजेरी लावून आपलं रसिकतेचं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं.
जून्या जमान्यातील गायक संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन 29-30 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आले होते. समान्य रसिकांच्या बळावर शास्त्रीय संगीताचा महोत्सव भरवता येतो यावरच मुळात कुणाचा विश्वास बसत नव्हता. पण सेलू सारख्या गावानं कुठलाही मोठा प्रायोजक न घेता, कुठल्याही राजकीय नेत्याचा आश्रय न घेता सामान्य रसिकांच्या स्वेच्छा देणगीवर संमेलन यशस्वी करून दाखवले. या संमेलनात संपूर्ण तीन सत्रे शास्त्रीय संगीताचीच झाली.
आधी केले मग सांगितले या धरतीवर या प्रदेशातील रसिकांनी सेलूचा महोत्सव झाल्यावर औरंगाबादला मराठवाडा पातळीवर बैठक घेतली. आधी संपूर्ण मराठवाड्यात आणि नंतर महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताचे महोत्सव, छोट्या मैफली, कार्यशाळा यांचे आयोजन करण्याचा निर्धार केला. आधीपासून विविध ठिकाणी ज्या व्यक्ती आणि संस्था शास्त्रीय संगीतासाठी काम करत आहेत त्यांना जोडून घेण्यासाठी ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ नावाने अनौपचारिक मंचाची स्थापना केली. संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गायक पं. नाथराव नेरलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या मंचाचे रितसर उद्घाटन गाण्याच्या मैफिलीनेच व्हावे असे सर्वानूमते ठरले.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या पत्नी वत्सलाबाई जोशी या औरंगाबादच्या. येथील शारदा मंदिर प्रशालेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगितिक उपक्रम करण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले होते. पण त्यात सातत्य राहिले नाही. तेंव्हा ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ ची सूरवात म्हणून वत्सलाबाईंच्या स्मृतीत संगीत सभा घेण्याचा ठरले. पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले. बनारस घराण्याचे तबला वादक पं. अरविंद आझाद यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रतिष्ठानचे रीतसर उद्घाटन झाले.
प्रतिष्ठानच्या वतीने परभणीला उस्ताद डॉ. गुलाम रसूल यांच्या स्मृतीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे संगीत चळवळीची कोंडी फोडण्याचे काम केले आहे. या प्रदेशात अंबडसारख्या छोट्या गावात गेली 95 वर्षे दत्त जयंती संगीत महोत्सव होतो आहे. असे तूरळक अपवाद वगळता छोट्या गावांमधून नियमित स्वरूपात शास्त्रीय संगीताचे उपक्रम होताना दिसत नाहीत.
मोठ्या शहरांमध्ये ’सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ च्या धर्तीवर छोटे मोठे उपक्रम आता नियमित होत आहेत. पण लहान गावांत असं काही घडत नाही. त्यातील काही अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. एक तर अशा कार्यक्रमांना तिकीट लावले तर लोक येतीलच असे नाही. शिवाय पुरेसा निधी जमा होईलच असे नाही. प्रयोजक मिळवावेत तर त्यांच्या काही अटी असतात त्या शास्त्रीय संगीताला पेलतीलच असे नाही. कुठल्याही व्यवसायीक आस्थापनांची अपेक्षा असते भरपूर गर्दी जमा झाली पाहिजे. पण असे काही शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांत होताना दिसत नाही.
पॉप-रॉक-पंजाबी गाण्यांना प्रचंड मोठा समुह ऐकायला मिळतो. मोठ्या स्टेडियमवर हे कार्यक्रम होतात. येणारे तरूण तरूणी धूंद होवून नाचत असतात. प्रचंड मोठा आवाज केलेला असतो. याच्याशी तूलना करता शास्त्रीय संगीताचे क्षेत्र प्रचंड वेगळंच आहे हे लक्षात येतं.
पहिली बाब म्हणजे हजारो श्रोत्यांपर्यंत आमचं संगीत अशा पद्धतीनं पोचू शकत नाही. डोकं बाजूला ठेवून बेधुंदपणे झिंग आणणार्या तालावर नाचणे हे इथे जमत नाही. हे संगीत बुद्धि बाजूला ठेवून नव्हे तर बुद्धि लावूनच सादर केले जाते परिणामी ऐकतानाही त्या श्रोत्याला आपल्या बुद्धिनं त्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. हे संगीत म्हणजे तयार असलेल्या नोटेशनवर केवळ गाणं असं नाही. रागदारीची एक चौकट तेवढी असते. बाकी रंग प्रत्येक मैफलीत त्या त्या वेळी भरल्या जातो. तोच गाणारा/वाजवणारा असेल आणि रागही तोच असेल तरी तो पहिल्यासारखा असतोच असे नाही.
कुणीही येवून शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला बसेल आणि त्याला ते पचेल असेही नाही. इथे श्रोत्याचा कानही तयार व्हावा लागतो. शास्त्रीय संगीतासाठी साधारणत: 500 आसनक्षमतेचे सभागृह पुरेसे आहे. (छोट्या मैफिलीं साठी 200 पेक्षाही कमी पुरे.) त्यापेक्षा जास्तीची आसनव्यवस्था पोषक ठरत नाही. आज ज्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा बोलबाला आहे त्याही महोत्सवात जास्तीची गर्दी अनावश्यक आहे असंच या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात. मूळात आमचं संगीत असं पाच आणि दहा हजारांच्या संख्येने ऐकण्याचं नाहीच.
मोठे कलाकार व्यवहारीक पातळीवर मोठ्या महोत्सवात सहभागी होतात पण जाणीवपूर्वक छोट्या मैफिलीत आपली कला सादर करतात कारण त्यांना त्यातून आपल्या सादरीकरणाचे कितीतरी आयाम सापडतात. हे प्रचंड मोठ्या ठिकाणी घडत नाही. डोळे मिटून आपण केलेला रियाज आपला विचार ते जेमतेम सादर करतात. पण नविन काही सुचण्याची प्रक्रिया प्रचंड मोठ्या महोत्सवात घडत नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर छोट्या गावांमधून सुरू झालेल्या ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ सारख्या शास्त्रीय संगीत चळवळीला रूजवू पाहणार्या उपक्रमांचा विचार करावा लागेल.
मूळात आपल्याकडे देवळांमधून संगीत परंपरा फार वर्षांपासून जतन केल्या गेली होती. कितीतरी कालबाह्य धार्मिक रूढी परंपरांना विरोध करत असताना नकळतपणे आपण संगीत परंपरेवरही घाला घातला. देवीच्या आरत्या पदे गाणी सादर करणारे दलित कलाकार पुरोगामी चळवळीत या परंपरा जतन करताना टीकेचे लक्ष्य व्हायला लागले. चर्मवाद्य वाजविण्याची परंपरा पूर्वाश्रमीचे महार, मातंग यांच्याकडे चालत आलेली होती. कोल्हाटी समाजाकडे नृत्याची परंपरा होती. जाती व्यवस्थेची एक काळी छाया संगीतावर पडलेली होती.
पण स्वातंत्र्योत्तर कालखंडात यातील कालबाह्य रूढी परंपरांना बाजूला ठेवून निखळ संगीत परंपरा जतन व्हायला हवी होती. अजूनही दक्षिणेतील काही मंदिरांमध्ये ती जतन केलेली आहे. मंदिरांपेक्षा सार्वजनिक सभागृहांमध्ये आपण सांस्कृतिक उपक्रम चालवू. ते सोपं आहे. असं बर्याच जणांना वाटतं. पण यातील अडचण अशी की महाराष्ट्रात सांस्कृतिक उपक्रमांसाठी बांधलेली सभागृहे, समाज मंदिरे यांची अवस्था बकाल होवून गेलेली आहे. शासनाने जी नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थांना (नगर पालिका, महानगर पालिका) निधी देवून उभारली ती काही दिवसांतच निकाली निघाली. याच्या उलट छोट्या गावांमध्ये आजही जूने किंवा नविन एखादे मंदिर आढळून येते ज्याचे सभागृह चांगल्या अवस्थेत असते. तिथे किमान स्वच्छता राखल्या जाते. त्या त्या देवी देवतेचा उत्सव असेल तर छोट्या गावातील अगदी धार्मिक नसलेले लोकही त्यात उत्साहाने सामील होतात.
या मंदिरांना जोडून छोट्या गावांमध्ये संगीताच्या मैफिली करणं सहज शक्य आहे. काही ठिकाणी गुरूवारची पंचपदी, एकादशीचे किर्तन, महाशिवरात्रीचे भजन अशा परंपरा आहेतच. यांना केवळ थोडेसे आधुनिक रूप देण्याची गरज आहे.
शास्त्रीय संगीतासाठी असे उपक्रम रूजविण्याचे कारण म्हणजे इतर सर्व प्रकारच्या सुगम संगीताचा पाया म्हणजे हे संगीत होय. ते शिकविण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. काही एक मेहनत, उपजत गळा आणि बुद्धी या तिन्हीच्या आधारावर हे संगीत फुलते. संगीत ही सादरीकरणाची कला असल्या कारणाने ते सादर होणेच गरजेचे आहे. खुप मोठा गायक आहे पण तो गातच नाही. असं होवू शकत नाही.
दुसरीकडून चांगले रसिक म्हणजेच कानसेन तयार होण्यासाठी नियमितपणे हे शास्त्रीय संगीत सादर झालं पाहिजे. या दोन्ही बाबींचा विचार करून म्हणजेच तानसेन आणि कानसेन किंवा त्याहीपेक्षा ज्यांच्याकडे कलासक्त मन आहे त्यांच्यासाठी पोषक वातावरण होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. धर्माच्या नावाखाली शेकडो वर्षे हे चाललं. आता मात्र जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं हे रूजवलं गेलं पाहिजे.
दुसरा एक गंभीर मुद्दा सध्याच्या धकाधकीच्या काळात पुढे येता आहे. तास दोन तास शांत बसून एखाद्या रागाचा विस्तार ऐकणे, स्वरांचे बारकावे समजून घेणे, संगीत सौंदर्याचा आस्वाद घेणे हे मनशांतीसाठी आवश्यक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तूम्हाला गाणं कळो की न कळो पण या गाण्यानं मनशांती मिळते, विचारशक्तीला चालना मिळते, आपलंही मन सृजनात्मक दिशेनं काम करू लागतं हे महत्त्वाचं आहे.
छोट्या गावांमध्ये ही चळवळ जास्त चांगली रूजू शकते याचे एक कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात तयार झालेला मध्यमवर्ग. त्याच्यापाशी किमान वेळ आणि पैसा अशा कलांसाठी उपलब्ध आहे. शहरांमध्ये वेळेची समस्या मोठी गंभीर आहे. आणि अगदी छोट्या गावांमध्ये पोटापाण्याचे प्रश्नच सुटलेले नसताना कलात्मक चळवळींसाठी कुठल्याच अर्थाने जागा शिल्लक नसते. मग यातला मधला पर्याय म्हणून नगर पालिका असलेली महाराष्ट्रातील 200 गावं संगीत चळवळीची केंद्र म्हणून विचारात घ्यावी लागतील. ‘देवगिरी संगीत प्रतिष्ठान’ सारख्या उपक्रमांचे महत्त्व या दृष्टीने जास्त आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575