Thursday, October 5, 2017

लेखकाच्या स्मृतीत सांस्कृतिक सोहळे


उरूस, विवेक, 24 सप्टेंबर 2017

काळ अतिशय प्रतिकूल असा स्वातंत्र्यापूर्वीचा, जात्यांध-सरंजामदारी निजामी राजवटीचा. एक लेखक अतिशय हलाखीच्या स्थितीत हैदराबाद या राजधानीच्या गावापासून मैलो दूर परभणी सारख्या तेंव्हाच्या खेडेवजा शहरात राहून वाङ्मय निर्मिती करतो. एक दोन नाही तर तब्बल सात कादंबर्‍या, पाच कथा संग्रह, सव्वाशे कविता इतकी निर्मिती अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात करतो. ओढग्रस्तीत त्याची तब्येत खालावत जाते. शेवटी नोकरीच्या ठिकाणीच 7 सप्टेंबर 1953 ला हृदय बंद पडून त्याचा करूण देहांत होतो. तो दिवस असतो पोळ्याचा. अमावस्येचा. 

बरोबर पन्नास वर्षांनी 7 सप्टेंबर 2002 साली अमावस्याच असते. या लेखकाच्या स्मृतीत एक कोटी रूपये खर्च करून भव्य स्मारक उभारल्या जाते. ग्रेस सारख्या प्रतिभावंत कविच्या हस्ते त्या स्मारकाचे उद्घाटन होते. 
कविवर्य बोरकरांनी असं लिहून ठेवलं होतं

मी विझल्यावर त्या जागेवर
नित्याच्या जनरितीप्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्र फुलांची छत्री

ओळी लिहिल्या बोरकारांनी. पण अगदी शब्दश: त्या खर्‍या ठरल्या या लेखकाच्या बाबतीत. अमावस्येलाच या कविच्या कवितांनी त्याच्या साहित्यानेच त्याच्यावर चंद्र फुलाची छत्री धरली. त्याचे सुंदर स्मारक साकार झाले. या कविचे नाव आहे बी. रघुनाथ. 

भगवान रघुनाथ कुलकर्णी हे त्या लेखकाचे मूळ नाव.  निजामी राजवटीत तेलगू पद्धतीप्रमाणे त्यांनी लेखक म्हणून टोपण नाव स्विकारले ‘बी. रघुनाथ’.

या लेखकाच्या नावाने परभणीत स्मारक उभारल्या गेले आहे. त्यांच्या स्मृतीत एक सभागृह त्यांच्या मृत्यूनंतर लगेच 1956 ला भर गावात उभारण्यात आले होते. नंतर 2002 मध्ये नविन स्मारक पुतळ्यासह उभारण्यात आले. इतकेच नाही तर गेली 15 वर्षे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सप्टेंबर महिन्यात चार दिवसांचा ‘बी. रघुनाथ महोत्सव’ भरविला जातो.  बी. रघुनाथांच्या नावाने मोठे महाविद्यालय परभणी शहरातच सुरू करण्यात आले आहे. 

औरंगाबादला गेली 28 वर्षे ‘बी. रघुनाथ स्मृती संध्येचे’ आयोजन करण्यात येते. त्यांच्या नावाने एक मोठा वाङ्मयीन पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार प्रा. नितीन रिंढे यांच्या ‘लिळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाला प्रख्यात नाटककार अजित दळवी यांच्या हस्ते देण्यात आला आहे. 

एखाद्या लेखकाचे स्मारक उभारणे आणि त्याच्या स्मृतीत असे सोहळे साजरे करणे हे महाराष्ट्रात फार दूर्मिळ आहे. केशवसुतांचे मालगुंडला देखणे स्मारक उभे आहे.  पु.ल.देशपांडे यांच्या नावाने एक अकादमी मुंबईला स्थापन करण्यात आली आहे. पु.लं.चा पुतळाही रविंद्र नाट्य मंदिराच्या परिसरात आहे. कुसूमाग्रजांच्या स्मृती नाशिककर सतत जागवत असतात. कुसूमाग्रज प्रतिष्ठानने मोठे कामही उभे केले आहे. नांदेडला प्रा. नरहर कुरूंदकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. जळगांवला ‘काव्य रत्नावली’ चौक उभारून कविंची स्मृती जागविली गेली आहे. हे ठळक अपवाद वगळले तर लेखकाची स्मृती जपण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. उलट विखारी जातीय भूमिका घेत लेखकांचे पुतळेच उखडून टाकण्याची मात्र उदाहरणे आहेत. 

साहित्य संमेलनांची मोठी परंपरा महाराष्ट्रात असताना लेखकांची मात्र उपेक्षा कशामुळे केली जाते? 

 सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाच्या लेखकाच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व साहित्याचे पुनर्मुद्रण झाले पाहिजे. जे लिखाण प्रसिद्ध झाले नसेल ते प्रकाशात आले पाहिजे.  दूसरं महत्त्वाचे काम म्हणजे त्या लेखकाच्या महत्त्वाच्या कलाकृतींवर आधारीत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण. रविंद्रनाथ टागोरांवर आजही बंगालात विविध कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. रविंद्र संगीताचे सादरीकरण आजही तरूण कलाकार मोठ्या उत्साहने करतात.
पण मराठीत हे होताना दिसत नाही. आधुनिक काळातील लेखक तर नंतरची बाब आहे. पण ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, चोखा मेळा, महदंबा, सोयराबाई, मुक्ताबाई, जनाबाई यांच्या समग्र लिखाणाची अर्थासह स्पष्टीकरण देणारी सटीप आवृत्ती आहे का?

अण्णाभाऊंचे पुतळे जातिय राजकारणाच्या सोयीसाठी गावोगाव उभारलेले दिसतात. पण त्याचा साहित्य प्रेमाशी काडीचाही संबंध आढळून येत नाही. 

एक अतिशय साधी योजना आखता येवू शकते. त्या त्या परिसरातील दिवंगत साहित्यीकाच्या स्मारकासाठी त्या  त्या परिसरातील ‘अ’ दर्जाच्या ग्रंथालयाला विशिष्ठ निधी देवून त्यांना- पुतळा उभारणे, पुस्तके प्रकाशीत करणे, स्मृती सोहळे साजरे करणे - यासाठी प्र्रोत्साहित केल्या जावू शकते. महाराष्ट्रात 235 जिल्हा ‘अ’ दर्जाची शासनमान्य ग्रंथालये आहेत. यांना नियमित अनुदानही दिले जाते. सर्व ग्रंथालयांना स्वत:ची छोटी मोठी इमारत आहे, सभागृह आहे, पुतळाच उभारायचा असेल तर जागाही उपलब्ध होवू शकते. काही ठिकाणी नगर पालिका महानगरपालिकेची खुली जागा ग्रंथालयांला लागून असेल तर तीपण पुतळ्यासाठी उपलब्ध होवू शकते. काही लेखकांचे नातेवाईक जे की आर्थिक दुष्ट्या सुस्थितीत असतील ते देणगीही देवू शकतात. (औरंगाबादला पत्रकार अनंत भालेराव यांच्या कुटूंबियांनी त्यांचा पुतळा साहित्य परिषदेला देणगी दाखल दिलेला आहे.) 

काही शैक्षणिक संस्थाही यासाठी पुढाकर घेवू शकतात. नांदेडला असा पुढाकार नरहर कुरूंदकर स्मारकासाठी तेथील शैक्षणिक संस्थेने घेतलाही आहे. 

प्रत्येक वेळी शासनाची मदत पाहिजे, अनुदान पाहिजे असेही नाही. गावोगावी विविध उत्सव दणक्यात साजरे होतच असतात. अगदी खेड्यागावातही हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह होतात. त्यावर प्रचंड खर्चही होतो. मग काही ठिकाणी अशा संस्थांनी पुढाकार घेवून हेच सोहळे त्या त्या भागातील प्रतिभावंतांच्या स्मृतीत साजरे केले तर कुठे बिघडले? 

हे का करायचे? तर हे प्रतिभावंत काळाच्या पुढचे पहात असतात. ज्यांची प्रतिभा काळावर टिकते त्यांची दखल आपण घ्यायलाच हवी. बी. रघुनाथ यांनी 1945 मध्ये असं लिहीलं होतं

राऊळी जमतो भावूक मेळा
गुरवाचा गांजावर डोळा
त्यातही डोळे किती निराळे
भक्त कुणा समजावे
आज कुणाला गावे

संन्याश्याच्या छाटीत चोळी
मुमुक्षु  फिरतो गल्ली बोळी
विविधरंगी या शुका-बकातील 
नितळ कसे निवडावे
आज कुणाला गावे

आज जिकडे तिकडे सामान्य भक्तांची दिशाभूल करणार्‍या बाबा/बुवा/बापुंचा विषय चर्चेत आहे. आणि सत्तर वर्षांपूर्वी एक कवि नेमकं हेच टिपून ठेवतो हे त्याच्या प्रतिभेचे मोठेपण नाही का?

बी. रघुनाथांच्या स्मृतीत सामान्य रसिक एकत्र येवून सोहळा साजरा करतात हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच हा उत्सव टिकून आहे. त्यात औपचारिकता नसून उत्स्फुर्तता आहे. 

आषाढीला महाराष्ट्राभरातून विविध संतांच्या नावाने दिंड्या निघतात. आणि त्या सगळ्या मग आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरला जमा होतात. या प्रमाणेच विविध साहित्यीकांच्या नावाने महाराष्ट्रभर वर्षभर सोहळे साजरे व्हावेत. आणि या सगळ्यांची ‘वाङ्मयीन एकादशी’ साहित्य संमेलनाच्या रूपात साजरी व्हावी.  
 
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment