दैनिक दिव्य मराठी १७ डिसेंबर २०१७
चांगली कलाकृती ही नेहमीच समिक्षकांपुढे आव्हान निर्माण करत असते. प्रतिभावंत हा एक कोडं बनून समोर उभा राहतो. आणि ते सोडवताना आपल्याला बौद्धिक कष्ट करावे लागतात.
बब्रूवान रूद्रकंठावार हा सध्याच्या मराठी साहित्यातील असाच एक लेखक आहे. त्याच्या कलाकृतींनी भल्या भल्यांना गेल्या 20 वर्षांत गोंधळात टाकले आहे. याला ग्रामीण म्हणावे का? याला विनोदी म्हणावे का? ही शैली कोणती आहे? ही भाषा नेमकी कोणती म्हणायची?
हिंदीत दुष्यंतकुमार या कवीच्या बाबतीत असा प्रकार घडला होता. ही भाषा हिंदी आहे की उर्दू या विवंचनेत पडलेल्या समिक्षकांना शेवटी साहित्य अकादमी पुरस्कार या लेखकाला देता आलाच नाही. बब्रूवानचे काहीसे तसेच आहे. पण सुदैवाने त्याच्या लिखाणातील उपहासाची धार लक्षात येवून यावर्षीचा शासनाचा विनोदी लेखनासाठी असलेला कोल्हटकर पुरस्कार त्यांच्या ‘आमादमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला घोषित झाला.
बब्रूवान यांचे पहिले पुस्तक ‘पुन्यांदा चबढब’ हे 20 वर्षांपूर्वी प्रकाशीत झाले. त्याही पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या या शैलीतील पहिल्याच पुस्तकावर लिहीताना ज्येष्ठ कवी फ.मुं. शिंदे यांनी इंग्रजी-मराठी अशा या ‘इंग्राम’ शैलीला मानसिक संग्राम असे संबोधले होते. दोस्त आणि बब्रूवान या दोघांतील संवाद असे या लिखाणाचे स्वरूप आहे. विरोधाभास आणि दोलायमानता ही वैशिष्ट्ये फ.मुं.नी अधोरेखीत करून ठेवली होती.
आता या व्यक्तिरेखांनाही जवळपास 21 वर्षे झाली आहेत. मराठीत सातत्याने एखादी व्यक्तीरेखा उपहासातून जिवंत ठेवण्याचे हे पहिलेच उदाहरण ठरावे. काळाप्रमाणे बब्रूवान यांची शैलिही विकसित होत गेलेली किंवा बदलत गेलेली आढळते. वरवरचा शाब्दिक विनोद पकडता पकडता ती हळू हळू खोलवर तत्त्वज्ञानाकडे जाताना आढळते. सुधीर रसाळांसारख्य दिग्गज समिक्षकाने या लिखाणावर बोलताना अतिशय नेमकेपणाने असे लिहीले आहे, ‘.. अशा प्रकारचा चिंतनप्रेरक विनोद मराठीत जवळपास दुसरा नाही.’
पहिल्या पुस्तकानंतर आलेलं ‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी‘. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नाटककार दत्ता भगत यांनी बबरूवानच्या भाषिक प्रयोगाबद्दल फारच नेमकेपणाने निरिक्षण नोंदले आहे. ‘.. या लिखाणात केवळ इंग्रजी शब्द ग्रामीण बोलीशी जोडून जी विसंगती निर्माण होते तेवढाच विनोद नाही. मूळचे जे ओरिजनल आहे ते कुठल्याशा छापात बसवणे हीच नागरीकरणाची प्रक्रिया आहे. अशा नागरीकरणाच्या प्रक्रियेत मूळचे सामर्थ्य कसे संकुचित होते यावरही हा लेखक बोट ठेवतो.’
नंतरचे ‘टर्र्या, डिंग्या आन् गळे‘ हे तिसरे आणि ज्याला पुरस्कार मिळाला ते चौथे. शिवाय एक नाटक याच शैलीत पत्रकारितेवरचं त्यांनी लिहीलं ‘चौथ्या इस्टेटीच्या बैंलाला’ तेही पहिल्याच पुस्तकाच्या वेळेस 1998 ला रंगभूमीवर आलेलं आहे.
या लिखाणाचे तीन वैशिष्ट्ये आहेत. यात बबरू आणि दोस्त अश्या दोन मुख्य व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांच्या संवादातून हे सगळं लिखाण उलगडत जातं. दोघांच्या बायका आणि पोरं आधून मधून येत राहतात. इतर प्रसंग-ात्कालिन घटना यावरचे भाष्य यात उमटत राहते. बबरू लेखक-पत्रकार आहे तर दोस्त गल्लीपातळीवरचा छोटा राजकारणी आहे. खरं तर दोघेही सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करतात.
दूसरं वैशिष्ट्य म्हणजे या लिखाणाची शैली. बोली मराठी-प्रमाण मराठी-इंग्रजी अशी एक भन्नाट सरमिसळ बबरूवान करतात. म्हणूनच तर अरूण साधू यांनी या शैलीला ‘अस्सल मराठवाडी ग्रामीण बोली सिन्थेसाईझ्ड वुईथ इंग्लिश.. डेडली कॉकटेल !’ म्हटलं आहे.
तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व लेखांचा शेवट ता.क. म्हणजेच ताजा कलम ने होतो. हा ताजा कलम परत एक वेगळाच नमुना आहे. एकीकडून तो विषयाशी संबंधीत असतोच पण दुसरीकडून त्याला एक स्वतंत्र अस्तित्वही आहे. गझलेचा प्रत्येक शेर जसा स्वतंत्र असतो शिवाय तो संपूर्ण कवितेचा एक भाग असतो तसेच. उदा. जातीचं मॅथेमॅटिक्स या लेखात जो ता.क. आला आहे तो असा ‘जातीच्या कार्डाचं मातर अवगड आस्तं. आपण ते घडीघडी स्वॅप करीत र्हायलो की, कार्डाचा चुथडा व्हवून जातो, त्यावरले आक्षरं उडायला लागतेत. धागे निघायला लागतेत. मंग बोथट कार्ड कायम रिटर्न येवून रिव्हर्स मारत र्हातंय. कानफटात म्होरनं लगावल्यापक्षा रिव्हर्सचा फटका जोरदार आस्तो.’ हे जे वाक्य आहे ते स्वतंत्रपणे जरी वाचलं तरी त्याचा नीट अन्वयार्थ वाचकाला लागू शकतो. इतकी ताकद या ता.क. मध्ये आहे.
बबरूवानला अजून एका गोष्टीचं श्रेय द्यायला पाहिजे. आर. के. लक्ष्मण यांनी ज्या प्रमाणे ‘कॉमन मॅन’ च्या माध्यमातून सर्वकाही मांडण्याचा मोठा प्रतिभावंत खेळ करून दाखवला तसाच बबरूनी पण ‘बबरू’ आणि ‘दोस्त’ या केवळ दोन व्यक्तीरेखांच्या संवादांतून सारं काही उलगडून दाखवलं आहे. बबरूवान यांच्या या व्यक्तीरेखांच्या निवडीची तुलना विख्यात लेखक अरूण साधू यांनी गुरू-शिष्य संवादाशी (सॉक्रेटीस-प्लेटो) किंवा दोन व्यासंगी तत्त्वज्ञांची चर्चा याच्याशी केलेली आहे. खरं तर इतके नेमके विश्लेषण करून साधूंनी बबरूच्या लिखाणाचं एक मोठंच कोडं उलगडून दाखवलं आहे.
वास्तविक या दोन व्यक्तिरेखा म्हणजे तमाशातील आबुराव-गबुराव होण्याची शक्यता फार होती. तमाशातील ग्राम्य विनोदाचा बाज जर याला एकदा चढला असता तर या लिखाणातील अभिजातता कमकुवत ठरली असती. तसेच एकदा का ‘ग्रामीण इनोदी’ म्हणून शिक्का बसला की वाचक-समीक्षकच काय पण लेखकही बहकून जातो. तशी खुप उदाहरणे मराठीत आहेत. ग्रामीण मराठी-इंग्रजी-प्रमाण मराठी-खेडे-शहर या सगळ्यांच्या काठांवरून चालताना एक नेमका तोल त्यांनी सांभाळला.
दूसरं एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक राजकीय विषयांची अतिशय बारीक समज बबरूवान यांच्या लिखाणात आढळते. आम आदमी पार्टी याच नावाच्या लेखात ‘.. दोस्ता आमादमी फिगरमंदी न्हाई, जिगरमंदी मोजावा लागत आस्तोय.’
हे वाक्य 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या आधीचं आहे. आणि तेही आम आदमी पक्षानं दिल्लीची निवडणुक जिंकल्यानंतरचे आहे. मग आपल्या लक्षात येतं की लेखकाची सामाजिक राजकीय समज किती बारीक आहे.
एखादा लेखक सतत 21 वर्षे दोन व्यक्तीरेखा घेवून लिहीतो आहे. आपली शैलीबद्ध लिखाणातून कालसापेक्ष घटना प्रसंगांवर लिहीता लिहीता हळूच त्यातून निसटून कालनिरपेक्ष होण्याकडे धाव घेतो आहे हे विस्मयचकित करणारं आहे.
अशा या प्रतिभावंत लेखकाला अजून मोठे पुरस्कार मिळो. केवळ टोपण नाव घेवूनच हे लिखाण केलं गेलं आहे असं नसून प्रस्थापित लेखक म्हणून मिरवण्याच्या भाषणं करण्याच्या स्वत:ची मार्केटिंग करण्याच्या शैलीला नाकारून या लेखकांनं एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. आपण त्याला दाद द्यायलाच हवी.
श्रीकांत उमरीकर
मो. 9422878575