उरूस, पुण्यनगरी, 1 फेब्रुवारी 2016
साहित्य संमेलनात दोन गोष्टींना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. एक म्हणजे कवी संमेलन आणि दुसरे म्हणजे ग्रंथ प्रदर्शन. ग्रंथ प्रदर्शनात जे विक्रेते प्रकाशक सहभागी असतात त्यांच्या काही तक्रारी संमेलन संपले की ऐकायला मिळतात. स्टॉल्सची रचनाच सदोष होती. सुरक्षा व्यवस्था नव्हती. चोर्याच झाल्या. स्टॉल्सचा आकारच लहान होता.
साहित्य संमेलनावर पुस्तकांच्या प्रकाशकांच्या दृष्टीने जो महत्त्वाचा आक्षेप घेतला जातो तो म्हणजे संमेलने पुस्तक केंद्री नसतात. अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचीही पुस्तके खपतात असे नाही. ही संमेलने व्यक्ती केंद्री असतात.
हे सगळे दोष दूर करण्यासाठी आता मराठीतील प्रकाशकच पुढे सरसावले आहेत. ‘चार दिवस पुस्तकांचे’ या नावाचे चार दिवसीय ग्रंथमहोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रात ठिक ठिकाणी करण्याचा निर्णय प्रकाशक परिषदेने घेतला. गोरेगाव येथे हा उपक्रम राबविल्यानंतर आता औरंगाबाद शहरात अश्या प्रकारचे आयोजन नुकतेच यशस्वीरीत्या करण्यात आले होते.
पुस्तकांची दालनं कशी उभारावीत याचे प्रात्यक्षीकच प्रकाशक परिषदेने सिद्ध करून दाखवले. सर्व स्टॉल्सची रचना मुख्य मंडपाला सामोरी जाणारी होती. जेणे करून कुणावर अन्याय झाला असे म्हणायला नको. प्रदर्शनाची वेळ संपल्यावर रात्री पुस्तकांची सुरक्षा ही प्रत्येक प्रदर्शनात अतिशय चिंतेची बाब असते. औरंगाबाद येथे भरलेल्या ग्रंथ महोत्सवात सगळे स्टॉल्स व्यवस्थित पत्र्यांनी झाकलेले होते. शिवाय हा सगळा परिसर बंदिस्त करून एकच प्रवेश द्वार ठेवण्यात आले होते. परिणामी रात्री हे द्वार लावून घेतले त्यावर रखवालदार बसविला की सर्व स्टॉल्सची सुरक्षा सहज होवून जात होती. परिणामी ज्या विक्रेत्यांनी प्रकाशकांनी स्टॉल्स उभारलेे त्यांना रात्री पुस्तकांच्या सुरक्षेची काही काळजी शिल्लक राहिली नाही.
पुस्तक प्रदर्शनात समोरा समोर स्टॉल्स उभारले तर फिरण्यासाठी मोकळी जागाच शिल्लक राहत नाही. परिणामी नुस्ती गर्दी होते. हे टाळण्यासाठी या प्रदर्शनात सर्व स्टॉल्स खुल्या मैदानाकडे तोंड करून उभारल्यामुळे फिरायला मोकळी जागा भरपुर उपलब्ध होती.
साहित्य संमेलनात ज्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यात पुस्तकांना फारसे स्थान भेटत नाही. या ग्रंथ महोत्सवात या त्रुटीवर विचार करून ती दूर करण्यात आली. पुस्तकांचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम आयेजित करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशनही या सोहळ्यात घेण्यात आले. परिणामी वाचनाचा प्रसार होण्याच्या मुळ उद्देशाला चालना मिळाली.
सरस्वती भुवन सारख्या शंभर वर्षे जून्या शिक्षण संस्थेने आपल्या परिसरात हा ग्रंथ महोत्सव घेण्यास सहकार्य केले होते. याही गोष्टीला विशेष महत्त्व आहे. मुलांवर वाचनाचा संस्कार शालेय वयातच झाला पाहिजे. शालेय शिक्षणासाठी प्रमाणिकपणे धडाडीने काम करणार्या हेरंब कुलकर्णी यांच्या ‘बखर शिक्षणाची’ या पुस्तकाचे प्रकाशक दहावीच्या वर्गातील उत्कृष्ट वाचक असलेल्या मुलीच्या हस्ते करण्यात आले. नुसतेच पुस्तक प्रदर्शन भरवून उपयोग नाही. पालकांनी शिक्षकांनी काय वाचावे हेही सांगितले पाहिजे. या भावनेतून हेरंब कुलकर्णी यांनी बखर शिक्षणाची हे पुस्तक लिहीले. त्यात शिक्षक पालकांनी कोण कोणती पुस्तके वाचली पाहिजे हे सांगितले आहे. अशा पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे.
वाचनाच्या संदर्भात नुस्ती बडबड फार केली जाते. पण प्रत्यक्ष कृती मात्र होताना दिसत नाही. मराठी भाषेची चिंता करणारे ठराव साहित्य संमेलनात सतत मांडले जातात. पण नेमके करायचे काय हे सांगितले जात नाही. हे टाळण्यासाठी प्रकाशक परिषदेने प्रत्यक्ष ग्रंथ महोत्सव भरवून दाखवला. त्यातही मुलांनी पालकांनी काय वाचावे अशी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. जेणे करून वाचकांना त्याचा उपयोग होवू शकेल.
शासकिय प्रकाशनांचे दालनही या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. शासकिय पुस्तके गोदामात धूळ खात पडतात. ती लोकांपर्यंत पोचत नाहीत. असा आरोप केला जातो. मग यासाठी प्रकाशक परिषदेने पुढाकार घेवून शासकीय कार्यालयाला विनामुल्य स्टॉल उपलब्ध करून दिला. जेणे करून ही अतिशय स्वस्त आणि महत्त्वाची पुस्तके सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध होतील. भारतीय घटनेची नविन आवृत्ती शासनाने प्रकाशीत केली आहे. बर्याच दिवसांपासून ती उपलब्ध नव्हती. शब्दकोशाचे खंड आता उपलब्ध झाले आहेत. आंबेडकरांच्या समग्र वाङमयाच्या खंडांना नेहमीच मागणी असते. विविध जिल्ह्याचे गॅझिटियर लोकांना हवे असतात. ही सगळी पुस्तके या ग्रंथ महोत्सवामुळे चार दिवस लोकांना उपलब्ध झाली.
मुलं वाचत नाहीत असा सरधोपट आरोप केला जातो. पण त्याचे मुळ कारण त्यांना पुस्तकं उपलब्ध होत नाहीत. शालेय ग्रंथालयात आता नविन पुस्तकेच खरेदी केली जात नाहीत. शिवाय विद्यार्थ्यांची संख्या वाढली त्या प्रमाणात पुस्तकांची संख्या शालेय ग्रंथालयात वाढली नाही. निधी अभावी शालेय ग्रंथालयांची खरेदी मर्यादीत होवून बसली आहे. पालक स्वत:च वाचत नाहीत मग विद्यार्थ्यांवर आरोप करण्यात काय मतलब.
या ग्रंथ महोत्सवात ज्योत्स्ना प्रकाशन नवनीत प्रकाशन सारख्या मुलांची पुस्तके आवर्जून प्रकाशीत करणार्या संस्थांनी आपली दालनं उभारली होती. परिणामी मुलांना अतिशय चांगली दर्जेदार रंगीत चित्रांनीयुक्त अशी पुस्तके पहायला मिळाली. याचाच परिणाम म्हणजे ती त्यांना घ्यावीशी वाटली.
बाल भारती अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसोबतच इतरही पुस्तके प्रकाशीत करतं. पण ही पुस्तके फारशी मुलांपर्यंत पोचतच नाहीत. बालभारतीची ही अभ्यासक्रमाव्यतिरिक्तची पुस्तके या ग्रंथ महोत्सवात मांडण्यात आली होती. ज्याला बालवाचकांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला.
या ग्रंथ महोत्सवात जे सांस्कृतिक कार्यक्रम योजले होते त्यांतही वाङमयीन दृष्टी राखण्यात आली होती. सावरकरांच्या कविता व गीतांवर आधारीत ‘शुरा मी वंदिले’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कलाकारांनी सादर केला. महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगांवकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या प्रथम मासिक स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कविता व गीतांवर आधारीत कार्यक्रम ‘आनंदयात्री’ या महोत्सवात सादर झाला.
गंभीर वैचारिक पुस्तके म्हणजे निव्वळ कपाटाचे धन. त्यांना कोण वाचणार असा सार्वत्रिक समज आहे. हा दूर करण्यासाठी या महोत्सवात रावसाहेब कसबे यांच्या ‘भक्ती आणि धम्म’ या हजार पानाच्या जाडजूड गंभीर पुस्तकावर चर्चा घडवून आणण्यात आली.
एक मोठं विचित्र दृश्य या ग्रंथ महोत्सवात पहायला मिळलं. तथाकथित साहित्यीक, मराठीचे प्राध्यापक हे पुढाकार घेवून काही करताना दिसत नव्हते. इतकेच नव्हे तर पुस्तक खरेदी करतानाही ते फारसे दिसत नव्हते. उलट सामान्य वाचक ज्याला कुठलाही चेहरा नाही असे आपण म्हणतो तो मोठ्या उत्सुकतेने पुस्तक पाहताना खरेदी करताना दिसत होता. हे कशाचे लक्षण मानायचे? शालेय विद्यार्थ्यांचे कविसंमेलन झाले त्यात एका विद्यार्थ्याने
दर्ग्यावर चढवली जाते
चादर मोठ्या श्रद्धेने
बाहेर त्याच देवाची लेकरे
कुडकुडतात थंडीने
अशी वरवर साधी वाटणारी पण या व्यवस्थेलाच प्रश्न करणारी कविता सादर केली. ही संवेदनक्षमता छोटी मुलं दाखवत आहेत. शब्दकोश खरेदी करण्यासाठी एखादी छोटी मुलगी आईपाशी हट्ट करत आहे. चित्रांच्या पुस्तकात कुणी लहान मुलगा हरवून गेला आहे. त्याला आजूबाजूचे भानच नाही. शासनाने नामदेव गाथा प्रकाशीत केली पण ती सटीप नाही. या ग्रंथ महोत्सवात नमादेवांची सटीप गाथा उपलब्ध होताच एका म्हतार्या आजोबांना विलक्षण आनंद झाला. त्यांनी तातडीने खिसे चाचपून पैसे काढले व ती गाथा खरेदी केली.
प्रकाशकांनी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने भरविलेल्या या ग्रंथ महोत्सवाचा उद्देश सफल झाल्याचा पुरावा या छोट्या छोट्या घटना देतात. हा ग्रंथ महोत्सव नियमित भरत राहिला तर वाचनाबाबत एक चांगले चित्र निर्माण झालेले दिसेल.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment