सा.विवेक, ऑक्टोबर 2018
दिवस मावळून संध्याकाळचा अंधार पसरत चालला आहे. पश्चिम क्षितीजाकडे पंचमीची चंद्रकोर झुकलेली आहे. मंचामागील दाट झाडांच्या काळोख्या आकारांवर ती शुभ्र चंद्रकोर शोभून दिसते आहे. जणू काही नेपथ्याचा भाग म्हणून तिथे लटकून ठेवली आहे. हळू हळू रंगमंच उजळतो. या खुल्या रंगमंचाला (ऍम्फी थिएटर) अतिशय कल्पक ‘द्यावा पृथिवी’ असे नाव आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो ‘पृथ्वीवरील स्वर्ग’. पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याची ताकद कलेतच असते हे अप्रत्यक्षरित्या या नावातून सुचित होते.
महागामीच्या युवा नृत्यांगना आणि नर्तक मंचावर शिवस्तूती सादर करायला लागतात. वेरूळच्या कैलास लेण्यातील शिवाच्या लालित्यपूर्ण मुद्रा जिवंत होवून समोर साकार होत आहेत असाच भास रसिकांना होतो.
हे सगळं वर्णन आहे 13 ऑक्टोबरला औरंगाबाद येथे सुरू झालेल्या ‘ऑरा औरंगाबाद’ उपक्रमाचे. औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी म्हणून घोषित केल्या गेली. पण त्या सोबत जे विविध प्रकल्प इथे राबविल्या जायला हवे होते ते केल्या राबविले गेलेच नाहीत. रस्ते वीज पाणी स्वच्छता नाले यांच्या समस्या अजूनही सुटल्या नाहीत. मग अशा प्रदुषित वातावरणात सांस्कृतिक पर्यावरणाबद्दल न बोललेलेच बरे.
सांस्कृतिक पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करणे आपली जबाबदारी आहे हे ओळखून महागामी गुरूकुलाच्या संचालिका प्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता या पुढ्या सरसावल्या. 2013 पासून त्यांनी पर्यटकांचा बहर असण्याच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या काळात दर शनिवार-रविवारी संध्याकाळी सात ते आठ या वेळात ‘ऑरा औरंगाबाद’ ची आखणी केली. गेली सहा वर्षे हा उपक्रम साजरा होतो आहे.
औरंगाबाद परिसराला एक संपन्न असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. वेरूळ अजिंठ्याच्या शिल्पांतील चित्रांतील नृत्य मृद्रा, वाद्यांचे कित्येक संदर्भ, देवगिरी किल्ल्यावर महान संगीततज्ज्ञ शारंगदेव यांनी केलेली ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथाची रचना, औरंगाबाद शहरात असलेल्या लेण्यांमधील भारतातील पहिला संगीत संदर्भ असलेले ‘आम्रपाली’ हे शिल्प या सगळ्याला कलात्मक रित्या सादर करण्याची आवश्यकता पार्वती दत्ता यांना जाणवली.
परदेशी पर्यटक त्यातही विशेषत: युरोपातील पर्यटक संस्कृती जाणून घेण्यासाठी जास्त उत्सुक असतात. त्यांना आपल्या संपन्न सांस्कृतिक वारश्याचे दर्शन घडविणे या निखळ हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. केवळ परदेशी पर्यटकच नव्हे तर देशी पर्यटक, कलास्नेही, कला रसिक, अभ्यासक यांच्यासाठी सुद्धा हा उपक्रम आवश्यक आहे. त्यांचा अनुभव संपन्न करणारी आहे असे हळू हळू लक्षात येत गेले.
सहाव्या वर्षात पोचलेल्या या उपक्रमाची दखल आता सांस्कृतिक क्षेत्रात गांभिर्याने घेतली जात आहे. परदेशी पर्यटक तर आपले नियोजन या तारखांप्रमाणे करतात.
13 ऑक्टोबरला ‘ऑरा औरंगाबाद’चे पहिले सादरीकरण ‘द्यावा पृथिवी’ या खुल्या रंगमंचावर झाले. शीतल भामरे, श्रीया दिक्षीत, रसिका तळेकर आणि महेश कवडे या तरूण कलाकारांनी कथ्थक नृत्यशैलीत ही संध्याकाळ रंगवली.
शिवस्तुतीने कार्यक्रमाची सुरवात झाली. वेरूळचे कैलास लेणे हे शिवाच्या विविध रूपांना मुद्रांना दर्शविते. शिवाच्या विविध मंदिरांमधील हे मंदिर म्हणजे कारागिरीचा सर्वोत्कृष्ठ नमुना मानले जाते. ‘ऑरा’ च्या कार्यक्रमांत आवर्जून शिवस्तुती किंवा शिवाच्या संदर्भातील रचना सादर केल्या जातात.
शिवस्तुतीनंतर या तरूण कलाकारांनी रसिकांसमोर सादर केली बिंदादीन महाराजांची अष्टपदी ‘निरतत ढंग’. ज्या पद्धतीनं राजन साजन मिश्रा किंवा सिंग बंधु किंवा अमानत अली नजाकत अली सहगायन सादर करतात त्या पद्धतीनं हे चारही कलाकार एक प्रकारे सहनृत्य सादर करत होते.
बिंदादीन महाराजांची जी अष्टपदी सादर झाली तिचे बोल होते
निरतत ढंग
बहे पवन मंद सुगंध
शीतल बिनसी वट तट निकट
जमुना वृंदावन
की कुंज गलिन मे
नाचे गोपी उमंग
निर तत् ढंग
या सुंदर रचनेला मंचावर सादर करताना चारही तरूण कलाकारांच्या हालचाली अतिशय मोहक होत्या. विशेषत: बहे पवन मंद या शब्दांसोबत हाताच्या केल्या गेलेल्या हालचाली त्या हळूवार वार्याची आठवण करून देत होत्या. मंद सुगंध या शब्दाच्या उच्चारणानंतर बोटांच्या हालचालींतून फुलाचे सुचन करण्यात आले. पण यासोबत आजूबाजूच्या झाडांमुळे एक वेगळीच अनुभूती रसिकांनी आली. या खुल्या रंगमंच्या जवळ लांब दांडीच्या फुलांची उंचच उंच दाट झाडी आहे. सध्या या झाडाचा बहर चालू आहे. या फुलांचा मंद असा सुगंध सगळ्यात आसमंतात भरून राहिला आहे. नेमक्या याच वातावरणात बिंदादीन महाराजांची ही अष्टपदी निवडण्याची सुचकता पार्वती दत्तांनी दाखवली याचे करावे तेवढे कौतूक थोडेच आहे.
अष्टपदी असो की नंतर सादर झालेला किरवानी तराना, कृष्णाच्या गोवर्धन लिलेचे वर्णन करणारे तानसेन रचित धृपद या सगळ्यांतून चारही कलाकारांचा आपसांतील सांगितीक संवाद आणि त्यातून निर्माण होणारा सुंदर रंगाविष्कार यांची अनोखी अनुभूती रसिकांना येत होती.
खुल्या वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात याच परिसरातील शिल्पांवर संगीत शास्त्रावर आधारलेली कला पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. विशेषत: परदेशी पर्यटक जेंव्हा हा अनुभव घेण्यासाठी येतात तेंव्हा ते आपले वस्त्रही आवर्जून सुती खादीचे परिधान करतात. कपाळाला टीळा लावून एखाद्या मंदिरात जावे तसे रंगमंचासमोर कलेचा आस्वाद घेण्यासाठी बसतात तेंव्हा आपण चकितच होतो.
या कार्यक्रमाचे निवेदन पार्वती दत्तांची छोटी शिष्या वैभवी पाठक ही करत होती. अगदी 14 वर्षांची लहान मुलगी. पण ज्या शैलीत तिने निवेदन केले त्याने रसिकांचे कान वेधून घेतले. स्वच्छ सोपी पण नजाकत भरलेली इंग्रजी भाषा निवेदनासाठी तिने वापरली होती. परदेशी पर्यटकांना समजावे म्हणून आवर्जून या उपक्रमाचे निवेदन हिंदी सोबत इंग्रजीतही केले जाते. नृत्यासोबतच इथे निवेदक हिंदी इंग्रजी भाषा ज्या पद्धतीनं वापरतात त्याचीही दखल घेतली पाहिजे. रंगमंचावर वावरणारे सर्वच एका विशिष्ट भारतीय शैलीतीलच कपडेच परिधान करतात. या मुळे दृश्य संस्कारही रसिकांवर होतो.
या तूलनेत भारतीय पर्यटक किंवा रसिकांकडूनच या कलाविष्काराची तेवढी बूज ठेवली जात नाही. याचे एवढे गांभिर्यच आपल्याला जाणवत नाहीत.
ऑरा औरंगाबाद हा उपक्रम आपल्या संपन्न सांस्कृतिक वारश्याची आठवण करून देणारा आहे. हा वारसा जतन करण्यासाठी आहे. ज्या परिसरात हा उपक्रम साजरा होतो तिथे सर्वत्र पणत्या लावलेल्या असतात. तांब्याच्या लखलखीत घंगाळात फुलांच्या पाकळ्यांच्या सहाय्याने रांगोळ्या काढलेल्या असतात. सारवलेल्या जमिनीवर पारंपरिक रांगोळ्या रेखाटलेल्या असतात. असे वातावरण बघितले की परदेशी पर्यटक ज्यांना धूम्रपानाची सवय असते तेही कटाक्षाने प्रवेश करतानाच सिगारेट विझवून येतात.
कार्यक्रमाला पर्यटक-रसिकांसोबतच या गुरूकुलात शिकणार्या मुलीही आवर्जून उपस्थित असतात. आपल्या शिक्षणाचा एक भाग म्हणूनच त्यांना या उपक्रमांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर सगळी रंगमंच सज्जा, आजूबाजूची वातावरण निर्मिती, सजावट, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत ही सगळी जबाबदारी या शिष्यांवरच असते. म्हणजे यांना केवळ कलेचेच शिक्षण मिळते असे नाही तर ही कला जतन करण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घ्यावी लागते, येणार्या रसिकांसाठी एक विशिष्ट वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी पण कशी पार पाडावी लागते, कार्यक्रमाची आखणी अगदी निवेदनापासून ते रसिकांचे स्वागत करण्या पर्यंत कसे करावे लागते याचेही एक प्रशिक्षण नकळतपणे मिळून जाते.
डिसेंबर पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. खरं तर अशा प्रकारे मंदिरे, दर्गे इथे विविध सांगितीक उपक्रम आखले गेले पाहिजेत. महागामी मध्ये नृत्य-संगीत सादर केले जाते. पण विविध लोककलांसाठी इतर संस्थांनी पुढाकर घेवून आखणी केली पाहिजे. पर्यटक जेंव्हा आपल्या शहरात येतात तेंव्हा ते केवळ वास्तु पाहण्यासाठी येतात असे नाही. त्यांना आपली संस्कृती समजून घ्यायची असते.
पर्यटनाला चालना मिळण्यासाठी चालू करण्यात आलेला वेरूळ महोत्सव कधीचाच बंद पडला आहे. तो चालू होता तेंव्हाही त्याच्या आयोजनावर विविध प्रश्न तेंव्हाच उपस्थित केल्या गेले होते. त्याच्या दर्जाबाबत जाणकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर 6 वर्षांपासून महागामीच्या वतीने चिकाटीने चालू असलेल्या ‘ऑरा औरंगाबाद’ चे महत्त्व जास्तच ठळकपणे दिसून येते.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575