Monday, January 25, 2016

साहित्य कोकिळांचे डि‘पियू’ डि‘पियू’



उरूस, पुण्यनगरी, 25 जानेवारी 2016

वसंंत ऋतूत आंबराईतून कोकिळेचा मधुर असा स्वर उमटतो त्याला कुहू कुहू म्हणतात. हिंदीत हा उच्चार पियू पियू असाही केला जातो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्याचा वसंत ऋतू. हे संमेलन पुण्याजवळ पिंपरी चिंचवड येथे भरले होते. या संमेलनातून एकच नाद सर्वत्र उमटत होता. तो म्हणजे डि‘पियू’ डि‘पियू. 

डिपियू म्हणजे डि.वाय.पाटील युनिव्हर्सिटी. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डि.पाटील यांचे सासरे श्री. डि.वाय.पाटील यांचे हे विद्यापीठ. त्यांनीच हे सगळे संमेलन व्यापून टाकले होते. 
संतोष पद्माकर पवार याची कविता आहे (पचायला जड असे काही शब्द बदलले आहेत.)

लोकांना मुर्ख बनवून 
विजयी झालेल्यांच्या मिरवणुकीत
हजार नालायक नाचले 
तरी हरकत नाही
पण एका विवेकी माणसाचा पाय
थिरकला नाही पाहिजे.

अखिल भारतीय साहित्य संमेलन नावाच्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करणार्‍या प्रचंड मोठ्या जत्रेत कितीतरी प्रतिभावंत भान हरपून नाचत सुटले. पण असा कोणी निपजले नाही  की जो ठणकावून म्हणेल, ‘मला निमंत्रण आपण दिले हरकत नाही. पण अशा संमेलनात मी येणार नाही.’ काही जणांनी परस्परच जाणे टाळले. पण त्यांनीही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. ते आपल्या घरातच चुप बसून राहिले. यामुळे घडले काय की सर्वसामान्य रसिकांपर्यंत हा संदेश गेला की थोड्याफार पैशाचे आमिष दाखविले की भले भले साहित्यीकही चळायला लागतात. त्यांची काही फार मोठी पत्रास ठेवण्याची गरज नाही. 

या साहित्य संमेलनात ठळकपणे स्वागताध्यक्षाचे फोटो जिकडे तिकडे झळकत होते. बाकी कोण अध्यक्ष, कोण उद्घाटक, कोण समारोपाचा पाहूणा हे कोणाच्याही समोर ठळकपणे आले नाही. हे संमेलन साहित्य महामंडळाच्या हातून केंव्हाच सुटून गेले. पतंगाची दोरी आमच्या हातात असते असं म्हणणारे महामंडळ. प्रत्यक्षात या महामंडळाच्या हातात दोरीही उरली नाही. पतंग गेला दोरी सुटली केवळ चरखीच यांच्या हाती राहिली. 

गेल्या 20 वर्षांमध्ये संमेलनाचे स्वरूप प्रचंड पालटून गेले. 1995 मध्ये मराठवाड्यात परभणीला अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले होते. गोळा झालेली एकूण रक्कम होती 40 लाख आणि खर्च झाला होता 32 लाख रूपये. उरलेल्या 8 लाखांचा ‘अक्षर प्रतिष्ठा’ नावाचा एक ट्रस्ट स्थापन झाला होता आणि त्यामाध्यमातून दिवाळी अंकाचे प्रकाशन, जिल्हा संमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रम असे 10 वर्षे चालले. आज संमेलनाचा खर्च 5 कोटीच्या पुढे गेला आहे. पंधरापट किमान खर्च वाढला आहे. मग साधा प्रश्न आहे की 1995 मध्ये मराठी ललित वैचारिक साहित्याच्या (ज्यासाठी हे साहित्य संमेलन भरविले जाते) पुस्तकाची आवृत्ती 1100 निघत होती. ती आज कितीवर आली आहे?  सर्वसाधारणपणे आज मराठी ललित वैचारिक पुस्तकाची आवृत्ती फक्त 300 किंवा 500 ची निघते. म्हणजे एकीकडे संमेलनाचा खर्च प्रचंड वाढला आहे. साहित्यीकांचे मानधनही यावेळेस भरपूर दिल्या गेले. मग पुस्तकांची आवृत्ती का कमी निघते आहे? याचे उत्तर कोण देणार? 

कुसुमाग्रजांच्या एका कवितेत ‘मंदिर सलामत तो मूर्ती पचास’ असा उपहास केलेला आहे. मग आपण तसं म्हणायचं का की संमेलनत सलामत तो पुस्तक पचास? पुस्तकांचा विचार करायचाच कशाला. साहित्यीकांना विचारतोच कोण. संमेलन म्हणजे एक भलामोठा इव्हेंट आहे. त्या निमित्ताने मोठी उलाढाल होते आहे. केटरिंग वाल्यांना धंदा मिळतो आहे. मंडपवाले खुश आहेत. शुटिंग करणार्‍यांची चांदी झाली आहे. हॉटेलवाले उत्साहात आहेत. 

इतकंच कशाला पुस्तकांचे जे प्रदर्शन भरलं होतं ते विक्रेते प्रकाशकही  खुश आहेत. कारण पुस्तकांची उलाढाल प्रचंड झाली. आता कोणती पुस्तके विकली गेली ते विचारू नका. यश कसे मिळवावे, लठ्ठपणा कसा कमी करावा, मधुमेहावर नियंत्रण कसे मिळवाल? माणसं जोडावी कशी? इंटरनेटचा वापर कसा करावा, संगणक शिकण्याची सोपी युक्ती, पुरूषांनी करावयाच्या सोप्या पाककृती,  बाळाची चाहूल अर्थातच आजीबाईचा बटवा, चित्रे रंगवा, ओरिगामी वगैरे वगैरे. 

गेली काही वर्षे संमेलनात जी पुस्तके विकली जातात त्यांचा साहित्याशी काहीही संबंधच उरला नाही. मुळात साहित्य संमेलनाचा आणि साहित्याचाच काही संबंध उरला नाही. परिसंवादात बोलणारे बरेच वक्ते  असे निर्माण झाले आहेत की ते कोणत्याही संमेलनात कुठेही कोणत्याही विषयावर किमान अर्धा घंटा बडबड करू शकतात. 

संमेलनाचा अध्यक्ष, त्याला कुणी  विचारायला तयार नाही. तो काही महत्त्वाचे साहित्यीक विषय मांडतो आहे असंही नाही. तो काही फार मोठा दर्जेदार वाचकप्रिय साहित्यीक आहे असेही नाही. वक्ते काय बोलतात त्याचेही काही कुणाला फारसे महत्त्व शिल्लक नाही. कविसंमेलनातील कवितांच्या आठवणी आजकाल मनात दरवळत नाहीत. साहित्य महामंडळ स्वागताध्यक्षाच्या दावणीला पूर्णपणे बांधलेले आहे हे या संमेलनाने सिद्ध झाले. सर्वसामान्य वाचकांबाबत बोलावे तर आलेल्या कित्येकांना ते कशासाठी आले तेच माहित नसते. केवळ मोठी जत्रा आहे. भरपूर लोक गोळा झाले आहेत. अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षीत, मकरंद अनासपुरे, आशा भोसले, लता मंगेशकर, शाहरूख खान वगैरे वगैरेसाठी आलो असेच जास्तीत जास्त लोक सांगतिल. ज्या प्रतिभावंत साहित्यीकांसाठी हे संमेलन आहे असं म्हणावं तर त्यांनी केंव्हाच आपले सारे सत्व स्वागताध्यक्षाच्या पायी गहाण ठेवले आहे. मग हे संमेलन हवेच कशाला? 

संमेलनाच्या एकूण खर्चापैकी किती रक्कम साहित्यीकांवर प्रत्यक्ष खर्च झालेली आहे? ठाण्याच्या साहित्य संमेलनात पाच वर्षांपूर्वी एक कोटी बारा लाखांपैकी केवळ साडेचार लाख रूपये साहित्यीकांच्या मानधन व प्रवासखर्चावर झाल्याचे समोर आले होते. या संमेलनातही सगळी मिळून ही रक्कम दहा पंधरा लाखाच्या पुढे जात नाही. मग हे बाकीचे पैसे खर्च झाले कशावर? गाडीखालून चालणार्‍या कुत्र्याला वाटते की आपण गाडी चालवतो. हळू हळू कुत्राच इतका मोठा झाला की गाडीचा बैल त्याच्यापुढे लहानच झाला इतकेच नाही तर तो केविलवाणा झाला. गाडीतली माणसेही हतबल झाली. गाडीवानाने तर केंव्हाच कासरा सोडून दिला. कुत्र्याने शेपटी हलवली की त्या प्रमाणे आपण हलायचे इतकेच आता गाडी-बैल-गाडीवान-गाडीतील माणसं यांच्या हातात उरलं असं दिसतं आहे.

कुसुमाग्रजांचीच विशाखातील एक कविता आहे

नवलाख तळपती दिप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणि करते व्याकुळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्यांची वात

आजही छोट्या छोट्या गावात पहाटे आलेले वृत्तपत्र एखादा म्हातारा उन्हात बसून डोळे फोडून वाचत बसतो. त्यातील एखादा लेख आवडला तर त्या लेखकाला आवर्जून फोन करून आपली भावना साध्या शब्दांत व्यक्त करतो. आजही शाळेत एखादा पोरगा सुट्टीच्या वेळात डबा खाणं झाल्यावर शाळेच्या भंगार झालेल्या वाचनालयातून एखादे फाटके पुस्तक घेवून वाचत बसतो. आजही एखादी म्हातारी दुपारी खिडकीजवळ बसून पोथी वाचत काहीतरी पुटपुटत राहते. आजही छोट्या गावातील एखादा उमेदीचा कवी आपली नवी कविता उत्साहाने फेसबुकवर टाकतो आणि तथाकथित मोठ्या म्हटल्या जाणार्‍या एखाद्या साहित्यीकाची त्यावर काय प्रतिक्रिया येईल याची वाट पहात बसतो. आजही तालूक्याच्या गावी निवृत्त झालेला एखादा शिक्षक गावच्या वाचनालयात व्याख्यानाचा कार्यक्रम होण्यासाठी धडपड करतो. आलेल्या व्याख्यात्याला प्रेमानं घरी नेवून जेवू खावू घालतो... अशा मंद दिव्यांच्या वाती उजळत आहेत. तेवढीच आशा आहे. बाकी संमेलन नावाचा झगमगाट ज्यांना छान वाटतो त्यांना वाटत राहो. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

No comments:

Post a Comment