पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला काही ठराविकच गाणी आपल्या कानावर पडतात. लता मंगेशकर-सी. रामचंद्र यांचे अजरामर गाणे ‘ए मेरे वतन के लोगो’, लताच्याच आवाजातील ‘सारे जहां से अच्छा’, नया दौर मधील ‘ये देश है वीर जवानों का’, लिडर मधील ‘अपनी आझादी को हम हरगीज मिटा सकते नही’, उपकार मधील, ‘मेरे देश की धरती’, काबुलीवाला मधील ‘ए मेरे प्यारे वतन’, सन ऑफ इंडियातील ‘नन्हा मुन्ना राही हू’, बुट पॉलिश मधील ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है’, सरदार भगतसिंग मधील ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘सरफरोशी की तमन्ना’, हकिकत मधील 'अब तूम्हारे हवाले वतन साथियो', शहीद मधील ‘ए वतन ए वतन’ शिवाय जागृती चित्रपटातील तर सगळीच गाणी ‘आओ बच्चो तुम्हे दिखाये झाकि हिंदुस्तान की’,‘दे दी हमे आझादी’ सारखी आपल्या कानावर पडत राहतात.
मात्र या शिवाय हिंदी चित्रपटात देशभक्तीपर अजून काही अतिशय चांगली, गोड, श्रवणीय गाणी आहेत हे जवळपास विस्मरणात गेले आहे. मराठी संगीतकारांनी हिंदी चित्रपटांमध्ये अतिशय चांगली देशभक्तीपर गाणी दिली आहेत. ज्या सी. रामचंद्र यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे हिट गाणे दिले त्यांनीच 1955 मध्ये ‘इन्सानियत’ या चित्रपटात एक देशभक्तीपर गाणे दिले आहे. देव आनंद आणि दिलीपकुमार अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट. राजेंद्रकृष्ण यांनी या चित्रपटात
जूल्म सहे ना, जूल्म करे ना,
यही हमारा नारा है
रहे चैन से सभी देश
हमे अपना देश प्यारा है
अशी साधी सोपी शब्दकळा लिहीली आहे. लाठ्या काठ्या आणि तलवारींचे खेळ करणारे तरूण-तरूणी, घोड्यावर बसलेला देवआनंद आणि कदमताल करत जमिनीवरती दिलीपकुमार सोबत बीना रॉय. लता मंगेशकर आणि महोम्मद रफी यांच्या आवाजात हे गाणे आहे. याच सी. रामचंद्र यांनी ‘26 जानेवारी’ या चित्रपटात लताच्या आवाजात एक अतिशय वेगळे देशभक्तीचे गाणे दिले आहे. ‘सोने की जहा धरती, चांदी का गगन है, वो मेरा वतन मेरा वतन मेरा वतन है’. या गाण्यात कुठेही एरव्ही देशभक्तीपर गीतात वापरतात तसा मार्चिंगचा ठेका नाही. शिवाय शब्दही राजेंद्रकृष्ण यांनी अतिशय वेगळे लिहीले आहेत. ‘हर लहर यहां गीत है, हर मौज है संगीत । इस दुनिया की जो रीत है, कहते है उसे प्रीत । जर्रा भी जहा फुल है, सेहरा भी चमन है । वो मेरा वतन है ।’
सी.रामचंद्र यांनी अजून एका चित्रपटात ‘तलाक’ (1958) मन्ना डेच्या आवाजात कवी प्रदीप यांच्या शब्दांना देशभक्ती संगीताचा साज चढवला आहे. देशभक्तीपर गीते म्हणजे तर कवी प्रदीप यांचा हातखंडाच. या गाण्यात कश्मीरचा उल्लेख असल्याने आजही हे गाणे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहते. त्याचे शब्दही प्रदीप यांनी त्यांच्या नेहमीच्या ढंगात जोशात लिहीले आहेत. मन्ना डे च्या शांत पण ठाम स्वरात हे गाणं सजले आहे. गाण्याची सुरवातच बिगुलच्या सुरांनी होती. ‘कहनी है इक बात हमे इस देश के पेहरेदारोंसे, सम्भल के रहना अपने घर मे घुसे हुये गद्दारों से.’ असे ते शब्द आहेत. याच गाण्यात पुढे ‘झांक रहे है अपने दुष्मन अपनीही दिवारोंसे’ ही ओळ आहे. आजच्या कश्मीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आजही हे गाणे ताजे वाटते.
‘सारे जहां से अच्छा’ हे गाणं लता मंगेशकरच्या आवाजात नेहमी आपल्या कानावर पडतं. पण याच गाण्याला एन. दत्ता (दत्ता नाईक) या गुणी मराठी संगीतकाराने अतिशय गोड अशी वेगळी चाल आशा भोसलेच्या आवाजात लावली आहे. भाई बहन (1959) चित्रपटात हे गाणं आहे. ‘विरान कर दिया था, आंधी ने इस चमन को । दे कर लहू बचाया, गांधी ने इस चमन को ॥ असे सुंदर शब्द राजा मेहदी अली खां यांनी मूळ गीतात बदल करून वापरले आहेत.
याच एन. दत्ता याने दीदी (1959) चित्रपटात साहिर चे छानसे देशभक्तीपर गीत दिले आहे. ‘बच्चो तूम तकदीर हो, कल के हिंदोस्तान की, बापु के वरदान की, नेहरू के आरमान की’. साहिर जसे अवघड उर्दू शब्द वापरायचा तशी त्याची लेखणी मुलांसाठी लिहीताना किती सोपी व्हायची हे या गाण्यातून लक्षात येते. याच चित्रपटात लहान मुलांच्या तोंडी एक गाणं आहे ‘हमने सुना था एक है भारत’ असं मुलं शिक्षकाला विचारत आहेत. मग हा जो भेदभाव आम्हाला दिसतो आहे तो का आहे? त्याला शिक्षक उत्तर देतात असं ते गाणं आहे. ‘सदियों तक अपनों पे रही है हुकूमत बच्चों गैरों की, अभी तलक हम सबके मुह पर धूल है उनके पैरों की’ अशी एक साधीच पण विलक्षण ओळ या गाण्यात साहिरने लिहीली आहे. पुढे धर्मपुत्र (1962) चित्रपटातही एन.दत्ता-साहिर या जोडीने देशभक्तीचे गाणे दिले आहे. ‘जय जननी जय भारत मां’ असे शब्द लिहीताना साहिरला कुठेही त्याचा धर्म आड आला नव्हता. आज जर साहिरने हे गाणे लिहीले असते तर फुकटचे वादंग उठले असते.
‘अब दिल्ली दूर नही’ (1957) या चित्रपटाला दत्तराम वाडकर या मराठी माणसाचे संगीत होते. दत्तराम त्यांच्या तबल्याच्या ठेक्यासाठी अतिशय प्रसिद्ध होते. आशा आणि गीताच्या आवाजात हे देशभक्तीपर गीत ‘ये चमन हमारा अपना है’ यात आहे. ‘मत कहो के सर पे टोपी है, कहो सर पे हमारे ताज है’ या सारख्या ओळी शैलेंद्रलाच सुचू शकतात. शैलेंद्र तसा डाव्या विचारांचा. पण गांधींच्या प्रभावातून तेंव्हा कुणीच सुटू शकले नाही. गांधी टोपी म्हणजे जणू काही राज मुकूटच असं समजलं जायचं. चित्रपटात मात्र गांधी टोपी न दाखवता दिग्दर्शकाने जरीची टोपी दाखवली आहे. त्याला शैलेंद्रच्या शब्दांचे मर्म कळालं नसावं.
हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिभाशाली मराठी संगीतकार म्हणजे वसंत देसाई. सी.रामचंद्र, दत्तराम वाडकर, एन.दत्ता यांच्या रांगेतच या मराठी संगीतकाराने एक अतिशय अनोखे देशभक्तीपर गीत ‘प्यार की प्यास’ (1961) या चित्रपटात दिले आहे. देशाची एकात्मता सांगताना विविध प्रांतातील अभिमानाचे विषय काय असावेत? वसंत देसाई यांनी विविध प्रांतातील संगीतच वापरून अतिशय सुरेश श्रवणीय असे देशभक्तीपर गाणे संगीतबद्ध केले आहे. लता-गीता-मन्ना डे यांच्या स्वरांनी हे गाणे सजलेले आहे. एक अतिशय छोटा मुलगा ‘बोलो वो है किसका देश?’ असा प्रश्न आपल्या कोवळ्या गोड स्वरात विचारतो आणि प्रत्येक प्रांतातील लोक त्याला आपल्या आपल्या संगीतातून उत्तर देतात. वसंत देसाई यांच्या स्वरांवर भरत व्यास यांनी विविध भाषांत शब्द लिहून मोठीच किमया साधली आहे. पूर्वेचे प्रतिनिधीत्व करताना ‘आमार शोनार बांगला देश’ म्हणत बांगला लोक संगीताचा वापर केला आहे. यासाठी गीता दत्तचा आवाज वापरला आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ म्हणत पोवाडा आणि लावणीचा वापर केला आहे. राजस्थानच्या लोकसंगीतावर वसंत देसाई यांचा विशेष जीव. दो आंखे बारा हाथ मध्ये त्यांनी ज्या कोका वाद्याचा वापर केला होता तेच वाद्य या गीतात ‘म्हारो देश मारवाड’ असे शब्द संगीतबद्ध करताना वापरले आहे. गुजराथी गरब्याची पारंपरिक चाल जी आहे ती जास्तच लडिवाळ आहे. आणि शब्दही ‘हो जी रे म्हारो रडियाळो देश गुजरात’ असे भरत व्यासांनी वापरले आहेत. भांगड्याचा रांगडा आविष्कार दाखवताना नेहमीच ठेक्याच्या धिंगाण्यात त्या संगीताचा गोडवाच हरवून जातो. वसंत देसाई यांनी ‘साडा देश पंजाब, खिलीया फुल गुलाब’ ही हळूवार रचनाही त्याच भांगड्याच्या ठेक्यात बसवून गोडवा हरवू न देण्याची किमया साधली आहे. दक्षिणेच्या संगीताचे प्रतिनिधीत्व म्हणून भरत नाट्यमचा अप्रतिम तुकडा वापरला आहे. (पुढे हीच संकल्पना मिले सूर मेरा तूम्हारा मध्ये वापरली. पण त्यात शब्द विविध भाषेचे वापरले पण संगीत नाही तसं वापरता आले.)
स्वातंत्र्यानंतर जवळपास 20 वर्षे चित्रपटांमधून देशभक्तीपर गीते आढळून यायची. 1966 पर्यंत तर ही गीतं ठळकपणे दिसतात. त्यांना प्रचंड लोकप्रियताही मिळाली. नंतर चित्रपटात देशासाठी लढणे आणि देशभक्तीपर गाणे मागेच पडले. सगळी शक्ती अंतर्गत लढाईतच संपायला लागली.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
(लेखात उल्लेख केलेल्या गाण्यांच्या लिंक)
http://www.hindigeetmala.net/song/zulm_sahe_na_zulm_kare_na_yahi.htm
http://www.hindigeetmala.net/song/bigul_baj_rahaa_aazaadi_kaa.htm
http://www.hindigeetmala.net/song/saare_jahan_se_achha_hindustan_hamara.htm
http://www.hindigeetmala.net/song/humne_suna_tha_ek_hai_bharat.htm
http://www.hindigeetmala.net/song/bagaawat_kaa_jay_janani_jay.htm
http://www.hindigeetmala.net/song/yeh_chaman_hamara_apna_hai.htm
http://www.hindigeetmala.net/song/bolo_woh_hai_kiska_desh.htm
(लेखात उल्लेख केलेल्या गाण्यांच्या लिंक)
http://www.hindigeetmala.net/song/zulm_sahe_na_zulm_kare_na_yahi.htm
http://www.hindigeetmala.net/song/bigul_baj_rahaa_aazaadi_kaa.htm
http://www.hindigeetmala.net/song/saare_jahan_se_achha_hindustan_hamara.htm
http://www.hindigeetmala.net/song/humne_suna_tha_ek_hai_bharat.htm
http://www.hindigeetmala.net/song/bagaawat_kaa_jay_janani_jay.htm
http://www.hindigeetmala.net/song/yeh_chaman_hamara_apna_hai.htm
http://www.hindigeetmala.net/song/bolo_woh_hai_kiska_desh.htm