उरूस बुधवार 25 ऑक्टोबर 2017
बनारस घराण्याच्या ठूमरी गायिका गिरीजा देवी यांचे वृद्धापकाळाने 24 ऑक्टोबर रोजी निधन झाले. ठुमरीची साम्राज्ञी निवर्तली.
12 वर्षांपूर्वी मुुबईला षण्मुखानंद सभागृहात पंचम निषाद संस्थेच्या शशी व्यास यांनी एक अप्रतिम योग घडवून आणला होता. गानसरस्वती किशोरी आमोणकर, ठुमरी सम्राज्ञी गिरीजा देवी, गानहिरा परवीन सुलताना या तिघींना एक मंचावर आणले होते. पहिल्यांदा मंचावर आल्या परवीन सुलताना. त्या अप्रतिम गाऊन गेल्या. दुसर्यांदा मंचावर आल्या गिरीजा देवी. त्यावेळी त्या पंच्च्याहत्तरीत होत्या. फिक्या पिवळ्या रंगाची बनारसी त्या नेसल्या होत्या. शुभ्र केसाची भलीमोठी वेणी खांद्यावरून पुढे ओढून घेतली. कसलाही विलंब न करता आवाज लावला. एका सेकंदात त्यांचा आवाज असा काही लागला की सभागृहाने पहिल्याच सूराला कडाडून टाळी दिली. अतिशय रसरशीत असं ते गाणं. त्यांच्यासोबत त्यांची शिष्या मागे बसून गात होती. एका जागी तिने इतकी सुंदर हरकत घेतली की रसिकांनी तिलाही प्रचंड टाळ्या वाजवून मनसोक्त दाद दिली. गिरीजा देवींनी गाणं क्षणभर थांबवलं, ‘हमारी बेटीको आपने तालिया दी.. एक गुरू के लिये और क्या चाहिये की लोग उनके शिष्योंको उनके सामने नवाजे... इन्ही के जरिये हमारे घरानेकी ये गायकी आगे जायेगी..’ लोकांनी परत टाळ्या वाजवल्या.
ठुमरी सारख्या गानप्रकाराला दुय्यम समजल्या जातं. स्वातंत्र्योत्तर काळात या ठुमरीला सिद्धेश्वरी देवींपासून बेगम अख्तर, निर्मला देवी, लक्ष्मी शंकर, शुभा गुर्टू, गिरीजा देवी यांनी मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. संगीत तज्ज्ञ अशोक दा. रानडे यांनी आपल्या पुस्तकात एक प्रसंग नमुद करून ठेवला आहे. केसरबाई मुंबईला एका कार्यक्रमात ठुमरी गात होत्या. त्या सभागृहात सिद्धेश्वरींचे आगमन झाले. लगेच केसर बाईंनी आपलं गाणं थांबवलं. सिद्धेश्वरी म्हणाल्या "क्यू बंद किया? आच्छा तो चल राहा था." पण केसरबाई जे बोलल्या ते फार महत्त्वाचे होते. ‘ठुमरी की तालिम पाती तो सर पे बैठ के गाती.’ मला ठुमरीची तालिम भेटली नाही म्हणून गात नाही असं सांगत केसरबाईंनी सिद्धेश्वरींच्या ठुमरीचा गौरवच केला.
‘रस के भरे तोरे नैन’ ही गिरीजा देवींची अतिशय गाजलेली भैरवी ठुमरी. सत्याग्रह (२०१३) चित्रपटात ही ठुमरी वापरली आहे. त्यांच्या आयुष्याची भैरवी झाली आहे.. आज त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘रस से भरी तोरी अवाजा..’ अशीच भावना दाटून आली आहे.. गिरीजा देवींना विनम्र श्रद्धांजली.
(रस के भरे तोरे नैन या ठुमरीची link)
https://www.youtube.com/watch?v=HJS6Em8y3VU
No comments:
Post a Comment