Saturday, February 9, 2019

प्रवीण बर्दापूरकर : दुपारच्या चहाचे मैत्र


दैनिक उद्याचा मराठवाडा ९ फेब्रुवारी २०१९ 

दुपारी साडेतीन चार ची वेळ झाली की मला बर्दापूरकर सरांची आठवण येते. माझ्याही नकळत माझी बोटं मोबाईलवर त्यांचा नंबर डायल करतात. ‘सर मोकळे अहात का? चहाला येऊ?’. माझ्या प्रश्‍नाला बहुतांश वेळा त्यांचा उत्साहानं भरलेला होकार येतो. उन्हं कलायला लागलेली असतात. माझ्या घरापासून अगदी जवळ असलेल्या त्यांच्या घरी मी उत्सुकतेनं पोचतो. माझ्या डोक्यात खुप काही बोलायचं असतं. काही खटकलेल्या गोष्टींसाठी त्यांच्यापाशी मन मोकळे करायचे असते. त्यांच्याकडून खुप काही ऐकायचं असतं. पत्रकारीतेतील कितीतरी संदर्भ नव्यानं समजून घ्यायचे असतात.

त्यांना आतल्या खोलीत आपण आलेलो कळावे म्हणून दरवाजा उघडा असला तरी मी बेल वाजवतोच.  आवाज कशाला केलास म्हणून त्यांचे बोलणेही खातो. वहिनी बाहेर खुर्चीवर बसलेल्या असतात. टिव्हीवर कुकरी शो, खेळ किंवा जूनी हिंदी गाणी असलं त्यांच्या आवडीचं काहीतरी चालू असतं. बर्दापूरकर त्यांच्या आतल्या खोलीत ज्याला मी आणि धनंजयनी ‘दिवाण-ए-खास’ नाव दिलं आहे तिथं असतात. मग आतूनच तिकडे येण्याचा आदेश येतो. वहिनींना चार दोन शब्द मी बोलतो. त्यात बर्‍याचदा जून्या गाण्यांचेच संदर्भ असतात. बर्दापुरकर बाहेर असतील तर तेही काहीतरी गाण्यांबद्दल बोलतात. त्यांच्या किंवा माझ्या बोलण्यात एखादा चुक संदर्भ आला की वहिनी न चुकता तो दुरूस्त करत, ‘नाही रे, त्यात वहिदा नाही, माला सिन्हा आहे’, ‘संगीतकार रवी नाही जयदेव आहे’, ‘लता नाही सुमन कल्याणपुरचे आहे ते गाणे’ असं अगदी कमी शब्दांत सांगून मोकळ्या होतात. आवडतं गाणं चालू असेल तर आम्ही तिघेही त्यावरच्या गप्पा मारत बाहेरच्या खोलीत ज्याला आम्ही ‘दिवाण-ए-आम’ असं नाव दिलंय तिथे बसतो.  

आतल्या खोलीत गेल्यावर बर्दापूरकर सर त्यांच्या आवडत्या लेखनाच्या टेबलासमोरच्या खुर्चीवर विराजमान होतात.  मधल्या छोट्या टीपॉयवर कामवाल्या मावशींनी चहा आणि सोबत बिस्किटं खारी आणून ठेवली असते. चहा कधीच छोट्या कपात नसतो. मोठ्या कपात काठोकाठ भरून चहा येतो. माझा मित्र अशा कपातून चहा पिण्याला ‘तांब्यानं चहा पिणं’ म्हणतो. मला चहा अत्यंत प्रिय असल्याने ‘फारच मोठा कप आहे, इतका कशाला?’ असलं काहीही शिष्टासारखं न म्हणता तो कप मी ताब्यात घेवून चहाचा बिस्कीटांचा आस्वाद घेत सरांशी गप्पा मारायला लागतो. किंवा खरं तर उलटं झालेलं असतं. मी चहा सुरू करे पर्यंत सरांनी त्यांच्या डोक्यात असलेला एखादा विषय संदर्भ आठवण सांगायला सुरवातही केली असते. मी त्यांच्याकडे कधीच संकोच न करता सर्व बिस्कीटं संपवणे शिल्लक जास्तीचा चहा असेल तर तोही पिणे असले  उद्योग करतो. 

त्यांच्या माझ्या वयातलं 20 वर्षांचं अंतर विसरून त्यांचा पत्रकारितेतला प्रचंड दांडगा अनुभव, कित्येक राजकीय नेत्यांशी, उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी असलेली त्यांची अगदी अरे तूरेची मैत्री, शेकडो सामाजिक संस्थांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध सारं सारं बाजूला ठेवून ते सहजपणे माझ्याशी गप्पा मारत असतात.

बर्दापूरकर सरांचा माझा प्रत्यक्ष परिचय व्हायच्या आधीच त्यांची भेट लोकसत्तातून झालेली होती. त्यांच्या वेगळ्या बातम्या, एखादं स्फुट, एखादं फिचर आम्हां मित्रांमध्ये चर्चिल्या गेल्याचं आजही चांगलं आठवतं (औरंगाबादला झालेल्या विचारवेध संमेलनाचे पाहूणे भाजप-सेनेच्या गाडीतून कसे उतरले वगैरे). निवृत्तीनंतर त्यांनी औरंगाबादला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. श्याम देशपांडेच्या कार्यालयात आम्ही दर रविवारी जमून गप्पा टवाळ्या करायचो त्यात बर्दापुरकर सर सहज सामील झाले. वयाचे अंतर मिटवून तिथे सगळेच मोकळेपणाने गप्पा मारतात. त्या ‘संडे क्लब’ ने त्यांच्याशी  मैत्रीचे धागे घट्ट करून दिले.
 
त्यांच्या घरी मी जायला लागलो तसा एक मोकळेपणा अनुभवास आला. जसा मोठा भाऊ आपली काळजी घेतो आपल्याला वडिलकीच्या नात्याने रागावतो प्रसंगी आपल्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागतो अशी त्यांच्याबाबतची एक भावना माझ्या मनात वाढत गेली.बर्‍याचदा ते लिखाण डिक्टेट करून सांगतात. या प्रक्रियेत लिहायच्या आधी गप्पा मारताना उघड चिंतन असं काही तरी घडत असणार. मग त्यांना माझ्यासारखी एक जिवंत भिंत सेयीची वाटत असावी. त्यांच्या कितीतरी लेखांचे विषय त्यांनी माझ्यापाशी सविस्तर चर्चिले आहेत. वस्तुत: त्यात माझा काहीच सहभाग नसतो. मी त्या विषयातला कुणी तज्ज्ञ नसतो. माझ्याशी त्या व्यक्ती किंवा त्या घटना संबंधित नसतात. पण तरी सर माझ्याशी नदिच्या पात्रात संथपणे पाणी वहात जावं तसं बोलत राहतात. मी काहीतरी एखादी व्यक्ती एखादी घटना एखादा प्रसंग या बाबत थोडंसं काहीतरी त्यांना पुढे बोलण्यासाठी आधार मिळावं असं बोलतो. परत त्यांचा ओघ चालू राहतो. 

छापिल पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांच्या वयाला शोभणार नाही अशी डीजीटल पत्रकारिता सुरू केली. सातत्याने ब्लॉग लेखन केलं. सामाजिक राजकीय बातम्यांचे त्यांचे ‘सोर्स’ आजही जबरदस्त आहेत. त्यांच्या लिखाणात इतरत्र छापून आलेल्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतून समोर आलेल्या त्याच बातमीचे कितीतरी वेगळे पैलू वाचकां समोर येतात. वेगळे संदर्भ वाचकांना समृद्ध करून जातात. 

मंगल वहिनींच्या आजारपणाने त्यांना गेले काही दिवस घरातच जखडून ठेवले आहे. पण याचा कुठलाच परिणाम त्यांच्या लिखाणावर होवू शकला नाही हे एक आश्चर्य आहे. वहिनींच्या आजारपणाची कसरत सांभाळताना एखाद्या बातमीचा घटनेचा संदर्भ वेगळ्या दृष्टीने शोधणे, संबंधित व्यक्तीला अधिकार्‍याला प्रत्यक्ष फोन करून खातरजमा करून घेणे, स्वत:च्या समृद्ध ग्रंथ संग्रहातून नेमकी माहिती शोधून लेखात पेरणे हे सगळं अतिशय कठिण काम आहे. त्यांच्यातला सच्चा पत्रकार त्यांना शांत बसू देत नाही.

सकाळी आलेल्या वर्तमानपत्रांतील एखाद्या चुकीच्या शब्दांबद्दल ते अस्वस्थ असतात. टिव्ही वाहिन्यांवरच्या बातम्यांची चिरफाड करण्याचा तर त्यांना आता कंटाळाच आला आहे. त्या चर्चांमध्ये जाणेही त्यांनी पार कमी करून टाकले आहे. 

माझा त्यांचा प्रत्यक्ष परिचय होण्याआधी नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेंव्हा त्यांनी लिहीलेला लेख माझ्या वाचण्यात आला. मी त्यांच्या त्या शैलीच्या प्रेमातच पडलो. लोकसत्ताच्या पुरवणीतील त्या लेखाचे पानभर लेआऊट आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्या इतर सगळ्या लिखाणात मला त्यांची व्यक्तीचित्रे आणि ललित लेखच जास्त आवडतात. माझा तर त्यांना सतत आग्रह असतो तूम्ही हे अनुभव ललित शैलीत मांडा. 

मी जून्या गाण्यांचा अभ्यास हौसेखातर करतो आहे. त्यात एकदा साबरी ब्रदर्सच्या ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद’ या कव्वालीचा संदर्भ निघाला. ही कव्वाली चित्रपटात आहे असा उल्लेख वाचून मी त्याचा शोध घेत होतो. पण तो संदर्भ सापडतच नव्हता. मग पुढे ही कव्वाली पाकिस्तानी चित्रपटात असल्याचे केदार मांडाखळीकर या तरूण मित्राने शोधून दिले. मी हे बर्दापूरकरांना सांगत होतो तेंव्हा त्यांनी खुलताबादच्या उरूसात ही कव्वाली आपण तरूणपणी कशी ऐकली होती ते रसदार वर्णन करून सांगितलं. मी त्यांना आग्रह धरला की तूम्ही या आठवणी लिहाच. पत्रकारिता करताना केवळ रूक्ष घडामोडींवरच लिहायला पाहिजे असं नाही. आजूबाजूच्या साहित्यिक सांस्कृतिक घटनांचाही आढावा घेतला पाहिजे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले होते. पुरवणीत प्रतिभावंतांना लिहायला लावून वाचकांना एक मोठी कलात्मक मेजवानी दिलेली आहे. विदर्भातील साहित्यिक सांस्कृतिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. हे सगळे अनुभव त्यांनी लिहावेत असा माझा लकडा असतो. 

महाराष्ट्र राज्याचे भाषा संचालक यशवंत कानिटकर यांचं बीड जिल्ह्यातील गाव लिंबा गणेश बर्दापुरकरांच्या गावा जवळच आहे. गावच्या खुप सुंदर आठवणी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. त्याच धर्तीवर मी बर्दापुरकरांना त्यांच्या लहानपणच्या शिक्षणाच्या घराच्या गावाच्या सुरवातीच्या पत्रकारितेच्या  आठवणी लिहा असा आग्रह करत असतो. ते या आठवणी सांगताना व्यंकटेश माडगुळकरांची मला नेहमी आठवण येते. अकृत्रिम अशा शैलीत माडगुळकर लिहीत जातात. तशीच धाटणी बर्दापुरकरांची आठवणी सांगताना जाणवते. पण अजूनही त्यांनी हे फारसं लिहीलं नाही ही माझी खंत आहे. 

आपल्या क्षेत्रातील तरूण पत्रकारांना मदत करण्यासाठी ते एका पायावर तयार असतात. पण नविन पिढी फारशी मेहनत घेत नाही ही तक्रार त्यांची असते. सध्या कार्यरत असलेल्या संपादकांच्या सुमारपणाबद्दल त्यांच्या खुप तक्रारी आहेत. त्यांनी स्पष्टपणे खुपदा लिहीलेही आहे. काही जणांना त्यांचे फटकारणे खुपते. पण त्या मागची पत्रकारितेबद्दलची तळमळ ते लक्षात घेत नाहीत.  

त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खुप पैलू या काही दिवसांत जवळून पहायला मिळाले. सायलीच्या लग्नाच्या प्रसंगातला एक प्रेमळ बाप, मंगल वहिनींच्या आजारपणात काळजी घेणारा एक प्रेमळ नवरा, त्यांच्याबद्दल हळवेपणाने बोलताना एक प्रियकर, सद्यकालीन पत्रकारितेवर कोरडे ओढणारा जून्या पिढीतला सच्चा पत्रकार, मी-मनोज-धनंजय आमच्यावर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारा सहृदय माणूस, घर टापटीप सुंदर ठेवणारी एक कलासक्त व्यक्ती, एक शैलीदार लेखक, आपल्या वयाचा अनुभवाचा मोठेपणा विसरून इतरांत मिसळणारा माणसांच्या गोतावळ्यात रमणारा एक माणूस असे त्यांचे कितीतरी पैलू लखलखत समोर येतात. मिलींद देशपांडे सारख्या मित्राचा उल्लेख त्यांच्या तोंडून ऐकताना तर मला कुणी आपल्याच हृदयाच्या एका तुकड्याबद्दल बोलत आहे असा भास होत राहतो. मी स्वत: जवळच्या मित्रांमध्ये असा नेहमीच विरघळून जातो म्हणून असेल कदाचित मला त्यांची ही मित्राबद्दलची भावना चांगलीच उमगते. 

बर्दापूरकरांच्याकडे मी काहीतरी माझ्या आयुष्यातील अडचणी तक्रारी घेवून गेलेलो असतो. त्यांच्या समोर कमीजास्त शब्दांत मी त्या मांडलेल्या असतात. गप्पा संपवून परत येताना उन्हं पूर्ण कललेली असतात. संध्याकाळचे सुरेख रंग आभाळात पसरलेले असतात. माझ्या अचानक लक्षात येतं की माझी तक्रार, अडचण त्यांनी अलगद सुसह्य करून दिलेली आहे. माझ्या मनावरचे ओझं उतरलेलं असतं. मंगल वहिनींनी अतिशय मोजक्या शब्दांत जिव्हाळ्याचं दान माझ्या पदरात घातलेलं असतं. माझ्या एका कार्यक्रमाला त्या डॉ. अंजली देशपांडे सोबत आलेल्या होत्या. त्या कार्यक्रमातलं निवेदन त्यांना आवडलं. नंतर पुढे आजरपणानं त्यांचं बाहेर जाणं बंद झालं. पण प्रत्येक भेटीत माझ्या निवेदनाची एक ओळख त्या डोळ्यांतून मुकपणाने देत आहेत असंच जाणवत राहतं. अन्यथा अतिशय थोड्या परिचयात इतकी माया माझ्या वाट्याला येण्याचं कारणच काय.

मी त्यांच्या घरातून बाहेर पडतो. संध्याकाळचा अंधार पडत चाललेला असतो. केवळ प्रवीण बर्दापूरकर ही एक व्यक्ती नव्हे तर मंगल वहिनी आणि त्या घराशीच आपलं काहीतरी मैत्र जूळून आलेलं आहे. त्या मैत्रिचा मंद दिवा आपल्या आत पेटला आहे. असं वाटत राहतं. मॅटिनी शोच्या चित्रपटांचा एक सौम्य असा रंग असतो (जून्या काळी). तसा दुपारच्या चहाच्या वेळच्या या मैत्रिला एक सौम्य रंग, मंद सुगंध आहे. 

संध्याकाळी आई तुळशीसमोर दिवा लावायची तेंव्हा  शुभंकरोती म्हणत हात नकळत जुळले जायचे. आता तुळशी समोर दिवा शुभंकरोती हे वाढत्या वयात बदललेल्या काळात लोपून गेलंय. दासू-धनंजय-शाहू-मनोज या समकालीन मित्रांच्या सोबत श्याम देशपांडे, जयदेव डोळे, निशीकांत भालेराव आणि प्रवीण बर्दापूरकर या वयाने मोठ्या असलेल्या स्नेह्यांनी जे मैत्र दिलंय त्याचा दिवा काळजात  तेजाळून येतो. आई वडिलांपासून परभणीहून मी 2004 मध्ये दूर औरंगाबादला आलो. पंधरा वर्षे उलटली पण ती हूरहूर या मित्रांनी कधी जाणवू दिली नाही.   
बर्दापूरकरांच्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज होतो आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस 11 तारखेला आहे. त्यांना आणि वहिनींना मन:पूर्वक शुभेच्छा ! 
(छायाचित्र बर्दापूरकर यांच्या ब्लॉग वरून साभार )
 
श्रीकांत उमरीकर 

जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-401. मो. 9422878575

No comments:

Post a Comment