उरूस, पुण्यनगरी, 22 फेब्रुवारी 2016
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेली 5 वर्षे जिल्ह्या जिल्ह्यात ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. सुरवातीला हा ग्रंथ महोत्सव माहिती विभागा मार्फत आयोजित केला गेला. गेली दोन वर्षे ग्रंथालय संचालनालयाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एक अतिशय सकारात्मक गोष्ट म्हणजे जिल्हा ग्रंथालय संघाला व प्रकाशकांच्या प्रतिनिधींना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
मराठी पुस्तके सर्वदूर पोचत नाहीत ही तक्रार नेहमी केली जाते. ती पुष्कळशी खरीही आहे. गेली कित्येक वर्षे पुण्या-मुंबईच्या बाहेर मराठी पुस्तकांची बाजारपेठ आपण विकसित करून शकलो नाहीत. जेंव्हा जेंव्हा पुण्या मुंबई परिसराबाहेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होते त्या त्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनास मोठा प्रतिसाद लाभतो. कारण सध्या पुस्तके पुण्यात आणि वाचक सर्वदूर महाराष्ट्रात असा विरोधाभास पहावयास मिळतो. हा असमतोल दूर करावयाचा असेल तर पुस्तके दूर दूरपर्यंत पोचवली पाहिजेत यात काही वादच नाही.
हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने जिल्हा ग्रंथ महोत्सव ही चांगली योजना सुरू केली. तिला छोट्या गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे असे चित्र महाराष्ट्रात सर्वत्र आहे. हे ग्रंथमहोत्सवाचे पाचवे वर्षे. आता काही बदल या महोत्सवात अपेक्षीत आहेत. ते झाले तर अतिशय चांगला परिणाम दिसेल.
पहिली गोष्ट म्हणजे या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तिन महिन्यातच झालेले योग्य. फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी बारावीच्या परिक्षा सुरू होतात. शैक्षणिक संस्थांमध्ये परिक्षांची घाई असल्याने त्यांचे सहकार्य मिळू शकत नाही. शिवाय पालकही या काळात पुस्तकांच्या खरेदीसाठी अनुकूलता दाखवित नाहीत. तेच जर हा महोत्सव दिवाळीच्या मागेपुढे आखल्या गेल्या तर त्याची उपयुक्तता वाढेल. 14 नोव्हेंबर या बालदिनाला जोडून नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने बाल पुस्तक सप्ताह साजरा केला जातो. त्यासाठी विशिष्ट निधी त्या संस्थेकडे राखिव ठेवलेला असतो. महाराष्ट्रात शाळांमध्ये जिल्हा ग्रंथ महोत्सव या बालदिनाला जोडून घेतल्यास त्याचा उपयोग होवू शकेल.
तसेच स्थानिक पातळीवरील साहित्य संस्थांचा सहभाग यात वाढविला पाहिजे. जिल्हा साहित्य संमेलने, विभागीय साहित्य संमेलने, प्रकाशक परिषदांची अधिवेशने, जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक अधिवेशने, विभागीय अधिवेशने आदी कार्यक्रम जर या ग्रंथ महोत्सवाला जोडून घेतले तर त्याचा फायदा त्या त्या संस्थांना होईल शिवाय लोकांचा सहभाग वाढून ग्रंथ महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळू शकेल.
महाराष्ट्रात 12 हजार सार्वजनिक वाचनालये आहेत. त्यांचा या ग्रंथ महोत्सवात सक्रिय सहभाग वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद या विभागीय पातळीवर काम करणार्या साहित्य संस्था आहेत. त्यांच्या सर्वांच्या मिळून एकत्र विचार केला तर किमान 100 शाखा महाराष्ट्रात सक्रियपणे चालू आहेत. यांचा सहभाग या ग्रंथमहोत्सवात आवश्यक आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे या ग्रंथ महोत्सवाच्या तारखा ठरविताना विभाग म्हणजे एक एकक गृहीत धरून नियोजन करण्यात यावे. उदा. मराठवाडा विभागात आठ जिल्हे आहेत. तेंव्हा या आठ जिल्ह्यात ग्रंथ महोत्सवाच्या तारखा ठरविताना एकाच वेळी दोन किंवा तिन जिल्ह्यांमध्ये ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात येवू नये. त्याचे साधे कारण म्हणजे या ग्रंथ महोत्सवाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात ग्रंथ पोचावेत हा आहे. त्यासाठी ग्रंथ विक्री करणार्या विक्रेत्यांनी/प्रकाशकांनी आपली आपली ग्रंथ दालनं (स्टॉल्स) उभारले पाहिजेत. छोट्या गावांमध्ये विक्रेते नाहीत. ज्या वेळी ग्रंथ महोत्सव भरविला जातो त्यावेळी बाहेर गावाहून येवून विक्रेता आपले दालन उभे करतो. मग जर एकाच वेळी दोन तीन ठिकाणी ग्रंथ महोत्सव असेल तर तो आपल्या सोयीच्या ठिकाणीच दालन उभे करतो. परिणामी इतर ठिकाणी त्याला जाता येतच नाही. मग जर वाचकांनाच पुस्तके पहायला मिळाली नाहीत तर मुळ उद्देशच सफल होत नाही. तेंव्हा या बाबीचा गांभिर्याने विचार व्हावा. संपूर्ण विभागात ग्रंथ महोत्सवाच्या तारखा एका नंतर एक अशा असाव्यात.
तिसरा मुद्दा जिल्हा ग्रंथ महोत्सव फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच भरवला पाहिजे असे कशामुळे? एका जिल्ह्यात दरवर्षी वेगवेगळ्या तालूक्याच्या गावी हा ग्रंथ महोत्सव भरवला तर त्या त्या भागातील रसिक वाचकांना त्याचा फायदा होवू शकेल. मराठवाड्याचा जर विचार केला तर जिल्हा नसलेली पण सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेली उदगीर, अंबाजोगाई, माजलगांव, वसमत, सेलू, उमरगा, अंबंड, पैठण, निलंगा अशी बरीच गावं आहेत. या ठिकाणी जर ग्रंथ महोत्सव भरविला तर त्याला अतिशय चांगला प्रतिसाद वाचकांकडून मिळू शकतो.
चौथा मुद्दा ग्रंथ प्रदर्शनात स्टॉल्सची जी रचना आहे त्या बाबत आहे. पुस्तकांसाठी ही रचना त्रासदायक आहे. पुस्तकांचे प्रदर्शन भरवायचे असेल तर त्यासाठी वाचकांना मोकळं फिरून पुस्तकं बघता आली पाहिजे अशी जागा हवी. प्रदर्शनाची जागा रात्री पुर्णपणे बंदिस्त करून घेता आली पाहिजे. कारण पुस्तकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. रोज रात्री उघड्यावरची पुस्तके आवरून घ्यायची व सकाळी परत मांडायची ही सर्कस प्रदर्शनाच्या तीन चार दिवस कशी करणार?
अवकाळी पावसाची सतत भिती असल्याने हे स्टॉल्स पत्र्याचे करायला हवेत. शिवाय ग्रंथ प्रदर्शनाचे स्थळ धूळमुक्त हवे. नसता पुस्तके खराब होतात. हे जे नुकसान होते त्याला जबाबदार कोण? विक्रेत्याने पुस्तके प्रकाशकाकडून जोखिमेवर आणलेली असतात. धूळीने खराब झालेली पुस्तके प्रकाशक परत घेत नाही. मग अशी पुस्तके त्या विक्रेत्याच्या अंगावर पडतात.
शेवटचा मुद्दा ग्रंथ महोत्सवात घेण्यात येणार्या कार्यक्रमांबाबत. या कार्यक्रमांचा दर्जा काय असावा आणि कसा असावा यावर चर्चा करण्याची ही जागा नाही. ही पूर्णपणे स्थानिक बाब आहे. त्यात कमीजास्त होणारच. पण या कार्यक्रमांचे आयोजन करत असताना दिवसभर थोड्या थोड्या अंतराने कार्यक्रम आखलेले असावेत कारण त्यामुळे या परिसरात लोकांची गर्दी कायम राहते. रात्री 10 वाजेपर्यंत जर प्रदर्शन उघडे राहणार असेल तर रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रम आखले जावेत. विशेषत: संध्याकाळच्या वेळी स्थानिक कलाकारांचे गाण्याचे कार्यक्रम ठेवले जावेत. आज महाराष्ट्रात अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना अतिशय चांगला प्रतिसाद ठिक ठिकाणी भेटतो आहे. लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. प्रत्येक गावात नाटक-संगीत-साहित्य यांना जाणणारा एक ठराविकच वर्ग असतो. त्यांना जर आपण या निमित्ताने एकत्र करू शकलो तर एक मोठेच सांस्कृतिक पाऊल उचलले असे होईल. पूर्वी गावो गावी जत्रा/उरूस भरायचे. तेंव्हा त्याचे स्वरूप हे सांस्कृतिकच होते.
महाराष्ट्रातील प्रकाशकांचे प्रतिनिधीत्व करणार्या मराठी प्रकाशक परिषद आणि मराठी प्रकाशक संघ या दोन संस्थांना तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांना या नियोजनात सहभागी करून घेण्यात यावे. कारण हे दोन महत्त्वाचे घटक अखिल भारतीय साहित्य संमेलनाने आत्तापर्यंत उपेक्षीत ठेवले आहेत.
जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत देखील ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. असे दोन दोन वेळा दोन वेगवेगळ्या विभागाच्या वतीने ग्रंथ महोत्सव न घेता हा निधी एकत्र करून एकच मोठा ग्रंथ महोत्सव शासनाच्यावतीने जिल्ह्यात एका ठिकाणी घेण्यात यावा. शासनाच्यावतीने जी पुस्तके प्रकाशीत केली जातात. ती सर्व पुस्तकेही या ग्रंथमहोत्सवात उपलब्ध झालेली दिसली नाहीत. ही त्रुटी पुढच्यावर्षी दूर करण्यात यावी. शासनाची सर्व प्रकाशने शासकीय ग्रंथ महोत्सवात उपलब्ध करून देण्यात यावीत.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575