Monday, February 1, 2016

प्रकाशकांनीच भरविला ग्रंथ महोत्सव

उरूस, पुण्यनगरी, 1 फेब्रुवारी 2016

साहित्य संमेलनात दोन गोष्टींना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. एक म्हणजे कवी संमेलन आणि दुसरे म्हणजे ग्रंथ प्रदर्शन. ग्रंथ प्रदर्शनात जे विक्रेते प्रकाशक सहभागी असतात त्यांच्या काही तक्रारी संमेलन संपले की ऐकायला मिळतात. स्टॉल्सची रचनाच सदोष होती. सुरक्षा व्यवस्था नव्हती. चोर्‍याच झाल्या. स्टॉल्सचा आकारच लहान होता.

साहित्य संमेलनावर पुस्तकांच्या प्रकाशकांच्या दृष्टीने जो महत्त्वाचा आक्षेप घेतला जातो तो म्हणजे संमेलने पुस्तक केंद्री नसतात. अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचीही पुस्तके खपतात असे नाही. ही संमेलने व्यक्ती केंद्री असतात. 

हे सगळे दोष दूर करण्यासाठी आता मराठीतील प्रकाशकच पुढे सरसावले आहेत. ‘चार दिवस पुस्तकांचे’ या नावाचे चार दिवसीय ग्रंथमहोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रात ठिक ठिकाणी करण्याचा निर्णय प्रकाशक परिषदेने घेतला. गोरेगाव येथे हा उपक्रम राबविल्यानंतर आता औरंगाबाद शहरात अश्या प्रकारचे आयोजन नुकतेच यशस्वीरीत्या करण्यात आले होते. 

पुस्तकांची दालनं कशी उभारावीत याचे प्रात्यक्षीकच प्रकाशक परिषदेने सिद्ध करून दाखवले. सर्व स्टॉल्सची रचना मुख्य मंडपाला सामोरी जाणारी होती. जेणे करून कुणावर अन्याय झाला असे म्हणायला नको. प्रदर्शनाची वेळ संपल्यावर रात्री पुस्तकांची सुरक्षा ही प्रत्येक प्रदर्शनात अतिशय चिंतेची बाब असते. औरंगाबाद येथे भरलेल्या ग्रंथ महोत्सवात सगळे स्टॉल्स व्यवस्थित पत्र्यांनी झाकलेले होते. शिवाय हा सगळा परिसर बंदिस्त करून एकच प्रवेश द्वार ठेवण्यात आले होते. परिणामी रात्री हे द्वार लावून घेतले त्यावर रखवालदार बसविला की सर्व स्टॉल्सची सुरक्षा सहज होवून जात होती. परिणामी ज्या विक्रेत्यांनी प्रकाशकांनी स्टॉल्स उभारलेे त्यांना रात्री पुस्तकांच्या सुरक्षेची काही काळजी शिल्लक राहिली नाही. 

पुस्तक प्रदर्शनात समोरा समोर स्टॉल्स उभारले तर फिरण्यासाठी मोकळी जागाच शिल्लक राहत नाही. परिणामी नुस्ती गर्दी होते. हे टाळण्यासाठी या प्रदर्शनात सर्व स्टॉल्स खुल्या मैदानाकडे तोंड करून उभारल्यामुळे फिरायला मोकळी जागा भरपुर उपलब्ध होती. 

साहित्य संमेलनात ज्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यात पुस्तकांना फारसे स्थान भेटत नाही. या ग्रंथ महोत्सवात या त्रुटीवर विचार करून ती दूर करण्यात आली. पुस्तकांचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम आयेजित करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशनही या सोहळ्यात घेण्यात आले. परिणामी वाचनाचा प्रसार होण्याच्या मुळ उद्देशाला चालना मिळाली. 

सरस्वती भुवन सारख्या शंभर वर्षे जून्या शिक्षण संस्थेने आपल्या परिसरात हा ग्रंथ महोत्सव घेण्यास सहकार्य केले होते. याही गोष्टीला विशेष महत्त्व आहे. मुलांवर वाचनाचा संस्कार शालेय वयातच झाला पाहिजे. शालेय शिक्षणासाठी प्रमाणिकपणे धडाडीने काम करणार्‍या हेरंब कुलकर्णी यांच्या ‘बखर शिक्षणाची’ या पुस्तकाचे प्रकाशक दहावीच्या वर्गातील उत्कृष्ट वाचक असलेल्या मुलीच्या हस्ते करण्यात आले. नुसतेच पुस्तक प्रदर्शन भरवून उपयोग नाही. पालकांनी शिक्षकांनी काय वाचावे हेही सांगितले पाहिजे. या भावनेतून हेरंब कुलकर्णी यांनी बखर शिक्षणाची हे पुस्तक लिहीले. त्यात शिक्षक पालकांनी कोण कोणती पुस्तके वाचली पाहिजे हे सांगितले आहे. अशा पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. 

वाचनाच्या संदर्भात नुस्ती बडबड फार केली जाते. पण प्रत्यक्ष कृती मात्र होताना दिसत नाही. मराठी भाषेची चिंता करणारे ठराव साहित्य संमेलनात सतत मांडले जातात. पण नेमके करायचे काय हे सांगितले जात नाही. हे टाळण्यासाठी प्रकाशक परिषदेने प्रत्यक्ष ग्रंथ महोत्सव भरवून दाखवला. त्यातही मुलांनी पालकांनी काय वाचावे अशी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. जेणे करून वाचकांना त्याचा उपयोग होवू शकेल. 
शासकिय प्रकाशनांचे दालनही या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. शासकिय पुस्तके गोदामात धूळ खात पडतात. ती लोकांपर्यंत पोचत नाहीत. असा आरोप केला जातो. मग यासाठी प्रकाशक परिषदेने पुढाकार घेवून शासकीय कार्यालयाला विनामुल्य स्टॉल उपलब्ध करून दिला. जेणे करून ही अतिशय स्वस्त आणि महत्त्वाची पुस्तके सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध होतील. भारतीय घटनेची नविन आवृत्ती शासनाने प्रकाशीत केली आहे. बर्‍याच दिवसांपासून ती उपलब्ध नव्हती. शब्दकोशाचे खंड आता उपलब्ध झाले आहेत. आंबेडकरांच्या समग्र वाङमयाच्या खंडांना नेहमीच मागणी असते. विविध जिल्ह्याचे गॅझिटियर लोकांना हवे असतात. ही सगळी पुस्तके या ग्रंथ महोत्सवामुळे चार दिवस लोकांना उपलब्ध झाली.

मुलं वाचत नाहीत असा सरधोपट आरोप केला जातो. पण त्याचे मुळ कारण त्यांना पुस्तकं उपलब्ध होत नाहीत. शालेय ग्रंथालयात आता नविन पुस्तकेच खरेदी केली जात नाहीत. शिवाय विद्यार्थ्यांची संख्या वाढली त्या प्रमाणात पुस्तकांची संख्या शालेय ग्रंथालयात वाढली नाही. निधी अभावी शालेय ग्रंथालयांची खरेदी मर्यादीत होवून बसली आहे. पालक स्वत:च वाचत नाहीत मग विद्यार्थ्यांवर आरोप करण्यात काय मतलब.
या ग्रंथ महोत्सवात ज्योत्स्ना प्रकाशन नवनीत प्रकाशन सारख्या मुलांची पुस्तके आवर्जून प्रकाशीत करणार्‍या संस्थांनी आपली दालनं उभारली होती. परिणामी मुलांना अतिशय चांगली दर्जेदार रंगीत चित्रांनीयुक्त अशी पुस्तके पहायला मिळाली. याचाच परिणाम म्हणजे ती त्यांना घ्यावीशी वाटली. 
बाल भारती अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसोबतच इतरही पुस्तके प्रकाशीत करतं. पण ही पुस्तके फारशी मुलांपर्यंत पोचतच नाहीत. बालभारतीची ही अभ्यासक्रमाव्यतिरिक्तची पुस्तके या ग्रंथ महोत्सवात मांडण्यात आली होती. ज्याला बालवाचकांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला. 

या ग्रंथ महोत्सवात जे सांस्कृतिक कार्यक्रम योजले होते त्यांतही वाङमयीन दृष्टी राखण्यात आली होती. सावरकरांच्या कविता व गीतांवर आधारीत ‘शुरा मी वंदिले’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कलाकारांनी सादर केला. महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगांवकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या प्रथम मासिक स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कविता व गीतांवर आधारीत कार्यक्रम ‘आनंदयात्री’ या महोत्सवात सादर झाला. 

गंभीर वैचारिक पुस्तके म्हणजे निव्वळ कपाटाचे धन. त्यांना कोण वाचणार असा सार्वत्रिक समज आहे. हा दूर करण्यासाठी या महोत्सवात रावसाहेब कसबे यांच्या ‘भक्ती आणि धम्म’ या हजार पानाच्या जाडजूड गंभीर पुस्तकावर चर्चा घडवून आणण्यात आली. 

एक मोठं विचित्र दृश्य या ग्रंथ महोत्सवात पहायला मिळलं. तथाकथित साहित्यीक, मराठीचे प्राध्यापक हे पुढाकार घेवून काही करताना दिसत नव्हते. इतकेच नव्हे तर पुस्तक खरेदी करतानाही ते फारसे दिसत नव्हते. उलट सामान्य वाचक ज्याला कुठलाही चेहरा नाही असे आपण म्हणतो तो मोठ्या उत्सुकतेने पुस्तक पाहताना खरेदी करताना दिसत होता. हे कशाचे लक्षण मानायचे? शालेय विद्यार्थ्यांचे कविसंमेलन झाले त्यात एका विद्यार्थ्याने 

दर्ग्यावर चढवली जाते 
चादर मोठ्या श्रद्धेने
बाहेर त्याच देवाची लेकरे
कुडकुडतात थंडीने

अशी वरवर  साधी वाटणारी पण या व्यवस्थेलाच प्रश्‍न करणारी कविता सादर केली. ही संवेदनक्षमता छोटी मुलं दाखवत आहेत. शब्दकोश खरेदी करण्यासाठी एखादी छोटी मुलगी आईपाशी हट्ट करत आहे. चित्रांच्या पुस्तकात कुणी लहान मुलगा हरवून गेला आहे. त्याला आजूबाजूचे भानच नाही. शासनाने नामदेव गाथा प्रकाशीत केली पण ती सटीप नाही. या ग्रंथ महोत्सवात नमादेवांची सटीप गाथा उपलब्ध होताच एका म्हतार्‍या आजोबांना विलक्षण आनंद झाला. त्यांनी तातडीने खिसे चाचपून पैसे काढले व ती गाथा खरेदी केली. 

प्रकाशकांनी शिक्षण संस्थेच्या सहकार्याने भरविलेल्या या ग्रंथ महोत्सवाचा उद्देश सफल झाल्याचा पुरावा या छोट्या छोट्या घटना देतात. हा ग्रंथ महोत्सव नियमित भरत राहिला तर वाचनाबाबत एक चांगले चित्र निर्माण झालेले दिसेल. 

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, January 25, 2016

साहित्य कोकिळांचे डि‘पियू’ डि‘पियू’



उरूस, पुण्यनगरी, 25 जानेवारी 2016

वसंंत ऋतूत आंबराईतून कोकिळेचा मधुर असा स्वर उमटतो त्याला कुहू कुहू म्हणतात. हिंदीत हा उच्चार पियू पियू असाही केला जातो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्याचा वसंत ऋतू. हे संमेलन पुण्याजवळ पिंपरी चिंचवड येथे भरले होते. या संमेलनातून एकच नाद सर्वत्र उमटत होता. तो म्हणजे डि‘पियू’ डि‘पियू. 

डिपियू म्हणजे डि.वाय.पाटील युनिव्हर्सिटी. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डि.पाटील यांचे सासरे श्री. डि.वाय.पाटील यांचे हे विद्यापीठ. त्यांनीच हे सगळे संमेलन व्यापून टाकले होते. 
संतोष पद्माकर पवार याची कविता आहे (पचायला जड असे काही शब्द बदलले आहेत.)

लोकांना मुर्ख बनवून 
विजयी झालेल्यांच्या मिरवणुकीत
हजार नालायक नाचले 
तरी हरकत नाही
पण एका विवेकी माणसाचा पाय
थिरकला नाही पाहिजे.

अखिल भारतीय साहित्य संमेलन नावाच्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करणार्‍या प्रचंड मोठ्या जत्रेत कितीतरी प्रतिभावंत भान हरपून नाचत सुटले. पण असा कोणी निपजले नाही  की जो ठणकावून म्हणेल, ‘मला निमंत्रण आपण दिले हरकत नाही. पण अशा संमेलनात मी येणार नाही.’ काही जणांनी परस्परच जाणे टाळले. पण त्यांनीही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. ते आपल्या घरातच चुप बसून राहिले. यामुळे घडले काय की सर्वसामान्य रसिकांपर्यंत हा संदेश गेला की थोड्याफार पैशाचे आमिष दाखविले की भले भले साहित्यीकही चळायला लागतात. त्यांची काही फार मोठी पत्रास ठेवण्याची गरज नाही. 

या साहित्य संमेलनात ठळकपणे स्वागताध्यक्षाचे फोटो जिकडे तिकडे झळकत होते. बाकी कोण अध्यक्ष, कोण उद्घाटक, कोण समारोपाचा पाहूणा हे कोणाच्याही समोर ठळकपणे आले नाही. हे संमेलन साहित्य महामंडळाच्या हातून केंव्हाच सुटून गेले. पतंगाची दोरी आमच्या हातात असते असं म्हणणारे महामंडळ. प्रत्यक्षात या महामंडळाच्या हातात दोरीही उरली नाही. पतंग गेला दोरी सुटली केवळ चरखीच यांच्या हाती राहिली. 

गेल्या 20 वर्षांमध्ये संमेलनाचे स्वरूप प्रचंड पालटून गेले. 1995 मध्ये मराठवाड्यात परभणीला अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले होते. गोळा झालेली एकूण रक्कम होती 40 लाख आणि खर्च झाला होता 32 लाख रूपये. उरलेल्या 8 लाखांचा ‘अक्षर प्रतिष्ठा’ नावाचा एक ट्रस्ट स्थापन झाला होता आणि त्यामाध्यमातून दिवाळी अंकाचे प्रकाशन, जिल्हा संमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रम असे 10 वर्षे चालले. आज संमेलनाचा खर्च 5 कोटीच्या पुढे गेला आहे. पंधरापट किमान खर्च वाढला आहे. मग साधा प्रश्न आहे की 1995 मध्ये मराठी ललित वैचारिक साहित्याच्या (ज्यासाठी हे साहित्य संमेलन भरविले जाते) पुस्तकाची आवृत्ती 1100 निघत होती. ती आज कितीवर आली आहे?  सर्वसाधारणपणे आज मराठी ललित वैचारिक पुस्तकाची आवृत्ती फक्त 300 किंवा 500 ची निघते. म्हणजे एकीकडे संमेलनाचा खर्च प्रचंड वाढला आहे. साहित्यीकांचे मानधनही यावेळेस भरपूर दिल्या गेले. मग पुस्तकांची आवृत्ती का कमी निघते आहे? याचे उत्तर कोण देणार? 

कुसुमाग्रजांच्या एका कवितेत ‘मंदिर सलामत तो मूर्ती पचास’ असा उपहास केलेला आहे. मग आपण तसं म्हणायचं का की संमेलनत सलामत तो पुस्तक पचास? पुस्तकांचा विचार करायचाच कशाला. साहित्यीकांना विचारतोच कोण. संमेलन म्हणजे एक भलामोठा इव्हेंट आहे. त्या निमित्ताने मोठी उलाढाल होते आहे. केटरिंग वाल्यांना धंदा मिळतो आहे. मंडपवाले खुश आहेत. शुटिंग करणार्‍यांची चांदी झाली आहे. हॉटेलवाले उत्साहात आहेत. 

इतकंच कशाला पुस्तकांचे जे प्रदर्शन भरलं होतं ते विक्रेते प्रकाशकही  खुश आहेत. कारण पुस्तकांची उलाढाल प्रचंड झाली. आता कोणती पुस्तके विकली गेली ते विचारू नका. यश कसे मिळवावे, लठ्ठपणा कसा कमी करावा, मधुमेहावर नियंत्रण कसे मिळवाल? माणसं जोडावी कशी? इंटरनेटचा वापर कसा करावा, संगणक शिकण्याची सोपी युक्ती, पुरूषांनी करावयाच्या सोप्या पाककृती,  बाळाची चाहूल अर्थातच आजीबाईचा बटवा, चित्रे रंगवा, ओरिगामी वगैरे वगैरे. 

गेली काही वर्षे संमेलनात जी पुस्तके विकली जातात त्यांचा साहित्याशी काहीही संबंधच उरला नाही. मुळात साहित्य संमेलनाचा आणि साहित्याचाच काही संबंध उरला नाही. परिसंवादात बोलणारे बरेच वक्ते  असे निर्माण झाले आहेत की ते कोणत्याही संमेलनात कुठेही कोणत्याही विषयावर किमान अर्धा घंटा बडबड करू शकतात. 

संमेलनाचा अध्यक्ष, त्याला कुणी  विचारायला तयार नाही. तो काही महत्त्वाचे साहित्यीक विषय मांडतो आहे असंही नाही. तो काही फार मोठा दर्जेदार वाचकप्रिय साहित्यीक आहे असेही नाही. वक्ते काय बोलतात त्याचेही काही कुणाला फारसे महत्त्व शिल्लक नाही. कविसंमेलनातील कवितांच्या आठवणी आजकाल मनात दरवळत नाहीत. साहित्य महामंडळ स्वागताध्यक्षाच्या दावणीला पूर्णपणे बांधलेले आहे हे या संमेलनाने सिद्ध झाले. सर्वसामान्य वाचकांबाबत बोलावे तर आलेल्या कित्येकांना ते कशासाठी आले तेच माहित नसते. केवळ मोठी जत्रा आहे. भरपूर लोक गोळा झाले आहेत. अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षीत, मकरंद अनासपुरे, आशा भोसले, लता मंगेशकर, शाहरूख खान वगैरे वगैरेसाठी आलो असेच जास्तीत जास्त लोक सांगतिल. ज्या प्रतिभावंत साहित्यीकांसाठी हे संमेलन आहे असं म्हणावं तर त्यांनी केंव्हाच आपले सारे सत्व स्वागताध्यक्षाच्या पायी गहाण ठेवले आहे. मग हे संमेलन हवेच कशाला? 

संमेलनाच्या एकूण खर्चापैकी किती रक्कम साहित्यीकांवर प्रत्यक्ष खर्च झालेली आहे? ठाण्याच्या साहित्य संमेलनात पाच वर्षांपूर्वी एक कोटी बारा लाखांपैकी केवळ साडेचार लाख रूपये साहित्यीकांच्या मानधन व प्रवासखर्चावर झाल्याचे समोर आले होते. या संमेलनातही सगळी मिळून ही रक्कम दहा पंधरा लाखाच्या पुढे जात नाही. मग हे बाकीचे पैसे खर्च झाले कशावर? गाडीखालून चालणार्‍या कुत्र्याला वाटते की आपण गाडी चालवतो. हळू हळू कुत्राच इतका मोठा झाला की गाडीचा बैल त्याच्यापुढे लहानच झाला इतकेच नाही तर तो केविलवाणा झाला. गाडीतली माणसेही हतबल झाली. गाडीवानाने तर केंव्हाच कासरा सोडून दिला. कुत्र्याने शेपटी हलवली की त्या प्रमाणे आपण हलायचे इतकेच आता गाडी-बैल-गाडीवान-गाडीतील माणसं यांच्या हातात उरलं असं दिसतं आहे.

कुसुमाग्रजांचीच विशाखातील एक कविता आहे

नवलाख तळपती दिप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणि करते व्याकुळ केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्यांची वात

आजही छोट्या छोट्या गावात पहाटे आलेले वृत्तपत्र एखादा म्हातारा उन्हात बसून डोळे फोडून वाचत बसतो. त्यातील एखादा लेख आवडला तर त्या लेखकाला आवर्जून फोन करून आपली भावना साध्या शब्दांत व्यक्त करतो. आजही शाळेत एखादा पोरगा सुट्टीच्या वेळात डबा खाणं झाल्यावर शाळेच्या भंगार झालेल्या वाचनालयातून एखादे फाटके पुस्तक घेवून वाचत बसतो. आजही एखादी म्हातारी दुपारी खिडकीजवळ बसून पोथी वाचत काहीतरी पुटपुटत राहते. आजही छोट्या गावातील एखादा उमेदीचा कवी आपली नवी कविता उत्साहाने फेसबुकवर टाकतो आणि तथाकथित मोठ्या म्हटल्या जाणार्‍या एखाद्या साहित्यीकाची त्यावर काय प्रतिक्रिया येईल याची वाट पहात बसतो. आजही तालूक्याच्या गावी निवृत्त झालेला एखादा शिक्षक गावच्या वाचनालयात व्याख्यानाचा कार्यक्रम होण्यासाठी धडपड करतो. आलेल्या व्याख्यात्याला प्रेमानं घरी नेवून जेवू खावू घालतो... अशा मंद दिव्यांच्या वाती उजळत आहेत. तेवढीच आशा आहे. बाकी संमेलन नावाचा झगमगाट ज्यांना छान वाटतो त्यांना वाटत राहो. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Monday, January 18, 2016

चली चली रे पतंग मेरी चली रे

उरूस, पुण्यनगरी, 18 जानेवारी 2016

निळ्याभोर आभाळात मुक्तपणे उडणारा पतंग स्वातंत्र्याचे आनंदाचे प्रतीक नेहमीच वाटत आलेला आहे. जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या काळात आभाळात डोलणारे पतंग मनाला उत्साही करतात. गुजरातमध्ये पतंगाचे अतोनात वेड आहे. संक्रांतीचे तीन दिवस (भोगी, संक्रात, कर) अक्षरश: लाखो पतंग आभाळात उडताना अख्ख्या गुजरातमध्ये आढळतात. अहमदाबादला मोठा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव भरतो. 

जुन्या हिंदी चित्रपटात पतंगावरचे एखादे गाणे हमखास असायचे. पतंगावरचे सगळ्यात सुंदर गाणे भाभी (1957)  चित्रपटात आहे. चित्रगुप्त या गुणी पण काहीसा बाजूला राहिलेल्या संगीतकाराचा हा सगळ्यात ‘हिट’ चित्रपट. यातील ‘चल उड जा रे पंछी’ या गाण्यानं मोठी लोकप्रियता मिळवली होती. पतंगाचे हे सुंदर गाणे लता आणि रफीच्या आवाजात आहे. राजेंद्रकृष्ण सारख्या गीतकाराने मोठ्य नजाकतीने हे गाणे लिहीले आहे. 

चली चली रे पतंग मेरी चली रे
चली बादलों के पार
हो के डोर पे सवार
सारी दुनिया ये देख देख जली रे

या गाण्यात एक अतिशय चपखल शब्द राजेंद्रकृष्ण यांनी वापरला आहे. 
रंग मेरे पतंग का धानी
हे ये नील गगन की रानी
याओळी मध्ये धानी हा शब्द आला आहे. ‘धानी’ रंगाला मराठीत जो पर्यायी शब्द आहे तो आहे ‘आनंदी’. बायका साड्यांचा बाबतीत हा शब्द नेहमी वापरतात. आनंदी रंगाची साडी म्हणजे निळ्यातील उजळ छटेची साडी. इंग्रजीत कॉपर सल्फेट ब्लु असा शब्द यासाठी आहे. हा पतंगाचा रंग त्या निळ्या आभाळाचेच प्रतिक आहे. आनंदाचे प्रतिक आहे. असंच राजेंद्रकृष्ण यांना सुचवायचे आहे. हे गाणे जगदीप आणि नंदावर चित्रित आहे. गाण्याचे अतिशय साधे पण लयदार शब्द आणि चित्रगुप्तचे मधुर संगीत अगदी जुळून आले आहे. या एका चित्रपटाने चित्रगुप्तला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यामानाने त्याच्या इतर चित्रपटांना ती लाभली नाही. निळ्या रंगावर बोरकरांनी लिहीताना 
असे नाना गुणी निळे
किती सांगू त्यांचे लळे
त्यांच्यामुळे नित्य नवे 
गडे तूझे माझे डोळे
अशा फारच सुंदर ओळी लिहील्या आहेत. 

दुसरं गाणं प्रत्यक्ष पतंगावरचे नाही. पतंगाचे प्रतिक वापरलेले आहे. रागिणी (1958) या चित्रपटात  किशोर कुमार पद्मिनीवर यांच्यावर हे गाणे चित्रित आहे. आशा भोसले गाण्याचे सुरवात करते
पिया मै हू पतंग तू डोर
मै उडती चारो ओर
मेरा दिल ये जवा
रहे बस मे कहा 
जब छायी घटा घनघोर
आता खरं तर पतंगाचा आणि पावसाळी हवेचा काही संबंध आहे का? पण हिंदी चित्रपट गीतांमध्ये अशा काही प्रश्नांना जागाच नाही. किशोरकुमार आशा भोसलेच्या सुरांना साद घालतो
बांकी अदा नैना मतवाले
चाल नयी अंदाज निराले
प्यार का जादू दिल पर डाले
आंख मिला कर निंद चुरा ले
पतंग राहिला बाजूला आणि प्रीतीचा पतंगच डोलत राहतो

तिसरे गाजलेले गाणे नागिन (1954) चित्रपटातील आहे. हेमंत कुमारच्या संगीतातील बीन या चित्रपटानंतर विलक्षण लोकप्रिय झाली होती. ‘मन डोले मेरा तन डोले’ ने अजूनही रसिक डोलतात. यात हेमंत कुमार लताच्या आवाजात मोठं गोड गाणं आहे
अरी छोड दे सजनीया
छोड दे पतंग मेरी छोड दे
एैसी छोडू ना बलमवा
नैनवा के डोर पहले छोड दे
हे गाणंही राजेंद्रकृष्ण यांनीच लिहीले आहे. रागिणी सारखेच या गाण्यात पतंगाला प्रेमाचे प्रतिक म्हणून वापरले आहे.

'पतंग' नावाचा एक चित्रपट 1960 मध्ये आला होता. राजेंद्रकुमार माला सिन्हाच्या यात भूमिका आहे. अंधळ्या मुलीची भूमिका माला सिन्हाने केली आहे. ओमप्रकाशवर चित्रित रफीच्या आवाजातील पतंगावरचे गाणे यात आहे. 
ये दुनिया पतंग
नीत बदले ये रंग
कोई जाने ना 
उडानेवाला कौन है
साध्या गाण्यातून जगण्याचं तत्त्वज्ञान समोर उलगडत गेलं आहे. गाणं फारसं लोकप्रिय झालं नाही. चालही फार काही वेगळी नाही. पण यात पतंगाचे जे रूपक जिवनासाठी वापरले ते मोठे मस्त आहे.
सब अपनी उडाये ये जान न पाये
कब किसकी चढे किसकी कट जाये
ये है किसको पता कब बदले हवा
और डोर इधर से उधर हट जाये
हो वो डोर या कमान
या जमिन आसमान
कोई जाने ना बनाने वाला कौन है
अगदी साध्या शब्दात जगण्याचे तत्त्वज्ञान आले आहे.

हिंदी चित्रपट गाण्यातील माधुर्य 1970 नंतर संपत गेलं. मग बहुतांश सख्येने आलेली गाणी निव्वळ गोंगाट होती. कल्याणजी आनंदजी यांनी ‘5 राइफल्स’  (1974) मध्ये एक गाणं दिलं आहे. ‘प्यार की पतंग डोर जिसके हाथ है, किस्मत भी उसके साथ है, जो ले उडा लो ले उडा’. राजेंद्रकृष्ण यांनीच हे गाणं लिहीलं आहे. पण त्याचे चिज़ करणारे संगीतकार नंतर उरले नाहीत. किशोरकुमार सारखा चांगला आवाज आहे. पण गाणं मात्र कानाला गोड वाटत नाही. 

बाकी काही गाण्यांमध्ये पतंगाचा उल्लेख शम्मा परवाना मधला पतंग म्हणून आहे. स्वतंत्र पतंगावर गाणे नाही.


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, January 11, 2016

शारंगदेव महोत्सव पार्वती दत्ता आणि महागामी

उरूस, पुण्यनगरी, 11 जानेवारी 2016


तेराव्या शतकात काश्मिरमधील संगीत विद्वान शारंगदेव यास देवगिरीच्या यादवांनी सन्मानाने आपल्या दरबारात बोलावून घेतले. त्याला राजाश्रय दिला. याच शारंगदेवाने ‘संगीत रत्नाकर’ या शास्त्रीय संगीतातील पायाभूत ग्रंथाची निर्मिती देवगिरीच्या परिसरात केली. सातशे वर्षानंतर एका नृत्य कलाकाराला या भूमिचे आकर्षण वाटले. तेंव्हा जसे देवगिरीच्या यादवांनी शारंगदेवाला आमंत्रित केले होते तसेच महात्मा गांधी मिशन संस्थेने या नृत्यांगनेला आमंत्रित केले. संस्थेचे आमंत्रण तिने स्विकारले आणि महात्मा गांधी मिशन संस्थेच्या रम्य आवारात ‘महागामी’ या कला अकादमीची स्थापना केली. कलकत्त्यात जन्मलेल्या, भोपाळमध्ये वाढलेल्या, दिल्लीत शिकलेल्या या नृत्यांगनेचे नाव आहे सुश्री पार्वती दत्ता. 

जानेवारी महिना म्हटलं की संक्रांतीचा तिळगुळ आणि निळ्या आभाळात विहरणारे हजारो पतंग सगळ्यांना आठवतात. पण गेल्या सहा वर्षांपासून औरंगाबादकरांना यासोबत अजून एका गोष्टीची आवर्जून आठवण येते. ती म्हणजे महागामीच्या वतीने भरविण्यात येणारा ‘शारंगदेव महोत्सव’. हा महोत्सव सुरू करणे आणि आजपर्यंत ती परंपरा यशस्वीरित्या संपन्न करणे यामागे उभी असलेली नृत्यांगना म्हणजे गुरू पार्वती दत्ता.

मुळच्या कलकत्त्याच्या असलेल्या पार्वती दत्ता आई वडिलांसोबत पुढे भोपाळमध्ये आल्या. उच्च पदावर काम करणार्‍या अभियंता आई वडिलांच्या पोटी जन्मलेली ही मुलगी स्वाभाविकच अभियंताच होईल असे नातेवाईक मित्रमंडळींना वाटायचे. पण नृत्याची असलेली अंगभूत ओढ तिला शांत बसू देईना. भोपाळ शहरापासून दूर औद्योगिक वसाहतीत राहतानाही सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी शहरात या कुटूंबांच्या नियमित चकरा व्हायच्या. नृत्याशिवाय पुढे काहीच दिसेना तेंव्हा भोपाळ सोडून दिल्लीत जायचा निर्णय त्यांनी स्वबळावर घेतला. जून्या काळातही अभियांत्रिकी पदवी मिळवून मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या आईने त्यांना पाठबळ दिले. आत्मविश्वास दिला. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या त्यांच्या वडिलांना या कलेचे महत्त्व माहित होते. त्यांनी प्रोत्साहन दिले.   

गुरू बिरजू महाराज व गुरू केलुचरण महापात्रा यांच्याकडे गुरूकुल परंपरेने त्यांनी कथ्थक व ओडिसीचे शिक्षण घेतले. शिकत असतानाच्या त्यांच्या लक्षात येत गेले की आधुनिक काळात ज्या पद्धतीनं कलेचे शिक्षण दिल्या-घेतले जाते ते कामाचे नाही. शिष्य म्हणजे मुलासारखा आहे असं समजून गुरूकुल परंपरेत शिकवले तरच नृत्यासारखी कला पुढे नेता येईल. मोठ्या शहरांमध्ये जाण्यापेक्षा कलेचे कुठलेही फारसे वातावरण नसलेल्या गावात काम करणे हे खरे आवाहन असेल असे मानून त्यांनी औरंगाबादहून आलेले महात्मा गांधी मिशन संस्थेचे आमंत्रण स्विकारले.

महागामी गुरूकुलची सुरवात झाली तेंव्हा फक्त 10 विद्यार्थी होते. गेल्या 20 वर्षांत 2000 पेक्षा जास्त शिष्य इथे शिकले. अनुभूती या उपक्रमा अंतर्गत विविध रसिकांसमोर ही नृत्यकला रसग्रहणासाठी सादर केली जाते. जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रसिकांनी यात आपला सहभाग आत्तापर्यंत नोंदवला आहे. 

केवळ नृत्य शिकविणारी एक संस्था असे स्वरूप न राहता महागामी म्हणजे कला संस्कृतीचे एक केंद्र म्हणून विकसित झाले पाहिजे असा दृष्टीकोन पार्वती दत्ता यांनी सुरातीपासून ठेवला. या परिसरात काम करत असताना या प्रदेशाचे सांस्कृतिक वैभव, येथील परंपरा याचाही शोध त्या घेत गेल्या. औरंबादला आल्यावर त्यांच्या या क्षेत्रातील कितीतरी स्नेह्यांनी त्यांना चिडवायला सुरवात केली की ‘तूम उस औरंगजेब की गांव मे बस चुकी हो जो संगीत के बारे मे क्या जानता था!’ पार्वती दत्ता यांना देवगिरी परिसर आणि त्या परिसरातील वेरूळ अजिंठा लेण्यांमधील कलेने कायमच आकर्षित केले होते. शारंगदेव, गोपाल नायक सारखे महान कलाकार विद्वान याच परिसरात घडले. तेंव्हा परत एकदा या जून्या लोकांच्या रचनांचा अभ्यास झाला पाहिजे. त्यांचे स्मरण झाले पाहिजे याची तीव्र जाणीव पार्वती दत्ता यांना झाली. 

इ.स. 2011 पासून शारंगदेव महोत्सवाची सुरवात झाली. भारतात संगीत विषयक खुप महोत्सव आहेत. पण त्यात कुठेही संगीतावर चर्चा, निबंध प्रस्तूती, संगीत संशोधनासाठी प्रोत्साहन, संगीताचे रसग्रहण हा भाग फारसा येत नाही. शारंगदेव महोत्सवात मात्र आवर्जून यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. दरवर्षी संगीतात महत्त्वाची कामगिरी करणार्‍या एका कलाकाराला ‘शारंगदेव सन्मान’ प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत धृपद गायक उस्ताद झिया फरिदउद्दीन डागर, कथ्थक गुरू पद्मविभुषण पं. बिरजू महाराज, बांसरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया, भरतनाट्यम गुरू पद्मा सुब्रमण्यम, विदुषी कपिला वात्सायन, कथ्थक गुरू कुमुदिनी लाखिया यांना हा सन्मान देवून गौरविण्यात आले आहे.

शारंगदेव महोत्सवात कितीतरी दुर्मिळ वाद्य, संगीत प्रकार यांचे दर्शन रसिकांना झाले. सुरबहार सारखे वाद्य जे की फारसे प्रचलित नाही, रूद्रवीणा तर ऐकायलाच भेटत नाही. धृपद गायकीही फारशी कानावर पडत नाही. यांचा आवर्जून समावेश या महोत्सवात पार्वती दत्ता यांनी केला आहे. शास्त्रीय नृत्यासोबत कितीतरी लोकनृत्याचे प्रकार भारतात आढळतात. लोकसंगीतानेही आपला देश संपन्न आहे. राजस्थानातील मांगनियार संगीत असो, इम्फाळ मधील पुंग चोलम असो, पुरूलिया जिल्ह्यातील छाऊ नृत्यप्रकार असो यांचाही आस्वाद शास्त्रीय नृत्य, वाद्यासोबत रसिकांना शारंगदेव महोत्सवात घेता आला आहे. यावर्षी पंडवानी गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगढच्या पद्मभुषण तिज्जनबाई आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. 
अनेक मोठमोठ्या कलाकारांनी आपली कला समर्पित भावनेने या महोत्सवात सादर केली आहे. प्रचंड मोठ्या छगमगाटी महोत्सवात हजारो प्रेक्षकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करताना समाधान भेटत नाही ही खंत अनेक कलाकार जाहिरपणे व्यक्त करत आहेत. अशा कलाकारांसाठी शारंगदेव महोत्सव हे एक आशादायी असे व्यासपीठ निर्माण झाले आहे. महात्मा गांधींच्या नावामुळे या परिसराला एक तात्त्विक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. अमजद अलि सारखा आंतरराष्ट्रीय किर्तीचा सरोदवादक या मंचावर आपली कला सादर करतो तेंव्हा त्याच्याही नकळतपणे त्याच्या सरोदमधून ‘रघुपती राघव राजाराम’ सारखी धुन निघते आणि रसिकही त्यावर डोलायला लागतात. 

‘ऑरा औरंगाबाद’ नावानं एक उपक्रम महागामीने चालविला आहे. परदेशी पर्यटक औरंगाबादला मोठ्या संख्येने येतात. त्यांना या परिसरात वास्तव्य असताना आपल्या कला परांपरांची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम आहे. तरूण प्रतिभावंत कलाकार आपली कला या पर्यटकांसाठी सादर करतात. पार्वती दत्ता यांनी याबाबत माहिती देताना मोठी कलात्मक बाब समोर आणली आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात शिवतांडव मुद्रेतील मुर्ती पाहिल्यावर पर्यटकांना जर परत संध्याकाळी शहरात आल्यावर शिवतांडव नृत्य प्रत्यक्ष पाहिला मिळाले तर त्यांना किती आनंद वाटेल. हे प्रत्यक्ष त्यांनी घडवून आणले आहे. वेरूळ अजिंठा पाहणारे पर्यटक संध्याकाळी महागामी परिसरात त्याच मुद्रा कलेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवतात. 

लहान मोठी अनेक मुले मुली या परिसरात ओडिसी, कथ्थकचे शिक्षण घेतात. खरं तर शिक्षण घेतात असं म्हणण्यापेक्षा जीवनाकडे कलेच्या दृष्टीने कसे पहावे हे समजून घेतात असं म्हणावे लागेल. 

स्वत: एक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कथ्थक व ओडिसी नृत्यांगना असलेल्या पार्वती दत्ता यांनी आपले आयुष्यच महागामी साठी समर्पित केले आहे. आपल्या आईसोबत त्या जेंव्हा या परिसरात आल्या तेंव्हा अगदी परिसराची स्वच्छताही आपणच कशी केली हे सांगताना त्यांना कुठे कमीपणा वाटत नाही. गांधीजींच्या तत्त्वाने या संस्थेचे कामकाज आपण कसे चालवतो हे सांगताना त्यांचे डोळे उजळून निघतात. त्यांच्या बोलण्यातला खरेपणा जाणवतो कारण त्यांनी स्वत: खादीचे सुती वस्त्रच नेसलेले आपल्या डोळ्यांना दिसत असतात. त्यांच्या गुरूकुलात स्वच्छता करणार्‍या महिलेची ओळखही त्या ‘मेरी सबसे पुरानी कलिग है !’ अशी करून देतात. जन्माने बंगाली असलेल्या पार्वती दत्ता यांनी विशेष मेहनत करून आपली भाषा बनवली. त्यांची हिंदी भाषा ऐकून मी त्यांना गमतीनं ‘ऐसी हिंदी को हम आयुर्वेदिक हिंदी बोलते है !’ म्हणालो तेंव्हा त्या लहान मुलासारख्या खळखळून हसल्या. त्यांची इंग्रजीही अतिशय डौलदार आहे. चांगला कलाकार हा चांगला प्रशासक असतो असे नाही. पार्वती दत्ता यांच्यात हा दुर्मिळ  योग जुळून आला आहे. 

येत्या 15 ते 17 जानेवारी दरम्यान 6 वा ‘शांरगदेव महोत्सव’ औरंगाबाद येथे संपन्न होत आहे. शारंगदेवाच्या भुमीत सांस्कृतिक बीजांची जी पेरणी पार्वती दत्ता करत आहेत त्याला चांगली फळं येवोत हीच कलेची देवता नटराजाच्या चरणी प्रार्थना.  
     
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, January 3, 2016

‘रंगीला प्यार का राही’ सुबीर सेन काळाच्या पडद्याआड


उरूस, 3 जानेवारी 2016

टांग्यात काळी टोपी घातलेला हास्य अभिनेता मेहमुद आणि साध्या साडीतील शुभा खोटे ही जोडी, पार्श्वभूमीला टांग्याचा ठेका सुरू होतो आणि पुढच्या गाण्यावर सगळं थिएटर नाचत उठतं. 

मै रंगीला प्यार का राही 
दूर मेरी मंझिल 
शौक नजर का तीर तूने मारा
दिल हुआ घायील.
तेरे लिये ही संभाल के रखा था
प्यार भरा ये दिल
तेरे इशारोंपे चलता रहेगा
ओ मेरे कातिल

हे गाजलेलं गाणं होतं 1959 च्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील हसरत जयपुरीने लिहीलेले. लताचा आवाज सगळ्यांच्याच ओळखीचा आणि आवडता होता. पण सोबतचा नवखा आवाज जो आजही रसिकांच्या कानात आहे, जो आवाज हेमंतकुमार सारखा वाटायचा पण हेमंतकुमारचा नव्हता. तो होता सुबीर सेन या बंगाली गायकाचा. कलकत्यात मंगळवार 29 डिसेंबर 2015 सुबीर सेनचे वयाच्या 81 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले.
अतिशय मोजकी पण लक्षात राहणारी गाणी हे सुबीर सेनचे वैशिष्ट्य. 1950 ते 1980 या काळात त्याची गाणी बंगालीत खुप गाजली. त्यामानाने त्याला हिंदीत फार थोडी गाणी मिळाली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेमंतकुमारशी मिळता जुळता त्याचा आवाज. त्यामुळे त्याची वेगळी छाप हिंदी चित्रपट सृष्टीत पडू शकली नाही.

’कठपुतली’ (1957) हा शंकर जयकिशन चा राज कपुर प्रॉडक्शन शिवायचा एक गाजलेला चित्रपट. या चित्रपटात सुबीर सेनचे गाणे ‘मंझिल वोही है प्यार की, राही बदल गये, सपनोंके महफिल मे हम तूम रहे’ आहे. पियानोवर बसलेला बलराज साहनी आणि सहज सोप्या हालचालींतून नृत्यविभ्रम करणारी वैजयंतीमला. सुबीर सेनेचे एकट्याचे त्याच्या हिंदी गाण्याच्या कारकीर्दीतील हे सगळ्यात सुंदर गाणे. त्यानंतर वर उल्लेखिलेले त्याचे लता सोबतचे सगळ्यात सुंदर गाणे ‘मै रंगीला प्यार का राही’. 

1959 मध्ये अर्धांगिनी नावाचा एक मीनाकुमारी राजकुमार यांचा चित्रपट आला होता. त्याला वसंत देसाईचे संगीत होते.  ‘झनक झनक पायल बाजे’ मध्ये लता-हेमंत च्या आवाजात नैन से नैन नाही मिलावो’ हे गाणे वसंत देसाई यांनी दिले होते. त्याच गाण्याची छाया वाटणारे अर्धांगिनी मध्ये सुबीर सेन आणि लताच्या आवाजात ‘प्यार मे मिलना सनम’ हे गोड गाणे त्यांनी दिले आहे. 

पुढे 1960 मध्ये मोहिंदर ने महलों के ख्वाब मध्ये राजा मेहंदी अली खान च्या ‘गर तूम बुरा ना मानो’ या गाण्याला गोड चाल बांधली आहे. ठोकळा प्रदीप कुमार आणि खट्याळ मधुबाला साठी सुबीर सेन आणि आशा भोसलेचा आवाज आहे. 

देव आनंद वहिदा रहमानच्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ मध्येही सुबीर सेनचा आवाज आहे. शंकर जयकिशनचे हे धार्मिक गाणे गंगेच्या काठावर चित्रित आहे. ‘आ जा रे आ जा रे आजा नैन दुलारे’ हे गाणे सुबीर सेन शिवाय आशाच्या आवाजातही आहे. गंगेत स्नान करून पुण्य मिळते या भावनेने आलेले भाविक, त्यांच्या गंगास्नानाच्या पार्श्वभूमीवर सुबीर सेनचा भारदस्त पण भावून आवाज उठून दिसतो. शंकर जयकिशनने याला संगीतही वेगळे दिले आहे.

राजेंद्रकुमार वैजयंतीमाला यांचा ‘आस का पंछी’ हा चित्रपट 1961 मध्ये आला. शंकर जयकिशनचे संगीत या चित्रपटाला होते. या चित्रपटाचे शिर्षक गीतच मुळी सुबीर सेनच्या आवाजात आहे. एनसीसी कॅडेटच्या वेशातील राजेंद्रकुमार हातातील कबुतर हवेत सोडून सायकलवर बसून हसरत जयपुरीचे शब्द आणि सुबीर सेनचा आवाज घोळवत निघाला आहे. मागे मोकळे आभाळ आणि त्यात उडणारे पक्षी. 
दिल मेरा एक आस का पंछी 
उडता है उंची गगन पर 
पहुंचेगा एक दिन कभी तो 
चांद की उजली जमीन पर 
(पुढे 1969 मध्ये माणसाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले). याच चित्रपटात ‘धिरे चलाओ जरा’ हे लतासोबतचे सुबीर सेनचे गाणेही छान आहे. 

शंकर जयकिशनशी सुबीर सेनचे सुर चांगलेच जुळले होते. पुढे 1964 मध्ये ‘अपने हुऐ पराये’ या चित्रपटात ‘गगन के चंदा न पुछ मुझको’ हे लता सोबतचे गोड गाणे सुबीर सेनचे शंकर जयकिशनने दिले आहे. मनोज कुमारच्या अगदी सुरवातीच्या चित्रपटांपैकी हा चित्रपट. 

शंकर जयकिशन शिवाय इतरही संगीतकारांनी सुबीर सेनचा आवाज वापरला. दत्तराम वाडकरने ‘जबसे तूम्हे देखा है’ (1963) सुबीर सेन सुमन कल्याणुरच्या आवाजात ‘चांद तले झुम झुम थिरक रही है घुंगरवालीया’ हे ठेकेदार गाणे दिले आहे. ठेकेदार यासाठी की दत्तराम त्याच्या तबल्याच्या बेहतरीन ठेक्यासाठी प्रसिद्ध होता. ठोकळा प्रदीप कुमार आणि नटखट गीताबाली वर हे गाणे चित्रीत आहे. कराचीचा सिंधी संगीतकार बुलो सी रानी यानेही सुबीर सेनचा आवाज आपल्या अनारबाला (1961) मध्ये ‘बहारे लुटा के’ या गाण्यात सुमन कल्याणपुर सोबत वापरला आहे.

‘हसता हुआ नुरानी चेहरा’ या गाजलेल्या गाण्यात लता सोबत जो आवाज होता तो कमल बारोट हीचा. कल्याणजी आनंदजी हे आधी कल्याणजी वीरजी शहा नावाने एकटेच संगीत द्यायचे. त्यांनी कमल बारोट आणि सुबीर सेन यांना घेवून ‘ओ तेरा क्या कहना’ (1959) चित्रपटात एक गाणे दिले आहे. मेहमुदवरचे हे गाणे ‘दिल लेके जाते हो कहा’ बर्‍यापैकी गाजले होते. 

हिंदी चित्रपटांत एक काळी गाण्याची अतिशय निकोप अशी स्पर्धा होती. त्यामुळे हेमंत कुमार सारखा आवाज म्हणून असलेल्या सुबीर सेनला खुद्द हेमंत कुमार यांनीच आपल्या चित्रपटात गायल्या लावल्याची दुर्मिळ घटनाही घडली आहे. लता, आशा, सुमन या त्यावेळच्या महत्त्वाच्या गायिकांसोबत गाणे गाणार्‍या सुबीर सेनच्या वाट्याला गीता दत्त सोबतही गाणे गायची संधी मिळाली आहे. ‘गोरी तोरे नटखट नैना, वार करे छूप जाये’ या सुबीर सेनच्या ओळींना ‘सैंय्या तेरे रसभरे बैना, सारी सारी रात जगाये’ असं सुंदर उत्तर गीता दत्त देते. शैलेंद्रच्या शब्दांना दोघांनीही अतिशय योग्य न्याय दिला आहे. 

बॉयफ्रेंड (1961) सं. शंकर जयकिशन, मासुम (1960)सं. रॉबीन बॅनर्जी, पासपोर्ट (1961) सं.कल्याणजी आनंदजी, जादू महल (1962) सं. बुलो सी रानी, रूप सुंदरी (1964) सं. सरदार मलिक. असे काही मोजके चित्रपट सुबीर सेनला मिळाले. पण त्याची छाप पडू शकली नाही. नंतर तो जास्त करून बंगाली संगीताकडेच वळला. त्याची बंगाली गाणी बरीच लोकप्रियही झाली. मोठ्या गायकांची छाप पडून त्या प्रभावाखाली येवून गाण्याची पद्धत हिंदीत आहे. सैगलच्या प्रभावात किशोर कुमार मुकेश होते याची साक्ष त्यांची सुरवातीची गाणी देतात. मोहम्मद रफी जी.एम. दुर्रानीच्या प्रभावात गायचा. लतावर नुरजहांचा प्रभाव होता. लताच्या आवाजाची छाया सुमन कल्याणपुरवर होती. रफीच्या छायेत तर महेंद्र कपुर, शब्बीर कुमार असे बरेच गायक होते. ज्यांना या प्रभावातून आपला वेगळा सुर गवसला ते टिकले. ज्यांना गवसला नाही ते काळाच्या ओघात लुप्त झाले. 

हेमंत कुमार गेल्यानंतर धर्मवीर भारती यांनी लिहीलं होतं ‘शोर और सुर मे येही फर्क होता है. शोर खत्म हो जाता है. और सुर खो जाता है. हेमंत कुमार का सुर आज खो गया.’ हेमंत कुमारची छाया असणारा सुबीर सेन आपल्यातून निघून गेला. त्याच्याही बाबतीत हेच म्हणावे लागेल. सुबीर कुमार का सुर आज खो गया. 
स्वर्गात बसून सुबीर सेन हेमंत कुमार समोर बसून गीता दत्त सोबत त्यांचेत गाणेख ‘गोरी तेरे नटखट नैना’ गात असेल.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, December 28, 2015

मनुस्मृती दहन दिन : 25 डिसेंबर

उरूस, पुण्यनगरी, 27 डिसेंबर 2015

डिसेंबर महिना विविध घटनांनी भरलेला आहे. 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण, याच दिवशी बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्या गेली, 24 डिसेंबर साने गुरूजींची जयंती, अभिनेता देवानंद याची पुण्यतिथी याच महिन्यात आहे (3 डिसेंबर) आणि शोमॅन समजला गेलेला राज कपुरचा जन्मही (14 डिसेंबर) याच महिन्यातला आहे. शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे यांचा वाढदिवसही याच महिन्यात (12 डिसेंबर) आणि शेतकरी नेते शरद जोशी यांचा स्मृती दिनही (12 डिसेंबर) याच महिन्यात. 

या शिवाय अजून एक वेगळी घटना याच महिन्यात घडली. 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले. या घटनेला आता 88 वर्षे झाली. बाबासाहेब हे भारतीय परंपरांचे दर्शनांचे मोठे अभ्यासक. त्यांना एखादा ग्रंथ जाळणे म्हणजे काय हे पूर्णपणे माहित होते. पुढे चालून दुर्गाबाई भागवत यांनी ग्रंथ जाळण्याबाबत जी टीका बाबासाहेबांवर केली त्याची जाणीव त्यांना निश्‍चितच असणार. पण  ‘लाथों के भूत बातों से नही मानते’ या म्हणी प्रमाणे एक सणसणीत कृती करावीच लागते. महात्मा फुल्यांनी धार्मिक ग्रंथांची खल्लड ग्रंथ म्हणून निर्भत्सना पूर्वीच केली होती. मग बाबासाहेबांना ग्रंथ जाळण्याचे पुढचे पाऊल उचलणे भागच होते. ते त्यांनी उचलले. बाबासाहेबांच्या या कृतीवर नरहर कुरूंदकरांनी केलेले भाष्य अतिशय मार्मिक आहे.  ‘हा ग्रंथ दिसेल तिथे जाळून टाकण्याची बाबासाहेबांची भूमिका नाही. ग्रंथ जाळून नष्ट करण्याचा रानटीपणा बाबासाहेबांना मान्य नव्हता. त्यांचे खरे भांडण पुस्तकाशी नसून त्यात व्यक्त झालेल्या समाजरचनेशी होते. ती समाजरचना जतन करू पाहणार्‍या मनोवृत्तीशी होते. म्हणून ते प्रतीकात्मक दहन होते. एक धक्का देवून सवर्ण समाजाला खडबडून जागे करण्याचा हेतू त्यामागे होता.’

ही मनुस्मृती नेमकी आहे तरी काय? त्यातील बहुतांश भाग टाकावू आहे यात काही वाद आता उरला नाही. 
1950 नंतर घटना लागू झाली आणि देशभर निदान कागदोपत्री समानता प्रस्थापित झाली. तेंव्हा बाबासाहेबांची कृती निश्‍चितच महत्त्वाची होती. पण सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणार्‍यांना मात्र या ग्रंथांला बाजूला ठेवून चालत नाही. आ.ह. साळूंके व नरहर कुरूंदकर यांच्यासारख्या विद्वानांनी यावर अतिशय प्रतिकूल लिहीले आहे. स्वामी वरदानंद भारती यांनी ‘श्री मनुस्मृती सार्थ सभाष्य’ हा ग्रंथ संपादित करून अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामूळे त्यात काय आहे हे आता सहज उपलब्ध आहे. 
महात्मा फुल्यांनी जेंव्हा अभ्यास करण्याच्या निमित्ताने हा ग्रंथ हाती घेतला तेंव्हा त्यांच्यासमोर इंग्रजी भाषांतर उपलब्ध होते. 1813 मध्ये या ग्रंथांची संस्कृत संहिता पुस्तक रूपात उपलब्ध झाली. मराठी भाषांतर उपलब्ध होण्यास 1877 साल उजाडावे लागले. जनार्दन महादेव गुर्जर यांनी केलेले हे भाषांतर निर्णयसागर प्रेसने प्रकाशीत केले. 

सध्या उपलब्ध असलेल्या संहितेप्रमाणे यात 2684 श्‍लोक आहेत. यातील फक्त 1 ते 58 श्लोक हे मनुने सांगितले आहेत. बाकी सर्व श्लोक हे भृगू ने सांगितले आहेत. म्हणजे एकप्रकारे ही भृगू संहिताच जास्त आहे. यातील किमान दहा टक्के श्लोक आजही विचार करावे असे आहेत. उदगीर येथील डॉ. गुडसूरकर यांनी अभ्यास करून यातील 268 ते 300 श्लोक शोधून काढले आहेत की ज्यांच्यावर आज कुठलाही वाद नाही. आजच्या काळाशी ते सुसंगत आहेत. निखळ वैचारिक भूमिकेतून या श्लोकांचा अभ्यास झाला पाहिजे असे त्यांचे अग्रहाचे प्रतिपादन आहे.

अरोग्य व आहार विषयक काही श्लोक मनुस्मृतीत आहेत. उष्टे अन्न खावू नये, अतिभोजन हे अनारोग्यकारक, आयुष्य कमी करणारे व दुसर्‍याचा घास हिरावणारे असते म्हणून ते टाळावे. संध्याकाळी जेवू नये व झोपू नये. पचण्यास जड असलेले पदार्थ खाऊ नये. जेवण केल्यावर लगेच स्नान करू नये. उलट स्नान केल्यावर मगच जेवण करावे. जव, गहू व दूध यापासून बनविलेले पदार्थ बर्‍याच दिवसांपवूर्वी केलेले असले तरी खाण्यायोग्य असतात. उदा. दुधातील दशमी वगैरे. आजच्या मांसाहाराविषयी जे समज गैरसमज पसरले किंवा पसरविले आहेत त्याबाबत एक अतिशय धक्कादायक धाडसी विधान मनुस्मृतीत आहे. या जगातील प्रत्येक सजीव वस्तू ही खाण्यायोग्य आहे. (श्लोक 5-28). आरोग्य विषयक लिहीताना ज्या गावात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्या गावात राहू नये. रात्री झाडाखाली झोपू नये. कामवासना उत्कट झाली तरी रजस्वला स्त्रीशी संभोग करू नये. 

ही सगळी विधाने आजही लागू पडतात. त्यातील विज्ञान आपण आज योग्यरितीने समजून घेतले आहे. तेंव्हा या भागाचा विचार आजही आपण करू शकतो. 

विद्या ही ब्राह्मणांनी आपल्या जवळ लपवून ठेवली आणि ती इतरांना दिली नाही असा एक आरोप केला जातो. पण मनुस्मृतीत मात्र विद्येसंबंधी वेगळे विचार आहे. विद्या ही आपल्या वरिष्ठांकडूनच नव्हे तर कनिष्ठा जवळ असली तरी शिकून घ्यावी. (इथे वरिष्ठ कनिष्ठ हे जातीप्रमाणे नसून सिनिअर ज्युनिअर या अर्थाने आहेत) गुरूने शिष्याला जे काही शिकवायचे ते ताडन न करता मधुर वाणीने शिकवाने. आज मुलांना मारू नये म्हणून जो नियम मानस शास्त्राच्या अभ्यासकांनी करायला लावला आहे त्याचा दाखला मनुस्मृतीत आढळतो. मूल्य घेवून शिकवू नये असा एक नियम मनुस्मृतीत सांगितला आहे. त्याचा आजच्या काळात इतकाच अर्थ काढता येतो की शिक्षणाचा बाजार मांडता कामा नये. 

स्त्रीयांवर मनुस्मृतीने अन्याय केला हे खरेच आहे. पण याच मनुस्मृतीत मातृगौरव सांगताना दहा उपाध्यायांपेक्षा आचार्य श्रेष्ठ, शंभर आचार्यांहून पिता, पित्यापेक्षा सहस्त्रपट माता गौरवार्ह आहे असं सांगितले आहे. आई म्हणजे सर्व भार सोसणारी पृथ्वीच होय असेही वर्णन यात आलेले आहे. 

थोरल्या भावाची पत्नी ही धाकट्या भावास गुरुमातेप्रमाणे व धाकट्या भावाची पत्नी थोरल्या भावास सुनेप्रमाणे आहे. परस्त्रीशी बोलताना भगिनी सुभगे असे संबोधून बोलावे. असेही यात आलेले आहे.
लग्नाच्या बाबत कन्येसाठी कुठलेही शुल्क घेवू नये असे सांगितले आहे. म्हणजे कुठल्याही अर्थाने हुंडा पद्धत त्याज्य. घरातील वडिलधार्‍यांनी मुलीचे लग्न योग्य वयात लावून दिले नाही तर तिने स्वत: पती निवडावा. 
आपल्या समाजाचा सगळ्यात छोटा घटक हा एक कुटूंब आहे. तेंव्हा गृहस्थाश्रम आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मानला गेला आहे. मनुस्मृतीने गृहास्थाश्रमास सर्व आश्रमांचा ‘प्राणवायु’ मानले आहे.

सार्वजनिक वाहतुकीचेही नियम मनुस्मृतीत आले आहेत. वृद्ध, रोगी, स्त्री, ओझे वाहणारा, विद्वान व राजा यांना आधी मार्ग उपलब्ध करून द्यावा. आजही हे आपण पाळणे संयुक्तीक आहे. प्रदुषणावर मनुस्मृतीत जे सांगितले आहे ते म्हणजे मल-मूत्र, रक्त, थुंकी, घाण व विष हे जलाशयांत टाकू नये. प्रत्येक गावाच्या भोवती किमान 400 हात रूंदीची मोकळी जागा (हरित पट्टा) गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवावी. नगराभोवती हाच पट्टा 2000 हात रूंदीचा असावा. राजमार्गावर घाण, केरकचरा टाकणे दंडनीय आहे. 

सार्वजनिक सुरक्षे बाबत सांगताना संध्याकाळी ग्रामांतर करू नये, गाव किंवा घर यांची तटबंदी ओलांडून उडी मारून प्रवेश करू नये, ज्या जलाशायाचे ज्ञान नाही त्यात उतरून स्नान करू नये, भल्या पहाटे अंधारात प्रवासाला निघू नये. हे सगळे साधारणत: दोन हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक स्थितीवर लिहीले आहे. 
विद्या, शिल्प, शेती, गोरक्षण, मजुरी, भिक्षा व दान यातून अतिरिक्त धन संचय होवू शकत नाही हे मनुने सांगितले आहे. म्हणजे यातून उपजिविका होवू शकते, पोटापुरते मिळू शकते पण काही शिल्लक राहू शकत नाही असे मनुस्मृतीचे म्हणणे आहे. 

भेसळीच्या बाबतही काही कडक दंड यात सुचविले आहेत. अंकुरित न होणारी बीजे विकणे तसेच बियाणांची भेसळ या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड सुचवला आहे. अभिचार कर्म (भानामती, चेटूक, मूठ मारणे इत्यादी वशीकरणाचे प्रयोग करणारे) तसेच जादूटोणा करारे यांना 200 पट दंड सुचविलेला आहे. दाभाळकरांची हत्या झालेल्या या महाराष्ट्रात या बद्दल अजून काय सांगायचे?वैद्यक शास्त्राचे कसलेही ज्ञान नसताना चिकित्सक बनुन जे औषणे वगैरे देतात त्यांनाही जबर दंड सुचविला आहे. बोगस डॉक्टरांच्या कितीतरी बातम्या आपण वाचत असतो.

असे किमान 300 श्लोक आज विचार करावे असे आहेत. डॉ. रंगनाथ गुडसूरकर यांनी आपल्या ‘निवडक मनुस्मृती’ या पुस्तकात यावर चर्चा घडवून आणली हे महत्त्वाचे काम केले आहे. 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन. या निमित्ताने या ग्रंथाला शिव्यादेण्यापेक्षा त्याच्या काळसुसंगत पैलूवर चर्चा होणे हे जास्त महत्त्वाचे.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, December 20, 2015

एकनाथी भागवत ग्रंथाचा ४४२ वा वाढदिवस !!


उरूस, दै. पुण्यनगरी, २० डिसेंबर २०१५

वेदांतविचारात उपनिषदे, ब्रह्मसुत्रे व भगवद्गीता यांना प्रस्थान त्रयी म्हणून संबोधण्यात येते त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामगाथा या तीन ग्रंथांना प्रस्थानत्रयी म्हणतात. वारकरी संप्रदायात या तीन ग्रंथांचे पारायण करणे आवश्यक मानले गेले आहे. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यांच्यावर विवेचनात्मक असंख्य ग्रंथ आहेत. या तुलनेत एकनाथ महाराजांचे ‘भावार्थ एकनाथी भागवत’ मात्र कमी चर्चिल्या/वाचल्या जातं. दिवाळी नंतर येणार्‍या पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) दिवशी या ग्रंथाची पुर्तता झाली. म्हणजे या 25 नोव्हेंबरला या ग्रंथाला बरोब्बर 442 वर्षे पूर्ण झाली. हा ग्रंथ एकनाथांनी काशीत बसून पूर्ण केला. तेथील विद्वानांनी या ग्रंथाचा सखोल अभ्यास करून आपला अनुकूल अभिप्राय दिला. या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. 

मराठी माणसांनी अभिमान बाळगावा अशी एक खास गोष्ट या ग्रंथाबाबत आहे. संस्कृत श्रीमद्भागवताचा इतर भाषांमध्ये अनुवाद गद्य स्वरूपात झालेला नव्हता. कन्नड तामिळ सारख्या भाषांमध्ये भागवताच्या दहाव्या स्कंधावर जो की कृष्णाच्या लीलांवर आधारीत आहे काव्य आढळतात. खुद्द संस्कृतमध्येही दहाव्या स्कंधावर काव्यरचना आहे. पण तत्त्वज्ञानात्मक असलेल्या एकादश स्कंधावर लिहील्या गेलं नव्हतं. संत एकनाथ हे या संस्कृत भागवताच्या एकादश स्कंधावर टीका लिहीणारे संस्कृतेत्तर पहिले विद्वान ठरतात. म्हणून त्यांचे महत्त्व आहे.

मराठी भाषेच्या संदर्भात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे नाथांनी गायलेली मराठीची थोरवी. संस्कृतमधील ज्ञान आपण मराठीत आणले हे जाणीवपूर्वक केलेले काम आहे. संस्कृतचे महत्त्व ज्यांना असाधारण वाटते अशा विद्वनांनी हा प्रादेशीक भाषेतील ग्रंथ आहे म्हणून याची उपेक्षा करू नये हे एकनाथांनी आग्रहाने मांडले आहे.  

धनवंतु रत्नपारखी पुरा । तेणे धुळीमाजी देखिल्या हिरा । 
गांधी बांधोनि आणी घरा । पारखी खरा निजज्ञाने॥ 
तैसे ज्ञाते विद्वज्जन । ग्रंथु मराठी देखोन । 
उपेक्षा न करितां करावा यत्न । पारखोनि चिद्रत्न साधावया ॥ 
क्षुद्रदृष्टी पाहणे पाहतां । बोलू लागेल व्यासाचे ग्रंथा । 
मा हे तरी मराठी कविता । सांडूनि कुटिलता पाहावी ॥

याहीपुढे जात नाथांनी मराठी भाषेचा गौरव आपल्या ओव्यांमधून एकनाथी भागवताच्या सुरवातीलाच केला आहे. संस्कृत देवांची भाषा आहे मग मराठी भाषा काय चोरापासून झाली असा रोकडा सवाल नाथांनी चारशे वर्षांपूर्वी केला होता. 

संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृती काय उणीवी । 
नवी जुनी म्हणावी । कैसेनि केवी सुवर्णसुमने ॥ 
कपिलेचे म्हणावे क्षीर । मा इतरांचे काय ते नीर । 
वर्णस्वादे एकचि मधुर । दिसे साचार सारिखे ॥ 
जे पाविजे संस्कृत अर्थे । तेचि लाभे प्राकृते । 
तरी न मानावया येथे । विषमचि ते कायी ॥ 
दुबळी आणि समर्थ । दोहीस राये घातले हात । 
तरी दोघीसिही तेथ । सहजे होत समसाम्य ॥ 
देशभाषावैभवे । प्रपंचपदार्थी पालटली नांवे । 
परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवे पालटू ॥ 
संस्कृत वाणी देवे केली । प्राकृत तरी चोरापासोनि जाली । 
असोतु या अभिमानभुली । वृथा बोली काय काज ॥

ज्ञानेश्वर नामदेव संतांनी मराठीत रसाळ रचनेची एक वाट नाथांच्या समोर घालून दिलेलीच होती. नाथांची या पायवाटेचा हमरस्ता करण्याचा यत्न केला. आज इंग्रजी सारख्या भाषेशी तुलना करताना मराठीत विविध विषयांतील ज्ञानाची कमतरता जाणवते. नाथांनी त्या काळाला अनुसरून तेंव्हाचे ज्ञान मराठीत आणले आणि हे करताना सार्थ अभिमानही बाळगला. आजही मातृभाषेतून रचना करणार्‍यांनी ही नाथांची भावना उरी बाळगायला हवी. 

एकनाथी भागवताचा बोलबाला तत्त्वज्ञान ग्रंथ म्हणून झालेला असला तरी त्यातील काव्यही अप्रतिम आहे. प्रलयकाळी शंभर वर्षे जी घनघोर अतिवृष्टी झाली तीचे वर्णन म्हणजे पावसाच्या रौद्र रूपाचा एक अप्रतिम नमूना आहे. आजच्या कुठल्याही आधुनिक कवितेमध्ये असे वर्णन आढळत नाही.

स्वर्ग आणि पाताळतळा ।
कवळूनि उठल्या अग्निज्वाळा ।
तंव प्रळयकर्त्या मेघमाळा ।
क्षोभल्या त्या काळा अतिदुर्धरा ॥
म्हणाल तेथ मोठमोठे ।
वर्षो लागले थेंबुटे ।
तैसे नव्हे गा कडकडाटे ।
एकी धार सुटे अनिवार ॥
जैसी की मदगजाची सोंड ।
तैशा धारा अतिप्रचंड । 
शत वर्षेवरी अखंड ।
पर्जन्य वितंड पैं वर्षे ॥
विजु निजतेजे नभ जाळी ।
कडकडाटे दे आरोळी ।
काळाची बैसे दातखिळी ।
ऐसा प्रलयकाळी मेघ खवळे ॥

या सगळ्या रचनेत कुठे काय देव धर्म यांचा संदर्भ येतो? स्वर्ग पाताळ या पारंपरिक संकल्पना येतात पण त्या धार्मिक अंगाने येत नाहीत. संतांच्या कित्येक रचना या विशुद्ध भावकविता आहेत हेच आपण विसरून चाललो आहोत. ज्या संतांची रचना आहे त्याची जात आपण आधी पाहतो आणि मग तीला चांगली म्हणायचे की नाही याचा निर्णय घेतो. 

मैत्रीवरच्या ओव्याही या एकनाथी भागवतात आहेत. फ्रेंडशिप डे साजरा करणार्‍यांनी नाथांच्या 400 वर्षांपूर्वीच्या या ओव्या जरूर वाचाव्यात. 

जे विषयवियोगे न विटे । नाना विकल्पी न तुटे । 
आलिया परम संकटे । मैत्री नेटपाटे सदा ग्राह्य ॥ 
या नांव गा मित्रभावो। प्राण गेलिया न तुटे पहा हो । 
देखतां कल्पांतकाळाघावो । निजमित्रसमुदावो एकवटे की ॥ 

(जी मैत्री विषयाच्या वियोगाने विटत नाही, नाना प्रकारच्या संशयांनी तुटत नाही तीच सर्वकाळ मनी बाळगावी. प्राण गेला तरी न तुटणारा हा मित्रभाव याच्यावर घाव पडताच सर्व मित्र एकत्र येवून  हल्ला परतवून लावतात.)

धार्मिक वर्गात मोडल्या जाणार्‍या साहित्याचे एक दुर्दैव असे की त्याला सरसकट लाल बासनात बांधून गुंडाळून ठेवल्या जाते. भक्तांना चिकित्सा नको असते आणि विरोधकांना तर स्पर्शही करायचा नसतो. मग अशा ग्रंथांमधले शब्दांचे काव्याचे सौंदर्य कसे समजणार? 

एकनाथी भागवतावर भाष्य करणारे फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. जे उपलब्ध आहेत त्यात ह.भ.प.वै. शंकरमहाराज खंदारकर यांची टीका प्रमाण मानली जाते. वारकरी संप्रदायात खंदारकर महाराजांच्या भाष्याला मोठी किंमत आहेत. खंदारकर महाराजांच्या देहावसनानंतर 1991 मध्ये ‘भावार्थ एकनाथी भागवताची’ पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. एकनाथ पैठणचे-मराठवाड्याचे. खंदारकर महाराजांचे घराणेही मराठवाड्यातीलच. नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावी साधुमहाराज म्हणून संत इ.स. 1708-1812 या काळात होवून गेले. त्यांचे वंशज म्हणजे शंकर महाराज खंदारकर. पंढरपुरात ते महान निरुपणकार म्हणून प्रसिद्धी पावले. धुंडामहाराज देगलुरकर व मामासाहेब दांडेकर यांच्या बरोबरीने शंकर महाराजांच्या शब्दाला वारकरी फडांमध्ये महत्त्व प्राप्त झाले.

एकनाथांच्या भागवत रचनेवरील भाष्यग्रंथ लिहून खंदारकर महाराजांनी मोठं काम करून ठेवलं आहे. आपण त्याचे निदान वाचन तरी केले पाहिजे. 

एकनाथांचा गौरव करताना संत तुकारामांनी फार सोप्या पण मार्मिक भाषेत अभंग रचना केली आहे. 

ब्राह्मणाचा पोर खेळिया एक भला ।
तेणे जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करुनिया तेणे ।
वैष्णवांचा मेळ मिळविला रे ।
एकचि घाई खेळता खेळता ।
आपणचि बसवंत झाला रे ॥

लोकांना सोप्या भाषेत अध्यात्माच्या आवरणातून व्यवहाराचे ज्ञान नाथांनी दिले. मातृभाषेचा गौरव सामान्यांच्या मनात ठसवला. 442 वर्षांचा त्यांचा ग्रंथ त्यामुळे आजही महत्त्वाचा ठरतो.  
       
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575