उरूस, दै. पुण्यनगरी, 9 मे 2016
लेखाचे शिर्षक वाचून मार्क्सविरोधी, कम्युनिस्ट विरोधी कुणाला आनंद हाईल. पण त्यासाठी हे शिर्षक दिलेले नाही. औरंगाबाद शहरात कार्ल मार्क्सची 198 जयंती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा 90 वा वर्धापन दिन असा कार्यक्रम झाला. डाव्या चळवळीत नेहमी ऐकायला येतात तशी जोशपूर्ण गाणीही सादर झाली. पण समोर लोकंच उपस्थित नव्हते. तेंव्हा हा प्रश्न पडला की 198 व्या जयंतीला 198 ही लोक का नाहीत? आणि ही टीका मार्क्सवाद्यांवर नाही. त्यांच्याकडे एक बोट दाखविताना बाकी चार बोटं आपल्याकडेच येतात याची आम्हाला जाणीव आहे.
दोन मुद्दे आम्हाला अतिशय गंभिरपण जाणवतात.
एक म्हणजे वैचारिक स्वरूपाच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रात (भारतात किंवा जगात काय घडते त्याचा विचार इथे केला नाही.) लोक का येत नाहीत? त्यातही परत तरूण का उपस्थित रहात नाहीत? कुठलंही व्याख्यान असेल तर लोक जमवणं कठीण जातं असं संयोजक सांगतात. हे खरं आहे का? आमच्या मते हे अर्धसत्य आहे. ज्या सभागृहात औरंगाबादला हा कार्यक्रम झाला त्याच सभागृहात काही महिन्यांपूर्वी शेषराव मोरे यांची प्रकट मुलाखत झाली होती. त्याला लोकांनी प्रचंड (सभागृहाच्या मानाने) गर्दी केली होती. त्याच सभागृहात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना अनंत भालेराव पुरस्कार प्रदान करण्यात आला सहा महिन्यांपूर्वी. त्याहीवेळेस सभागृह पूर्ण भरले होते. गुढी पाडव्याच्या दिवशी भालचंद्र नेमाडे यांचे भाषण याच सभागृहात झाले. तेंव्हाही सभागृह भरले होते. (अर्थात नेमाडे त्यांच्या चित्र विचित्र विधानांमुळे ते गर्दी खेचतात ही बाब अलाहिदा!) हा रोख केवळ डाव्यांवर नाही. डाव्यांनी चालविलेल्या ए.आय.बी.इ.ए. या बँक कर्मचार्यांच्या संघटनेने आयोजित केलेल्या प्रशांत भुषण यांच्या "बँकांची बुडीत कर्जे" या विषयावरील भाषणाला याही पेक्षा मोठ्या सभागृहात लोकांनी प्रचंड गर्दी केली. म्हणजे वैचारिक कार्यक्रमांना गर्दी होत नाही हे पूर्णत: खरे नाही.
वैचारिक कार्यक्रमांसाठी तरूणांपर्यंत पोचणे आणि त्यांना खिळवून ठेवू शकेल अशी सोप्या पण ओघवत्या शैलीत मांडणी करणे आवश्यक आहे. शिवाय विषय चालू काळातील समस्यांच्या संदर्भात असावयाला हवा. मार्क्स जयंतीचा निरोप लोकांपर्यंत तरूणांपर्यंत योग्य रितीने गेला नाही शिवाय विषय त्यांना भावणारा वाटला नाही असा निष्कर्ष निघतो. याच कार्यक्रमात वक्त्यांनी परत परत केलेल्या कन्हैया कुमारच्या उल्लेखाने जे काही थोडेफार विचार ऐकू इच्छिणारे श्रोते आले होते ते चकितच झाले. वैचारिक अतिशय समृद्ध अशी परंपरा असणार्या कम्युनिस्टांना कन्हैय्यासारख्या उठवळ पोरांचा आधार वाटावा हा मार्क्सचा फारच मोठा पराभव आहे.
वैचारिक मतभेद असू शकतात. पण वेगळ्या विचारांच्या कार्यक्रमांना हजरच रहायचे नाही हे मोठे गंभिर आहे. हे महाराष्ट्राच्या उदारमतवादी परंपरेत बसत नाही. डाव्या विचारांच्या कार्यक्रमांना लोक येत नाहीत या संदर्भात एक चांगले विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी याच औरंगाबाद शहरात नुकतेच केले आहे. सध्या भारतीय समाजात जो मध्यम वर्ग तयार झाला आहे त्याची संख्या 36 कोटी आहे. अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी आहे. त्यातील 40 टक्के सामान्य व हालाखीच्या परिस्थितील लोक वजा केले तर ही संख्या 18 कोटी होते. म्हणजे अमेरिकेत जितका उपयुक्त ग्राहक वर्ग त्याच्या दुप्पट संख्या आजच भारतात आहे. हा वर्ग पूर्णत: स्वमग्न झाला आहे. आणि हा खरा डाव्या चळवळीला धोका आहे असे कुमार केतकर यांनी मांडले.
जो मध्यमवर्ग मोठ्यासंख्येने डाव्यांसोबत होता तो आता दूर गेलाय. बाकी जो कामगार वर्ग होता तोही हक्कासाठी लढणारा न उरता स्वताच्या पगारापुरता उरला. कामगारांमधील केवळ 8 टक्के इतक्याच नोकरदारांच्या संघटना कम्युनिस्टांना बांधता आल्या. शिल्लक बहुतांश असंघटित स्वरूपातील कामगारांपर्यंत त्यांना अजूनही आपली चळवळ नेता आलेली नाही. हेही याचे कारण असावे.
दूसरा जो मुद्दा आम्हाला विचारार्थ ठेवावा वाटतो तो अतिशय वेगळा आहे. सध्याच्या काळात मार्क्सवादी विचारधारेची उपयुक्तता कितपत शिल्लक आहे? हा प्रश्नही आम्ही मार्क्सवाद्यांना नाही तर इतरांना करतो आहोत. शेतकरी, दलित आणि स्त्रिया या तीन वर्गांबाबत कम्युनिस्ट उदासीन राहिले. ही उदासीनता नविन काळात जास्तच जाणवते.
मार्क्सने असा सिद्धांत मांडला की श्रमिकांचे शोषण करून कारखानदार नफा कमावतो. एक साधी मांडणी या संदर्भात शेतकरी चळवळीने केली. जेंव्हा कारखाना उभा राहतो तेंव्हा तर कामगार नसतो. मग हा कारखाना कुणाचे शोषण करून उभा राहतो? पहिल्यांदा शोषण शेतकर्याचे होते. कच्च्या मालाचे भाव कमी राहतील हे पाहिले जाते. मगच त्यावर कारखानदारी उभी राहते. मग मार्क्स शेतकर्यांबाबत का काही बोलत नाही? लेनिन च्या रशियात तर दीड कोटी शेतकरी रणगाडे घालून मारले गेले. साहजिकच शेतकरी वर्ग या विचारधारेपासून दूरावला. आजही तो त्यांच्या जवळ जायला तयार नाही.
दुसरा वर्ग होता दलितांचा. वर्ग लढ्यावर लक्ष केंद्रित करणार्या मार्क्सवाद्यांना आणि समाजवाद्यांना आंबेडकरांची वर्णलढ्याची तळमळ समजली नाही. नामदेव ढसाळांनी कम्युनिस्टांच्या दलित प्रश्नाच्या आकलनाच्या मर्यादा स्पष्टपणे आपल्या पुस्तकात मांडल्या आहेत. (आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट)
तिसरा वर्ग होता स्त्रियांचा. मार्क्सला समाजाची विभागणी ‘आहे रे’ आणि ‘नाहि रे’ अशा दोनच वर्गात करणे सोयीचे वाटले. स्त्री-पुरूष भेदाबाबत मार्क्सवादी बोलतच नाहित. स्त्रियांनी चूल-मूल यात लक्ष घालावे आणि पुरूषांनी बाहेरची कामे करावीत ही विभागणी जीवशास्त्रीय कारणामुळे आहे असे एंगल्सने सांगितले. ही मांडणी काळाने खोटी ठरवली. सार्वजनिक स्वयंपाकघरे उघडली किंवा पाळणाघरे निर्माण झाली की स्त्री प्रश्न संपला इतका ढोबळपणा कम्युनिस्टांकडे होता.
शेतकरी, दलित आणि स्त्रीया हे तिघेही उत्पादक- कष्टकरी वर्गात मोडतात. हे सगळे असंघटित आहेत. त्यांच्याकडे कम्युनिस्टांनी लक्ष पुरवले नाही.
भारतातील दलित किंवा इतर मागास वर्गीय हे पारंपरिकदृष्ट्या सेवा क्षेत्रात हजारो वर्षांपासून कार्यरत होते. सध्या सेवा व्यवसायाला बरकतीचे सोन्याचे दिवस आले आहेत. स्त्रियांवरची कृत्रिम बंधने तंत्रज्ञानाने कमी/ हलकी झाली. गर्भनिरोधकांमुळे सक्तीच्या लादल्या जाणार्या मातृत्वापासून बर्याच मोठ्या प्रमाणात स्त्रीची सुटका झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात लक्षणीय वाढ करता येते हे बीटी कापसाच्या उदाहरणाने शेतकर्यांनी दाखवून दिले. आयातदार असलेला भारत देश कापसाच्या बाबतीत केवळ बीटी मुळे एक नंबरचा निर्यातदार बनला.
म्हणजे सद्य काळात उद्योजक, कल्पक, उत्पादक असलेल्या दलित/मागासवर्गीय, स्त्रिया आणि शेतकरी या तिनही घटकांना संधी उपलब्ध झाल्या आहेत. आणि यांच्याकडे कम्युनिस्टांनी कायम दूर्लक्ष केले किंवा यांच्या मार्गात अडथळे तरी आणले. आज डाव्यांच्या फुकट वाटपाच्या बाजूने सध्याचे उजव्यांचे सरकारही बर्याचदा दिसून येते आहे. जेंव्हा डाव्यांचा सरकारशाही प्रबळ करण्याचा अजेंडा कॉंग्रेसने चोरला राबविला. तेंव्हा डावे प्रभावहीन झाले. कालांतराने कॉंग्रसचाही जोर ओसरला. मनरेगा, फुकट धान्य वाटणे, भावांवर नियंत्रण आणणे, जीवनावश्यक वस्तू कायदा, जमीन धारणा कायदा, कालबाह्य कामगार कायदे राबविणे, वेतन आयोगाच बोजा वाढविणे असले डाव्यांचे कळकट कार्यक्रम उजव्यांनी राबवले तर तेही काळाच्या ओघात संपून जातील.
मार्क्स हा जगावर प्रभाव दाखविणारा महामानव होता यात काही शंकाच नाही. त्याच्या विचारांची दखल घेतल्या शिवाय जग पुढे जावूच शकत नाही. मार्क्स समजून घेतल्या शिवाय मार्क्सच्या विचारांची मर्यादा लक्षात येत नाही. म्हणून हा खटाटोप मार्क्सच्यावाद्यांसाठी नसून ज्यांना मार्क्स आपला वाटत नाही किंवा अकाराण त्याचा द्वेष/विरोध केला जातो त्यांच्या साठी आहे. मार्क्सवाद्यांना खुद्द मार्क्सही परत जन्मला तर तोही काही समजावून सांगू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी हे कदापिही नाही.
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.