Wednesday, January 30, 2019

शारंगदेव महोत्सवात फुलली सुफी कव्वाली


विवेक, उरूस, जानेवारी 2019

गेली दहा वर्षे महागामी गुरूकुलाच्या वतीने ‘शारंगदेव समारोहाचे’ आयोजन करण्यात येत आहे. देवगिरीचा सम्राट सिंघणदेव यादव याच्या दरबारी शारंगदेव हा महान संगीत तज्ज्ञ होता. त्याने ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथाची रचना तेराव्या शतकात (ज्ञानेश्वरांच्या जन्माआधी) याच ठिकाणी केली. शारंग देवाची स्मृती जागी ठेवण्यासाठी आणि त्याच्या ग्रंथाचा विविध अंगांनी सांगितीक अभ्यास, आजच्या संगीतातून ते संदर्भ शोधणे, त्यातील काही सांगितीक परिभाषेचे सादरीकरण करणे, त्यातील कुटप्रश्‍नांची चर्चा करणे अशा विस्तृत परिप्रेक्ष्यातून या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

या वर्षी इतर कलाकृतींसोबतच सुफी कव्वालीही सादर करण्यात आली. देवगिरीच्याच परिसरात खुलताबाद हे सुफी चळवळीचे मोठे केंद्र म्हणून ओळखल्या जाते. सातशे वर्षांपूर्वी उत्तरेतून शेकडो सुफी संत येथे आले. येथील राजवटींच्या आधाराने त्यांनी या परिसरात वास्तव्य केले. या सुफी संतांसोबतच येथे संगीताची पण एक माोठी परंपरा रूजली. ही कव्वाली गायनाची परंपरा आजतागायत पाळली जाते. 

सुफींच्या चिश्ती संप्रदायातील 22 वे ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यासमोरच 21 वे ख्वाजा बुर्‍हाद्दीन गरीब (अजमेरचे मोईनोद्दीन चिश्ती 17वे ख्वाजा होते. दिल्लीचे सुप्रसिद्ध निजामोद्दीन चिश्ती 20 वे ख्वाजा होते.)  यांचा दर्गा आहे. या दर्ग्यात कव्वाली गाण्याची परंपरा आहे. याच परिसरात पहिले निजाम मीर कमरोद्दीन यांचीपण कबर आहे. (जास्त करून सगळ्यांना जैनोद्दीन चिश्ती दर्गा परिसरातील औरंगाजेब कबरीचीच माहिती असते. पण मराठवाडा, आजचा तेलंगणा आणि कर्नाटकातील तीन जिल्ह्यांचा मिळून असलेल्या हैदराबाद राज्याची स्थापना औरंगाबादला झाली होती. पहिले दोन निजाम औरंगाबाद राजधानी ठेवूनच राज्य करत होते.)

सुफी संगीताला फार मोठा रसिकवर्ग भारतात आधीपासून राहिला आहे. कारण हे संगीत याच मातीत फुलले. आजची जी कव्वाली आहे ती अमीर खुस्रो यांनी विकसित केली. आणि हे संगीत भारतीय संगीत परंपरेचाच भाग आहे. 

शारंग देव समारोहात हैदराबादचे कव्वाल अहसान हुसैन खान आणि त्यांचे सुपुत्र आदिल हुसैन खान आमंत्रित होते. ग्वाल्हेरच्या कादरी परंपरेतील हे कव्वाल घराणे आहे. सुप्रसिद्ध कव्वाल उस्ताद कुरबान हुसैन कादरी यांचे हे नातू. ग्वाल्हेरच्याच कादरी परंपरेत राजे महंमद म्हणून सुफी संत होवून गेले. त्यांचे सुपुत्र म्हणजे श्रीगोंद्याचे प्रसिद्ध वारकरी संत शेख महंमंद.

खरं तर कव्वाली ही आज ज्या पद्धतीनं चित्रपटांमध्ये आली तसे तिचे मुळ स्वरूप नाही. मुलत: कव्वाली ही देवाची प्रार्थना आहे. हे धार्मिक परंपरेचा भाग म्हणून आलेलं संगीत आहे. जसं की आपल्याकडे भजन किर्तन भक्तीगीत गायल्या जाते. हिंदू परंपरेत देवाची पुजा दोन पद्धतीनं केली जाते. एक अंगभोग (हार, उदबत्ती, नारळ, वस्त्र पांघरणे, विविध दागिने देवाला अर्पण करणे) आणि दुसरं म्हणजे रंगभोग (यात गायन, वादन, नृत्य, नाट्य यांचा समावेश आहे.) हीच पद्धत सुफींनीही स्विकारली. रंगभोगातील संगीत त्यांनी दर्ग्यात सुरू केलं.

सुफी कव्वालीची सुरवातच देवाच्या प्रार्थनेने होते. हुसैन कादरी यांनी अरबी भाषेतील अल्लाची प्रार्थना सादर करूनच कार्यक्रमाची सुरवात केली. आरश्यात स्वत:ला आपण पाहतो आणि हे आपल्याला आपले प्रतिबिंब दाखवणारा आरसा म्हणजे ईश्वर. 

कौन आईना है ? कौन आईना सा 
दीद मुझको होती है रू-ब-रू 
अल्ला हूं अल्ला हुं ॥

हा सगळा आशय अद्वैत तत्त्वाज्ञानाचा आहे. 

हुसैन कादरी यांच्या कव्वाली गायनाचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय संगीतातील रागांची चौकट जशाला तशी कायम ठेवून त्यात गायन करणे. अन्यथा सुगम संगीतात शास्त्रापासून दूर जाण्याचे स्वातंत्र्य नेहमीच घेतले जाते. पण हुसैने कादरींनी मिश्र रचनांसोबतच दरबारी कानडा, वसंत बहार, पुरिया कल्याण, भैरव आदी रांगांना अगदी शुद्ध स्वरूपात कव्वालीच्या अंगाने मांडले आणि रसिकांना प्रभावित केले.



भाषेची चौकट मोडून कव्वाली पुढे कशी निघून जाते हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. अरेबिक, पर्शियन, खडी बोली (कबीराच्या काळातील हिंदी), उर्दू, पंजाबी या सर्व भाषांमधून समर्थपणे कव्वाली गाऊन दाखवली. 

दुसर्‍या दिवशी सप्रयोग व्याख्यानात त्यांनी पारंपरिक सुफी कव्वालीचे अनेक पदर उलगडून दाखवले. रसिकांनी कबीरावर प्रश्‍न विचारताच त्यांनी त्याचे विश्लेषण करताना कबीराची अप्रतिम रचना ‘मन लागो मेरो यार फकिरी मे’ गाऊन दाखवली. कबीर इतक्या विविध तर्‍हेने भारतात गायला जातो. अगदी एकतारीवर एकट्याने देखील कबीर गायला जातो. आणि आठ दहा साजिंद्यांसह कव्वालीच्या शैलीत टाळ्यांच्या गजरातही कबीर गायला जातो.

वसंत बहार रागातील अमिर खुस्रोची रचना ‘फुल खिले गुलशन मे, आमदा फसले बहार’ ही बंदिश सादर करताना त्यांनी कुठेही रागाची चौकट मोडून दिली नाही. रागाचे चलन पूर्णत: शुद्ध ठेवत कव्वाली सादर करणे हे एक मोठे आव्हानच असते. पण अहसान हुसैन व आदिल हुसैन कादरी यांनी हे आव्हान समर्थपणे पेलून दाखवले.

संगीत समिक्षक अभ्यासक डॉ. मंजिरी सिन्हा यांनी रागदारी आणि त्याच्या वेळा यांच्या बाबत चिकित्सकपणे चर्चा केली तेंव्हा आदिल हुसैन यांनी कव्वालीत शब्दांना जास्त महत्त्व असल्याने एखाद्या वेळेस रागाची वेळ नसतानाही ते सुर कसे कव्वालीत येतात हेही स्पष्ट केले. हुसैन कादरी यांच्या सोबत साथ देण्यासाठी चार सहकलाकार होते. त्यांची जी सूर लावण्याची पद्धत आहे त्याला ‘ये तो जिंदा तानपुरे है’ असा समर्पक उल्लेख मंजिरी सिन्हांनी केला. अन्यथा हे सहगायक म्हणजे निव्वळ टाळ्या वाजविण्यासाठीच आहेत असा गैरसमज सर्वत्र असतो. पण ते तसं नाही. सहगायक प्रमुख सूर लावून धरतात. मुख्य गायक जेंव्हा ताना आलापींच्या जंगलात शिरतो तेंव्हा त्याला मुख्य रस्त्यावर आणून सोडण्याचे काम हे सहगायक करत असतात. 

संस्कृत मध्येही कव्वालीच्या रचना आहेत हे हुसैन कादरींनी सांगताच उपस्थित रसिक चकित झाले. भाषांची बंधने तोडून कव्वाली बाहेर पडते कारण ही शैली म्हणजे देवाची प्रार्थना आहे हे हुसैन कादरींनी स्पष्ट केले. 

कव्वाली मोहमद पैगबरांच्या काळात केवळ डफावर शांतपणे सादर होणारा असा संगीत प्रकार होती. अमिर खुस्रो च्या काळात या कव्वालीत तबला आणि सतारीचा समावेश झाला. गेल्या शंभर एक वर्षांपासून हार्मानियम ढोलक यांचा उपयोग यात वाढला. कव्वालीची कितीतरी सौंदर्यस्थळे हुसैन कादरी पितापुत्रांनी उलगडून दाखवली. 

पारंपरिक कव्वालीला आजकाल जास्त मागणी नाही. चित्रपटांतील भडक आरडा ओरडीने सजलेली कव्वालीच जास्त ऐकायला मिळते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. परंपरेचं हे संचित जपून ठेवण्याचे फार मोठे आव्हान आपल्यावर आहे. आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो आहोत. पण रसिकांनी आयोजकांनीही कव्वालीचे पारंपरिक रूप जतन करण्यासाठी  प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

संगीतादी कला भारताच्या भूमित विकसित होत गेल्या याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. इतकी अनुकूलता जगात दुसरीकडे कुठेच लाभली नाही. संपूर्ण भारतखंड (पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, ब्रह्मदेश यांच्यासह) म्हणजे संगीतासाठी अतिशय सुपीक अशी भूमी जिच्यात सामगायनापासून पुरावे सापडतात. किमान पाच हजार वर्षांची परंपरा स्पष्टपणे दाखवून देता येते. इतका समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. 

भारतात विशेषत: दक्षिणेत या संगीत परंपरेची मोठी शक्तीस्थळे आहेत. हे संगीत कधीच बंदिस्त असे राहिलेले नाही. यात कालानुरूप काही बदल होत गेले. पण त्याचा मुळ गाभा तसाच राहिला. संगीताच्याही दोन परंपरा आपल्याकडे अबाधित राहिल्या आहेत. मार्गी (लेखी स्वरूपात जे शास्त्र म्हणून उपलब्ध आहेत) आणि देशी (मौखिक स्वरूपात आजही ज्या जतन केलेल्या आढळतात). 

आदिल हुसैन कादरी यांनी त्यांच्या घराण्यात चालत आलेली कव्वालीची मौखिक परंपरा कशी आहे हे उलगडून दाखवत असतानाच अभ्यासाची जोड देवून त्याचे सौंदर्य कसे विकसित केले याचीही उदाहरणे आपल्या गायनातून मांडली.  सुरेल आवाज असलेले उस्ताद अहसान व आदिल हुसैन खान कादरी आणि त्यांचे सहगायक यांनी आठशे वर्षांची या मातीतील एक समृद्ध परंपरा आधुनिक काळात रसिकां समोर सादर केली. कबीराच्याच ओळी ज्या त्यांनी सादर केल्या 

मेरा मुझमे कुछ नही
सब कुछ है तेरा
तेरा तुझको सौप दूं
क्या रेहता है मेरा

असं म्हणून देवगिरीच्या परिसरातील सुफी संगीताची समृद्ध परंपरा आपल्या गाण्यांतून इथल्या रसिकांच्या हृदयात पोचवली.   

                             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment