Monday, January 11, 2016

शारंगदेव महोत्सव पार्वती दत्ता आणि महागामी

उरूस, पुण्यनगरी, 11 जानेवारी 2016


तेराव्या शतकात काश्मिरमधील संगीत विद्वान शारंगदेव यास देवगिरीच्या यादवांनी सन्मानाने आपल्या दरबारात बोलावून घेतले. त्याला राजाश्रय दिला. याच शारंगदेवाने ‘संगीत रत्नाकर’ या शास्त्रीय संगीतातील पायाभूत ग्रंथाची निर्मिती देवगिरीच्या परिसरात केली. सातशे वर्षानंतर एका नृत्य कलाकाराला या भूमिचे आकर्षण वाटले. तेंव्हा जसे देवगिरीच्या यादवांनी शारंगदेवाला आमंत्रित केले होते तसेच महात्मा गांधी मिशन संस्थेने या नृत्यांगनेला आमंत्रित केले. संस्थेचे आमंत्रण तिने स्विकारले आणि महात्मा गांधी मिशन संस्थेच्या रम्य आवारात ‘महागामी’ या कला अकादमीची स्थापना केली. कलकत्त्यात जन्मलेल्या, भोपाळमध्ये वाढलेल्या, दिल्लीत शिकलेल्या या नृत्यांगनेचे नाव आहे सुश्री पार्वती दत्ता. 

जानेवारी महिना म्हटलं की संक्रांतीचा तिळगुळ आणि निळ्या आभाळात विहरणारे हजारो पतंग सगळ्यांना आठवतात. पण गेल्या सहा वर्षांपासून औरंगाबादकरांना यासोबत अजून एका गोष्टीची आवर्जून आठवण येते. ती म्हणजे महागामीच्या वतीने भरविण्यात येणारा ‘शारंगदेव महोत्सव’. हा महोत्सव सुरू करणे आणि आजपर्यंत ती परंपरा यशस्वीरित्या संपन्न करणे यामागे उभी असलेली नृत्यांगना म्हणजे गुरू पार्वती दत्ता.

मुळच्या कलकत्त्याच्या असलेल्या पार्वती दत्ता आई वडिलांसोबत पुढे भोपाळमध्ये आल्या. उच्च पदावर काम करणार्‍या अभियंता आई वडिलांच्या पोटी जन्मलेली ही मुलगी स्वाभाविकच अभियंताच होईल असे नातेवाईक मित्रमंडळींना वाटायचे. पण नृत्याची असलेली अंगभूत ओढ तिला शांत बसू देईना. भोपाळ शहरापासून दूर औद्योगिक वसाहतीत राहतानाही सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी शहरात या कुटूंबांच्या नियमित चकरा व्हायच्या. नृत्याशिवाय पुढे काहीच दिसेना तेंव्हा भोपाळ सोडून दिल्लीत जायचा निर्णय त्यांनी स्वबळावर घेतला. जून्या काळातही अभियांत्रिकी पदवी मिळवून मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या आईने त्यांना पाठबळ दिले. आत्मविश्वास दिला. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या त्यांच्या वडिलांना या कलेचे महत्त्व माहित होते. त्यांनी प्रोत्साहन दिले.   

गुरू बिरजू महाराज व गुरू केलुचरण महापात्रा यांच्याकडे गुरूकुल परंपरेने त्यांनी कथ्थक व ओडिसीचे शिक्षण घेतले. शिकत असतानाच्या त्यांच्या लक्षात येत गेले की आधुनिक काळात ज्या पद्धतीनं कलेचे शिक्षण दिल्या-घेतले जाते ते कामाचे नाही. शिष्य म्हणजे मुलासारखा आहे असं समजून गुरूकुल परंपरेत शिकवले तरच नृत्यासारखी कला पुढे नेता येईल. मोठ्या शहरांमध्ये जाण्यापेक्षा कलेचे कुठलेही फारसे वातावरण नसलेल्या गावात काम करणे हे खरे आवाहन असेल असे मानून त्यांनी औरंगाबादहून आलेले महात्मा गांधी मिशन संस्थेचे आमंत्रण स्विकारले.

महागामी गुरूकुलची सुरवात झाली तेंव्हा फक्त 10 विद्यार्थी होते. गेल्या 20 वर्षांत 2000 पेक्षा जास्त शिष्य इथे शिकले. अनुभूती या उपक्रमा अंतर्गत विविध रसिकांसमोर ही नृत्यकला रसग्रहणासाठी सादर केली जाते. जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रसिकांनी यात आपला सहभाग आत्तापर्यंत नोंदवला आहे. 

केवळ नृत्य शिकविणारी एक संस्था असे स्वरूप न राहता महागामी म्हणजे कला संस्कृतीचे एक केंद्र म्हणून विकसित झाले पाहिजे असा दृष्टीकोन पार्वती दत्ता यांनी सुरातीपासून ठेवला. या परिसरात काम करत असताना या प्रदेशाचे सांस्कृतिक वैभव, येथील परंपरा याचाही शोध त्या घेत गेल्या. औरंबादला आल्यावर त्यांच्या या क्षेत्रातील कितीतरी स्नेह्यांनी त्यांना चिडवायला सुरवात केली की ‘तूम उस औरंगजेब की गांव मे बस चुकी हो जो संगीत के बारे मे क्या जानता था!’ पार्वती दत्ता यांना देवगिरी परिसर आणि त्या परिसरातील वेरूळ अजिंठा लेण्यांमधील कलेने कायमच आकर्षित केले होते. शारंगदेव, गोपाल नायक सारखे महान कलाकार विद्वान याच परिसरात घडले. तेंव्हा परत एकदा या जून्या लोकांच्या रचनांचा अभ्यास झाला पाहिजे. त्यांचे स्मरण झाले पाहिजे याची तीव्र जाणीव पार्वती दत्ता यांना झाली. 

इ.स. 2011 पासून शारंगदेव महोत्सवाची सुरवात झाली. भारतात संगीत विषयक खुप महोत्सव आहेत. पण त्यात कुठेही संगीतावर चर्चा, निबंध प्रस्तूती, संगीत संशोधनासाठी प्रोत्साहन, संगीताचे रसग्रहण हा भाग फारसा येत नाही. शारंगदेव महोत्सवात मात्र आवर्जून यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. दरवर्षी संगीतात महत्त्वाची कामगिरी करणार्‍या एका कलाकाराला ‘शारंगदेव सन्मान’ प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत धृपद गायक उस्ताद झिया फरिदउद्दीन डागर, कथ्थक गुरू पद्मविभुषण पं. बिरजू महाराज, बांसरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया, भरतनाट्यम गुरू पद्मा सुब्रमण्यम, विदुषी कपिला वात्सायन, कथ्थक गुरू कुमुदिनी लाखिया यांना हा सन्मान देवून गौरविण्यात आले आहे.

शारंगदेव महोत्सवात कितीतरी दुर्मिळ वाद्य, संगीत प्रकार यांचे दर्शन रसिकांना झाले. सुरबहार सारखे वाद्य जे की फारसे प्रचलित नाही, रूद्रवीणा तर ऐकायलाच भेटत नाही. धृपद गायकीही फारशी कानावर पडत नाही. यांचा आवर्जून समावेश या महोत्सवात पार्वती दत्ता यांनी केला आहे. शास्त्रीय नृत्यासोबत कितीतरी लोकनृत्याचे प्रकार भारतात आढळतात. लोकसंगीतानेही आपला देश संपन्न आहे. राजस्थानातील मांगनियार संगीत असो, इम्फाळ मधील पुंग चोलम असो, पुरूलिया जिल्ह्यातील छाऊ नृत्यप्रकार असो यांचाही आस्वाद शास्त्रीय नृत्य, वाद्यासोबत रसिकांना शारंगदेव महोत्सवात घेता आला आहे. यावर्षी पंडवानी गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगढच्या पद्मभुषण तिज्जनबाई आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. 
अनेक मोठमोठ्या कलाकारांनी आपली कला समर्पित भावनेने या महोत्सवात सादर केली आहे. प्रचंड मोठ्या छगमगाटी महोत्सवात हजारो प्रेक्षकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करताना समाधान भेटत नाही ही खंत अनेक कलाकार जाहिरपणे व्यक्त करत आहेत. अशा कलाकारांसाठी शारंगदेव महोत्सव हे एक आशादायी असे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महात्मा गांधींच्या नावामुळे या परिसराला एक तात्त्विक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. अमजद अलि सारखा आंतरराष्ट्रीय किर्तीचा सरोदवादक या मंचावर आपली कला सादर करतो तेंव्हा त्याच्याही नकळतपणे त्याच्या सरोदमधून ‘रघुपती राघव राजाराम’ सारखी धुन निघते आणि रसिकही त्यावर डोलायला लागतात. 

‘ऑरा औरंगाबाद’ नावानं एक उपक्रम महागामीने चालविला आहे. परदेशी पर्यटक औरंगाबादला मोठ्या संख्येने येतात. त्यांना या परिसरात वास्तव्य असताना आपल्या कला परांपरांची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम आहे. तरूण प्रतिभावंत कलाकार आपली कला या पर्यटकांसाठी सादर करतात. पार्वती दत्ता यांनी याबाबत माहिती देताना मोठी कलात्मक बाब समोर आणली आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात शिवतांडव मुद्रेतील मुर्ती पाहिल्यावर पर्यटकांना जर परत संध्याकाळी शहरात आल्यावर शिवतांडव नृत्य प्रत्यक्ष पाहिला मिळाले तर त्यांना किती आनंद वाटेल. हे प्रत्यक्ष त्यांनी घडवून आणले आहे. वेरूळ अजिंठा पाहणारे पर्यटक संध्याकाळी महागामी परिसरात त्याच मुद्रा कलेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवतात. 

लहान मोठी अनेक मुले मुली या परिसरात ओडिसी, कथ्थकचे शिक्षण घेतात. खरं तर शिक्षण घेतात असं म्हणण्यापेक्षा जीवनाकडे कलेच्या दृष्टीने कसे पहावे हे समजून घेतात असं म्हणावे लागेल. 

स्वत: एक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कथ्थक व ओडिसी नृत्यांगना असलेल्या पार्वती दत्ता यांनी आपले आयुष्यच महागामी साठी समर्पित केले आहे. आपल्या आईसोबत त्या जेंव्हा या परिसरात आल्या तेंव्हा अगदी परिसराची स्वच्छताही आपणच कशी केली हे सांगताना त्यांना कुठे कमीपणा वाटत नाही. गांधीजींच्या तत्त्वाने या संस्थेचे कामकाज आपण कसे चालवतो हे सांगताना त्यांचे डोळे उजळून निघतात. त्यांच्या बोलण्यातला खरेपणा जाणवतो कारण त्यांनी स्वत: खादीचे सुती वस्त्रच नेसलेले आपल्या डोळ्यांना दिसत असतात. त्यांच्या गुरूकुलात स्वच्छता करणार्‍या महिलेची ओळखही त्या ‘मेरी सबसे पुरानी कलिग है !’ अशी करून देतात. जन्माने बंगाली असलेल्या पार्वती दत्ता यांनी विशेष मेहनत करून आपली भाषा बनवली. त्यांची हिंदी भाषा ऐकून मी त्यांना गमतीनं ‘ऐसी हिंदी को हम आयुर्वेदिक हिंदी बोलते है !’ म्हणालो तेंव्हा त्या लहान मुलासारख्या खळखळून हसल्या. त्यांची इंग्रजीही अतिशय डौलदार आहे. चांगला कलाकार हा चांगला प्रशासक असतो असे नाही. पार्वती दत्ता यांच्यात हा दुर्मिळ  योग जुळून आला आहे. 

येत्या 15 ते 17 जानेवारी दरम्यान 6 वा ‘शांरगदेव महोत्सव’ औरंगाबाद येथे संपन्न होत आहे. शारंगदेवाच्या भुमीत सांस्कृतिक बीजांची जी पेरणी पार्वती दत्ता करत आहेत त्याला चांगली फळं येवोत हीच कलेची देवता नटराजाच्या चरणी प्रार्थना.  
     
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment