उरूस, पुण्यनगरी, 5 सप्टेंबर 2016
ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली 27 वर्षे औरंगाबाद मध्ये ‘बी. रघुनाथ स्मृतिसंध्या’चे आयोजन करण्यात येते. परभणी शहरातही बी. रघुनाथ यांच्यास स्मृतिप्रित्यर्थ गेली 14 वर्षे ‘बी. रघुनाथ महोत्सव’ भरविल्या जातो आहे. या निमित्ताने सहजच एक प्रश्न समोर उभा राहतो आहे. आजकाल साहित्य संमेलनांचे जे स्वरूप बदलले आहे. त्याला राजकिय शक्तीचे प्रचंड पाठबळ अनिवार्य वाटते आहे. ते तसे योग्य आहे का सामान्य रसिकांनी जपलेले साधेपणातले, सुटसुटीत साहित्य सोहळे योग्य आहेत?
नुकतेच जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोथरूडला संपन्न झाले त्याचा खर्च जवळपास 12 कोटी रूपये झाला. आयोजकांनी शासनाचे 25 लाख रूपये साहित्य महामंडळाच्या तोंडावर फेकत हिशोब मागण्याचा तूम्हाला अधिकारच काय असे खडसावले. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण आहे? हा प्रश्न पत्रकारांनी आलेल्या रसिकांना विचारला तर त्याला नावही सांगता आले नाही. पण तेच स्वागताध्यक्ष कोण हे विचारले तर चटकन सांगता आले. कारण सरळ आहे तशी प्रचंड प्रमाणात जाहिरातच केली गेली होती. याच आयोजक संस्थेवर काही दिवसांतच आयकर विभागाच्या धाडी पडल्या.
ज्या पद्धतीने संपत्तीचे प्रदर्शन या संमेलनात झाले त्यावरून गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. की साहित्य सोहळे हे असे आयोजित केले जावेत का? की ज्यातून संपत्तीचे/ सत्तेचे केवळ हिडीस प्रदर्शनच जाणवते आणि साहित्य केविलवाणे होवून कोपर्यात जावून बसते.
याच्या उलट बी. रघुनथा महोत्सवाचे आहे. बी. रघुनाथ सारखा एक लेखक वयाच्या चाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने मृत्यूमुखी पडला. त्याच्या मागे कुठलीही संपत्ती नव्हती. कुठल्याही राजकीय नेत्याशी/पक्षाशी हा साहित्यीक संबंधीत नव्हता. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ सामान्य रसिकांनी एकत्र येवून काही एक वाङ्मयीन उपक्रमांची परंपरा निर्माण केली . बी. रघुनाथ यांच्या मृत्युनंतर चारच वर्षात 1957 मध्ये एक छोटेसे सभागृह स्वयंसेवी संस्थेने उभारले. पुढे परभणीला अखिल भारतीय साहित्य संमेलन 1995 मध्ये कवी नारायण सुर्वे यांच्या अध्यक्ष्यतेखाली संपन्न झाले. त्या संमेलनात बी. रघुनाथ यांचे समग्र वाङ्मय कवी इंद्रजीत भालेराव आणि श्रीकांत उमरीकर यांनी संपादित करून प्रसिद्ध केले. म्हणजे लेखकाच्या स्मृतित स्मारक केले, त्याची पुस्तके प्रकाशीत केली. पुढे तीन वर्षांनी या समग्र साहित्यावर मान्यवर समिक्षकांना आमंत्रित करून परिसंवाद घेतला. त्याचे पुस्तकही प्रकाशीत केले.
परभणीकर रसिकांनी पाठपुरावा करून वैधानिक विकास मंडळाकडून 66 लाखाचा निधी मिळवला. आमदार निधी व स्थानिक निधी असे एक कोटी रूपयांचे भव्य देखणे स्मारक या लेखकाच्या स्मृतित 2002 साली उभारले. 2003 साला पासुन बी. रघुनाथ महोत्सव साजरा होतो आहे. हा महोत्सव 115 वर्षांची जुनी परंपरा लाभलेल्या गणेश वाचनालय या संस्थेच्या सभागृहात भरतो. साहित्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने गोळा होतात. औपचारिकतेचे फारसे अवडंबर न माजवता साधेपणाने चार दिवस साहित्य संगीताची, विचारांची मेजवानी रसिकांना मिळते.
असे लहान साहित्य सोहळे हवे आहेत की भव्य सत्ता/संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करणारे साहित्य सोहळे हवे आहेत?
नेहमी असा प्रश्न विचारला जातो की मोठ्या सोहळ्यांना किमान खर्च होतो. तो कुणी करायचा? त्याचेही एक वेगळे उत्तर औरंगाबादच्या ‘बी. रघुनाथ स्मृतीसंध्या’ या उपक्रमाने दिले आहे. बियाणे क्षेत्रात काम करणार्या नाथ उद्योग समुहाने या उपक्रमाचे प्रायोजकत्व स्विकारले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यात मदत करते आहे. आणि परिवर्तन सारखी साहित्यीक नाट्यप्रेमी वाचक रसिकांची संस्था या सगळ्या सोहळ्याची साहित्यीक बाजू सांभाळते आहे.
म्हणजे परभणीच्या सामान्य रसिकांनी ग्रंथालयाच्या आधारने स्विकारलेले एक प्रारूप आणि रसिक कलाकारांच्या परिवर्तन संस्थेने उद्योग समुहाला हाताशी धरून सिद्ध केले औरंगाबादचे दुसरे प्रारूप (मॉडेल) अशी दोन उदाहरणं आपल्या समोर आहेत.
प्रचंड प्रमाणात उधळपट्टी करणार्या साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून ही दोन प्रातिनिधीक उदाहरणं समोर आहेत. महाराष्ट्रभर असे कितीतरी छोटे मोठे साहित्यीक सांस्कृतिक उपक्रम विविध संस्था घेत आहेत. अगदी तालुकाही नसलेल्या उंडणगाव सारख्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठ्यांच्या डोंगर रांगांतील रम्य गावात गेली 33 वर्षे गणपतीच्या काळात व्याख्यानमाला चालविली जाते. यात कविसंमेलनाचा आवर्जून समावेश असतो. मराठीतील कितीतरी नामवंत कवी या छोट्या गावात येवून गेले आहेत. याच गावाने 2008 मध्ये रसिकांच्या भरगच्च गर्दीत मराठवाडा साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवले होते.
म्हणजे औरंगाबाद सारखे महानगर, परभणी सारखे जिल्ह्याचे ठिकाण किंवा उंडणगावसारखे खेडे साहित्यीक उपक्रम आपल्या आपल्या परीने राबवून सांस्कृतिक वातावरण कायम ठेवण्यासाठी झटत आहेत. यांनी निधी उभारणी साठी आपल्या आपल्या पातळीवर प्रयत्न करून उत्तरं शोधली आहेत. आपल्या आपल्या पद्धतीनं आयोजनात येणारे अडथळे दूर केले आहेत.
महाराष्ट्रभर विविध महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक ग्रंथालये, साहित्यीक-सांस्कृतिक संस्था यांना हाताशी धरून प्रत्येक तालुक्याला किमान एक अशी 500 साहित्यीक-सांस्कृतिक केंद्र विकसित करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करावे लागतील. यासाठी त्या त्या ठिकाणचे ‘अ’ अथवा ‘ब’ वर्गाचे सार्वजनिक ग्रंथालय हाताशी धरता येईल. अशा सगळ्या सांस्कृतिक केंद्रांचा समन्वय साधण्याचे काम अखिल भारतीय साहित्य महामंडळाला करावे लागेल. आणि या सगळ्या केंद्रांचे एक वार्षिक अथवा द्वैवार्षिक अधिवेशन म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे करावे लागेल.
महाराष्ट्र शासन दर वर्षी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथ महोत्सव’ भरवित आहे. त्याचे नियोजन चुकीच्या तारखा आणि गैरसोयीचे ठिकाण यामूळे मातीमोल ठरत आहे. मराठी प्रकाशकांची परिषद, राज्य ग्रंथालय संघ आणि साहित्य महामंडळ यांनी मिळून प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी, इतर साहित्यीक सांस्कृतिक संस्था यांना हाताशी धरून हा ग्रंथ महोत्सव व्यापक केला पाहिजे.
आणि दर वर्षी एक राज्य पातळीवरचा ग्रंथ महोत्सव साहित्य संमेलनाला जोडून भरविला गेला पाहिजे. म्हणजे तीन दिवसांचे साहित्य संमेलन, त्याला जोडून एक दिवस प्रकाशकांचे वार्षिक अधिवेशन, एक दिवस ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन असे किमान पाच दिवस भव्य ‘माय मराठी महोत्सव’ आयोजित केला गेला जावा. किंवा अजून दोन दिवस स्थानिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या संस्थांना हातशी धरून ‘लोक कला महोत्सव’ भरवावा. असा एक भव्य 7 दिवसांचा सप्ताह साजरा होवू शकतो. याला जोडून अर्थातच भव्य ग्रंथ प्रदर्शन रसिकांसाठी भरविले जावे.
पंढरपुरच्या विठ्ठलावर बहिणाबाईंनी जी कविता लिहीली आहे ती इथे चपखल लागू पडते.
सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्याचा विठोबा
पानाफुलातच राजी
तेंव्हा साधेपणानं आपल्या साहित्य पंढरीची ‘आषाढी वारी’ आपण करू. झगमगाटाला बळी न पडता साहित्याशी निष्ठा बाळगण्याची आठवण म्हणून ‘तुळशीची माळ’ गळ्यात घालू. उधळपट्टीची ‘मांस मच्छी’ वर्ज्य करून साधे आयोजन करू. साध्या माणसाच्या हृदयी सच्ची रसिकता आहे हे ओळखून त्याला नमन करू.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575