सा.विवेक, नोव्हेंबर 2018
हैदराबाद मुक्ती संग्राम लढा हा वर वर पहाता एका जूलमी राजवटी विरूद्धचा लढा असल्याचे चित्र समोर येते. ते खरेही आहे. सोबतच हा लढा मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेविरूद्ध सामाजिक पातळीवरचा पण होता. त्यामुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतरही (17 सप्टेंबर 1948) या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वत:ला विधायक सामाजीक कार्यात झोकून दिले. शैक्षणीक संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, व्यायाम शाळा, गणेश उत्सवातील संगीत मेळे, खादी ग्रामोद्योग समिती, प्रौढ साक्षरता अशा कितीतरी कामांमध्ये हे स्वातंत्र्यसैनिक अग्रेसर राहिले. औरंगाबादेतील सरस्वती भुवन, नांदेड येथील पिपल्स महाविद्यालय, परभणीचे नुतन विद्यालय, सेलूची नुतन शिक्षण संस्था, अंबाजोगाईचे योगेश्वरी महाविद्यालय, लातूरचे पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन, ‘मराठवाडा’ वृत्तपत्र, परभणीचे गणेश वाचनालय, औरंगाबादचे बलवंत वाचनालय अशा कितीतरी संस्था स्वातंत्र्य सैनिकांनी लोकाश्रयांतून उभ्या केल्या आणि सचोटीने चालवून दाखवल्या.
अशा हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी सेलूचे (जि. परभणी) विनायकराव चारठाणकर. विनायकरावांना 1988 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी व इतरांनी निधी गोळा करून एक लक्ष रूपयांची थैली अर्पण केली. त्याचा उद्देश त्यांनी ज्या खस्ता स्वातंत्र्यलढ्यासाठी घेतल्या त्याची उतराई व्हावी हा होता. पण विनायकरावांनी हा निधी कुठल्याही वैयक्तिक कामासाठी न वापरता सार्वजनिक कामासाठीच वापरण्याचा निर्णय घेतला. या निधीत स्वत:चीही भर घालून सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्याची योजना सर्वांसमोर मांडली. 1988 पासून सेलू सारख्या छोट्या गावांत दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक साहित्यीक पत्रकारिता आदी क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या मराठवाड्यातील व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.
महाराष्ट्रात आणि विशेषत: मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेच्या मराठवाड्यात सामाजीक क्षेत्रात सर्वस्व झोकून काम करण्याची आवश्यकता धुरीणांना जाणवली. खरं तर टिळक आगरकर या वादाचे विश्लेषण अभ्यासक काहीही करोत पण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक सुधारणा हातात हात घालूनच चालत होत्या. स्वातंत्र्यानंतर परकीयांविरूद्ध लढण्याची गरज संपल्याने बहुतांश स्वातंत्र्यसैनिकांनी सक्रिय राजकारणा सोबतच सरकत इतर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बाबींमध्ये लक्ष्य केंद्रित केलं.
हैदराबाद मुक्ती लढ्याचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी पहिल्या दोन निवडणुकांत खासदारकीची निवडणुक लढवून खासदारकी निभावल्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही संन्यास घेतला. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, श्यामराव बोधनकर, विनायकराव चारठाणकर, मुकूंदराव पेडगांवकर, अनंत भालेराव यांनी काम केलं. आजही यांनी उभ्या केलेल्या संस्था समाजात मोलाचे काम करत आहेत.
स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर यांच्या हयातीत सुरू झालेला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा त्यांच्या मृत्यूनंतरही विश्वस्थ संस्थेने त्याच तोलामोलाने चालू ठेवला आहे. या वर्षी सामाजिक श्रेत्रातील योगदानासाठी औसा येथील रवी बापटले, अभिनय क्षेत्रातील संकर्षण कर्हाडे आणि साहित्यीक ऋषीकेश कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
गेल्या 30 वर्षांत 90 व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यात नुकतेच ज्यांचे निधन झाले ते मराठवाड्यातील गांधी म्हणून ओळखले जाणारे गंगाप्रसादजी अग्रवाल, थोर स्वातंत्र्यसेनानी शामराव बोधनकर, कॉ. चंद्रगुप्त चौधरी कलेच्या क्षेत्रातले वर्हाडकार लक्ष्मण देशपांडे, सुरमणी कमलाकर परळीकर, उस्ताद गुलाम रसूल, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, साहित्यीक डॉ. सुधीर रसाळ, रा.रं.बोराडे, ना.धो. महानोर, तु.शं.कुलकर्णी ते अगदी पुढच्या पिढीचे कवी इंद्रजीत भालेराव, दासू वैद्य यांच्यापर्यंतची नावे या यादीत आहेत.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सेलूत होणार्या या सामाजिक कृतज्ञता सोहळ्याला एक अनौपचारीक घरगुती स्वरूप प्राप्त झाले आहे. चारठाणकर-वाईकर कुटूंबिय एखाद्या घरगुती मंगल सोहळ्यासारखं याचं आयोजन आपल्यापरीनं करतात. या काळात नातेवाईक मंडळी गोळा होतात. आपल्या घराण्यातील या उत्तूंग व्यक्तीमत्वाच्या स्मृतीत हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ही भावना फार मोलाची आहे. सध्याच्या काळात सामाजिक कार्याचे पुर्णत: ‘एनजीओ’करण झालेले आहे. एक व्यवसायीकता, सरकारी कामाची रूक्षता आणि उपचार, उरकून टाकावा अशी औपचारिकता त्याला आली आहे. अशा रूक्ष काळात विनायकराव चारठाणकरांच्या स्मृतीत एक मोठा सोहळा उत्साहात साजरा होतो आहे याला जास्त महत्त्व आहे.
दुसर्या बाजूने हा सोहळा म्हणजे सामाजिक क्षेत्रात एक आदर्श म्हणून पण पहाता येईल. स्वातंत्र्योत्तर कालखंडात विनायकराव चारठाणकरांसारख्या ज्येष्ठांना सामाजिक कामाची तळमळ वाटली. त्यांनी त्यांच्या परीने ही सामाजिक लढाई सर्व शक्तीनिशी लढली. आता यासाठी पुढच्या पिढीने पुढे येण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात सामाजिक कामाची गरज कधीच संपत नाही. विविध आव्हाने समोर येत जातात. मराठवाड्यासारख्या भागात तर अजूनही सरंजामी मानसिकता विविध विकास कामात आड येताना दिसते.
एकेकाळी मोंढ्यामधील कापूस व्यापारी कापसाच्या प्रत्येक गोणी मागे विशिष्ट रक्कम सामाजिक शैक्षणीक कामासाठी देणगी म्हणून द्यायचे. अशी सेलूची परंपरा आहे. व्यापार्यांना सामाजिक कामात शत्रू समजायची एक विचित्र मांडणी सामाजिक चळवळीत केल्या गेली. पण सेलूत मात्र व्यापार्यांनी सामाजिक कामात केवळ देणग्याच दिल्या असे नाही तर प्रत्यक्ष सहभागही नोंदवला. श्रीरामजी भांगडियांसारखे लोक तन-मन-धनाने येथील सामाजिक चळवळीत उतरले होते. आज त्याच भांगडियाजींच्या नावाने असलेली सार्वजनिक बाग उद्ध्वस्त झालेली पाहून मन विदीर्ण होते.
विनायकराव चारठाणकरांच्या पत्नी गीताबाई यांचेही स्मरण या सामाजिक कृतज्ञता सोहळ्या निम्मिताने करणे भाग आहे. त्या केवळ विनायकरावांचा संसार सांभाळणार्या या अर्थाने अर्धागिनी होत्या असे नव्हे तर त्यांनी विनायकरावांचा सामाजिक संसारही मोठ्या हिमतीने सांभाळला. त्याही अर्थाने ‘अर्धांगिनी’पद सार्थ केले. ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव यांनी आपल्या ‘कावड’ या पुस्तकात गीताबाईंचा मोठा गौरवाने उल्लेख केला आहे, ‘.. स्टेट कॉंग्रेसचा 47 ते 48 हा निर्णायक लढा. सशस्त्र प्रतिकार, सारे एकापाठोपाठ एक करून अंगावर कोसळत गेले. विनायकराव लढले यत नवल नाही. परंतु एखाद्या योद्ध्याचे कौशल्य व शर्थ करून यश ओढून घेण्याचे शौर्य गीताबाईंनी या काळात दाखविले. निजामी पोलिसही त्यांना वचकून असत.’
महाराष्ट्राच्या विविध भागात नि:स्पृहपणे निरलसपणे स्वातंत्र्यलढ्यात लढून पुढे सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेली बरीच उदाहरणे आहेत. त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीत सातत्याने सामाजिक सोहळे घेणे हे एक कठिण किचकट काम आहे. पण ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रतिष्ठानचे सचिव ऍड. श्रीकांत वाईकर आणि त्यांचे सर्व सहकारी हे काम अव्याहतपणे करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे.
सेलू -चारठाणा-कौठा-जिंतूर-धानोरा या परिसरात सामाजिक कार्यासोबतच संगीताची नाटकांचीही मोठी परंपरा आहे. हरिभाऊ चारठाणकरांसारखे गुणी प्रतिभावंत गायक, हिराबाई बडोदेकरांचे सहकारी असलेले गायक नट रंगराव जिंतूरकर देशपांडे याच मातीत होवून गेले. हरिभाऊंच्या स्मृतीत संगीत महोत्सव साजरा होतो आहे.
सेलू सारखी जिल्हा नसलेली छोटी तालूक्याची गावे ही आता सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे खर्या अर्थाने केंद्र बनली आहेत. महाराष्ट्रभर अशा गावांमधील परंपरा हेरून तेथील कार्यकर्त्यांना संस्थांना जोडून सामाजिक सांस्कृतिक कामाची एक मोठी चळवळ उभी केली गेली पाहिजे. सध्या महाराष्ट्रभर व्याख्यानमाला, संगीत महोत्सव, दिवाळी पहाट असे कार्यक्रम राजकीय नेत्यांच्या अमर्याद हस्तक्षेपाने आपला मुळ हेतूच हरवून बसले आहेत. ज्याला पुरस्कार द्यायचा, ज्या वक्त्याचे व्याख्यान ठेवायचे त्याच्यापेक्षा मोठा फोटो आमदार खासदार मंत्री यांचा फ्लेक्सवर लावून गावभर मिरवला जातो. मंचावरही त्या राजकीय नेत्याचा त्याच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रभाव आढळून येतो.
चारठाणकर प्रतिष्ठान सारखे शांतपणे आपले काम करणार्या संस्था अशा काळात अंगणात तुळशी वृंदावनापुढे लावलेल्या दिव्यासारख्या जाणवतात. कुसूमाग्रजांच्या ओळीत सांगायचं तर
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परी स्मरते आणिक करते व्याकूळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575