अक्षरनामा news portal मंगळवार २४ जानेवारी २०१७
संगीताच्या जाणकारांना 'आहत' नाद व 'अनाहत' नाद हे शब्द माहीत असतात, पण सामान्य रसिकांना हे फारसं कळत नाही. कानाला जे ऐकू येतात ते सर्व 'आहत' नाद आणि कानाला ऐकू येत नाहीत किंवा जाणवत नाहीत, पण ज्यांचा अंतश्चक्षू तीक्ष्ण आहे, त्यांना ऐकू येतो तो 'अनाहत' नाद.
संगीताच्या जाणकारांना 'आहत' नाद व 'अनाहत' नाद हे शब्द माहीत असतात, पण सामान्य रसिकांना हे फारसं कळत नाही. कानाला जे ऐकू येतात ते सर्व 'आहत' नाद आणि कानाला ऐकू येत नाहीत किंवा जाणवत नाहीत, पण ज्यांचा अंतश्चक्षू तीक्ष्ण आहे, त्यांना ऐकू येतो तो 'अनाहत' नाद.
माझ्यासारख्याचा अंतश्चक्षू किती तीक्ष्ण आहे माहीत नाही, पण २१ जानेवारीला औरंगाबादेत शारंगदेव महोत्सवात ज्यांनी ज्यांनी पार्वती बाऊल या गायिकेचं ‘बाऊल संगीत’ ऐकलं, पाहिलं, अनुभवलं असेल, त्यांना एक वेगळीच अनुभूती आली असेल हे निश्चित. या अनुभवाचं वर्णन करणं खरंच अवघड आहे. सर्वसाधारण अनुभव शब्दांत मांडता येतो, पण असाधारण अनुभवासाठी शब्द कुठून आणायचे?
बाऊल संगीत ही फार जुनी परंपरा आहे. जवळपास हजार वर्षांपासून बंगालमध्ये ती प्रचलित आहे. एक गुढवादी पंथ म्हणून या लोकांना ओळखलं जातं. आज या पंथाचे अतिशय थोडे लोक शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे पार्वती बाऊल. (त्यांची माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे.)
शारंगदेव महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे वातावरण निर्मिती. १३ व्या शतकात शारंगदेवाने देवगिरी किल्ल्याच्या परिसरात ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथाचं लेखन केलं. त्या अनुषंगानं याच परिसरात गेल्या सात वर्षांपासून या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. मंचावर कुठलेही झगझगीत, बटबटीत बॅनर लावले जात नाहीत. पाठीमागच्या काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर कलाकार आपली कला सादर करतो. प्रकाश व ध्वनी व्यवस्था हेही अतिशय नेमकं व साजेसं असतं. कार्यक्रमाच्या पत्रिका आकर्षक व वेगळ्या पद्धतीनं छापलेल्या असतात. कुठलेही कृत्रिम ध्वनी (इलेक्ट्रॉनिक आवाज) संपूर्ण महोत्सवात वापरले जात नाहीत. महागामीच्या आवारात ठायी ठायी कलात्मकता जाणवत राहते. सकाळच्या भाषण सत्राचा कार्यक्रम महागामीच्या छोट्या बैठक सभागृहात होतो. जिथं बसायचा ओदिशाच्या गवती चटया आंथरलेल्या असतात. स्त्रियांसाठी बाहेर मुद्दाम गजरे उपलब्ध करून दिले जातात. जेणे करून त्यांनी ते केसांवर माळावेत. पुरुषांसाठी बाहेर नक्षीदार वाटीत गंध ठेवलेलं असतं. चंदनाचा वास सर्वत्र दरवळत असतो.
जिथं संध्याकाळचा कार्यक्रम होतो, त्या रुक्मिणी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक पणत्या पेटवून सजावट केली असते. फुलांची उधळण तर असतेच. सुंदर पोषाखातील महागामी गुरुकुलाच्या मुली सगळ्यांचे 'नमो नमा:' म्हणून स्वागत करत असतात. जुन्या पोथीचं पान शोभावं असा एक फ्लेक्स प्रवेशद्वारावर लटकलेला असतो. कार्यक्रमाची सुरुवात ‘संगीत रत्नाकर’मधील संस्कृत श्लोकांच्या पठणानं होते.
यामुळे आधीच रसिक एक वेगळ्या मानसिकतेत पोचलेला असतो. त्यात पार्वती बाऊल यांचं सादरीकरण म्हणजे तर... त्यांचा केशरी पोशाख काळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होता. त्यांचं सादरीकरण म्हणजे एकपात्री प्रयोगच. कमरेला बांधलेला तबला (डुग्गी) डाव्या हातानं त्या वाजवत होत्या. ही डुग्गी म्हणजे छोटा तबला. हा मातीचा बनवलेला असतो.
उजव्या हातात या पंथाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असलेली एकतारी. ही एकतारी भोपळ्याचा तुंबा आणि लाकडाची काठी यांपासून बनवली जायची. आता ती लाकूड व बांबूपासून बनवली जाते. त्याची तार ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. जो नाद या एकतारीपासून निर्माण होतो, त्याला ‘अनाहत नाद’ असं संबोधलं जातं. अर्थात तो नाद आपल्याला ऐकू येतो, पण त्याची अनुभूती काहीतरी विलक्षण अशी असते.
पायात नुपूर. आपण सगळ्यांना घुंगरू म्हणूनच ओळखतो. पण त्यांच्या पायात नुपूर होते. त्याचं विश्लेषण त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या भाषण सत्रात सविस्तर सांगितलं. देवाच्या पायातलं हे आभूषण आहे. मयुराचं तोंड असलेलं नागाच्या आकारातील पोकळ कंकण आणि त्याच्या पोटात धातूचे दाणे!
बंगाली भाषेतल्या भक्तीरचना पार्वती बाऊल आपल्या गोड व काहीशा चिरकणाऱ्या आवाजात सादर करत होत्या. हे सादर करताना एका हातानं डुग्गी, तर दुसऱ्या हातानं एकतारी वाजवत होत्या. नाचताना होणारा नुपुरांचा आवाज, मध्येच गिरकी मारून त्या शांत उभ्या राहत…तेव्हा फक्त एकतारीचा नाद सगळ्या आसमंतात घुमत राही. गायन, वादन, नृत्य व चेहऱ्यावरील उत्कट भावाविष्कारानं साधलं जाणारं नाट्य असा तो अदभुत एकपात्री प्रयोग होता. कुमार गंधर्व यांनी सुरात वाजणाऱ्या तंबोऱ्यांचं महत्त्व अनेकदा आपल्या मुलाखतींमधून सांगितलं आहे. पार्वती बाऊल यांच्या एकतारीच्या सुरांत अशीच काहीतरी जादू होती!
बंगालचे सुप्रसिद्ध सुफी संत लालन साई यांची एक रचना त्यांनी सादर केली. याच लालन साईंवर सुनील गंगोपाध्याय यांनी 'मोनेर मानुष' या नावानं एक कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीवर चित्रपट आला असून त्याला राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं आहे. (ही कादंबरी मराठीत अनंत उमरीकर यांनी अनुवादित केली आहे.) हे लालन साई स्वत: मोठे बाऊल गायक होते. त्यांनी हजारभर गीतं गायिली आहेत. पार्वती बाऊल त्याच परंपरेतील. लालन साईंची रचना त्यांच्या तोंडून ऐकणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
किती वेळात संपवायचा आहे कार्यक्रम, असं त्यांनी दहा वाजून गेल्यावर विचारलं. तेव्हा तुमच्या मनाप्रमाणे गात रहा, असं महोत्सवाच्या आयोजिका सुप्रसिद्ध ओडिसी/कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता यांनी सांगताच पार्वती बाऊल यांनी खास ठेवणीतल्या चिजा काढायला सुरवात केली.
पार्वती दत्ता यांनी आपल्याला आमंत्रित केलं, मला इथं स्त्री शक्ती जास्त जाणवत आहे असं म्हणून पार्वती बाऊल यांनी काली दुर्गा यांच्यावरची भक्तिरचना सादर केली. त्यांच्या त्या पायापर्यंत लोंबणाऱ्या लांब लांब जटा. गिरकी घेताना त्यांचा तयार होणारा घेर, त्यांच्या आवाजातील भेदून जाणारी आर्तता यातून कालीचं एक रूपच रसिकांच्या डोळ्यांसमोर प्रकट झालं. आर्त वाटणारा आवाज क्षणात महाकालीच्या सर्वशक्तीमान अशा सामर्थ्याचा आविष्कार दाखवून गेला.
समारोप त्यांनी रास लीलेवरील गीतानं केला. राधा, कृष्ण आणि गोपी यांचे वेगवेगळे आविष्कार दाखवता दाखवता ते सगळेच शेवटी एकरूप कसे होऊन गेले हे व्यक्त करण्याची त्यांची पद्धत फारच विलक्षण होती. एकच व्यक्ती आपल्या समोर राधा आणि कृष्णही उभा करते, त्यांची एकरूपता दाखवते. रास चालू असताना टिपऱ्या चालू आहेत असा एक प्रसंग रंगवायचा होता. मला उत्सुकता होती की, त्या आता नेमकी काय क्लृप्ती वापरतात. हातात तर काठीही नाही. मग टिपऱ्यांचा आवाज कसा निर्माण करायचा? तेव्हा त्यांनी दोन्ही पाय जोडून उंच उडी मारली. हे पाय परत रंगमंचाच्या लाकडी जमिनीवर आदळले, तेव्हा त्यातून टिपऱ्यांचा ध्वनी उमटला. या प्रसंगावर तर टाळ्या वाजवायचंही सुधरलं नाही. त्यांच्या पायातले नुपूर आणि जमिनीवर विशिष्ट पद्धतीनं पाय आपटून टिपऱ्यांचा नाद निर्माण करणारी ही कला कोणत्या श्रेणीची म्हणावी?
आभाळाच्या दिशेनं त्या हात करून तार स्वरात आर्ततेनं देवाला आळवायच्या, तेव्हा असं वाटायचं की, खरंच त्यांना तो तिथं कुठेतरी दिसत असावा. हा स्वर खराच त्याच्यापर्यंत पोचतो आहे. शेवटी शांतपणे त्यांनी सगळी गती थांबवली. सगळ्या हालचाली बंद केल्या. डोळेही बंद केले. उजव्या हातातील एकतारी केवळ वाजत राहिली. ऐकता ऐकता रसिकांना असं वाटत होतं की, आपल्याही शरीरात ही एकतारी वाजत आहे. हा आहत नाद नाही. आता हा ‘अनाहत नाद’ आपल्या आत सुरू झाला आहे. या संगीताची ताकद अशी की, आपल्यालाही तो ऐकू येतो आहे.
महात्मा बसवेश्वरांचं एक कानडी वचन पं. मल्लिकार्जून मन्सूर गायचे. त्याचा मराठी भावानुवाद असा -
मस्तक भोपळा।शीरा जणू तारा।दांडी या शरीरा।बनव गा॥
बोटांनी छेडीत।अशी एकतारी।लावूनिया उरी।गा तू देवा॥
पार्वती बाऊल यांच्या एकतारीचा आवाज कानात घुमत असताना अशीच भावना प्रत्येक रसिकांची झाली होती.
लेखक जनशक्ती वाचक चळवळ (औरंगाबाद) या प्रकाशनसंस्थेचे संचालक आहेत.
shri.umrikar@gmail.com